Wednesday, 23 October 2024

 Reflection for 30th Sunday in Ordinary Time (27/10/2024) By Br. Reon Andrades

सामान्य काळातील तिसावा रविवार

दिनांक: २७/१०/२०२४

पहिले वाचन: यिर्मया ३१: ७-९

दुसरे वाचन: इब्री ५: १-६

शुभवर्तमान: मार्क १०: ४६-५२


 
प्रस्तावना

        आज आपण सामान्य काळातील तिसावा रविवार  साजरा करत आहोत. आजची वाचने आपणास विश्वासाचे जीवन जगण्यास पाचारण करत आहेत. 

       आजच्या पहिल्या वाचनात आपणास कळून  येते की, देव आपल्या बरोबर आहे त्याला आपली काळजी आहे. प्रत्येक क्षणी तो आपल्याबरोबर आहे व त्याला आपली काळजी आहे म्हणून तो आपणास आशेचे जीवन जगण्यास बोलावीत आहे.     

         दुसऱ्या वाचनात आपल्याला समजते की, येशू ख्रिस्ताला आपला मानवी दुर्बलपणा माहित आहे, कारण त्याने स्वतः तो अनुभवलेला आहे. ह्यास्तव तो देवापुढे मानवजातीला रास्तपणे सादर करण्यास सक्षम आहे ह्याची प्रचीती आपणास येते. 

        शुभवर्तमानामध्ये बर्तीमयचा विश्वास, त्याची चिकाटी व येशूवर असलेली खात्री ह्याचे दर्शन आपणास मिळत आहे.

        आपणही ख्रिस्ती विश्वासात वाढावेत व देवाचा अनुभव आपणास पावलो-पावली यावा. तसेच आपण आशेचे जीवन जगावे म्हणून आजच्या ह्या मिस्साबलीदानात आपण प्रार्थना करूया.

 

मनन चिंतन

        आज आपण सामान्य काळातील तिसावा रविवार साजरा करत आहोत. आजची वाचने आपणास देवावर विश्वास ठेवण्यास पाचारण करत आहेत.

        आजच्या पहिल्या वाचानात आपण पाहतो की, देवाला लोकांची काळजी आहे. तो आपल्या लोकांपासून दूर नाही तर प्रत्येक क्षणी, तो त्यांच्या सुख-दु:खात त्याचा सहभाग घोषित करत असतो. हद्द्पारीत व गुलामगिरीच्या अवस्थेत, देव आपल्या लोकांना यिर्मया संदेष्ट्याद्वारे, आशा बाळगण्यास सांगत आहे. देव फक्त चांगल्या लोकांनाच नव्हे, तर लंगडे, लुळे, अपंग, गर्भवती बायकाआंधळे सर्वांना आपल्या मायदेशात परत घेऊन येणार आहे. देव त्यांचे नेतृत्व करणार आहे व त्यांना चांगल्या वाटेने चालवणार आहे. जेणेकरून ते पडणार आणि त्यांना लागणार नाही. देव स्वतःला इस्रायेलचा  पिता घोषित करत आहे, म्हणजेच देव दूर नसून त्यांच्या बरोबर आहे. त्याला सर्व लोकांची काळजी आहे, ज्याप्रमाणे एका पित्याला आपली सर्व मुलं प्रिय असतात मग ति कशीही असो.

        दुसऱ्या वाचनात आपणाला कळून येत कि, येशू हाच एकमेव महायाजक आहे. त्याने आपल्या मरणाने सार्वकालिक एकमेव बळी अर्पण केला आहे. हा महायाजक आपणापासून दूर नसून तो, आपल्यासारखा आहे. त्याला आपल्या कमकुवतपणाचे जाणीव आहे. मानवाचा अशक्तपणा तो जाणतो, कारण त्याने स्वतः तो अनुभवलेला आहे.  तो मानवाला देवापुढे योग्यप्रकारे  सादर करण्याची योग्यता, त्याच्याकडे आहे.

आज शुभवर्तमानात आपण तीन प्रकारची माणसं पाहतो,

शिष्य: येशूच्या बरोबर त्यांना चालण्याची व शिष्य म्हणून घेण्याचे भाग्य त्यांना लाभले, परंतु ते त्या अंध भिकाऱ्याला पाहू शकले नाही. त्यांची वर्तणूक जणू काही बेपर्वाहीची होती. त्यांनी ना सकारात्मक नाही नकारात्मक भूमिका बजावली असती तर मार्क या शुभवर्तमानकरने नमूद तसे नमूद केले असते.

        आपणही अनेक वेळेला बेपर्वाही जीवन जगात असतो. आपल्या शेजार्याला आपली गरज आहे कि नाही ह्याची आपणाला चिंता नसते. आपण आपल्या जीवनात व्यस्थ असतो. आम्ही ख्रिस्ती आहोत हे आम्हाला पुरे, इतरांपर्यंत ख्रिस्त व त्याची शुभवार्ता पोहचविणे आमची जबाबदारी नाही, अशी आपली परिस्थिती असते.

लोकसमुदाय: लोकसमुदाय वाऱ्यासारखा आपली दिशा बदलत आहे. काही क्षणापूर्वी तो अंध भिकाऱ्याला गप्प राहण्यास धमकावले, परंतु येशूने त्याला बोलवताच त्याच्या प्रती त्यांचा व्यवहार बदलतो. ते त्याला धीर धरून उठवतात.

