Wednesday, 18 December 2013

Wikie Bavighar hails from Our Lady of Sea, Uttan, Bhayander. He belongs to the St. Bonaventure Capuchin Province of Maharashtra. Presently, he is pursuing his Theological studies in Jnana Deepa Vidyapeeth, Pune.







आगमन काळातील चौथा रविवार
२२/१२/२०१३
यशया; ७:१०-१४.
रोमकरास पत्र;  १:१-७.
मत्तय;  १:१८-२४.                           
                                                
       "पाहा, कुमारी गर्भवती होईल व तिला पुत्र होईल."


प्रस्तावना:
आज आपण आगमन काळातील चौथा रविवार साजरा करीत असताना आजची उपासना आपले लक्ष येणा-या तारणारा-याकडे केंद्रित करते.आजच्या शुभवर्तमानाद्वारे आपणास प्रार्थनामय, संयमी आणि नम्र योसेफाचे दर्शन घडते जेव्हा योसेफला समजले कि मरिया गर्भवती आहे तेव्हा त्याने तिला गुप्तपणे सोडण्याचे ठरवले परंतु जेव्हा त्याला प्रभुच्या दुताद्वारे समजले कि हे सर्व देवाच्या आज्ञेप्रमाणे होत आहे तेव्हा त्याने स्वतःचा मीपणा बाजूला सारून देवाच्या हाकेला होकार दिला. योसेफने स्वतःच्या इच्छेला प्राधान्य दिले नाही तर देवाच्या कार्याला आणि इच्छेला प्राधान्य दिले.आपण सुद्धा आपल्या जीवनात नम्रता, संयमता व प्रार्थनेची आस धरून देवाच्या इच्छेला प्राधान्य दयावे म्हणुन ह्या मिसाबलीदानात प्रार्थना करू या.

पहिले वाचन: यशया;७:१०-१४.
"पाहा, कुमारी गर्भवती होईल व तिला पुत्र होईल….."(यशया;७:१४)अश्या शब्दात यशया संदेष्टा येशूच्या जन्माविषयी भविष्यवाणी करतो.

दुसरे वाचन: रोमकरांस पत्र; १:१-७.
संत पौल येशू ख्रिस्तचा खरा दास आहे कारण तो प्रेषित होण्याकरिता बोलावण्यात आलेला आणि देवाच्या सुवार्तेकरिता वेगळा केलेला आहे ह्याचा अनुभव त्याला दिमिष्काच्या वाटेवर झाला व पुनरूत्थित ख्रिस्ताने ख्रिस्ती लोकांचा छळ करणा-या शौलाला दर्शन दिले आणि त्याला परराष्ट्रात सुवार्ता संदेश पोहचविण्याच्या देवाच्या योजनेत महत्वाची भूमिका बजावण्याचे आवाहन केले. पौलाने येथे किंचित स्पर्श केलेला हाच मुद्दा पुढे रोमकरांस पत्रात केंद्रस्थानी केला आहे. 'सत्ताधारी देवाचा पुत्र' या नव्या पदावर येशूची नेमणूक झाल्याची घोषणा केली गेली.  देवाचा पुत्र म्हणून येशूचे सर्वकाळ पूर्व अस्तित्व आहेच पण आता मेलेल्यातून पुन्हा उठल्याने त्याला नवे सामर्थ्य व गौरव प्राप्त झाले आता हे सामर्थ्य विश्वास ठेवणा-या प्रत्येकाच्या तारणासाठी कार्यासाठी झाले आहे.

शुभवर्तमान: मत्तय; १:१८-२४.
आजच्या शुभवर्तमानामध्ये देवदूत योसेफाला स्वप्नात दर्शन देऊन सांगतो की, मरियेच्या उदरी पवित्र आत्माच्या सामर्थ्याने आलेल्या बाळचे नाव तू येशू ठेव, कारण तो आपल्या लोकांचे पापापासून तारण करील.मरियेच्या उदरी येणारा येशू हा दाविद राजाच्या वंशात जन्माला येणारा तारणारा अभिषिक्त (हिब्रु-मसिहा, ग्रीक-ख्रिस्त) आहे.

सम्यक विवरण:
 जुन्या करारामधून प्रकट केलेले देवाचे अभिवचन कसे परिपूर्ण होत आहे हे दाखविण्यासाठी घटनांची एक मालिका येथे सादर केली आहे. परंतू शुभवर्तमानाचा हा भाग सामान्यपणे बाल्यकाळातील वृत्तांत म्हणून ओळखला जातो येथील कथावृत्तांत योसेफच्या दृष्टिकोनातून सांगितला आहे
शुभवर्तमानकार मत्तय ख्रिस्त जन्माची कहाणी सांगताना नमूद करतो की, येशूची आई मरिया हिची योसेफबरोबर मागणी झालेली होती पण त्यांचे लग्न होण्यापूर्वीच पवित्र आत्म्याद्‌वारे ती गरोदर असल्याचे दिसून आले तिचा होणारा पती योसेफ हा सज्जन होता. मरियेची अब्रू चव्हाट्यावर मांडावयाची त्याची इच्छा नव्हती. म्हणून त्याने आपली मागणी गुपचूप मोडून टाकण्याचा बेत केला. ह्या नंतरच्या वाक्यामध्ये दूताने योसेफाले स्वप्नात दर्शन देऊन मरियेच्या गर्भवतीपणाचे कारण स्पष्ट केले(मत्तय;१:१८-२१).मरियेसारख्या तरूण मुलीला यावेळी एका मोठ्या संकटातून जावे लागले तिच्या मनामध्ये शंकेचे वादळ उठलेच असेल(लुक१:२९), पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने ती गर्भवती आहे असे इतरांना सांगणे वेडपटपणाचे आहे आणि हे रहस्य तिच्या सांगण्यावरून कोण खरे मानणार होते? ह्या मन:स्थितीमध्ये केवळ पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यावरच तिला विसंबून राहणे भाग होते.
योसेफच्या विचाराची तिला चाहूल लागली असेल. ह्या प्रसंगी मरियेने केवळ एकच गोष्ट केली आणि ती म्हणजे तिने प्रभूच्या शब्दावर आणि योसेफाच्या चांगुलपणावर विश्वास टाकला, वेगवेगळ्या शंकाकुशंकातून मन जात असताना पराक्रमी देवाच्या शब्दावर आणि वाङनिश्चय झालेल्या आपल्या भावी पतीच्या धार्मिकतेवर तिने विश्वास ठेवला. देवाच्या मदतीच्या आशेवर तिने आपल्या जीवनाचे पुढचे पाऊल उचलून एकमेकांना साथ दिली आणि नव्या जीवनास श्रध्दापूर्वक भाविकतेने सुरवात केली. काही दिवसातच ह्या दोघांवर पुन्हा नव्याने आघात झाला नवे संकट त्याच्यासमोर उभे राहिले रोमी सुभेदाराच्या खानेसुमारीच्या फर्मानानुसार त्यांना त्यांच्या पूर्वजांच्या गावी जावे लागले तेथे त्यांना ना घर ना दार, मरिया गरोदर होती, दिवस भरत आलेले अशा स्थितीमध्ये नाझरेथ ते बेथलहेम हा पायी प्रवास करणे सोपे नव्हते. तरी पण सरकारी फर्मानाला मान देऊन त्यांनी हा प्रवास गाढवावर आपली सामग्री लादून सुरू केला मरिया आणि योसेफाने एकच सत्य जाणले आणि ते म्हणजे परात्पराच्या दूताने आणि परात्पराच्या आत्म्याने त्यांच्यावर बालकाच्या संगोपनाची जबाबदारी दिली व ती जबाबदारी त्यांच्यासाठी महत्वाची होती परंतु सरकारी फर्मानानुसार आपली नावनोंदणी करणे हेच कर्तव्य ते पार पाडत होते ह्या कर्तव्यामुळेच एक ऐतिहासिक सत्य सा-या जगासमोर येणार होते,  ह्याच दारिद्रयात आणि गोठ्यात दाविदाचा वंशज जन्माला येणार होता.

