Tuesday, 1 April 2014

Reflections for Homily By:- Malcolm Dinis 











उपवास काळातील पाचवा रविवार






पुनरुत्थान व जीवन मीच आहे; जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला तरी जगेल(योहान ११:२५).






दिनांक: ६/४/२०१४.
पहिले वाचन: यहेज्केल ३७:१२-१४.
दुसरे वाचन: पौलाचे रोमकरांस पत्र ८:८-११.
शुभवर्तमान: योहान ११:१-४५.

प्रस्तावना:

मनुष्य केवळ देहाने बनलेला नाही तर त्याच्यामध्ये दैविपणाचा अंश आहे. त्यामुळे मानवी देहाचा आपण आदर राखतो आणि म्हणून मृत्यु म्हणजे अंत नसून बदल आहे असे समजतो. आजच्या पहिल्या वाचनामध्ये यहेज्केल संदेष्टा निराश झालेल्या इस्त्रायली प्रजेला आठवण करून देतो की पुन्हा एकदा सर्वसमर्थ परमेश्वर आपल्या पुर्वजांबरोबर केलेल्या करारानुसार आपली सुटका करणार आहे. दुस-या वाचनात संत पौल सांगतो की ‘जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा प्राप्त झाला नसेल तर तो ख्रिस्ताचा नाही, परंतु ख्रिस्त तुम्हामध्ये असेल तर शरीर जरी पापामुळे मेलेले असले, तरी आत्मा नितिमत्वामुळे जिंवत असतो.’
शुभवर्तमानामध्ये येशू ख्रिस्त लाजरसला मृत्युमधून उठवितो, ही गोष्ट प्रत्येक श्रध्दावतांसाठी अतिशय आशादायक आहे. जीवन देण्याची शक्ती फक्त प्रभू येशू ख्रिस्ताकडे आहे. तो जीवन व पुनरुत्थान आहे आणि मृत्यूची बंधने दुर सारून तो आपणास देखील एक दिवस पुनरूस्थानाचा वाटेकरी करणार आहे ही आपली ख्रिस्ती श्रध्दा आहे. हीच श्रध्दा प्रत्येक ख्रिस्ती माणसाला लाभावी म्हणून ह्या पवित्र मिस्साबलिमध्ये आपण विशेष प्रार्थना करूया.

पहिले वाचन: यहेज्केल- ३७:१२-१४.

आजच्या पहिल्या वाचनामध्ये यहेज्केल संदेष्टा स्वत:च्या देशातून हद्दपार केलेल्या इस्त्रायली लोकांना देव आपल्याबरोबर आहे याची साक्ष देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवितो. यहेज्केल प्रवक्त्याचे हे भाकीत पुढे येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानामध्ये परिपूर्ण होते. ख्रिस्ताठायी देवाचा पवित्र आत्मा आजही सर्व श्रध्दावंताना मुक्ती मिळवून देत असतो हे एक महान सत्य आहे.

दुसरे वाचन: पौलाचे रोमकरांस पत्र ८:८-११.

ह्या पत्रात संत पौल सांगतो की, ‘खरा मृत्यु हा देवाच्या अस्तित्वापासून दूर होण्यातच आहे. देवापासून दूर झाल्याने आपण पापांमध्ये जगत असतो, म्हणून जिंवत असून देखील आपण मर्त्यच असतो’. जोपर्यंत आपण देवबापाच्या संगतीत जगतो, तोपर्यंत आपणाठायी जीवन असते. ज्या-ज्या वेळी प्रांजळपणे आपण आपली हृदये परमेश्वरासमोर खुली करतो व स्वत:लाच देवाच्या स्वाधीन करतो, त्या-त्या वेळी देव मृत्यूच्या पाशातून आपणाला सोडवितो.

शुभवर्तमान: योहान; ११:१-४५.

आजच्या शुभवर्तमानातील घटनेद्वारे प्रभू येशू सर्वांसाठी पुनरुत्थानाचा संदेश देत आहे. मार्था आणि मरिया ह्यांचा भाऊ लाजरस मरण पावलेल्या चार दिवसानंतर प्रभू येशू ख्रिस्त तिथे पोहोचतो. दु:खित मार्था आणि मरिया सांत्वन करत तो लाजरसला हाक मारून जिंवत करतो व ह्यास्तव देव पित्याचे गौरव प्रकट करतो. विश्वासणा-यांसाठी मृत्यूनंतर पुनरूस्थान आहे हा संदेश येशू ख्रिस्त आपल्याला देत आहे. जगातील एकमेव सत्य म्हणजे, ‘येशू स्वतः मरणावर विजय मिळवून पुनरूत्थित झाला आहे.’ जो कोणी प्रभूवर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल हा संदेश प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला आजच्या शुभवर्तमानामध्ये देत आहे.

सम्यक विवरणः

देवाच्या गौरवासाठी आजार:(११:१-१६):
या अध्यायात येशू ख्रिस्ताचे ‘देवत्व’ दाखविणारे एक अति महत्वाचे चिन्ह (अद़भूत चमत्कार)आहे. ‘लाजर’ या नावाचा अर्थ ‘देव मदत करतो. येशूची लाजरसच्या कुटुंबावर प्रीती होती. येशू सर्वसमर्थ आहे हे ह्या घराण्यातील सर्वांना ठाऊक होते म्हणूनच येशू ख्रिस्ताचे अधिक गौरव या कुटूंबात प्रकट झाले. लाजर जेव्हा आजारी पडला तेव्हा लाजरसच्या बहिणींनी येशू ख्रिस्ताकडे निरोप पाठविला, प्रभुजी ज्याच्यावर तुमचे प्रेम आहे तो आजारी आहे(योहान ११:३). त्याच्या आजाराविषयी ऐकताच येशू ख्रिस्ताने आश्चर्यचकीत विधान केले, या आजाराचा शेवट मरण नसून देवाच्या पुत्राचा गौरव व्हावे ह्यासाठी आहे(योहान ११:४). देवाच्या मुलावर मरणाची सत्ता नाही म्हणूनच शारिरीक मरणाला ‘झोपी जाणे’ असे म्हटले आहे(१थेस्स ४:१३). आपल्या जीवनात प्रभू देव जे घडू देतो त्याचा उद्ददेश हाच आहे.

मी पुनरूस्थान आहेः(११:१७-२७):
येशू ख्रिस्त आला तेव्हा लाजरसला मरून चार दिवस झाले होते व यहुदी लोक शोक करीत होते. लाजरस पुन्हा उठेल असे कोणालाच वाटत नव्हते पण येशू ख्रिस्ताला मात्र ते ठाऊक होते; म्हणूनच येशू मार्थाला उद्देशून म्हणतो, तुझा भाऊ पुन्हा उठेल(योहान ११:२३). मार्थेला खात्री होती की, जर येशू ख्रिस्त तेथे असता तर तिचा आजारी भाऊ मेला नसता. प्रभू येशू त्या समयी तेथे नव्हता याचेच तिला अतोनात दुःख होत होते(योहान ११:२१). तिचा भाऊ पुनरुत्थानाच्या दिवशी उठेल याची तिला खात्री होती कारण पुनरुत्थानाचा प्रभू प्रत्यक्ष तिच्या समोरच होता.
येशू ख्रिस्ताने तिला स्वतःची; पुनरुस्थान व जीवन मीच आहे, जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल(योहान ११:२५) ही आश्चर्यकारक ओळख करून दिली. त्याच्यासमोर मरणाची सत्ता कमजोर आहे. रोग्यांना बरे करून त्याने त्यांना मरणापासून वाचविले होते. जे मरण पावले त्यांना मरणाच्या सत्तेतून मुक्त करण्यास तो समर्थ आहे. तो मुक्त करतो (पुनरूत्थान) व जीवन देतो (योहान ११:२५). प्रत्येक मनुष्य पापात मेलेला आहे. तो जीवनात पार जाऊ शकतो (योहान ५:२४). ह्या येशू ख्रिस्ताच्या बोलण्यावर मार्थाने विश्वास ठेवला व तो देवाचा पुत्र ख्रिस्त आहे असा विश्वास ठेवला (योहान ११:२७).

