Tuesday, 24 June 2014

Reflections for the homily by: Malcolm Dinis.










संत पिटर व संत पौल


“आपण ख्रिस्त, जिवंत देवाचे पुत्र आहा”


दिनांक २९/०६/२०१४.
पहिले वाचन: प्रेषितांचे कृत्ये १२:१-११.
दुसरे वाचन: २ तिमथी ४:६-८, १७-१८.
शुभवर्तमान: मत्तय; १६:१३-१९.

प्रस्तावना:

आज ख्रिस्तसभा संत पेत्र आणि संत पौल या दोन महान संतांचा सण साजरा करीत आहे. संत पेत्र हा एक कोळी होता परंतु त्याने ख्रिस्ताला जिवंत देवाचा पुत्र म्हणून श्रद्धेने स्वीकारले. म्हणूनच अनुभवाने महान असलेल्या ह्या ज्येष्ठ शिष्यांवर प्रभू येशू ख्रिस्ताने संपूर्ण ख्रिस्तसभेची जबाबदारी सोपवली. संत पौल हा ख्रिस्तसभेतील एक महान आणि प्रतिभाशाली सुवार्ता प्रचारक होता. अनेक प्रकारचा छळ सोसून आणि विरोध सहन करूनही संत पौलाने आणि पेत्राने ख्रिस्ती धर्म पसरविला.
आजच्या पहिल्या वाचनात ख्रिस्ती मंडळीच्या एकाग्र प्रार्थनेमुळे संत पेत्राची तुरूंगातून कशी सुटका होते हे दर्शविले आहे. तसेच आजच्या दुस-या वाचनात संत पौल आपल्या आयुष्याचा जमाखर्च मांडताना म्हणतात, ‘जे समृध्द ते मी केले आहे. माझी धाव संपविली आहे व आता माझ्यासाठी नितिमत्वाचा मुकूट ठेविला आहे’.
आजच्या शुभवर्तमानात येशू हा ख्रिस्तअसल्याची कबूली पेत्र देत आहे. संत पौलासारखा सुवार्ता प्रसाराचा उत्साह आम्हा सर्वांना लाभावा म्हणून ह्या पवित्र मिस्साबळीमध्ये परमेश्वराकडून विशेष कृपा मागूया.

पहिले वाचन (प्रेषितांचे कृत्ये १२:१-११):

हेरोद राजा रोमी बादशाहाचा मित्र होता. यहुदी लोकांना खुष करण्यासाठी ख्रिस्ती मंडळीचा छळ करत पेत्राला मारण्याच्या उद्देशाने त्याने त्याला पकडून तुरूंगात टाकले. पेत्र तुरूंगातून निसटून जाण्याची शक्यताच नव्हती. त्याच्या हातात साखळ दंड होता व चार शिपाई सतत त्याची राखण करीत होते.
जे मनुष्याला अशक्य असते ते देवाला शक्य असतेहे ख्रिस्ती मंडळीला माहित होते म्हणून ते अत्यंत कळकळीने व एक चित्तेने प्रार्थना करीत असता पेत्राची तुरूंगातून सुटका झाली.

दुसरे वाचन ( २ तिमथी ४:६-८, १७-१८):

संत पौल लवकरच प्रभूकडे जाणार होता हे त्याला कळून चुकले होते. आपल्या जीवनात तो ख्रिस्ताशी सतत एकनिष्ठ राहिला होता. सत्यासाठी तो स्थिर उभा राहिला. ख्रिस्ताच्या सुर्वातेचे सत्य राखण्यासाठी त्याने कितीतरी कष्ट घेतले होते. आपल्या सर्व संकटामध्ये, दुःखामध्ये, अडचणीमध्ये त्याने सतत प्रभूकडे लक्ष केंद्रित केले व आपला विश्वास शेवटपर्यंत बळकट ठेवला म्हणूनच पौल म्हणतो की, जे समृध्द ते मी केले आहे, माझी धाव संपविली आहे, विश्वास राखिला आहे.
शुभवर्तमान (मत्तय; १६:१३-१९):
येशू हा ख्रिस्त आहेअशी कबूली पेत्राने दिली. पेत्राला हे सत्य स्वतःच्या अक्कल हुषारीने समजले नव्हते, तर देवानेच त्याला ते प्रगट केले होते.
येशू हा ख्रिस्त आहेयाच सत्यावर ख्रिस्त आपली मंडळी रचणार होता. स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या सोपविणे म्हणजे एक अधिकाराचे चिन्ह आहे. ख्रिस्ताने पेत्राला व प्रेषितांना सुर्वातेची घोषणा करून स्वर्गात जाण्याचा मार्ग खुला करण्याचा अधिकार दिला. या अधिकाराचा उपयोग त्यांनी पेन्टेकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली केला.

