Wednesday, 1 January 2014




Reflections for Homily By:- Suresh Alphonso.




प्रकटीकरणाचा सण

दिनांक: ०५/०१/२०१४
पहिले वाचन : यशया ६०:१-६
दुसरे वाचन : इफिसकरांस पत्र ३:२-३
शुभवर्तमान : मत्तय २:१-१२

"आम्ही त्याचा तारा पाहून त्याला नमन करावयास आलो"

प्रस्तावना :

ख्रिस्तसभा आज प्रकटीकरणाचा सण म्हणजेच तीन राजांचा सण साजरा करीत आहे.हे तीन राजे येशूला नमन करण्यासाठी दुरून आले होते कारण त्यांना जगाचा तारणारा, प्रकाशमान तारा: ख्रिस्त बाळ सापडला होता आजच्या पहिल्या वाचनात यशया संदेष्टा आपणास प्रकाशमान होण्यास सांगत आहे.तर दुस-या वाचनात संत पौल आपल्याला सांगतो कि प्रकटीकरणाच्याद्वारे मला रहस्य कळले व ते रहस्य ख्रिस्त येशूच्या ठायी आम्हास कळविण्यात आले.ज्या प्रकारे तीन ज्ञानी लोकांनी देवाने देलेल्या ता-याचे चिन्ह ओळखून येशू बाळाचा शोध केला त्याच प्रकारे आपण सुद्धा आपल्या जीवनात देवाने दिलेल्या चिन्हाला ओळखून प्रभूचा मागोवा घेण्यास आपणाला कृपा शक्ती मिळावी म्हणून आजच्या मिस्साबलिदानात प्रार्थना करुया.

सम्यक विवरण:

आजच्या शुभवर्तमानाद्वारे आपण दोन व्यक्तिमत्वाचा अनुभव घेतो प्रथम म्हणजे ते तीन ज्ञानी लोक जे बाळ येशूला भेटायला आले होते व दुसरे म्हणजे धूर्त हेरोद राजा ज्याने  येशूला ठार मारण्याचा प्रयत्न केला त्याचा धूर्तपणा आपणास त्याच्या मनातील कपटीपणामुळे आढळतो जेव्हा त्या तीन राजांनी त्याच्याकडे येऊन विचारपूस करू लागले  की,  येहुद्यांचा राजा जन्माला आला आहे तो कोठे आहे? कारण आम्ही पूर्व दिशेस त्याचा तारा पाहून त्याला नमन करावयास आलो आहोत (मत्तय २:२).असे ऐकता बरोबर हेरोदाचे धाबे दणाणले, त्याचे पित्त खवळले व तो चलबिचल झाला अश्यासाठी कि माझ्याशिवाय व माझ्यापेक्ष्या श्रेष्ठ असा दुसरा राजा जन्माला कसा येऊ शकतो?
हेरोदाबरोबर सर्व येरुशलेम घाबरून गेले आणि त्याने प्रजेचे सर्व मुख्य याजक व शास्री ह्यांना जमवून विचारले कि ख्रिस्ताचा जन्म कोठे व्हायचा आहे? ते त्याला म्हणाले,'यहुदियातील बेथलेहेमात' (मत्तय २:४-५)  हे सर्व ऐकून हेरोद घाबरला म्हणून त्याने धूर्तपणाने योजना आखली व त्या तीन राजांना मुद्दाम बोलावून त्यांच्याकडून तारा दिसू लागल्याची वेळ निट विचारून घेतली व त्यास म्हणाला,'तुम्ही जाऊन त्या बालकाविषयी बारकाईने विचारपूस करा व तुम्हाला शोध लागल्यावर मला कळवा म्हणजे मीहि येउन याला नमन करीन (मत्तय २:७-८).हि सर्व धूर्त योजना आखून सुद्धा हेरोद येशूचा नाश करू शकला नाही व देवाची कोणतीही योजना असफल करू शकला नाही कारण देवाची योजना वेगळी होती म्हणूनच देवाने त्या तीन राजांचा त्याच्या गौरवासाठी व जगाच्या तारणासाठी उपयोग करून घेतला.

बोधकथा:

गिअन कार्लोस मेनोती ह्याने एकदा एक अंकी नाटक सादर केले होते व त्या नाटकाचे नाव 'अमेल आणि नाईट विझीटर्स' होते. त्या नाटकात असे दाखवले आहे की:तीन ज्ञानी लोक बाळ येशूला भेटण्यासाठी येरुशलेमाकडे निघाले होते ह्या नाटकात अमेल नावाचा मुलगा अपंग असून चालण्यासाठी कुबड्यांचा वापर करतो.जेव्हा अमेलला समजते की हे तीन ज्ञानी लोक बाळ येशूला भेटण्यासाठी येरुशलेमाकडे निघाले तेव्हा त्याने गुप्तपणे त्यांचा पाठलाग करण्यास सुरवात केली.जेव्हा त्या तीन राजांना येशु बाळ सापडते तेव्हा ते त्याच्यासमोर नतमस्तक होवून त्यांनी आणलेल्या भेटवस्तू बाळाच्या चरणाशी अर्पण करतात हे पाहून अमेललासुद्धा वाटते की आपणदेखील काहीतरी अर्पण करावे परंतु त्याच्याजवळ अर्पण करण्यासारखे काहीच नव्हते म्हणून तो आपल्या जवळ असलेल्या कुबड्या येशुबालाच्या चरणाशी अर्पण करतो.त्याने त्या कुबड्या अर्पण करताच त्याचा अपंगपणा दूर होतो.(जेव्हा आपण निस्वार्थीपणे आपले सर्वस्व प्रभूला समर्पित करतो तेव्हा प्रभू आपल्यावर अनेक वरदानांचा वर्षाव करतो).

मनन -चिंतन:

प्रकटीकरणाचा सण हा तारणाचा, प्रकाशाचा, व आशेचा सण आहे. जो तीन राजांनी तारा पहिला तो तारा पाहणे फार महत्वाचे आहे. परमेश्वर आम्हाला कधीही अंधारात ठेवत नाही जे घडणार आहे त्याची तो आम्हाला पूर्व सूचना देतो. प्रत्येक व्यक्तीद्वारे, घटनेद्वारे परमेश्वर आम्हाला काय घडणार आहे ह्याची पूर्व सूचना देत असतो परंतु ज्याप्रमाणे तीन राजांनी तारा पाहण्याची तयारी दर्शविली त्याचप्रमाणे आमचीसुद्धा दैवी पूर्वसूचना पाहण्याची आणि ऐकण्याची तयारी असली पाहिजे.
प्रकटीकरण आपणाला दोन गोष्टी शिकविते त्या म्हणजे:१.परमेश्वराने त्या तीन राजांचा ज्या प्रमाणे प्रभूच्या तारणाचा आणि प्रकाशाचा संदेश त्यांच्या देशापर्यंत आणि नंतर त्याहूनही पलीकडे नेण्यासाठी वापर केला , त्याप्रमाणे परमेश्वराला आपल्याद्वारे देखील इतरांची सेवा करायला आवडेल जसे आपले गुण, हुशारी, कौशल्य, वेळ, ताकद आणि इतर अनेक साधने व जे काही आपल्यामध्ये दडलेले आहे त्याद्वारे आपण प्रभूचा संदेश इतरापर्यंत पोहोचवू शकतो किवा पसरवू शकतो.ज्याप्रमाणे देवाने क्यास्पर , मल्खिओर व बल्ताझार ह्यांना हेरोदाकडून येणा-या अडचणीवर मात करण्यास मदत केली, त्याचप्रमाणे देव आपल्यालादेखील प्रत्येक वेळी मदत करत असतो. २.तीन राजांनी आणलेले सोने, उध व गंधरस प्रभूला अर्पण करण्याबरोबरच त्यांनी स्वतःला नम्र बनवून आपला गर्विष्टपणा देखील प्रभूचरणाशी समर्पित केला आणि हे कृत्य करून ते तीन राजे त्यांच्याबरोबर भरपूर काही घेऊन गेले. त्यांनी येशुबाळ कोठे जन्माला होता ह्या माहितीबरोबरच त्यांना तारा कसा दिसला व त्याची आई मारिया कश्याप्रकारे त्यांच्या बरोबर वागली हेच घेऊन गेले नाहीत तर प्रभूघोषणेची मोठी जबाबदारी ते त्यांच्या खांद्यावर घेऊन गेले.वास्तविकच ते एक प्रकारचे ओझे म्हणून नव्हे तर ते एक प्रकारचे तेज किंवा चमक त्यांनी जी बाळ येशुकडून मिळविली होती ती इतरांना देण्यास घेऊन गेले.अश्या प्रकारे ते एक प्रकारचे सुवार्तीकच बनले.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद : हे बाळ येशु तुझ्या शांतीचे राज्य येवो

१. ख्रिस्तसभेत कार्य करणारे आपले पोप, कार्डीनल्स, बिशप्स, फादर्स, सिस्टर्स व इतर प्रापचिंक लोकांना कार्य करण्यास बाळ येशुकडून प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करू या.
२. ख्रिस्ती मिशनरी जगाच्या कानाकोप-यात बाळ येशूची सुवार्ता पसरवीत आहेत.त्यांना होणारा त्रास व त्यांच्यावर होणारे हल्ले थांबावेत व त्यांनी इतरांची सेवा धैर्याने करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. आपल्या देशाचा कारभार सांभाळणारे आपले सर्व राज्यकर्ते ह्यांनी त्यांचा स्वार्थ, हेवा व मत्सर बाजूला ठेवून निस्वार्थीपणाने सेवा करावी व आपला देश सुजलाम सुफलाम करावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. हेरोद राजाने बाळ येशूचा अंत करण्याचा बेत केला होता, आज समाजात असे खूप हेरोद आहेत जे बालकांचाच नव्हे तर संपूर्ण समाजाचा नाश करण्याचा प्रयत्न करत आहेत. अश्या सर्वांना बाळ येशू कडून सदबुद्धी मिळावी व सर्वांचे तारण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

५. समाजात जे आजारी, दुखी-कष्टी आहेत अश्या सर्वांवर बाळ येशूचा वरदस्त असावा म्हणून आपण प्रार्थना करूया. 

1 comment: