Wednesday, 30 April 2014

Reflections for homily By:Leon D'Britto.









पुनरूत्थानकाळातील तिसरा रविवार


त्यांचे डोळे उघडले व त्यांनी त्याला ओळखले


दिनांक ०४/०५/२०१४.
पहिले वाचनः प्रेषितांची कृत्ये २:१४,२२-२८.
दुसरे वाचन: १ पेत्र १:१७-२१.
शुभर्वतमान: लूक २४:१३-३५.

प्रस्तावना:

            आज आपण पुनरुत्थानकाळातील तिसरा रविवार साजरा करीत आहोत. आजच्या पहिल्या वाचनात आपण ऐकतो की ज्या येशूने देवाच्या सामार्थ्याद्वारे चमत्कार घडवले त्यालाच भीती व मत्सरामुळे वधस्तंभावर खिळले गेले. संत पेत्रूस आपल्या भाषणाद्वारे स्पष्ट करतो की ह्याच येशूला देवाने मरणातून उठविले आहे व आपण सर्व ह्याचे साक्षीदार आहोत. तर दुस-या वाचनात पेत्र म्हणतो, ‘सोने देऊन नव्हे, तर ख्रिस्ताच्या मूल्यवान रक्ताने आपण व्यर्थ वागणुकीपासून मोकळे झालो आहोत.
शुभवर्तमानात अम्माउसच्या वाटेवर पुनरुत्थित येशूचे शिष्यांना भेटण्याचा प्रसंग आपण पाहतो. हा प्रसंग येशू मरणावर विजयी झाल्याची मोहोर लावतो. येशूच्या मरणानंतर विश्वासात डगमगलेले व निराश झालेले दोन शिष्य पुनरुत्थित येशूला ओळखण्यात असमर्थ ठरतात. आपल्याही जीवनात निराशा येते, अपेक्षाभंग होतो परंतु अशावेळी विश्वासात कमी न पडता आपण प्रभूवरील विश्वासात दृढ राहावे म्हणून ह्या मिस्साबलीदानात विशेष प्रार्थना करुया.  
सम्यक विवरण:-
पहिले वाचनः प्रेषितांची कृत्ये २:१४,२२-२८.
येशू हाच मसीहा (ख्रिस्त) आहे:
पेत्राने आपल्या भाषणाद्वारे स्पष्ट केले की ज्याला लोकांनी नाकारले होते तोच येशू मसीहा आहे. पेत्र नि:संदिग्धपणे सांगतो की येशूचे जीवन व त्याने केलेली कृत्ये, ह्यावरून तो देवाला मान्य असलेला व देवाला संतोष देणारा होता. परंतु त्याला आरोपी ठरवून वधस्तंभावर खिळून मारले. असे असूनही देवाने त्याला मरणाच्या वेदनांपासून सोडवून उठविले. आता, हा येशू जिवंत आहे, असे पेत्र जाहीर करतो.

दुसरे वाचन: १ पेत्र १:१७-२१.
            ज्या विखुरलेल्या ख्रिस्ती यहूदी लोकांचा येशूवरील विश्वासामुळे छळ होत होता त्यांना उद्देशून व उत्तेजन आणि धीर देण्यासाठी पेत्राने हे पत्र लिहिले होते. ह्या उता-यात पेत्र म्हणतो, ‘सोने देऊन नव्हे, तर ख्रिस्ताच्या मूल्यवान रक्ताने तुम्ही व्यर्थ वागणुकीपासून मोकळे झाला आहात’(ओवी.१८-१९). ख्रिस्त कोण आहे हे लक्ष्यात घ्या. ख्रिस्ताद्वारे तुम्ही देवावर विश्वास ठेवला आहात तर तुमचा विश्वास व आशा देवावर आहे.

शुभर्वतमान: लूक २४: १३-३५.
अ. उता-याची बांधणी:
१. शिष्य येरुशलेममधून परत जात होते (१३-१४).
२. येशू ख्रिस्त त्यांच्याबरोबर प्रवास करतो (१५).
३. देवाने त्यांना येशूला ओळखण्यापासून रोखले (१६).
४. मध्यांतर व संवाद (१७-३०).
३. देवाने त्यांना येशूला ओळखण्यास मदत केली (३१).
२. येशू त्यांच्यातून निघून जातो (३१ब).
१. शिष्य येरुशलेममध्ये परत आले (३२-३५).

            ह्या उता-याच्या मध्यांतरमध्ये (ओवी १७-३०) झालेल्या घटनांची पुनरावृत्ती, संवाद आणि येशूचे दर्शन ह्यांचा अनोखा मेळ साधला गेला आहे. येशू, शिष्यांकडून झालेल्या घटनांची पुनरावृत्ती त्यांच्या शब्दांमध्ये करून घेतो(१७-२४). ओवी २५-३० मध्ये, येशू व शिष्य ह्यामधील संवाद नोंदलेला आहे. ओवी ३१ येशूचे दर्शन तर ओवी ३२-३५ शिष्याचे येरुशलेमला परत जाणे दर्शवतात.
अम्माउसच्या वाटेवरील वृतांत हा आपल्याला येशूच्या दु:खसहनापूर्वी गालीलातून येरुशलेमकडील प्रवासाची आठवण करून देतो(लूक ९:५१-५६). गालीलातून येरुशलेमकडील प्रवासअम्माउसच्या वाटेवरील वृतांत स्पष्ट करतात की दोन्ही वेळेला, शिष्य येशूला संपूर्णपणे समजू शकले नाहीत म्हणूनच ते ख-या येशूला अनुभवू शकले नाहीत. त्यांचे प्रत्यक्षात येशूबरोबर राहणे येशूला ओळखण्यास पुरेसे नव्हते. त्यासाठी त्यांना येशूचा अनुभव घेणे जरुरीचे होते(ओवी.२९).  

ब : उता-याचे स्पष्टीकरण
नाराज झालेले तसेच मनोबल खचलेले शिष्य अम्माउसच्या वाटेवर होते व त्यावेळेला ते पुनरुत्थित ख्रिस्ताला भेटण्याच्या अपेक्षित नव्हते. आजपर्यंतच्या शिकवणीवरून मसिहा दु:ख सोसून गौरवीला जावे असे शक्य नव्हते. त्यांचे गोंधळलेले मन शांत होण्यासाठी ख्रिस्त जुन्याकारारात त्याच्याविषयी- म्हणजेच त्याचे दु:खसहन, मरण व पुनरुत्थान-  जे शिकवलेले होते त्याचा अर्थ सांगतो. पवित्र शास्त्राच्या उलघडयाने त्यांना नवा प्रकाश मिळतो व ते येशूला भोजन समयी ओळखतात.
अश्याच आध्यात्मिक निष्काळजीपणामुळे आपण ख्रिस्ताच्या उपस्थितीला ओळखू शक नाही. पुनरुत्थित ख्रिस्ताला पाहण्यासाठी फक्त शारिरीक डोळे पुरेसे नसून त्यासाठी विश्वासातला स्पष्टपणा, आध्यात्मिक जबाबदारी आणि दैवी रोषणाईची गरज आहे.

बोधकथा:
एकदा एक फुटबॉल प्रशिक्षकाला, आपल्या कौटुंबिक कारणास्तव, आपल्या पदाचा राजीनामा दयावा लागला. त्यांचे हे अकस्मात जाणे तरुण प्रशिक्षण घेणा-या युवकांना धक्कादायक होते. कारण ते एक चांगले प्रशिक्षक गमावनार होते. त्याच्या दृष्टीकोनातून ते फार चांगले प्रशिक्षक होते, जे त्यांना समजायचे व त्यांच्या चुकांना प्रेमाने मार्गदर्शन करून दुरुस्त करायचे. त्यांना वाटले की प्रशिक्षक आमच्या वागणुकीला वैतागून आमच्यापासून दूर जात आहे. प्रशिक्षकाने जेव्हा त्यांचा निरोप घेतला तेव्हा ते त्यांना म्हणाले, ‘तुमच्यात अंत:सामर्थ्य ठसून ठसून भरलेले आहे. तुम्हीं जर हा खेळ १००% देऊन खेळलात तर नक्कीच तुम्हांला यश प्राप्त होईल’.
परंतु असे काहीही झाले नाही. पुढच्या हंगामात आपल्या बेजबाबदार खेळामुळे ते कुठलाही सामना किंवा कुठेलीही स्पर्धा जिंकले नाहीत. त्या हंगामातल्या शेवटच्या स्पर्धेत आपला पहिला सामना खेळताना त्यांची नजर आपल्या लाडक्या प्रशिक्षकावर गेली. त्यांनी सांगितलेले प्रत्येक शब्द त्यांना आठवले. प्रशिक्षकाने दाखवलेला विश्वास त्यांनी खेळात उतरवला. आणि समानाच नव्हे तर ती स्पर्धा सुद्धा जिंकली. देवाने दिलेला विश्वास आपल्या जीवनात उतरवणे म्हणजेच देवाला ओळखणे असे होय.

मनन चिंतन:
१. आध्यात्मिक आंधळेपणा:
लूक २४:१९-२० मध्ये आपण पाहतो की ते दोन शिष्य येशूच्या जीवन व मरणाविषयी अगदी सखोलपणे माहिती देत होते व त्यांचे शब्द जणू (creed) प्रेषितांचा विश्वाससंगीकार आहे  असे भासत होते. येशूच्या जीवनात घडलेल्या घटनांची पुरेपूर माहिती त्यांना होती तरीही त्यांचा त्यावर पूर्ण विश्वास नव्हता. अम्माउसच्या वाटेवर चालत असताना येशूने त्यांना पवित्र शास्त्र समजावून सांगितले. परंतु, येशू मरणातून उठला आहे, ह्या सत्यावर विश्वास ठेवण्यास ते पुरेसे ठरले नाही. येथे येशूला ओळखण्यासाठी येशूविषयी फक्त माहिती असणे पुरेसे नव्हते. ह्या प्रसंगात दोन महत्वाच्या बाबीमुळे (आतिथ्यशीलता व प्रभूभोजन) त्यांचे डोळे उघडले व ते येशूला ओळखू शकले.
अ) आतिथ्यशीलता: अम्माउसच्या वाटेवर त्यांना भेटलेला हा गृहस्थ व्यक्ती अनोळखी होता. त्याच्याविषयी त्यांना काहीही माहिती नव्हती. तरी त्यांनी येशूला त्यांच्याबरोबर रात्री घरात विश्रांती घेण्यास आमंत्रण दिले. समजा शिष्यांनी येशूला त्यांच्या घरात विश्रांती घेण्यास आमंत्रित केले नसते तर त्यांच्यापुढे जे काही घडले ते कदाचित घडले नसते. ह्या प्रसंगातून लूक आपल्याला आतिथ्यशीलतेचे महत्व समजावून देतो.
ब) प्रभूभोजन: दुसरी महत्वाची बाब म्हणजे प्रभूभोजन. शेवटच्या भोजनाच्या वेळेला प्रभूभोजानाद्वारे येशूचे खरेपण शिष्यांसमोर आले. लूक २२:१६,१८ मध्ये येशू म्हणाला होता; “देवाच्या राज्यात हे पूर्ण होईपर्यंत मी हे भोजन पुन्हा करणार नाही; देवाचे राज्य येईपर्यंत द्राक्षवेलाचा उपज ह्यापुढे मी पिणार नाही.जेवताना भाकर मोडण्याच्या प्रथेमुळे शिष्यांचे डोळे उघडले व ते पुनरुत्थित ख्रिस्ताला ओळखू शकले. ह्या प्रसंगात येशू शिष्यांसोबत भाकरी मोडत भोजन घेत आहे म्हणजेच देवाच्या राज्याला सुरवात झालेल्याची आठवण करून देत आहे.
येशूच्या शिष्यांबरोबर भाकरीच्या मोडण्यात झालेली भेट फक्त त्या दोन शिष्यांसाठी नव्हती. होय, त्या प्रसंगामुळे त्यांच्या येशूवरील विश्वासात भर पडली होती व त्यांचा विश्वास दृढ झाला होता परंतु त्यामुळे त्यांना त्यांचा विश्वास दुस-यांना देण्यास व इतरांपर्यंत पोहोचविण्यास प्रोत्साहान मिळाले. ह्याचाच परिणाम म्हणून लागलीच ते येशू पुनरुत्थित झाल्याची शुभवार्ता पसरविण्यासाठी येरुशलेमला परतले.         
अम्माउसच्या वाटेवर येशूच्या शिष्यांना येशूची भेट ही घटना एका साध्या प्रसंगापेक्षा अधिक महत्वाची आहे. ही घटना आपल्याला येशूचे जीवन, मरण पुनरुत्थानाविषयी माहिती देते. ज्याप्रकारे भाकर मोडल्याने त्यांचे डोळे उघडले तसेच मिस्साबळीमध्ये आपल्याला येशूचे पूर्ण अस्तित्व जाणवते. परंतु मिस्साबळी अथवा आपली उपासना ही येशूला त्या पवित्र भाकारीद्वारे स्वीकारण्याने पूर्ण होत नाही तर जेव्हा आपण मिस्साबळीदानात ख्रिस्ताला सेवन करतो तेव्हा आपण आपल्या प्रभुशी व शेजा-यांशी एकरूप झाल्याची भावना आपल्यात निर्माण झाली पाहिजे. तसेच ज्याप्रकारे शिष्यांना पुनरुत्थित ख्रिस्ताची ओळख पडताच ते ख्रिस्ताची सुवार्ता पसरविण्यासाठी येरुशमेला परतले तसेच प्रत्येक उपासनेत अथवा मिस्साबळीदानात आपण अनुभवलेल्या ख्रिस्ताची सुवार्ता इतरांपर्यंत पोहोचविण्यास आपण प्रयत्न केले पाहिजेत.
२)  अम्माउसच्या वाटेवरचा हा प्रसंग वाचताच आपल्या नजरेस येते की  दोन्ही शिष्यांचा ख्रिस्तावरील विश्वास  डगमगला होता. येशू त्यांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करू शकला नाही म्हणून निराश होवून ते आपल्या इतर बांधवाना सोडून परत आपल्या गावी जात होते. परंतु येथे समस्या येशूविषयी नाही तर त्या दोन शिष्यांनी येशूकडून केलेल्या अपेक्षांची आहे. ब-याच वेळी आपल्याला आपल्या प्रार्थनेचे उत्तर मिळत नाही अथवा आपल्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत अश्या वेळी हार किंवा अपयश मानून मागे फिरण्याएवजी प्रथम आपल्या अपेक्षा, प्रार्थना विनंत्या पडताळून त्या योग्य, निस्वार्थी व गरजेच्या आहेत का हे पाहून त्यांना बदलण्यात आपले हित आहे.  
 
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभो आमचा विश्वास वाढव
१) आपले परमगुरुस्वामी, महागुरुस्वामी व सर्व धार्मिक अधिका-यांनी त्यांच्या जीवनाद्वारे  व कार्याद्वारे प्रभूचा अनुभव प्रत्येक भाविकांपर्यंत पोहोचवावा व सर्वांना जिवंत प्रभूचा अनुभव घेण्यास मदत करावी म्हणून आपण पुनरुत्थित ख्रिस्ताकडे प्रार्थना करूया.
२) जे निराश होऊन देवापासून दूर गेलेले आहेत त्यांना प्रभूने स्पर्श करावा व त्यांच्या जीवनात परिवर्तन यावे व त्यांनी परत एकदा प्रभूने दाखवलेल्या मार्गावर चालावे म्हणून आपण पुनरुत्थित ख्रिस्ताकडे प्रार्थना करूया.
३) आपल्या देशात सुरु असलेल्या निवडणुका शांततेत व पारदर्शकपणे पार पडून आपल्या देशाला एक दृढ व सक्षम सरकार लाभावे म्हणून आपण पुनरुत्थित ख्रिस्ताकडे प्रार्थना करूया.
४) आपल्या सर्व मिशनरी बंधू-भगिनींना त्यांचे कार्य जोमाने सुरू ठेऊन प्रभूची सुवार्ता जगाच्या कानाकोप-यात पसरविण्यास सामर्थ व कृपा लाभावी म्हणून आपण पुनरुत्थित ख्रिस्ताकडे प्रार्थना करूया.
५) जे लोक विश्वासामध्ये अडखळत आहेत त्यांचा विश्वास दृढ व्हावा म्हणून आपण पुनरुत्थित ख्रिस्ताकडे प्रार्थना करूया.
६) थोडावेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तीत गरजा प्रभूचरणी ठेऊ या.

Tuesday, 22 April 2014

Reflections for Homily By: Chris Bandya.









पुनरूत्थानानंतरचा दुसरा रविवार


माझ्या प्रभू! माझ्या देवा!


दिनांक २७/०४/२०१४.
पहिले वाचनः प्रेषितांची कृत्ये २:४२-४७.
दुसरे वाचन: १ पेत्र १:३-९.
शुभर्वतमान: योहान २०: १९-२३.

प्रस्तावनाः

            आजच्या उपासनेत आपण श्रध्दा, पुर्नजन्म व ख्रिस्ती जीवनाच्या वैशिष्ट्याबद्दल ऐकतो. पहिले वाचन आपणास ख्रिस्तसभा एक पवित्र कुटुंब, भक्तीमय सभा, प्रार्थनामय जीवन व आदरभाव युक्त सभा म्हणून आपल्यासमोर माडंत आहे. ख्रिस्ती जीवन चांगल्याप्रकारे जगण्यासाठी आपणास ख्रिस्तसभा पहिल्या वाचनाप्रमाणे ह्या वैशिष्ट्यासारखी ठेवावी लागेल. ख्रिस्ती जीवन हे आदर्शमय जीवन म्हणून आपण जगले पाहिजे. अनेक चांगल्या गुणांमुळे ख्रिस्तसभा प्रेषितांसमवेत ख्रिस्ती श्रध्देत वाढत गेली. अनेक संताच्या मार्गदर्शनाने तसेच त्याच्या मध्यस्तीने ही श्रध्दा दृढ ठेवण्यास आपण सुद्धा सतत प्रयत्न करायला हवेत.
            आज आपण दैवी दयेचा(Divine Mercy) सण साजरा करीत आहोत. दैवी दयेच्या विश्वासात वाढण्यासाठी आपणास संत फॉस्टीना ह्या महान संताची मदत आपल्या दैनंदिन जीवनात होते आणि संत फॉस्टीना आपणास तिच्या बरोबर, ‘हे येशू, माझी तुझ्यावर श्रध्दा आहेअशी प्रार्थना करावयास आव्हान करते. तिच्या जीवनाचे आचारण आपण सतत करावे व ख्रिस्ती श्रध्देत वाढावे म्हणून आपण देवाकडे त्याच्या दयेसाठी प्रार्थना करूया. संत थोमाने येशूला पाहताच, ‘माझ्या देवा! माझ्या प्रभो!हे शब्द उच्चारले. जरी तो सुरूवातीला विश्वासात डगमगला तरी नतंर तो ख्रिस्ताचा खरा अनुयायी झाला व ख्रिस्ताच्या शब्दांचा प्रचार सर्वत्र केला. आजच्या शुभर्वतमानात येशू ख्रिस्त आपणास निमंत्रीत करून म्हणत आहे, ‘पाहिल्यावाचून विश्वास ठेवणारे ते धन्य.ह्याच पुनरूत्थित ख्रिस्तामध्ये आपला विश्वास सदैव राहून तो आपल्या कार्यात दिसावा म्हणून आपण आजच्या ह्या पवित्र मिस्साबलीदानात प्रभूकडे विशेष प्रार्थना करू या.

पहिले वाचनः प्रेषितांची कृत्ये २:४२-४७.

    ख्रिस्तसभेची वैशिष्ट्ये: हा उतारा आपणासमोर ख्रिस्तसभेची अनेक वैशिष्ट्ये सादर करीत आहे.
१.    ख्रिस्तसभा ही मार्गक्रमित आहे.
२.    ख्रिस्त सभा परस्परभावावर बांधलेली आहे.
३.    ख्रिस्तसभा ही प्रार्थनामय आहे.
४.    ख्रिस्तसभा ही आदरभावयुक्त आहे.
५.   ख्रिस्तसभेत अनेक नविन चिन्हे व चमत्कार घडलेले आहेत.
६.    ख्रिस्तसभा एक कुटुंब आहे.
७.   ख्रिस्तसभा भक्तीमय आहे.

दुसरे वाचन: १ पेत्र १:३-९.

हा उतारा देवाचे आभार-प्रदर्शनम्हणून नावाजलेला आहे, कारण ख्रिस्ताचे शिष्य तारणप्राप्तीसाठी परमेश्वराकडे आशा ठेवतात. पण हे आभार-प्रदर्शन वेगळ्याच प्रकारचे आहे. यहूदी लोक प्रार्थनेपुर्वी देवाला धन्यवाद देत म्हणत, ‘देव धन्यवादित असो.परंतु ख्रिस्ती लोक जेव्हा प्रार्थनेला सुरूवात करत तेव्हा ते म्हणत,  ‘आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो.अशाप्रकारे जीवन प्राप्त होण्यासाठी आणि अविनाशी, निर्मळ व अक्षय वतन मिळण्यासाठी ते पुनरुत्थित ख्रिस्ताद्वारे प्रार्थना करीत असत. 
 
शुभर्वतमान: योहान २०: १९-२३.

ख्रिस्ताने सोपवलेली कामगिरी येशूच्या मरणानतंर सुध्दा येशूचे शिष्य शेवटचे भोजन केलेल्या वरच्या खोलीत भेटत असत. परंतु ही भेट भिती व भयाने भरलेली होती. त्यांना ठाऊक होते की येहूद्यांनी शत्रूत्वाच्या कट्टूत्वाने येशूला जीवे मारले होते आणि आपण सुध्दा ह्या कट्टूत्वाचे बळी पडू म्हणून ते भयभीत झाले होते. म्हणूनच ते एकटेपणात भेटत असत, पायरीवर पडलेले एक-एक पाऊल ते ऐकत असत व दरवाज्यावर वाजणा-या आवाजामुळे त्यांच्या हृदयाचे ठोके बंद होत असत. जेव्हा ते शांततेत बसले होते तेव्हा अचानक येशू ख्रिस्त त्यांच्यामध्ये येऊन उभा राहतो. येशूने त्यांना दैनदिन जीवनातील पूर्वेकडील अभिवादन देऊन म्हणाला, ‘तुम्हास शांती असो.ह्याचा अर्थ असा की तुमचे सर्व सकंटापासून संरक्षण होवो तसेच देवपिता तुम्हावर चांगल्या गोष्टींचा वर्षाव करो.तदनंतर येशू त्यांना कामगिरी सोपवितो व पुढच्या कार्यास पाठवतो व हे कार्य ख्रिस्तसभेने कधीच विसरले पाहिजे नाही हे त्यांना ठामपणे समजावूनही सांगतो.

. ख्रिस्त म्हणतो, ‘मला परमपित्याने पाठवले आहे आणि म्हणूनच मी तुम्हास पाठवतो.  ह्यालाच आपण ख्रिस्तसभेचा अधिकार, सनद किंवा सत्ता म्हणतो.

    अधिकार, सनद किंवा सत्ता म्हणजे तीन महत्वाच्या गोष्टी:
अ) ख्रिस्ताला ख्रिस्तसभेची गरज आहे.
संत पौल म्हणतो, ‘ख्रिस्तसभा हे ख्रिस्ताचे शरीर आहे’(इफिस्सीकरांस पत्र; १:२३, १ करिंथकरांस पत्र; १२:१२). जो बाळ येशू जगाला प्रेमाचा संदेश घेऊन आला आणि आता पुनरुत्थित होऊन पित्याकडे परततो हा संदेश जर ख्रिस्तसभेने स्विकारला नसता तर ह्या संदेशाची फळे ह्या जगात उगवली गेली नसती. ख्रिस्तसभा ह्याच संदेशाचे मुख बनले, कामासाठी हात, तर चागंल्या मार्गावर पाय बनले. म्हणूनच येशू ख्रिस्त ह्या  ख्रिस्तसभेचा आश्रयदाता आहे.
ब) ख्रिस्तसभेला ख्रिस्ताची गरज आहे.
पाठवण्यासाठी पाठवणा-याची गरज असते. म्हणूनच मार्गस्थ ख्रिस्तसभेचा प्रभू येशू ख्रिस्त मार्गदर्शक बनतो व आपल्या संदेशाने परिपूर्ण करतो. एवढेच नव्हे तर शिष्यांना अधिकार व शक्तीसुध्दा देतो. ख्रिस्ताशिवाय ख्रिस्तसभेकडे संदेश असणे शक्य नव्हते, म्हणूनच ख्रिस्त सभेला ख्रिस्ताची गरज आहे.
क) ख्रिस्तसभेला संदेश प्रसरविण्यासाठी पाठवणे हे ख्रिस्ताला परमपित्याने पाठवणे ह्या समांतर आहे.
परमपिता प्रभू येशू, आपला पुत्र ह्याला प्रेमाचा संदेष्टा म्हणून पाठवतो. येशू ख्रिस्त ख्रिस्तसभेला त्या प्रेमाचा वाहक असे नियुक्त करतो. ह्यामुळेच ख्रिस्तसभेने स्वतःच्या संदेशाचा प्रसार न करता ख्रिस्ताच्या संदेशाचा प्रसार करायला हवा.

२) येशूने शिष्यांवर फुंकर मारून त्यांच्यावर विश्वास पाठविला व त्यांना पवित्र आत्म्याने परिपूर्ण केले.
संत योहानाचे हे शब्द मानवनिर्मितीशी जुळत आहेत. लेखक लिहितो, “मग मातीचा मनुष्य घडविला व त्याच्या नाकपुड्यांत जीवनाचा श्वास फुकला; तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी झाला” (उत्पत्ति; २:७). यहेज्केल सुध्दा आपणास हेच सांगत आहे(यहेज्केल; ३७:९).

संशयी थोमाची खात्री (योहान २०:२४-२९):
थोमाला येणा-या क्रुसाची जाण होती. जेव्हा लाजरसच्या आजाराबद्दल येशूला बातमी मिळाली व जेव्हा येशू बेथनीला गेला तेव्हा थोमा म्हणाला, “आपणही ह्यांच्याबरोबर मरावयास जाऊं” (योहान ११:१६). थोमा धैर्यवान होता परंतु स्वभावाने तो निराशावादी होता. त्याचे येशूवर खूप प्रेम होते. दुसरे शिष्य घाबरून गेले असताना सुध्दा तो येरूशलेमात गेला कारण त्याला ख्रिस्तासोबत मरायचे होते. येशूच्या दुःखामुळे तो अंत्यत दुःखी होऊन एकाकटा झाला होता. जेव्हा येशू प्रेषितांना दर्शन देतो तेव्हा थोमा त्यांच्या बरोबर नव्हता. थोमाला ही बातमी कळते तेव्हा आपल्या निराशावादी स्वभावामूळे तो विश्वास ठेवत नाही. थोमा त्यांना म्हणाला, “त्याच्या हातात खिळ्याचे वण पाहिल्यावाचून; खिळे होते त्या जागी आपले बोट घातल्यावाचून व त्याच्या कुशीत आपला हात घातल्यावाचून मी विश्वास धरणारच नाही” (योहान;२०:२५).
थोमा ख्रिस्ती बंधूवर्गापासून दूर गेला होता. त्याने एकत्र राहण्यापेक्षा एकटेपणात राहण्याचा निश्चय केला होता. आपल्या बंधूबरोबर एकत्र न राहिल्यामुळे त्याला पुनरूत्थित येशूला भेटण्याची संधी लाभली नाही. दुस-या आठवड्यात जेव्हा येशू ख्रिस्त पुन्हा दर्शन देतो तेव्हा थोमा तिकडे हजर असतो. येशूला पाहून थोमाचे हृदय प्रिती व भक्तीने ओसंडून वाहते व थोमा म्हणतो, “माझा प्रभू व माझा देव!” (योहान; २०:२८). येशूने थोमाला उत्तर देत म्हटले, “तू मला पाहिले आहे म्हणून विश्वास ठेवला आहे; पाहिल्यावाचून विश्वास ठेवणारे ते धन्य”(योहान; २०:२९).

शुभवर्तमानाचा हेतू(२०:३०, ३१):
संपूर्ण शुभवर्तमानामधून हाच एक असा उतारा आहे जो शुभवर्तमानाचा हेतू आपणांसर्वांसमोर उत्कृष्टपणे ठेवतो.
१) ओवी ३० सांगते, “ह्या पुस्तकांत लिहिली नाहीत अशी दुसरीही पुष्कळ चिन्हे येशूने आपल्या शिष्यांदेखत केली.ह्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की इतिहास येशू ख्रिस्ताचे स्पष्टीकरण बनत नाही तर येशू ख्रिस्तामुळे इतिहासाला गौरव प्राप्त होते.
२) शुभवर्तमान हे फक्त येशूचे जीवन चरित्र नसून, ख्रिस्त हा खरा रक्षणकर्ता(Saviour) व गुरूजी(Master) आहे हे समजावते. शुभवर्तमानाचा हेतू फक्त बोधपत्र नसून ते एक जीवनदायक झरा बनते.
म्हणूनच शुभवर्तमानाकडे पाहण्याचा आपला दुष्टिकोन ऐतिहासिक किंवा जीवनचरित्रीक न ठेवता येशूचे अनुयायी म्हणून आपण देवाचा शोध करणारे त्याचे भक्त, हा आपला दुष्टिकोन असायला हवा.

बोध कथाः

चार्ल्स ब्लोन्डीन ह्या दोरीवरील कसरत करणा-या एका व्यक्तीची आश्चर्यचकित कथा. कॅनडा देशातील ११००० फुट उंचीच्या नायागारा धबधब्यावरून चार्ल्स ह्याने कसरतीच्या दोरीवर चालून तो धबधबा पार केला. त्याने हा पराक्रम प्रत्येक वेळेस नविनप्रकारे केला; एकदा सायकलवर, गोणपाटात पाय ठेऊन, अंधारात आणि डोळे झाकून. एका वेळेस तर त्याने स्टोव घेऊन त्याच्यावर अंड्याचा ऑमलेट बनविला.
खूप लोक चार्ल्सचा पराक्रम पहायला गर्दी करत असत. त्याला प्रोस्ताहान करत जोरजोरात आरडाओरडा करत असत. एकदा त्याने प्रोस्ताहान देणा-या लोकांकडे पाहून त्यांना सहजच प्रश्न केला, 'तुम्हाला विश्वास आहे की ह्या दोरीवरून मी एका माणसाला उचलून धबधब्याच्या त्या पलीकडे जाऊ शकतो?’ लोकांनी उत्साहात प्रतिसाद देत म्हटले, 'होय तुम्हीतर जगात एकमेव व्यक्ती आहात जे ह्या दोरीवरून जाऊ शकता व आम्हांला विश्वास आहे की हा पराक्रम तुम्ही नक्कीच करू शकता.मग चार्ल्सने लोकांकडे आपली नजर फिरवून त्यांस म्हटले, 'मग तुमच्यातील कोणाला माझ्याबरोबर यायचं आहे.
त्यावेळेस एकाही मनुष्याने त्यासबरोबर जाण्यास पुढाकार घेतला नाही. विश्वासासाठी पराक्रमाची गरज भासत नाही तर त्यासाठी मनाचा ठाम निर्णय व निश्चय असायला हवा.

मनन चिंतनः

     तू मला पाहिले आहे, म्हणून श्रध्दा ठेवली आहे. पाहिल्यावाचून श्रध्दा ठेवणारे ते धन्य.
            असे सागितंले जाते की जो आपल्या जीवनाचे घर विश्वासाच्या भक्कम पायावर बांधतो त्या घराला कुठलीही वाईट गोष्ट किंवा प्रसंग हादरू शकत नाही. आजच्या शुभवर्तमानात ऐकल्याप्रमाणे येशू ख्रिस्त संत थोमाच्या शंकेचे निरसन करण्यासाठी त्याला म्हणतो, “तू आपले बोट इकडे कर आणि माझे हात पाहा व आपला हात पुढे करून माझ्या कुशीत घाल, आणि श्रध्दाहीन असू नको, तर श्रध्दावंत हो. थोमाने त्याला म्हटले, माझ्या प्रभू! माझ्या देवा!” (योहान; २०:२७-२८).
थोमा श्रध्दाहीन झाला कारण जेव्हा पुनरूत्थित ख्रिस्ताने शिष्यांना दर्शन दिले तेव्हा तो शिष्यांबरोबर नव्हता. त्यांच्या शब्दांवर थोमाचा विश्वास बसला नाही. जेव्हा त्यांची भेट पुनरूत्थित प्रभूशी होते तेव्हा थोमा श्रध्दावंत होऊन येशूला आपले सर्वस्व मानतो. (माझ्या प्रभू! माझ्या देवा!) आपल्या भारतात तिस-या शतकात येऊन त्यांने ख्रिस्ताच्या शब्दांचा प्रचार केला. आज संपूर्ण भारत देशात जर आपण पाहिले तर आपणास अनेक असे ख्रिस्ती लोक बघावयास मिळतात व ह्या सर्वाचे श्रेय प्रामुख्याने संत थोमाला जाते. त्याने येशू ख्रिस्ताच्या श्रध्देचे बीज भारतात पेरले. येशू ख्रिस्ताच्या स्पर्शाने थोमाचा पुर्न-जन्म झाला होता व त्यांने आपले जीवन ख्रिस्ताच्या शब्दांसाठी अर्पण केले.
शुभवर्तमानाद्वारे ख्रिस्त आपणास सांगतो, “पाहिल्यावाचून श्रध्दा ठेवणारे ते धन्य.ह्या शब्दांद्वारे ख्रिस्त आपणास आव्हान करीत त्याच्या श्रध्देत वाढण्यास सर्वाना निमंत्रीत करतो. जरी आपण स्वतः ख्रिस्ताला पाहिलेले नाही तरी सुध्दा ह्या जगातील अनेक माध्यमांद्वारे आपणास ख्रिस्ताच्या प्रेमाची जाण होते. आपण न पाहता येशूवर श्रध्दा ठेवली म्हणूनच शुभवर्तमानात सागितंल्याप्रमाणे आपण धन्य होतो. जीवनात अनेक असे मार्ग आहेत, ख्रिस्तसभेच्या वैशिष्ट्याप्रमाणे मार्गक्रमण करणे हेच खरे ख्रिस्तीय आहे. आज संत थोमा आपणासमोर एक आदर्श म्हणून आहे. थोमा श्रध्दाहीन होता परंतू प्रभू येशूच्या स्पर्शाने प्रेरित होऊन तो ख्रिस्त-शब्दांचा प्रचार करणारा झाला. संत थोमामुळे अनेक श्रध्दाहीन श्रध्दावंत झाले.
संत थोमाप्रमाणे आपण सुध्दा श्रध्दावंत होऊन व परमेश्वराच्या सानिध्यात राहून दुस-यांना चांगले जीवन जगण्यास मदत करायला पाहिजे. आपली श्रध्दा, आपला विश्वास व आपले प्रेम जर परमेश्वरावर दृढ असेल तर आपण पुनरूत्थित ख्रिस्ताचे खरे अनुयायी ठरू व तसेच आपण सदैव ख्रिस्ताच्या वचनात चालून दुस-यांना त्याच्या प्रेमाचा स्पर्श करण्यास मदत करावी म्हणून ख्रिस्ताकडे प्रार्थना करू या.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभो, आमची श्रध्दा दृढ कर!
१) आपले परमगुरू पोप फ्रान्सिस, बिशप्स, धर्मगुरू आणि व्रतस्थ लोकांनी त्यांच्यावर सोपवलेल्या जबाबदा-या पार पाडाव्या व लोकांना दैवी दयेचा अनुभव घेण्यास मदत करावी व लोकांचा विश्वास ख्रिस्तावर दृढ करण्यास त्यांस मदत करावी, म्हणून आपण प्रभू चरणी प्रार्थना करू या.
२) जे लोक दुःखी, कष्टी व चिंताग्रस्त आहेत, त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख परिहार करणा-या स्पर्शाचा अनूभव यावा व जे लोक आजारग्रस्त आहेत त्यांना चागंले आरोग्य लाभावे, म्हणून आपण प्रभू चरणी प्रार्थना करू या.
३) सर्व सरकारी नेत्यांनी आणि अधिका-यांनी सत्याने आणि न्यायाने राज्यकारभार करून लोकांना शिक्षण, रोटी, कपडे आणि चांगले राहणीमान देण्यास प्राधान्य द्यावे जेणेकरून ते निस्वार्थीपणे सेवा करण्यास समर्थ होतील म्हणून आपण प्रभू चरणी प्रार्थना करू या.
४) भारतातील सर्व युवकांना ज्ञानाची व बरे-वाईटातील भेद ओळखण्याची देणगी प्रभूने दयावी, त्यांच्या जीवनात ख्रिस्त प्रकाश हा त्यांचा मार्गदर्शक आणि रक्षक होऊन त्यांच्याबरोबर राहावा, म्हणून आपण प्रभू चरणी प्रार्थना करू या.
५) आपल्या खाजगी व वैयक्तिक हेतूसाठी आपण प्रभू चरणी प्रार्थना करू या.