Reflections for Homily by: Nevil Govind
पवित्र आत्म्याचा सण
“पवित्र आत्म्याचा स्वीकार करा.”
दिनांक: ०८/०६/२०१४.
पहिले वाचनः प्रेषितांची कृत्ये २: १-११.
दुसरे वाचन: १ करिंथकरांस पत्र १२: ३-७, १२-१३.
शुभर्वतमान: योहान २०:१९-२३.
प्रस्तावना:
आज आपण पवित्र
आत्म्याचा सण साजरा करीत आहोत. पेनटेकॉस्टच्या दिवशी म्हणजे पन्नासावा दिवस आला
तेव्हा अग्नीच्या जीभांसारख्या जीभा प्रत्येक शिष्यांवर एकएक अश्या बसल्या आणि ते
सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले हे आपणांस आजच्या पहिल्या वाचनातून ऐकण्यास
मिळते. दुस-या वाचनात संत पौल म्हणतो, ‘पवित्र आत्म्याच्या योगे बोलल्यावाचून
कोणालाही येशू हा प्रभू आहे असे म्हणता येत नाही. कृपादानाचे निरनिराळे प्रकार
आहेत, तरी आत्मा एकच आहे.
आजचे शुभवर्तमान
सांगते की, ‘पुनरुत्थानानंतर येशूने आपल्या प्रेषितांना दर्शन देऊन त्यांना पवित्र
आत्म्याचे दान दिले आणि जसे पित्याने येशूला पाठवले होते तसे येशूनेही त्याच्या
शिष्यांस पाठविले. आजच्या ह्या सणाच्या दिवशी आपणावरसुद्धा पवित्र आत्म्याच्या दानांचा
वर्षाव व्हावा म्हणून आजच्या ह्या मिस्साबलीदानात प्रभूकडे प्रार्थना
करूया.
सम्यक विवरण:-
पहिले वाचनः प्रेषितांची कृत्ये २: १-११.
यहूदी धर्मामध्ये वल्हांडण सणानंतर ५०
दिवसांनी हंगामाचा सण पाळीत. गव्हाचे पीक कापून आणले की हा सण साजरा करीत. एका
यहूदी परंपरेनुसार नियमशास्त्र देणे आणि करार नव्याने करणे यांच्याशी देखील ह्या
सणाचा संबंध होता. या सणाला पन्नासावा दिवस म्हणत(पेनटेकॉस्ट). ह्या
दिवशी सकाळी प्रभूचे शिष्य व इतर बंधूजन एका घरात होते. एकाएकी सुसाट्याचा वारा
वाहावा तसा आवाज झाला व पवित्र आत्मा त्यांच्यावर उतरला.
येशू ख्रिस्ताने त्यांना असे घडेल हे
सांगितले होते. या घटनेला प्रभू येशूने ‘पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा होणे’ असे
म्हटले होते(प्रेषितांची कृत्ये १:५). पवित्र
आत्म्याने शिष्यांना विशेष धैर्य दिले.
दुसरे वाचन: १ करिंथकरांस पत्र १२: ३-७, १२-१३.
पवित्र आत्मा प्रत्येक विश्वास
ठेवणा-या व्यक्तीला आध्यात्मिक कार्य करण्यासाठी विशेष सामर्थ्य देतो. ह्या
सामर्थ्याला किंवा क्षमतेला आध्यात्मिक दान म्हटले आहे(ओवी.१). मूर्तिपूजक पुढारी
व तसेच काही यहूदी लोक येशू शापित आहे असे शिकवीत. जे असे शिकवीत ते पवित्र
आत्म्याच्या सामर्थ्याने असे म्हणत नव्हते हे पौलाने स्पष्ट केले. कित्येक स्वतःला
ख्रिस्ती म्हणविणारे खोटे शिक्षकही असे म्हणत.
जे
येशूला मनापासून प्रभू मानतात व त्याचे देवत्व मान्य करून त्याला प्रभू म्हणतात ते
पवित्र आत्म्याने चालविले आहेत. त्यांना ख्रिस्ताची ओळख आहे. अश्यांनाच मंडळीतील
सेवेकरिता आध्यात्मिक दाने पवित्र आत्म्याकडून मिळाली (ओवी ३). सर्व
विश्वासणा-यांना पवित्र आत्मा निरनिराळ्या क्षमता देतो (ओवी ४). त्याचा उद्देश असा
की, त्यांनी देवाची व त्याच्या मंडळीची सेवा निरनिराळी कार्ये करून करावी (ओवी
५,६). कार्य व सेवा भिन्न आहेत तरी देवपिता, देवपुत्र व पवित्र आत्मा ह्या सर्व कार्यांवर
नियंत्रण करतात.
शुभर्वतमान: योहान २०:१९-२३.
स्त्रियांनी रिकामी कबर पाहिली व कबरेजवळ मारियेला जिवंत
प्रभू भेटला. त्याच दिवशी सायंकाळी प्रभू येशूने आपल्या शिष्यांची भेट घेतली.
यहूदी धर्मपुढारी त्याचे कट्टर शत्रू झाले होते. येशूच्या शिष्यांनी त्याचे शरीर
कबरेतून चोरून नेले ही खोटी बातमी शत्रूंनी गावात पसरविली होती. शिष्य घाबरलेले व
गोंधळलेले होते. ते एका खोलीत दारे बंद करून बसले होते. भीतीने शिष्यांना ग्रासले
होते.
अकस्मात, त्यांचा प्रभू त्यांच्यामध्ये आला.
ख्रिस्ताला आत येण्यासाठी दार उघडावे लागले नाही. आपल्या धीर देणा-या आवाजात येशू
शिष्यांना म्हणाला, ‘तुम्हांस शांती असो’ व लगेच त्याने हातातील व कुशीतील जखमांचे
व्रण त्यांना दाखविले. शिष्यांनी आपल्या जिवंत प्रभूला ओळखले व प्रभूला पाहून
त्यांना आनंद झाला(ओवी २०).
प्रभू येशूने त्यांना आपली शांती दिली व
ज्या सेवेसाठी त्याने त्यांना नेमले होते त्याची आठवण करून दिली. ते येथून पुढे,
जो येशू मेला व जिवंत झाला त्याच्याविषयी सांगणास जाणार होते. ख्रिस्ताने त्यांना
पवित्र आत्मा दिला व तो आत्मा त्या प्रत्येकात वस्ती करू लागला(ओवी २२). जे
ख्रिस्ताचा स्वीकार करतात त्यांच्यात पवित्र आत्मा तेव्हाच वस्ती करावयास येतो. पेनटेकॉस्टच्या दिवशी पवित्र
आत्मा शिष्यांवर उतरला व त्याने ख्रिस्ताची मंडळी अस्तित्वात आणली. तेव्हापासून
शिष्य पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने साक्ष देऊ लागले. जे ख्रिस्तावर विश्वास
ठेवतील त्यांना पापक्षमा मिळेल अशी शिष्यांनी घोषणा केली.(ओवी २३).
बोधकथा:
इ.स. विसाव्या
शतकाच्या मध्यवर्तीस बिली ग्रेहम हा एक उत्तम सुवार्तिक होता. तो धर्मयुद्धात
प्रवचनासाठी नावाजलेला होता. एकदा त्याने विद्याथी म्हणून एका पुनरजीवन मीटिंगमध्ये
आपली उपस्थिती दाखवली होती. त्या मीटिंगमध्ये एक प्रवचनकर होता जो सर्व लोकांना
प्रश्न विचारत असे. त्याचा प्रश्न: ‘तुमचा पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा झालेला आहे
का?’ आणि ज्या व्यक्तीला त्याने प्रश्न केला तो उत्तर देत असे, ‘होय.’ तदनंतर त्या
प्रवचनकाराने अचानक बिली ग्रेहमला प्रश्न विचरला, ‘तरुण माणसा, पवित्र आत्म्याने
तुझा बाप्तिस्मा कधी झाला होता?’ तेव्हा ग्रेहम म्हणाला, ‘ज्या क्षणाला मी येशू हा
माझा तारणारा आहे असे स्वीकारतो तेव्हा माझा पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा होतो.’
ज्या क्षणाला
आपण येशू हा माझा तारणारा आहे असे स्वीकारतो(आपल्या बाप्तीस्म्यावेळी), आपण पवित्र
आत्म्याचा स्वीकार करतो.
मनन चिंतन:
आज आपण पवित्र आत्म्याचा सण साजरा
करीत आहोत. पेनटेकॉस्टच्या दिवशी येशूने
आपल्या शिष्यांना पवित्र आत्म्याला पाठवण्याचे दिलेले वचन पूर्ण केले. येशूच्या स्वर्गरोहणाआधी
येशू आपल्या शिष्यांस म्हणाला, “तरी पण मी
तुम्हांला खरेच सांगतो; मी जातो हेच तुमच्या हिताचे आहे! कारण मी गेलो नाही तर तो
साह्यकर्ता तुमच्याकडे येणार नाही! मी गेलो तर त्याला तुमच्याकडे पाठवून देईन”(योहान १६:७).
अ) पवित्र आत्मा कोण आहे?
पवित्र आत्मा
हा (person) व्यक्ती आहे. येशूने
कधीही पवित्र आत्म्याला (it) नपुसकलिंग असे म्हटले नाही. योहानाच्या शुभर्वतमानात पवित्र
आत्म्याला व्यक्ती (he) असे संबोधले आहे (योहान.
अध्याय १४,१५&१६). पवित्र आत्मा हा काही जोर, प्रभाव किंवा शक्ती नाही किंवा
वस्तू नाही; पवित्र आत्मा हा खरा व्यक्ती आहे.
बायबलमधून
आपणास कळते की पवित्र आत्म्याला भावना, समज आणि इच्छा आहे. पवित्र आत्मा माणसाची
सर्व कार्य करतो. पवित्र आत्मा बोलतो, तो मध्यस्ती करतो, तो साक्ष देतो, तो निदर्शक
आहे. तो आज्ञा करतो, तो मार्गदर्शन करतो, तो नेमणूक करतो.
·
पवित्र आत्मा
बोलतो: “आत्मा मंडळ्यांस काय म्हणतो हे ज्याला
कान आहेत त्याने ऐकावे”(प्रकटीकरण २:७).
·
पवित्र आत्मा
मध्यस्ती करतो: “तसेच आत्माही आपल्या अशक्तपणांत
आपल्याला हातभार लावतो; कारण आपण यथायोग्य कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक
नाही; पण आत्मा स्वतः अनिर्वाच्य कन्ह्ण्याने मध्यस्थी करितो”(रोमकरांस ८:२६).
·
तो साक्ष
देतो: “परंतु जो
पित्यापासून निघतो, ज्याला मी पित्यापासून तुम्हांकडे पाठवीन तो कैवारी म्हणजे
सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो माझ्याविषयी साक्ष देईल”(योहान १५:२६).
·
पवित्र आत्मा
मार्गदर्शन करतो: “कारण जितक्यांना
देवाचा आत्मा चालवीत आहे तितके देवाचे पुत्र आहेत”(रोमकरांस ८:१४).
पवित्र
आत्मा हा फक्त माणूस नाही; तर तो दैवी व्यक्ती आहे. संपूर्ण बायबलमध्ये आपणास
स्पष्ट होते की, देवाचे सर्व गुणधर्म पवित्र आत्म्यात समाविष्ट आहेत. पवित्र आत्मा
सार्वकालिक आहे(इब्री ९:१४), पवित्र आत्मा सर्वशक्तिमान आहे(लूक १:३५), पवित्र
आत्मा सर्वव्यापी आहे(स्तोत्र १३९:७), पवित्र आत्मा सर्वज्ञ आहे(१ करिंथ २:१०-११).
ब) आपण पवित्र आत्म्याचा स्वीकार
केव्हा करतो?
आपण पवित्र आत्म्याचा स्वीकार आपल्या
बाप्तीस्म्याच्यावेळी करितो. (ccc.no.1265).
ज्यावेळेला आपण ख्रिस्ताला आपला
तारणारा म्हणून स्वीकार करतो त्यावेळेला आपण पवित्र आत्म्याचा स्वीकार करतो. संत
पौल रोमकरांस लिहिलेल्या पत्रात म्हणतो, ““परंतु तुम्हांमध्ये देवाचा आत्मा
वसती करीत आहे, तर तुम्हीं देहाच्या अधीन नाही, आत्म्याच्या अधीन आहा. जर कोणाला
ख्रिस्ताचा आत्मा प्राप्त झालेला नसेल तर तो ख्रिस्ताचा नाही”” (रोमकरांस ८:९).बाप्तिस्मा एकदाच होतो
पुन्हा-पुन्हा नाही. पवित्र आत्म्यापासून वेगळा बाप्तिस्मा होत नाही.
क) पवित्र आत्म्याची कार्ये:
पुनर्जीवन/नवजीवन
आणि पावित्र्यता ही पवित्र
आत्म्याची कार्ये आहेत. पवित्र आत्मा आपणास देवामध्ये नवजन्म देतो आणि पवित्र
आत्म्याची दाने देऊन देवाच्या दैवी जीवनात पुढे जाण्यास आपणास बळकट करतो.
१) पुनर्जीवन/नवजीवन: येशू
म्हणाला, “तो येऊन
पापाविषयी, नितीमत्वाविषयी व न्यायनिवाडयाविषयी जगाची खात्री करील””(योहान १६:८). आपण सर्वांनी पापात
जन्म घेतला व आपण सर्वजण पापात जगतो. संत पौल म्हणतो,“ “कारण सर्वांनी पाप केले
आहे आणि ते देवाच्या गौरवला उणे पडले आहेत””(रोमकरांस ३:२३).
आपल्याला
कधी-कधी आपल्या पापांची जाणीव नसते किंवा आपण पापांमध्ये जगतो हे आपण कबूल करत
नाही. अश्या वेळेस पवित्र आत्मा आपल्याला आपल्या पापांची जाणीव करून देतो. पवित्र आत्मा हा फक्त आपल्या पापांवर
प्रकाश पाडीत नाही तर येशू खिस्त हाच तारणारा आहे व तोच मार्ग, सत्य आणि जीवन आहे
हे आपल्याला पटवून देतो.
२) पावित्र्यता: “परजातीय स्वत:च देवाला मान्य असे
अर्पण व्हावेत आणि ते पवित्र आत्म्याकरवी शुद्ध केले जावेत” (रोमकरांस १५:१६). आपणास संत
होण्यासाठी पाचारण केले आहे असे संत पौल करिंथकरांस सांगतो(१ करिंथ १:२), आपण
दररोज ख्रिस्ताच्या सहवासात राहिलो पाहिजे आणि त्याचे शब्द पाळले पाहिजेत. येशू
ख्रिस्तात राहण्यासाठी, पृथ्वीचे मीठ होण्यासाठी आणि जगाचा प्रकाश बनण्यासाठी पवित्र
आत्मा आपणास त्याची दाने पुरवत असतो. जसा प्रकाश अंधाराला दूर करतो आणि मीठ
कुजण्यासाठी वेळ घेतो, तसेच प्रत्येक ख्रिस्ती लोकांनी पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने
आणि दानाद्वारे करावे. पवित्र आत्म्याच्या सानिध्याने आणि शक्तीने, आपण ह्या
अंधारलेल्या जगात प्रकाश आणि जीवन आणू शकतो. ह्या जगात आणि आपणात कायापालट
करण्यासाठी प्रभावशाली पवित्र आत्म्याची शक्ती आपल्या जवळ हजर आहे. आपण प्रार्थना
करूया की; देवाने आपणाला पवित्र आत्म्याने परिपूर्ण करावे.
विश्वासू लोकांच्या प्रार्थनाः
प्रतिसादः हे प्रभू आमची प्रार्थना ऐक.
१. आपल्या धर्माची धुरा वाहणारे परमगुरुस्वामी,
महागुरुस्वामी व इतर सर्व धार्मिक नेत्यांनी पवित्र
आत्म्याच्या साह्याने ख्रिस्ताची सुवार्ता जगजाहीर करावी म्हणून आपण प्रार्थना
करूया.
२.
पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार करण्यासाठी
आपण आपली योग्य रीतीने तयारी करावी व मिळालेल्या
दानांचा उपयोग दुस-यांच्या सेवेसाठी करावा म्हणून प्रार्थना करू या.
३. येणा-या शैक्षणिक वर्षात सर्व विद्यार्थ्यांनी
एकाग्रतेने अभ्यासावर लक्ष केंद्रित करून चांगले ज्ञान आत्मसात करावे म्हणून आपण प्रार्थना
करू या.
४.
ह्या पावसाळी हंगामात आपल्यास योग्य अश्या
पावसाचे प्रमाण लाभावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.
५. आपण आपल्या कौटुंबिक व सामाजिक गरजेसाठी
प्रार्थना करू या.
No comments:
Post a Comment