Tuesday, 8 April 2014

Reflections for Homily By:- Suresh Alphonso.










झावळ्यांचा रविवार (पवित्र आठवडा)




दाविदाच्या पुत्राला होसान्नाप्रभूच्या नावाने येणारा तो धन्यवादित! ऊर्ध्वलोकी होसान्ना!





दिनांक: १३/४/२०१४.
मिरवणूक: मत्तय २१:१-१४.
पहिले वाचन: यशया ५०:४-७.
दुसरे वाचन: फिलिप्पैकरांस पत्र: २:६-११.
शुभवर्तमान: मत्तय २६:१४-२७,६६.

प्रस्तावनाः

आज ख्रिस्तसभा येशूच्या दुःखसहनाचा रविवार अथवा झावळ्यांचा रविवार साजरा करीत आहे. येशू ख्रिस्त हा राजांचा राजा होता म्हणून येरूशलेमेत लोक राजांच्या राजाला झावळ्याने मिरवणूक काढून त्याला मोठ्या उत्साहाने होसान्नाम्हणून त्याचा जयघोष करून त्याला मानवंदना देतात. आजच्या पहिल्या वाचनात आपण पाहतो की, यशया प्रवक्ता आपल्या दुःखाद्वारे ख्रिस्ताच्या दुःखसहनाची शेकडो वर्षे आधी पूर्व तयारी करतो आणि स्वतःच यातनामय ख्रिस्ताचा आवाज होतो. दुस-या वाचनामध्ये संत पौल आपणाला आपले ख्रिस्ती जीवन कशाप्रकारे आपण जगले पाहिजे ह्याविषयी फार मौलिक असे मार्गदर्शन करतो.
आजच्या शुभवर्तमानामध्ये संत मत्तय, येशू ख्रिस्ताचे संपूर्ण दु:खसहन व क्रुसावरील मरण हे देवाची मानवाच्या तारणाची योजना पूर्णत्वास नेण्यासाठी व शास्त्रलेख पूर्ण होण्यासाठी येशूला ठार मारण्याचा कट करण्यात आला ह्याचा वृत्तांत दिला आहे. म्हणूनच आजपासून ख्रिस्तसभा ह्या पवित्र आठवड्यात ख्रिस्ताच्या दुःखसहन, मरण व पुनरूत्थान ह्यावर मनन-चिंतन करण्यासाठी व ख्रिस्ताच्या दुःखसहनात सहभागी होण्यासाठी बोलावत आहे.

पहिले वाचन: यशया ५०:४-७.  

यशया ५०:४-७ हे तिसरे सेवक गीतआहे. पहिल्या गीतामध्ये सहनशील सौम्यता होती(यशया ४२:१-९). दुस-यामध्ये निष्फळ परिश्रमांतील वैफल्य निमूटपणे स्वीकारले होते(यशया ४९:४,७); आणि तिस-या गीतामध्ये सेवकाला दृष्टतेला आणि सक्रीय आकस यांना तोंड द्यावे लागत आहे. यशया प्रवक्ता आपल्या दुःखाद्वारे ख्रिस्ताच्या दुःखसहनाची शेकडो वर्षे आधी पूर्व तयारी करतो आणि स्वतःच यातनामय ख्रिस्ताचा आवाज होतो.  

दुसरे वाचन: फिलिप्पैकरांस पत्र: २:६-११.

     पौलाने हे पत्र रोम येथे तुरुंगात असताना इ.स. ६० मध्ये लिहिले. फिलिप्पैकरांच्या प्रीतीबद्दल व त्याच्याविषयी त्यांना असलेल्या कळकळीबद्दल पौल त्यांचे मनापासून आभार मानतो. ख्रिस्ती जीवन जगणे म्हणजे काय याचा अर्थ पौल स्वत:च्या जीवनावरून देतो. कारण मला तर जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हे लाभ आहे”(फिलिप्पै १:२१). ख्रिस्ती जीवन कसे जगावे याचे उत्कृष्ट वर्णन या पत्रात आढळते.
     येशू ख्रिस्ताच्याठायी असलेली चित्तवृत्ती ख्रिस्ताने आपल्या कृतीने दाखवली. ख्रिस्ताने देवत्वाचा अधिकार व मान बाजूला ठेवला; मनुष्याचा देह धारण करून त्याने स्वत:ला रिक्त केले; म्हणजेच मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले आणि मनुष्यप्रकृतीत प्रगट होऊन त्याने वधस्तंभावरचे मरण सोसले. प्रत्येकाने ख्रिस्ताची श्रेष्ठता ओळखावी व येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे प्रत्येकाने कबूल करावे म्हणून ही देवाची योजना होती.

सम्यक विवरणः

येरुशलेममध्ये प्रवेश:
येरुशलेम हे इस्रायलच्या राजधानीचे शहर होते. गालीलातून यात्रेकरूंचे थवेच्या थवे वल्हांडण सणासाठी पायी प्रवास करून येरुशलेममध्ये येत असत. प्रभू येशूने यहुदी लोकांच्या वल्हांडण सणाआधी जेव्हा यरुशलेम नगरात प्रवेश केला तेव्हा लोकांनी आपली वस्त्रे काढून आणि झाडांच्या डहाळ्या तोडून येशूच्या वाटेवर पसरविल्या आणि लोकांनी उत्स्फूर्तपणे येशूचे स्वागत करीत म्हटले, ‘दाविदाच्या पुत्राला होसान्नाप्रभूच्या नावाने येणारा तो धन्यवादित! ऊर्ध्वलोकी होसान्ना!’(मत्तय २१:१-११). होसान्ना या शब्दाचा अर्थ आमचे तारण कर असा आहे.
पवित्र शास्त्रात आपण वाचतो की, यरुशलेमातल्या त्या जयोत्सवानंतर येशू स्वस्थ न बसता आपल्या पित्याचे कार्य करू लागला:
येरूशलेमचे मंदिरः
     येरूशलेमचे मंदिर संपूर्ण पॅलेस्टाईनचे भूषण होते. त्या देवळामध्ये देशपरदेशातून लोक येत असत. यहुदी लोकांचे सगळ्यात मोठे असे हे तीर्थक्षेत्र होते. सालोमन राजाने देवाला अर्पण करण्यासाठी त्याकाळी लाखो रूपये खर्च केले. हे देऊळ बांधण्यासाठी सुमारे ७ वर्षे लागली होती. अशा ह्या मंदिराचे रूपांतर बाजारात झाल्याबद्दल ख्रिस्त ह्या देवापुत्रालाच नव्हे तर सर्वसामान्य माणसाला देखील सहन होणे शक्य नव्हते.
     त्याकाळी अशी परिस्थिती होती की, धर्माधिका-यांनी स्वतःच्या फायद्यासाठी मंदिरात अवतीभवती व्यापार सुरू केला होता. भाविकांनी अर्पणाच्या सर्व वस्तू आपल्याकडून विकत घ्याव्यात म्हणून त्यांनी मेंढरे, कबूतरे ह्यासारख्या प्राण्यांचा व वस्तूंचा बाजार भरविला होता. ख्रिस्ताने त्या सर्वांना तेथून हाकलून दिले व ते मंदिर शुध्द केले. माझ्या घराला प्रार्थनेचे घर म्हणतील”(यशया ५६:७), असे शास्त्रलेखात लिहिलेले आहे ह्याची येशूने लोकांना आठवण करून दिली आणि त्याने आणखी एका शास्त्रलेखाच्या शब्दांत त्यांच्यावर आरोप ठेवला की, “तुम्ही त्याची लुटारूंची गुहा केली आहे”(यिर्मया ७:११).
येरूशलेम नगरीचे शुध्दीकरणः
मंदिराचे शुध्दीकरण जितके प्रात्यक्षिक आहे तितकेच प्रतिकात्मक आहे. येरूशलेमला पवित्र नगरी म्हटले जाई. येरूशलेम हेच जणू परमेश्वराचे वस्तीस्थान होते. देवाची निवडलेली व आशीर्वादित केलेली प्रजा तेथे रहात होती. कराराचा कोश येरूशलेमला होता. अशा या येरूशलेममध्ये गुलामगिरी, भ्रष्टाचार, व अत्याचार, व्यभिचार ह्यांचा व्यापार भरला होता. लोकांच्या अशा पातकामुळे संपूर्ण येरूशलेममध्ये पापांची धुके पसरलेली होती. मंदिराचे शुध्दीकरण म्हणजे येरूशलेमचे शुध्दीकरण, त्यासाठी येशूने खंबीर भूमिका घेतली. लोकांना त्याने आपल्या कणखर वाणीने झोडून काढले व तारणाचा संदेश दिला. येरूशलेमची प्रजा ही पवित्र प्रजा आहे. त्यांनी पापांचा बाजार आपल्या नगरात भरवू नये व आपल्या ख-या देवाला टाकू नये. मंदिराच्या शुद्धीकरणाद्वारे प्रभू येशू येरुशलेम जनतेची शुध्दीकरण करत आहे.

वल्हांडणाचा सणप्रभूभोजन:
     इजिप्त देशामधून इस्त्राएल लोकांची गुलामगिरीतून सुटका आणि मरणापासून त्यांचे रक्षण व्हावे म्हणून वल्हांडण सणात एकएक कोंकरू घेऊन ते अर्पण करावे अशी आज्ञा केली होती(निर्गम १२:१-३०). नंतर राजाने सर्व लोकांस आज्ञा दिली की या कराराच्या ग्रंथांत लिहिले आहे त्याप्रमाणे तुम्ही आपला देव परमेश्वर याच्यापित्यार्थ वल्हांडण सण पाळा. असा वल्हांडण सण इस्त्राएलाचे शास्ते शासन करीत होते त्यांच्या काळापासून व इस्त्राएलाचे राजे व यहुदाचे राजे यांच्या कारकिर्दीत कधी पाळण्यात आला नव्हता; योशीच्या राजाच्या कारकीर्दीच्या अठराव्या वर्षी परमेश्वरापित्यार्थ येरुशलेमेंत वल्हांडण सण पाळण्यात आला”(२राजे २३:२१-२३). या महत्वपूर्ण घटनांचे स्मरण म्हणून वल्हांडण सण प्रतिवर्षी साजरा केला जात असे.
     २६:१७-३० शेवटले भोजन हे सर्व ऐतिहासिक संदर्भ व प्रतीके यांची पार्श्वभूमी असलेले हे वल्हांडणाचे भोजन होते. येशूच्या मरणाद्वारे या भोजनाला आता नवा अर्थ दिला जाणार होता. त्यामुळे पुढे हे भोजन ख्रिस्ती उपासनेतील प्रमुख कृतीचा आदर्श ठरणार होते.
     आपल्या भावी मरणाचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी वल्हांडणाच्या भोजनातील भाकरी व द्राक्षारस ही दुश्य साधने वापरली आहेत. मोडलेली भाकरी हे त्याच्या शरीराचे प्रतिक आहे तर त्यातून त्याच्या भावी मरणाची वस्तुस्थिती नि:संशयास्पद स्पष्ट होते. हे माझे शरीर आहे’ ह्याचा अर्थ हा प्रतीकात्मक आहे. आपले शरीर आपल्या शिष्यांसाठी मरणातून दिले जाणार हेच प्रभू येशू सूचित करत आहे आणि पुढे त्याचे स्मरण करण्यासाठी त्याच्या स्मरणार्थ हा विधी पुन्हा पुन्हा करण्यास सांगितले आहे. याद्वारे प्रभूच्या राज्याचे आगमन झाल्याचे प्रभू सांगत आहे. प्यालादेताना तो जे बोलला त्यातून हा मुद्दा अधिक स्पष्ट झाला. पापांची क्षमा होण्यासाठी त्याचे रक्त पुष्कळांकरिता ओतले जाणार होते. ह्याद्वारे यज्ञार्पणाने नव्या कराराची प्रस्थापना प्रभू येशू करत आहे.   

