Thursday, 6 August 2026

Reflections for the Homily of 19th Sunday in Ordinary Time (09-08-2026) By Fr. Rackson Dinis

 सामान्य काळातील एकोणिसावा रविवार

दिनांक: ०९/०८/२०२६
पहिले वाचन: १ राजे १९:९, ११-१३

दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ९:१-५

शुभवर्तमान: मत्तय १४:२२-३३

प्रस्तावना:

आज आपण सामान्य काळातील एकोणिसावा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपल्याला एक सुंदर आणि दिलासा देणाऱ्या  सत्याची आठवण करून देते, “देवावर विश्वास ठेवणारा कधीच एकटा नसतो.” जीवनात दुःख, संकटे, अपयश आणि वादळे येतात. कधी कधी माणसांची साथही सुटते. अशा वेळी आपण स्वतःला एकटे समजतो. परंतु आजची वाचने आपल्याला खात्री  करून देते की, देव आपल्या लेकरांना कधीच एकटे सोडत नाही, तो संकटात धीर देतो, दुःखात बळ देतो आणि पडल्यावर पुन्हा उभे करतो.

या पवित्र मिस्साबलिदानात  सहभागी होताना, आपण आपल्या जीवनातील सर्व चिंता आणि भीती प्रभूच्या चरणी अर्पण करूया. देवाच्या उपस्थितीवर आणि त्याच्या प्रेमावर दृढ विश्वास ठेवण्यासाठी कृपा व सामर्थ्य मागूया.

मनन चिंतन:

आज आपण सामान्य काळातील एकोणिसावा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासणा आपल्याला एका सुंदर विषयावर मनन-चिंतन करण्यास बोलावत आहेत. "देवावर विश्वास ठेवणारा कधीच एकटा नसतो."

बंधू-भगिनींनो, आपण लहान असताना चालायला शिकत होतो. चालता चालता आपण पडलो की आई किंवा वडील लगेच धावत यायचे, आपला हात धरायचे आणि पुन्हा उभे करायचे. म्हणून आपल्याला पडण्याची फारशी भीती वाटत नव्हती. कारण एक गोष्ट आपल्याला ठाऊक होती, जरी आपण पडलो तरी पुन्हा आपला हात धरणारे कोणी तरी आहे.

पण आज आपण मोठे झालो आहोत. आता पडणे म्हणजे फक्त जमिनीवर पडणे नाही. जीवनात दुःख येते, संकटे येतात, अपयश येते, कधी आपल्या माणसांची साथही सुटते. अशा वेळी मनात एकच प्रश्न उभा राहतो, आता माझ्यासाठी कोण आहे? माझा हात कोण धरणार? आणि हळूहळू माणसाला वाटू लागते की, “मी एकटाच आहे.”

पण बंधू-भगिनींनो, आज देवाचे वचन आपल्याला एक सुंदर सत्य शिकवते. माणसे कधी- कधी साथ सोडू शकतात, पण देव कधीच साथ सोडत नाही. आपण पडतो तेव्हा तो आपल्याला उचलतोआपण घाबरतो तेव्हा तो धीर देतो, आणि जेव्हा आपण एकटे आहोत असे वाटते, तेव्हा तो आपल्या शेजारीच उभा असतो. म्हणूनच आजची तिन्ही वाचने आपल्याला  “देवावर विश्वास ठेवणारा कधीच एकटा नसतो.” हा संदेश देत आहे.

बंधू-भगिनींनो, आजच्या पहिल्या वाचनात परमेश्वर एलिया संदेष्टाला म्हणतो, “बाहेर ये आणि माझ्या समोर उभा राहा.” त्यानंतर प्रचंड वारा वाहतो, पर्वत हादरतात, भूकंप होतो आणि अग्नी प्रकट होते. पण पवित्र शास्त्र पुन्हा पुन्हा सांगते, “परमेश्वर त्या वाऱ्यात नव्हता. परमेश्वर त्या भूकंपात नव्हता. परमेश्वर त्या अग्नीतही नव्हता.” शेवटी एक मंद, शांत स्वर ऐकू येतो आणि त्या शांत स्वरात एलियाला परमेश्वराची उपस्थिती अनुभवायला मिळते.

बंधू-भगिनींनो, आपल्या जीवनातही अनेक वादळे येतात. संकटांचा वारा वाहतो, दुःखाचा भूकंप होतो, परीक्षेची अग्नी पेटते. अशा वेळी आपल्याला वाटते की देव आपल्यापासून दूर गेला आहे. पण आजची वाचणे सागतात, की देव दूर गेलेला नसतो; तो शांतपणे आपल्या सोबत उभा असतो. तो मोठ्या आवाजात नव्हे, तर आपल्या अंतःकरणात हळुवारपणे म्हणत असतो, “घाबरू नको, मी तुझ्याबरोबर आहे.” म्हणूनच, जो देवाच्या उपस्थितीवर विश्वास ठेवतो, त्याला कधीच एकटे वाटत नाही.

बंधू-भगिनींनो, देवाच्या या शब्दावर ज्याने विश्वास ठेवला, त्याचे जीवन कितीही कठीण असले तरी तो खचत नाही. ह्याचे  सुंदर उदाहरण आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल आपल्यासमोर मांडतो.

संत पौल म्हणतो, “माझ्या हृदयात मोठे दुःख आहे आणि अखंड वेदना आहेत.” ते म्हणजे त्यांच्या स्वतःच्या लोकांनी येशू ख्रिस्ताला स्वीकारले नव्हते, ह्याचे त्याला दुख वाटत होते. तरीही त्यांनी देवावरील विश्वास सोडला नाही. यातून संत पौल आपल्याला एक सुंदर धडा शिकवतो, तो असा की, खरा विश्वास म्हणजे दुःख नसणे नव्हे; तर दुःखातही देवाची साथ आहे, याची खात्री बाळगणे. म्हणूनच, दुःखातही त्यांना स्वतःला एकटे वाटले नाही.

बंधू-भगिनींनो, पहिल्या वाचनात देवाने एलियाला आपल्या उपस्थितीची खात्री दिली. दुसऱ्या वाचनात संत पौलांनी दुःखातही देवावरील विश्वास अढळ ठेवला. आणि आता शुभवर्तमानात आपण पाहतो की, जो देवावर विश्वास ठेवतो, त्याचा हात देव कधीच सोडत नाही.

आजच्या शुभवर्तमानात शिष्यांची तारू/होडी समुद्राच्या मध्यभागी वादळात सापडते. चारही बाजूंनी लाटा उसळत होत्या. अंधार होता, भीती होती, त्या क्षणी येशू त्यांच्याकडे चालत येतो आणि म्हणतो, “धीर धरा; मी आहे. भिऊ नका.”

पेत्र येशूकडे पाहून तारूतून खाली उतरतो आणि पाण्यावर चालू लागतो. पण ज्या क्षणी त्याची नजर येशूकडून हटून वादळाकडे जाते, त्या क्षणी तो बुडू लागतो. लगेच तो ओरडतो, “प्रभो, मला वाचवा!” आणि येशू तात्काळ आपला हात पुढे करून पेत्राला वाचवतो.

बंधू-भगिनींनो, पेत्राला वाचवणारी गोष्ट त्याची ताकद नव्हती; तर येशूची साथ होती. म्हणूनच आज प्रभू आपल्यालाही सांगत आहे, “देवावर विश्वास ठेवणारा कधीच एकटा नसतो.”

बंधू-भगिनींनो, आजच्या तिन्ही वाचनांतून देव आपल्याला एकच खात्री देतो. जीवनात वादळे येतील, दुःख येईल, लोक साथ सोडतील; पण देव कधीच आपली साथ सोडणार नाही.

एलियाला देव शांत स्वरात भेटला, संत पौलांना दुःखात बळ दिले आणि पेत्र बुडू लागला तेव्हा त्याचा हात धरला. तोच देव आजही आपल्या प्रत्येकाच्या जीवनात कार्य करीत आहे. म्हणून आज आपण फक्त एकच निर्णय घेऊया, संकटांकडे नाही, तर येशूकडे पाहूया. कारण जो येशूचा हात धरतो, त्याला कोणतेही वादळ बुडवू शकत नाही. कारण “देवावर विश्वास ठेवणारा कधीच एकटा नसतो.” आमेन.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे प्रभू आमची प्रार्थना ऐक.

१. आपले पोप लियो सर्व कार्डीनल्स, बिशप, धर्मगुरू व व्रतस्थ ज्यांनी आपले सर्व आयुष्य प्रभूसेवेसाठी अर्पण केले आहे. त्यांना देवाची कृपा व आशीर्वाद मिळावा व त्यांनी देवाची सुवार्ता जगाच्या कानाकोपऱ्यात पसरवावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

२. जे युवक व युवती देवापासून दूर गेले आहेत व ज्यांच्या जीवनामध्ये काही ध्येय नाही अशा सर्वांना देवाच्या प्रेमाचा स्पर्श व्हावा व ते देवाच्या अधिक जवळ यावेत म्हणून आपण प्रार्थना करूया.

३. जे लोक आजारी आहेत व खाटेला खिळलेले आहेत, त्यांना प्रभूचा दैवी स्पर्श व्हावा व ते लवकरात लवकर बरे व्हावेत म्हणून आपण प्रार्थना करूया.

४. जे लोक देवापासून दूर गेलेले आहेत व ज्यांना जगाच्या एैहिक वस्तूंमध्ये आनंद मिळतो अशा लोकांना तो आनंद सर्वकाळचा नाही तर तो क्षणभंगुर आहे ह्याची जाणीव व्हावी व त्यांनी देवाच्या सानिध्यात जास्तीत जास्त वेळ घालवावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

५. जी मुले अनाथ आश्रमामध्ये आहेत व ज्या मुलांना आई-वडिलांनी सोडून दिले आहेत, त्यांची परमेश्वराच्या मायेच्या पंखाखाली वाढ व्हावी व उदारमतवादी आश्रयदात्यांनी त्यांचे आश्रयस्थान बनावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

६. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.