बोध-कथा:
१. एक आदिवासी बाई आपल्या तान्हया बाळाबरोबर झोपडीत राहत होती. एकदा मध्यरात्री झोपडीला सर्व बाजूने आग लागली होती व त्या बाईला झोपडी बाहेर पडता आले नाही तिने आपल्या बाळाला झोपडीमध्ये एक खड्‌डा होता,  त्यामध्ये झोपवलं व ती त्या बाळाच्या अंगावर झोपली लोकांनी झोपडी विझवली तेव्हा त्यांना बाई भाजलेली आढळली, परंतु तिचे बाळ मात्र सुखरूप होते. (असाच निस्वार्थीपणा योसेफ आपल्या जीवनात दाखवतो.)

मनन चिंतन (जीवन ध्येय):

१.   प्रार्थना म्हणजे भाविकाने केलेला परमेश्वराचा शोध, त्याचा शोध घेऊन प्राप्त झालेला हर्ष मानवाच्या जीवनाला दिशा आणि आकार प्राप्त करून देतो. दिशाहीन जीवन जगणारी माणसे जेव्हा देवाचा शोध घेतात तेव्हा त्यांच्या जीवनातील दिशाहीनता नष्ट होऊन, त्यांना अर्थपूर्ण जीवनाचा आनंद मिळतो प्रार्थना हा देवाबरोबर साधलेला सुसंवाद, ज्याद्‌वारे आपण देवाबरोबर आपल्या घनिष्ठ नातेसंबंधाची स्थापना करतो. ह्या प्रेमळ नातेसंबंधात देव आपल्या गरजा, व्यथा, दु:खे-संकटे सर्वच जाणतो व आपल्या प्रार्थनेला होकारात्मक उत्तर देतो.
आजच्या शुभवर्तमानाद्‌वारे आपली भेट प्रार्थनामय योसेफाबरोबर होते मरिया व योसेफाचे वाग्दान झालेले होते परंतु त्यांचा सहवास होण्यापूर्वी ती पवित्र आत्म्यापासून गर्भवती झालेली दिसून आली.तरी सुध्दा योसेफास मरियेची बेअब्रु करण्याची इच्छा नव्हती ह्या संकटमय दुविधा परिस्थितीत योसेफास नक्की काय करावे हे सुचत नव्हते, योसेफ हा नीतीमान होता त्याला कोणताही निर्णय रागाने, घाईगडबडीत, विचार न करता घ्यायचा नव्हता. त्याचा देवावर पुर्णपणे विश्वास होता त्याने संयमाने ही संकटमय दुविधा परिस्थिती देवाच्या चरणाशी समर्पित केली.ह्या संकटमय दुविधा परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रभूच्या दुताने त्याला स्वप्नात दर्शन देऊन म्हटले, ''योसेफा, दाविदाच्या पुत्रा, तू मरियेला आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास नकार करू नकोस, कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे.''(मत्तय१:२०) अशाप्रकारे देवाने योसेफाच्या प्रार्थनेला होकारात्मक प्रतिसाद देऊन योसेफाला जगाच्या तारण कार्यामध्ये सहभागी करू घेतले.
आजच्या ह्या आधुनिक युगात कधी-कधी आपल्या जीवनात सुध्दा संकटमय दुविधा परिस्थितीची मोठी रांगच लागलेली असते, नक्की काय करावे? व कोणत्या मार्गावर अग्रक्रमण करावे? आलेल्या परिस्थितीस 'होय' म्हणावे कि 'नाही'? असे अनेक प्रकारचे प्रश्न आपल्या समोर उभे असतात ह्या सर्व दुविधा परिस्थितीत आपण काय करावे हे समजत नसते परंतु देव आपल्याला ह्या सर्व संकटमय परिस्थितीवर मात करण्यासाठी योसेफाप्रमाणे संयमाने वागून, देवावर विश्वास ठेवण्यास आवाहन करत आहे. ज्याप्रमाणे योसेफाने नम्रतेने व निस्वार्थीपणाने पवित्र आत्म्याद्वारे गर्भवती असलेल्या मरियेचा आपल्या जीवनात स्विकार केला त्याचप्रमाणे आपण सुध्दा आपल्या कुटूंबातील सर्व व्यक्तींचा व आपल्या शेजा-यांचा नम्रतेने व निस्वार्थीपणे स्विकार केला पाहिजे, एकमेकांची सुख-दु:खे जाणून घेतली पाहिजेत तरच आपण ख-या अर्थात ह्या आगमनकाळाची तयारी करून  ह्या जगी जन्म घेणा-या तारणा-याला आपल्या हृदयात स्थान देऊ शकू.
             एकदा एका ठिकाणी काही लोक वाळूमध्ये काम करत होते. काम करत असताना एका माणसाचे घड्याळ हरवले, सर्वजण घड्याळ शोधायला लागले परंतु घड्याळ काही सापडेना. एक लहान मुलगा हे सर्व पाहत होता, त्याने सगळ्यांना घड्याळ शोधण्यास बंद केले आणि म्हटले, ‘तुम्ही सर्वजण बाहेर एकत्र उभे राहा मग त्याने वाळूवरती कान लावले आणि काही क्षणातच घड्याळ शोधले सगळ्यांनी त्याला विचारले, हे तुला कस काय शक्य झाले?’  तेव्हा त्या मुलाने सांगितले  कि तुमच्या सर्वांच्या आवाजामुळे तुम्हाला घड्याळ कुठे आहे ते सापडत नव्हते, परंतु जेव्हा तुम्ही शांत झाले तेव्हा मी वाळूवर कान लावून घड्याळाची टिक टिक ऐकली आणि मला ताबडतोब घड्याळ सापडले.
ह्या आधुनिक जगात कधी-कधी आपण सर्वजण आपल्या आजुबाजुला होणा-या घाईगडबडीत व आवाजात हरवले जातो व देवाची वाणी ऐकू येण्यास कठीण जाते. जर आपण  योसेफाप्रमाणे देवावर लक्ष्य केंद्रित केले व मन शांत केले तर आपल्याला देवाची वाणी नक्कीच ऐकू येईल. आजच्या शुभवर्तमानात आपण ऐकतो कि कुमारी गर्भवती होईल व तिला पुत्र होईल व त्याला ''इम्मानुएल'' म्हणजे देव आम्हामध्ये वास्तव करील देव आपणा बरोबर आहे परंतु आपण त्याला ओळखत नाही म्हणून आपण देवाचा शोध योग्य ठिकाणी व योग्य प्रकारे केला पाहिजे.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना.
प्रतिसाद: हे प्रेमळ बापा, आम्हावर दया कर.
१.ख्रिस्तसभेचा कारभार पाहणारे आपले परमगुरू स्वामी, महागुरू स्वामी, सर्व धर्मगुरू, धर्मबंधू व धर्मभगिनींवर परमेश्वराचा आर्शिवाद असावा व त्यांना योग्य ते सामर्थ्य, धैर्य, शक्ती प्रदान करावी; म्हणून आपण प्रार्थना करू या.
२.आपल्या भारत देशाच्या पाठीवर अनेक धर्म, संस्कृती, पंथ आहेत या मायभूमित राहणा-या प्रत्येक व्यक्तीच्या मनात एकमेकांविषयी आदराची भावना असावी व देशाच्या उन्नतीसाठी ज्या ज्या नेत्यावर जबाबदारी आहे या सर्वांनी आपले कार्य निस्वार्थपणे करावे म्हणून आपण प्रार्थना करू या.
३ ज्यांच्या वैवाहिक जीवनात संशयामुळे अशांती निर्माण झालेली आहे त्यांनी एकमेकांना समजुन घेऊन देवाच्या प्रेमाचा, ऐक्याचा आणि शांतीचा अनुभव घेऊन आपले वैवाहिक नातेसंबध मजबूत करावेत म्हणून आपण प्रार्थना करू या.
४.जे लोक आपल्या आजारपणामुळे या पवित्र विधिमध्ये हजर राहू शकले नाही अशा सर्व लोकांना प्रभूच्या प्रेमाचा अनुभव मिळावा आणि त्यांचा विश्वास अधिक मजबूत व्हावा म्हणून आपण प्रार्थना करू या.
५ थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक गरजा प्रभू चरणी ठेऊ या.

3 comments: