Tuesday, 24 June 2014

Reflections for the homily by: Malcolm Dinis.










संत पिटर व संत पौल


“आपण ख्रिस्त, जिवंत देवाचे पुत्र आहा”


दिनांक २९/०६/२०१४.
पहिले वाचन: प्रेषितांचे कृत्ये १२:१-११.
दुसरे वाचन: २ तिमथी ४:६-८, १७-१८.
शुभवर्तमान: मत्तय; १६:१३-१९.

प्रस्तावना:

आज ख्रिस्तसभा संत पेत्र आणि संत पौल या दोन महान संतांचा सण साजरा करीत आहे. संत पेत्र हा एक कोळी होता परंतु त्याने ख्रिस्ताला जिवंत देवाचा पुत्र म्हणून श्रद्धेने स्वीकारले. म्हणूनच अनुभवाने महान असलेल्या ह्या ज्येष्ठ शिष्यांवर प्रभू येशू ख्रिस्ताने संपूर्ण ख्रिस्तसभेची जबाबदारी सोपवली. संत पौल हा ख्रिस्तसभेतील एक महान आणि प्रतिभाशाली सुवार्ता प्रचारक होता. अनेक प्रकारचा छळ सोसून आणि विरोध सहन करूनही संत पौलाने आणि पेत्राने ख्रिस्ती धर्म पसरविला.
आजच्या पहिल्या वाचनात ख्रिस्ती मंडळीच्या एकाग्र प्रार्थनेमुळे संत पेत्राची तुरूंगातून कशी सुटका होते हे दर्शविले आहे. तसेच आजच्या दुस-या वाचनात संत पौल आपल्या आयुष्याचा जमाखर्च मांडताना म्हणतात, ‘जे समृध्द ते मी केले आहे. माझी धाव संपविली आहे व आता माझ्यासाठी नितिमत्वाचा मुकूट ठेविला आहे’.
आजच्या शुभवर्तमानात येशू हा ख्रिस्तअसल्याची कबूली पेत्र देत आहे. संत पौलासारखा सुवार्ता प्रसाराचा उत्साह आम्हा सर्वांना लाभावा म्हणून ह्या पवित्र मिस्साबळीमध्ये परमेश्वराकडून विशेष कृपा मागूया.

पहिले वाचन (प्रेषितांचे कृत्ये १२:१-११):

हेरोद राजा रोमी बादशाहाचा मित्र होता. यहुदी लोकांना खुष करण्यासाठी ख्रिस्ती मंडळीचा छळ करत पेत्राला मारण्याच्या उद्देशाने त्याने त्याला पकडून तुरूंगात टाकले. पेत्र तुरूंगातून निसटून जाण्याची शक्यताच नव्हती. त्याच्या हातात साखळ दंड होता व चार शिपाई सतत त्याची राखण करीत होते.
जे मनुष्याला अशक्य असते ते देवाला शक्य असतेहे ख्रिस्ती मंडळीला माहित होते म्हणून ते अत्यंत कळकळीने व एक चित्तेने प्रार्थना करीत असता पेत्राची तुरूंगातून सुटका झाली.

दुसरे वाचन ( २ तिमथी ४:६-८, १७-१८):

संत पौल लवकरच प्रभूकडे जाणार होता हे त्याला कळून चुकले होते. आपल्या जीवनात तो ख्रिस्ताशी सतत एकनिष्ठ राहिला होता. सत्यासाठी तो स्थिर उभा राहिला. ख्रिस्ताच्या सुर्वातेचे सत्य राखण्यासाठी त्याने कितीतरी कष्ट घेतले होते. आपल्या सर्व संकटामध्ये, दुःखामध्ये, अडचणीमध्ये त्याने सतत प्रभूकडे लक्ष केंद्रित केले व आपला विश्वास शेवटपर्यंत बळकट ठेवला म्हणूनच पौल म्हणतो की, जे समृध्द ते मी केले आहे, माझी धाव संपविली आहे, विश्वास राखिला आहे.
शुभवर्तमान (मत्तय; १६:१३-१९):
येशू हा ख्रिस्त आहेअशी कबूली पेत्राने दिली. पेत्राला हे सत्य स्वतःच्या अक्कल हुषारीने समजले नव्हते, तर देवानेच त्याला ते प्रगट केले होते.
येशू हा ख्रिस्त आहेयाच सत्यावर ख्रिस्त आपली मंडळी रचणार होता. स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या सोपविणे म्हणजे एक अधिकाराचे चिन्ह आहे. ख्रिस्ताने पेत्राला व प्रेषितांना सुर्वातेची घोषणा करून स्वर्गात जाण्याचा मार्ग खुला करण्याचा अधिकार दिला. या अधिकाराचा उपयोग त्यांनी पेन्टेकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली केला.

सम्यक विवरणः

मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात? (१३)
आपली खरी ओळख लोकांना झाली आहे की नाही हा येशू ख्रिस्तासमोर प्रश्न होता. येशू कोण आहे याविषयी लोकांत अनेक कल्पना होत्या. प्राचीन संदेष्ट्यातील कोणी एक जिवंत झाला आहे असे सुध्दा त्यांना वाटत होते. लोकांच्या अपेक्षा तसेच अंदाजही निरनिराळे होते. येशू ख्रिस्ताने आपल्या पित्याची शिकवण लोकांना दिली होती व आपल्या महान कृत्यांनी लोकांची मने परमेश्वराकडे वळवळी होती. आता संधी होती ती म्हणजे लोकांच्या विचारांची; येशूला खरोखर त्यांनी देवाचा पुत्र म्हणून ओळखले होते का? म्हणून येशूने आपल्या शिष्यांना त्याच्याविषयी लोकांचे मत काय आहे असे विचारले.

आपण ख्रिस्त, जिंवत देवाचे पुत्र (१६):
मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात? ह्या प्रश्नावर शिष्यांनी वेगवेगळी उत्तरे दिली परंतु शिमोन पेत्राचा अंदाज अचूक होता तो म्हणाला, ‘आपण ख्रिस्त, जिंवत देवाचे पुत्र आहा.ही त्याची अंतःप्रेरणा होती. ह्या पेत्राच्या अंर्तज्ञानामुळे येशू त्याला विशेष अधिकार देतो.
इस्त्राएल लोक ज्या मसीहाची वाट पाहत होते व ज्याच्या येण्याविषयीचे भविष्य जुन्या करारात केले होते त्याच मसिहाचीकिंवा ख्रिस्ताचीपेत्राने कबुली दिली होती. यहुदी लोकांनी ख्रिस्ताला तो चांगला आहे, तो थोर आहे असे म्हटले. पण तो सर्वात चांगला, सर्व मानव जातीत श्रेष्ठ, सर्वात मोठा संदेष्टा असे कधीच मानले नाही. परंतु जेव्हा ख्रिस्ताची खरी ओळख पेत्राच्या शब्दाने होते हे ऐकून ख्रिस्ताला किती समाधान वाटले असेल? पेत्राने येशू हाच ख्रिस्त आहे असे ओळखल्यावर तो त्यांना स्वतःचे दुःखसहन, मरण व पुनरूत्थान याविषयी शिक्षण देऊ लागला.

मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन (१९)
पेत्र ह्या नावाचा अर्थ खडक असा होतो. ख्रिस्ताने पेत्राला स्वर्ग राज्याच्या किल्ल्या सोपविल्या म्हणजेच संपूर्ण ख्रिस्तसभेची काळजी त्याच्यावर सोपविली. किल्ली हे अधिकाराचे चिन्ह आहे. पेत्राला येशू ख्रिस्ताने जो अधिकार दिला आहे तो सत्ता गाजविण्यासाठी नव्हे तर हा अधिकार सेवा करण्यासाठी आहे. अधिकार नसला तर सेवा करणे कठीण जाते. म्हणून येशू ख्रिस्त पेत्राला अधिकारही देतो व जबाबदारीही देतो. हा अधिकार इतरांसाठी आहे, तो स्वतःसाठी नाही. ज्याला येशूचा खराखुरा अनुभव येतो तो स्वतःचा राहत नाही. तो स्वतःला काही प्रमाणात विसरून जातो. त्याला आंतरिक स्वातंत्र्य मिळते, त्या आंतरिक स्वातंत्र्यातून तो इतरांकडे वळतो. म्हणूनच ख्रिस्ताने पेत्राला व प्रेषितांना सुवार्तेची घोषणा करून स्वर्गात जाण्याचा मार्ग खुला करण्याचा अधिकार दिला.

