Reflections for homily By:- Malcom Patil.
येशूच्या अतिपवित्र शरीराचा
आणि रक्ताचा सण
दिनांक: २२/६/२०१४.
पहिले वाचन: अनुवाद ८:२-३, १४-१६.
दुसरे वाचन: १ करिंथ १०:१६-१७.
शुभवर्तमान: योहान ६:५१-५८.
प्रस्तावना:
ख्रिस्ताठायी जमलेल्या माझ्या प्रिय भाविकांनो, आज
आपण प्रभू येशूच्या शरीर व रक्ताचा सोहळा साजरा करीत आहोत. ख्रिस्ती धर्मात सर्वात
मोठी प्रार्थना म्हणजे पवित्र मिस्साबली होय. पवित्र मिस्साबलीदानात खुद्द प्रभू
येशू ख्रिस्त आपल्यात उपस्थित असतो, त्याच बलिदानात येशूच्या वधस्तंभावरील पवित्र
रक्ताचे स्मरण केले जाते. पवित्र ख्रिस्तप्रसादाच्या वेळी आपण भाकरीच्या रुपात खुद्द
प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या अंतकरणात स्वीकारत असतो.
इस्रायल जनता चाळीस वर्षे रानात भटकत असताना देवाने त्यांचे
कशाप्रकारे रक्षण केले व त्यांना स्वर्गीय मान्ना देऊन त्यांचे पोषण केले याचा
वृतांत आजच्या पहिल्या वाचनात सांगण्यात आला आहे. आपण सर्वजण एक भाकर व एक शरीर
असून एका भाकरीचे भागीदार आहोत असे पौल आजच्या दुस-या वाचनात स्पष्ट करून सांगतो.
तर आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, “स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे, ह्या भाकरीतून जो
कोणी खाईल तो सर्वकाळ जगेल”.
प्रभू येशू ख्रिस्त या साक्रामेंतामध्ये जिवंतपणे हजर आहे,
त्याच्या सानिध्यात बसण्यासाठी व त्याचा संदेश ऐकण्यासाठी आम्ही तयार आहोत का? जर
कळत नकळत आपण प्रभू येशू ख्रिस्ताला योग्य स्थान दिले नसेल तर आपण ख-या अंतकरणाने प्रभू
येशूची क्षमा मागूया व भक्तीने ह्या पवित्र मिस्सामध्ये भाग घेऊया.
पहिले वाचन: अनुवाद ८:२-३, १४-१६
देवाचे आज्ञापालन केवळ समजून-उमजून नव्हे तर ते अंत:करणपुर्वक
केले पाहिजे. अंतकरण तर नेहमीच आपल्या वाटेने जाण्याची संधी शोधीत असते. या मानवी
दुर्बळपणावर अनुवादाच्या पुस्तकात विशेष लक्ष दिले आहे. इस्रायली लोकांना लीन व
नम्र करण्यासाठी रानातला अनुभव त्यांना दिला होता आणि हा अनुभव खडतर असला तरी तोही
एक देणगी असाच होता व लोकांना या अनुभवाचे स्मरण कायम रहावे अशी योजना केली होती.
दुसरे वाचन: १ करिंथ १०: १६-१७
पौलाने ख्रिस्ताकडे आणलेल्या त्याच्या बंधूनी मूर्तिपूजेचा
धोका लक्षात घेऊन, देवळात जाऊन भोजन करणे टाळावे हेच त्यांना बरे आहे. या बाबतीत
त्यांनी आणखी नीट विचार करावा यासाठी पौलाने दोन साम्यदर्शक उदाहरणे देऊन त्यांना
आवाहन केले आहे. यातील पहिले उदाहरण, प्रभूभोजना संबधीचे आहे. येशूने आपल्या
मरणापुर्वीच्या रात्री द्राक्षरसाच्या प्यालाचे महत्व नव्याने सागितले. हा प्याला
वधस्तंभावर सांडल्या जाणा-या रक्ताचे साधन होते. त्याचप्रमाणे प्रभूभोजनाच्या समयी
ख्रिस्ती लोक एकाच भाकरीतून भोजन घेतात व या वास्तुस्थितीवरून ते सर्व ख्रिस्ताचे
आहेत हे स्पष्ट होते.
सम्यक विवरण:
शुभवर्तमान: योहान ६:५१-५८.
‘मी जीवनाची भाकर
आहे, मी स्वर्गातून उतरलो आहे’, येशू ख्रिस्ताची ही विधाने ऐकून तेथे जमलेल्या
लोकांना मोठे आश्चर्य वाटले. ही विधाने आजही खरी आहेत. इस्रायल लोकांनी चाळीस
वर्षे अरण्यात मान्ना खाल्ला तरी त्यांना सार्वकालिक जीवन मिळाले नव्हते. ख्रिस्त
स्वतः सार्वकालिक जीवन देणारा होता. हे जीवन त्याच्यावर विश्वास ठेवून, म्हणजे
त्याचा स्वीकार करून मिळते. सार्वकालिक जीवन जगाला देता यावे यासाठी येशू
ख्रिस्ताला वधस्तंभावर मरण सहन करावे लागले, त्याचा देह वधस्तंभावर खिळला गेला.
त्याचे रक्त बहुतांच्या खंडणीसाठी त्या वधस्तंभावर वाहिले.
देह या शब्दाने येशूच्या मानवी जीवनाचा उल्लेख होतो. पण
यहुद्यांनी त्याविषयी गैरसमज करून घेतला, त्यांनी येशूचे बोलणे शब्दशः घेतले
म्हणून त्यांना त्याचा आंतरिक अर्थ समजलाच नाही. येशूच्या शब्दामधील आध्यात्मिक
अर्थाच्या गाभ्यापर्यंत यहुद्यांची मजल गेली नाही यात नवल नाही; कारण हे समजणे
केवळ विश्वासाद्वारेच शक्य होते. येशूचे देह व रक्त सेवन करणे ही पूर्णपणे
विश्वासाची कृती आहे.
यहूदी लोकांना येशू आत्मिक दृष्टीकोनातून बोलत होता हे
समजले नाही म्हणून ख्रिस्ताने हे अधिक स्पष्ट केले. हे जीवन, ख्रिस्ताने त्याचे
शरीर व रक्त अर्पण केल्यामुळे मिळणार होते. अर्पणाच्या कोकराचा वध केल्यावर ते
रक्त वेदीच्या सभोवती ओतीत व कोकराचा देह सेवन करीत. ‘सेवन करणे व पिणे’ हे उदगार
ख्रिस्ताच्या मरणाद्वारे तो जे सार्वकालिक जीवन देऊ शकणार होता याचे सूचक आहेत. या
अर्थाने, जो ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन मिळते.
बोध कथाः
१. इ. स. १२६३ सालची घटना, प्रेग गावचे फा. पीटर नावाचे एक
जर्मन धर्मगुरू सेवाभावी आणि धार्मिक असूनही मिस्साबली अर्पण करताना पवित्र भाकर व
दाक्ष्रारस यांचे येशूच्या शरीरात व रक्तात रूपांतर होते या श्रध्देबाबत सांशक
होते. ते एकदा रोमच्या तीर्थयात्रेला जात असताना बोल्सेना येथे उतरले. तेथे संत
ख्रिस्तीनाच्या थडग्यावर उभारलेल्या ख्रिस्तमंदिरात मिस्साबली अर्पण करताना
त्यांच्या मनात वरील शंका होतीच. तत्वपालटाच्या वेळी त्यांनी ख्रिस्ताचे शब्द
उच्चारून भाकर उंचावली आणि अचानक त्या भाकरीतून रक्ताचे थेंब पडू लागले. फा. पीटर
यांचे हात आणि वेदीवस्त्र रक्ताने भिझून गेले. फादरांना मोठा धक्काच बसला, भांबावून
गेलेल्या फा. पीटर यांना त्यांच्या इच्छेनुसार पोप महाशयांकडे नेण्यात आले. पोप
महाशयांनी फा. पीटर यांचे म्हणणे ऐकून घटनेची संपूर्ण चौकशी करण्याचा आदेश दिला.
त्यानंतर सदर पवित्र भाकर व वेदीवस्त्र मागविण्यात आले. स्वतः पोप महाशयांनी
चमत्कारीक भाकर व रक्ताचे डाग पडलेले वेदीवस्त्र स्विकारून महामंदिरात मोठ्या
भक्ती भावाने ठेवले आणि ऑगस्ट १२६४ साली पोप महाशयांनी आपल्या आदेशाद्वारे ख्रिस्ताच्या
अतिपवित्र शरीराचा व रक्ताचा सण जाहीर केला.
२. एका खेड्यातील एका शाळेत मुलांनी विज्ञानाचे प्रदर्शन भरविले होते. ते
प्रदर्शन पहायला जगप्रसिध्द संशोधक थॉमस एडिसन गेला. तेथे त्याला कुणी ओळखले नाही.
प्रदर्शनात एडिसनने छोट्या मुलांनी बनविललेली विजेवर चालणारी एक मोटार पाहिली.
एडिसनने एका मुलाला विचारले, “ही मोटार कशावर चालते?” मूलगा म्हणाला वीजेवर.
एडिसनने विचारले, “विज म्हणजे काय?” मुलांना काही उत्तर देता येईना. त्यांनी
त्यांच्या मास्तरांना बोलावले, त्यांना देखील उत्तर येईना. त्यांनी हेडमास्तरांना
बोलावले, त्यांना सुध्दा उत्तर ठाऊक नव्हते. तेव्हा एडिसन म्हणाला, मुलांनो
भांबावून जाऊ नका. मी आहे थॉमस एडिसन, मीच वीजेचा शोध लावला, परंतू मला पण माहित
नाही की वीज ही काय गोष्ट आहे.
मनन चिंतनः
ख्रिस्ती धर्मात अशी अनेक धर्मरहस्ये आहेत की ती आमच्या
बुध्दीच्या पलिकडची आहेत. रासायनिक प्रयोग शाळेत ती सिध्द् करता येत नाहीत. मात्र
संताच्या व प्रेषितांच्या सांगण्यावरून किंवा आमच्या आत्मिक प्रेरणेवरून त्याचे
अस्तित्व आम्हाला मान्य करावे लागते आणि यालाच म्हणतात श्रध्दा.
आज आपण ख्रिस्ताच्या अतिपवित्र शरीराचा व रक्ताचा सण आपण
साजरा करीत आहोत, भाकररूप ख्रिस्त-शरीर हे ख्रिस्ती धर्मातील एक महान रहस्य आहे.
ख्रिस्ताचे आम्हाला दिव्य दर्शन घडावे, आमचे आत्मिक पोषण व्हावे, त्याच्या मायेचा
ओलावा आम्हाला सदैव मिळावा, त्याची आम्हाला नित्य सोबत लाभावी म्हणून ख्रिस्त भाकररूप
बनला.
साध्या भाकरीहून ही भाकर दिसायला काही वेगळी नाही. या
भाकरीचे अणू परमाणूत विघटन केले तरी ख्रिस्त-शरीर आपल्याला त्यात सापडणार नाही. सुक्ष्म
दर्शन यंत्राखाली या भाकरीचे निरीक्षण केले तरी ख्रिस्त तेथे आपल्या नजरेला पडणार
नाही. या भाकरीचे आपण प्रयोग शाळेत रासानिक पुथ्थकरण केले तरी भाकरीतला ख्रिस्त
आपण वेगळा काढू शकणार नाहीत कारण हा भाकररूपी ख्रिस्त आपल्या दृष्टीच्या पलिकडे आपल्या स्पर्शच्या पलिकडे,
आपल्या इंद्रियाच्या पलिकडे आहे तरी सुध्दा: ‘जड स्वरूपी अदृश्य तू, परी
उपस्थित माझ्या सामोरी’ जडस्वरूपात तो अदृश्य असला
तरी ही भाकर ख्रिस्त-शरीर आहे ही वस्तुस्थिती आहे, ही आमची श्रध्दा आहे.
‘ग्रहण इंद्रिया हो हो गुढ
गोचर केवळ श्रध्देला’
इंद्रियाला गुढ आणि बुध्दीला अगम्य असलेल्या ख्रिस्ताचे हे
शरीर आम्ही श्रध्दारूपी डोळ्यांनी पाहत आहोत. आज आपण ख्रिस्ताच्या अतिपवित्र
शरीराचा व रक्ताचा सण आपण साजरा करीत आहोत या शूभ प्रसंगी आपण त्याचा स्विकार
करण्यास आणि त्याच्याशी एकजीव होण्यास पात्र ठरावे म्हणून प्रार्थना करूया.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: “हे प्रभो आमची श्रद्धा बळकट
कर.”
१. ख्रिस्त सभेची धुरा वाहणारे
पोप फ्रान्सीस, कार्डिनल्स, बिशप्स, फादर्स, सिस्टर्स, ब्रदर्स व इतर प्रापंचिक या
सर्वांवर देवाचा विशेष आर्शिवाद यावा व त्यांना त्यांच्या या पवित्र कार्यात
प्रभूचे मार्गदर्शन व कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. आज हा पवित्र सण साजरा करीत
असताना आपण सर्वांनी एकमेकांना समजून घ्यावे, आपल्या शरीररूपी मंदिरात देवाला
प्रथम स्थान द्यावे व आपले जीवन त्याच्यासाठी समर्पित करावे, म्हणून आपण प्रार्थना
करूया.
३. युवकांना नोक-या मिळाव्यात,
गरजवतांच्या गरजा पूर्ण व्हाव्यात, आजा-यांचा आजार दूर व्हावा, भटकलेल्यांना मार्ग
सापडावा, व्यसनाधीन झालेल्यांची व्यसनातून मुक्कता व्हावी, म्हणून आपण प्रार्थना
करूया.
४. आपल्या देशात नेहमी शांती नांदत
राहावी, द्वेष-मत्सर दूर व्हावा, सर्वांना समानतेचा हक्क व वागणूक मिळावी, म्हणून
आपण प्रार्थना करूया.
५. यंदाच्या वर्षात भरपूर पाऊस
मिळावा, शेतक-यांच्या सर्व गरजा पूर्ण व्हाव्यात व सर्वांनी शांतीने, प्रेमाने
रहावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment