Tuesday, 14 January 2025

 Reflection for the 2nd Sunday in Ordinary Time (19/01/2025) By Fr. Suhas Pereira


सामान्य काळातील दुसरा रविवार

दिनांक १९-०१-२०२५

पहिले वाचन: यशया ६२:१-५

दुसरे वाचन: १ करिंथ. १२:४-११

शुभवर्तमान: योहान २:१-११

प्रस्तावना

आज देऊळमाता सामान्य काळातील दुसरा रविवार साजरा करत आहे. आजची उपासना आपल्याला प्रभूचे आपल्या जीवनाचा कायापालट करण्याचं सामर्थ्य  मनन-चिंतन करण्यास आमंत्रण देत आहे. आपली हृदये त्याच्या प्रेमासाठी उघडण्यास , त्याच्या कृपेद्वारे नूतनीकरण अनुभवण्यास आणि त्याच्या शांती आणि आनंदाची साधने या जगात बनण्यास आपल्याला प्रभू येशू आज बोलावत आहेयशया संदेष्ट्याच्या पुस्तकातून घेतलेल्या आजच्या पहिल्या वाचनात यशया संदेष्टा परमेश्वराने आपल्याला प्रजेचं नूतनीकरण आणि तिची पुनर्स्थापना करण्याचं जे वचन दिलेल आहे, त्याबद्दल बोलत आहेआजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल करिन्थिकरांस पाठवलेल्या पहिल्या पत्रात पवित्र आत्म्याच्या दानांबद्दल बोलत आहे. पौल सांगतो कि आपल्याला पवित्र आत्म्याची कृपादाने सर्वांच्या कल्याणासाठी आणि त्याचप्रमाणे एकमेकांची सेवा करण्यासाठी आणि ख्रिस्ताचे शरीर, पवित्र देऊळमातेचा उद्धार करण्यासाठी देण्यात आलेली आहेत. देवाच्या प्रेमात आपलं जीवन बदलण्याची आणि नवीन करण्याची शक्ती आहे. देवाचं हेच सामर्थ्य आणि त्याचं प्रेम अनुभवण्यासाठी प्रभू येशू आज आपल्याला बोलावत आहे.

मनन चिंतन

प्रिय बंधू आणि भगिनींनो, प्रभू येशूने आपल्या दैवी सामर्थ्याने भाकरीचा चमत्कार करून पाच हजार लोकांना जेवण दिले, आणि ती लोकं प्रभूच्या भोजनाने तृप्त झाली, तेव्हा त्या लोकांना येशूला आपला राजा करावयाचे होते. कारण लोकांना वाटत होते, कि एखादा राजाच पाच हजाराच्या मोठ्या जमावाला इतक्या भाकरींनी तृप्त करू शकतो. आजच्या शुभवर्तमानात काना गावच्या चमत्काराबद्दल ऐकल्यानंतर आपणसुद्धा असच काही तरी म्हणू शकतो. काना गावी लग्नसमयी द्राक्षरस संपला. प्रभू येशू हा आपल्या शिष्यांसह त्या समारंभासाठी हजर होता. त्याने त्या ठिकाणी असलेले दगडाचे सहा मोठे रांजण पाण्याने भरण्याची आज्ञा दिली, आणि नंतर आपल्या दैवी सामर्थ्याने पाण्याचं रूपांतर उत्कृष्ठ अशा द्राक्षरसात केलं. अशाप्रकारे प्रभू येशू लोकांना त्या दिवशी असा एक मनुष्य वाटला, जो समाजासाठी फार उपयुक्त आहे. परंतु येशू ख्रिस्त समाजासाठी उपयोगाचा कसा आहे हे सिद्ध करणे हा आजच्या शुभवर्तमानाचा आणि घडलेल्या चमत्काराचा हेतू नाही आहे. काना गावी घडलेल्या चमत्काराचा खरा अर्थ जाणून घेण्यासाठी शुभवर्तमानकार योहान आपल्याला आमंत्रण देत आहे. काना गावी जे घडले त्याला योहान " एक चिन्ह" असे संबोधितो. या चिन्हाद्वारे शिष्यांना आणि आपणा सर्वांना एक महत्वाचा संदेश दिला गेलेला आहे.

       तो संदेश काय आहे? काना गावी घडलेल्या त्या घटनेत एक नाही तर अनेक चिन्हे आहेत. त्यातील पहिलं चिन्ह आपण येशूची आई मरीया हिच्यामध्ये ओळखू शकतो. मरीया  हि एक शहाणी आणि जागृत स्त्री होती आणि तिने काना गावच्या त्या परिवाराची गरज ओळखली: “त्यांच्याजवळ द्राक्षारस नाही (योहान ,).” प्रभू येशूने मात्र मरीयेला नकार देऊन म्हटले, बाई, ह्याच्याशी तुझा-माझा काय संबंध? माझी वेळ अजून आलेली नाही (,).” येशूने आपल्या आईला दिलेलं थोडसं उद्धट वाटणारं उत्तर आपल्याला बारा वर्षाचा असताना आणि मंदिरात हरवलेला असताना येशूने आपल्या आई-वडिलांना दिलेल्या उत्तराची आठवण करून देते: "मी माझ्या पित्याच्या घरात असलो पाहिजे हे तुम्हाला ठाऊक नाही का?".

बाई, ह्याच्याशी तुझा-माझा काय संबंध? इथे मरीयेला लक्षात घ्यावं लागलं, कि आपल्या मुलाने काय केलं पाहीजे, हे ती ठरवू शकत नाहीतेथे असलेल्या नोकरांना बोलावून मारिया त्यांना सांगते, “येशू तुम्हांला सांगेल तसे करा.” मारिया आपल्याला देवावर श्रद्धा ठेवण्यास शिकवते. देवासमोर आपण प्रथम शांत राहून त्याची वाणी ऐकण्यास शिकलो पाहिजेत.

परंतु काना येथील चमत्कारातील चिन्ह खरे पाहता प्रभू येशू स्वतः आहे. शुभवर्तमान आपल्याला सांगते कि येशूने द्राक्षरसाच्या चमत्कारासाठी सहा पाण्याच्या रांजणांचा उपयोग केला. प्रत्येक रांजणात जवळ-जवळ शंभर लिटर पाणी होते. याचा अर्थ असा, कि प्रभू येशूने समारंभातील  उपस्थित पाहुणे तृप्त झाल्यानंतरसुद्धा जवळ-जवळ सहाशे ते सातशे लिटर द्राक्षारस बनवण्याचा चमत्कार केला. त्याद्वारे आपल्याला कळते, कि परमेश्वर आपल्याला आपल्या गरजेच्या मदत करून तो आपल्याला आपल्या गरजेपेक्षा जास्त देत असतो. "भगवान देता है, तो छप्पर फाड के देता है"I 

परमेश्वर आपल्याला देतो, तेव्हा तो आपल्याला संकुचित वृत्तीने नाही तर एकदम उदार अंतःकरणाने देत असतो, आपल्याला पुरेल आणि पुरून उरेल अशा प्रमाणात देत असतो. ज्या प्रमाणे भाकरीच्या चमत्कारावेळी पाच हजार लोकं तृप्त जेवून अजून किती तरी टोपल्या भाकऱ्या शिल्लक राहिल्या, त्याच प्रमाणे येशूच्या आजच्या शुभवर्तमानात पहिल्या चमत्कारावेळी, किंव्हा चिन्हावेळी त्याच्या उदात्त आणि स्वर्गीय उदारतेच अनुभव लोकांनी घेतला. परमेश्वर आपल्याला आपण मागतो त्यापेक्षा जास्त प्रमाणात आणि आपल्या अपेक्षेपेक्षा विपुल प्रमाणात आपल्याला आशीर्वाद देत असतो. प्रभू येशू स्वतः सांगतो, "मी जीवन देण्यासाठी आलो. असे जीवन जे भरपूर आणि चांगले आहे (योहान १०,१०)".

काना गावातील चमत्काराद्वारे प्रभू येशू आपल्याला स्वर्गीय पित्याची फक्त सांत्वनकर्ता म्हणून नाही तर आपल्या आनंदात सहभागी होणार आनंदी देव अशी ओळख करून देतो. प्रोटेस्टंट धर्मपंडित कार्ल बार्थ, म्हणतो. कि, "परमेश्वर मनुष्य झाला आणि या पृथ्वीवर आला, कि जेणेकरून तो आपल्या दुःखात आणि सुखात आपल्याला बरोबर असू शकेल. कारण आपल्याला देवाची सदैव गरज आहे".

खरोखरच आपल्याला देवाची नितांत गरज आहे. काना गावातील द्राक्षारसाचा चमत्कार आपल्याला सांगतो, कि आपल्या जीवनातील सर्व परिस्थितींमध्ये परमेश्वर आपल्या जीवनात प्रवेश करतो. तो फक्त आपल्या दुःखात आपलं सांत्वन करून आपल्याला देत नाही, तर आपल्या सुखातसुध्दा तो सामील होतो आणि आपला आनंद परिपूर्ण करत असतो. ज्या प्रमाणे प्रभू येशूने आजच्या शुभवर्तमानात सहा खाली रांजण पाण्याने भरण्यास सांगितले, त्याचप्रमाणे प्रभू येशूला आपली हृदये, आपलं जीवन त्याच्या शांतीने, आनंदाने आणि आशेने भरावयाची आहेत.

तर मग आपण माता मरियेकडे वळू या. प्रभू येशूला, देवाला आपल्याला कोणती दाने किंव्हा कोणते आशीर्वाद द्यावयाचे आहेत हे आपण स्वतः ठरवू शकत अहित हे सत्य पवित्र मरीयेप्रमाणे आपणसुद्धा समजण्याचा प्रयत्न करू या. पवित्र मारिया प्रभूकडे आपलं लक्ष वेधून आपल्याला सांगत आहे, "तो काय सांगतो ते ऐका आणि करा". पवित्र मारिया सांगते त्याप्रमाणे जगण्याचा प्रयत्न आपण करू या, म्हणजे मग परमेश्वरसुद्धा आपल्याला आपल्या जीवनासाठी आणि तारणासाठी जे आवश्यक आहे ते सर्व बहाल करेल.

विश्वासू लोकांची प्रार्थना

परमेश्वर त्याच्या कृपेने आपलं जीवन बदलू शकतो. उघड अंतःकरणांनी आणि विश्वासाने भरलेल्या हृदयाने आपण त्याच्याकडे येऊ या.

प्रतिसाद: हे प्रभू आमचे नूतनीकरण कर.

) शहाणपणाने आणि दयेने सर्व लोकांना तुझ्या जवळ आणण्यासाठी आणि  तुझ्या सामर्थ्याचा अनुभव देण्यासाठी आमचे परमगुरु फ्रान्सिस आणि ख्रिस्तसभेच्या सर्व सेवक नेत्यांना तुझी कृपा आणि शक्ती दे.

) आमच्या राजकीय नेत्यांनी आणि सत्तेत असलेल्या सर्वानी सर्वांचा विकास आणि सर्वांच्या गरजा लक्षात ठेऊन सत्याच्या आणि न्यायाच्या मार्गाने चालावे म्हणू त्यांना तुझी कृपा आणि सदबुद्धी दे.

) आमच्या समाजातील सर्व गोर-गरीब, गरजू आणि पीडितांना  तुझ्या प्रेमाचा, करुणेचा आणि दयेचा अनुभव यावा म्हणून  त्यांना तुझी कृपा दे.

) सर्व ख्रिस्ती कुटुंबांना आणि इतर सर्व कुटुंबाना प्रेम, दया, क्षमा, सामंजस्य, विश्वास या मूल्यांद्वारे जगता यावे आणि त्यांनी तुझ्या शांतीचा प्रचारक व्हावे म्हणून तू त्यांना सहाय्य्य कर.

) आमच्या कुटुंबातील आणि समाजातील मरण पावलेल्या सर्व व्यक्तींना तुझ्या स्वर्गीय नंदनवनात चिरशांती दे.


Friday, 10 January 2025

Reflection for the Solemnity of the Baptism of the Lord (12/01/2025) 

By: Fr. Rakesh Ghavtya.


येशूच्या स्नानसंस्काराचा सण

दिनांक: १२/०१/२०२५

पहिले वाचन: यशया: ४०:१-५, ९-११

दुसरे वाचन: संत पौलाचे तीताला पत्र २:११-१४, ३:४-७

शुभवर्तमान: लूक ३:१५-१६, २१-२२


प्रस्तावना

        आज अखिल ख्रिस्तसभा प्रभूयेशूच्या स्नानसंस्काराचा सण साजरा करीत आहे. आजची उपासना आपल्याला कृपेचे जीवन जगण्याचे प्राचारण करत आहे.

        आजचे पहिले वाचन यशया संदेष्याच्या पुस्तकातून घेतले आहे. या वाचनात सियोन सबंधी परमेश्वराचे सांत्वनपर उदगार ऐकायला मिळतात. परमेश्वराची वाणी ऐकू येते की, "अरण्यात परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा." परमेश्वर पराक्रमासारखा येत आहे.

        दुसऱ्या वाचनात संत पौलचे तीताला पत्र यात आपण ऐकतो की, देवाने नव्या जन्माचे स्नान व पवित्र आत्म्याने केलेले नवीकरण ह्यांच्याद्वारे आपल्या दयेनुसार आपणास तारिले. त्यांने तो आत्मा आपला तारणारा येशू ख्रिस्त ह्यांच्याद्वारे आपल्यावर विपुलपणे ओतला आहे. त्यामुळे जी कृपा लाभली आहे त्यास्तव आपण जीवनाचे वारीस झालो आहोत.

        शुभवर्तमानात आपण योहानाची प्रभूयेशूबद्दलची साक्ष ऐकतो. योहान बाप्तीस्ता म्हणतो की, "मी तुम्हांला पाण्याने बाप्तिस्मा देतो, परंतु जो (येशू) माझ्यापेक्षा समर्थ आहे तो तुम्हांला पवित्र आत्म्याने व अग्नीने बाप्तिस्मा देईल." येशूने योहान मार्फत बाप्तिस्मा घेतला असताना, पवित्र आत्मा देह रूपाने कबूतराप्रमाणे त्याच्यावर उतरला व देवाने आपल्या पुत्राला प्रकट केले.

        प्रभूयेशुचा बाप्तिस्मा आपल्याला प्रत्येकाच्या बाप्तिस्म्याची आठवण करून देतो. हा जो स्नान संस्कार आम्ही स्वीकारला आहे, त्यामुळे आमच्यात देवाची कृपा आली असून पवित्र आत्मा कार्यरत आहे. त्यामुळे आम्ही आमचे ख्रिस्ती जीवन जगताना ख्रिस्ताला परिधान करूया.

        म्हणजे आमच्या संपूर्ण आचरणातून ख्रिस्त प्रकट व्हावा. या मिस्साबलिदानात सहभाग घेत असताना लागणारी कृपा व आशीर्वाद देवाकडे मांगूया.


मनन चिंतन

        ख्रिस्ती जीवनाचा आध्यात्मिक प्रवास हा स्नानसंस्कार (बाप्तिस्मा) या संस्काराने सुरू होतो. या संस्काराद्वारे ख्रिस्ती व्यक्तीसाठी दैवी कृपेचा खजिना उपलब्ध करून दिला जातो व परिपूर्ण जीवनासाठी आवश्यक असलेले प्रेम तिच्यातही उत्पन्न केले जाते. म्हणून स्नान संस्कार हे देवाने मानवाला दिलेले सुंदर वरदान आहे.

        इ.स. १४४२ साली फ्लोरेन्स येथे भरलेल्या धर्मसभेमध्ये अशी शिकवण देण्यात आली होती की, “पवित्र स्नान संस्कार” हा ख्रिस्ती जीवनाचा पाया, पवित्र आत्म्याच्याठायी मिळणाऱ्या नवजीवनाकडे नेणारे प्रवेशद्वार आणि इतर संस्काराचे भांडार उघडे करून देणारा दरवाजा आहे. स्नानसंस्काराद्वारे पापापासून आपली सुटका होते व आपण देवाची मुले म्हणून नवजीवन मिळवतो. आपण ख्रिस्ताचे अवयव बनतो, ख्रिस्त सभेमध्ये आपला समावेश होतो आणि ख्रिस्त सभेच्या प्रेषित कार्यात आपल्याला सहभाग दिला जातो.

        रोमन धर्मग्रंथ खंड २:-५ मध्ये असे म्हटले आहे की, "प्रभू शब्द आणि पवित्र पाण्याच्या अभिषेकाद्वारे नवजीवन देणारा संस्कार म्हणजे स्नान संस्कार होय."

        या संस्काराला पवित्र आत्म्याठायी नवजीवन असेही म्हटले जाते. यासंदर्भात ख्रिस्ताचे वचन म्हणते, "पाण्याने आणि पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा झाल्याशिवाय आणि नव्याने जन्म घेतल्याशिवाय कोणीही स्वर्गराज्यात प्रवेश करू शकत नाही." (तीत: 3:5) (योहान: ३:५) म्हणूनच स्नानसंस्काराद्वारे ख्रिस्ताच्या ठायी नवजीवनामध्ये आपला जन्म होतो व हा संस्कार तारणासाठी आवश्यक आहे.

        ख्रिस्ताचा बाप्तिस्मा आपल्याला आपल्या बाप्तिस्माची आठवण करून देतो. आजच्या शुभवर्तमानात आपण येशूच्या बाप्तिस्माविषयी ऐकतो. येशूने यार्देन नदीत संत योहान बाप्तिस्ता यांच्याहस्ते बाप्तिस्मा स्वीकारून मगच आपल्या प्रेषितीय कार्यास सुरुवात केली. येशू प्रार्थना करीत असताना आकाश उघडले गेले व येशूच्या बाप्तिस्माचा प्रकट झाला. याच क्षणी येशूला अं:तरिक पाचारण व मिशन कार्य करण्याची प्रेरणा देण्यात आली.

        कॅथोलिक ख्रिस्तसभेच्य श्रद्धाग्रंथात असे नमूद करण्यात आले आहे की, "प्रभुने केवळ पाप्यांसाठी असलेला बाप्तिस्मा स्वच्छेने स्वीकारला तो फक्त सर्व धर्माचरण परिपूर्ण व्हावे म्हणूनच." (मत्तय ३:१५) त्याद्वारे “त्याने आपणास रिक्त केले.” (फिलिप्पी २:) जो आत्मा जगाच्या प्रारंभी जलाशयावर तळपत होता, तो आत्मा ख्रिस्तावर पाठवून देवाने नवनिर्मितीच्या कार्याचा शुभारंभ केला व येशूला आपला परमप्रिय पुत्र म्हणून घोषित केले. (मत्तय ३: १६-१७)

        "तू माझा प्रिय पुत्र आहेस; तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे." (लुक ३: २२) या वाणीतून असे प्रकट होते की, येशूचा आपल्या बापाशी घनिष्ठ संबंध होता. यासंदर्भात परमेश्वराचे शब्द स्तोत्रकारांच्या वाणीतून ऐकू येतात, "तू माझा पुत्र आहेस; आज मी तुला जन्म दिला आहे." (स्तोत्र २:) तसेच यशयाच्या पुस्तकात (४२:) आपण ऐकतो, "पहा, हा माझा सेवक! याला मी आधार आहे; पहा, हा माझा निवडलेला! याच्याविषयी मी आपला आत्मा घातला आहे." या वाणीद्वारे येशूच्या पवित्र मिशन कार्याला सुरुवात झाली.

        स्वतःच्या दुःखसहनाद्वारे येशूने अखिल मानवजातीसाठी स्नानसंस्काराचा झरा खुला केला. त्यामुळेच देवराज्याच्या प्राप्तीसाठी पाण्याचा आणि पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा घेऊन नव्याने जन्म घेणे शक्य झाले आहे. प्रेषित पौलाच्या मते, स्नानसंस्कारामध्ये ख्रिस्ती श्रद्धावंत ख्रिस्ताबरोबर मरण पावतो, पुरला जातो आणि त्याच्यासह जिवंत होतो. आपण जितक्यांनी ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला, तितक्यांनी त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतला. ह्याविषयी तुम्ही अजाण आहात काय? तर मग आपण त्या मरणातील बाप्स्तीस्माने त्याच्या बरोबर पुरलो गेलो ह्यासाठी  कि, ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवाने मेलेल्यांतून उठला त्याचप्रमणे आपणही नवीन प्रकारच्या जीवनात चालावे. (रोम ६:-) यावरून आपल्याला अशी जाणीव होते की स्नान संस्काराचा संबंध श्रद्धेशी आहे.

        संत अगस्तीण ह्यांनी स्नानसंस्काराविषयी पुढील उद्गार काढलेले आहेत: "स्नानसंस्कारामध्ये शब्द देहधारण करतो आणि संस्कार रूपाने आपल्यामध्ये वस्ती करतो. म्हणून स्नानसंस्कार हा आपल्याला केवळ पापापासून शुद्ध करतो इतकेच नव्हे, तर आपल्याला अंतर्बाह्य नवीन करतो. आपण एक नवी उत्पत्ती बनतो, देवाचे दत्तक पुत्र बनतो, ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी बनतो, ख्रिस्ताचा अवयव आणि त्याचबरोबर सहवास बनतो." (१ करिंथ ६:१५) तसेच, "आपण पवित्र आत्म्याचे मंदिर बनतो." (१ करिंथ ६:१९)

        देवाची कृपा ही आम्हा सर्वांवर सदैव असते. ती अनुभवण्यासाठी आम्हाला प्रत्येक संस्कार दिला जातो. बाप्तिस्मा या संस्काराद्वारे आम्ही शुद्ध होऊन आमचे जीवन कृपेने भरते. जसा येशूने बाप्तिस्मा घेतला व देवाची कृपा त्याच्यावर राहिली, त्याचप्रमाणे आम्ही जेव्हा बाप्तिस्मा घेतो, तेव्हा देव आम्हालाही त्याची कृपा बहाल करतो.

म्हणून येशूच्या बाप्तिस्म्याची आठवण आपल्याला तीन गोष्टींची ओळख करून देते:

1. येशूचा बाप्तिस्मा आपल्याला आमची ओळख करून देतो:
आपण कोण आहोत व कोणाचे आहोत याची ओळख होते. बाप्तिस्माद्वारे आपण देवाची प्रेमळ लेकरे बनतो, येशूचे भाऊ-बहीण व ख्रिस्त सभेचे उमेदवार म्हणून ओळखले जातो. यास्तव आम्ही देवाच्या सान्निध्यात राहून कृपेचा अनुभव घ्यावा.

2. येशूचा बाप्तिस्मा आम्हाला आमच्या मिशन कार्याची आठवण करून देतो:
देवाचे अस्तित्व आम्हाला व इतरांमध्ये अनुभवून आम्ही देवाच्या लोकांवर प्रेम करावे, त्यांची सेवा करावी व त्यांना आदराने वागवावे. आम्ही आमचे ख्रिस्तीजीवन चांगले आचरण धारण करून जगावे व ख्रिस्ताचा संदेश इतरांपर्यंत शब्दांनी आणि कृत्यांनी पसरावा. तसेच, आम्ही पवित्र जीवन जगून कृपेने भरले जावो व इतरांना देवाची कृपा मिळवून द्यावी. म्हणून सतत प्रार्थना करत राहावे.

3. येशूचा बाप्तिस्मा आम्हाला आमच्या बाप्तिस्म्याची आठवण करून देतो:
स्नानसंस्काराद्वारे आपण ख्रिस्ताच्या याजक, संदेष्टा व राजा या तिन्ही भूमिकेतून प्रेषितकार्यात सहभागी होत असतो. स्नानसंस्काराद्वारे सर्वांना सामान्य याजकपदात सहभाग मिळत असतो. स्नान संस्काराद्वारे ख्रिस्तामध्ये एक झालेली व्यक्ती ख्रिस्तस्वीकार करते. त्याच स्नान संस्काराद्वारे आपण ख्रिस्ताचे आहोत ह्या पदाला जणू ण पुसला जाणारा हा आध्यात्मिक ठसा आमच्या ख्रिस्ती जीवनावर उमटविला जातो. ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घेतलेल्या आम्ही ख्रिस्ताचे बनलो, व पवित्र आत्म्याच्या कृपाशक्तीने आमच्यावर ख्रिस्ताचे तेज पसरते.

        या मिस्साबलिदानात सहभाग घेत असताना देवाकडे हीच प्रार्थना करूया की, "हे परमेश्वरा, आम्हाला तुझ्या कृपाशीर्वादाने भर. म्हणजे आम्ही पवित्र जीवन जगून तुझी प्रेमळ मुले म्हणून गणली जाऊ."

जीवनात देवाला ओळखावे. आमेन.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

धर्मगुरू:

आज आपण प्रभूयेशुच्या स्नानसंस्काराचा सण साजरा करताना देवाचे आभार मानूया, कारण देवाने आपल्याला बाप्तिस्मा हा संस्कार दिला आहे व आपल्याला त्याची प्रिय लेकरे बनविली आहेत. याच देवाकडे कृपेची याचना करूया, की त्याद्वारे आपण योग्य ख्रिस्ती जीवन जगू.

प्रतिसाद: प्रभू, आम्हाला तुझ्या कृपेने भर.

१.  सर्वसमर्थ प्रेमळ पित्या, आम्ही तुझ्या चरणी आमचे पोप महाशय फ्रान्सिस महागुरू, सर्व धर्मगुरू, धर्मबंधू, धर्मभगिनी यांसाठी विशेष प्रार्थना करतो. त्यांच्या प्रेषितीय कार्यात तुझ्या सहवासाचा अनुभव व पवित्र आत्म्याचा स्पर्श होऊ दे. ते कृपा व आशीर्वादाने भरून त्यांच्याकडून उत्तम सेवा घडवू यावी, म्हणून प्रार्थना करूया.

२. सर्वसमर्थ दयाळू परमेश्वरा, आम्ही सर्व बाप्तिस्मा घेतलेल्या बंधू-भगिनींसाठी खास प्रार्थना करतो. आम्ही सर्वांनी आमचे अंत:करण शुद्ध ठेवून कृपेच्या जीवनाकडे वाटचाल करावी, म्हणून प्रार्थना करूया.

३. सर्वसमर्थ प्रेमळ पित्या, आम्ही या क्षणी ख्रिस्ती भाविकांसाठी प्रार्थना करतो, जे बाप्तिस्मा स्वीकारण्यासाठी तयारी करत आहेत. त्यांना तुझ्या अस्तित्वाची जाणीव होऊ दे व पवित्र आत्म्याच्या स्पर्शाने त्यांचा विश्वास वाढू दे व त्यांच्या श्रद्धेत भर होऊ दे, म्हणून प्रार्थना करूया.

४. सर्वसमर्थ दयाळू पित्या, आम्ही आमच्या तरुण-तरुणींसाठी प्रार्थना करतो, जे तुझ्यापासून दुरावलेले आहेत व ऐहिक गोष्टींच्या मागे लागले आहेत. त्यांना तुझ्या शक्तीने जवळ आण, म्हणजे ते पुन्हा एकदा ख्रिस्ती जीवन विश्वासाने व भक्तिभावाने जगण्यास पुढे यावेत, म्हणून प्रार्थना करूया.

५. सर्वसमर्थ शक्तिशाली परमेश्वरा, आम्ही सर्व आजारी, दुःखी, कष्टी व निराश झालेल्या लोकांसाठी विशेष प्रार्थना करतो. त्यांना तुझ्या गुणकारी स्पर्शाने बरे कर, सुखी व समाधानी ठेव आणि त्यांना चांगल्या आरोग्याचे वरदान दे. म्हणून आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो.

६. (थोडावेळ शांत राहून आपल्या खासगी आणि सामुदायिक हेतूसाठी विशेष प्रार्थना करूया.)

धर्मगुरू:

हे स्वर्गीय पिता, आम्ही तुझे आभार मानतो व तुझ्या नावाला धन्यवाद देतो. तुझ्या अपार प्रेमामुळेच आम्हाला बाप्तिस्मा या संस्काराद्वारे कृपा मिळते. आमच्या या गरजा व विनंती तुझ्यासमोर ठेवत असताना, तुझ्या इच्छेने त्या सफल कर व आम्हाला तुझ्या सान्निध्यात ठेव, की जेणेकरून आम्ही आमचे ख्रिस्ती जीवन तुझ्या श्रद्धेने व विश्वासाने जगू. ही प्रार्थना आम्ही तुझ्याकडे करतो.

Friday, 3 January 2025

Reflection for the Homily of Solemnity of Epiphany of the Lord (05-01-2025) by          Fr. Benjamin Alphonso


प्रकटीकरणाचा सण

दिनांक: ०५/०१/२०२५

पहिले वाचन:  यशया ६०:१-६

दुसरे वाचन: इफिसकरांस पत्र ३:२-३,५-६

शुभवर्तमान: मत्तय २:१-१२


प्रस्तावना

        आज पवित्र देऊळमाता प्रभू येशूच्या प्रकटीकरणाचा म्हणजेच तीन राजांचा सण (सोहळा) साजरा करत आहे. प्रभू येशू जगाचा प्रकाश आहे. यशया संदेष्टा आजच्या पहिल्या वाचनात आपणास सांगतो, सर्व राष्ट्रे एक होऊन प्रभूच्या प्रकाशाकडे येतील. दुसऱ्या वाचनात संत पौल आपल्याला देवाच्या प्रकटीकरणाविषयी सांगतो. हे प्रकटीकरण सर्व लोकांसाठी आहे आणि म्हणूनच विदेशीयांना सहवास व सहसभासद करून संत पौल त्यांचा उल्लेख करीत आहे. तर आजचे शुभवर्तमान आपल्याला तीन राजांची ख्रिस्ताला दिलेली भेट याविषयी सांगत आहे. तीन राजांनी, ज्याप्रमाणे आपली दाणे ख्रिस्ताला समर्पित केली. त्याचप्रमाणे आपणही आपल्या जीवनात ख्रिस्ताच्या तेजस्वी प्रकाशाला शरण जाऊन, आपले सर्वस्व त्याच्या चरणी समर्पित करूया. तसेच आपल्या व इतरांच्या जीवनात आनंद व प्रकाश निर्माण व्हावा म्हणून, आजच्या या पवित्र मिस्साबलिदानात प्रार्थना करूया.

मनन चिंतन

        संत मदर तेरेजा यांच्या जीवनात घडलेली सुंदर अशी बोधकथा आहे. ऑस्ट्रेलियातील मेलबॉन या शहरात तिकडच्या आर्चबिशपने मदर तेरेजा आणि त्यांच्या सिस्टरला कार्य करण्यासाठी आमंत्रित केले होते. मदर तेरेजा व त्यांच्या भगिनींनी त्या शहरातील लोकांना (कुटुंबांना) भेट दयायचे ठरवले. त्याप्रमाणे तिकडच्या घरांना भेट देत होत्या.

        एक दिवस मदर  तेरेजा व त्यांच्या सिस्टर्स एका ठिकाणी भेट देत होत्या, तेव्हा त्या एक घर (रूम) आढळली, जी बऱ्याच दिवसापासून बंद होती. त्यांनी त्या घराचा दरवाजा ठोठावला, तेव्हा एका वृद्ध व्यक्तीने तो दरवाजा उघडला. आतमध्ये अंधार होता व घर जाळ्याने व धुळीने भरलेले होते. तेव्हा मदर तेरेजानी त्या व्यक्तीला विचारले की, आम्ही तुझे घर साफ स्वच्छ करू का? तेव्हा त्या व्यक्तीने हो म्हटले. मदर तेरेजा व सिस्टरांनी ते घर स्वच्छ केले. तेव्हा त्यांना एक सुंदर दिवा सापडला. मदर तेरेजानी त्या व्यक्तीला विचारले की, तुम्ही हा दिवा का पेटवत नाही? तेव्हा त्या व्यक्तीने उत्तर दिले: मी एकटा आहे आणि मला कोण भेटायला येत नाही, मग कोणासाठी दिवा लावू. तेव्हा मदर तेरेजानी त्याला विचारले, जर आमच्या दोन सिस्टर्स रोज तुम्हाला भेटायला आल्या तर, तुम्ही तो दिवा रोज लावाल का? त्यानी हो म्हटले. त्या दिवसापासून रोज दोन सिस्टर्स त्या व्यक्तीला भेटायला जायच्या व तो व्यक्ती दिवा लावायचा. मदर तेरेजा भारतात परत आल्या, तेव्हा त्या व्यक्तीकडून मदर तेरेजाला पत्र आले. तुमच्या सिस्टर्स मला रोज भेटायला येतात त्याबद्दल आभारी. आता मला त्या भेटायला आल्या नाहीत तरी चालेल कारण मला ‘ख्रिस्त खरा प्रकाश’ मिळाला आहे. मी रोज दिवा लाविन.

        प्रभू ख्रिस्त खरा जीवनाचा प्रकाश आहे. ज्यांना ख्रिस्त सापडतो. त्यांना खरा प्रकाश व मार्ग मिळतो. तीन मागी राजांना ख्रिस्तबाळाचा प्रकाश सापडला. तसेच मेंढपाळांना सुद्धा प्रकाश व तारा सापडला. त्यांना जीवनाचा खरा अर्थ व मार्ग सापडला.

        येशू ख्रिस्त हा ‘प्रकाशाचा प्रकाश’ व ‘राजांचा राजा’ आहे.  हे तीन मागी राज्यांना समजले होते. म्हणून कुठलाही विचार न करता, ते लगेच ख्रिस्ताच्या दर्शनासाठी आपले दाणे घेऊन बेथलहेम गावाकडे निघतात. बायबल मध्ये आपल्याला त्यांच्याविषयी जास्त काही सांगण्यात आलेले नाही, ती तीन राजे ज्ञानवंत, गुणवंत व यशवंत होते. ते येशु बाळाचे दर्शन घेण्यासाठी पूर्वेकडून आले. असे सांगतात की, त्या तीन राज्यांची नावे आस्थर, रूफस आणि मेलकीओर होते. येशु बाळाला भेटण्यासाठी ते रिकाम्या हाताने न येता, ते आपल्याबरोबर सोने, धूप व गंधरस आणून ते येशू बाळाला दान म्हणून भेट करतात. त्या तीन दानांचा खालील प्रमाणे होता. सोने म्हणजे राजांचा सुवर्ण मुकुट. येशू हा राजांचा राजा आहे. म्हणून सोने येशूचा राजेपणा दर्शवितो. धूप म्हणजे येशूचे देवपण. जरी शब्द मनुष्य झाला, तरी तो देवाचा पुत्र होता आणि गंधरस येशूच्या मृत्यूशयेवर शिपडण्यासाठी आणले होते.

        परमेश्वर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे आणि ठिकाणी दर्शन देत असतो. आपण परमेश्वराला ओळखले पाहिजे. ज्याप्रमाणे तीन राजाने देवाला येशू बाळामध्ये ओळखले. तसेच आपण सुद्धा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये देवाने प्रकट केलेल्या रूपात देवाला ओळखणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण नम्र होऊन प्रार्थना केली पाहिजे. आपणही येशु बाळासमोर नतमस्तक होऊया. ह्या पवित्र मिस्साबलीत प्रार्थना करूया की, आपला विश्वास मजबूत व्हावा व दररोजच्या जीवनात देवाला ओळखावे. आमेन.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐकून घे.

१. आपले परमगुरु स्वामी पोप फ्रान्सीसमहागुरू स्वामीधर्मगुरू व व्रतस्थ ह्या सर्वांना देवाचा आशीर्वाद लाभाव व त्यांच्या पवित्र जीवनाद्वारे त्यांचा प्रकाश इतरांपर्यंत पोहचवावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

२. आपल्या राजकीय पुढाऱ्यांना देवाचा आशीर्वाद मिळावा व आपल्या सत्तेचा वापर जनतेच्या हितासाठी करावा व खरी शांती जगात प्रस्थापित करावी त्यासाठी त्यांना कृपया शक्ती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

३. शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व कर्मचारांसाठी आपण प्रार्थना करूया त्यांच्या मार्गदर्शनाने व त्यांच्या कार्याने समाजाची प्रगती व्हावी व वाईट गोष्टींचा धिक्कार करून चांगल्या गोष्टी आत्मसात करण्यात त्यांना यश प्राप्त व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

४. आपल्या सर्वांसाठी आपणा प्रार्थना करूया कीजसे ज्ञानी पुरुष बाळ येशूला भेटायला गेले होतेत्याच प्रमाणे आपल्या समाजातील उपेक्षित व आजारी व्यक्तींना बाळ येशूचा संदेश आपल्या जीवनाद्वारे देण्यास आपण तयार असले पाहिजे म्हणून आपण प्रार्थना करूया.

५. आता आपण थोडावेळ शांत राहून आपल्या वयक्तिकसामाजिककौटुंबिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.