Reflections for Homily By:- Botham Patil.
सामान्य काळातील तिसरा रविवार
दिनांक :- २६/०१/२०१४
पहिले वाचन: यशया; ८:२३-९:३.
दुसरे वाचन: १करींथीकरास पत्र; १:१०-१३,१७.
शुभवर्तमान: मत्तय ४:१२-२३.
"माझ्या मागे चला, म्हणजे मी तुम्हाला माणसे धरणारे करीन."
प्रस्तावना:
आजची उपासना आपणा सर्वांना येशू हा
जगाचा तारणारा व जगाचा प्रकाश आहे हे सांगत आहे. येशूने गालीलातील,
कफर्णहूम येथील लोकांस पश्चाताप करण्याचे आमंत्रण दिले व देवाराज्याची घोषणा करण्यास
सुरवात केली. ज्याप्रमाणे मासे
धरणारे कोळी माणसे धरणारे शिष्य बनले, त्याचप्रमाणे आजची उपासना आपणा सर्वांना ख्रिस्ताचे अनुयायी
बनून ख्रिस्ताचा प्रकाश, सर्वांना
देण्यासाठी व जे अंधारात आपले जीवन जगत आहेत त्यांना प्रकाशात आणण्यासाठी बोलावत
आहे, आपणा सर्वांना प्रभू येशूची पाचारण देणारी वाणी ऐकू येण्यासाठी व ती आपण स्वखुशीने स्विकारण्यासाठी ह्या पवित्र
मिस्साबलिदानाद्वारे कृपा व शक्ती मागु या.
पहिले वाचन:
आजच्या पहिल्या
वाचनात यशया प्रवक्ता जबुलून आणि नफ्ताली प्रांत ह्यांच्या होणा-या विजयाविषयी बोलत आहे. हे दोन्ही प्रांत अंधारात व
संकटात होते कारण दुस-या राज्याच्या राजाने त्यांच्यावर जुलूम केले होते,
परंतु यशया प्रवक्ता त्यांस विजयाची घोषणा
करत आहे, देवाचा प्रकाश त्यांच्यावर पडला आहे हे तो
सांगत आहे.
दुसरे वाचन:
दुस-या वाचनात
आपण ऐकतो की करिंथ येथे लोकांमध्ये फूट पडली होती. प्रत्येकजण मी अपुल्लोचा,
मी पौलाचा, मी कैफाचा आणि मी ख्रिस्ताचा मनवून घेत होते,
म्हणून संत पौल त्यांना एक असावे व त्यांच्यात फूट नसावी म्हणून सांगत आहे. संत पौल त्यांच्या संकुचित वृत्तीबद्दल त्यांची
कानउघडणी करत आहे.
सम्यक विवरण :
४० वर्षे प्रवास करून सरतेशेवटी इस्त्रायली जनता पँलेस्टाइनमध्ये
पोहचली. तदनंतर यहोशवाने प्रत्येक वंशाला आपआपली जागा वाटून दिली. जबुलून आणि नफ्ताली ह्या दोन जमातींचे लोक गालीलातील उत्तरेकडे वास्तव्यास होते. हा प्रदेश दिसावयास सुंदर व शेती बागायतीसाठी सुपीक किंवा सकस होता, म्हणूनच हा प्रदेश शत्रूंच्या हल्ल्यामध्ये
कायमचा असयचा. कोणत्याच प्रकारचे संरक्षण त्यांच्याकडे उपलब्ध नव्हते. यशया प्रवक्ता येशू येण्याच्या ७०० वर्षाअगोदर येरुशलेममध्ये
राहत होता आणि त्याने हे सर्वकाही पाहिले होते. असिरियाच्या सैन्याने हा प्रदेश लुटून सर्वकाही नष्ट केले होते आणि तेथील लोकांना गुलाम बनवून घेऊन गेले होते. ह्याच परिस्थितीत देवाचा आत्मा यशायावर आला व त्याने अंधारात चालणा-या लोकांस प्रकाशाची घोषणा केली.
शुभवर्तमानकार मत्तय ह्याच प्रकाशाची घोषणा येशूमध्ये करतो. कारण येशूने जेव्हा ह्या विश्वात प्रवेश केला तेव्हा हे सारे विश्व पापाच्या अंधारात बुडून गेले होते. सर्वजण प्रकाश, सुख व स्वातंत्र्याच्या शोधात होते, परंतु ते ह्यापासून वंचित होते. योहान बाप्तिसत्याने पश्चातापाची घोषणा केली आणि जेथून त्याने घोषणा करणे बंद केले तेथून येशू ख्रिस्ताने सुरु केले. योहानाने लोकांवर प्रकाश पाडला होता परंतु शुभवर्तमान सांगते;
"हा तो प्रकाश नव्हता, तर त्या प्रकाशाविषयी साक्ष द्यायला आला होता" (योहान १:८).
"हा प्रकाश येशू ख्रिस्त होय, ज्याचा प्रत्येक शब्द मनुष्याला प्रकाशित करतो" (योहान १:९).
येशू ख्रिस्ताला माहित होते की तो ह्या जगात कायमचा राहू शकत नाही आणि त्याचे कार्य नेहमीच चालू राहिले पाहिजे म्हणून तो शिष्यांना पाचारण करतो (मत्तय ४:१८-२२). येशू ख्रिस्त पेत्र आणि अंद्रिया तसेच याकोब व योहान ह्यांना त्याच्यामागे येण्यास पाचारण करतो. त्या चार भावंडांचा हा काही येशूला पाहण्याचा पहिलाच क्षण नव्हता, त्यांनी नक्कीच येशूला पाहिले असेल आणि त्याच्याबरोबर बोलले असतील. परंतु येशूने ह्या घटकेस त्यांच्यासमोर कठीण आव्हान ठेवले ते म्हणजे सर्व काही किंवा त्यांच्याकडे असेल- नसेल ते सोडून त्याच्यामागे येण्याचे, आणि काय प्रतिसाद, "ते लागलेच सर्वकाही सोडून त्याला अनुसरले(मत्तय ४:२०,२२).
येशूने ज्या माणसांना बोलावले ते काही महान विद्वान नव्हते किंवा संपत्तीने देखील श्रीमंत नव्हते. ते साधे- भोळे मासे पकडणारे कोळी होते. बहुसंख्य अभ्यासकांच असं मत आहे की चांगला किंवा अस्सल
कोळी ह्याच्या अंगी खालील गुण असणे गरजेचे आहे जेणेकरून तो चांगला मासे पकडणारा बनू शकतो:
१) सहनशीलता/ चिकाटी: जोपर्यंत मासा गळाच्या आमिषाला बळी पडत नाही तोपर्यंत सहनशील असणे गरजेचे आहे. जर मासे धरणारा चंचल व उतावळा असेल तर तो कधीच चांगला मच्छीमार बनू शकत नाही. हीच पद्धत माणसे धरताना देखील वापरावी लागते.
२) अथक प्रयत्नशील: त्याने कधीही खचून न जाता पुन्हा-पुन्हा प्रयत्न करत राहिले पाहिजे.
३) धैर्य: तो नेहमी धोका पत्करायला तयार असला पाहिजे. समुद्राच्या लाटा व वादळांना न घाबरता अथांग सागरात आपल्या लहानश्या नावेणे त्याला किनारा गाठता आला पाहिजे. लोकांच्या बाबतीत देखील हेच आहे, सत्य हे कटू असते आणि लोक जेव्हा त्या सत्याचा प्रतिकार करतात तेव्हा अडचणीत उभे राहून त्याला सामोरे जाणे हे एका चांगल्या मच्छीमाराचे लक्षण आहे.
बोधकथा:
१) इटलीमध्ये असिसी
ह्या शहरात ११८२ मध्ये एका मुलाचा जन्म झाला.घरी गर्भश्रीमंती असूनदेखील हा मुलगा
आईने देलेल्या सु-संस्कारामुळे चांगला घडला परंतु मित्रांबरोबर
नाच, गाणी, मौजमजा आणि
मेजवान्या ह्या सा-या गोष्टीत तो रमून जात असे. वडिलांचे कपडयांचे मोठे दुकान होते,
त्या दुकानात तो आपल्या वडिलांना त्यांच्या कामात
मदत करी व मिळालेल्या पैशातून चैनबाजी करी परंतु त्याला
आपले संपूर्ण जीवन ह्या दुकानातच घालवायचे नव्हते तर पराक्रमी योद्धा बनून मोठे
नाव कमवायचे होते म्हणून तो महागुरूंच्या संस्थानाचे संरक्षण करणा-या गॉथीयर
राजाला सामील झाला.
युद्धासाठी प्रवास
करत असताना तो वाटेत आजारी पडला व रात्री तो झोपला असताना आपल्याशी कोणीतरी बोलत
आहे असा त्याला भास झाला, तो आवाज त्याला विचारात होता, "धन्यापेक्षा सेवक
उदार बनू शकतो का?" "कधीच नाही" त्या युवकाने उत्तर दिले, "तर मग सेवकाच्या
मागे लागण्याचा खुळेपणा का करतोस", असे म्हणून तो आवाज बंद झाला. दुस-या दिवशी
उठून देवच आपल्याशी बोलला अशी त्या युवकाला खात्री झाली व तो युवक असिसीला पुन्हा
परतला व सैनिकी योद्धा बनण्याचे सोडून देवाराज्याचा योद्धा बनला.हा युवक दुसरा
तिसरा कोणी नसून महान संत असिसीचा संत फ्रान्सिस होय.
२) `एक ख्रिस्ती
सुशिक्षित मुलगी चांगल्या पदव्या घेऊन माहिती व तंत्रज्ञानाच्या(IT) कंपनीमध्ये
चांगल्या पदावर काम करत होती. भरगच्च असा पगार हातात पडे तरी कोणतेच व्यसन तिच्या
ठायी नव्हते. तिचा दिवस सुरु
व्हायचा आणि नेहमीच्या कामा-काजात संपून जायचा, असा हा तिचा
रोजचा जीवनक्रम चालू होता. चांगली नोकरी, चांगला पगार, चांगलं कुटूंब व
चांगले मित्र-मैत्रीणी असूनदेखील ती तिच्या जीवनात आनंदी नव्हती. असं काहीतरी होतं ते तिला अस्वस्थ करून सोडत
होतं, तिला आपले हे
जीवन अपूर्ण किंवा अपूर्त वाटत होते. कशाचातरी तिला
अभाव जाणवत होता. तिला हे दररोजचे जीवन स्वस्थ बसू देत नव्हते.
तिने हे सर्व
आपल्या आईला सांगितले. तिने देखील तिला
प्रार्थना करून प्रभूचा सल्ला घेण्यास सांगितले. तिने प्रभूचा आवाज ऐकला व त्याच दिवशी आपली
चांगली नोकरी सोडून आपल्याकडे असलेले सर्वकाही व बैंकेची सर्व पुस्तके आईच्या हाती
देऊन धर्मभगिनी होण्यासाठी कॉनवेन्टचा रस्ता धरला. दुनियेची सर्व सुखे सोडून,
गरिबांची व गरजुंची सेवा करण्यासाठी व स्वर्गीय सुख मिळविण्यासाठी तिने
प्रभूचा मार्ग निवडला व आज ती तरुणी प्रभू येशूची अनुयायी होऊन आपले जीवन
इतरांच्या सेवेसाठी समर्पित करून जगत आहे.
मनन चिंतन:
ह्या आधुनिक
युगात आपण बघतो की भरपूर लोक पश्चिमात्य देशांतून भारतात गुरूच्या शोधात येत आहेत,
जेणेकरून त्यांच्या वस्तूंनी भरलेल्या परंतु मुल्यहीन किंवा अर्थहीन झालेल्या
जीवनाला अर्थ मिळू शकेल. त्यांच्यामध्ये
कोणत्यातरी प्रकारची जी पोकळी निर्माण झाली आहे ती भरून काढण्यासाठी एका गुरुकडून
दुस-याकडे जातात आणि जर ते का शोधण्यास यशस्वी झाले तर ते त्याला चिकटून राहतात व
आपले संपूर्ण जीवन त्याच्याबरोबर निष्ठेने आणि भक्तीने घालवतात. हीच रीत इस्त्रायली लोकांमध्ये होती. जर त्यांना कोणाचा शिष्य व्हायचे असेल तर ते
प्रतिष्ठीत व पवित्र असणा-या गुरूचा शोध घेत व त्याचा शिष्य बनून ज्ञान प्राप्त
करत असत. परंतु येशूच्या
येण्याने हे दृश्य बदलून गेलं. जे बोलाविलेले
पहिले शिष्य होते ते येशूच्या शोधात गेले नाहीत तर येशू ख्रिस्ताने स्वतः पुढाकार
घेऊन त्यांना त्याच्या मागे येण्यास आमंत्रण दिले. येशूने जेव्हा त्यांना आमंत्रण दिले तेव्हा
येशूने त्यांना असे सांगितले नाही की, "तुम्हाला माझ्या
मागे यायला आवडेल का? तुम्ही ह्याचा आठवडाभर विचार करा आणि मग सांगा,
जर तुम्हाला आवडलं तर हा माझा पत्ता आहे ह्या पत्त्यावर येऊन माझे शिष्य बना."
नाही, ह्याप्रकारचे काहीच येशूने त्यांना सांगितले
नाही. उलट फक्त एका वाक्यात ते म्हणजे,
"माझ्यामागे चला म्हणजे मी तुम्हाला माणसे धरणारे
करीन." एवढेच बोलून त्यांना पाचारण केले.
चार ही भावंडांनी
कोणताच मागचा-पुढचा विचार न करता तसेच कोणताही प्रश्न न विचारता सर्वकाही सोडून ते
येशूला अनुसरले, जसं काही त्यांना अगोदरच माहीत असावं,
"ज्याने माझ्याकरिता व सुवार्तेकरिता घरदार,
बहीणभाऊ, आईबाप, मुलेबाळे किंवा
शेतीवाडी सोडली आहे त्यांना येणा-या युगात सार्वकालिक जीवन मिळाल्याशिवाय राहणार
नाही"(मार्क ९:२९-३०). पण ही त्यांची
अपेक्षा नव्हती तर येशूने दिलेले आश्वासन होते. फक्त त्यांच्यासाठीच नव्हे तर येणा-या सर्व
पिढ्यांसाठी देखील हे तितकेच मौल्यवान आहे. ह्या घटनेनंतर ते
काही मासे धरणारे उरले नाहीत तर माणसे
धरणारे बनले. ते येशूच्या मिशनकार्यात
त्याचे सहकारी झाले. बहुतेक लोकांचा
असा गैरसमज आहे की येशूच्या
मिशनकार्यात सहभागी होणे म्हणजे फक्त धर्मगुरू किंवा धर्मभगिनी होणे किंवा
चर्चच्या कोणत्यातरी संघटनेमध्ये सामील होणे परंतु तसे काहीच नाही. हि परमेश्वराची इच्छा असते किंवा त्याला वाटते
की आपण त्याचे अनुयायी असले पाहिजे मग आपण कोणीपण का असेनात,
त्याचा पाठलाग करण्यासाठी तो आपणा प्रत्येकाला हाक देतो. जर आपण मच्छीमार असू
तर तो म्हणतो: "या म्हणजे मी तुम्हाला माणसे धरणारे बनवीन." जर आपण
शिक्षक असू तर तो म्हणतो: "मला अनुसरा म्हणजे स्वर्गराज्याची रहस्ये उलघडून
मी ती इतरांस कशी शिकवावी ह्याचे तुम्हास ज्ञान देईन." जर आपण लेखक,
वैद्य, वकील, कवी किंवा
परिचारिका असू तर तो सांगतो: "या म्हणजे मी तुम्हाला तुमचा व्यवसाय एका नवीन
पद्धतीने आणि स्वर्गराज्याच्या दृष्टीने करायला शिकवीन." आपण ह्याच्यासाठी
तयार आहोत का?
परमेश्वराची
शक्ती अतुल्य आहे. त्याला कोणत्याही मदतीची गरज नाही. पण मानवावर तो प्रीती करतो, इतकी की,
तो आपल्याला त्याची मुले म्हणतो आणि तो आपला पिता बनतो. जशी मुले आईबापांबरोबर काम करतात,
तसेच आपणही त्याच्याबरोबर काम करावे अशी देवाची अपेक्षा आहे. प्रभू येशू
ख्रिस्ताने त्याच्या कार्यासाठी प्रेषितांची निवड केली, संत पौल सारख्या
महान सुवार्तिकांनी ख्रिस्ताची सुवार्ता पसरविली. आज ख्रिस्तसभा पाचारण रविवार साजरा करीत आहे. ख्रिस्ताठायी बाप्तिस्मा स्वीकारलेल्या
प्रत्येकाला ख्रिस्ताची सुवार्ता पसरविण्यासाठी पाचारण करण्यात आले आहे,
परंतु मी त्याच्या हाकेला प्रतिसाद देतो का? आपल्या
गुणवत्तेवरून तो आपणाला बोलावत नाही तर बोलावून आपणाला गुणवान बनवतो कारण
"आपल्या योजना त्याच्या योजना नाहीत"(यशया ५५:८-९),
त्याला सर्वकाही ठाऊक आहे की आपणास काय उपयुक्त आहे. स्त्री असो व पुरुष तो
प्रत्येकाला त्याच्या इच्छेनुसार बोलावतो मग ते काही वैवाहीक जीवन असो वा वैराग्याचे,
प्रत्येकाच्या जीवनात तो रंग भरतो व ते रंग इतरांच्या जीवनात भरण्यासाठी
आपणाला सज्ज बनवतो. जेव्हा परमेश्वर
आपणाला बोलावतो तेव्हा कोणीही सांगू शकत नाही की मी अशक्त आहे. बायबल कितीतरी उदाहरणे दाखवते ज्यात देवाने
अशक्त लोकांची निवड करून त्यांस सशक्त बनवले, उदाहरणार्थ:
आब्राहाम जो वयाने प्रौढ होता, राहाब जी वैश्या
होती, यिर्मया तर तरुण होता आणि जक्कय ठेंगणा होता.
आपण संदेष्टे
आहोत संदेश नाहीत, परमेश्वर हा संदेश आहे.आपण आपला प्रचार न करता
संदेशाचा प्रचार केला पाहिजे, जेणेकरून
परमेश्वराची स्तुती होईल, म्हणून आजच्या
ह्या रम्य दिवशी आपण स्वतःला विचारूया:
"जीवन सुंदर आहे, ते अधिक सुंदर
बनविण्यासाठी…
ह्या सुंदर जीवनाचा सुगंध इतरांपर्यंत पोहोचविण्यासाठी…
सर्वांना ख्रिस्ताठायी परिपूर्ण जीवनाचा अनुभव देण्यासाठी…
अंतकरणात ईश्वरी पाचारणाची ज्योत प्रज्वलीत करण्यासाठी…
मी तयार आहे का?
प्रभूचा प्रकाश होण्यासाठी व इतरांना प्रकाशात आणण्यासाठी मी प्रयत्न करत आहे
का? मी इतरांसाठी प्रकाश बनावे, मी इतरांना
ख्रिस्ताची सुवार्ता सांगावी, ख्रिस्ताची ओळख
इतरांना करून दयावी व प्रभूच्या तारणदायी कृपेचे साधन बनावे ह्यासाठी आपणास कृपा
मिळावी म्हणून विशेष प्रार्थना करूया, जेणेकरून आपण
शिष्यांप्रमाणे आनंदाने गाऊ शकू:
"आम्ही शिष्य प्रभूचे,
एक शारिरी, एक आत्मा
त्याच्या प्रतिछायेचे,
आम्ही शिष्य प्रभूचे."
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे पित्या, आम्हाला तुझे शिष्य
बनव.
१) ख्रिस्तसभेचे नेते ह्यांनी प्रभूचा प्रकाश अनुभवावा व तोच प्रकाश इतरांना त्यांच्या शब्दांद्वारे व कृतींद्वारे इतरांपर्यंत पोहचवावा व जे अंधारात वाटचाल करत आहेत त्यांना प्रकाशाच्या मार्गावर चालण्यास मदत करावी म्हणून आपण प्रार्थना करू या.
२) जास्तीत जास्त लोक ख्रिस्ताच्या सुवार्तेचे साक्षीदार व्हावे, घर, कारखाने, कार्यालये यांचे मार्ग ख्रिस्ताचे मार्ग व्हावेत म्हणून आपण प्रार्थना करू या.
३) आज आपण आपल्या भारत देशाचा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. सर्व नागरिकांना आपल्या हक्कांबरोबर कर्तव्याची जाणीव व्हावी व जेथे अन्याय, भ्रष्टाचार व अत्याचार होत आहेत त्या विरोधात आवाज उठवावा म्हणून आपण प्रार्थना करू या.
४) प्रभूच्या मळ्यात कार्य करण्यासाठी तरुण-तरुणींनी प्रभूची हाक ऐकावी व त्याने दिलेल्या पाचारणाला होकार देऊन देवाराज्याची घोषणा सा-या जगभर करावी, प्रभूचा प्रकाश व त्याची दया त्यांनी इतरांना दाखवावी म्हणून आपण प्रार्थना करू या.
५)आपल्या धर्मग्रामातील प्रत्येक व्यक्तीवर प्रभूचा आशीर्वाद यावा, आपले मानसिक व शारीरिक आजार दूर व्हावेत, आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबात शांती नांदावी व आपण सर्वांनी आपल्या दररोजच्या जीवनात प्रभूचे शिष्य बनावे म्हणून आपण प्रार्थना करू या.
६) आपल्या वैयक्तिक व खाजगी हेतूंसाठी थोडा वेळ शांत राहून आपण प्रार्थना करू या.
very good work..............congratulation bro............God Bless You
ReplyDeletehi dear botham really very nice points to reflect upon on our vocation story.... may God bless you.....good work .....
ReplyDeleteBravo..yaar
ReplyDeleteBravo...yaar
ReplyDeleteNice points! Congrats Botham!!!
ReplyDeleteGood Dude....keep it up...
ReplyDeleteDear Botham
ReplyDeleteWell done
go ahead
Good Reflection, Keep it up.
ReplyDelete