Monday, 14 April 2014

Reflections for Homily By:- Botham Patil.











पुनरुत्थान रविवार 





जागरण विधी







दिनांक: १९/०४/२०१४
पहिले वाचन: उत्पत्ती १:१-२,२
दुसरे वाचन: उत्पत्ती २२:१-१८
तिसरे वाचन: निर्गम १४:१५-१५:१
चौथे वाचन: यशया ५४:५-१४
पाचवे वाचन: यशया ५५:१-११
सहावे वाचन: बारुख ३:९-१५.३२-४:४
सातवे वाचन: यहेज्केल ३६:१६-२८
आठवे वाचन: रोमकरांस पत्र ६:३-११
शुभवर्तमान: मत्तय २८:१-१० 

आजच्या ह्या विधीचे चार भाग आहेत:
पहिला भाग: प्रकाश विधी- पुनरुत्थित येशू जगाचा प्रकाश आहे हे आपण घोषीत करतो.
दुसरा भाग: प्रभुशब्दविधी- येथे जुन्या व नवीन करारातील निवडक वाचने, जगाचा सुरूवातीपासून देवाने मानवावर प्रेमाची वर्षाव केली, त्याची आपणाला आठवण करून देतात.
तिसरा भाग: पाण्याला आशीर्वाद- येथे बाप्तिस्म्यासाठी लागणा-या पाण्याला आशीर्वाद दिला जातो. पुनरुत्थानाचे पहिले गोड फळ म्हणजे बाप्तिस्मा. ख्रिस्तामध्ये आपला बाप्तिस्मा होणे हा देवाचा अनन्य साधारण आशीर्वाद आहे.
चौथा भाग: ख्रिस्तशरीर स्विकारविधी- येथे आपण ख्रिस्तशरीर स्विकारविधी साजरा करतो. स्वर्गीय भोजनाची चव ह्या ठिकाणी आपण घेतो.           
प्रास्ताविक:
प्रिय ख्रिस्ती मित्रांनो, या पवित्र रात्री आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने मृत्यूवर विजय मिळविला. या शुभप्रसंगी ख्रिस्तसभा सा-या जगातील तिच्या मुलांना जागरण व प्रार्थना करण्यासाठी एकत्र बोलावित आहे. हा प्रभूच्या वल्हांडणाचा दिवस आहे. प्रभूचे शब्द ऐकून व त्याची दिव्य रहस्ये साजरी करून त्याच्या मृत्यूचे व पुनरुत्थानाचे आपण पुण्यस्मरण केले तर त्याच्या मरणावरील विजयात आपणाला खात्रीपूर्वक सहभाग मिळेल व त्याच्याबरोबर शाश्वत जीवन जगता येईल.  

सम्यक विवरण:
पार्श्वभूमी:
इंग्रजीमध्ये विजील (vigil, जागरण, पहारा) ह्याचा अर्थ होतो वॉच (watch, लक्ष देणे). लष्करामध्ये पहारेकरी लष्करी छावणीवर नेहमी लक्ष ठेवतात किंवा पहारा देतात. काही वर्षाअगोदर प्रत्येक गावामध्ये दिवसा अन् रात्री आळीपाळीने रखवालदार ठेवला जाई जेणेकरून गावाचे रक्षण होईल अथवा अनपेक्षितरित्या शत्रू गावावर हल्ला करून तो गाव आपल्या ताब्यात घेत असत.
ख्रिस्तावर विश्वास ठेवाणारा पहिला समुदाय प्रत्येक मोठ्या सणाच्या संध्याकाळपासून संपूर्ण रात्रभर जागरण करत असे परंतु हे जागरण भीतीमुळे किंवा कशाचाच पहारा करण्यासाठी नव्हते तर उलट ते कोणाच्यातरी येण्याची आशेने व उत्कंठतेने वाट पाहत असत. ज्याची ते वाट पाहत तो व्यक्ती म्हणजे येशू ख्रिस्त होय. ख्रिस्ती समुदाय एकत्र जमून संपूर्ण रात्रभर पवित्र शास्त्र वाचण्यात, त्याचा खुलासा करून त्यावर मनन-चिंतन करण्यात व प्रभूची प्रार्थना व स्तुती-आराधना करण्यात घालवत असत व हे जागरण पहाटे ख्रिस्ताच्या बलिदानाच्या आठवणीने म्हणजेच ख्रिस्तयागाने संपवत असत.
वर्षातील सर्वात महत्वाचं जागरण ते येशूच्या पुनरुत्थानाच्या दिवशी करत असत, त्याला ‘पास्काच जागरण’ म्हणून ते संबोधित असत. ख्रिस्ती समुदायाने हे नाव आणि त्याची तारीख यहुदी लोकांच्या वल्हांडण सणावरून घेतली आहे परंतु याहुद्यांपेक्षा ख्रिस्ती जनतेला हा सोहळा सखोल अर्थाचा व अधिक महत्वाचा आहे. यहुद्यांसाठी वल्हांडण म्हणजे परमेश्वराच्या दूताने मिसर देशातील घरांना ‘ओलांडून जाणे’ आणि यहुद्यांची घरे सुरक्षित ठेवून मिसर देशात जन्मलेल्या माणसांपासून तर गुराढोरांपर्यंत प्रथमवत्स्याचा वध करणे तसेच फारोच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन परमेश्वराने कबूल केलेल्या देशात निघून जाणे. परंतु ख्रिस्ती लोकांसाठी वल्हांडण म्हणजे येशूची मरणातून पुनरुत्थानाकडे वाटचाल, जणूकाही तिमिरातून तेजाकडे आणि दु:खातून-सुखाकडे. ह्याच घटनेमुळे प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती मरणातून पुनरुत्थानाकडे व पापातून नवीन जीवनाकडे वाटचाल करतो.

शुभवर्तमान:
यहुदी लोक मृतांना काळजीपूर्वक पुरत असत. मृतांना कपड्यामध्ये कश्याप्रकारे गुंडाळायचे, विशेषप्रकारचा मलम कसा वापरावा जेणेकरून शरीराचा –हास होण्यापासून किंवा सडण्यापासून बचाव कसा करता येईल हे सर्वकाही ते मिसरवासियांकडून (इजिप्तच्या लोकांकडून) शिकलेले होते. श्रीमंत लोक फार मोठी रक्कम खर्च करून त्यांच्या घरच्यांना पुरण्यासाठी हे सर्वकाही करत असत.
येशू ख्रिस्त गरीब होता, त्याच्याकडे अशाप्रकारची उत्तरक्रिया करावयास पैसे नव्हते, पुरण्यासाठी त्याच्याकडे स्वतःची कबर देखील नव्हती परंतु शुभवर्तमान सांगते की निकदेमस नावाच्या श्रीमंत माणसाने (जो येशूचा गुपीत अनुयायी होता: योहान ३:१-२१) सुमारे शंभर रत्तल मिश्रण आणले जेणेकरून यहुद्यांच्या उत्तरक्रियेच्या रितीप्रमाणे येशूची उत्तरक्रिया होईल (योहान १९:३९). ज्यादिवशी येशू मरण पावला तो शुक्रवार होता आणि त्याची उत्तरक्रिया करावयास त्यांच्याकडे पुरेसा वेळ नव्हता कारण (वल्हांडण सणाच्या) तयारीचा दिवस सुरु होणार होता (लूक २३:५४, मार्क १५:४२) आणि अश्याप्रकारचे कोणतेही कामे करण्याची नियमशास्त्रानुसार परवानगी नव्हती (निर्गम १६:२३, २०:८, ३१:१४, अनुवाद ५:१२), म्हणून ते तसेच घाईमध्ये परंतु पुन्हा शब्बाथ संपल्यानंतर येऊन नीट पुरण्याच्या आशेने येशूला कपड्यामध्ये गुंडाळून जातात.
शब्बाथानंतर पहिल्याच दिवशी म्हणजेच ‘सूर्याची पहिली किरणे दिसताच’ भल्या पहाटे स्त्रिया कबरेवर जाण्यासाठी निघतात, परंतु तेथे पोहचताच त्यांना कबर रिकामी सापडते. येशू पुनरुत्थित झाला आहे हे त्या कबरेवर बसलेला दूत त्यांना सांगतो व कशाप्रकारे येशू ख्रिस्ताने त्याचे दु:खसहन, मरण व पुनरुत्थान ह्याविषयी सांगितले होते व त्याची पूर्तता कशी झाली हे त्यांच्या मनी आणुन दिले (मत्तय १६:२१, १७:२३, २०:१९, २६:३२, लूक २४:७). हे दृश्य येथेच संपत नाही. त्या स्त्रिया परतत असताना येशू त्यांना दर्शन देतो. काय हा योगायोग! कारण ज्या स्त्रिया येशूबरोबर नेहमी असत, त्याच स्त्रिया येशूच्या क्रुसाजवळ त्याच्या मरणावेळी उभ्या होत्या (मत्तय २७:५६), जेव्हा येशूला थडग्यात ठेवले त्या वेळेस देखील त्या येशूबरोबर होत्या (मत्तय २८:७) आणि आता त्याच्या पुनरुत्थानाच्या त्या साक्षीदार बनतात. जे काम दूताने त्यांना सांगितले होते त्यावर येशू शिक्कामुहूर्त करतो, ते म्हणजे, ही शुभवार्ता स्वत:पुर्ताच न ठेवता इतरांना देखील सांगा (मत्तय २८:७, २८:१०).

येशूच्या पुनरुत्थानाची सूचकता किंवा अर्थपूर्णता:
 (१).     पुनरुत्थान सिद्ध् करते की येशू देवाचा पुत्र होता: येशू म्हणाला होता की ‘कोणालाही जीवन देण्याचा आणि तो घेण्याचा अधिकार त्याला आहे’ (योहान १०:१७-१८). 
(२). पवित्र ग्रंथात असलेल्या सत्याची पुष्ठता करते (सिद्ध् करते): जुन्या करारात आणि येशूच्या शिकवणुकीत येशू पुनरुत्थानाविषयी अचूक शिकवण देतो (स्त्रोत्रसंहिता १६:१०, ११०:१). जर येशू कबरेतून बाहेर आला नसता तर धर्मग्रंथ किंवा पवित्रग्रंथ खोटा ठरला असता.
(३).  येशूचे पुनरुत्थान, आपले पुनरुत्थान निश्चित करते: येशू मरण पावला व पुन्हा उठला, त्याचप्रमाणे आपणदेखील त्याच्याबरोबर उठविले जाऊ( १ थेस्सलनिकाकरांस पत्र ४:१३-१८). ख्रिस्ती श्रद्धा ही येशूच्या पुनरुत्थानावर बांधली आहे. जर आपण पुनरुत्थान वगळले, तर आपणाकडे काहीच आशा उरत नाही.
(४). भविष्यात होणा-या न्यायाच्या हे प्रमाण (पुरावा) आहे: त्याने असा एक दिवस नेमला आहे की, ज्या दिवशी तो आपण नेमलेल्या मनुष्याद्वारे जगाचा न्यायनिवाडा नीतिमत्वाने करणार आहे, त्याने त्याला मेलेल्यांतून उठवून ह्याविषयीचे प्रमाण सर्वांस पटविले आहे (प्रे. कृत्ये १७:३१).
(५). ख्रिस्ती जीवन जगण्यास सामर्थ्य/ शक्ती देते: आपण आपल्या स्वतःच्या बळावर परमेश्वरासाठी जगू शकत नाही परंतु आपण स्वीकारलेल्या त्याच्या (येशूच्या) मरणातील बाप्तीस्म्याने आपण येशुमध्ये पुरले जाऊ व त्याचा पुनरुत्थानाने परमपित्याची इच्छा व त्याचा गौरव आपल्या जीवनाद्वारे इतरांस दाखवू शकू ( रोमकरांस पत्र ६:४).                           
बोधकथा:
. एका शाळेमध्ये येशूच्या पुनरुत्थानावर एक छोटीशी नाटीका करावयाची होती आणि ह्यासाठी त्यांची जोरदार तयारी चालू होती. सर्व मुलांना चांगली पात्र मिळाली होती, कोणी येशू, कोणी दूत तर काहीजण स्त्रिया बनणार होते. परंतु छोट्या जॉनीला तेवढे खास काही पात्र देण्यात आले नव्हते. त्याला फक्त कबरेच्या तोंडावर दगड म्हणून उभे रहावयास सांगितले होते.
नाटक संपल्यानंतर जॉनीचे मम्मी-पप्पा तेवढे खूष नव्हते. ते आपला नाराज चेहरा करून गाडीत बसले होते परंतु जॉनी गाडीच्या मागच्या सीटवर अगदी आनंदाने उड्या मारत होता. थोडा वेळ सहन केल्यानंतर त्याच्या आईवडिलांनी त्याला विचारले की, नाटकामध्ये तुला काही महत्वाचे पात्र दिलेले नव्हते तरीपण ह्या छोट्याश्या पात्रामुळे तू इतका आनंदी कसा?  ह्यावर छोटासा जॉनी उत्तरला, छोटे का होईना, पण माझ्या त्या कबरेवरच्या तोंडावरून सरकण्यामुळेच येशू त्या कबरेतुन बाहेर येऊ शकला नाहीतर येशू तेथेच राहून गेला असता आणि जे पूर्ण व्हायचे होते ते अर्धेच राहून गेले असते.  

. एके दिवशी एक अन्य धर्मीय व्यक्ती एका ख्रिस्ती माणसाला म्हणाली, शवपेटीवरून आपणास माहित पडते की इतिहासामध्ये एखादी महान व्यक्ती होऊन गेली कारण तिचे शरीर त्या शवपेटीत आहे. पण जेव्हा तुम्ही ख्रिस्ती येरुशलेमला जाता तेव्हा तेथे तुम्हाला फक्त रिकाम्या कबरेशिवाय काहीच सापडत नाही.
आभारी, ख्रिस्ती व्यक्ती उदगारली, जे काही तू म्हणतोस ते एकदम सत्य आहे. ही रिकामी कबर जी आपणास बघावयास मिळते त्यावरून स्पष्ट होते की आम्ही जीवंत झालेल्या येशूची सेवा व आराधना करतो व त्याला मृतांमध्ये शोधीत नाहीत. 

मनन चिंतन:
रात्र आणि दिवस ह्यांच जसं नातं आहे तसं गुडफ्रायडे आणि इस्टर ह्या दोन दिवसांचं नातं आहे. रात्रीनंतर निश्चितपणे पहाट होत असते तशीच गुडफ्रायडेच्या अंधारानंतर इस्टरची मंगल पहाट फुटत असते. किंबहुना इस्टरची सुंदर पहाट होण्यासाठी गुडफ्रायडेच्या रात्रीची आवश्यकता आहे. आपल्या श्रद्धेनुसार सत्य हे कधीच कबरेत राहू शकत नाही. असत्याची सर्व बंधने तोडून सत्य हे आज प्रभू येशू ख्रिस्ताच्या रुपात पुनरुत्थित झाले आहे. आपल्या पुनरुत्थानाद्वारे प्रभू ह्या जगाच्या स्थल-काल मर्यादेपलीकडे जातो. एकाच वेळी तो अनेक ठिकाणी, अनेक लोकांना दृष्टीस पडतो व आम्हासाठी जीवनदायक आत्मा होतो. हा पवित्र आत्मा आपणांस ख्रिस्ताप्रमाणे देवपित्याची लेकरे करतो. पूर्ण अर्थाने आपणास 'ख्रिस्ती' करतो. यामुळे आपले ख्रिस्ती जीवन हे गुडफ्रायडेला थांबत नाही. मृत्यू हा ख्रिस्ती जीवनाचा पूर्णविराम नसुन तो एका ख-या नवजीवनाचा प्रारंभ आहे. तेंव्हा गुडफ्रायडेला अर्थ आहे तो इस्टरच्या प्रकाशात, पुनरुत्थित प्रभूच्या प्रकाशात, म्हणूनच पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्त हा आदि आणि अंत आहे, प्रारंभ आणि शेवट आहे. आपल्या जीवनाचा पाया आणि कळस आहे. आजचा दिवस हा आम्हा सर्व श्रद्धावंतासाठी एक आनंदाचा दिवस आहे.
अनेक वेळा जीवनातील दु:खभोग, वेदना, अरिष्टे, संकटे, एकाकीपणा यामुळे आम्ही निराश आणि हतबल होतो. सर्व आशा गमावून बसतो. हे चित्र बदलण्याची किमया प्रभू येशूने केली. आपल्या पुनरुत्थानाने त्याने वधस्तंभालाच अर्थपूर्ण केले. म्हणूनच ख्रिस्ताच्या पुनरुत्थानावर श्रद्धा ठेवणा-यांना निश्चितच भविष्यात आशा आहे. ह्या आशेच्या किरणामुळेच निराशेतून आशेकडे, अपयशातून यशाकडे, दु:खातून सुखाकडे, असत्याकडून सत्याकडे मार्गक्रमण करण्यास सामर्थ्य प्राप्त होते. पराभूत दृष्टीने जीवनाकडे बघण्यापासून व वैफल्यग्रस्त होण्यापासून आपला बचाव करते. कारण ख्रिस्ताने पुनरुत्थित होऊन जगावर, मृत्यूवर आणि सैतानावर संपूर्णपणे विजय मिळविलेला आहे.    
पण खरोखरच येशू ख्रिस्त मरणातून उठला का? इतिहास आपणाला शिकवतो की येशू ख्रिस्त नावाचा एक व्यक्ती इतिहासामध्ये होऊन गेला, विज्ञानही ही सिद्ध करते परंतु तो मरणातून खरोखरच उठला का हा मोठा प्रश्न अनेकजणांसमोर उभा राहतो. काहीक वेळेला आपल्याला विचार देखील आला असेल की जर ख्रिस्त थडग्यावरील पहारेक-यांच्या उपस्थितीत किंवा त्याला पहावयास गेलेल्या स्त्रीयांसमोर पुनरुत्थित झाला असता तर किती प्रश्न सुटले असते. परंतु रिकामे थडगे, येशूने दिलेली दर्शने आणि शिष्यांना आलेल्या नवजीवानाच्या अनुभवावरून ख्रिस्ताचे पुनरुत्थान सिद्ध होते. येशूच्या पुनरुत्थानानंतर येशूने वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या लोकांना दर्शन दिले हे बायबलमधील प्रसंगच येशू जिवंत झाल्याची आपणाला साक्ष देतात:
(!) मग्दालीया मरीया (मार्क १६:९, योहान २०:१४).
(२) अम्माऊस वाटेवर दोन शिष्य (मार्क १६:१२, लूक २४:१३-१५).
(३) पेत्र(लूक २४:३४, १करिंथ १५:५).
(४) दहा शिष्य वरच्या खोलीत असताना: थोमा गैरहजर (योहान २०:१९).
(५) अकरा शिष्य वरच्या खोलीत असताना: थोमा हजर (योहान २०:२६, लूक २४:३६, मार्क १६:१४).
(६)  तिबिर्याच्या समुद्राजवळ शिष्यांस दर्शन (योहान २१:१)
(७) अकरा शिष्यांस डोंगरावर दर्शन (गालील) (मत्तय २८:१६-२०)
(८) पाचशेपेक्षा अधिक जणांस दर्शन ( १करिंथ १५:६)
(९) याकोब ( १करिंथ १५:७)
(१०)  सर्व प्रेषितांना ( १करिंथ १५:७)
(११) स्वर्गरोहणावेळी (मार्क १६:१९, लूक २४:५०, प्रे. कृत्ये १:३)
(१२) सौल (पौल) दिमिष्काच्या वाटेवर असताना (प्रे. कृत्ये ९:३-८, १करिंथ १५:८, १करिंथ ९:१)

ख्रिस्त मेलेल्यातून उठला आणि आजही तो आपल्यामध्ये जिवंत असून कार्यरत आहे. ज्यांना ह्या जिवंत ख्रिस्ताचा अनुभव झालेला आहे, त्यांनी देव अनुभवलेला आहे. मी त्या पुनरुत्थित ख्रिस्ताचा अनुभव घेतला आहे का? की मी अजूनपर्यंत अविश्वासाच्या अंधारात रेंगाळत आहे? जीवनातील दु:खामुळे, संकटांमुळे आणि अडी-अडचणीमुळे अजूनही पुनरुत्थित येशूवर विश्वास ठेवायला संकोच दाखवत आहे का? येशू ख्रिस्ताचे दर्शन ज्याप्रमाणे वेगवेगळ्या व्यक्तींना लाभले त्याप्रमाणे आपल्यालादेखील हुबेहूब प्रत्यक्षात होईल असे नाही, परंतु खचून न जाता पुनरुत्थित येशूवर विश्वास ठेवू या कारण आपण जरी चुकलो असू तरी येशू आपणाला माफ करतो, पाप जरी केले असले तरी तो आपणाला क्षमा करतो. कारण शुभवर्तमानच आपणाला सांगते: की ज्या शिष्यांनी येशूला सोडून दिले, पेत्र ज्याला येशूने खडक म्हटले त्याने येशूला तीन वेळा नाकारले, त्या सर्वांना येशू सोडत नाही किंवा नकारातही नाही उलट त्यांना भाऊ संभोधून आनंदाची शुभवार्ता त्यांना देण्यासाठी स्रियांना घाईने पाठवतो (मत्तय २८:१०). ज्याप्रमाणे येशूने मरणावर विजय मिळविला त्याचप्रमाणे आपणदेखील आपल्या दररोजच्या जीवनात येणा-या मरणावर विजय मिळवूया म्हणजेच ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाची व आनंदाची शुभवार्ता संपूर्ण जगाला घोषीत करू शकू.

(टीप: पुनरुत्थानाच्या रात्रीच्या मिस्सावेळी पश्चातापविधी, प्रस्तावना व श्रद्धावंतांच्या प्रार्थना वगळण्यात येतात.)


तुम्हा सर्वांना पास्काच्या सणाच्या हार्दीक शुभेच्या.





No comments:

Post a Comment