Tuesday, 7 January 2014

Reflections for Homily By: John Mendonca





येशूच्या स्नानसंस्काराचा सण



दिनांक: १२/०१/२०14
पहिले वाचन: यशया ४२:१-४,६-७
दुसरे वाचन: प्रेषितांची कृत्ये १०:३४-३८
शुभवर्तमान: मत्तय ३:१३-१७

"हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे"

प्रस्तावना :

आज विश्वव्यापी ख्रिस्त सभा प्रभू येशूच्या बाप्तीस्माचा सोहळा साजरा करीत आहे. प्रभू येशूने योहानाच्या हस्ते यार्देन नदीत बाप्तिस्मा घेऊन आपल्या दैवी कार्याला शुभारंभ केला. आजच्या पहिल्या वाचनाद्वारे यशया संदेष्टाने केलेल्या भविष्यवाणीची परिपुर्णता आजच्या शुभवर्तमानात आपणास ख्रिस्ताद्वारे झालेली दिसून येते व ह्याच भविष्यवाणीला सत्याचा दुजोरा देत आजच्या दुस-या वाचनाद्वारे संत पौल म्हणतो, "नासोरी येशूला देवाने पवित्र आत्माचा व सामर्थ्याचा अभिषेक केला; तो सत्कर्मे करीत व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना बरे करीत फिरला; कारण देव त्याच्याबरोबर होता".आजच्या ह्या पवित्र सोहळ्यात सहभागी होत असताना येशूच्या बाप्तिस्मा बरोबर आपण आपल्या सुद्धा बाप्तीस्मावर मननचिंतन करू या, जेणेकरून आपल्याला आपल्या खिस्ती जीवनाच्या जबाबदारीची जाणीव होईल.

पहिले वाचन:

यशया संदेष्टा, देवाचा सेवक कशाप्रकारे व कोणत्या व्यक्तिमत्वाचा असेल हे जाहीर करताना आपणास सांगतो कि तो नम्र व लीन अशा प्रकारचा असेल व त्याच्याठायी देवाचा आत्मा वास्तव्य करील, जेणेकरून तो सत्याने न्यायाची प्रवृत्ती करील, राष्टांना प्रकाश देईल, आंधळ्याचे डोळे उघडील आणि बंदिशाळेतून बंदिवानांस मुक्त करील.

दुसरे वाचन:

 'देव पक्षपाती नाही' असे पौल कनैल्यास ठामपणे सांगून स्पष्टीकरण करतो की ज्याची कृत्ये नैतिक आचाराणाशी सहमत आहेत त्याच्याठायी प्रभू वास्तव्य करतो, ज्याप्रमाणे देवाने नासोरी येशूबरोबर वास्तव्य करून नासोरी येशूवर पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला त्याचप्रमाणे जर का आपली कृत्ये नैतिक आचारणाशी सहमत असतील तर देव आपणावर पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा वर्षाव करील.

सम्यक विवरण:

 योहानाने लोकांना पश्चाताप करायला सांगितले आणि बाप्तीस्माची प्रथा सुरु केली. बाप्तिस्मा हे नाव "बैप्टांयझेन" या ग्रीक शब्दावरून आले आहे त्याचा अर्थ डुबणे, डुबविणे अथवा बुडवून काढणे असा होतो: जणु ते ख्रिस्ताच्या मृत्युत पुरले जात आणि नवीन निर्मिती म्हणून त्याच्या पुनरुस्थानात सहभागी होत. संत पौल कलैस्सेकारांस सांगतो की तुमचा बाप्तिस्मा झाला तेव्हा तुम्ही त्याच्या बरोबर पुरले गेला आणि ज्याने त्याला मेलेल्यांतून उठविले त्या देवाच्या कृतीवरील विश्वासाच्या द्वारे त्याच्या बरोबर उठविले गेला"(कलैस्सेकारांस २:१२).येशू ख्रिस्त म्हणतो,  "पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्यावाचून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही"(योहान ३:५). ह्याच ख्रिस्त वचनानुसार बाप्तीस्मा संस्काराला "पवित्र आत्म्याठायी नवजीवन" असे सुद्धा म्हटले जाते. योहानाच्या हातून बाप्तिस्मा घेण्याकरिता "येशू गाली लाहुन यार्देनवर त्याच्याकडे आला"(मत्तय ३:१३).येशुने संत योहान बाप्तीस्ता ह्याच्या हस्ते बाप्तिस्मा स्वीकारून मगच आपल्या प्रेषितीय कार्यास सुरवात केली. आपल्या पुनरुस्थानानंतर येशूने आपल्या प्रेषितांनाही ह्याच प्रेषितकार्याची दीक्षा दिली "तुम्ही जाऊन सर्व राष्टातील लोकांस शिष्य करा,  त्यांस पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा दया, जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यांस पाळावयास शिकवा"(मत्तय २८:१९-२०).
जेव्हा संत योहानाने लोकांस पश्चाताप करण्याचे आवाहन केले तेव्हा येरुशलेम, सर्व यहूदिया व यार्देनच्या आसपासचा अवघा प्रदेश त्याच्याकडे लोटला व त्यांनी आपआपली पापे पदरी घेऊन यार्देन नदीत योहानाच्या हातून बाप्तिस्मा घेतला"(मत्तय ३:५). योहान येशुविषयी म्हणतो,  "मी पाण्याने तुमचा बाप्तिस्मा पश्च्यातापासाठी करतो खरा; परंतु माझ्या मागून जो येत आहे तो माझ्यापेक्षा समर्थ आहे, त्याच्या वाहाणा उचलून चालण्याची देखील माझी पात्रता नाही; तो पवित्र आत्म्याने व अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करणार आहे"(मत्तय ३:११).
     प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकामध्ये पेत्र लोकांस सांगतो,  "पश्चाताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा मिळावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्माचे दान मिळेल"(प्रेषितांची कृत्ये २:३८). येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आणि योहानापेक्षा श्रेष्ठ असूनसुद्धा येशूने योहानाकडून बाप्तिस्मा का घ्यावा? ह्याचे उत्तर आपणास मत्तय अध्याय ३ ओवी १५ वरून आपणास स्पष्ठ होते की प्रभू येशूने केवळ पाप्यांसाठी असलेला बाप्तिस्मा स्वेच्छेने स्वीकारला तो फक्त धर्माचरण परिपूर्ण व्हावे म्हणूनच. जेव्हा येशूने बाप्तिस्मा स्विकारला तेव्हा जो पवित्र आत्मा जगाच्या प्रारंभी जलाशयावर तळपत होता, तो आत्मा ख्रिस्तावर पाठवून देवाने नवनिर्मितीच्या कार्याला शुभारंभ करून घोषित केले की,"हा माझा पुत्र मला परम प्रिय आहे, त्याच्याविषयी मी संतुष्ट आहे"(मत्तय ३:१७).
नव्या करारात आपण अनेक ठिकाणी पाहतो की अनेक लोकांनी बाप्तिस्मा स्व इच्छेने व विश्वासाने स्वीकारलेला आहे. उदा."फिलिप्प देवाचे राज्य व येशू ख्रिस्ताचे नाव ह्याविषयीची सुवार्ता सांगत असता लोकांचा विश्वास बसला आणि पुरुष व स्त्रीया ह्याचा बाप्तिस्मा झाला स्व:ता शिमोनानेही विश्वास धरला व बाप्तिस्मा घेऊन तो फिलीप्पाच्या सहवासात राहील"(प्रेषितांची कृत्ये ८:१२-१३),  तेव्हा ज्यांनी त्याच्या संदेशाचा स्वीकार केला त्यांचा बाप्तिस्मा झाला; आणि त्या दिवशी त्यांच्यात सुमारे तीन हजार माणसाची भर पडली" (प्रेषितांची कृत्ये १६:१५).