सम्यक विवरणः

मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात? (१३)
आपली खरी ओळख लोकांना झाली आहे की नाही हा येशू ख्रिस्तासमोर प्रश्न होता. येशू कोण आहे याविषयी लोकांत अनेक कल्पना होत्या. प्राचीन संदेष्ट्यातील कोणी एक जिवंत झाला आहे असे सुध्दा त्यांना वाटत होते. लोकांच्या अपेक्षा तसेच अंदाजही निरनिराळे होते. येशू ख्रिस्ताने आपल्या पित्याची शिकवण लोकांना दिली होती व आपल्या महान कृत्यांनी लोकांची मने परमेश्वराकडे वळवळी होती. आता संधी होती ती म्हणजे लोकांच्या विचारांची; येशूला खरोखर त्यांनी देवाचा पुत्र म्हणून ओळखले होते का? म्हणून येशूने आपल्या शिष्यांना त्याच्याविषयी लोकांचे मत काय आहे असे विचारले.

आपण ख्रिस्त, जिंवत देवाचे पुत्र (१६):
मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात? ह्या प्रश्नावर शिष्यांनी वेगवेगळी उत्तरे दिली परंतु शिमोन पेत्राचा अंदाज अचूक होता तो म्हणाला, ‘आपण ख्रिस्त, जिंवत देवाचे पुत्र आहा.ही त्याची अंतःप्रेरणा होती. ह्या पेत्राच्या अंर्तज्ञानामुळे येशू त्याला विशेष अधिकार देतो.
इस्त्राएल लोक ज्या मसीहाची वाट पाहत होते व ज्याच्या येण्याविषयीचे भविष्य जुन्या करारात केले होते त्याच मसिहाचीकिंवा ख्रिस्ताचीपेत्राने कबुली दिली होती. यहुदी लोकांनी ख्रिस्ताला तो चांगला आहे, तो थोर आहे असे म्हटले. पण तो सर्वात चांगला, सर्व मानव जातीत श्रेष्ठ, सर्वात मोठा संदेष्टा असे कधीच मानले नाही. परंतु जेव्हा ख्रिस्ताची खरी ओळख पेत्राच्या शब्दाने होते हे ऐकून ख्रिस्ताला किती समाधान वाटले असेल? पेत्राने येशू हाच ख्रिस्त आहे असे ओळखल्यावर तो त्यांना स्वतःचे दुःखसहन, मरण व पुनरूत्थान याविषयी शिक्षण देऊ लागला.

मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन (१९)
पेत्र ह्या नावाचा अर्थ खडक असा होतो. ख्रिस्ताने पेत्राला स्वर्ग राज्याच्या किल्ल्या सोपविल्या म्हणजेच संपूर्ण ख्रिस्तसभेची काळजी त्याच्यावर सोपविली. किल्ली हे अधिकाराचे चिन्ह आहे. पेत्राला येशू ख्रिस्ताने जो अधिकार दिला आहे तो सत्ता गाजविण्यासाठी नव्हे तर हा अधिकार सेवा करण्यासाठी आहे. अधिकार नसला तर सेवा करणे कठीण जाते. म्हणून येशू ख्रिस्त पेत्राला अधिकारही देतो व जबाबदारीही देतो. हा अधिकार इतरांसाठी आहे, तो स्वतःसाठी नाही. ज्याला येशूचा खराखुरा अनुभव येतो तो स्वतःचा राहत नाही. तो स्वतःला काही प्रमाणात विसरून जातो. त्याला आंतरिक स्वातंत्र्य मिळते, त्या आंतरिक स्वातंत्र्यातून तो इतरांकडे वळतो. म्हणूनच ख्रिस्ताने पेत्राला व प्रेषितांना सुवार्तेची घोषणा करून स्वर्गात जाण्याचा मार्ग खुला करण्याचा अधिकार दिला.

बोध कथाः

. एकदा एका प्रियसीने आपल्या प्रियकराच्या घराचा दरवाजा वाजवला. घरामधून आवाज आला, ‘कोण आहे?’ प्रियसीने उत्तर दिले, ‘मी आहे.घरामधून परत आवाज आला. इथून परत जा, हे घर आपल्या दोघांना सामावून घेणार नाही.प्रियसी तेथून निघून गेली व आपल्या प्रियकराच्या शब्दांवर बराच विचार केला व परत येऊन प्रियकराच्याघराचा दरवाजा वाजवला. मधून आवाज आला, ‘कोण आहे?’ पण ह्या वेळेला प्रियसीचे उत्तर होते, ‘तूच आहेस.असे उत्तर देताच दरवाजा लगेच उघडला गेला.
(येशू ख्रिस्ताला माहित करून घ्यायचे होते की खरोखर आपल्या शिष्यांच्या हृदयात त्याच्यासाठी जागा आहे का? म्हणून तो त्याना प्रश्न करतो, लोक कोण म्हणून मला ओळखतात?)

. धर्मगुरू झाल्यानंतर फा.थॉमस ह्यांची बदली एका शहरापासून दूर अश्या गरीब मागासलेल्या गावामध्ये झाली. शैक्षणिक व आध्यात्मिक दृष्ट्या ते गाव फारच मागासलेले होते. परंतू जेव्हा फा.थॉमसने ह्या गावात पाऊल टाकले तेव्हा सर्वप्रथम शिक्षणाची सोय केली, त्यासाठी त्यांना पैशांची गरज होती म्हणून त्यांनी शहराकडे जाऊन श्रीमंत-दानशूर माणसांकडून अक्षरशः भीक मागितली व स्वतःचे जे होते-नव्हते ते सर्व गावाच्या विकासासाठी विकून टाकले व गावाला नवीन दिशा दाखवली. आज त्या गरीब गावाचा विकास फा.थॉमसच्या परिश्रमामुळे झाला व त्यांच्या पुण्याईमुळेच आज त्या गावामध्ये शैक्षणिक, आध्यात्मिक व सर्वच बाबतीत प्रगती झालेली आहे. ह्याचे सर्व श्रेय फा.थॉमस ह्यांना जाते.
आजच्या दुस-या वाचनात संत पौलाच्या पत्रामध्ये म्हटल्याप्रमाणे फा.थॉमससाठी आपण इतकेच म्हणू शकतो, “मी माझी धाव संपविली आहे, आता माझ्यासाठी नितीमत्वाचा मुकूट ठेवला आहे.” (२ तिमथी; ४:६)  
 
मनन-चिंतनः

आज ख्रिस्तसभेकडे भरपूर अधिकार आहेत; भरपूर सत्ता आहेत. ही सत्ता व अधिकार केवळ ख्रिस्ती माणसांसाठी नाही, तर सर्व गरजूंसाठी आहे. यासाठी ख्रिस्तसभेच्या अधिकार वर्गाला आपल्या कोषातून बाहेर पडावे लागेल. आज ख्रिस्ती माणूसही आपल्या अधिकाराचा दुरूपयोग करतात. ह्याचे एक मुख्य कारण म्हणजे आम्हाला ख्रिस्ताच्या खराखुरा अनुभव आलेला नाही. आम्ही ख्रिस्ताची शिकवण जाणतो, ख्रिस्ताची आम्हाला तात्विक ओळख आहे. पण त्या ओळखीद्वारे आमचा अंहकार पुसला जात नाही. त्यामुळे आम्ही स्वतःला विसरत नाही, आम्हाला आंतरिक स्वातंत्र्य मिळत नाही, म्हणून अधिकाराचा, सत्तेचा फायदा आपण आपल्यासाठी करून घेत असतो.
आज आपण भौतिक ज्ञानाकडे अधिक लक्ष पुरवत आहोत. आजच्या स्पर्धात्मक जगात त्याची गरज आहे, पण आध्यात्मिक मूल्यांकडे लक्ष पुरवले नाही तर आपण पोकळ राहू, म्हणूनच ज्याला येशूचा खराखुरा अनुभव येतो तो स्वतःचा राहत नाही. येशू ख्रिस्त सर्वांसाठी आला होता. अंत:ज्ञानानेझालेला येशूचा सेवक सर्वांचा सेवक बनतो. त्याला आंतरिक स्वातंत्र्य मिळते व त्या आंतरिक स्वातंत्र्यातून तो इतरांकडे वळतो.
येशू ख्रिस्ताने आपल्याला स्वर्ग-राज्याच्या किल्ल्या दिल्या आहेत म्हणजे भौतिक मूल्यांपलीकडे नेण्याचा अधिकार ख्रिस्ताने आम्हाला दिला आहे, ही जबाबदारी ख्रिस्ताने आम्हाला दिली आहे. ही जबाबदारी कठीण आहे पण ख्रिस्ताचा परमात्मा आपल्याबरोबर आहे असा विश्वास ठेवून आपल्या जीवनाला नवीन सुरूवात करूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसादः हे प्रभो, आमच्या प्रार्थना स्विकारून घे.
. आपले परमाचार्य पोप फ्रान्सिस, कार्डिनल्स, बिशप्स, धर्मगुरू, धर्मबंधू-भगिनी व सर्व प्रांपचिक त्यांच्या कार्याद्वारे आणि शुभसंदेशाने येशू ख्रिस्ताची खरी ओळख संपूर्ण जगाला मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
. आज आपण संत पिटर व संत पौल ह्यांचा सण साजरा करीत असताना, जे लोक मिशन भागात काम करीत आहेत त्यांची आपण विशेष आठवण करूया. त्यांना देवाची विशेष कृपा मिळावी व संत पिटर व पौल प्रमाणे त्यांची श्रध्दा बळकट होऊन त्यांनी इतरांचीही श्रध्दा बळकट करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
. ख्रिस्ताच्या मळ्यात कार्य करण्यासाठी आपल्या परिसरातील अनेक तरूण-तरूणींना पुढे येण्यास पवित्र आत्म्याची प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
. आपल्या धर्मग्रामात जे लोक असाध्य आजाराने पछाडलेले आहेत त्यांना परमेश्वरी कृपेचा अनुभव यावा आणि नवजीवनाची वाट त्यांना दिसावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
. आपण आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक गरजांसाठी प्रार्थना करूया.

No comments:

Post a Comment