बोध कथाः

. एकदा एका प्रियसीने आपल्या प्रियकराच्या घराचा दरवाजा वाजवला. घरामधून आवाज आला, ‘कोण आहे?’ प्रियसीने उत्तर दिले, ‘मी आहे.घरामधून परत आवाज आला. इथून परत जा, हे घर आपल्या दोघांना सामावून घेणार नाही.प्रियसी तेथून निघून गेली व आपल्या प्रियकराच्या शब्दांवर बराच विचार केला व परत येऊन प्रियकराच्याघराचा दरवाजा वाजवला. मधून आवाज आला, ‘कोण आहे?’ पण ह्या वेळेला प्रियसीचे उत्तर होते, ‘तूच आहेस.असे उत्तर देताच दरवाजा लगेच उघडला गेला.
(येशू ख्रिस्ताला माहित करून घ्यायचे होते की खरोखर आपल्या शिष्यांच्या हृदयात त्याच्यासाठी जागा आहे का? म्हणून तो त्याना प्रश्न करतो, लोक कोण म्हणून मला ओळखतात?)

. धर्मगुरू झाल्यानंतर फा.थॉमस ह्यांची बदली एका शहरापासून दूर अश्या गरीब मागासलेल्या गावामध्ये झाली. शैक्षणिक व आध्यात्मिक दृष्ट्या ते गाव फारच मागासलेले होते. परंतू जेव्हा फा.थॉमसने ह्या गावात पाऊल टाकले तेव्हा सर्वप्रथम शिक्षणाची सोय केली, त्यासाठी त्यांना पैशांची गरज होती म्हणून त्यांनी शहराकडे जाऊन श्रीमंत-दानशूर माणसांकडून अक्षरशः भीक मागितली व स्वतःचे जे होते-नव्हते ते सर्व गावाच्या विकासासाठी विकून टाकले व गावाला नवीन दिशा दाखवली. आज त्या गरीब गावाचा विकास फा.थॉमसच्या परिश्रमामुळे झाला व त्यांच्या पुण्याईमुळेच आज त्या गावामध्ये शैक्षणिक, आध्यात्मिक व सर्वच बाबतीत प्रगती झालेली आहे. ह्याचे सर्व श्रेय फा.थॉमस ह्यांना जाते.
आजच्या दुस-या वाचनात संत पौलाच्या पत्रामध्ये म्हटल्याप्रमाणे फा.थॉमससाठी आपण इतकेच म्हणू शकतो, “मी माझी धाव संपविली आहे, आता माझ्यासाठी नितीमत्वाचा मुकूट ठेवला आहे.” (२ तिमथी; ४:६)  
 
मनन-चिंतनः

आज ख्रिस्तसभेकडे भरपूर अधिकार आहेत; भरपूर सत्ता आहेत. ही सत्ता व अधिकार केवळ ख्रिस्ती माणसांसाठी नाही, तर सर्व गरजूंसाठी आहे. यासाठी ख्रिस्तसभेच्या अधिकार वर्गाला आपल्या कोषातून बाहेर पडावे लागेल. आज ख्रिस्ती माणूसही आपल्या अधिकाराचा दुरूपयोग करतात. ह्याचे एक मुख्य कारण म्हणजे आम्हाला ख्रिस्ताच्या खराखुरा अनुभव आलेला नाही. आम्ही ख्रिस्ताची शिकवण जाणतो, ख्रिस्ताची आम्हाला तात्विक ओळख आहे. पण त्या ओळखीद्वारे आमचा अंहकार पुसला जात नाही. त्यामुळे आम्ही स्वतःला विसरत नाही, आम्हाला आंतरिक स्वातंत्र्य मिळत नाही, म्हणून अधिकाराचा, सत्तेचा फायदा आपण आपल्यासाठी करून घेत असतो.
आज आपण भौतिक ज्ञानाकडे अधिक लक्ष पुरवत आहोत. आजच्या स्पर्धात्मक जगात त्याची गरज आहे, पण आध्यात्मिक मूल्यांकडे लक्ष पुरवले नाही तर आपण पोकळ राहू, म्हणूनच ज्याला येशूचा खराखुरा अनुभव येतो तो स्वतःचा राहत नाही. येशू ख्रिस्त सर्वांसाठी आला होता. अंत:ज्ञानानेझालेला येशूचा सेवक सर्वांचा सेवक बनतो. त्याला आंतरिक स्वातंत्र्य मिळते व त्या आंतरिक स्वातंत्र्यातून तो इतरांकडे वळतो.
येशू ख्रिस्ताने आपल्याला स्वर्ग-राज्याच्या किल्ल्या दिल्या आहेत म्हणजे भौतिक मूल्यांपलीकडे नेण्याचा अधिकार ख्रिस्ताने आम्हाला दिला आहे, ही जबाबदारी ख्रिस्ताने आम्हाला दिली आहे. ही जबाबदारी कठीण आहे पण ख्रिस्ताचा परमात्मा आपल्याबरोबर आहे असा विश्वास ठेवून आपल्या जीवनाला नवीन सुरूवात करूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसादः हे प्रभो, आमच्या प्रार्थना स्विकारून घे.
. आपले परमाचार्य पोप फ्रान्सिस, कार्डिनल्स, बिशप्स, धर्मगुरू, धर्मबंधू-भगिनी व सर्व प्रांपचिक त्यांच्या कार्याद्वारे आणि शुभसंदेशाने येशू ख्रिस्ताची खरी ओळख संपूर्ण जगाला मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
. आज आपण संत पिटर व संत पौल ह्यांचा सण साजरा करीत असताना, जे लोक मिशन भागात काम करीत आहेत त्यांची आपण विशेष आठवण करूया. त्यांना देवाची विशेष कृपा मिळावी व संत पिटर व पौल प्रमाणे त्यांची श्रध्दा बळकट होऊन त्यांनी इतरांचीही श्रध्दा बळकट करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
. ख्रिस्ताच्या मळ्यात कार्य करण्यासाठी आपल्या परिसरातील अनेक तरूण-तरूणींना पुढे येण्यास पवित्र आत्म्याची प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
. आपल्या धर्मग्रामात जे लोक असाध्य आजाराने पछाडलेले आहेत त्यांना परमेश्वरी कृपेचा अनुभव यावा आणि नवजीवनाची वाट त्यांना दिसावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
. आपण आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक गरजांसाठी प्रार्थना करूया.

Wednesday, 18 June 2014

Reflections for homily By:- Malcom Patil.









 येशूच्या अतिपवित्र शरीराचा आणि रक्ताचा सण


दिनांक: २२/६/२०१४.
पहिले वाचन: अनुवाद ८:२-३, १४-१६.
दुसरे वाचन: १ करिंथ १०:१६-१७.
शुभवर्तमान: योहान ६:५१-५८.

प्रस्तावना:
ख्रिस्ताठायी जमलेल्या माझ्या प्रिय भाविकांनो, आज आपण प्रभू येशूच्या शरीर व रक्ताचा सोहळा साजरा करीत आहोत. ख्रिस्ती धर्मात सर्वात मोठी प्रार्थना म्हणजे पवित्र मिस्साबली होय. पवित्र मिस्साबलीदानात खुद्द प्रभू येशू ख्रिस्त आपल्यात उपस्थित असतो, त्याच बलिदानात येशूच्या वधस्तंभावरील पवित्र रक्ताचे स्मरण केले जाते. पवित्र ख्रिस्तप्रसादाच्या वेळी आपण भाकरीच्या रुपात खुद्द प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या अंतकरणात स्वीकारत असतो.
इस्रायल जनता चाळीस वर्षे रानात भटकत असताना देवाने त्यांचे कशाप्रकारे रक्षण केले व त्यांना स्वर्गीय मान्ना देऊन त्यांचे पोषण केले याचा वृतांत आजच्या पहिल्या वाचनात सांगण्यात आला आहे. आपण सर्वजण एक भाकर व एक शरीर असून एका भाकरीचे भागीदार आहोत असे पौल आजच्या दुस-या वाचनात स्पष्ट करून सांगतो. तर आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे, ह्या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्वकाळ जगेल.
प्रभू येशू ख्रिस्त या साक्रामेंतामध्ये जिवंतपणे हजर आहे, त्याच्या सानिध्यात बसण्यासाठी व त्याचा संदेश ऐकण्यासाठी आम्ही तयार आहोत का? जर कळत नकळत आपण प्रभू येशू ख्रिस्ताला योग्य स्थान दिले नसेल तर आपण ख-या अंतकरणाने प्रभू येशूची क्षमा मागूया व भक्तीने ह्या पवित्र मिस्सामध्ये भाग घेऊया.

पहिले वाचन: अनुवाद ८:२-३, १४-१६

देवाचे आज्ञापालन केवळ समजून-उमजून नव्हे तर ते अंत:करणपुर्वक केले पाहिजे. अंतकरण तर नेहमीच आपल्या वाटेने जाण्याची संधी शोधीत असते. या मानवी दुर्बळपणावर अनुवादाच्या पुस्तकात विशेष लक्ष दिले आहे. इस्रायली लोकांना लीन व नम्र करण्यासाठी रानातला अनुभव त्यांना दिला होता आणि हा अनुभव खडतर असला तरी तोही एक देणगी असाच होता व लोकांना या अनुभवाचे स्मरण कायम रहावे अशी योजना केली होती.  
    
 दुसरे वाचन: १ करिंथ १०: १६-१७

पौलाने ख्रिस्ताकडे आणलेल्या त्याच्या बंधूनी मूर्तिपूजेचा धोका लक्षात घेऊन, देवळात जाऊन भोजन करणे टाळावे हेच त्यांना बरे आहे. या बाबतीत त्यांनी आणखी नीट विचार करावा यासाठी पौलाने दोन साम्यदर्शक उदाहरणे देऊन त्यांना आवाहन केले आहे. यातील पहिले उदाहरण, प्रभूभोजना संबधीचे आहे. येशूने आपल्या मरणापुर्वीच्या रात्री द्राक्षरसाच्या प्यालाचे महत्व नव्याने सागितले. हा प्याला वधस्तंभावर सांडल्या जाणा-या रक्ताचे साधन होते. त्याचप्रमाणे प्रभूभोजनाच्या समयी ख्रिस्ती लोक एकाच भाकरीतून भोजन घेतात व या वास्तुस्थितीवरून ते सर्व ख्रिस्ताचे आहेत हे स्पष्ट होते.

सम्यक विवरण:

शुभवर्तमान: योहान ६:५१-५८.

 ‘मी जीवनाची भाकर आहे, मी स्वर्गातून उतरलो आहे’, येशू ख्रिस्ताची ही विधाने ऐकून तेथे जमलेल्या लोकांना मोठे आश्चर्य वाटले. ही विधाने आजही खरी आहेत. इस्रायल लोकांनी चाळीस वर्षे अरण्यात मान्ना खाल्ला तरी त्यांना सार्वकालिक जीवन मिळाले नव्हते. ख्रिस्त स्वतः सार्वकालिक जीवन देणारा होता. हे जीवन त्याच्यावर विश्वास ठेवून, म्हणजे त्याचा स्वीकार करून मिळते. सार्वकालिक जीवन जगाला देता यावे यासाठी येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर मरण सहन करावे लागले, त्याचा देह वधस्तंभावर खिळला गेला. त्याचे रक्त बहुतांच्या खंडणीसाठी त्या वधस्तंभावर वाहिले.
देह या शब्दाने येशूच्या मानवी जीवनाचा उल्लेख होतो. पण यहुद्यांनी त्याविषयी गैरसमज करून घेतला, त्यांनी येशूचे बोलणे शब्दशः घेतले म्हणून त्यांना त्याचा आंतरिक अर्थ समजलाच नाही. येशूच्या शब्दामधील आध्यात्मिक अर्थाच्या गाभ्यापर्यंत यहुद्यांची मजल गेली नाही यात नवल नाही; कारण हे समजणे केवळ विश्वासाद्वारेच शक्य होते. येशूचे देह व रक्त सेवन करणे ही पूर्णपणे विश्वासाची कृती आहे.
यहूदी लोकांना येशू आत्मिक दृष्टीकोनातून बोलत होता हे समजले नाही म्हणून ख्रिस्ताने हे अधिक स्पष्ट केले. हे जीवन, ख्रिस्ताने त्याचे शरीर व रक्त अर्पण केल्यामुळे मिळणार होते. अर्पणाच्या कोकराचा वध केल्यावर ते रक्त वेदीच्या सभोवती ओतीत व कोकराचा देह सेवन करीत. ‘सेवन करणे व पिणे’ हे उदगार ख्रिस्ताच्या मरणाद्वारे तो जे सार्वकालिक जीवन देऊ शकणार होता याचे सूचक आहेत. या अर्थाने, जो ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन मिळते. 

बोध कथाः
१. इ. स. १२६३ सालची घटना, प्रेग गावचे फा. पीटर नावाचे एक जर्मन धर्मगुरू सेवाभावी आणि धार्मिक असूनही मिस्साबली अर्पण करताना पवित्र भाकर व दाक्ष्रारस यांचे येशूच्या शरीरात व रक्तात रूपांतर होते या श्रध्देबाबत सांशक होते. ते एकदा रोमच्या तीर्थयात्रेला जात असताना बोल्सेना येथे उतरले. तेथे संत ख्रिस्तीनाच्या थडग्यावर उभारलेल्या ख्रिस्तमंदिरात मिस्साबली अर्पण करताना त्यांच्या मनात वरील शंका होतीच. तत्वपालटाच्या वेळी त्यांनी ख्रिस्ताचे शब्द उच्चारून भाकर उंचावली आणि अचानक त्या भाकरीतून रक्ताचे थेंब पडू लागले. फा. पीटर यांचे हात आणि वेदीवस्त्र रक्ताने भिझून गेले. फादरांना मोठा धक्काच बसला, भांबावून गेलेल्या फा. पीटर यांना त्यांच्या इच्छेनुसार पोप महाशयांकडे नेण्यात आले. पोप महाशयांनी फा. पीटर यांचे म्हणणे ऐकून घटनेची संपूर्ण चौकशी करण्याचा आदेश दिला. त्यानंतर सदर पवित्र भाकर व वेदीवस्त्र मागविण्यात आले. स्वतः पोप महाशयांनी चमत्कारीक भाकर व रक्ताचे डाग पडलेले वेदीवस्त्र स्विकारून महामंदिरात मोठ्या भक्ती भावाने ठेवले आणि ऑगस्ट १२६४ साली पोप महाशयांनी आपल्या आदेशाद्वारे ख्रिस्ताच्या अतिपवित्र शरीराचा व रक्ताचा सण जाहीर केला.
२. एका खेड्यातील एका शाळेत मुलांनी विज्ञानाचे प्रदर्शन भरविले होते. ते प्रदर्शन पहायला जगप्रसिध्द संशोधक थॉमस एडिसन गेला. तेथे त्याला कुणी ओळखले नाही. प्रदर्शनात एडिसनने छोट्या मुलांनी बनविललेली विजेवर चालणारी एक मोटार पाहिली. एडिसनने एका मुलाला विचारले, “ही मोटार कशावर चालते?” मूलगा म्हणाला वीजेवर. एडिसनने विचारले, “विज म्हणजे काय?” मुलांना काही उत्तर देता येईना. त्यांनी त्यांच्या मास्तरांना बोलावले, त्यांना देखील उत्तर येईना. त्यांनी हेडमास्तरांना बोलावले, त्यांना सुध्दा उत्तर ठाऊक नव्हते. तेव्हा एडिसन म्हणाला, मुलांनो भांबावून जाऊ नका. मी आहे थॉमस एडिसन, मीच वीजेचा शोध लावला, परंतू मला पण माहित नाही की वीज ही काय गोष्ट आहे.    

मनन चिंतनः

ख्रिस्ती धर्मात अशी अनेक धर्मरहस्ये आहेत की ती आमच्या बुध्दीच्या पलिकडची आहेत. रासायनिक प्रयोग शाळेत ती सिध्द् करता येत नाहीत. मात्र संताच्या व प्रेषितांच्या सांगण्यावरून किंवा आमच्या आत्मिक प्रेरणेवरून त्याचे अस्तित्व आम्हाला मान्य करावे लागते आणि यालाच म्हणतात श्रध्दा.
आज आपण ख्रिस्ताच्या अतिपवित्र शरीराचा व रक्ताचा सण आपण साजरा करीत आहोत, भाकररूप ख्रिस्त-शरीर हे ख्रिस्ती धर्मातील एक महान रहस्य आहे. ख्रिस्ताचे आम्हाला दिव्य दर्शन घडावे, आमचे आत्मिक पोषण व्हावे, त्याच्या मायेचा ओलावा आम्हाला सदैव मिळावा, त्याची आम्हाला नित्य सोबत लाभावी म्हणून ख्रिस्त भाकररूप बनला.
साध्या भाकरीहून ही भाकर दिसायला काही वेगळी नाही. या भाकरीचे अणू परमाणूत विघटन केले तरी ख्रिस्त-शरीर आपल्याला त्यात सापडणार नाही. सुक्ष्म दर्शन यंत्राखाली या भाकरीचे निरीक्षण केले तरी ख्रिस्त तेथे आपल्या नजरेला पडणार नाही. या भाकरीचे आपण प्रयोग शाळेत रासानिक पुथ्थकरण केले तरी भाकरीतला ख्रिस्त आपण वेगळा काढू शकणार नाहीत कारण हा भाकररूपी ख्रिस्त आपल्या  दृष्टीच्या पलिकडे आपल्या स्पर्शच्या पलिकडे, आपल्या इंद्रियाच्या पलिकडे आहे तरी सुध्दा: ‘जड स्वरूपी अदृश्य तू, परी उपस्थित माझ्या सामोरी जडस्वरूपात तो अदृश्य असला तरी ही भाकर ख्रिस्त-शरीर आहे ही वस्तुस्थिती आहे, ही आमची श्रध्दा आहे.
‘ग्रहण इंद्रिया हो हो गुढ गोचर केवळ श्रध्देला’
इंद्रियाला गुढ आणि बुध्दीला अगम्य असलेल्या ख्रिस्ताचे हे शरीर आम्ही श्रध्दारूपी डोळ्यांनी पाहत आहोत. आज आपण ख्रिस्ताच्या अतिपवित्र शरीराचा व रक्ताचा सण आपण साजरा करीत आहोत या शूभ प्रसंगी आपण त्याचा स्विकार करण्यास आणि त्याच्याशी एकजीव होण्यास पात्र ठरावे म्हणून प्रार्थना करूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना­:
प्रतिसाद: हे प्रभो आमची श्रद्धा बळकट कर.
१.      ख्रिस्त सभेची धुरा वाहणारे पोप फ्रान्सीस, कार्डिनल्स, बिशप्स, फादर्स, सिस्टर्स, ब्रदर्स व इतर प्रापंचिक या सर्वांवर देवाचा विशेष आर्शिवाद यावा व त्यांना त्यांच्या या पवित्र कार्यात प्रभूचे मार्गदर्शन व कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२.    आज हा पवित्र सण साजरा करीत असताना आपण सर्वांनी एकमेकांना समजून घ्यावे, आपल्या शरीररूपी मंदिरात देवाला प्रथम स्थान द्यावे व आपले जीवन त्याच्यासाठी समर्पित करावे, म्हणून आपण प्रार्थना करूया. 
३.    युवकांना नोक-या मिळाव्यात, गरजवतांच्या गरजा पूर्ण व्हाव्यात, आजा-यांचा आजार दूर व्हावा, भटकलेल्यांना मार्ग सापडावा, व्यसनाधीन झालेल्यांची व्यसनातून मुक्कता व्हावी, म्हणून आपण प्रार्थना करूया.
४.    आपल्या देशात नेहमी शांती नांदत राहावी, द्वेष-मत्सर दूर व्हावा, सर्वांना समानतेचा हक्क व वागणूक मिळावी, म्हणून आपण प्रार्थना करूया.
५.   यंदाच्या वर्षात भरपूर पाऊस मिळावा, शेतक-यांच्या सर्व गरजा पूर्ण व्हाव्यात व सर्वांनी शांतीने, प्रेमाने रहावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.