Thursday, 7 January 2021

Reflection for the Homily for the FEAST OF THE BAPTISM OF THE LORD (10/01/2021) By Fr. Benjamin Alphonso

प्रभू येशूचा स्नानसंस्कार

दिनांक: १०/०१/२०२१    

पहिले वाचन: यशया ५५:१-११

दुसरे वाचन: १ योहान ५:१-९

शुभवर्तमान: मार्क १: ७-११


“तू माझा पुत्र मला परमप्रिय आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे.”

प्रस्तावना:

          आज पवित्र ख्रिस्तसभा प्रभू येशूच्या स्नान संस्काराचा सण साजरा करीत आहे. आजच्या पहिल्या वाचनात यशया संदेष्टा, “परमेश्वर वैभवयुक्त आहे व तो इस्त्रायलाचा पवित्र प्रभू आहे” असे सांगतो. येशू हा ख्रिस्त आहे असा विश्वास जो कोणी धरतो तो देवापासून जन्मला आहे असे दुसऱ्या वाचनात सांगितले आहे. तर शुभवर्तमानात आपण प्रभू येशूच्या बाप्तिस्माविषयी ऐकतो. त्या वेळेस पवित्र आत्मा प्रभू येशूवर उतरतो व त्याचा स्वर्गीय पिता, येशू ख्रिस्त हा त्याचा परमप्रिय पुत्र आहे असे जाहीर करतो. सात संस्कारापैकी स्नानसंस्कार हा आपल्या ख्रिस्ती जीवनातील महत्त्वाचा संस्कार आहे. ह्या पवित्र संस्काराद्वारे आपण पवित्र देऊळ मातेचे सभासद होत असतो. प्रभू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा आपल्याला आपल्या प्रत्येकाच्या बाप्तिस्माची आठवण करून देतो. आजच्या ह्या पवित्र मिस्साबलीदानात आपल्या सगळ्यांना देवाची कृपा व आशीर्वाद मिळावा, म्हणून आपण प्रार्थना करू या.

सम्यक विवरण:

पहिले वाचन: यशया ५५:१-११

          यशया संदेष्टा आपणा सर्वांना परमेश्वराकडून मोफत मिळणाऱ्या दयेच्या देणगीविषयी सांगत आहे. देवाने यशया संदेष्ट्याला आपल्या सेवेसाठी व लोकांच्या तारणासाठी निवडलेले होते. त्याने लोकांना देवाची ओळख पटवून दिली. यशया संदेष्टा लोकांना आवाहान करतो की, “अहो तान्हेल्यांनो, तुम्ही सर्व जलाशयाकडे या, जवळ पैका नसलेले तुम्ही या; सौदा करा, खा; या, पैक्यावांचून व मोलावांचून द्राक्षारसाचा व दुधाचा सौदा करा!” (यशया ५५:१). जो देवाचा मनुष्य आहे व ज्याचा देवावर पूर्णपणे विश्वास आहे तोच व्यक्ती देवाचे आव्हान स्वीकारू शकतो. देव अशाच लोकांची निवड करतो.

दुसरे वाचन: १ योहान ५:१-९

          ख्रिस्ताच्या अनुयायांची श्रद्धा किती मजबूत असावी ह्याविषयी योहान आपल्याला सांगत आहे. योहान म्हणतो, ‘येशू हा ख्रिस्त आहे असा विश्वास जो कोणी ठेवतो तो देवापासून जन्मलेला आहे.’ जेव्हा आपण देवावर प्रीती करतो व देवाच्या आज्ञा पाळतो, तेव्हा आपल्याला खरोखर कळते की आपण ख्रिस्ताचे शिष्य आहोत की नाही.

शुभवर्तमान: मार्क १: ७-११

          आजच्या मार्ककृत शुभवर्तमानात आपण बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाविषयी व त्याच्या संदेशाविषयी ऐकतो. योहानाने येशूचा मार्ग तयार केला. प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा परमप्रिय पुत्र आहे. तसेच जगाच्या तारणासाठी पित्याने येशूला जगात पाठविले होते. प्रभू येशू ह्या जगात येण्याअगोदर देवपित्याने अनेक संदेष्टे व प्रवक्ते ह्यांना पाठवले. योहान हा संदेष्ट्यांपैकी एक महान संदेष्टा होता, ज्याने देवाच्या इच्छेप्रमाणे येशूच्या येण्याचा मार्ग मोकळा केला. योहानाने आपल्या संदेशा (प्रवचना) द्वारे लोकांचे मन परिवर्तन केले त्यांना पाण्याचा बाप्तिस्मा दिला व प्रभू येशूला स्वीकारण्यासाठी सज्ज केले. योहान स्वतः म्हणतो ‘मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने केला खरा; तो तर तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करणार आहे.’ कारण येशूचे कार्य हे योहानाच्या कार्यापेक्षा अधिक मोठे व वेगळे होते. येशू आपल्या सारखा मानव आहे हे दाखविण्यासाठी येशूचा बाप्तिस्मा योहानाच्या हातून यार्देन नदीत झाला. आणि लागलेच पाण्यातून वर येताना आकाश उघडले व कबुतराच्या रूपाने पवित्र आत्मा येशूवर उतरला व देववाणी झाली: “तू माझा परमप्रिय पुत्र आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे.” ह्यावरून प्रभू येशू हा देवाचा पुत्र आहे स्पष्ट होते. त्यानंतर येशू आपल्या मिशनकार्याला सुरुवात करतो.

बोधकथा:

          फ्रान्सचा सुप्रसिद्ध राजा संत लुईस, जेव्हा सही करायचा तेव्हा ‘पोईसेचा लुईस’ म्हणून करायचा. तो राजा होता तरी राजा लुईस नावाने म्हणून कधीच स्वाक्षरी करायचा नाही. एकदा त्यांना विचारण्यात आले की तुम्ही राजा म्हणून नाही तर ‘पोईसेचा लुईस’ म्हणून का स्वाक्षरी करता? तेव्हा त्यांनी उत्तर दिले की पोईसे ह्या ठिकाणी माझा बाप्तिस्मा झाला ते ठिकाण व ती गोष्ट माझ्यासाठी महत्त्वाची आहे. मी राजा आहे पण त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे मी बाप्तिस्म्याद्वारे देवाचं मुल आहे. आणि बाप्तिस्म्यामुळे जीवनाच्या शेवटी मला स्वर्गराज्यात प्रवेश मिळणार आहे.

मनन चिंतन:

          बाप्तिस्मा ही देवाची फार मोठी देणगी आहे. संत पौल म्हणतो की बाप्तिस्म्याद्वारे आपल्याला पवित्र आत्म्याचे दान मिळते व आपण पवित्र आत्म्याचे मंदिर होतो. (१ करिंथ ३:१६) आपण ख्रिस्ताद्वारे पित्याशी एकरूप होत असतो. बाप्तिस्मा करणारा योहान नम्र होता त्याने ख्रिस्ताचा यार्देन नदीत बाप्तिस्मा केला पण तो कधी गर्वाने फुगून गेला नाही. प्रभू येशू पण नम्र राहिला. त्याने नम्रपणे योहानाकडून बाप्तिस्मा स्वीकारला. त्यामुळे येशू मानव झाला होता हे आपल्याला दिसून येते. पित्याचा आशीर्वाद प्रभू येशूवर नेहमी होता हे आपल्याला आजच्या शुभवर्तमानात दिसून येते. आपल्या पित्याचे कार्य पुढे नेण्यासाठी येशू ह्या जगात आला होता. येशू जेव्हा पाण्यातून वर आला तेव्हा पवित्र आत्मा त्याच्यावर कबुतराच्या रूपाने उतरला व आकाशवाणी झाली ह्याचा अर्थ प्रभू येशू जे काही करत होता त्याला पित्याची मान्यता व त्याचा आशीर्वाद होता.

          ख्रिस्ताचा बाप्तिस्मा आपल्याला आपल्या बाप्तिस्म्याची आठवण करून देतो. आपल्या सगळ्यांचा बाप्तिस्मा पाण्याने व पवित्र आत्म्याने झालेला आहे. देवाने आपल्या सगळ्यांना त्याची लेकरे म्हणून निवडलेले आहे. याची साक्ष देण्यासाठी ख्रिस्ताप्रमाणे आपल्याला जगात पाठवले आहे. आपल्याविषयी देव संतुष्ट आहे. आपले आईवडील व धर्मआईबाप आपल्यासाठी देवाला वचने देतात. आपण ती वचने दररोजच्या जिवनात आणण्याचा प्रयत्न करूया तसेच ख्रिस्ताच्या दयेची व प्रेमाची साक्ष जगाला देऊया. अनेक संतानी अशी साक्ष व ग्वाही जगाला दिलेली आहे. आपणसुद्धा संतांप्रमाणे कार्य करण्याचा प्रयत्न करूया. ह्या पवित्र मिस्साबलीदानामध्ये त्यासाठी विशेष प्रार्थना करूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: प्रभो आमचा विश्वास दृढ कर.

१) सर्वसमर्थ दयाळू परमेश्वरा आम्ही तुझ्याकडे आमचे पोप फ्रान्सिस, महागुरू, सर्व धर्मगुरू, धर्मबंधू, धर्मभगिनी ह्यांच्यासाठी खास प्रार्थना करतो. तुझे कार्य करण्यासाठी त्यांना शक्ती व चांगले आरोग्य दे. तुझा पवित्र आत्मा त्यांच्यावर येऊ दे ह्यासाठी प्रार्थना करूया.

२) सर्वसमर्थ प्रेमळ परमेश्वरा आम्ही सर्व मिशनरी बंधुभगिनिंसाठी प्रार्थना करतो तुझ्या प्रेमाचा व दयेचा संदेश त्यांनी सर्वत्र पोहचवावा म्हणून त्यांना आशीर्वादित कर.

३) सर्वसमर्थ दयाळू परमेश्वरा आम्ही आमच्या तरुण-तरुणींसाठी प्रार्थना करतो. विशेषकरून जे तुझ्यापासून दुरावलेले आहेत त्यांना सहाय्य कर व त्यांचा विश्वास मजबूत कर जेणेकरून त्यांनी चांगल्या मार्गाचा अवलंब करून तुझे प्रेम सर्वत्र पोहचवावे.

४) सर्वसमर्थ प्रेमळ परमेश्वरा आम्ही जे आजारी, दुःखी आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. तसेच जे कोरोनाच्या आजाराने त्रस्त आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. तुझा स्पर्श त्यांना कर व आजारातून त्यांना बरे कर व सर्वांना सुखी ठेव.

५) थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक व सामाजिक गरजांसाठी प्रार्थना करूया. 


Friday, 1 January 2021

Reflection for the Homily for the FEAST OF THE EPIPHANY OF THE LORD (03/01/2020) By Fr. Albert Pegado




प्रकटीकरणाचा सण

 

दिनांक: /०१/२०

पहिले वाचन: यशया ६०:१-६

दुसरे वाचन: इफिसकरांस पत्र ३:२-३, ५-६ 

शुभवर्तमान: मत्तय २:१-१२




प्रस्तावना :

ख्रिस्तसभा आज प्रकटीकरणाचा सण म्हणजेच तीन राजांचा सण साजरा करीत आहे. हे तीन राजे येशूला नमन करण्यासाठी दुरून आले होते. कारण त्यांना जगाचा तारणारा, प्रकाशमान तारा म्हणजेच ख्रिस्त बाळ सापडला होता. आजच्या पहिल्या वाचनात यशया संदेष्टा आपणास प्रकाशमान होण्यास सांगत आहे. तर दुसऱ्या वाचनात संत पौल आपल्याला सांगतो की प्रकटीकरणाच्याद्वारे मला रहस्य कळले व ते रहस्य ख्रिस्त येशूच्याठायी आम्हास कळविण्यात आले. ज्या प्रकारे तीन ज्ञानी लोकांनी देवाने देलेल्या ताऱ्याचे चिन्ह ओळखून येशू बाळाचा शोध केला, त्याचप्रकारे आपणसुद्धा आपल्या जीवनात देवाने दिलेल्या चिन्हाला ओळखून प्रभूचा शोध घेण्यास आपणाला कृपा  शक्ती मिळावी म्हणून आजच्या मिस्साबलिदानात प्रार्थना करुया. 

पहिले वाचन: यशया ६०: १-६

आजचे पहिले वाचन हे सियोन या माता नगरीला उद्देशून आहे. तिचे पुत्र व कन्या केवळ इस्त्रायलातील पांगलेले नाहीत, तर प्रत्येक राष्ट्रातील आहेत. ही सर्व राष्ट्रे प्रकाशात येतील आणि ज्याप्रमाणे कबुतरे आपल्या खुराड्याकडे आपोआप येतात, तसे ते देवाकडे येतील आणि आशेने देवाकडे पाहतील. हे आपणास यशया संदेष्टा सांगत आहे. 

दुसरे वाचन: इफिसकरांस पत्र ३:२-३, ५-६ 

यहुदी लोकांना वाटत होते की, ‘ते देवाची निवडलेली माणसे आहेत म्हणून संत पौल दुसऱ्या वाचनात विदेशी लोकांचा देवामध्येच समावेश आहेया बाबीवर विशेष भर देतो. कारण दुसऱ्या जातीतील लोकांना प्रभूच्या राज्यात वारसा मिळावा व त्यांनीसुद्धा त्या एकाच शरीराचे अवयव व्हावे आणि त्यांना ही ख्रिस्ताची अभिवचने मिळवावीत असे पौलाला वाटते. देवासाठी सर्व लोक एकसमान व प्रिय आहेत. आपण प्रेषितांची कृत्ये १०: ३४-३५ मध्ये एकतो, ‘देव तोंड पाहून माणसांना वागवीत नाही, तर जे त्याला भितात व त्याच्या इच्छेप्रमाणे योग्य तेच करतात मग ते कोणत्याही वंशाचे व जातीचे असो –  देवाला त्या व्यक्ती मान्य व प्रेमळ असतात. 

शुभवर्तमान: मत्तय २:१-१२

येशू हा जुन्या करारातील देवाने वचन दिलेला इस्त्रायलचा तारणारा आहे. तो इस्त्रायलचा राजा आहे, असा विषय मत्तयच्या शुभवर्तमानात मांडला आहे. भविष्यवाद्यांनी भाकीत केलेला तारणारा आणि राजा हा येशूच आहे आणि त्याचे आपण मनोभावे स्वागत करावे व आपण विश्वास ठेवावा असे मत्तय आपल्या वाचकांना आवर्जून सांगत आहे. 

आजच्या शुभवर्तमानात जे मागी लोक ख्रिस्ताला भेट देण्यास येतात ते ज्योतिषी होते. ग्रहताऱ्यांचे सूक्ष्म निरीक्षण आणि अवलोकन यांच्या आधारे ते आपले निष्कर्ष काढीत. पूर्वेकडील प्रदेशात ग्रहताऱ्यांचे निरीक्षण व गणिते करून पॅलेष्टाइन देशात राजकुळात महत्त्वपूर्ण व्यक्तीचा जन्म झाल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला. अर्थात या बाळराजाच्याभेटीसाठी थाटामाटाने जाणे त्यांना अगत्याचे वाटले कारण देवाचे हे त्यांना अस्सल प्रकटीकरण होते. 

मनन चिंतन:

पर्शिया ह्या शहरामध्ये अशी एक गोष्ट सांगितली जाते, शहा अब्बास हा एक राजा होऊन गेला ज्याला त्याच्या राजवाड्यापेक्षा त्यांच्या दुःखी-कष्ठी लोकांमध्ये राहायला फार आवडायचे, आणि म्हणूनच तो एका भिकाऱ्याचा वेश करून आपल्या बाजूलाच असलेल्या एका लोहाराच्या दुकानात एका गरीब माणसाबरोबर बसून गप्पा करू लागला व त्याला बराच नियमित सल्ला देऊ लागला. गरीब लोहार देखील ह्या भिकाऱ्याच्या वेशात आलेल्या महाराजाचा सल्ला ऐकू लागला. लोहाराने दिलेली थोडी भाकरही राजा खाऊ लागला. अशाप्रकारे एकमेकांची मैत्री वाढू लागली. महाराज रोज ह्या गरीब लोहाराकडे येऊ लागला त्याच्या दुःखात सहभागी होऊ लागला. काही दिवसातच दोघे एकमेकांचे जवळचे मित्र बनले. एक दिवस राजा आपल्या मित्राला म्हणाला. तू मला ओळखतोस काय? माझी ओळख तुला माहिती आहे काय? मी तुझा राजा शहा अब्बास आहे. राजाला वाटले त्याचा मित्र हे ऐकून खुश होईल व त्याच्याकडून काहीतरी मोठे बक्षीस मागील. परंतू तो गरीब व लाचार लोहार क्षणभर शांत उभा राहिला. महाराज पुन्हा म्हणाला तु माझ्याकडून हवे ते मागू शकतो. तुला मी गरीबाचा श्रीमंत करू शकतो, माझ्याकडे असलेली दौलत व धन-संपत्ति मी तुला देऊ शकतो, एखाद्या राज्याचा धनी मी तुला करू शकतो किंवा माझ्या राजवाड्यात तुला एकादे मंत्रिपद देऊ शकतो. तू फक्त तुला काय हवे आहे ते सांग? थोड्यावेळानंतर तो लोहार शांतपणे म्हणाला, महाराज, मला सर्व कळले आहे, परंतू तुम्ही हे असे का केले? माझ्या सारख्या गरीब व लाचार लोहारासाठी तुम्ही तुमचा महाल, तुमचा मान-सन्मान, मर्यादा सोडून माझ्यासारखे गरीब व लीन झाले, आणि ह्या माझ्या झोपडीमध्ये वास केला ह्या पेक्ष्या मोठे बक्षीस ते मला काय हवे आहे? मला आता एकच मोठे बक्षीस हवे आहे ते म्हणजे तुमची आणि माझी झालेली ही मैत्री सदैव अशीच राहावी अशी माझी इच्छा आहे ती मात्र तुम्ही पुरी करा.

प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज पवित्र ख्रिस्तसभा प्रकटीकरणाचा सोहळा साजरा करीत आहे आणि प्रभू येशु ख्रिस्ताच्या आपणांस झालेल्या प्रकटीकरणा विषयीचे महत्व पटवून सांगत आहे. येशु ख्रिस्त जगाचा प्रकाश आहे आणि तो अंधाऱ्या व पापी जगात देवाच्या दयेचा, प्रेमाचा आणि शांतीचा प्रकाश आपणा सर्व मानवांना देण्याकरिता ह्या पृथ्वीतलावर अवतरला. ख्रिस्त स्वतः एकाच वेळी संपूर्णतः देव आणि मनुष्य होता. तो पूर्णपणे जाणून होता की, त्याला ह्या जगात पापी मानवाचे तारण करण्याकरिता पाठविले होते आणि म्हणूनच तो म्हणाला होता की माझ्या मरण आणि पुनरुत्थानाने साऱ्या पापी जगाचे तारण होणार आहे आणि हेच ख्रिस्ताचे शब्द सिमिओन ह्या संदेष्ट्याद्वारे मरियेला सांगण्यात आले होते. सार्वकालिक जीवन हे फक्त सार्वकालिक प्रभू येशू ख्रिस्ताद्वारेच शक्य आहे. आपण सर्व प्रकाशाची लेकरे आहोत आणि आपणा सर्व ख्रिस्ती लोकांची एक महान जबाबदारी आहे की जी लोक बहकलेली आहेत त्यांना आपण त्या प्रकाशाकडे आणले पाहिजे. 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे प्रभूआम्हांला तुझे दर्शन घडव.

१. ख्रिस्तसभेची धुरा वाहणारे आपले पोप महाशयबिशस्पधर्मगुरू व तसेच धर्म-भगिनी ह्यांना देवाचे प्रेमद्या व शांती इतरांपर्यंत पोहचविण्यासाठी कृपा व शांती लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

२. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने देवाची मुले म्हणून जीवन जगावे व ख्रिस्ताच्या वचनांचे आज्ञाधारकपणे पालन करून देवाच्या इच्छेला प्रथम प्राधान्य द्यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

३. आज जगात अशांतता असल्यामुळे वैरीपणाचे वातावरण निर्माण झाले आहे. म्हणून जगात शांती पसरावी व एकात्मतेचे वर्चस्व स्थापन व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

४. हे नवीन वर्ष चांगलेसुखा-समाधानाचेशांतीचे व भरभराटीचे जावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

५. आपण आपल्या सामाजिककौटुंबिक आणि वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करूया.


Wednesday, 30 December 2020

Reflection for the SOLEMNITY OF MARY, MOTHER OF GOD AND NEW YEAR 2021 (01/01/2021) by Fr. Suhas Pereira



देवमातेचा सोहळा

दिनांक: ०१/०१/२०२१

पहिले वाचन: गणना ६:२२-२७

दुसरे वाचन: गलतीकरांस पत्र ४:४-७

शुभवर्तमान: लूक २:१६-२१



प्रस्तावना:

          आज जानेवारी २०२१, नवीन  वर्षाचा पहिला दिवस. जुने वर्ष अंतास गेलेलं आहे. गतवर्षात आपल्या जीवनात अनेक चांगले, वाईट, सुखाचे-दुःखाचे, सकारात्मक-नकारात्मक अनुभव आले. जग कोरोना महामारीच्या भयानक मायाजालात अडकून पडलंय आणि अनेक लोकं बेघर, निराधार, भुकेली, बेरोजगार झालेली आहेत. परंतु या सर्वात परमेश्वराने आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला सुखी ठेवले, आपला सांभाळ केला आणि आपल्याला त्याच्या कृपाछत्राखाली ठेवले म्हणून त्या विधात्याचे आभार मानण्यासाठी आणि त्याचबरोबर नवीन वर्षातसुद्धा परमेश्वर सदैव आपल्याबरोबर असावा आणि त्याच्या प्रेमाने आणि शांतीने, त्याच्या दयेने आणि कृपेने आपलं जीवन त्याने भरून काढावं म्हणून त्याच्याकडे प्रार्थना करण्यासाठी आपण जमलेलो आहोत. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण मरीया, देवाची माता हिचा सण साजरा करत आहोत. पवित्र मरीया, देवाची माता ही आपल्या सर्वांचीसुद्धा माता आहे. परमेश्वराने आपल्या पवित्र पुत्राची माता म्हणून मरियेची निवड केल्यानंतर मरीयेच्या जीवनातसुद्धा भविष्याबद्दलची अनिश्चितता, चिंता आणि भीती निर्माण झाली असेल. परंतु तिची देवावरील श्रद्धा बळकट होती. या श्रद्धेच्या जोरावर ती पुढे गेली आणि देवाच्या योजनेचा आपल्या जीवनात स्वीकार केला. या नवीन वर्षात पदार्पण करत असताना मरीया मातेने आपल्या सोबत राहून आपल्याला मार्गदर्शन करावं आपल्या जीवनमार्गाचा दीपस्तंभ बनुन आपल्याला देवाकडे जाण्याचा मार्ग दाखवावा म्हणून आज विशेष प्रार्थना करू या.

पहिले वाचन: गणना ६:२२-२७

आजच्या पहिल्या वाचनात परमेश्वर अहरोन आणि त्याच्या पुत्रांद्वारे म्हणजेच याजकवर्गाद्वारे इस्रायली लोकांना सदैव आशीर्वादित करण्याचं वचन देतो. जेव्हा जेव्हा इस्राएलचे याजक इस्रायलला परमेश्वराच्या नावाने आशीर्वाद देतील, तेव्हा-तेव्हा परमेश्वर स्वतः लोकांना आशीर्वादित करील आणि त्यांचा आशीर्वाद फलद्रुप होईल. हा आशीर्वाद इस्राएली लोकांच्या परमेश्वरी कराराबरोबर असलेल्या निष्ठेचे, विश्वासूपणाचे फळ असेल. त्याचप्रमाणे परमेश्वराने अब्राहामाद्वारे संपुर्ण मानवजातीला दिलेल्या आशीर्वादाच्या अभिवाचनाच्या पूर्ततेची शाश्वती आजच्या वाचनातील आशीर्वाद आहे.

दुसरे वाचन: गलतीकरांस पत्र ४:४-७

मनुष्याचा या पृथ्वीवरील इतिहास आणि खास करून जुन्या कराराचा काळ हा अभिवचने आणि तयारीचा काळ होता. परंतु परमेश्वराने जेव्हा त्याच्या प्रिय पुत्राला या जगात पाठविले, तेव्हा देवाने जगाला दिलेल्या अभिवाचनांची पूर्तता होण्याची वेळ आली. ख्रिस्ताच्या येण्याद्वारे आणि ख्रिस्ताद्वारे आपण सर्वजण स्वर्गाच्या वतनाचे वारसदार बनलो आहोत. ख्रिस्तामध्ये आपण स्वर्गीय बापाची लेकरे झालो आहोत आणि पवित्र आत्म्याच्या कृपाप्रसादाद्वारे आपण देवाला अब्बा-पिता असं संबोधू शकतो.

शुभवर्तमान: लूक २:१६-२१

आज आपण देवमातेचा सोहळा साजरा करत असल्यामुळे आजच्या शुभवर्तमानात आपण पुन्हा एकदा प्रभू येशूच्या जन्माचे वृत्त ऐकतो. परंतु आजच्या दिवशी देऊळमाता मरीयेने परमेश्वराच्या तारणाच्या योजनेत देवाच्या पुत्राला या जगात आणण्याची जी महत्वाची भूमिका बजावली त्या भूमिकेवर जास्त भर देत आहे आणि लक्ष केंद्रित करत आहे. मरीया ही आपल्या सर्वांसारखी सर्वसाधारण व्यक्ती होती. परंतु परमेश्वराने आपल्या पुत्राची माता म्हणून तिची निवड केली. आपल्या पुत्राची माता होण्याचे भाग्य, दान देवाने मरियेला बहाल केले. म्हणूनच आपण जेव्हा पवित्र मरीयेचा सन्मान करतो तेव्हा आपण अप्रत्यक्षपणे खुद्द परमेश्वराचाच सन्मान करतो आणि  त्याच्या असंख्य कृपादनांबद्दल आपण त्याचे आभार मानत  असतो.

बोधकथा:

एका वृद्धाश्रमातील काही स्त्री-पुरुष एकदा नाताळच्या दिवशी ट्रेन ने त्यांच्या सुट्टीच्या जागेकडे प्रवास करीत होते. हा प्रवास खूपच लांब आणि कंटाळवाणा होता. का स्टेशनवर, लहान मुलासह एक तरुण आई ट्रेनमध्ये चढली. त्या लहान मुलाने त्या ट्रेन मधील त्या वृद्धांच्या थकलेल्या पडलेल्या चेहऱ्यांकडे स्मितहास्य केले. आणि एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे तो लहान मुलगा उड्या मारू लागला, त्यांच्याशी बोलू लागला, आणि आनंदाने ओरडत आणि सर्वांशी गप्पा मारू लागला. त्वरित, ट्रेनमधील निरास आणि शांत  वातावरण आनंदित आणि हर्षमय झाले. आज आम्ही आनंदाने आणि कृतज्ञतेने लक्षात ठेवतो की मरिया आणि तिचा दैवी पुत्र येशू याने कसे, निराश पापी जगाला आशेत आनंदात बदलले. आज मरीया-देवाची माता हा सोहळा साजरा करत असताना मरीयेने आणि तिच्या दैवी पुत्राने या पापी, नैराश्याने भरलेल्या आणि निरुत्साही जगाचे रूपांतर एका आनंदी, सुखकारक जगात कशे केले त्याची आपण कृतज्ञतापूर्वक आठवण करत आहोत.

मनन-चिंतन:

          मरीया देवाची माता हा सोहळा एक प्राचीन सोहळा आहे. आणि आजचा सण कॅथॉलिक ख्रिस्तसभा मरियेचा सन्मान का करते? या प्रश्नाचं अनेक लोकांना हवं असलेलं उत्तर देते. मरीयेला आपण परमेश्वराची जागा देऊन परमेश्वरासारखी तिची आराधना आणि पूजन करत नाही. आपण मरीयेचा सन्मान करतो, तिला मान देतो, तिच्यावर प्रेम करतो आणि तिच्या मध्यस्थीद्वारे आपण परमेश्वराकडे जाण्याचा प्रयत्न करतो. खुद्द देवानेच आपल्या पवित्र पुत्राची माता म्हणून निवडून मरियेला सन्मानित केलं. म्हणून आपणसुद्धा मरियेला सन्मानित करतो. लुकलिखीत शुभवर्तमानात प्रभूच्या दूताने मरीयेला दिलेला संदेश त्याचप्रमाणे मरीया तिची मावसबहीण अलिशिबा हिला भेटायला गेलेली असताना अलिशिबेने मरियेबद्दल केलेलं विधान यांद्वारे आपल्याला मरीया देवाची माता असल्याची कल्पना येते.

          बायबलमधील अशा संदर्भांचा आधार घेऊन ख्रिस्तसभेच्या एफेसुस येथील ४३१ रोजी भरलेल्या विश्व-धर्मपरिषदेमध्ये जाहीर करण्यात आले, की मरीया खरोखरच थेओ-टोकोस म्हणजेच परमेश्वराची माता होती. कारण प्रभू येशू ख्रिस्त जो मरीयेच्या पवित्र आत्म्याद्वारे गर्भसंभवाच्या पहिल्या क्षणापासून खरा देव आणि खरा मनुष्य होता, त्याला मरीयेने आपल्या उदरात वाढवले आणि त्याला मानवी जन्म दिला. मरीयेची देवाची माता अशी परिभाषा करून एफेसूसच्या विश्व-धर्मपरिषदेने फक्त मरीयेला सन्मान देऊन उंचावले नाही, तर त्याद्वारे येशू हा खरो देव आणि खरोखर मनुष्य होता. या श्रद्धारूप तत्वाला किंवा या शिकवणुकला पुष्टी दिली. व्या शतकात नेस्टोरिऊस आणि त्याचे शिष्य शिकवत होते की, ख्रिस्तात दोन व्यक्ती होत्या: मानवी येशू आणि देवाचा पवित्र पुत्र. परंतु एफेसूसच्या विश्व-धर्मपरिषदेने या शिकवणुकीचं खंडन केलं आणि ठामपणे सांगितलं, की येशू ख्रिस्त हा दैवी आणि मानवी स्वभाव असणारी एकच व्यक्ती होती. आणि मरिया ही फक्त मानवी येशुचीच नव्हे, तर दैवी ख्रिस्ताचीसुद्धा-देवाची माता होती. येशू-ख्रिस्त हा देव आहे. मरीया येशूची माता, त्याची जन्मदाती असल्यामुळे मरीया ही देवाची माता, मसिहाची, ख्रिस्त आपल्या तारणाऱ्याची माता आहे. कालवारी टेकडीवर क्रुसावरून प्रभू येशूने मरीया त्याची प्रिय माता आपल्या सर्वांची माता म्हणून आपल्याला दिली. म्हणूनच मरिया ही फक्त ख्रिस्ताची माता नाही, तर ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या आणि  त्याच्या शिकवणुकीप्रमाणे आपलं जीवन आणि आचरण ठेवणाऱ्या प्रत्येकाची ती माता आहे.

          आज आपण नवीन वर्षाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. ३६५ दिवसांचा हा एक लांब, खडतर प्रवास असेल. हा प्रवास सरळ मार्गावर असेल की वाकड्या मार्गावर असेल ते आपल्याला माहित नाही. आणि या मार्गावर आपण काय अनुभव घेणार आहोत ते सुद्धा आपल्याला माहित नाही. परंतु देऊळमाता आपल्याला मरियेचे उदाहरण आपल्या जीवनात घेऊन, परमेश्वराच्या अदृश्य हातात हात देऊन आपल्या जीवनाचा प्रवास करण्यास सांगत आहे. पवित्र मरीयेकडे श्रद्धेचं धैर्य होतं. म्हणूनच तिच्या जीवनाची नौका ती सुखरूपपणे पैलतीरी नेऊ शकली. आपणसुद्धा आज या नवीन वर्षाच्या सुरुवातीला पवित्र मरियेचा आश्रय घेऊ या आणि आपल्या जीवनाची नौका या नवीन वर्षातसुद्धा सुखरूपपणे या जगाच्या अथांग सागरात डोलत राहावी आणि पैलतीरी पोहचावी म्हणून मरीयेकडे तिच्या ख्रिस्ताकडे मध्यस्थीसाठी विशेष विनंती करू या आणि म्हणू या: पैलतीरी मज ने, माते पैलतीरी मज ने.”

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभो आमची प्रार्थना एक.

) हे प्रभो तुझ्या प्रिय ख्रिस्तसभेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ख्रिस्तसभेच्या प्रत्येक सदस्याने तुझ्या शिकवणुकीप्रमाणे आपलं जीवन जगून तुझ्या प्रेमाचा, सत्याचा आणि चांगुलपणाचा प्रकाश आपल्या जीवनाद्वारे या जगास द्यावा म्हणून आम्ही प्रार्थना करतो.

) हे नवीन वर्ष आणि आमचं जीवन, आमचं भविष्य, आमचं कुटुंब, आमच्या सर्व योजना आम्ही तुझ्या पवित्र हातात सोपवतो. या नवीन वर्षात तुझ्या कृपेचा वरदहस्त सदैव आमच्यावर राहू दे आणि वाईटाच्या मार्गाला जाता तुझ्या प्रेमाच्या छत्राखाली आम्ही सदैव राहून आमचं संरक्षण व्हावं म्हणून आम्ही प्रार्थना करतो.

) जी लोकं आजारी आहेत त्या सर्वांना तुझ्या दयेचा नि प्रेमाचा अनुभव येऊन नवजीवनाचा आणि चांगल्या आरोग्याचा आस्वाद त्यांना मिळावा  म्हणून आम्ही प्रार्थना करतो.

) आपण सर्व एकाच देवाची लेकरे आहोत. ही जाणीव सर्व धर्माच्या लोकांना व्हावी आणि सर्वानी सर्वधर्म समभावाच्या, सहिष्णुतेच्या, प्रेमाच्या आणि आदराच्या भावनेने  जीवन जगून स्वर्गराज्याची प्रस्थापना या जगात करण्याचा प्रयत्न करावा म्हणून आम्ही प्रार्थना करतो.

५) आता थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक हेतूसाठी प्रार्थना करूया.