Thursday 7 January 2021

Reflection for the Homily for the FEAST OF THE BAPTISM OF THE LORD (10/01/2021) By Fr. Benjamin Alphonso

प्रभू येशूचा स्नानसंस्कार

दिनांक: १०/०१/२०२१    

पहिले वाचन: यशया ५५:१-११

दुसरे वाचन: १ योहान ५:१-९

शुभवर्तमान: मार्क १: ७-११


“तू माझा पुत्र मला परमप्रिय आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे.”

प्रस्तावना:

          आज पवित्र ख्रिस्तसभा प्रभू येशूच्या स्नान संस्काराचा सण साजरा करीत आहे. आजच्या पहिल्या वाचनात यशया संदेष्टा, “परमेश्वर वैभवयुक्त आहे व तो इस्त्रायलाचा पवित्र प्रभू आहे” असे सांगतो. येशू हा ख्रिस्त आहे असा विश्वास जो कोणी धरतो तो देवापासून जन्मला आहे असे दुसऱ्या वाचनात सांगितले आहे. तर शुभवर्तमानात आपण प्रभू येशूच्या बाप्तिस्माविषयी ऐकतो. त्या वेळेस पवित्र आत्मा प्रभू येशूवर उतरतो व त्याचा स्वर्गीय पिता, येशू ख्रिस्त हा त्याचा परमप्रिय पुत्र आहे असे जाहीर करतो. सात संस्कारापैकी स्नानसंस्कार हा आपल्या ख्रिस्ती जीवनातील महत्त्वाचा संस्कार आहे. ह्या पवित्र संस्काराद्वारे आपण पवित्र देऊळ मातेचे सभासद होत असतो. प्रभू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा आपल्याला आपल्या प्रत्येकाच्या बाप्तिस्माची आठवण करून देतो. आजच्या ह्या पवित्र मिस्साबलीदानात आपल्या सगळ्यांना देवाची कृपा व आशीर्वाद मिळावा, म्हणून आपण प्रार्थना करू या.

सम्यक विवरण:

पहिले वाचन: यशया ५५:१-११

          यशया संदेष्टा आपणा सर्वांना परमेश्वराकडून मोफत मिळणाऱ्या दयेच्या देणगीविषयी सांगत आहे. देवाने यशया संदेष्ट्याला आपल्या सेवेसाठी व लोकांच्या तारणासाठी निवडलेले होते. त्याने लोकांना देवाची ओळख पटवून दिली. यशया संदेष्टा लोकांना आवाहान करतो की, “अहो तान्हेल्यांनो, तुम्ही सर्व जलाशयाकडे या, जवळ पैका नसलेले तुम्ही या; सौदा करा, खा; या, पैक्यावांचून व मोलावांचून द्राक्षारसाचा व दुधाचा सौदा करा!” (यशया ५५:१). जो देवाचा मनुष्य आहे व ज्याचा देवावर पूर्णपणे विश्वास आहे तोच व्यक्ती देवाचे आव्हान स्वीकारू शकतो. देव अशाच लोकांची निवड करतो.

दुसरे वाचन: १ योहान ५:१-९

          ख्रिस्ताच्या अनुयायांची श्रद्धा किती मजबूत असावी ह्याविषयी योहान आपल्याला सांगत आहे. योहान म्हणतो, ‘येशू हा ख्रिस्त आहे असा विश्वास जो कोणी ठेवतो तो देवापासून जन्मलेला आहे.’ जेव्हा आपण देवावर प्रीती करतो व देवाच्या आज्ञा पाळतो, तेव्हा आपल्याला खरोखर कळते की आपण ख्रिस्ताचे शिष्य आहोत की नाही.

शुभवर्तमान: मार्क १: ७-११

          आजच्या मार्ककृत शुभवर्तमानात आपण बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाविषयी व त्याच्या संदेशाविषयी ऐकतो. योहानाने येशूचा मार्ग तयार केला. प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा परमप्रिय पुत्र आहे. तसेच जगाच्या तारणासाठी पित्याने येशूला जगात पाठविले होते. प्रभू येशू ह्या जगात येण्याअगोदर देवपित्याने अनेक संदेष्टे व प्रवक्ते ह्यांना पाठवले. योहान हा संदेष्ट्यांपैकी एक महान संदेष्टा होता, ज्याने देवाच्या इच्छेप्रमाणे येशूच्या येण्याचा मार्ग मोकळा केला. योहानाने आपल्या संदेशा (प्रवचना) द्वारे लोकांचे मन परिवर्तन केले त्यांना पाण्याचा बाप्तिस्मा दिला व प्रभू येशूला स्वीकारण्यासाठी सज्ज केले. योहान स्वतः म्हणतो ‘मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने केला खरा; तो तर तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करणार आहे.’ कारण येशूचे कार्य हे योहानाच्या कार्यापेक्षा अधिक मोठे व वेगळे होते. येशू आपल्या सारखा मानव आहे हे दाखविण्यासाठी येशूचा बाप्तिस्मा योहानाच्या हातून यार्देन नदीत झाला. आणि लागलेच पाण्यातून वर येताना आकाश उघडले व कबुतराच्या रूपाने पवित्र आत्मा येशूवर उतरला व देववाणी झाली: “तू माझा परमप्रिय पुत्र आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे.” ह्यावरून प्रभू येशू हा देवाचा पुत्र आहे स्पष्ट होते. त्यानंतर येशू आपल्या मिशनकार्याला सुरुवात करतो.

बोधकथा:

          फ्रान्सचा सुप्रसिद्ध राजा संत लुईस, जेव्हा सही करायचा तेव्हा ‘पोईसेचा लुईस’ म्हणून करायचा. तो राजा होता तरी राजा लुईस नावाने म्हणून कधीच स्वाक्षरी करायचा नाही. एकदा त्यांना विचारण्यात आले की तुम्ही राजा म्हणून नाही तर ‘पोईसेचा लुईस’ म्हणून का स्वाक्षरी करता? तेव्हा त्यांनी उत्तर दिले की पोईसे ह्या ठिकाणी माझा बाप्तिस्मा झाला ते ठिकाण व ती गोष्ट माझ्यासाठी महत्त्वाची आहे. मी राजा आहे पण त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे मी बाप्तिस्म्याद्वारे देवाचं मुल आहे. आणि बाप्तिस्म्यामुळे जीवनाच्या शेवटी मला स्वर्गराज्यात प्रवेश मिळणार आहे.

मनन चिंतन:

          बाप्तिस्मा ही देवाची फार मोठी देणगी आहे. संत पौल म्हणतो की बाप्तिस्म्याद्वारे आपल्याला पवित्र आत्म्याचे दान मिळते व आपण पवित्र आत्म्याचे मंदिर होतो. (१ करिंथ ३:१६) आपण ख्रिस्ताद्वारे पित्याशी एकरूप होत असतो. बाप्तिस्मा करणारा योहान नम्र होता त्याने ख्रिस्ताचा यार्देन नदीत बाप्तिस्मा केला पण तो कधी गर्वाने फुगून गेला नाही. प्रभू येशू पण नम्र राहिला. त्याने नम्रपणे योहानाकडून बाप्तिस्मा स्वीकारला. त्यामुळे येशू मानव झाला होता हे आपल्याला दिसून येते. पित्याचा आशीर्वाद प्रभू येशूवर नेहमी होता हे आपल्याला आजच्या शुभवर्तमानात दिसून येते. आपल्या पित्याचे कार्य पुढे नेण्यासाठी येशू ह्या जगात आला होता. येशू जेव्हा पाण्यातून वर आला तेव्हा पवित्र आत्मा त्याच्यावर कबुतराच्या रूपाने उतरला व आकाशवाणी झाली ह्याचा अर्थ प्रभू येशू जे काही करत होता त्याला पित्याची मान्यता व त्याचा आशीर्वाद होता.

          ख्रिस्ताचा बाप्तिस्मा आपल्याला आपल्या बाप्तिस्म्याची आठवण करून देतो. आपल्या सगळ्यांचा बाप्तिस्मा पाण्याने व पवित्र आत्म्याने झालेला आहे. देवाने आपल्या सगळ्यांना त्याची लेकरे म्हणून निवडलेले आहे. याची साक्ष देण्यासाठी ख्रिस्ताप्रमाणे आपल्याला जगात पाठवले आहे. आपल्याविषयी देव संतुष्ट आहे. आपले आईवडील व धर्मआईबाप आपल्यासाठी देवाला वचने देतात. आपण ती वचने दररोजच्या जिवनात आणण्याचा प्रयत्न करूया तसेच ख्रिस्ताच्या दयेची व प्रेमाची साक्ष जगाला देऊया. अनेक संतानी अशी साक्ष व ग्वाही जगाला दिलेली आहे. आपणसुद्धा संतांप्रमाणे कार्य करण्याचा प्रयत्न करूया. ह्या पवित्र मिस्साबलीदानामध्ये त्यासाठी विशेष प्रार्थना करूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: प्रभो आमचा विश्वास दृढ कर.

१) सर्वसमर्थ दयाळू परमेश्वरा आम्ही तुझ्याकडे आमचे पोप फ्रान्सिस, महागुरू, सर्व धर्मगुरू, धर्मबंधू, धर्मभगिनी ह्यांच्यासाठी खास प्रार्थना करतो. तुझे कार्य करण्यासाठी त्यांना शक्ती व चांगले आरोग्य दे. तुझा पवित्र आत्मा त्यांच्यावर येऊ दे ह्यासाठी प्रार्थना करूया.

२) सर्वसमर्थ प्रेमळ परमेश्वरा आम्ही सर्व मिशनरी बंधुभगिनिंसाठी प्रार्थना करतो तुझ्या प्रेमाचा व दयेचा संदेश त्यांनी सर्वत्र पोहचवावा म्हणून त्यांना आशीर्वादित कर.

३) सर्वसमर्थ दयाळू परमेश्वरा आम्ही आमच्या तरुण-तरुणींसाठी प्रार्थना करतो. विशेषकरून जे तुझ्यापासून दुरावलेले आहेत त्यांना सहाय्य कर व त्यांचा विश्वास मजबूत कर जेणेकरून त्यांनी चांगल्या मार्गाचा अवलंब करून तुझे प्रेम सर्वत्र पोहचवावे.

४) सर्वसमर्थ प्रेमळ परमेश्वरा आम्ही जे आजारी, दुःखी आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. तसेच जे कोरोनाच्या आजाराने त्रस्त आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. तुझा स्पर्श त्यांना कर व आजारातून त्यांना बरे कर व सर्वांना सुखी ठेव.

५) थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक व सामाजिक गरजांसाठी प्रार्थना करूया. 


No comments:

Post a Comment