येशू रडला (११:२८-३७) :
मार्था येशूला भेटली(योहान ११:२०) व येशू येताच मरियासुध्दा धावत येऊन येशूच्या पाया पडली(योहान ११:३२). आपल्या भावाच्या आजारात त्या दोघींनी येशूची वाट किती अगत्याने व क्षणोक्षणी कशी पाहिली होती हे मरियेला सांगायचे होते(योहान ११:३२); असे सांगताना ती रडत होती. तिचे रडणे पाहून इतरही रडू लागले. हे दृश्य पाहून येशू ख्रिस्त आत्म्यात खवळला; म्हणजे पापामुळे जे घोर परिणाम मनुष्याला भोगावे लागत आहेत त्याबद्दल त्याला सात्विक संताप आला. तो मनाने अति कष्टी झाला (योहान ११:३३).
येशू रडला(योहान ११:३५) हे पाहून जमलेल्या लोकांना येशूचे  त्या कुटुंबावरील असलेले प्रेम दिसले. येशू ख्रिस्ताने जे प्रेम वधस्तभांवर प्रकट केले ते सर्व जगातील उत्कृष्ट असे प्रेम होते. त्या प्रेमाने येशूने पापाची व मरणाची सत्ता मोडली. आज तो पुनरूत्थान व जीवन असा आपल्याजवळ आहे. त्याला आपल्या सर्व दुःखाविषयी पूर्ण सहानुभुती आहे (इब्री.२:१४,१५).

विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाहशील (११:३८-४५):
या प्रभूच्या शब्दांनी त्यांच्या मनाची तयारी झाली(योहान ११:४१). येशू ख्रिस्ताने धोंड काढलेल्या गुहेसमोर प्रार्थना केली. पित्याने येशूची प्रार्थना ऐकली होती त्याबद्दल येशूने पित्याचे आभार मानले. येशूला देवपित्याने पाठविले होते असा तेथे जमलेल्या लोकांनी विश्वास धरावा ह्यासाठी येशू हे अदभूत कृत्य करणार होता. जेव्हा माणसे येशू ख्रिस्ताला ओळखतात व त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवतात तेव्हाच त्याचा गौरव तेथे प्रकट होतो. लाजरा, बाहेर ये(योहान ११:४३) अशी येशूने हाक मारताच त्या मेलेल्या माणसाने त्याची हाक ऐकली व तो जिंवत होऊन बाहेर आला (योहान ११:४४). त्याला पूर्वीचेच शरीर होते. ख्रिस्त मेलेल्यातून उठला तेव्हा धोंड काढावी लागली नाही किंवा प्रेतवस्त्र वेगळी करावी लागली नाहीत (योहान २०:६-७).

मनन-चिंतन:

येशू ख्रिस्त लाजरसला मृत्यूतून उठवितो ही घटना एक प्रकारे येशू ख्रिस्ताचे पुनरूत्थानच सुचित करते. मृत्यूवर असलेला ख्रिस्ताचा अधिकार प्रकट करून ख-या अर्थाने प्रभू येशू ख्रिस्ताच्या उद्धारतीकरणाला या घटनेपासून सुरूवात होते. म्हणूनच प्रभू मार्थाला आत्मविश्वासाने सांगतो की, पुनरूत्थान व जीवन मीच आहे. माझ्यावर विश्वास ठेवणारा कदापि मरणार नाही’. प्रत्येक श्रध्दावंतासाठी येशू ख्रिस्ताचे हे शब्द अतिशय आशादायक आहेत. यामुळेच तर उपवास काळातील आजचा पाचवा रविवार सार्वकालिक जीवन देण्याची शक्ती फक्त प्रभू ख्रिस्ताकडे आहे हे सिध्द करतो. सर्व प्रकारच्या भीतीची, समस्यांची, मृत्यूची बंधने दूर सारून जीवनदायी प्रभू सदासर्वदा देव पवित्र आत्म्याच्या सान्निध्यात जगून या जीवनामध्येच ख-या सुख-शांती समाधानाचा अनुभव घेण्यासाठी आपणास बोलावितो.
आपल्या दैनंदिन जीवनाच्या व्यवहारमध्ये, दुःख, सकंटाच्या व मरणाच्या डोहातून प्रवास करीत असताना देवावर विश्वास ठेवून आशेने पुढचे पाऊले टाकण्यासाठी प्रभूचे शब्द आपणाला आज प्रेरणा देतात. अनेकवेळा दुःखांच्या, संकटांच्या किंवा एखादया प्रिय व्यक्तींच्या मृत्यूवेळी आपण आपले सर्वस्व हरवून बसतो. काय करावे, कुठे जावे व कसे जगावे हे आपणाला सुचत नाही. अशावेळी येशूच्या पुनरूत्थानावर, ‘भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व मजकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन’, असे अभिवचन देणारा ख्रिस्त आज आपणाला मुक्तीचे आमंत्रण देत आहे. त्याला होकार देऊन त्याच्या पुनरूत्थानात सहभागी होण्यास आपण तयार आहोत का?

बोध कथाः

एकदा एक चिनी फकीर एका दफनभूमीतून चालला होता. अचानक त्याचा पाय एका कवटीला लागला, त्याने ती कवटी उचलली आणि आपल्या आश्रमात आणली. शिष्यांनी विचारले, ‘गुरूजी, या कवटीचे तुम्ही काय करणार? कशासाठी ही घाण आश्रमात आणली?’ तेव्हा तो म्हणाला, ‘मी अंधारात दफन भूमीतून चाललो होतो इतक्यात अचानक माझा पाय या कवटीला लागला; लक्षात ठेवा, ही दफनभूमी काही छोट्या लोकांची नव्हती तर मोठ्या लोकांची होती. मोठ-मोठे सम्राट तिथे पुरले गेले होते, महारथी तेथे दफन करण्यात आले होते. ही कवटी सामान्य माणसाची कवटी नाही आणि मी ती माझ्या पायाने ठोकरली.’ ह्या बोलण्यावर सर्व शिष्य हसू लागले व ते म्हणाले, ‘गुरूजी, तुम्ही वेडे तर झाले नाहीत ना? आता ही कवटी सम्राटाची असो किंवा प्रधानाची असो, काय फरक पडतो? आता तर ही मातीला मिळालेली आहे; ही कवटी काहीही करू शकणार नाही. फेकून दया तिला, असा कचरा आपल्या आश्रमात नको.’
तो फकीर त्यांना म्हणाला, ‘मी ही कवटी जपून ठेवणार आहे; अशासाठी की, मला कायम आठवण राहील की, उदया माझी सुध्दा कवटी अशीच पडलेली असेल. लोक ती ठोकरतील पण मी त्यांना काहीही करू शकणार नाही.’
देह पूर्तीचे जीवन हे क्षणभंगुर असते. आत्मिक जीवनाचा अंत नसतो. पुनरुत्थित आत्मिक जीवन जगणे म्हणजेच देवाचा गौरव अनुभवने असे होय.  

. एक इब्राहिम नावाचा मोठा बादशाहा होता. एक दिवस तो आपल्या सिंहासनावर बसला असताना एक फकीर त्याच्या दरबाराच्या दाराशी आला परंतू पहारेक-यांनी त्याला आत जाण्यास मनाई केली. तेव्हा तो त्यांना म्हणाला, ‘मला आत जाऊ दया, मी ह्या धर्मशाळेत आज रात्री विसावा घेण्यासाठी आलो आहे.’ तेव्हा पहारेकरी फकिराला म्हणाला, तुम्हाला वेड तर लागले नाही ना? हा बादशाहाचा महाल आहे, ह्याला तुम्ही धर्मशाळा म्हणता?’ बादशाहाने पहारेकरी व फकीर यांच्यामधील भांडण ऐकले, तेव्हा त्यांने फकिराला बोलावून घेतले आणि विचारले; ‘काय भानगड आहे? हा माझा महाल आहे.’ तेव्हा फकिराने त्या बादशाहाकडे रोखून पाहिले आणि विचारले; ‘यापूर्वी सुध्दा मी येथे आलो होतो. तेव्हा मी याच सिहांसनावर दुस-या कुणाला बसलेला पाहिला होता.’ बादशाहा म्हणाला, ‘बरोबर आहे ते माझे वडील होते.’ तो फकीर म्हणाला, ‘मी त्या आधीदेखील आलो होतो तेव्हा दुसरा कोणीतरी बसला होता.’ बादशाहा म्हणाला, ‘ते देखील बरोबर आहे. ते माझ्या वडिलांचे वडील होते, माझे ते आजोबा होते.’ फकीर मोठ्याने हसू लागला आणि म्हणाला, ‘मी जेव्हा पुन्हा येईन तेव्हा तुला खात्री आहे का? की तूच या सिहांसनावर बसलेला असशील म्हणून? तेव्हा तुझा मुलगा मला सिहांसनावर बसलेला दिसेल. तो मग मला म्हणेल, माझ्या आधी माझे वडील या सिहांसनावर बसत होते. म्हणूनच मी या तुझ्या मोठ्या महालाला धर्मशाळा म्हणतो. मी येथे तीन वेळा आलो. येथे वेगवेगळे लोक थांबलेले आढळले मग मी ह्याला महाल का म्हणू? ही धर्मशाळा नाही तर काय आहे?’ ह्या फकीराच्या बोलण्यांने इब्राहिम बादशाहाच्या मस्तकात एक जणू विजेची चमक उठली. तो उठून उभा राहिला व म्हणाला, ‘तुमचे अगदी बरोबर आहे, हा माझा महाल धर्मशाळाच आहे.’ मग इब्राहिम बादशाहाने महाल सोडला व ते सुध्दा एका फकीराचे जीवन जगू लागला.
माणूस हा ह्या जगाचा रहिवाशी नसून तर तो प्रवाशी आहे. पुनरुत्थानाकडे असलेला हा प्रवास फक्त देवाच्या कृपेनेच पूर्ण होऊ शकतो. 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभो, ह्या जीवनात तुझा गौरव अनुभवण्यास मदत कर.
. ख्रिस्तसभेचे अधिकारी पोप महाशय, बिशप्स, धर्मगुरू, सिस्टर्स व सर्व प्रापंचिक ह्या सर्वांना चांगले आरोग्य लाभावे व त्यांच्या कार्यावर प्रभूचा आर्शिवाद असावा, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
. जो ख्रिस्त आपल्या सर्व मानवजातीच्या पापांसाठी मरण पावला व जिवंत होऊन सर्वांना नवजीवन दिले तो ख्रिस्त आपणाला अधिक पवित्र बनवण्यास धैर्य व शक्ती देवो, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
. जी कुटुंबे वेगळी झाली आहेत; जेथे प्रेम, शांती व ऐक्य नाही अश्या कुटुंबात परमेश्वराच्या मदतीने पुन्हा प्रेम, शांती व ऐक्य प्रस्थापित व्हावे, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
. आपण स्वतःसाठी न जगता इतरांसाठी जगावे व परमेश्वराचा आनंद इतरांना दयावा, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.

. आता आपण थोडावेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक गरजांसाठी, आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.      

1 comment: