दिनांक: ०३/०१/२०२१
पहिले वाचन: यशया ६०:१-६
दुसरे वाचन: इफिसकरांस पत्र ३:२-३, ५-६
शुभवर्तमान: मत्तय २:१-१२
प्रस्तावना :
ख्रिस्तसभा आज प्रकटीकरणाचा सण म्हणजेच तीन राजांचा सण साजरा करीत आहे. हे तीन राजे येशूला नमन करण्यासाठी दुरून आले होते. कारण त्यांना जगाचा तारणारा, प्रकाशमान तारा म्हणजेच ख्रिस्त बाळ सापडला होता. आजच्या पहिल्या वाचनात यशया संदेष्टा आपणास प्रकाशमान होण्यास सांगत आहे. तर दुसऱ्या वाचनात संत पौल आपल्याला सांगतो की प्रकटीकरणाच्याद्वारे मला रहस्य कळले व ते रहस्य ख्रिस्त येशूच्याठायी आम्हास कळविण्यात आले. ज्या प्रकारे तीन ज्ञानी लोकांनी देवाने देलेल्या ताऱ्याचे चिन्ह ओळखून येशू बाळाचा शोध केला, त्याचप्रकारे आपणसुद्धा आपल्या जीवनात देवाने दिलेल्या चिन्हाला ओळखून प्रभूचा शोध घेण्यास आपणाला कृपा व शक्ती मिळावी म्हणून आजच्या मिस्साबलिदानात प्रार्थना करुया.
पहिले वाचन: यशया ६०: १-६
आजचे पहिले वाचन हे सियोन या माता नगरीला उद्देशून आहे. तिचे पुत्र व कन्या केवळ इस्त्रायलातील पांगलेले नाहीत, तर प्रत्येक राष्ट्रातील आहेत. ही सर्व राष्ट्रे प्रकाशात येतील आणि ज्याप्रमाणे कबुतरे आपल्या खुराड्याकडे आपोआप येतात, तसे ते देवाकडे येतील आणि आशेने देवाकडे पाहतील. हे आपणास यशया संदेष्टा सांगत आहे.
दुसरे वाचन: इफिसकरांस पत्र ३:२-३, ५-६
यहुदी लोकांना वाटत होते की, ‘ते देवाची निवडलेली माणसे आहेत’ म्हणून संत पौल दुसऱ्या वाचनात ‘विदेशी लोकांचा देवामध्येच समावेश आहे’ या बाबीवर विशेष भर देतो. कारण दुसऱ्या जातीतील लोकांना प्रभूच्या राज्यात वारसा मिळावा व त्यांनीसुद्धा त्या एकाच शरीराचे अवयव व्हावे आणि त्यांना ही ख्रिस्ताची अभिवचने मिळवावीत असे पौलाला वाटते. देवासाठी सर्व लोक एकसमान व प्रिय आहेत. आपण प्रेषितांची कृत्ये १०: ३४-३५ मध्ये एकतो, ‘देव तोंड पाहून माणसांना वागवीत नाही, तर जे त्याला भितात व त्याच्या इच्छेप्रमाणे योग्य तेच करतात – मग ते कोणत्याही वंशाचे व जातीचे असो – देवाला त्या व्यक्ती मान्य व प्रेमळ असतात.
शुभवर्तमान: मत्तय २:१-१२
येशू हा जुन्या करारातील
देवाने वचन दिलेला इस्त्रायलचा तारणारा आहे. तो इस्त्रायलचा राजा आहे, असा विषय
मत्तयच्या शुभवर्तमानात मांडला आहे. भविष्यवाद्यांनी भाकीत केलेला तारणारा आणि
राजा हा येशूच आहे आणि त्याचे आपण मनोभावे स्वागत करावे व आपण विश्वास ठेवावा असे
मत्तय आपल्या वाचकांना आवर्जून सांगत आहे.
आजच्या शुभवर्तमानात जे मागी लोक ख्रिस्ताला भेट देण्यास येतात ते ज्योतिषी होते. ग्रहताऱ्यांचे सूक्ष्म निरीक्षण आणि अवलोकन यांच्या आधारे ते आपले निष्कर्ष काढीत. पूर्वेकडील प्रदेशात ग्रहताऱ्यांचे निरीक्षण व गणिते करून पॅलेष्टाइन देशात राजकुळात महत्त्वपूर्ण व्यक्तीचा जन्म झाल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला. अर्थात या ‘बाळराजाच्या’ भेटीसाठी थाटामाटाने जाणे त्यांना अगत्याचे वाटले कारण देवाचे हे त्यांना अस्सल प्रकटीकरण होते.
मनन चिंतन:
पर्शिया ह्या शहरामध्ये
अशी एक गोष्ट सांगितली जाते, शहा अब्बास हा एक राजा होऊन गेला ज्याला त्याच्या
राजवाड्यापेक्षा त्यांच्या दुःखी-कष्ठी लोकांमध्ये राहायला फार आवडायचे, आणि
म्हणूनच तो एका भिकाऱ्याचा वेश करून आपल्या बाजूलाच असलेल्या एका लोहाराच्या
दुकानात एका गरीब माणसाबरोबर बसून गप्पा करू लागला व त्याला बराच नियमित सल्ला देऊ
लागला. गरीब लोहार देखील ह्या भिकाऱ्याच्या वेशात आलेल्या महाराजाचा सल्ला ऐकू
लागला. लोहाराने दिलेली थोडी भाकरही राजा खाऊ लागला. अशाप्रकारे एकमेकांची मैत्री
वाढू लागली. महाराज रोज ह्या गरीब लोहाराकडे येऊ लागला त्याच्या दुःखात सहभागी होऊ
लागला. काही दिवसातच दोघे एकमेकांचे जवळचे मित्र बनले. एक दिवस राजा आपल्या
मित्राला म्हणाला. तू मला ओळखतोस काय? माझी ओळख तुला माहिती आहे काय? मी तुझा राजा
शहा अब्बास आहे. राजाला वाटले त्याचा मित्र हे ऐकून खुश होईल व त्याच्याकडून
काहीतरी मोठे बक्षीस मागील. परंतू तो गरीब व लाचार लोहार क्षणभर शांत उभा राहिला.
महाराज पुन्हा म्हणाला तु माझ्याकडून हवे ते मागू शकतो. तुला मी गरीबाचा श्रीमंत
करू शकतो, माझ्याकडे असलेली दौलत व धन-संपत्ति मी तुला देऊ शकतो, एखाद्या राज्याचा
धनी मी तुला करू शकतो किंवा माझ्या राजवाड्यात तुला एकादे मंत्रिपद देऊ शकतो. तू
फक्त तुला काय हवे आहे ते सांग? थोड्यावेळानंतर तो लोहार शांतपणे म्हणाला, महाराज,
मला सर्व कळले आहे, परंतू तुम्ही हे असे का केले? माझ्या सारख्या गरीब व लाचार
लोहारासाठी तुम्ही तुमचा महाल, तुमचा मान-सन्मान, मर्यादा सोडून माझ्यासारखे गरीब
व लीन झाले, आणि ह्या माझ्या झोपडीमध्ये वास केला ह्या पेक्ष्या मोठे बक्षीस ते
मला काय हवे आहे? मला आता एकच मोठे बक्षीस हवे आहे ते म्हणजे तुमची आणि माझी
झालेली ही मैत्री सदैव अशीच राहावी अशी माझी इच्छा आहे ती मात्र तुम्ही पुरी करा.
प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज पवित्र ख्रिस्तसभा प्रकटीकरणाचा सोहळा साजरा करीत आहे आणि प्रभू येशु ख्रिस्ताच्या आपणांस झालेल्या प्रकटीकरणा विषयीचे महत्व पटवून सांगत आहे. येशु ख्रिस्त जगाचा प्रकाश आहे आणि तो अंधाऱ्या व पापी जगात देवाच्या दयेचा, प्रेमाचा आणि शांतीचा प्रकाश आपणा सर्व मानवांना देण्याकरिता ह्या पृथ्वीतलावर अवतरला. ख्रिस्त स्वतः एकाच वेळी संपूर्णतः देव आणि मनुष्य होता. तो पूर्णपणे जाणून होता की, त्याला ह्या जगात पापी मानवाचे तारण करण्याकरिता पाठविले होते आणि म्हणूनच तो म्हणाला होता की माझ्या मरण आणि पुनरुत्थानाने साऱ्या पापी जगाचे तारण होणार आहे आणि हेच ख्रिस्ताचे शब्द सिमिओन ह्या संदेष्ट्याद्वारे मरियेला सांगण्यात आले होते. सार्वकालिक जीवन हे फक्त सार्वकालिक प्रभू येशू ख्रिस्ताद्वारेच शक्य आहे. आपण सर्व प्रकाशाची लेकरे आहोत आणि आपणा सर्व ख्रिस्ती लोकांची एक महान जबाबदारी आहे की जी लोक बहकलेली आहेत त्यांना आपण त्या प्रकाशाकडे आणले पाहिजे.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद: हे प्रभू, आम्हांला तुझे दर्शन घडव.
१. ख्रिस्तसभेची धुरा वाहणारे
आपले पोप महाशय, बिशस्प, धर्मगुरू
व तसेच धर्म-भगिनी ह्यांना देवाचे प्रेम, द्या व शांती
इतरांपर्यंत पोहचविण्यासाठी कृपा व शांती लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने देवाची मुले
म्हणून जीवन जगावे व ख्रिस्ताच्या वचनांचे आज्ञाधारकपणे पालन करून देवाच्या
इच्छेला प्रथम प्राधान्य द्यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. आज जगात अशांतता असल्यामुळे वैरीपणाचे
वातावरण निर्माण झाले आहे. म्हणून जगात शांती पसरावी व एकात्मतेचे वर्चस्व स्थापन
व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. हे नवीन वर्ष चांगले, सुखा-समाधानाचे, शांतीचे व भरभराटीचे जावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. आपण आपल्या सामाजिक, कौटुंबिक आणि वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment