Reflections for Homily By Amol Gonsalves.
सामान्य काळातील चौथा रविवार.
"बाळ येशूच्या
समर्पणाचा सण."
दिनांक :
०२-०२-१४.
पहिले वाचन: मलाखी; ३: १-४.
दुसरे वाचन: इब्री; २: १४-१८.
शुभवर्तमान: लूक; २: २२-४०.
''कारण माझ्या
डोळ्यांनी तुझे तारण पाहिले आहे.''
प्रस्तावना:
आज पवित्र ख्रिस्तसभा ''यरूशलेम मंदिरात
प्रभू येशूच्या समर्पणाचा सण'' साजरा करीत आहे. मलाखी ह्या पुस्तकातून घेतलेल्या आजच्या
पहिल्या वाचनात आपण सेनाधीश परमेश्वर, सर्वांचा न्यायधीश ह्याचा दिवस समीप आहे ह्या
विषयी ऐकतो.
आपल्या प्रभू ख्रिस्ताने देहरूप धारण करून
आपल्याला देवाचे मुले बनविले आहे. देवाचा पुत्र 'ख्रिस्त' हा देवदुतापेक्षा श्रेष्ठ असून देव-प्रेमाद्वारे
आपल्याला ह्या श्रेष्ठतवाचा लाभ करून दिला आहे, असे आपणास संत पौल इब्री लोकांस लिहिलेल्या
पत्राद्वारे सांगत आहे.
आजच्या शुभवर्तमानात संत लूक आपल्यासमोर मरिया
व योसेफ ह्यांनी मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे यरूशलेम मंदिरात येशूचे समर्पण कसे
केले व त्यावेळी संदेष्टा शिमोन व संदेष्टी हन्ना ह्यांनी केलेल्या
प्रकटीकरणाविषयी ऐकत आहोत. माता मरिया व
धन्य योसेफ ह्यांनी यरूशलेम मंदिरात केलेल्या बाळ येशूचे समर्पण आपल्याला आपल्या ''जीवन-समर्पणाविषयी'' आठवण करून देते.
अशा समर्पणाची परंपरा आज देखील आपल्यामध्ये प्रज्वलित आहे. बास्तिमाच्यावेळी
आपल्याला पवित्र वेदीसमोर ठेऊन, आपल्या भावी आयुष्याचे समर्पण देवापुढे केले जाते.
आज, आपण आपल्या जीवनातील ''ख्रिस्त-समर्पणाचे'' महत्त्व जाणून
घेऊ या. व त्यानुसार आपल्या जीवनात बदल घडून आणण्यासाठी आपण पयत्न करावा म्हणून, ह्या
मिस्साबलिदानामध्ये कृपा मागू या.
सम्यक विवरण:
पहिले वाचन:
पवित्र शास्त्रामधील प्रथम ग्रंथ-पंचकातील
शेवटचे पुस्तक हे संदेष्टा मलाखी ह्याचे मानले जाते. मलाखीद्वारे इस्त्राएलास प्राप्त झालेले
परमेश्वराचे वचन असे होते की न्यायाचा दिवस समीप आहे, तो जवळ येत आहे. इस्त्राएली बांधवांची तुच्छतेची वृत्ती आणि
धार्मिक घुसफुस लक्षात घेऊन, ''जागे व्हा! उठा'' हा भविष्य संदेश सांगून परमेश्वराबरोबर
केलेल्या कराराशी पुन्हा एकदा नव्याने एकनिष्ठ होण्याचे संदेष्टा मलाखी आवाहन देतो व ''ज्या प्रभूला तुम्ही शोध करीत आहात, तो एकाएकी आपल्या
मंदिरात येईल'' असे अभिवचन घोषित
करतो. पण! दुर्दैवाने अपेक्षित प्रतिसाद दुरच राहतो.
इस्त्राएली लोकांनी आपल्या मनात येईल तशी अर्पणे परकीय देवाच्या पायापाशी अर्पिले
व उपासनेत दांभिक उपचार आणून ख-या व सत्य देवाचा अपमान केला. ह्यास्तव संदेष्टा मलाखी प्रखरपणे इस्त्राएली
लोकांसमोर दोन महत्त्वपूर्ण प्रश्न मांडतो.
- त्याच्या
आगमनाच्या दिवशी कोण निभावेल?
- तो प्रकट होईल
तेव्हा कोण टिकेल?
जरी दुराचारी संपन्न झाले व दुर्जनांचा उत्कर्ष
झाला तरी सर्व समर्थ सेनाधीश देवाने दिलेले अभिवचन पूर्ततेस येईल. ''त्या दिवशी
त्यांची सेवा करणा-या विश्वासू लोकांना तो वाचविल, त्यांच्यावर दया करील. त्या दिवशी न्यायत्वाचा
सुर्य उदय पावेल, त्याच्या
पंखाच्याठायी आरोग्य असेल.''
त्या दिवशी सर्व गर्विष्ठ व सर्व दुराचारी धसकटासारखे जाळून जातील.
दुसरे वाचन:
इब्री
लोकांस लिहिलेल्या पत्रातून घेतलेल्या आजच्या दुस-या वाचनात आपण, ख्रिस्त
सर्वसमर्थ पित्याचा पुत्र ह्यांची मानखंडना व त्याने स्वत:ला कसे उन्नत केले ह्या
विषयी ऐकतो. इब्री लोकांस पत्र अध्याय १ आपल्याला ''देवपुत्र, देवदूताहून
श्रेष्ठ आहे.'' ह्या विषयी जाणीव प्राप्त करून देते व अध्याय २ आपल्याला त्या देवपुत्राने दिलेल्या संदेशात
दृढ होण्यास आव्हानीत करते. पुत्राचा संदेश
हा तारणाविषयी होता. पापी मानवजातीचे तारण कसे साधले गेले ह्याविषयीचा उल्लेख व
महत्त्व येथे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. ख्रिस्ताने संपूर्णरीत्या मानवीरूपाला
ग्रहण करून आम्हासाठी काय केले ह्याचा
पाठपुरावा आजचे दुसरे वाचन आपल्याला देते.
शुभवर्तमान:
संत
लूक आपल्याला ''यरूशलेम मंदिरात येशूचे समर्पण'' तसेच येशूची
सुंता कशी झाली व त्याच्याविषयी कोणत्या प्रकारचे प्रकटीकरण करण्यात आले ह्याविषयी
माहिती पूरवितो.
'येशूचे मंदिरात समर्पण' आपल्यासमोर तीन
लक्षणीय गोष्टींचा उल्लेख ठेवितो.
अ. माता मरिया व धन्य योसेफ ह्यांची यहूदी
नियमशास्त्राशी एकात्मता:
यहूदी नियमशास्त्रानुसार पुरूष मुलाच्या
जन्मानंतर माता सात दिवस ''अशुध्द'' मानली जाते आणि तिला आणखी तेहतीस दिवस घरीच राहावे लागते.
त्यानंतर, चाळीसाव्या दिवशी शुध्दीकरणासाठी फक्त यरूशलेम मंदिरात येऊन
शुध्दीकरणाचे अर्पण समर्पित करावे लागत असे(लेवीय; १२:१-८). यहूदी शास्त्राप्रमाणे मुलाला नव्हे तर फक्त
मातेला शुध्दीकरण्याची गरज असते. पण! संत लूक ''त्यांचे
शुध्दीकरणाचे दिवस भरल्यावर'' ह्या वाक्याचा उल्लेख शुभवर्तमानात करतो कारण, मरीयेचे आणि बाळ
येशूचे शुध्दीकरणाचे अर्पण जर का वेगवेगळ्या प्रकारे केले असते तर मरीयेस अर्पणाचा
खर्च जास्त आला असता ह्यास्तव त्यांनी दोघांचे अर्पण एकत्रित केले.
ब. हे समर्पण ''सोडवून घेण्यासाठी'' केले जात:
नियमशास्त्रानुसार प्रथम जन्मलेल्या मुलाला
भरपाई देऊन सोडवून घेणे आवश्यक होते. प्रथम जन्मलेले सर्वच जीव देवाला समर्पित
आहेत असे मानले जाई. यात, प्रथम जन्मलेले
पशूंचे होमार्पण करीत आणि पाच शेकेल द्रव्य भरून मुलांना सोडवून घेत (निर्गम;१३:१३, गणना १८:१५-१६).
क. देवाच्या कार्यासाठी नेमलेला सेवक:
मरियेने आपल्या मुलाला खास करून देवाच्या
सेवेसाठी अर्पण केले. म्हणूनच येशू त्यावेळी तेथे होता. हन्नानेही पूर्वी याच
प्रकारे शमुवेलाला निवास मंडपात समर्पित
केले होते (१ शमुवेल; १:११,२१-२८).
ह्या वृतांतात पुढे आपल्याला शिमोन व हन्ना
ह्यांच्या बाबतीत सांगितले जाते. शिमोन एक
भक्तिमान, सात्विक व नितीमान इस्त्राएली होता (यशया; ४०:१;६१:२). देव
आपल्या लोकांचे सांत्वन, सुटका व मुक्तता करील ह्या प्रतिक्षेची वाट
पाहत होता. आपण मसिहा-ख्रिस्त
पाहिल्यावाचून मरणाला मुकणार नाही असे देवाचे अभिवचन त्याला मिळाले होते. तो क्षण
जेव्हा आला तेव्हा त्याने मुलाला उचलून कवटाळले आणि देवाचे आभार मानून आपण मरण्यास
तयार असल्याचे म्हटले. तथापि शिमोनाने
आणखी सांगितले की, या मुलाचे येणे हे न्यायनिवाडा होण्यास व तारण
होण्यास कारणीभूत ठरेल, कारण लोकांच्या अंत:करणाचा भेद उघड केला जाईल व
येशूला पुढे मिळणा-या वागणुकीमुळे मरियेला दु:ख सोसावे लागले.
हन्ना ही एक संदेष्टी होती व ती देखील
इस्त्राएलच्या सुटकेची व तारणाची वाट पाहत होती. हन्नाच्या आगमनाने शिमोनाच्या शब्दांना दुजोरा
मिळाला. देव येशूद्वारे
यहूदी लोकांची मुक्तता व तारण करील असे केलेले भाकीत पूर्णतेस आले आहे ह्यासाठी, ती देवाचा महिमा
व उपकार स्तूती करते.
बोध कथा:
एकदा
एक अख्रिस्ती विधवा बाईचा एकुलता एक मुलगा लहानपणापासून भयानक अशा आजाराने पिडीत
होता. आपल्या एकुलत्या मुलाला बरे करण्यासाठी त्या आईने आपली सर्व संपत्ती व शक्ती पणाला लावली. अनेक नामवंत अशा वैद्यांचे औषधे-उपचार करून
घेतले पण आजारातून त्या मुलाची काही केल्या सुटका होईना! अशा जीव घेण्या
मनस्थितीत जात असताना एके दिवशी त्या बाईला कोणीतरी सांगितले की तुम्ही ख्रिस्ती
धर्मगुरूकडे जाऊन आपल्या मुलावर प्रार्थना करून घेण्याचा सल्ला दिला.
त्या बाईला ख्रिस्ती धर्माविषयी व धर्मगुरुविषयी
कोणतीही जाणीव नव्हती. आपल्या मुलाच्या
आजारातून सुटकेसाठी ती बाई चौकशी करत मुंबईतील एका चर्चमध्ये येऊन पोहचली. दुपारची वेळ होती चर्चच्या सभोवताली कोणीही नव्हते. आपण काय करावे हे त्या बाईला उमजत नव्हते. त्या बाईने आपल्या मुलाला चर्चच्या मुख्यदारी
झोपवून, देवाकडे अशी
विनवणी केली, ''सर्व-समर्थ
परमेश्वरा मला तू कोण आहेस,
तू कुठे आहेस ह्याची कल्पना मला नाही. सर्व ठिकाणी जाऊन मी थकली आहे. आता माझ्याकडे पर्यायी मार्ग उरला नाही. मी माझ्या आजारी मुलाला तुझ्या दारी, तुझ्या हाती
समर्पित करीते शक्य झाले तर
माझ्या मुलाला नव-जीवन बहाल कर. ''खूप वेळानंतर
धर्मगुरूने त्या बाईला पाहिले व सर्व काही विचारून झाल्यावर, धर्मगुरू त्या
बाईला म्हणाले, ''जर तुझा येशूख्रिस्तावर
पूर्ण विश्वास असेल तर तुझा मुलगा नक्कीच बरा होईल, तू विश्वासाने घरी जा.''
दुस-या दिवशी जेव्हा वैदयकिय तपासनी केली गेली
तेव्हा तपासनीचा अहवाल सम्य असल्याचे आढळून आले व कोणताही आजार नसल्याचे साध्य
झाले. ''देवाला काही
अशक्यच नाही'' आपण देखील जर
आपले सर्वस्वी येशूला समर्पिले तर तो आपले सर्व दु:ख कष्ट हलके करील व आपल्याला
नव-जीवन बहाल करील.
मनन-चिंतन (जीवन ध्येय):
ख्रिस्ताला यरूशलेम देवालयात समर्पित
केल्यानंतर त्याच्या जीवनात ज्या ज्या घटना घडल्या त्यात देवाच्या तारणकार्यासंबंधीचा
संदेश दडला होता. ''मंदिरातील समर्पण'' ख्रिस्ताला
आपल्या जीवनातील पुढील कार्याचे दार उघडून देते. ह्या घटनेपासून ख्रिस्त आपले
संपूर्ण जीवन देव कार्यासाठी सज्ज बनवितो. अशा ह्या समर्पित
जीवनामधूनच आध्यात्मिक व नैतिक मुल्यांचा खरा उगम होत असतो. देवाने निवडलेल्या लोकांचा तारण-इतिहास ह्यांच
घटनेपासून आंरभीत होतो.
ह्यास्तव, आजचा हा ''समर्पणाचा'' सण आपल्याला दोन
महत्त्वपूर्ण पैलूवर मनन-चिंतन करण्यास निमंत्रण देतो.
१. ख्रिस्ताचे समर्पित जीवन व
२. आपले समर्पित जीवन.
१. ख्रिस्ताचे समर्पित जीवन:
ख्रिस्त हा स्वत: तारणारा
होता. तो देवपुत्र होता. पहिल्या वाचनात नमुद केल्याप्रमाणे देवाने त्याला देवदूतापेक्षा
श्रेष्ठ केले होते. तो सर्व जीवाहून
महान व श्रेष्ठ होता. पण ह्या कृतीतून ख्रिस्त मानवी स्वरूपाशी एकचित होतो व सर्व
मानवजातीशी एकरूप होतो.
येशूचे समर्पण व समर्पित जीवन हे मानवाच्या
तारणासाठी व सेवेसाठी होते. आज, ह्यावरून
ख्रिस्ताच्या बाबतीत लिहिलेले एक शास्त्र वचन पूर्णतेस येते. ते असे की, ''मी सेवा करून घ्यावयास आलो नाही; तर सेवा करावयास आलो आहे.''
प्रत्येक समर्पित जीवनात मातृ-पितृचे स्थान
मोलाचे असते. ख्रिस्ती जीवनमुल्यावर कार्य करण्यासाठी व त्यानुसार जीवन
अनुसरण्यासाठी लाभणारे प्रोत्साहान व प्रेरणादायी जीवन हे आई-वडिलांकडून लाभत
असते. ह्यास्तव समर्पित जीवनावर यशस्वीरित्या वाटचाल करण्यासाठी आई-वडिलांना
सिंहाचा वाटा उचलावा लागतो. संत लूकने
शुभवर्तमानात येशूचे आई-वडील, मरिया व योसेफ ह्यांनी केलेल्या कार्याचा
उल्लेख केला आहे. त्यांनी आई-वडील ह्या नात्याने आपली जबाबदारी तन्मयतेने कशी पार
पाडली ह्याविषयी सांगत आहे.
२.आपले समर्पित जीवन:
प्रभू
येशूच्या समर्पणावर चिंतन करीत असताना आपले समर्पित जीवन कसे आहे. ह्यावर थोडावेळ विचार करू या. प्रत्येक ख्रिस्तीजनाच्या समर्पित जीवनाची
सुरवात स्नानसंस्काराद्वारे होत असते व पुढे दृढीकरण, ख्रिस्तशरीर, प्रायश्चित, रूग्णाभ्यंग, गुरूदिक्षा किंवा
लग्न अशा संस्काराद्वारे ह्या समर्पित जीवनाचा शेवट होत असतो.
आपल्याला लाभलेले समर्पित जीवनाचे पाचारण आज
आपल्याला दोन महत्त्वपूर्ण गोष्टींची आठवण करून देते. ते म्हणजे ख्रिस्ताशी असलेले आपले एकनिष्ठतेचे
नाते व ख्रिस्ताने दिलेला सुर्वाता पसरविण्याचा महामंत्र. आज आपण आपल्या कृतीतून, कार्यातून, विचारातून
देवाच्या प्रेमाचा संदेश इतरांपर्यंत पोहचवितो का? आपण ख्रिस्ताला खरोखरचं आपल्या जीवनाचा तारणारा
प्रभू म्हणून स्विकारले आहे का? शिमोन व हन्ना ह्यांच्या नीतीमान व भक्तीमय जीवन शैलीतून
आपणास कोणता संदेश मिळतो?
ह्यावर थोडा वेळ विचार करू या. आजचा हा समर्पणाचा दिवस सर्व व्रतस्थ बंधू-भगिनीसाठी
विशेष प्रार्थना करण्याचा दिवस म्हणून समजला जातो. ख्रिस्ताने सदैव आपली माया, कृपा व प्रेम
त्यांच्या कार्यात दयावी म्हणून आपण प्रार्थना करू या व त्याच्या समर्पक जीवनाचे सार्थक होण्यासाठी
याचना करू या.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: अर्पितो मी प्रभूला जीवन हे माझे
सारे.
१. आपले परमगुरूस्वामी फ्रान्सिस
ह्यांना प्रभूने उदंड आयुष्य व आरोग्य बहाल करावे व अखिल ख्रिस्तसभेची धुरा
सांभाळण्यास त्यांना मनोबल दयावे, म्हणून आपण प्रार्थना करू या.
२. आपल्या देशाचा कारभार
सांभाळण्यासाठी जे राज्यकर्ते नेमले गेले आहेत, विशेषकरून आपले राष्टपती, उपराष्टपती, पंतप्रधान व
मंत्रीमंडळाचे सदस्य यांना प्रभूचे विशेष मार्गदर्शन लाभावे, म्हणून आपण
प्रार्थना करू या.
३. आजच्या तरूण पिढीला जीवघेण्या
स्पर्धेला तोंड दयावे लागत आहे. प्रसंगी ते निराश
होत आहेत. या तरूण पिढीत असलेला
उत्साह कायम टिकून राहावा, म्हणून आपण प्रार्थना करू या.
४. शांती निर्माण
करण्यासाठी व समेट घडवून आणण्यासाठी आज जगभरात अनेक अशा संघटना कार्यारत आहेत, त्यांच्या
कार्यात प्रभूचा आर्शिवाद यावा, म्हणून आपण प्रार्थना करू या.
५. आपल्या कुटूंबात
प्रत्येक व्यक्तीला समानतेची व सन्मानाची वागणूक मिळावी, प्रत्येक सदस्यात
बंधूभाव वाढावा, एकमेकांत जवळीक वाढावी, म्हणून आपण
प्रार्थना करू या.