बोधकथा:

१.       एका खेड्यात धर्मगुरूना चर्च बांधायचे होते. चर्च बांधण्यासाठी येणारा अवास्तव्य खर्च पाहून धर्मगुरूनी लोकांना उदार हस्ते मदत करण्याचे आवाहन केले. लोकांनी उदार हस्ते मदत करून सुध्दा अवास्तव्य खर्चामुळे चर्चचे काम अपूर्ण राहिले. त्याच गावातील एका बाईची आर्थिक परिस्थिती फार बिकट होती तिच्याजवळ राहण्यासाठी व्यवस्थित ना घर ना दार, अशा बिकट परिस्थितीत ही बाई धर्मगुरूना १०० रूपयाची देणगी चर्च बांधण्यासाठी देण्यास तयार होते. परंतु धर्मगुरूना ह्या बाईच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव असल्यामुळे धर्मगुरू ती देणगी घेण्यास नकार देतात व त्या बाईस म्हणतात, ''हे कसे शक्य आहे की मी तुमच्याकडून चर्च बांधणीसाठी देणगी स्विकारावी, खरे तर मी तुम्हाला मदत करायला पाहिजे.'' ह्यावर त्या बाईने धर्मगुरूना सांगितले, ''मी तुमच्या मताशी सहमत आहे, परंतु बाप्तिस्माद्‌वारे मी एक ख्रिस्ती व्यक्ती व देवाची लेक आहे.तुम्ही माझ्या परिस्थितीची चिंता करू नका. देवाने ह्या क्षणापर्यत माझी चांगली देखभाल केलेली आहे व ह्यापुढेही तो करणार.बाप्तिस्माद्‌वारे त्याने माझा त्याच्या राज्यात परिपुर्ण स्विकार केलेला आहे तर मग त्याच्या राज्याची घोषणा करण्यासाठी ह्या आपल्या चर्चसाठी मी माझ्यापरीने मदत का करू नये?''(बाप्तिस्माद्‌वारे आपण देवाची प्रिय मुले होतो).

२.      गेनेसीयस हा अधर्मी, हास्य-विनोदी रोमी अभिनेता होता. एके दिवशी त्याची नेमणुक रोमन राजा डायसोल्टेन ह्याच्यासमोर अभिनय करण्यासाठी केली गेली. राजा डायसोल्टेन हा ख्रिस्ती लोकांचा तिरस्कार करत असे.ह्याच कारणास्तव राजा डायसोल्टेनला आपल्या अभिनयाद्‌वारे अधिक प्रसन्न करण्यासाठी गेनेसीयसने ख्रिस्ती स्नानसंस्काराच्या धार्मिक विधीवर अभिनय करण्याचा निश्चय केला. अभिनय करण्यासाठी गेनेसीयसने ख्रिस्ती धार्मिक शिक्षकाद्‌वारे, स्नानसंस्काराच्या विधीचे रीतीरिवाज जाणून घेतले.
ठराविक दिवशी राजा डायसोल्टेनसमोर गेनेसीयस हास्य-विनोदी अभिनय करण्यासाठी हजर झाला.तो रंगमंचावर अभिनय करत असताना तो आजारी असल्याचे त्याने सोगं केले(अभिनय केला) व जोरजोराने ओरडू लागला, ''मला स्नानसंस्कार हवा. मला स्नानसंस्कार हवा.'' त्याचक्षणी त्याचा आवाज ऐकूण एक नकली धर्मगुरू रंगमंचावर येतो व स्नानसंस्काराच्या विधीला सुरूवात करतो. जेव्हा गेनेसीयसच्या डोक्यावर तीन वेळा पाणी ओतले जाते तेव्हा त्याच्यामध्ये आश्चर्यकरीत्या बदल होतो. त्याच घटकेपासून तो रंगमंचावर एक ख्रिस्ती व्यक्ती म्हणून अभिनय करण्यास सुरूवात करतो परंतु त्याच्या ह्या अभिनयावर कोणाचाच विश्वास नव्हता, राजा डायसोल्टेनला त्याचा हा अभिनय अजूनपर्यत एक प्रकारचा हास्य-विनोदच वाटत होता.परंतु गेनेसीयसने ठामपणे सांगितले की खरोखरच ह्या क्षणीच त्याने ख्रिस्ताचा स्विकार करून, ख्रिस्ती धर्माचा स्विकार केलेला आहे. सरते शेवटी राजा डायसोल्टेनला ह्या गोष्टीची खात्री पटली व त्याने गेनेसीयसचा शिरच्छेद करण्याची आज्ञा केली. अशाप्रकारे गेनेसीयस हा स्नानसंस्काराद्‌वारे ख्रिस्ती श्रध्देस्तव रक्तसाक्षी झाला.

मनन-चिंतन:

आज येशू ख्रिस्तचा बाप्तिस्मा आपणा सर्वांना आपल्या बाप्तीस्मावर मनन-चिंतन करण्यास आमत्रण करीत आहे.आपणा सर्वांना आपल्या जन्माचा दिवस, लग्नाचा दिवस अशा इत्यादी महत्त्वपुर्ण सभारंभाची आपणास अचूकपणे आठवण असते परंतु आपल्या बाप्तीस्माचा दिवस आपल्या साहजिकच ध्यानात नसतो.ख्रिस्ती ह्या नात्याने वास्तवता आपला खरा वाढदिवस म्हणजे आपल्या बाप्तीस्माचा दिवस कारण ह्या दिवसाद्वारे आपण ख्रिस्त सभेचे सभासद म्हणून घोषित केले जातो.लुमेन जेन्सुम नुसार बाप्तिस्मा हे ख्रिस्ती धर्माचे प्रमुख प्रवेशदार आहे, ज्याद्वारे आपण इतर संस्कार स्विकारू शकतो(लुमेन जेन्सुम क्र.११)
     बाप्तिस्माद्वारे ख्रिस्तसभा आपणास धर्मकायदयानुसार खालीलप्रकारे अधिकार बहाल करते-
१. पवित्रतेचे जीवन जगण्याचा अधिकार (धर्मकायदा क्र.२१०),
२. शुभवार्ता घोषित करण्याचा अधिकार (धर्मकायदा क्र.२११),
३. इतर ख्रिस्ती संस्कार स्वीकारण्याचा अधिकार (धर्मकायदा क्र.२१३),
४. प्रेषितीय कार्य करण्याचा अधिकार (धर्मकायदा क्र. २१६),
५. ख्रिस्ती शिक्षण घेण्याचा अधिकार (धर्मकायदा क्र.२१७).
नाझियाझुसचे संत ग्रेगरीच्या मतानुसार स्नान संस्कार हे देवाने मानवाला दिलेले सुंदर वरदान आहे, स्नान संस्काराला आपण धन म्हणतो कारण तो आपण स्व सामार्थाने मिळवू शकत नाही. स्नान संस्काराला आपण कृपा म्हणतो कारण देव तो दीनांस अन सज्जनांस सारख्याच प्रेमभावनेने देतो. स्नानसंस्कार हा स्नानसंस्कार आहे कारण आपले पाप त्याद्वारे पाण्यामध्ये डुबविले जाते, स्नानसंस्कार हा अभिषेक आहे कारण तो आपल्या सामान्य याजकपणाचे चिन्ह-स्त्रोत्र आहे. स्नानसंस्कार हा ज्ञानप्राप्ती आहे कारण तो व्यक्तीला प्रकाशमय करतो. स्नानसंस्कार हा कृपावस्त्र आहे कारण तो आपली लाज झाकवतो आपल्याला धुऊन  शुद्ध करतो.स्नानसंस्कार हा शिक्का आहे कारण तो आपले रक्षण करतो आणि देवाचे आपल्यावरील स्वामित्वाचे ते चिन्न आहे.
स्नानसंस्काराचा सबंध श्रध्देशी आहे. प्रेषितांची कृत्यांत आपण पाहतो की, पौल फिलिप्पि येथे बंदिखान्यात असताना तुरूंगाचे पाये हादरले व दरवाजे खडाखड उघडले म्हणून घाबरून गेलेल्या तुरूंग अधिका-याला संत पौलाने म्हटले, ''प्रभू येशूवर विश्वास ठेव म्हणजे तुझे आणि तुझ्या घराण्याचे तारण होईल.'' आणि तेव्हाच त्या अधिका-यानी तात्काळ आपल्या कुटूंबियासह बाप्तिस्मा घेतला (प्रेषितांची कृत्ये १६:३१-३३).
येशूच्या स्नानसंस्काराचा हा सोहळा आपल्या प्रत्येकाला पापमुक्तीदायक, तारणदायक आणि पवित्र आत्म्याचे वरदान देणारा आहे. ख्रिस्तसभेने स्नानसंस्काराच्या दिवशी, पवित्र तेलाने आपणा सर्वांस पवित्र आत्म्याने अभिषिक्त करून ख्रिस्ताचे याजक, संदेष्टा व राजा ह्या भुमिकांमध्ये आपणांस समाविष्ट केले आहे. ह्याचप्रमाणे स्नानसंस्काराच्या शुभ्र वस्त्राद्‌वारे आपण ख्रिस्त परिधान केलेला आहे व आपल्या स्नानसंस्काराच्या मेणबत्तीद्‌वारे ख्रिस्तसभेने आपणास तेजमय करून आपणही ख्रिस्तासारखेच ह्या जगाचा प्रकाश आहोत म्हणून घोषित केले आहे.
आजच्या ह्या पवित्र दिवशी ख्रिस्तसभेने स्नानसंस्काराद्‌वारे, आपणावर ज्या विविध जबाबदा-या सोपवलेल्या आहेत, त्या जबाबदा-यांचा आज आपण फेरविचार करून पाठपुरावा करू या व आपल्या स्नानसंस्काराच्या वचनाशी सदैव एकनिष्ठ राहण्याचा प्रयत्न करू या.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

आपला प्रतिसाद: हे प्रभो तुझ्या लेकरांची प्रार्थना ऎकुण घे

.आपल्या ख्रिस्तसभेच्या धार्मिक अधिकारा-यांना देवराज्यांची सुवार्ता जगजाहीर करण्यासाठी दैवी कृपा लाभावी  म्हणून आपण प्रार्थना करू या.
२.आपल्या देशातील अन्याय, अत्याचार आणि भेदभाव दूर होऊन सर्वत्र शांततेचे वातावरण निर्माण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करू या.
३.जे तरुण-तरुणी नोकरीच्या शोधात आहेत त्यांना योग्य अशी नोकरी मिळावी व आपल्या प्रत्येकाच्या कामधंदयावर परमेश्वराचा आशीर्वाद असावा म्हणून आपण प्रार्थना करू या.
४.स्नानसंस्काराद्वारे आपल्यावर असलेल्या ख्रिस्ती जबाबदारीची आपणांस जाणीव व्हावी व स्नानसंस्काराच्या वचनाशी आपण सदैव एकनिष्ठ राहावे म्हणून आपण प्रार्थना करू या.

५.ज्या व्यक्ती आजारी, निराशीत आणि दु:खी कष्टी आहेत अश्या सर्वांना प्रभू प्रेमाचा स्पर्श व्हावा व त्यांचे जीवन प्रभू प्रेमाने प्रफुल्लीत व्हावे म्हणून आपण प्रार्थना करू या.

4 comments: