Reflections for Homily by:- Cajeten Pereira
सामान्य काळातील दुसरा रविवार
दिनांक :- १९/०१/२०१४
पहिले वाचन: यशया; ४९:३, ५-६.
दुसरे वाचन: १करिथीकरास पत्र; १:१-३.
शुभवर्तमान:योहान १: २९-३४.
''पाहा, जगाचे पाप हरण
करणारा देवाचा कोकरा !''
प्रस्तावना:
आजची उपासना बाप्तिस्मा स्विकारलेल्या प्रत्येक
ख्रिस्ती व्यक्तीची दैनंदिन जीवनातील भूमिकेविषयी स्पष्टीकरण देते. ख्रिस्ताठायी
बाप्तिस्मा स्विकारलेल्या प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने आपल्या शब्दाने व वृत्तीने
ख्रिस्ताचा प्रकाश जगात पसरविला पाहिजे. संपूर्ण राष्टांचा प्रकाश होऊन, परमेश्वराकडून
होणारे तारण दिगंतापर्यत नेण्यासाठी
परमेश्वराने इस्त्राएली लोकांना कसे पाचारण दिले हे आपण आजच्या पहिल्या वाचनात पाहतो तर आजच्या दुस-या
वाचनात संत पौल, येशूचे नाव
जगजाहीर करण्याच्या आपल्या कार्याचे प्रकटीकरण करतो.
आजच्या शुभवर्तमानात आपण दोन प्रकारचे
बाप्तिस्मा पाहतो. योहानाने पाण्याने दिलेला बाप्तिस्मा आपल्याला मुळ पापापासून
शुध्द करतो, तर येशूने पवित्र
आत्माद्वारे दिलेला बाप्तिस्मा आपल्याला नव-जीवन देतो. पापाच्या अंधकारातून सार्वकालिक प्रकाशात आणण्यासाठी येशू
स्वत: जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरू बनला.
आपल्याला
लाभलेल्या ख्रिस्ताचा सार्वकालिक प्रकाश इतरांपर्यंत पोहचविता यावा म्हणून
परमेश्वराकडे सामर्थ्य व कृपा मागूया.
पहिले वाचन:
बाबेलच्या
बंदिवासात असताना इस्त्राएली लोक देवाची निवडलेली प्रजा म्हणून असलेल्या आपल्या
ओळखीबद्दल गोधंळून गेले. अशावेळी यशया संदेष्टा इस्त्राएली लोकांना देवाने
दिलेल्या सुवर्णसंधीचे खात्रीपूर्वक आश्वासन देतो. देव आपल्या निवडलेल्या
प्रजेमध्ये रमताना, त्याच्याकडून अशी
अपेक्षा बाळगतो की, परराष्टीयासमोर
त्यांनी प्रकाश व्हावे.
दुसरे वाचन:
आजचे दुसरे वाचन
आपणाला मंदिराविषयी स्पष्टीकरण देते. पौल म्हणतो, करिंथ येथील देवमंदिर; ते करिंथचे मंदिर
नव्हते तर देवाचे मंदिर होते. तसेच प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती देवमंदिराचा अविभाजक
घटक होता. ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील बलिदानाने
ख्रिस्ती व्यक्तीला पवित्र व अभिषिक्त बनविले. येशू ख्रिस्त संपूर्ण मानवजातीच्या
तारणासाठी भूतलावर आला म्हणून ख्रिस्त सर्वांचा आहे व सर्वंजण ख्रिस्ताचे आहेत.
त्यामुळे येशू ख्रिस्ताचे नाव जगाच्या अंतापर्यंत पसरविले पाहिजे.
सम्यक विवरण:
योहानाने येशूकडे पाहून म्हटले, ''हा पाहा, जगाचे पाप हरण
करणारा देवाचा कोकरा!''(योहान; १:२९). ह्या
वाक्याचे स्पष्टीकरण योहानाच्या इतर संदर्भावर आधारून करावयास हवे. येशू ''पापे हरण
करण्यासाठी प्रगट झाला''(१योहान; ३:५). तो, ''आपल्या पापांची
क्षमा करील व आपल्याला सर्व अनीतीपासून शुध्द करील''(१योहान; १:९). तो केवळ आपल्याच पापाबद्दल नव्हे तर सर्व जगाच्याही
पापाबद्दल प्रायश्चित करेल(१योहान; २:२९). येशूचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शूध्द करिते
(१योहान; १:७). तसेच जुन्या करारात
यशया संदेष्टाच्या पुस्तकात दु:खभोग सेवकाची प्रतिमा बघावयास मिळते. अर्पणास नेत
असलेल्या कोकराप्रमाणे, लोकर
कातरणा-यापुढे गप्प राहणा-या मेंढराप्रमाणे, तो गप्प राहिला... त्याच्या जिवाचे दोषार्पण केले... कारण
त्याने बहुताचे पाप आपल्यावर घेतले व अपराध्यांसाठी मध्यस्थी केली(योहान; १३:७,१०,१२). तसेच
इस्त्राएलचा (मिसर देशातील) गुलामगिरीतून मुक्तता करणारा वल्हाडणाचा यज्ञपशू
म्हणूनही प्रतिक आहे (निर्गम 12:46, गणना.9:12, १करिथीकरास पत्र;5:7-8).
शुभवर्तमानामध्ये
कोकरू तीन महत्त्वाच्या बाबीचे प्रतिक आहे. सौम्यता, यज्ञ व विजय.
अ. कोकरू
सौम्यतेचे प्रतिक:
कोकरू सौम्य व निरपराध प्राणी आहे. तो इतका निष्पाप आहे की
कसाईचा हात जो त्याला मरण्यासाठी उठतो तोसुध्दा चाटतो. येशू सुध्दा
नम्र व सौम्य माणूस आहे. मत्तयलिखित शुभवर्तमानात येशू म्हणतो, ''माझ्यापासून शिका
कारण मी मनाने लीन व सौम्य आहे''(मत्तय; १९:२९). येशू यिर्मया संदेष्टाच्या वधावयास नेलेल्या सौम्य
कोकरासारखा आहे(यिर्मया; ११:१९), तो आपल्या मारेकरांसाठीसुध्दा मरण पावला.
ब. कोकरू यज्ञपशूचे प्रतिक:
जेव्हा योहानाने
येशूला देवाचा कोकरा म्हणून संबोधिले, तेव्हा त्याचे मन जुन्या करारातील वल्हांडणाच्या यज्ञपशूच्या
प्रतिमेने भरले. त्याला दररोज सकाळ-संध्याकाळी अर्पण केलेला यज्ञपशूची आठवण झाली, तसेच त्याला
आब्राहामाला यज्ञासाठी मुलाऐवजी देवाने दिलेल्या कोकराप्रमाणे (मेंढराप्रमाणे)(उत्पत्ती; २२:८) येशू हा
सुध्दा देवाने आपल्यासाठी दिलेला परिपूर्ण
कोकरू असलेल्याची आठवण झाली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे वल्हांडणाचा कोकरू
इस्त्राएलला मिसर देशातून मिळालेल्या मुक्ततेचे, पापक्षमेचे
प्रतिक होते. येशूचा यज्ञ सर्व प्रकारच्या प्राचीन यज्ञाचा पूर्तता होता.
क. कोकरू विजयाचे प्रतिक:
यहुदा मक्काबीच्या काळात शिंग असलेले कोकरू
विजयाचे प्रतिक बनले. शमुवेल, दावीद व
शलमोनाप्रमाणे मक्काबीचे वर्णन शिंग असलेला कोकरा म्हणून केलेले आहे. जेव्हा
येशूला देवाचा कोकरा म्हणून संबोधिले तेव्हा तो सैतानावर व पापावर विजय मिळविलेला
शिंग असलेला कोकरू बनला. हा विजयी कोकरू देवाच्या प्रजेची दुष्ट शत्रूपासून
मुक्तता करतो व त्यांना देवराज्यात घेऊन जातो. जेथे तो त्याच्यांवर सत्ता गाजवितो.
येशू देवाचा कोकरू सौम्य,
आधारात्मक व
विजयी आहे. तो त्याच्या पवित्र रक्ताने आपणाला शुध्द करतो व त्याचा विजय आपणाबरोबर
वाटतो.
बोध कथा:
१. बालपणापासून
आनंदीमय प्रेमळ वातावरणात वाढलेले दोघे भाऊ सॅम व जॉय एकमेकावर अतोनात प्रेम
करायचे, परंतू संपत्ती व
जमीन वाटपावरून दोघात राग,
द्वेष व भांडण
सुरू झाले. प्रेमाने राहणारे सॅम व जॉय आता एकमेकांचे तोंड बघण्यास तयार
नव्हते. दोघातील वैर इतक्या विकोपाला पोहचले की असह्य त्रासाला वैतागून सॅम आपल्या
सासरवाडी राहावयास निघून गेला परंतू मानसिक
त्रासापासून सॅम दूर पळू शकला नाही. शेवटी पत्नीच्या सल्ल्यानूसार काही काळ
प्रार्थनेत व शिबिरात घालविल्यानतंर सॅमला कळून चुकले की, निष्पाप असूनही
ख्रिस्त आपल्याला पापमूक्त करण्यासाठी वधस्तंभी मरण पावला व जर
आपण दुस-याकडू आपल्या पापाची व चूकेची क्षमा मागितली तर आजही ख्रिस्त आपल्याला आपल्या पापाची क्षमा
करण्यास उत्सूक आहे. आनंदाने सॅम मिठाईची पेटी घेऊन जॉयच्या घरी गेला व मिठाईची
पेटी जॉयला भेट दिली व त्याच्याकडून क्षमा मागितली.
जॉयने सॅमकडे एक
तिरस्काराची दृष्टी टाकली व ती पेटी त्याच्या तोडांवर फेकून दिली. दुस-या व तिस-या
दिवशी सुध्दा हाच प्रकार घडला चौथ्या दिवशी मात्र जॉयने सॅमला आपल्याकडे हसत
मुखाने येताना पाहिले तेव्हा जॉयचे हृदय हळहळले, डोळ्यातून अश्रूची धारा वाहू लागली. धावत जाऊन
त्याने सॅमला मिठी मारली व
क्षमा मागितली. सॅमलाही आपले अश्रू आवरता आले नाही. दोघांनीही एकमेकाची क्षमा मागितली व क्षमा केली. दोघांनाही जगाची पापे दूर करणारा कोकरू एकमेकांत दिसला होता.
२. एक व्यक्ती शोरूमच्या काचा साफ करत होता जेणेकरून
शोरूममधील वस्तू बाहेरील व्यक्तीला स्पष्ट दिसाव्यात. तो व्यक्ती काळजीपूर्वकपणे
काच स्वच्छ करीत होता, तरीही एक डाग
कितीही साबण व पाणी लावला तरी निघत नव्हता. खूप प्रयत्न केल्यानंतर त्या व्यक्तीच्या लक्षात आले की, तो डाग आतमधून
होता. त्याने आतमधील व्यक्तीला इशारा करून तो डाग काढण्यास सांगितला. आत्म्याला
लागलेला पापाचा डाग आतमधून म्हणजेच येशूचा पवित्र रक्ताने व ख-या मनपरिवर्तनानेच
काढता येतो, बाहयकृतीने
नव्हे.
मनन-चिंतन:
१: केवळ देवच आपल्याला पापमुक्त करू शकतो; आपल्या पापाची
क्षमा करू शकतो. म्हणूनच देवाने स्वत:च्या पुत्राला, कोकराला मानवाची पापे पदरी घेण्यास भूतलावर
पाठविले. वधस्तंभी आपल्या प्राणाची आहूती देऊन निश्चितच ख्रिस्ताने आपल्याला
पापमुक्त केले व जुन्या करारातील कोकराचा यज्ञबळी बदलून उंचाविला अश्याप्रकारे
देवाने क्षमेची पूर्णता फक्त इस्त्राएली लोकांनाच नव्हे तर संपूर्ण जगाला बहाल
केली. म्हणूनच
मिस्साबलिदानात आपण म्हणतो,
''जगाचे पापे दूर करणा-या देवाच्या कोकरा...''.
ख्रिस्ताद्वारे देवाने मानवाबरोबर असलेले
जिव्हाळ्याचे व ऐक्याचे नाते पुन्हा प्रस्थापित केले. जेव्हा आपण पापाच्या
दडपणाखाली चिरडून जात आहोत; देवापासून, इतरांपासून व स्वत:पासून
अलिप्त होत आहोत व आपण तीव्र
वेदना अनुभवतो तेव्हा जर आपण कळकळीने येशूकडे मदतीसाठी ओरडलो तर येशू आपल्या
मदतीला धावून येतो. आपल्याला पापाची क्षमा करून प्रेम, दया, शांतीने भरून
काढतो. येशूचे रक्त आपणाला पापमुक्त करते म्हणून ते पवित्र आहे असे नव्हे तर येशूचे रक्त पवित्र आहे म्हणून ते आपणाला पापमुक्त करते.
संत पेत्र आपणाला ह्याची जाणीव करून देतो, ''वाडवडिलांच्या परंपरेने चालत आलेल्या तुमच्या निरर्थक
वागणुकीपासून, 'सोने रूपे' अशा नाशवंत
वस्तूनी नव्हे, तर निष्कलंक व
निदौष कोकरा असा जो ख्रिस्त, त्याच्या मूल्यवान रक्ताने तुम्ही मुक्त झाला आहा'' (१पेत्र; १:१८-१९).
२. आज जगात पुष्कळ सामुदायिक व सुप्रसिद्ध संस्था, तसेच ख्यातनाम व्यक्ती चांगल्या जनसंपर्क अधिका-यांच्या शोधात आहेत कारण चांगला जनसंपर्क अधिकारी संकटसमयी व आणीबाणीच्या वेळी संस्थेची प्रतिमा जनतेपुढे चांगल्या अवस्थेत ठेवण्यास मदत करतो.
बाप्तिस्मा करणारा योहान येशूचा उत्तम जनसंपर्क अधिकारी होता. तो येशूच्या खऱ्या व्यक्तीमत्वाविषयी बोलण्यास भयभित झाला नाही. त्याने येशूकडे पाहून म्हटले ,"हा पाहा, जगाचे पाप हरण करणारा, देवाचा कोकरा !" (जॉन १:२९) अश्याप्रकारे योहान इतरांना येशूचा परिचय करून देतो. तसेच योहान साक्ष देतो की, येशु आपणा अगोदर अस्तित्वात होता व देवाचा आत्मा त्याच्याठायी आहे व येशु इतरांना आत्म्याने बाप्तिस्मा देईल .
आपले जीवनसुद्धा बाप्तिस्मा करणाऱ्या योहानासारखे असले पाहिजे. येशूचे उत्तम जनसंपर्क अधिकारी बनून आपणसुद्धा न भिता येशूविषयी इतरांना सांगितले पाहिजे कारण ख्रिस्ताच्या रक्ताने आपल्याला पापमुक्त केले आहे व आपणाला अभिषिक्त केले आहे म्हणूनच ख्रिस्त आपल्या जीवनाचा ध्येय व उद्धिष्ट
असला पाहिजे.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद : हे येशू आम्हाला प्रकाशमय बनव .
१. आपले पोप महाशय, सर्व कार्डीनल्स, बिशप, धर्मगुरू व धर्मभगिनि ह्यांनी अनुभवलेल्या ख्रिस्ताचा प्रकाश सर्व जगात पसरविण्यासाठी प्रयत्न करावेत म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. संत योहानाप्रमाणे आपण सर्वांनी येशूची खरी
ओळख जगाला आपल्या कृतीने व शब्दाने प्रकट करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. जे लोक देऊळ मातेपासून दुरावलेले आहेत त्यांनी जगाची पापे दूर करणाऱ्या देवाच्या कोकराला ओळखावे व ख्रिस्ताच्या प्रकाशात त्यांचे मनपरिवर्तन व्हावे म्हणून आपण प्रार्थना करू या .
४. जे लोक दु:खी-कष्टी, आजारी आहेत त्यांना प्रभूच्या स्पर्शाने चांगले आरोग्य लाभावे व त्यांचे जीवन सुखी समाधानी बनावे म्हणून आपण प्रार्थना करू या.
५. आता थोडावेळ शांत राहून आपण आपल्या वयक्तिक हेतूसाठी प्रार्थना करू या .
Caji
ReplyDeletetu si great ho
Congratulations
Fr Saby Kinny