येशूचे कार्य: 
     देवाने ख्रिस्ताला ह्या जगात लोकांचा उद्धार करण्यासाठी पाठवले होते. इब्री, इस्त्रायल किंवा यहुदी लोक देवाची निवडलेली प्रजा होती. प्रमुख्त: संपूर्ण जुनाकरार आपल्याला देवाने ह्याच प्रजेची इजिप्तमधील गुलामगिरीतून सुटका आणि मरणापासून त्यांचे रक्षण कसे केले हे सांगते. देवाची योजना होती की, दुरावलेल्या यहुदियांचे तारण व्हावे व यहुदियांच्या आदर्शांद्वारे संपूर्ण जगाचे तारण करावे म्हणून त्याने येशूला ह्या जगात पाठवले.

येशू शांतीचा राजा:
येशू ह्या जगात शांती प्रस्तापित करण्यासाठी आलेला होता. येशू जेव्हा येरुशलेमला येतो तेव्हा तो एका खेचरावर बसून येतो; तो राजासारखा घोड्यावरून स्वारी करत येत नाही. घोड्यावर स्वारी करून येणे म्हणजे दुस-या राजाला युद्धाचे आव्हान देणे असे मानले जात असे. परंतु खेचरावर बसून येणे म्हणजे दोन राजांतील समेट करणे होय. येशूने खेचरावर बसून येरुशलेममध्ये प्रवेश करून तो शांती प्रस्तापित करण्यासाठी आला आहे हे दर्शविले. सीयोनकन्ये, जोराने आनंदाचा गरज कर; यरुशलेमकन्ये, गजर कर; पाहातुझा राजा  तुजकडे येत आहे; तो न्यायी व यशस्वी आहे, तो लीन आहे; खेचरावर, म्हणजे शिंगरावर बसून येत आहे. एफ्राइमांतले रथ, यरुशलेमेतले घोडे मी नष्ट करीन; युद्धधनुष्य तोडून टाकण्यात येतील, तो राष्ट्रांबरोबर शांतीच्या गोष्टी बोलेल; त्याचे अधिपत्य प्रत्येक  समुद्रावर व फरात नदापासून तो पृथ्वीच्या दिगंतापर्यंत चालेल”(जख-या ९:९-१०). 
            
बोध कथाः

१. जेनच्या काकांनी जेन व तिच्या संपूर्ण कुटूंबाला त्यांच्या घरी खास कार्यक्रमासाठी बोलावले होते. परंतु जेनचा नवरा जायला तयार नव्हता. कारण त्याच्याजवळ काकाला बक्षिस आणण्यास पैसे नव्हते. परंतू जेनने त्याला आमंत्रण पत्र दाखवले व त्यास सांगितले की ह्यात उल्लेख केला आहे की, “येताना काही बक्षिस किंवा देणगी आणू नये.जेन व त्याचे कुटूंब कार्यक्रमासाठी गेले. त्यांनी पार्टी आनंदात घालविली व त्यांना त्याच्या काकाकडून खूप मोठ्या बक्षिसांची देणगी भेटली. घरी आल्यावर जेनने जेव्हा बक्षिसांचे बॉक्स उघडले तेव्हा त्यांना त्यांच्या कुटूंबासाठी जेवणाचा सेट, जेनसाठी साड्या आणि मुलांसाठी दोन मनगटी घड्याळे आणि टॉमसाठी शर्ट-पिस दिले होते व ते सर्व भारावून गेले होते. त्या दिवसापासून जेनचा नवरा टॉम तिच्या काकासाठी अगदी जवळचा झाला व तो खूप काही चांगली कामे तिच्या काकासाठी करू लागला कारण काकाने टॉमचे मन जिंकले होते.
दोन वर्षे चांगल्याप्रकारे भरली. काही दिवसानी जेनचा काका व दिनेश, टॉमचा बॉस हे दोघे बँकेच्या निवडणूकीसाठी उमेदवार म्हणून उभे राहिले. टॉम जेनच्या काकांनी त्यांच्यासाठी केलेली सर्व कामे विसरला. त्याने आपल्या कार्याचे सर्वस्व आपल्या बॉस, दिनेशसाठी दिले. तो दिवस रात्र त्याच्या बॉससाठी कार्य करू लागला. जेन व त्यांच्या मुलांना लोकांकडून त्याच्या वडिलाविषयी खूप काही वाईट ऐकायला लागले. मुलांच्या काही मित्रांनी विचारले, ‘तुझे वडिल त्यांच्या बॉस दिनेशला खूप मदत करतात हे फार वाईट गोष्ट आहे.जेव्हा जेनने टॉमला ह्या विषयी विचारले तेव्हा टॉम म्हणाला तुझे काका कामापुरता मामा आहेत परंतु माझे बॉस तसे नाहीत त्यांनी मला खूप काही गोष्टीचे वचन दिले आहे व ते पूर्ण देखील करणार आहे. टॉमने जेनच्या काकाकडे पाठ फिरवली. ऐवढे सर्व करून सुध्दा टॉम ते विसरला व त्याचा बॉस दिनेश ह्याच्या मागे जाऊ लागला कारण दिनेशने टॉमला खूप काही गोष्टीचे आमिष दाखवले होते.
हेच तर आजचे जग आहे. जेव्हा काही लोक खूप मोह दाखवतात व आपण त्याच्याकडून खेचून घेतात तेव्हा आपल्या अगदी जवळची व चांगली मित्र आपल्याला सोडून जातात. कारण त्याचा मोह, आमिष आपल्या जास्तच जास्त देण्याचे वचन देते व आपण त्याला भुलतो. तेच टॉमच्या बाबतीत झाले. सगळ्याचा ऐवढाच उद्देश की, माणूस हा मोहात आंधळा होतो. तेच आपण आजच्या शुभवर्तमानात पाहतो.

२. दक्षिण भारतातील एका गावात एक मोठे झाड होते. लोकांच म्हणणं होते की, ते झाड हजारो वर्षोपूर्वीचे होते. त्या झाडाला लोक अमा मारान”’ म्हणजे झाडाची आई म्हणून संबोधत असत व ते झाड खूप अव्याढव्य होते. त्या झाडाच्या फाद्यांवर अनेक लोक बसू शकत होते. काही वर्षापूर्वी त्या झाडामध्ये असलेल्या गूहेत एक साधू महाराज राहत होता. तो फक्त त्या झाडाची फळे खात होता; झाडाची पाने, वस्त्रे म्हणून परिधान करीत होता. त्याच्या मरणानतंर लोकांना त्या साधू महाराजांनी लिहीलेला एक संदेश लोकांना सापडला. त्यात असे लिहले होते कि, ते झाड आपल्या स्वतःचे फळ खात नाही. नदी स्वतःसाठी वाहत नाही. ढग स्वतः पाऊस पाडत नाहीत. पण ते जगतात इतरांसाठी; दुस-याच्या हितासाठी.
ख्रिस्त स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी जगला.

मनन चिंतनः  

प्रभू येशूने यहुदी लोकांच्या वल्हांडण सणाआधी जेव्हा यरुशलेम नगरात प्रवेश केला तेव्हा लोकांनी आपली वस्त्रे काढून आणि झाडांच्या डहाळ्या तोडून येशूच्या वाटेवर पसरविल्या आणि लोकांनी उत्स्फूर्तपणे येशूचे स्वागत करीत म्हटले, ‘दाविदाच्या पुत्राला होसान्नाप्रभूच्या नावाने येणारा तो धन्यवादित! ऊर्ध्वलोकी होसान्ना!’(मत्तय २१:१-११).
परंतु खेदाची गोष्ट ही होती की, ज्या ओठांनी येशूचे स्वागत केले आणि येशूची स्तुती केली त्याच ओठांनी येशूला दोषी ठरविले. जेव्हा मुख्य याजकाने येशूची चौकशी करताना विचारले की, “तुम्हांस काय वाटते? त्यांनी उत्तर दिले, हा मरणदंडास पात्र आहे”(मत्तय २६:६६); परत येशू जेव्हा सुभेदारापुढे उभा होता तेव्हा सुभेदाराने लोकांना विचारले, “तुम्हाकरीता ह्या दोघांतून कोणाला सोडून द्यावे अशी तुमची इच्छा आहे? ते म्हणाले, बरब्बाला. पिलाताने त्यांस म्हटले, तर ख्रिस्त म्हटलेल्या येशूचे मी काय करावे? सर्व म्हणाले, “त्याला वधस्तंभावर खिळून टाका; त्याचे रक्त आम्हांवर व आमच्या मुलांबाळांवर असो”(मत्तय २७:२१-२५).
ते भोजनाला बसले असतांना येशूने त्यांना म्हटले, मी तुम्हांस खचित सांगतो, तुमच्यातील एक जण मला धरून देईल”(मत्तय २६:२१). यहुदाने येशूला धरून देण्याचा करार यहुदी पुढा-यांच्याबरोबर केला. तो ख्रिस्ताविरुद्ध साक्ष देण्यास तयार झाला. हा विश्वासघात करण्यासाठी त्याने यहुदी पुढा-यांकडून पैसे मांगितले होते. यहुदाची कामगिरी त्यांना इतकी महत्वाची वाटली की, त्यांनी त्याला चांदीची ३० नाणी तोलून दिली. ही एका गुलामाची किंमत होती.   
वरील गोष्टीवरून आपल्याला कळते की, माणूस हा नेहमी मोहात पडतो. तेच यहुदा(जुदास), पेत्र, पिलात व शिष्य ह्यांच्या बाबतीत घडले. शास्त्री-परूशांनी जुदासाला पैशाचा मोह दाखवला व त्याने येशूचा विश्वासघात केला. येशूचा शिष्य म्हणून जुदास तीन वर्षे येशूबरोबर राहिला; येशूची शिकवणूक त्याने जवळून अनुभवली, येशूचे चमत्कार अगदी जवळून त्याने पाहिले, येशूच्या शिष्यगणात खजिनदाराची भूमिकाही त्याने पार पडली, आणि एक वेळ अशी आली की ह्याच  जुदासाने येशूचा विश्वासघात केला. तेच नेमके पेत्राच्या बाबतीत घडले. पेत्राने येशूची खरी ओळख करून दिली होती; ‘तुम्ही ख्रिस्त जिंवत देवाचे पुत्र आहात.पेत्राने प्रभूला ठोकपणे सांगितले की, ‘सर्व सोडून गेले तरी मी तुम्हाला सोडून जाणार नाही’. ऐवढे सर्व ठोस आश्वासन देऊन ही पेत्र प्रभूला ओळखत नाही. तो तीन वेळा प्रभूला नाकारतो व त्याचा विश्वासघात करतो परंतु त्याने मनापासून पश्चाताप केला. पिलात हा जमावाला व शास्त्री-परूशांना घाबरला व स्वतःचा काही निर्णय घेऊ शकला नाही.
प्रभू येशु ख्रिस्त, बारब्बासारखा लुटारू किंवा दरोडेखोर नव्हता; मग त्याने दुःख का सहन केले? यशया संदेष्टा आपल्या ग्रंथात (५३:४) म्हणतो, ‘खरोखर आमचे व्याधि त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले.खरे पाहिले असता येशू आपल्या  दुष्कर्मांमूळे ठेचला गेला. आम्हास शांती देणारी अशी शिक्षा त्यास झाली, त्यास बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त झाले, त्याचे हालहाल केले तरी ते त्याने सहन केले, आपले तोंडसुध्दा उघडिले नाही, वधावयास नेत असलेल्या कोंकराप्रमाणे, लोकर कातरणाऱ्यापुढे गप्प राहणा-या मेंढराप्रमाणे तो गप्प राहिला, त्यांने आपले तोंड उघडिले नाही. हे सर्व प्रभूने कशासाठी केले? त्याने हे सर्व केले ते आपल्या सर्वांच्या पापांसाठी व आपणास सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे म्हणून. तो खरा देवाचा पुत्र  होता; राजांचा-राजा होता. त्याने पित्याला विंनती केली असती तर सर्व टाळले असते. जेव्हा येशू गेथशेमनी बागेत प्रार्थना करीत होता तेव्हा त्याने पित्याला विंनती केली, ‘हा दुःखाचा प्याला माझ्यापासून दूर ने, परंतु माझ्या इच्छे नव्हे तर तुझ्या इच्छेने व्होवोव ख्रिस्ताने आपल्या पित्याची इच्छा पूर्ण केली.
आपण आज जर ह्या सर्व गोष्टींचा विचार केला तर आपल्याला समजेल की, प्रभूच्या दुःखाला किंवा मरणाला फक्त शास्त्री, परूशी, यहुदी(जुदास), पेत्र, शिष्य व इतर माणसे जबाबदार नव्हती, तर आपणसुध्दा जबाबदार आहोत. ह्या शास्त्री, परूशी व इतरांप्रमाणे आज आपणसुद्धा आपल्या समाजात असेच वागत असतो. ती माणसे मेली नाहीत, तर ती आपण अजून आपल्यामध्ये जिंवत ठेवली आहेत. ह्या शास्त्री-परूशाप्रमाणे अनेकदा काही माणसे समाजात विष पेरण्याचे काम करतात; तर काही माणसे पिलाताप्रमाणे स्वतःच्या स्वर्थाला धक्का पोहोचू नये म्हणून अगदी नीच थरावरील तडजोड करीत असतात. मग त्या घरातल्या समस्या असो, ऑफिसच्या वा राजकारण्याच्या समस्या असो; माणूस कुठल्याही थराला पोहचतो व मग आपण पिलात, ज्युदास व शास्त्री, परूशांची भुमिका बजावतो, तिच भुमिका आपण घरात, समाजात, जमीन-जुमल्यावरून व कोर्ट-कचेरीत नाहीत्या कारणासाठी करत असतो.
म्हणून ह्या पवित्र आठवड्याची सुरुवात करीत असताना ख-या मनाने व अंतःकरणाने आपण स्वतःला पडताळून पाहू या. खरा ख्रिस्ती म्हणून मी कसा वागतो/वागते? ह्यांचा विचार करूया, व ख-या अंतःकरणाने प्रभूच्या दुःखात सहभागी होऊन ख-या मनाने प्रभूच्या दुःख सहनाची व त्याच्या पुनरूत्थानाची तयारी करूया  म्हणजेच आपणा सर्वांना  ख-या पास्काचा आंनद घेता येईल व येशु ख्रिस्तासारखे नम्रतेचे व सहनशीलतेचे जीवन जगता येईल.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे दयावंत बापा आमची प्रार्थना ऐकून घे.
१) ख्रिस्त सभेचे कार्य करणारे आपले पोप बिशप्स ह्यांना देवाचे कार्य करण्यास प्रेरणा व कृपा मिळावी, म्हणून आपण प्रार्थना करू या.
२) आपल्या सर्व मिशनरी फादर्स, ब्रदर्स, सिस्टरांना व प्रांपचिक लोकांना त्यांचे मिशन कार्य करण्यास देवाकडून पाठबळ मिळावे, व त्यांना सर्व लोकांकडून मदत व्हावी व त्यांचे सेवा कार्य सुरळीत राहावे, म्हणून आपण प्रार्थना करू या.
३) सध्या देशभरात निवडणूकीचा हंगाम चालू आहे. देवाच्या कृपेने आपणास चांगले सुसज्ज व योग्य सरकार मिळावे व देशाचा कारभार सुरळीत चालावा, म्हणून आपण प्रार्थना करू या.
४) अचानक पावसामुळे व गारपिटामुळे ज्या शेतक-यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे ह्या सर्वांवर देवाचा आर्शिवाद असावा व सर्व सुरळीत व्हावे, म्हणून आपण प्रार्थना करू या.
५) जे तरूण-तरूणी देवापासून दूर गेली आहेत, जे नोकरीच्या शोधात आहेत व ज्यांना जीवन नकोस झालंय ह्या सर्वांवर देवाचा आर्शिवाद असावा, म्हणून आपण प्रार्थना करू या.
६) आता आपण थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक गरजांसाठी, आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.     



  

           



  

         



  


       

3 comments:

  1. Thanks Suresh! - Br. Ajit Tellis

    ReplyDelete
  2. Congratulations Suresh.... Thank you for helping me to prepare my sermon.... William

    ReplyDelete
  3. Hallelua... hosana... God bless u.....

    ReplyDelete