Nevil Govind hails from St. Andrew’s parish, Uttan-Chowk, Bhayander. He belongs to the St.
Bonaventure Capuchin Province of Maharashtra. Presently, he is pursuing his Theological studies in Jnana
Deepa Vidyapeeth, Pune.
ख्रिस्तजयंती (मध्यरात्री)
२४/१२/१३
वर्ष- अ
पहिले वाचन - यशया ९:१-६
दुसरे वाचन
– पौलाचे तीताला पत्र २: ११-१४
शुभवर्तमान - लूक २:१-१४
“तुमच्यासाठी आज
दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे; तो ख्रिस्त प्रभू
आहे'.”
प्रस्तावना:
येशू ख्रिस्ताच्या
जन्माच्या सातशे वर्षे अगोदर यशया संदेष्ट्याने
एक भाकीत केले होते, “आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता
राहील, त्याला समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील.” ह्याच भाकीताच्या पुर्णतेची घोषणा आजच्या
शुभवर्तमानाद्वारे करताना देवदूत मेंढपाळांना
सांगतो की, तुमच्यासाठी आज दाविदाच्या
गावात तारणारा जन्मला आहे;
तो ख्रिस्त प्रभू
आहे'.
आजच्या दुस-या वाचनात
ख्रिस्त प्रेमाने झपाटलेला प्रेषित संत पौल आपणास सांगतो कि, “सर्व माणसांना तारण देणारी
देवाची कृपा प्रकट झाली आहे. ” आज आपण नाताळचा सण साजरा
करीत असताना ह्या पवित्र मिसाबलीदानात, बाळ येशू द्वारे
देवाने प्रगट केलेली त्याची कृपा स्विकारून प्रेम, दया,क्षमा आणि शांती हा नाताळचा
शुभ संदेश आपल्या आचारणात आण्यासाठी विशेष प्रार्थना करूया.
पहिले वाचन: यशया ९:१ – ६.
येशू ख्रिस्ताच्या
जन्माच्या आधी सातशे वर्षे अगोदर यशया संदेष्ट्याने एक भविष्य केले होते, “कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील, त्याला समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील.” ह्याद्वारे मानवाला एक
विश्वास व एक आशा मिळाली.
दुसरे वाचन: पौलाचे तीताला पत्र २: ११-१४
दुस-या वाचनात ख्रिस्त प्रेमाने
झपाटलेला प्रेषित संत पौल तीताला क्रेतांत येथील अंतर्गत कारभाराविषयी व ख्रिस्ती जणांच्या जीवन आचरणाविषयी कोणते शिक्षण घ्यायला
पाहिजे इत्यादी बाबतीत बोध करतो. देवाने सर्व माणसांना तारणाविषयी कृपा प्रगट केली आहे. त्या कृपेमध्ये आम्हाला
आमचा देव व तारणारा येशु ख्रिस्त याच्यामध्ये गौरवमय जीवन प्राप्त झाले आहे.
सम्यक विवरण: शुभवर्तमान: २:१-१४:
संत लूक ह्याचे शुभवर्तमान
हे नव्या करारातील तिसरे पुस्तक आहे. लूक त्याच्या सुरुवातीस लिहितो की, त्याने हे पुस्तक सखोल
संशोधन करून लिहिलेले आहे(लूक१:१-३) आणि तो ख्रिस्त जन्माच्या कहाणीची सविस्तर
माहिती देतो. लूकचे शुभवर्तमान हे सर्व मानवांसाठी आहे. त्याचा दृष्टीकोन अत्यंत
विशाल, व्यापक, असा आहे. येशू हा सर्वांसाठी आहे. कोणी यहुदी असो किवा परराष्ट्रीय असो, पुरुष असो किवा स्त्री असो, श्रीमंत असो किवा गरीब, संत किंवा पापी, कोणीही असो; येशू हा प्रत्येक मानवाच्या
तारणासाठी आलेला आहे. तिथे जात, वंश, लिंग, धर्म, संस्कृती, सामाजिक दर्जा इत्यादीमुळे
उदभवणारी कोणतीही बंधने नाहीत.('चांगला शोमरोनी' १०:२५-३७; शोमरोनी कुष्ठरोगी, १७:११-१९) 'जकातदार व पाप्यांचा मित्र' (लूक ७:३४). लूक येशूचा जन्म कधी, कोणत्या परिस्थितीत व कसा
झाला याचा वृत्तांत सादर करतो. तारणाची सुवार्ता हाच प्रमुख विषयाचा मुद्दा
आहे. सुवार्ता आणि तारण हे लूकचे आवडते शब्द आहे आणि देव जगात येणार हीच सुवार्ता
आहे.
सणाची पाश्वभूमी:
दर २५ डिसेंबरला आपण
ख्रिस्तजयंतीचा-नाताळाचा सण साजरा करतो. परंतु २५ डिसेंबरलाच आम्ही हा सण का साजरा करतो? इतर दिवशी का नाही? तसे पाहिले तर येशू ख्रिस्त
नक्की कोणत्या दिवशी जन्मला, हे कोणीही निश्चितपणे सांगू शकत नाही.२५ डिसेंबरला रोमन लोक सूर्याचा सण साजरा
करीत, कारण या दिवसाच्या आसपास
दिवस मोठा होऊ लागतो. सूर्याने अंधारावर-रात्रीवर विजय मिळवला हा आनंद व्यक्त
करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. रोमन ख्रिस्ती लोकांनी येशू ख्रिस्ताचा जन्मदिन
साजरा करण्यासाठी या सणाची निवड केली.
मरियेच्या उदरी येशूचा जन्म:
"यास्तव प्रभू स्वत: तुम्हांस चिंन्ह देत आहे; पाहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इम्मनुएल (आमच्याबरोबर देव) असे ठेविल"(यशया ७:१४). "नमो, कृपा पावलेल्या स्त्रिये, कल्याण असो; प्रभू तुझ्याबरोबर असो; मरिये, भिऊ नको, कारण देवाची कृपा तुझ्यावर
झाली आहे; पाहा, तू गरोदर राहशील व तुला
पुत्र होईल. त्याचे नाव येशू ठेव"(लूक १:२८,३०,३१). (मत्तय १:२१ मध्ये देवदूत
योसेफाला स्वप्नात दर्शन देऊन सांगतो की, 'मरीयेच्या उदरी पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आलेल्या
बाळाचे नाव तू येशू ठेव; कारण तो आपल्या लोकांचे
पापांपासून तारण करील'). मरियेच्या उदरी येणारा येशू
हा दाविद राजाच्या वंशात जन्माला येणारा तारणारा अभिषिक्त (हिब्रू- मसीहा; ग्रीक- ख्रिस्त) आहे असे देवदूताच्या
वचनांवरून दिसून येते (लूक १:३२, ३३; २ शमुवेल ७:८-१६). "स्त्रियांमध्ये तू धन्य व तुझ्या पोटचे फळ धन्य!" (लूक १:४२-४३). देवाने जगाच्या तारणासाठी
"आपल्या पुत्राला पाठविले; तो स्त्रीपासून जन्मलेला, नियमशास्त्राधीन असा जन्मलेला होता". (गलतीकरांस ४:४)
येशूला बाळंत्याने गुंडाळून गव्हाणीत ठेवले; कारण त्यांना उतारशाळेत जागा नव्हती:
"गव्हाणीत ठेवलेले बाळ" हा शब्दसमूह (लूक२:१-२०) या उता-यात तीन ठिकाणी केलेला आढळतो (लूक२:७,१२,१६). या वचनावरुन एक गोष्ट मात्र लक्षात येते कि, योसेफ व मारिया ही साधी, देवभिरु, धार्मिक, आज्ञाधारक माणसे होती. आर्थिक किंवा सामाजिक दृष्ट्या ती श्रीमंत नव्हती. इच्छा असूनही हक्काने किंवा अधिकारवाणीने कुणाकडे मदत मागण्याची त्यांच्यामध्ये कुवत नव्हती. अशा परिस्थितीत नाइलाजाने त्यांना बाळासाठी गव्हाणीचा आश्रय घ्यावा लागला. "श्रीमंत असूनही तो आमच्यासाठी गरीब झाला" (२करिंथ८:९).
मेंढपाळांना येशू जन्माचा शुभसंदेश: (लूक२:८-१४):
जगाचा तारणारा जन्मला आहे हा 'सर्व लोकांसाठी मोठ्या आनंदाचा शुभसंदेश' देवदूत सर्वप्रथम बेथलेहेमच्या परिसरात रात्रीच्यावेळी आपल्या कळपाची राखण करीत असलेल्या मेंढपाळांना देतो. तारणारा मसीहा हा दाविदाच्या वंशातून जन्माला येणार होता. दाविद हा लहानपणी मेंढपाळ होता(१ शमुवेल १६:१-१३), तसेच बेथलेहेम हे दाविद राजाचे शहर होते(लूक २:४). वरील कारणांमुळे मेंढपाळांचा खास उल्लेख केला असावा. शिवाय लूकच्या शुभवर्तमानात यहुदी समाजातील गरीब, कनिष्ठ, तुच्छ लेखले जाणारे लोक इत्यादि बद्दल येशू विशेष आस्था व प्रेम दाखवतो. त्या संदर्भात मेंढपाळ हे अगदी खालच्या थरातील लोक; अशांची निवड या शुभसंदेशासाठी देव करतो हे लूक आपल्या नजरेस आणून देतो.
"तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे.(२:११):
"आज":- हा शब्द लूकच्या शुभवर्तमानात महत्वाचा आहे, कित्येक महत्वपुर्ण उता-यात तो आढळतो; उदा. ४:२१; ५:२६; १२:२८; १३:३२,३३; १९:५,९; २२:३४,६१; २३:४३. देवाचे तारण हे कधीतरी भावी काळामध्ये येणार नसून आतापासूनच, आजपासूनच त्याला सुरुवात झाली आहे असा अर्थ "आज" या शब्दामध्ये सामावलेला आहे.
"तारणारा": येशू या नावाचा अर्थ "देवाचे तारण" असा होतो. लूकच्या विवरणात दिसून येते की हे 'तारण' म्हणजे पापी मानवाची पापाच्या दास्यातून किंवा सर्व प्रकारच्या वाईटापासून(लूक१:७७) होणारी मुक्ती; व मानवाचा देवाशी निर्माण होणारा समेट किंवा जवळीक(लूक१९:५,१०; २३:४३). मी नितीमानास बोलावण्यास
आलो नाही तर पापी लोकांस देवाकडे वळविण्यास आलो आहे कारण मनुष्याचा पुत्र 'हरवलेले शोधावयास' व तारावयास आला आहे (लुक१९:१०).
'ऊर्ध्वलोकी देवाला गौरव व पृथ्वीवर ज्यांच्यावर
देवाची कृपा झाली आहे अशा माणसांस शांती'(लुक२:१४):
तारणारा, ख्रिस्त प्रभू याच्या
जन्माबद्दल देवदूत देवाचे स्तुतिगान वरील वाक्यात करतात. या दैवी शांतीमुळे 'मोठा आनंद सर्व लोकांस
होणार आहे' (लुक २:१०). नंतर लूक १९: ३८ मध्ये जनसमुदाय येशूच्या कार्याविषयी आनंदाने
देवाची स्तुती करीत म्हणतो,
"स्वर्गात शांती आणि ऊर्ध्वलोकी गौरव."(लुक २:१४ व १९: ३८) ही वचने
अंतर्भाव दर्शवितात म्हणजे या दोन वचनांच्या मध्ये अंतर्भूत असलेल्या येशूच्या
कार्यविषयीचा सर्व वृत्तांत 'शांती' विषयी आहे. ख्रिस्ताचे
कार्य, मरण पुनरुत्थान याद्वारे
देवाने मानव जातीशी पापाक्षमेद्वारे समेट केला आहे; शांती प्रस्थापित केली आहे. "स्वर्गात शांती"
व "पृथ्वीवर शांती" हा सर्व देवाच्या मानवजातीवरील कृपेचा परिणाम आहे.
जगाचा तारणारा, ख्रिस्त प्रभू ह्याने
स्वर्गीय शांतीची देणगी आपल्या कार्याद्वारे मानवांस प्राप्त करून दिली आहे.
स्वर्ग व पृथ्वी, देव व मानव या दैवी
शांतीद्वारे एक झाले आहेत (कलसैकरांस १:२०; इफिसकारांस २:१४-१८).
बोधकथा:
१. एकदा एका राज्याला आपल्या राज्यांत
जे शेतकरी होते त्यांचे राहणीमान बदलायचे होते. त्यामुळे त्याने सर्व
लोकांस भेटी देण्यास सुरुवात केली, तेव्हा लोकांनी राज्याला दुरूनच उच्च दर्जाने मान-सन्मान
दिला परंतु त्याच्या जवळ कोणी जाण्यास तयार नव्हते. राजा अपयशी ठरला, शेवटी राजाने आपल्या
पुत्राला त्या लोकांसारखाच पोशाख घालून लोकांमध्ये पाठवले. तो त्यांच्यात राहिला, वावरला आणि त्यांच्यातील
भांडणे मिटवली, शत्रूंना जवळ केले, द्वेष मत्सर नाहीसा केला, मार्गदर्शन केले आणि शेवटी
यशस्वी ठरला.
२. सर्वत्र आनंदाचे वातावरण
पसरलेले होते. निरव शांततेत रात्रीच्या बारा वाजता बेलचा घंटानाद कानी पडला आणि
लोकांची लगबग सुरु झाली. झुंडीच्या झुंडी चर्चच्या दिशेने जावू लागल्या होत्या. आज
बाळ येशूचा जन्मसोहळा…………
चर्चच्या आवारात
रंगीबेरंगी कपड्यातली मंडळी आनंदलेली……… विविध अत्तरांच्या सुवासान
वातावरण अधिकच सुगंधात न्हाउन निघाले होते. त्याच चर्चच्या आवारात लुळे, पांगळे, भिकारी काहीतरी मिळण्याच्या आशेने लोकांच्या तोंडाकडे आशाळभूत नजरेने पाहत हात
पसरित होते. आपल्याच नादात असलेल्या मंडळींचे त्यांच्याकडे लक्षच नव्हते. जो-तो सरळ चर्चमध्ये प्रवेश करत होता, त्याच भिका-यांच्या
घोळक्यात एक भिक्षेकरी माता आपल्या आठ दिवसाच्या बाळाला घेवून भीक मिळण्याच्या
आशेने लोकांची काकुळतीने विनवणी करत होती. "या लेकरासाठी काहीतरी द्या हो, मायबाप येशूबापांचा
आशीर्वाद मिळेल तुम्हांला." पण तिच्या आर्त स्वरांकडे कुणाचेही लक्ष नव्हते. धर्मगुरू आले आणि वेदीवर
विधीला सुरुवात झाली, प्रभूजन्माचा सोहळा मोठ्या
उत्साहाने साजरा झाला. "Happy Christmas" अशा शुभेच्छा देत जो-तो आनंदाने एकमेकांना मिठी मारत
होता. सर्वजण एकमेकांचा निरोप घेऊन आपापल्या घराकडे रवाना झाले. एक व्यक्ती शेवटी चर्चच्या
बाहेर पडला, अचानकपणे त्याच लक्ष त्या
भिक्षेकरी मातेकडे असलेल्या बाळाच्या रडण्याच्या आवाजाकडे गेले. सुंदर, निरागस बाळ पाहून त्यांना
खूप आनंद झाला. थंडीने कुडकुडणा-या त्या बाळाच्या अंगावर त्याने आपली शॉल टाकली. बाळाच्या मातेच्या हातात काही पैसे दिले व बाळाचे चुंबन घेवून तो आपल्या
घराकडे गेला.
मनन चिंतन:
"देव प्राचीन काळी
अंशाअंशांनी व प्रकारा-प्रकारांनी संदेष्ट्यांच्या द्वारे आपल्या पुर्वजांशी बोलला
तो ह्या काळाच्या शेवटी पुत्राच्या द्वारे आपल्याशी बोलला आहे; त्याने त्याला सर्व
गोष्टींचा वारीस करून ठेविले आणि त्याच्याद्वारे त्याने विश्व निर्माण केले"(इब्री
१:१-२). राजांना दिसलेला 'तारा' सर्वांना प्रकाश देणारा आणि गरजवंतांना मार्ग दाखवणारा ठरला. गरीब मेंढपाळांना 'गव्हाण' ख्रिस्ताच्या दर्शनाबरोबर
प्राप्त परिस्थितीचा स्वीकार करून, नम्रतेचा धडा देणारी ठरली. गव्हाणीत झोपलेल 'बाळ' शांतीचे, सत्याचे आणि निरागस नि:स्वार्थी प्रेमाचे
प्रतीक ठरले. 'तारा', 'गव्हाण' आणि 'बाळ' आज प्रेमाच्या प्रतीकातून
कौटुंबिक सहजीवनाची प्रतीके ठरत आहेत. म्हणून कवी जॉर्ज लोपीस आपल्या एका कवितेत
म्हणतात, "तुझ्या जन्मातून होऊ दे प्रत्येक
निखारा दवाचा थेंब प्रत्येक पिडीताच्या अश्रूतून जन्मू दे तूला पाहण्याचा
आरसा"
अशांत हृदयाला शांती
देण्यासाठी, प्रत्येक डोळ्यांतील अश्रू
पुसण्यासाठी, सर्व मानवजातीला पापमुक्त
करण्यासाठी मानवजातीचे हृदय प्रेमाने
भरण्यासाठी देवाच्या पुत्राने जगात जन्म घेतला. लोकांच्या हृदयामध्ये दया, क्षमा आणि शांतीचे बीज
पेरले. क्रुसावरील दु:ख सहन करतानाही वेदनांमधून क्षमेचे अतुलनीय उदाहरण दिले. “देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, ह्यासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सनातन जीवन प्राप्त व्हावे”(योहान ३:१६). ख्रिस्ती धर्माचा आणि तत्त्वज्ञानाचा हा सारांश आहे, हीच सुवार्ता आहे, हेच शुभवर्तमान आहे म्हणून येशू ख्रिस्ताचे अनुयायी दर वर्षी त्याच्या जन्माची आठवण करतात आणि ख्रिस्तजयंती साजरी करतात.
येशू ख्रिस्ताचा जन्म झाला तो एकदाच. त्याला वधस्तंभावर मारले गेले तेही एकदाच. ह्या ऐतिहासिक घटना पुन्हा पुन्हा घडणार नाहीत. आपण दर दिवशी नवीन जन्म घेत
असतो परंतु मरणावर विजय मिळवलेला पुनरुत्थित ख्रिस्त आपल्या अंतःकरणात नव्याने जन्म घेत असतो हा त्याच्या भक्तांचा अनुभव आहे. संत पौल म्हणतो, “मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो.”(गलतीकरांस पत्र २:२०) म्हणून ख्रिसमस हा वर्षात एकदा येणारा सण असला आणि तो आपण दर वर्षी वाढत्या उत्साहाने साजरा करीत असलो, तरी ख्रिस्तजन्म ही आपल्या जीवनातील एक दररोजची घटना व्हायला हवी. ख्रिस्ती जीवन हे रोजच्या रोज जगायचे असते. येशूने सांगितले की, आपण उद्याची काळजी करू नये, ती आपण स्वर्गातील पित्यावर सोपवावी. आपण फक्त रोजचीच भाकर त्याच्याकडे मागावी, आयुष्यभरचा पुरवठा नाही. ख्रिस्ती जीवन हा एक दर रोजचा प्रवास आहे, एक रोजचे आव्हान आहे, रोज मिळणारी एक नवीन संधी आहे. ख्रिस्ती जीवनात आपली दिवसेंदिवस वाढ होत गेली पाहिजे. आपल्या आचरणातून, शब्दांतून आणि व्यक्तित्वातून, आपल्यात जगत असलेल्या ख्रिस्ताचे इतरांना दर्शन घडावे.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
आपले उत्तर: हे प्रभो आम्हांला तुझ्या प्रेमाने
व शांतीने भरून टाक.
१. बाळ येशूच्या शांतीचा, प्रीतीचा संदेश पोप महाशय, कार्डिनल्स, बिशप, धर्मगुरू, धर्मभगिणी ह्यांनी पुर्ण
तन्मयतेने जगजाहीर करावा म्हणून आपण
प्रार्थना करू या.
२. आज जे लोक दुखी कष्टी आजारी आहेत त्यांना बाळ
येशूची विशेष कृपा व आशीर्वाद मिळावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
३. बाळ येशूचा शांतीचा संदेश आपण अंगीकारून तोच
शांतीचा संदेश इतरांपर्यंत पोहचवीण्यास आपणास शक्ती व कृपा मिळावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
४. जे लोक देवापासून दुरावलेले आहेत त्यांना बाळ
येशूकडे येण्याचा मार्ग सापडावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया
५. आपण आपल्या वयक्तिक गरजा प्रभू चरणाशी
ठेवूया.
Dear Nevil
ReplyDeleteCongratulations, well done. go ahead...