Sunday, 22 December 2013



Xavier Patil hails from St. Andrew’s parish, Uttan-Chowk, Bhayander. He belongs to the St. Bonaventure Capuchin Province of Maharashtra. Presently, he is pursuing his Theological studies in Jnana Deepa Vidyapeeth, Pune.






नाताळचा सण(सकाळची मिस्सा)
२५/१२/०३.
यशया; ५२: ७-१०.
इब्री; १: १-६.
योहान; १: १-१८.

"प्रारंभी शब्द होता, आणि शब्द देवासह होता आणि शब्द देव होता."

प्रस्तावना:
'परिपुर्ण झाला काळ आज जन्मला बाळ', हयाच संदेशाची भविष्यवाणी यशया संदेष्टा आजच्या पहिल्या वाचनाद्वारे करत असताना सियोनातील लोकांना आनंद-घोष करण्यास सांगत आहे. इब्री लोकास पाठविलेल्या पत्रात संत पौल म्हणतो, पूर्वी देव संदेष्ट्याद्वारे आपल्या पूर्वजांशी बोलला. पण, आता तो आपल्या पुत्राद्वारे आपल्याशी बोलत आहे. तो पुत्र म्हणजे बाळ येशू ख्रिस्त. आजच्या शूभवर्तमानाद्वारे संत योहान आपणास सांगतो कि, 'शब्द' जो पूर्वी देवाबरोबर होता त्याने मानव रूप धारण करून जगाच्या तारणासाठी पृथ्वीवर आला आहे. ह्या पवित्र मिसाबलीदानात, बाळयेशूद्वारे प्रगट झालेली कृपा आपण स्विकारून प्रेम, दया, क्षमा आणि शांती हा नाताळचा शुभ संदेश आपल्या आचारणात आण्यासाठी विशेष प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:
इतर शुभवर्तमानाप्रमाणे योहानाच्या शुभवर्तमानाचा आरंभ ऐतिहासिक येशूपासून झालेला नाही. त्याऐवजी ''शब्दाचा'' परिचय करून झाला आहे. मग 'शब्द' म्हणजे काय?  त्याचा अर्थ काय? ''प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता.'' ह्याचा अर्थ असा की सृष्टी निर्मितीच्या पूर्वीपासून शब्द अस्तित्वात होता. तो शब्द म्हणजे येशू ख्रिस्त होय. तसेच देव आणि शब्द ह्यांच्यामध्ये असलेले सबंध आपणाला कळून येतात. सृष्टी देवाच्या शब्दाने निर्माण झाली म्हणून शब्द हा जीवनाचा उगम आहे. शब्द हा जीवन आहे. म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो, ''मार्ग, सत्य व जीवन मीच आहे.'' मीच जीवनाचा प्रकाश आहे. कारण पूर्वी मानवांचे जीवन प्रकाशावर अवलंबून होते. हा जीवन आणि प्रकाश ह्यांच्यातील सबंध आपणाला आजच्या शूभवर्तमानामध्ये कळतो.
बाप्तिस्मा करणा-या योहानाची साक्ष: योहान लोकांना स्पष्टपणे सांगतो की मी जीवनाचा प्रकाश नव्हे, तर माझ्यामागून जो येणार आहे तोच येशू जगाचा ख्रिस्त हा या जगाचा प्रकाश आहे व त्या प्रकाशाची साक्ष म्हणून मी आलो आहे. मी त्याच्या येण्याची वाट तयार करण्यास आलो आहे. जेणेकरून सर्वांनी विश्वास ठेवावा व त्याच्या आगमनाची तयारी करावी.
जगात आलेला प्रकाश: शब्द म्हणजेच ख्रिस्त सा-या जगाचा प्रकाश आहे. ख्रिस्ताच्या आगमनापूर्वी तो अस्तित्वात होता पण तो अनूषंगीक होता. त्या प्रकाशाला जगाने ओळखले नाही. जेवढ्यांनी त्याचा स्विकार केला त्या सर्वांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला.

शब्द देही झाला: दिव्य शब्द आता मानवी येशू झाला आहे. त्याने आम्हामध्ये म्हणजेच आपल्या लोकांमध्ये वस्ती करून राहत आहे. देव आणि मानवजात ह्यांच्यामधील तूटलेले नाते परत एकदा येशू ख्रिस्ताने त्याच्या अवतरनाने जोडले आहे. देव जो पूर्वी गुपीत होता त्या देवाला प्रत्येक्षात पाहण्यास येशू ख्रिस्ताने आपणाला सुवर्ण संधी दिली आहे.

बोधकथा:
एका देवळाच्या आवारात, नाताळच्या मध्यरात्रीच्या मिस्सानंतर आनंद मेळावा झाला, तदनंतर एक धर्मगुरू सहज आवारात फेरफटका मारत होते, तेव्हा त्यांना एक जवान मुलगा कपाळाला हात लावून बसलेला दिसला, त्याच्या चेह-यावर नाताळचा आनंद कुठेच दिसत नव्हता. आनंद मेळाव्यातील बॅंड, नाच-गाणी, खेळ, हास्य-विनोद ह्या गोष्टी त्याच्या मनाला आनंदी करु शकले नव्हते. आनंद मेळावा फूकट गेला असे धर्मगुरूंना वाटले. धर्मगुरूंनी त्याला विचारले; ''काय रे मुला, घरी जाणार नाही का?'' तो म्हणाला; ''घरी कशाला जाऊ?, वडील खूप दारू पितात. आई व आजी एकामेकीचे तोंड देखील बघत नाही.आई किंवा बाबांकडून कधीच गोड शब्द ऐकायला मिळत नाहीत. घरामध्ये शांती कधीच नसते, मग मी कशाला घरी जाऊ?'' मग धर्मगुरू त्याला म्हणाले; ''मुला, हा नाताळ तुला एक आव्हान आहे. येशूची शांती घरी आणायला तूला एक संधी आहे. म्हणून येशूवर विश्वास ठेऊन तू घरी जा.'' व तो मुलगा आपल्या घरी जातो.  

दुस-यादिवशी धर्मगुरू त्यांच्या घरी जातात व घरातील सर्वांना, घरात बनवलेल्या गोठ्याजवळ एकत्र बोलवतात आणि सर्वांना एकमेकांची क्षमा मागायला सांगतात आणि सांगतात की, झाले गेले विसरून जा, भांडण मिटवा, एकमेकांमध्ये समेट करा, नव्याने सुरूवात करा. तुमच्या घरात आज बाळ येशू जन्म घेत आहे. प्रेम, दया, शांती, क्षमा घेऊन तो आला आहे. थोड्या वेळानंतर ''आमच्या स्वर्गीय बापा'' ही प्रार्थना म्हणण्यासाठी एकमेकांचे हात धरले तेव्हा सर्वांच्या डोळ्यांतून अश्रू गळू लागले. अशाप्रकारे नाताळ सणाने त्यांचे तूटलेले संबंध जोडले व त्यांच्या घरात ख-या अर्थाने नाताळ साजरा झाला.
मनन चिंतन:
आज आपण, नाताळचा सण साजरा करीत आहेत. हा दिवस आपण 'ख्रिस्तमस' म्हणून साजरा करतो. 'ख्रिस्तमस' ह्याचा अर्थ 'ख्रिस्त' म्हणजेच देवाने अभिषेक केलेला आणि 'मास' म्हणजे मानव (मनूष्य). येशू हा देव आणि मानवरूप घेऊन सर्व धर्मीय मानवांच्या उध्दारासाठी ह्या भूतलावर आला. येशू ख्रिस्त ज्यावेळी जन्माला आला त्यावेळची स्थिती पाहिली तर आपल्याला दिसून येते की यहूदी लोक हलाखीचे जीवन जगत होते. धार्मिक पूढारी आपल्या स्वार्थासाठी वावरत होते. रोमन राज्यांच्या जूलामीमूळे आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती. एकंदरीत सामान्य माणसाचे जगणे कठीण झाले होते. प्रत्येक यहूदी आध्यात्मिक, सामाजिक आणि राजकीय शांतीसाठी झपाटलेला होता. अशा या अत्यंत बिकट परिस्थितीत येशू ख्रिस्त जन्माला आला आणि त्याने सर्व मनुष्य कुळास देवाच्या प्रेमाचा व शांतीचा संदेश दिला.
आज जवळ जवळ २००० वर्षानंतर देखील आपली परिस्थिती ख्रिस्ताच्या जन्माच्या परिस्थिती सारखीच आहे. आपला समाज देखील दुख:च्या खाईत बूडाला आहे. महिलांवर होणारे अत्याचार, लूट, चोरी, भांडण, बेरोजगारी, वस्तूची महागाई ह्यामुळे सामान्य माणसाचे जीवन कठीण झाले आहे व माणूस शांतीच्या शोधात अनैतिक गोष्टीकडे वळून आपले जीवन उद्‌ध्वस्त करीत आहे. अशा या बिकट परिस्थितीत, आज आपण येशू ख्रिस्ताचा जन्म, त्याचा वाढदिवस साजरा करीत आहोत. ख्रिस्त आज देखील आपणा सर्वांना त्याची शांती देण्यास आतूरतेने वाट पाहत आहे. आज येशू ख्रिस्त गोठ्यामध्ये नव्हे तर आपल्या हृदयामध्ये जन्म घेण्यास व त्याची शांती इतरांपर्यंत पोहोचवण्यास आपणाला बोलावत आहे.
आज देऊळमाता आपल्याला सांगत आहे की परमेश्वराने मानवजातीवर एवढे प्रेम केले की त्याने आपला एकूलता एक पूत्र आम्हासाठी दिला. देव आणि मानव यांच्यामधील तोडलेले नाते पून्हा जोडण्यासाठी देवपूत्र स्वत: पृथ्वीवर अवतरला. त्याने प्रेमाचा, शांतीचा, क्षमेचा, समेटाचा, सलोख्याचा आणि मायेचा संदेश आणला. पण कालांतराने नाताळचा सण फक्त सुट्‌टीचा, नाच-गाण्याचा आणि खाण्या-पिण्याचा दिवस झाला.

एक कवी म्हणतो: कधीतरी एकदा होता नाताळ, आता आहे नाताळपार्टी, नाताळ वृक्ष, नाताळ खरेदी, नाताळ पक्वान्न, नाताळ कार्ड, नाताळ गीते. सगळे आहे पण बिचारा नाताळ कुठे आहे दिसत नाही. जगामध्ये राग आहे, द्वेष आहे, मत्सर आहे, वैर आहे, भांडण आहेत. पण नाताळ कुठे आहे हे आपणाला दिसत नाही. हे सर्व बदले पाहिजे, पुन्हा एकदा आपण खराखूरा नाताळ साजरा करायला हवा. त्यासाठी येशू ख्रिस्ताने आपल्याला सुवर्ण नियम दिला आहे, तो म्हणजे.''ऐकमेकांवर प्रेम करा आणि प्रेमामध्ये जगा, कारण देव प्रेम आहे आणि प्रेम देव आहे.''

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभू, आमची प्रार्थना ऐकून घे.

१. आज आपण आपल्या ख्रिस्त-सभेसाठी प्रार्थना करूया. विशेष करून पोप फ्रान्सिस, सर्व कार्डीनल्स, बिशप, धर्मगुरू, धर्मभगिनी, ज्यांनी आपले सर्वस्व प्रभूसेवेसाठी अर्पण केले आहे. त्यांनी देवाचे सेवाकार्य करून त्याचे प्रेम दुस-या पर्यंत पोहचवावे. म्हणून, आपण प्रार्थना करूया.
२. जे लोक देवापासून दुरावले आहेत, आजारामुळे दु:खी आहेत व जे लोक अजून देखील देवाची वाट पाहत आहेत अशा सर्वांना येशूने त्याचे दर्शन देऊन त्यांचा शंका दूर कराव्यात व त्यांना चांगले आरोग्य बहाल करावे. म्हणून, आपण प्रार्थना करूया.
३. आज आपल्या मध्ये येशु ख्रिस्त बालकरूप धारण करून, त्याची शांती व प्रेम देण्यास आला आहे. आपण देखील बंधूप्रेमाने राहून सर्वत्र शांतीचे, प्रेमाचे, आनंदाचे व ऎक्याचे राज्य पसरावे. म्हणून, आपण प्रार्थना करूया.
४. हे प्रेमळ पित्या आज आम्ही विशेषकरून आमच्यासाठी प्रार्थना करीतो. जेणेकरून, ह्या आनंदमयी वातावरणात नांदत असताना आम्ही आमचाच नव्हे तर दुस-र्यांचा देखील विचार करावा व इतरांची सेवा करावी. म्हणून, आपण प्रार्थना करूया.
. आता, थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक गरजा प्रभू चरणी ठेऊ या.










No comments:

Post a Comment