        आपणही लोक्सामुदायासारखे वागत असतो. कोणी आपणास सत्कृत्ये करताना पाहावे व आपल्याविषयी चांगले बोलावे म्हणून आपण कार्य करत असतो. हे कार्य आपल्या हृदयातून होत नसतं. जर आपल्यला पाहायला कोणी नसेल तर आपण ते सत्कार्य करत नाही. ज्या दिशेने आपली वाहवा होईल त्या दिशेने आपण तोंड फिरवत असतो.

बर्तीमय: अंध भिकारी, शारीरिकरित्या अंध होता परंतु अध्यात्मिकरित्या दूरदृष्टी बाळगणारा होता. आज आपणास पाहिल्याशिवाय विश्वास ठेवत नाही. परंतु बर्तीमय न पाहता, फक्त ऐकून विश्वास ठेवणारा होता. लोकसमुदायने धमकावून देखिल तो गप्प बसला नाही तर उलट मोठ्याने ओरडत होता. ह्यावरून त्याची चिकाटी आपणास दिसून येते. पुढे जेव्हा त्याला येशू बोलावतो तेव्हा, तो आपले भिकाऱ्याची वस्त्रे टाकून येशूकडे येतो. ह्याचा अर्थ हा  त्याला पूर्णपणे खात्री होती की, तो बारा होणार आहे व या पुढे त्याला त्या वस्त्रांची गरज भासणार नाही.

        आपण ह्या बर्तीमय प्रमाणे, विश्वासाचे, चिकाटीचे व खात्रीचे जीवन जगतो का? विश्वास त्या बर्तीमय सारखा आहे का? आपण प्रार्थना करतो पूर्ण होणार ह्याची आपणास खात्री असते का? हा प्रश्न आपण आज स्वतःला विचारूया.

        आज आपण आपली पडताळणी करूया की, मी कोणत्या गटात आहे.? माझे जीवन व वागणे त्या शिष्या-प्रमाणे, लोकसमुदाया-प्रमाणे अथवा बर्तीमय-प्रमाणे जगत आहे. आपणास चांगले ख्रिस्ती जीवन जगण्यास विश्वासाची देणगी मिळावी म्हणून आज आपण आपल्यासाठी व आपल्या बंधू-भगिनींसाठी विशेष प्रार्थना करूया.

श्रद्धावंतांच्या प्रार्थना

प्रतिसाद – दयावंत प्रभू आमची प्रार्थना ऐक.

१) आपले परमगुरु, महागुरू, धर्मगुरू व सर्व व्रतस्थ बंधू-भगिनी व सर्व भाविकांनी सदैव ख्रिस्ताच्या मळ्यात कार्यरत असताना देवाचे कार्य अविरीतपणे करत रहावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

२) प्रत्येक ख्रिस्ती भाविकांनी आपले जीवन जगत असताना देवावर व आपल्या शेजाऱ्यावर संपूर्ण मनाने, जीवाने व शक्तीने प्रेम करावे म्हणून प्रार्थना करूया.

३) आजच्या ह्या जगाचे भवितव्य तरुण पिढीच्या हातात आहे. परंतु आजची पिढी अनैतिकता, आत्महत्या, भ्रष्टाचार आणि इतर वाईट मार्गावर चालून आपले जीवन नष्ट करत आहेत. अश्या तरुणांना परमेश्वराचे मार्गदर्शन लाभावे व त्यांनी योग्य मार्गाचा अवलंब करावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

४) आपल्या समाजात व कुटुंबात जे कोणी आजारी आहेत अश्या सर्वांना प्रभूचा आशिर्वाद मिळावा व आजार सहन करण्यास शक्ती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

५) थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक गरजासाठी प्रार्थना करूया.



Thursday, 17 October 2024

Reflection for 29th Sunday in Ordinary Time (World Mission Sunday) (20/10/2024) By Br. Trimbak Pardhi

सामान्य काळातील एकोणतिसावा रविवार (जागतिक मिशन रविवार)

दिनांक २०-१०-२०२४

पहिले वाचन :- यशया ५३:१०-११

दुसरे वाचन :- इब्री लोकांस ४:१४-१६

शुभवर्तमान :- मार्क १०:३५ -४५

 प्रस्तावना

        आज देऊळमाता सामान्य काळातील एकोणतिसावा रविवार आणि मिशन रविवार साजरा करीत आहे. आजची उपासना आपल्याला मिशन कार्य करण्यास आवाहन करीत आहे. सर्वसाधारणपणे मिशन हा शब्द  “मिस्सीओ” या लॅटिन शब्दातून आला आहे. ज्याचा अर्थ “पाठविणे.” असा होतो.

        आजच्या पहिल्या वाचनात, "दुःख सहन करणारा सेवक" यावर आहे, ज्याच्या दुःखामुळे सर्वांचे तारण होते. हे ख्रिस्ताचे आगमन दर्शवते, ज्याने आपले जीवन आपल्या लोकांसाठी दिले. परमेश्वराच्या इच्छेने त्याच्या दुःख सहनाद्वारे, संपूर्ण मानवजातीचे तारण केले जाईल.

        आजच्या दुसऱ्या वाचनात, येशू हा आपला महान याजक म्हणून संबोधिले आहे. त्याने मानवी रूप घेतले आणि  सर्व प्रकारच्या मोहाच्या अनुभवातून तो गेला, म्हणून, आपण आत्मविश्वासाने देवाच्या सिंहासनाजवळ जाऊ शकतो आणि त्याच्या कृपेची आणि दयेची याचना करू शकतो.

        आजच्या शुभवार्तमानात सांगितले आहे कि, मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यावयास नाही तर तो सेवा करावयास आला आहे.  प्रभू येशूने जशी लोकांची सेवा केली तशीच आपल्याला तो आज मिशन रविवार साजरा करत असताना, आपणाला मिशन सेवाकार्य करण्यास आमंत्रण देत आहे. आपले मिशन म्हणजे ख्रिस्ताच्या प्रेमाचे साक्षीदार होणे. निराश असलेल्या लोकांना आशा देणे आणि ज्या लोकांना देवाची ओळख नाही अशा लोकांना देवाचा संदेश सांगणे. मिशन कार्य केवळ दुसऱ्या देशामध्येच नाही तर आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या कार्यस्थळी, आपल्या समाजात सुरू करूया.

मनन चिंतन

        प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो आज आपण मिशन रविवार साजरा करत आहोत. हा दिवस आपल्याला चर्चची मूलभूत ओळख म्हणजेच एक मिशनरी होण्याची आठवण करून देतो. येशूने आपल्या अनुयायांना दिलेली ती जबाबदारी आहे. “जगभर जा आणि सृष्टीतील प्रत्येकाला सुवर्ता सांगा” (मार्क १६:१५) हा आदेश केवळ काहींनाच नव्हे, तर प्रत्येक बाप्तिस्मा घेतलेल्या ख्रिस्ती व्यक्तीला दिलेला आहे.

        पोप फ्रान्सिस यांनी आपल्या कार्यकाळात मिशनरी देऊळमातेची सुधारणा करण्यावर भर दिला आहे. सिनडच्या माध्यमातून देऊळ मातेमध्ये मिशनरी परिवर्तन करून सुधारणा करण्याची पोप फ्रान्सिस यांची तळमळ आपण पाहत आहोत. यासाठी त्याग आणि समर्पण आवश्यक आहे. मिशनरी असणे नेहमी सोपे नसते, त्यासाठी त्याग, धैर्य आणि चिकाटी लागते. शतकानूशतके अनेकांनी सुवार्तेसाठी आपले जीवन अर्पण केले आहे. आज आपण त्या मिशनऱ्यांचा सन्मान करतो आणि त्याचं स्मरण करतो. त्यांनी आपल्या घरी असलेल्या सुख सोयीचा त्याग केला, अनेक संकटे सहन केली आणि येशूचा संदेश जगभर पसरवला पोहोचवला.

        प्रिय भाविकांनो मिशनमध्ये माझी भूमिका काय आहे, हे समजून घेण्यासाठी आपल्याला मिशन म्हणजे काय हे माहीत असले पाहिजे. बहुतेक भाविकांना मिशनचा अर्थ म्हणजे मुक्तीचे  धर्मशास्त्र असा वाटतो. परंतु याचा अर्थ असा की भुकेल्यांना अन्न देणे, बेघरांना निवास देणे, पर्यावरणाची काळजी घेणे असा होतो. ख्रिस्ताचा महान आदेश आपण मत्तयलिखित शुभवर्तमानात वाचतो, “स्वर्गात आणि पृथ्वीवर मला सर्व अधिकार देण्यात आला आहे. म्हणून तुम्ही जा आणि राष्ट्रातील लोकांस माझे शिष्य करा, पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावाने बाप्तिस्मा दया आणि जे काही मी तुम्हाला शिकवले आहे ते त्या लोकांना करायला शिकवा आणि पहा काळाच्या शेवटपर्यंत मी सदोदित तुमच्याबरोबर राहील.” (मत्तय २८:१९) 

        दुर्दैवाने ख्रिस्ताच्या महान आदेशाला आधुनिक तत्त्वांनी मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केले, थट्टा केली आणि तो आदेश फटाळला. आजही काही धर्म पंडित म्हणतात की, बाप्तिस्मा करण्याची गरज नाही, ते निष्कर्ष काढतात की एक छान, ,दयाळू, सामाजिक  न्यायी व्यक्ती होण्यासाठी तुम्हाला ख्रिश्चन असण्याची किंवा देवावर विश्वास ठेवण्याची गरज नाही आणि त्यामुळे आज देऊळे रिकामी होत आहेत.

        पोप फ्रान्सीस त्यांच्या २०२४ च्या जागतिक मिशन रविवारच्या संदेशात म्हणतात की, चर्चचे ध्येय सर्व लोकांसाठी निर्देशित केले आहे; आणि प्रत्येक बाप्तिस्मा घेतलेल्या व्यक्तीचा सहभाग आवश्यक आहे. मिशन म्हणजे सर्व पुरुष आणि स्त्रियांसाठी नेहमी अथक बाहेर जाणे, त्यांना देवाला भेटण्यासाठी आमंत्रित करणे. ज्याप्रमाणे येशू चांगला मेंढपाळ आणि पित्याचा संदेशवाहक हरवलेल्या मेंढरांच्या शोधाला गेला त्याप्रमाणे बाप्तिस्मा घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीने ख्रिस्ताची सुवार्ता पसरविण्यासाठी बाहेर पडले पाहिजे.

        प्रिय बंधूंनो व भगिनींनो, मिशन रविवार साजरा करताना लक्षात ठेवा की, चर्चचे मिशन केवळ काहीसाठी नाही तर प्रत्येकासाठी आहे. आपण हे आव्हान उत्साहाने स्वीकारूया आणि हे जाणून घेऊया की, देव आपल्या छोट्या प्रयत्नाद्वारे मोठी कामे करतो. चला, आपल्या दैनंदिन जीवनात मिशन जिवंत करण्याचा प्रयत्न करू आणि ज्यांनी देवाचा संदेश अद्याप ऐकलेला नाहीत्याच्यापर्यंत पोहचवण्यासाठी मदत करू व प्रार्थना करू की, आपल्याला खऱ्या मिशनऱ्यासारखे बनवण्यासाठी पवित्र आत्मा आपल्याला मार्गदर्शन करेल आणि मिशनरी उत्साहाने भरले जाईल, जगभर येशू ख्रिस्ताची सुवर्ता पसरण्यासाठी.

श्रद्धावंतांच्या प्रार्थना

प्रतिसाद – हे प्रभू, आमची प्रार्थना ऐक.

१. आपल्या धार्मिक नेत्यांनी, देऊळ मातेची शिकवणूक सर्व ख्रिस्ती लोकांपर्यंत पोहचवावी व त्यांना ती योग्यरीतीने आचरणात आणण्यासाठी मदत करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

२. ज्या धर्मगुरुनी, धर्मभगिनींनी व प्रापंचीकांनी स्वत:ला मिशन कार्यासाठी वाहून घेतलेले आहे अशा निष्ठावंतांवर परमेश्वराच्या कृपेचा वरदहस्त सदैव असावा व त्यांना त्यांच्या कृत्यातून प्रभूची सुवार्ता पसरविण्यास धैर्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

३. आपल्या धर्मग्रामातील आजारी व्यक्तींना चांगले आरोग्य, बेरोजगारांना रोजगार आणि दुःख-संकटात सापडलेल्यांना प्रभूचे दैवीसामर्थ्य प्रदान व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

४. ख्रिस्ती श्रद्धेमुळे ज्या ज्या लोकांवर अन्याय, अत्याचार होत आहेत, त्यांना ख्रिस्ती श्रद्धेशी एकनिष्ठ राहण्यासाठी प्रभूचा कृपाशिर्वाद मिळावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

५. सर्व पत्रकारांनी त्यांचे कार्य करीत असता नैतिकता व सत्यता ह्यांनी प्रेरित व्हावे आणि सामान्य शोषित जनतेसाठी ते प्रवक्ते बनावेत म्हणून प्रार्थना करूया.

६. थोडावेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.


Thursday, 10 October 2024

 Reflection for 28th Sunday in Ordinary Time (13/10/2024) By Dn. Rackson Dinis


सामान्य काळातील अठ्ठावीसावा रविवार

दिनांक १३-१०-२०२४

पहिले वाचन :- ज्ञानग्रंथ :- ७:७-११

दुसरे वाचन :- इब्री लोकांस पत्र :- ४:१२-१३

शुभवर्तमान :- मार्क १०:१७ -३०

प्रस्तावना

     ख्रिस्ताठायी जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो आज आपण सामान्य काळातील अठ्ठावीसावा रविवार साजरा करीत आहोत, आजची उपासना आपल्याला दैवी ज्ञान याचे महत्त्व सांगत आहे. दैवी ज्ञान हे देवाने दिलेले दान आहे. हे दैवी ज्ञान विश्वाची निर्मिती होण्याअगोदर ते अस्तित्वात आले होते. ह्या विश्वाची निर्मिती देवाच्या दैवी ज्ञानाने झालेली आहे.

        ज्ञान हे अमूल्य रत्न आहे, जगातील सर्व संपत्ती ही तात्पुरती आहे, परंतु दैवी ज्ञान हे अनंत काळाचे आहे. दैवी ज्ञान ही खरी संपत्ती आहे. दैवी ज्ञान आपल्याला मिळाले तर आपोआप जगाची सर्व काही संपत्ती आपल्या हाती येते. म्हणूनच आपण जीवनात प्राधान्य दैवी ज्ञानाला दिले पाहिजे, आणि त्याचा खऱ्या मनाने शोध घेतला पाहिजे. कारण ह्या सर्व गोष्टींचा उगम दैवी ज्ञानाकडून होत असतो . मानवासाठी दैवी ज्ञान हा एक अक्षय खजिना आहे. ह्या खजिन्याचा लाभ होणाऱ्यांना देवाचे मित्रत्व लाभते.

    आजच्या ह्या मिस्साबलिदानात भाग घेत असताना, आपण खऱ्या मनाने व अंतकरणाने ह्या दैवी ज्ञानाचा शोध घेण्यासाठी आणि त्या मार्गावर चालण्यासाठी आशीर्वाद मागूया.

मनन चिंतन

     ख्रिस्ताठायी जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो आजची उपासना आपल्याला "दैवी ज्ञानाबद्दल" उपदेश करीत आहे. (दैवी ज्ञान) हा शब्द बायबल मध्ये एकूण २३० पेक्षा अधिक जास्त वेळा वापरला गेला आहे. दैवी ज्ञानाला हिब्री भाषेमध्ये "होकमा" असे म्हणतात, याचा अर्थ म्हणजे कौशल्य ज्याला इंग्लिश मध्ये skills म्हणतात.

    देवाने ही पृथ्वी, जलाशय, आकाश, अंतराळ, समुद्र, डोंगर, नद्या, झाडे, निर्माण करण्या अगोदर, सर्वप्रथम दैवी ज्ञानाची स्थापना केली(नीतीसूत्रे ८ :२३). ह्या वचनावरून आपल्याला समजून येते की "दैवी ज्ञान" किती महत्त्वाचे आहे. हे दैवी ज्ञान प्राप्त करण्यासाठी प्रत्येक मानवाला देवाच्या संगतीत राहण्यास लागते. कारण परमेश्वराचे भय म्हणजेच ज्ञानाचा आरंभ होय. हे भय म्हणजेच देवाचा आदर करणे, त्याच्या आज्ञा पाळणे, त्याच्या वचनाप्रमाणे जीवन जगणे, त्याच्याबरोबर बोलने, त्याच्या सहवासात राहणे, असे केल्यानेच आपल्याला देवाचे दान म्हणजे दैवी ज्ञान प्राप्त होते.

     दैवी ज्ञान प्राप्त करण्यासाठी शिक्षणाची गरज लागते असं नाही, तर ते ज्ञान आपल्या रोजच्या जीवनात व कामात सुद्धा मिळते. ह्यासाठी फक्त एक गोष्ट आपण केली पाहिजे ती म्हणजे परमेश्वराचा धावा आणि प्रार्थना.

  आजचे पहिले वाचन हे भरपूर सुंदररित्या ज्ञानाचे महत्त्व आणि देवाच्या शहाणपणाबद्दल सांगत आहे. जगातील सर्व संपत्ती, सोने, चांदी, शक्ती, पैसा, सौंदर्य ह्या सर्व गोष्टीमध्ये, अमूल्य रत्न म्हणजेच दैवी ज्ञान होय. कारण जगातील सर्व संपत्ती, सर्व शक्ती, ह्या गोष्टी तात्पुरत्या आहेत. ज्ञान हे सर्वात श्रेष्ठ आहे, सोने ज्ञानापुढे वाळू सारखे आहे, तर चांदी केवळ चीखलासारखी आहे. परंतु, देवाचे शहाणपण अनंत आहे. जीवनाच्या खऱ्या उद्दिष्टाकडे नेणारे शहाणपण हेच खरी संपत्ती आहे. जर का आपल्याला दैवी ज्ञान मिळाले, तर ह्या साऱ्या गोष्टी आपल्याला आपोआप मिळतील, कारण ह्या सर्व गोष्टींचा उगम दैवी ज्ञानाकडून होतो. परंतु आजच्या युगात आपण न्याहाळून पाहिले की आपल्याला दिसून येते आजची पिढी ही धनसंपत्तीच्या मागे व "डिजिटल जग" ह्यामध्ये बुडून गेलेली दिसून येते.

   आजच्या दुसऱ्या वाचनात आपण वाचतो की प्रभू येशू ख्रिस्ताचे शब्द हे दुधारी तलवारीपेक्षा तीष्ण आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताचे शब्द हे जीवन देणारे शब्द आहेत. हे शब्द दैवी ज्ञानासारखे आहेत. हे ज्ञान आपल्याला सर्वकालीन जीवनाची वाट दाखवत असते.

      तर आजच्या शुभवर्तमानमध्ये आपण पाहतो एक श्रीमंत तरुण व्यक्ती प्रभू समोर येते आणि म्हणते, हे प्रभू येशू ख्रिस्ता मी देवाच्या सर्व आज्ञा पाळून आलेलो आहे तर आता मी सार्वकालिक जीवनप्राप्तीसाठी काय करू. प्रभू येशू म्हणतो जे काही तुझ्याकडे असेल नसेल ते विकून गोरगरिबांना देऊन टाक म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताचे हे शब्द ऐकून तो श्रीमंत माणूस कष्टी होऊन निघून गेला.

      माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, जर का आपल्याला दैवी ज्ञान प्राप्त करायचे असेल तर देवाच्या शब्दाचे पालन करावे लागेल. आज जर देव छोट्या मुलावर प्रसन्न झाला आणि म्हणाला, बाळा तुला काय पाहिजे आणि मुलाचे उत्तर असेल, मला मोबाईल दे. जर देव तरुणांवरती प्रसन्न झाला तर तरुण म्हणेल, देवा मला इंजिनीयरचा नाहीतर कुठलातरी एक चांगला जॉब दे. जर का देव लग्न झालेल्या व्यक्तीवर ती प्रसन्न झाला तर ते म्हणतील देवा आम्हाला आमच्या कामात धनसंपत्ती व पैसा दे. आणि जर का देव वयस्कर लोकांवरती प्रसन्न झाला तर ते म्हणतील देवा मला चांगले आरोग्य आणि शांती दे. ह्यावरून आपल्याला असे दिसून येते की दैवी ज्ञान मागणारे ह्या जगात भरपूर कमी आहेत.

     माझ्या प्रिय मित्रांनो, जीवनामध्ये धनसंपत्ती पैसा हे महत्त्वाचे असते परंतु आपण त्या धनसंपत्ती पासून जास्त आकर्षिले न जावे, कारण आज कमावलेला पैसा दुसऱ्या दिवशी तो आपल्या हातातून निघून जाणार आहे, परंतु दैवी ज्ञान हे आपण जर प्राप्त केले त्याच्या सहवासात राहिलो, तर आपल्याला ह्या सर्व गोष्टी पुन्हा लाभणार, आणि त्याचबरोबर आपण देवाच्या सहवासात राहणार. कारण ह्या धरतीची आकाशाची पृथ्वीची निर्मिती करण्याअगोदर दैवी ज्ञान देवाबरोबर उपस्थित होते. धनसंपत्ती पैसा सोने हे सर्व काही दैवी ज्ञानानंतर आलेले आहेत, म्हणूनच जीवनामध्ये सर्वात महत्त्वाचे संपत्ती म्हणजे दैवी ज्ञान. हे दैवी ज्ञान शिक्षित लोकांनाच मिळते, असे नाही,तर ते अशिक्षित लोकांना सुद्धा मिळू शकते, मात्र जीवनामध्ये त्या दैवी ज्ञानाचा खऱ्या मनाने व अंत:करणाने शोध केला पाहिजे. आपण कसे जगावे, काय करावे, या सगळ्यात देवाचे शहाणपण आपल्याला मार्गदर्शन करते.

     एका गरीब गावात एक माणूस राहत असे. त्याच्याकडे काहीच नव्हते. परंतु त्याला शहाणपणाची आवड होती. तो नेहमी शिकत असे, आणि देवाच्या मार्गांचा अभ्यास करत असे. त्याच्यावर लोक हसत असत. एकदा त्याच्या गावात एक श्रीमंत व्यापारी आला. तो व्यापारी मोठ्या गर्वाने सांगत होता की त्याच्याकडे किती संपत्ती आहे. तेव्हा या गरीब माणसाने त्याला विचारले, "तुझ्या संपत्तीत देवाचे शहाणपण आहे का?" व्यापाऱ्याला उत्तर देता आले नाही. तेव्हा त्या माणसाने सांगितले, "तू कितीही श्रीमंत असलास, परंतु देवाचे शहाणपण नसेल तर तू खरा गरीब आहेस."

    या कथेतून आपल्याला शिकायला मिळते की श्रीमंतीपेक्षा शहाणपण अधिक महत्त्वाचे आहे. देवाच्या शहाणपणाशिवाय जगातील कोणतीही गोष्ट शाश्वत नसते.

    आजच्या उपासनेत सहभाग घेत असताना देवाकडे हीच विनंती करूया कि हे देवा तुझ्या दैवी भांडारातून आम्हाला दैवी ज्ञानाच्या कृपेचा वर्षाव कर म्हणजे आम्हला सार्वकालिक जीवनाचा अनुभव घेता येईल.

श्रद्धावंतांच्या प्रार्थना

प्रतिसाद – हे प्रभू दया कर व तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक.

१. हे परमेश्वरा तुझ्या सेवेत बोलाविलेले आमचे पोप फ्रान्सिस, बिशप्स, फादर्स व सर्व व्रतस्त बंधू-भगिनी ह्यांना तुझे कार्य करण्यास शारीरिक व मानसिक आरोग्य मिळावे. व तुझ्याशी एकनिष्ठ राहून जगाला तुझी ओळख द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

२. जे लोक देवापासून दूर गेले आहेत. त्या सर्वाना दैवी दयेचा स्पर्श व्हावा व देवाकडे वळून एक नवीन, विश्वासू जीवन जगावे म्हणून प्रार्थना करूया.

3.  जी कुटुंबे दैनिक वादविवादाला बळी पडून मोडकळीस आली आहेत, त्या कुटुंबात शांती नांदावी व प्रेमाला उधान यावे म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया.

४. जी दापत्ये अजून बाळाच्या देणगीची वाट पाहत आहेत, त्याची प्रार्थना परमेश्वराने ऐकावी व बाळाच्या देणगीने त्याचे जीवन आनंदमय व्हावे म्हणून प्रार्थान करूया.

५. थोडावेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व सामाजिक गरजांसाठी प्रार्थना करूया.



Thursday, 3 October 2024

 Reflection for 27th Sunday in Ordinary Time (06/10/2024) By Dn. Justin Dhavde

सामान्य काळातील सत्ताविसावा रविवार

दिनांक – ०६/१०/२०२४

पहिले वाचन:  उत्पत्ती : २:१८-२४

दुसरे वाचन: इब्री लोकांस पत्र २:९-११

शुभवर्तमान: मार्क १०:२-१६


“जे देवाने जोडले आहे, ते मनुष्याने तोडू नये.”

प्रस्तावना

    आज आपण सामान्य काळातील सत्ताविसावा रविवार साजरा करीत आहोत. आजची वाचणे आपल्याला देवाने जे पवित्रपावन व मंगल केले होते ते मानवाने स्वतःच्या स्वार्थापायीते पवित्र बंधन त्याने पायदळी तुडविले आहे. देवाला प्राधान्य न देतासैतानाला स्वतःच्या जीवनात प्रथम स्थान दिलेआणि ह्याच कारणास्तव आपण स्वतःच्या जीवनाची राखरांगोळी करून घेतली.

   आजच्या पहिल्या वाचनात आपल्याला असे दिसून येते कीपरमेश्वराने सर्व काही चांगले ते निर्माण केले व त्यांना नाव दयावे ह्याकरिता मनुष्याला त्यांच्यावर परिपूर्ण अधिकार गाजवायला दिला. तसेच आदाम व ऐवेला निर्माण करून परमेश्वराने त्यांना आशीर्वादित केलेजेणे करून ते फलद्रूप होतील. दुसऱ्या वाचनामध्ये आपल्याला पाहायला मिळते कीयेशूने मरण सोसल्यामुळे त्याला गौरव व थोरवी प्राप्त झाली. जो पवित्र करणारा आणि ज्यांना पवित्र करण्यात येत आहे, ते सर्व एकापासूनच आहेत; हे इब्रीलोकांस पाठवलेल्या पत्रात आपल्याला सांगण्यात येते. आजच्या मार्क लिखित शुभवर्तमानामध्ये परमेश्वर एक अतूट बंधनाविषयी आपल्याला सूचित करत आहे. “जे देवाने जोडले आहे, ते मनुष्याने तोडू नेये.”

    देवाने आपल्याला नर व नारी म्हणून निर्माण करून संपूर्ण जग आपल्या हवाली केले. आपल्याला परीपूर्ण असा आशीर्वाद दिला. जेणे करून आपण देवाच्या सानिध्यात राहू व जगू. जर आपण देवाच्या सानिध्यात राहण्यास व जगण्यास कमी पडलो असले तर परमेश्वराकडे क्षमेची याचना करूया.

मनन चिंतन

    ख्रिस्ताठायी जमलेल्या माझ्या प्रिय बंधूनो. अनेकदा आपल्या मनामध्ये विचार येत असतील की, लग्न म्हणजे काय? लग्न हा शब्द नेमका आला तरी कुठून? लग्नानंतर आपल्याला काय मिळते? एकदा एक मुलगा आणि एक मुलगी चांगले मित्र होते. ते एकाच शाळेमध्ये असल्याकारणाने एकमेकांची खूप मदत करायचे. शाळेत एकत्र जाणे, एकत्र अभ्यास करणे, एकमेकांना गृहपाठ करण्यासाठी मदत करणे इतकेच नाही तर परीक्षेच्या वेळी एकमेकांकडून नक्कल करणे, अशा गोष्टींमुळे त्यांची मैत्री ही शाळेमध्ये प्रसिद्ध होती. शाळेनंतर पुढे कॉलेज ही त्यांनी एकत्रच निवडले. त्यांना एकमेकांविषयी खूप आदर आणि जिव्हाळा होता. त्यांची ही मैत्री आता हळू-हळू प्रेमामध्ये बदलत चालली होती. दोघांच्याही मनात एकमेकांविषयी भावना होत्या. पण दोघेही एकमेकांना सांगायला घाबरत होते. एके दिवशी दोघांनीही वेलंकनी येथे मरियामातेच्या नोव्हेनाला जाण्याचा निर्णय केला. वेलंकनीला गेल्यावर लोकांच्या प्रचंड गर्दीमुळे दोघेही एकमेकांपासून हरवून गेले. दोघांना एकमेकांशिवाय राहायची सवय नसल्याकारणाने दोघेही एकदम अस्वस्थ झाले. दोघांचाही जीव एकदम कासाविस झाला. दोघांच्याही डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. मुलीने जागेवर गुडघे घालून मरियामातेकडे विनंती करण्यास सुरुवात केली. इतक्यात मागून कुणीतरी तिच्या खांद्यावर हात ठेवला. ती मागे वळून पाहताच तिला तिचे अश्रू अनावर झाले. कारण तिच्या खांद्यावर हात ठेवणारी व्यक्ती हा तिचा हरवलेला मित्रच होता. लागलीच त्यांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली आणि आपल्या मनातील भावना एकमेकांसमोर व्यक्त केल्या. कालांतराने दोघांचे लग्न झाले आणि त्यांनी नवीन जीवनाला सुरवात केली.

    वरील गोष्टीमध्ये त्या दोघांचे एकमेकांवर किती प्रेम होते हे लक्षात येते. त्या प्रेमाद्वारेच ते भल्यामोठ्या गर्दीमध्ये हरवून सुद्धा एकत्र झाले. परंतु आज आपण समाजामध्ये पाहिले तर, विवाहित जोडपी ही स्वतःच्या घरांमध्येच हरवलेली दिसतात. एकमेकांविषयी प्रेम, आदर भावना ह्या गोष्टी ते हरवून बसलेली आहेत. आज प्रभू येशूख्रिस्त हा आपल्याला पती आणि पत्नी ह्या पवित्र नात्याविषयी बोध देत असताना म्हणत आहे की, पती-पत्नी हे नाते एक पवित्र नाते आहे. लग्न संस्काराद्वारे पती-पत्नी हे दोघे नसून एकात्म झालेली असतात. त्यामुळेच पती आणि पत्नी हे दोघेही एकमेकांसाठी एक जबाबदारी बनत असतात. आजची तिन्ही वाचने ही महत्त्वाच्या मुद्द्यांवर विचार विनिमय करण्यासाठी आमंत्रण करत आहेत. १) मानवाची निर्मिती, २) दुःख आणि मरण, आणि ३) दोन देह आणि एक जीव.

. मानवाची निर्मिती: आपण उत्पत्तीचे पुस्तकांमध्ये वाचतो की, देवाने पहिल्यांदा जगाची निर्मिती केली आणि सर्वात शेवटी मानवाला उत्पन्न केले. मानवाला इतर प्राणीमात्रांवर अधिकार गाजविण्यासाठी नव्हे, तर इतर जीवांची काळजी घेण्यासाठी उत्पन्न केले, याचा अर्थ माणूस हा सर्व प्राणीमात्रांचा रक्षणकर्ता आहे. माणसाच्या निर्मितीनंतर देवाने माणसाच्या फासळीपासून स्त्रीची निर्मिती केली; जेणेकरून ते दोघे एक म्हणून सुखी समाधानी जीवन जगतील.

. दुःख आणि मरण: दुःख आणि मरण, हे आपल्या जीवनातील महत्त्वाचे पैलू आहेत. ह्या  विश्वातील प्रत्येक जीव हा एक ना एक दिवस मरणाला सामोरे जात असतो. हेच जीवनाचे सत्य आहे. प्रभू येशूख्रिस्त हा मरण पावला. परंतु आपल्या मरणाने त्याने मरणावर विजय मिळवला. कारण तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठला. आपणही आपल्या मरणाद्वारे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये उठले जाणार आहोत. त्यामुळे मरणाला न भिता आपण आनंदाने त्याचा स्वीकार करायला हवा.

. दोन देह एक जीव: लग्न संस्कार हे मानवासाठी एक मोठी जबाबदारी असते. लग्न संस्काराद्वारे पती आणि पत्नी जन्मभरासाठी एक होत असतात. जर एखाद्या वेळी पती-पत्नीमध्ये काही कारणास्तव गैरसमज किंवा भांडण झाले असेल, तर त्याचा निर्णय किंवा निकाल पर्याय हा घटस्फोट नसतो. कुठलीही समस्या ही पती-पत्नीने एकजुटीने समजून घेतल्यास सहजपणे पार पाडता येते. यामुळे कुटुंबामध्ये प्रार्थना ही नेहमी महत्त्वाची असते.

आज आपण देवाची मुले म्हणून नेहमी त्याच्या नियमाप्रमाणे चालावे व त्यासाठी देवाची भरपूर अशी कृपा शक्ती आपणा सर्वांना नेहमी मिळावी म्हणून प्रार्थना करूया.

श्रद्धावंतांच्या प्रार्थना

प्रतिसाद – हे प्रभोहे प्रभोआमची प्रार्थना ऐकून घे.

१) परमेश्वराने पवित्रमंगल नर-नारी बनवली. पण आम्ही आमच्या स्वार्थासाठीआमच्या स्वतःच्या ‘मी’ पणासाठी हे पवित्र बंधन जे देवाने निर्माण केलेले आहे ते तोडत आहोत. जे देवाने जोडले आहे ते मनुष्याने स्वतःच्या स्वार्थापाही तोडू नये म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.

२) येशू ख्रिस्ताने आम्हा सर्वाना प्रकाशाची लेकरे बनवली आहेत. पण आम्ही खोट्या सुखाच्या मोहाला बळी पडून परमेश्वरापासून दुरावले आहोत. त्यामुळे कुटुंबात शांतता नाही. कुटुंबामध्ये संशय व अहंकार भरलेला आहे. तर या पवित्र बलीदानाद्वारे देवाचा व आम्हा सर्वाचा पुन्हा एकदा नव्याने समेत व्हावा म्हणून प्रार्थान करूया.

३) आजच्या युगामध्ये लग्न हा एक प्रकारचा व्यवहार व खेळ झाला आहे. लोक आपसात करार करून स्वतःच्या स्वार्थापही एकत्र राहून पवित्र संस्काराला व देव निर्मितीला जुमानत नाही. त्यामुळे कुटुंबाना व चरण घरपण राहिले नाही. परमेश्वराने त्याच्या कृपेचा वर्षाव आम्हा सर्वांवर करावा जेणे करून आम्ही ख्रिस्ती आहोत याची जाणीव  आम्हाला व्हावी म्हणून परमेश्वराकडे याचना करूया.

४) प्रत्येक कुटुंबाचे ख्रिस्तामध्ये नुतनीकरण व्हावे. लेकरांनाआई-वडिलांच्या कष्टाची  जाणीव व्हावी. व त्यांनी आई-वडिलांच्या म्हातारपणात त्यांनी त्यांचा आधार बनावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.

५) आम्ही सर्वजण देवाची मुले आहोतम्हणून आमच्या समाजामध्ये स्त्री-पुरुष भेदाभेद न होताप्रेमानेप्रीतीने प्रार्थानामय जीवनपवित्र शास्त्राच्या वचनाद्वारे जीवनाचा कायापालट व्हावासमाजामधील प्रत्येक कुटुंबाने देंवाचा गौरव करावाम्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.