Reflections for Homily By: John Mendonca
आज्ञा गुरुवार
“माझ्या स्मरणार्थ हे करा”
दिनांक: १७/४/२०१४.
पहिले वाचन: निर्गम १२:१-८,११-१४.
दुसरे वाचन: १ करिंथकरांस पत्र ११:२३-२६.
शुभवर्तमान: योहान १३:१-१५.
प्रस्तावना:
आजपासून पवित्र आठवड्यातील पवित्र ‘त्रिदिनाला’(triduum): १)पवित्र आज्ञा गुरुवार, २)शुभ शुक्रवार आणि ३)पवित्र शनिवार ह्या तीन
दिवसांच्या महत्वाच्या उपासनेस सुरुवात होते. आजच्या उपासनेतील तीन अत्यंत महत्वाच्या
घटना म्हणजे धर्मगुरूपदाची स्थापना, पवित्र मिस्स्साबलिदानाची स्थापना आणि प्रभू
येशूने आपणास दिलेला सेवेचा कित्ता(महामंत्र). आजच्या पहिल्या वाचनात आपण यहुदी लोकांनी आपल्या सुटकेच्या स्मरणार्थ साजरा केलेल्या वल्हांडण
सणाविषयीचे वर्णन ऐकतो. दुस-या वाचनात संत पौल पवित्र मिस्स्साबलिदानाबद्दल आपले
विचार मांडून आपणास आठवण करून देतो की, ज्यावेळी आपण पवित्र मिस्स्साबलिदानात भाकर व रक्त भक्तीभावाने स्वीकारतो त्यावेळी आपण प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करतो.
तसेच
आजच्या पवित्र शुभवर्तमानामध्ये येशू ख्रिस्ताने शिष्यांबरोबर अखेरचे भोजन घेऊन
धर्मगुरूपदाची आणि पवित्र मिस्स्साबलिदानाची स्थापना कशी केली ह्या दोन अतिशय
महत्वपूर्ण घटनांचा संदर्भ येतो. दु:खसहानापूर्वी आपल्या शिष्यांबरोबर अखेरचे भोजन
घेत असताना येशूने आपल्या शिष्यांचे पाय धुतले आणि त्यांना सेवेची आज्ञा दिली. ही
ख्रिस्ताची आज्ञा आपण सुद्धा आपल्या दैनंदिन जीवनात सातत्याने आचरणात आणावी म्हणून
आपण ह्या उपासनेमध्ये विशेष प्रार्थना करूया.
पहिले वाचन: निर्गम १२:१-८,११-१४.
पहिल्या
वाचनात, यहुदी लोकांनी आपल्या सुटकेच्या स्मरणार्थ साजरा करावयाचा वल्हांडण
सणाविषयीचे वर्णन सादर केले आहे. परमेश्वर आपणाबरोबर आहे व आपल्या शत्रुंपासून तो
आपल्याला सोडवितो याची साक्ष हे वाचन आपणास देते. वल्हांडण सणाचे नियम हे कौटुंबिक
प्रितीभोजनावर आधारलेले आहे. एकमेकांच्या सुख-दु:खात सहभागी होऊन मुक्तीचा अनुभव
घेण्यासाठी हा सण समाजाच्या एकोप्यावर भर देतो.
दुसरे वाचन: १ करिंथकरांस पत्र ११:२३-२६.
संत
पौलाने प्रभूभोजनाचे महत्व व गांभीर्य करिंथ येथील मंडळीच्या नजरेस आणले. प्रभू
येशूने प्रीतीभोजनाद्वारे स्थापिलेल्या नव्या कराराविषयी संत पौल आपणास आठवण करून
देत आहे.
शुभवर्तमान: योहान १३:१-१५.
सम्यक विवरण:
“वल्हांडण
सणापूर्वी असे झाले की, येशूने आता ह्या जगांतून पित्याकडे जाण्याची आपली वेळ आली
आहे हे जाणून ह्या जगांतील स्वकीयांवर त्याचे जे प्रेम होते ते त्याने शेवटपर्यंत
केले”(योहान १३:१). ह्या वचनातून आपणास पाय धुण्याचे खरे
महत्व काय आहे ते समजून घेण्याची दिशा मिळते; आपली वेळ आल्याची येशूला झालेली सखोल
जाणीव आणि त्याचे स्वतःच्या लोकांवरील असलेले त्याचे गाढ प्रेम आपणास दिसून येते(योहान १३:२ ह्या वचनावरून शिमोनाचा मुलगा यहुदा इस्कयौत द्वारे सैतानाने
येशूविरुद्ध चालविलेली कारवाई स्पष्ट होते); तसेच येशूच्या कार्याचा उगम व भवितव्य
स्वर्गीय असल्याची येशूची प्रबळ खात्री आपणास दिसून येते.
सेवाकार्याच्या संपूर्ण काळात येशू आणि सैतान ह्यांच्यात असलेला
प्रत्यक्ष भेद(लूक ४:१-१२) आता शिगेस पोचण्याचा समय आला होता. पित्याचे प्रेम आणि
सैतानाचे बेत व मनसुबे यामधील तीव्र भिन्नता येथे तुलनेने दाखवली गेली आहे.
योहान १३:३ वरून आपणांस कळते की येशूला आपल्या शोकाची
घटका पित्याच्या हाती आहे हे माहित होते. पित्याची इच्छा पूर्ण करण्याच्या
पुन्हापुन्हा केलेल्या येशूच्या दाव्याशी हे सुसंगतच आहे. ह्या जाणीवेतुनच येशू शिष्यांचे
पाय धुतो. आपली बाह्यवस्त्रे काढून ठेवणे आणि रुमाल घेऊन कमरेस बांधणे(योहान १३:४)
हे स्वतःला दास केल्याचे सूचित करते. असा वेष करणे हे यहुदी आणि ग्रीक हेल्लेणी लोकांना
रुचण्यासारखे नव्हते.
जेव्हा येशू शिमोन पेत्राकडे आला
तेव्हा तो त्याला म्हणाला, “प्रभुजी, आपण माझे पाय धुता
काय?”(योहान १३:६). शिमोन
पेत्राचा हा प्रश्न नव्या करारातून आपणाला पेत्राचे असलेले वर्तन व प्रतिक्रिया ह्याच्याशी
सर्वस्वी सुसंगत आहे असे दर्शवते. त्याचे प्रश्न विचारणे, ठासून नकार देणे, व लगेच
उतावळ्यापणाने मन बदलणे त्यांच्या स्वभावाला अनुरूप आहे.
पाय धुण्याचा वृत्तांतामधून शिष्यांचा
अगदी गोंधळ उडाल्याचे स्पष्ट दिसते. परंतू ह्या गोंधळाची सांगता येशूने पेत्राला
दिलेल्या उत्तरावरून होते, “मी तुला न धुतले तर
माझ्याबरोबर तुला वाटा नाही”(योहान; १३:४). पाय धुणे हे
केवळ उदाहरण नसून ते एक आदर्श होते असे हे वचन १० सांगते. प्रभूच्या राज्यात
शिष्यांना सहभागी होता यावे यासाठी हे एक शासन होते. अशाप्रकारे येशूने पहिल्यांदा
पाय धुण्याचा संबंध शुध्दता करण्याकडे लावला होता.
आपल्याच प्रश्नाचे उत्तर देताना (योहान १३:१२) येशूने प्रथम
त्यांच्याशी असलेल्या आपल्या स्वतःच्या नात्याचा (गुरू-शिष्य) उल्लेख केला व नंतर
आपण केलेल्या कृत्यांचा उलगडा करत येशूने आपल्या शिष्यांस म्हटले, “मी प्रभू व गुरू असूनही जर तुमचे पाय धुतले तर तुम्हीही
एकमेकांचे पाय धुतले पाहिजेत”(योहान १३:१४).
बोधकथा:
१. इटलीतील लान्सियानो शहरात एक धर्मगुरू मिस्सा अर्पण करीत
होता. भाकर व द्राक्षरस आर्शिवादित करीत असताना त्याच्या मनात शंका आली की ही भाकर
व द्राक्षरस जे मी आर्शिवादित करीत आहे त्याचे रूपांतरण खरोखर येशूच्या पवित्र
शरीरात व रक्तात होते का? ह्या शंकेस्तव धर्मगुरूंनी दोनदा भाकर व द्राक्षरस आर्शिवादित
केले आणि काय आश्चर्य! भाकरीचे रुपांतर मांसात झाले व द्राक्षरसाचे येशूच्या
रक्तात झाले. ह्या येशूच्या रुपांतरीत मांसावर व येशूच्या रक्तावर खूप संशोधन
करण्यात आले. परंतु शेवटचे संशोधन १८ नोव्हेंबर १९७० रोजी लेनोली व बारतोली ह्या
दोन शाश्त्रज्ञानी केले व आपल्या संशोधनाचा अहवाल २१ मार्च १९७१ रोजी
सादर केला; तो खालीलप्रमाणे: ते रक्त व मांस हे खरे आहे. ते एकाच माणसाचे रक्त व मांस आहे. त्या मांसाचे
तंतू हे हृदयाचे आहेत. हे जिवंत माणसाचे रक्त व शरीर आहे.
२. काही वर्षापूर्वी घडलेली एक सत्यकथा. एकदा एक परदेशी
श्रीमंत माणूस मदर तेरेजा ह्यांना भेटण्यासाठी कलकत्त्यास मदरांच्या आश्रमात गेला.
त्यावेळी मदर तेरेजा एका आजा-याची सेवा करीत होत्या. त्या आजारी माणसाच्या घायाला
दुर्गंधी येत होती. त्यावेळी त्या श्रीमंत माणसाने मदर तेरेजांना म्हटले, ‘मला जर
कोणी लाखो रुपये दिले तरीही मी त्या माणसाची सेवा करणार नाही.’ मदर तेरेजा
उदगारल्या, ‘मला जर कोणी करोडो रुपये दिले तरी मी सुद्धा त्या आजारी माणसाची सेवा
करणार नाही. परंतु मी हे सगळं करते ते कवळ प्रभू येशू ख्रिस्तासाठी; आणि
त्याच्यावर व शेजा-यांवर असलेल्या प्रेमाखातीर.’
मनन चिंतनः
पवित्र आज्ञा गुरूवारी
प्रभू येशून ख्रिस्ताने १) पवित्र मिस्साबलिदान २) धर्मगुरूपद ह्या दोन महत्वपूर्ण
संस्कारांची स्थापना करून संपूर्ण जगाला बंधू प्रेमाची आज्ञा केली.
१)
पवित्र मिस्साबलिदानः
दोन हजार वर्षापूर्वी अशाच
एका रम्य सांयकाळी प्रभू येशूने आपल्या शिंष्यासमवेत भोजन घेतले. यहुदी समाजात
भोजनाप्रसंगी द्राक्षरस व भाकर ह्यांचे सेवन केले जाई. प्रभू येशूने ह्याच चिन्हांचा
आधार घेऊन पवित्र मिस्साबलिदानाची स्थापना केली. भाकर मोडून त्याने दुस-या दिवशी
कालवरी डोंगरावर घडणा-या चित्तथरारक नाट्याची कल्पना आपल्या शिष्यांना दिली.
क्रुसावर घळघळ वाहणा-या रक्ताचे थेंब त्याने द्राक्षरसाच्या रूपाने आपल्या
शिंष्यापुढे सादर केले आणि त्यामुळेच प्रत्येक वेळी जेव्हा आपण मिस्साबली अर्पण
करतो त्यावेळी कालवरीच्या घटनेचे आणि शेवटच्या भोजनाचे स्मरण करतो.
पवित्र मिस्साबलिदानाचा विधी हा ख्रिस्ती जीवनाचा पाया,
मध्यबिंदू आणि कळस मानला जातो. पवित्र मिस्साबली हा एक दीर्घ स्तुतीयज्ञ आहे. पूर्वी
स्तुतीगीत, स्त्रोतगीत आणि आल्लेलुया गाऊन आपण परमेश्वराची स्तुती करीत असतो.
संपूर्ण मिस्साबलीत देवाला गौरव दिला जातो. ख्रिस्ताच्या क्रुसावरील बलिदानाने
उपलब्ध होणारी पापक्षमा व तारणकृपा प्रत्येक पवित्र मिस्साबलिदानाच्या विधीमधून
आपल्याला मिळते. प्रत्येक पवित्र मिस्साबलिदानामध्ये संपूर्ण तनमयतेने सहभागी होऊन
पवित्र ख्रिस्तशरीराचे सेवन केल्यानंतर साक्षात ख्रिस्ताचेच दर्शन आपणास घडते.
पवित्र मिस्साबलिदान आपल्याला काटेरी वाटेवर चालण्यास, दुःखदायक प्रसंगाना सामोरे
जाण्यास, मोहावर आणि आपल्या पापमय वृत्तीवर विजय मिळविण्यास प्रभू परमेश्वराची शक्ती
प्रदान करत असतो म्हणूनच पवित्र मिस्साबलिदान एक अदभूत मार्ग आहे.
अंधाराकडून– प्रकाशकडे
जाण्याचा (नेणारा),
असत्याकडून- सत्याकडे
जाण्याचा,
पापमय वृत्तीकडून- पवित्र
जीवन जगण्याचा
निराशेकडून- आशेकडे
जाण्याचा
नरकाच्या वाटेवरून-
स्वर्गीय वाटेवर नेणारा हा मार्ग आहे.
२)
धर्मगुरू पदः
तू याजक युगायुगाचा,
जगतातूनी तुझ मी निवडलिले, देण्या शुभर्वाता सकला माझी!
‘धर्मगुरू पद हे प्रभू येशु ख्रिस्ताच्या अतिपवित्र
हृद्यातील प्रेमाचे प्रतिबिंब आहे’ असे उदगार
धर्मगुरूंचा आश्रयदाता संत जॉन मारी वियानी ह्यांनी काढलेले आहेत. धर्मगुरू पदाचे
पाचारण हे समर्पित सेवेद्वारे प्रभूच्या मिशन कार्यात सहभागी होऊन देव-राज्याची
प्रस्थापना करण्याचे पाचारण आहे. पवित्र ख्रिस्तसभेचे काही विशेष प्रेषितकार्य
करण्यासाठी काही सभासदांना खुद्द् देवाने पाचारण केले आहे. हे सेवक गुरूदीक्षा
विधीद्वारे आर्शिवादीत केले जातात व निवडले जातात. गुरूदीक्षेद्वारे मिळणा-या
पवित्र आत्माच्या कृपेमुळेच ख्रिस्तसभेतील सर्वांच्या सेवेसाठी ख्रिस्ताच्या
नावाने कार्य करण्याचे सामर्थ्य त्यांना मिळते. दीक्षित धर्मगुरू हा प्रमुख याजक
ख्रिस्त यांची जितीजागती प्रतिमाच असते.
व्रत्स्थ धर्मगुरूठायी हजर राहूनच ख्रिस्त स्वतः
ख्रिस्तसभेचे मस्तक, कळपाचा प्रमुख मेंढपाळ, तारणदायी बलिदानाचा प्रमुख याजक व सत्य
शिकविणारा गुरू म्हणून ख्रिस्तसभेची सेवा करीत असतो. ख-या अर्थाने लोकांची सेवा
करण्याच्या हेतूनेच खुद्द् येशूने आपल्या प्रेषितांना दिलेला अधिकार धर्मगुरूंना
असतो. ते धर्मगुरू पद पूर्णपणे ख्रिस्ताशी आणि जनमाणसांशी संबंधित असते. ते
संपूर्ण ख्रिस्तावर आणि त्याच्या अद्वितीय एकमेव याजकपणावर आधारलेले असते. ते
लोकांच्या कल्याणासाठी आणि ख्रिस्तसभेचे ऐक्य टिकवून ठेवण्यासाठी स्थापन केले आहे.
गुरूदीक्षेद्वारे धर्मगुरूंना मिळणारी पवित्र शक्ती केवळ येशू ख्रिस्त देत असतो.
दिव्यांचे कार्य असते अंधाराला नाहीसे करण्याचं; थंडगार वा-याचे
कार्य असते उकाडा कमी करण्याचे; फुलाचे कार्य असते सुगंध देण्याचा त्याचप्रमाणे
धर्मगुरूचे कार्य असते आशिर्वाद देण्याचे, आपल्या सेवामय जीवनाद्वारे लोकांना
ख्रिस्त देण्याचे, र्निजीव झालेल्यांना सजीव करण्याचे, ज्याच्याकडे समाजाने पाठ
फिरवलेली आहे अशा लोकांचे जीवन फुलविण्याचे व आशेचे बी पेरण्याचे कार्य धर्मगुरू करीत
असतात.
धर्मगुरू जन्मापासून ते मरणापर्यंत आपल्या सोबत असतात. मिस्साद्वारे
आपल्या बरोबर असतात. म्हणूनच ‘धर्मगुरू म्हणजे काय?’ ह्याचे वर्णन कवी सायमन
मार्टिन सुंदर रीत्या आपल्यासमोर मांडतात,
‘आपले दुःख काहीच
उघडे नाही करायचे|
लोकांचे सुख आपले
मानायचे| लोकांच्या आनंदात चेहरा हसता ठेवायचा|
आपले रडणे कुणाला
ऐकू जाऊ नये म्हणून आतच्या आत कोसळत राहायचे|
लोकांच्या गाण्यात
उच्च स्वराने गात राहायचे|
कधी अपार ऐकटेपणा
सभोवताली असते| तेव्हा आजुबाजुला कुणीचं नसते||
दुःख हलके
करण्यासाठी कुणी वेरोणिका नसते|
सायमन सिरोनिकर तर
कधीच भेटत नाही|
पाठीवर मायेचा
स्पर्श व्हावा म्हणून चर्चच्या भिंतीआड एकटाच थांबलेला असतो|
त्यालाच धर्मगुरू
म्हणतात, त्यालाच धर्मगुरू म्हणतात||
३) बंधुप्रेमाची आज्ञाः
‘करशील जे गरीबांसाठी होईल ते माझ्यासाठी,
दिले खावया भूकेल्याला, अन प्यायाला
तान्हेल्याला,
उघड्याला पांघरावयाला, केलेसी हे मजसाठी,
स्वर्गीचे सुख तुजसाठी.”
आपल्या अखेरच्या भोजनाद्वारे प्रभू
येशू ख्रिस्ताने आम्हाला आदर्श ख्रिस्ती सेवेचा परिपाठ घालून दिला आहे. आपल्या
विनम्र सेवेद्वारे त्याने आम्हांवरील आपल्या प्रेमाची परिपूर्ती केली आहे आणि आम्हांला
दाखवून दिले आहे की नम्रपणे कोणताही गाजावाजा न करता केलेली सेवा ही सर्वोतम सेवा
असते. त्याग, नम्रता आणि बलिदान तिचे अंगभूत घटक असतात. म्हणूनच प्रभू येशू
ख्रिस्त म्हणतो, ‘मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यावयास नाही तर सेवा करावयास आणि
पुष्कळांच्या पापांसाठी खडणी भरावयास या जगात आला आहे.’ प्रभू येशूने शिष्यांचे
पाय धुऊन आपणा सर्वांना सेवेचा उत्तम महामंत्र दिलेला आहे.
ह्या आधुनिक युगात बरेच इतरांसाठी
जगत नाही आणि इतरांसाठी मरत नाही. बरेच स्वतःसाठीच जगतात आणि स्वतःसाठीच मरतात. आपल्या
आजूबाजूला जे वृध्द आई-वडील, गोर-गरीब, दीन-दुबळे लोक आहेत अश्यांची सेवा करून
घ्यावयास फारच थोडे लोक आनंदाने पुढे येत असतात. त्यांच्या गरजां, इच्छा व आशाआकांक्षा
आपल्याला ख्रिस्ताने दिलेल्या सेवेची शिकवणुकीची आठवण करून देते.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: “हे ख्रिस्ता तुझ्याप्रमाणे चांगले सेवाकार्य करण्यासाठी
आम्हांला तुझी प्रेरणा आणि शक्ती दे.”
१. आपल्या ख्रिस्तसभेची धुरा वाहणारे आपले पोप, सर्व बिशप्स व सर्व धर्मगुरू आज धर्मगुरूपदाचा सोहळा साजरा करीत आहेत. प्रभू येशूप्रमाणे चांगले सेवाकार्य करण्याची प्रेरणा आणि शक्ती सर्व धर्मगुरूंना मिळावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.
२. पवित्र मिस्साबलिदानास आपल्या कुटुंबात महत्त्वाचे स्थान मिळावे व पवित्र ख्रिस्तशरीरात मिळणा-या येशूच्या कृपाचा व शांतीचा अनुभव आपणास यावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.
३. आपल्या धर्मग्रामातील धर्मगुरू/ धर्मगुरूंना त्यांच्या धार्मिक कार्यात येशूची प्रेरणा, कृपा आणि शक्ती मिळावी, त्याचप्रमाणे जे धर्मगुरू आजारी व वयस्कर आहेत त्यांना चांगले आरोग्य लाभावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.
४. या उपवास काळातील शेवटच्या दिवसात आपण पूर्ण मनाने व अंतकरणाने परमेश्वराकडे वळून आपल्या जीवनाद्वारे प्रेम व सेवा ही ख्रिस्ताची मुल्ये आपल्या कुटुंबात, समाजात पसरावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.
५. आपल्या धर्मग्रामातील सर्व लोकांच्या गरजा परमेश्वराने पूर्ण कराव्यात म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.
६. आता आपण थोडावेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक गरजांसाठी आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
१. आपल्या ख्रिस्तसभेची धुरा वाहणारे आपले पोप, सर्व बिशप्स व सर्व धर्मगुरू आज धर्मगुरूपदाचा सोहळा साजरा करीत आहेत. प्रभू येशूप्रमाणे चांगले सेवाकार्य करण्याची प्रेरणा आणि शक्ती सर्व धर्मगुरूंना मिळावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.
२. पवित्र मिस्साबलिदानास आपल्या कुटुंबात महत्त्वाचे स्थान मिळावे व पवित्र ख्रिस्तशरीरात मिळणा-या येशूच्या कृपाचा व शांतीचा अनुभव आपणास यावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.
३. आपल्या धर्मग्रामातील धर्मगुरू/ धर्मगुरूंना त्यांच्या धार्मिक कार्यात येशूची प्रेरणा, कृपा आणि शक्ती मिळावी, त्याचप्रमाणे जे धर्मगुरू आजारी व वयस्कर आहेत त्यांना चांगले आरोग्य लाभावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.
४. या उपवास काळातील शेवटच्या दिवसात आपण पूर्ण मनाने व अंतकरणाने परमेश्वराकडे वळून आपल्या जीवनाद्वारे प्रेम व सेवा ही ख्रिस्ताची मुल्ये आपल्या कुटुंबात, समाजात पसरावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.
५. आपल्या धर्मग्रामातील सर्व लोकांच्या गरजा परमेश्वराने पूर्ण कराव्यात म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.
६. आता आपण थोडावेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक गरजांसाठी आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment