Tuesday, 25 November 2014

Reflections for the Homily By : Fr. Joel Pen



आगमन काळातील पहिला रविवार


दिनांक: ३०/११/२०१४
पहिले वाचन: यशया ६३:१६ब,१७,१९ब,६४:२-७
दुसरे वाचन: १ करिंथ १:३-९
शुभवर्तमान: मार्क १३:३३-३७

“सावध असा, जागृत रहा कारण समय जवळ आला आहे”

प्रस्तावना:

ख्रिस्ताठायी जमलेल्या प्रिय भाविकांनो, आजपासून ख्रिस्तसभा उपासनेच्या नवीन वर्षात पदार्पण करीत आहे आणि ही सुरवात आपण आगमन काळाने म्हणजे येशू येण्याच्या तयारीने करीत आहोत. आजची उपासना आपल्याला जागृत राहून आपली जबाबदारी योग्य रितीने पार पाडण्यास बोलावत आहे.
इस्रायल लोक देवाच्या विरुद्ध अति वाईट वृत्तीने वागले व त्यांनी पापे केली म्हणून आजच्या यशयाच्या पुस्तकातून घेतलेल्या पहिल्या वाचनात आपण त्यांना देवाकडे दयेची याचना करताना पाहतो. तर दुसऱ्या वाचनात पौल करिंथकरांस येशूच्या दुस-या आगमनाविषयी सुचना करीत आहे तसेच मार्कलिखित शुभवर्तमानाद्वारे येशुख्रिस्त आपणास जागृत राहण्यास निमंत्रण देत आहे.
आजच्या मिस्साबलीदानात सहभागी होत असताना आपण सदैव जागृत राहून आपल्याला प्रभूच्या आगमनाची योग्य ती तयारी करता यावी म्हणून प्रार्थना करूया.

पहिले वाचन: यशया ६३:१६ब, १७, १९ब, ६४:२-७

यशया हा परमेश्वराचा खरा सेवक व भविष्यवादी होऊन गेला, त्याने परमेश्वराला पाहिल्यापासून पूर्ण विश्वास ठेवला होता. तो म्हणत असे की तुच आमच्या जीवनाचे केंद्रस्थान आहेस.
त्याने देवाकडे केलेली दयेची याचना ह्या अध्यायात दिसून येते. कारण इस्रायल लोक देवाच्या विरुद्ध अति वाईट वृत्तीने वागले व खूप वाईट पापे त्यांनी केली होती. त्यांच्या अनैतिक आचारणामुळे ते देवापासून दुरावले होते, अश्या वेळी हा भविष्यवादी म्हणत आहे की हे देवा तुझ्यासारखा दुसरा देव नाही. तू ह्या लोकांना शाशन कर, हे लोक आम्हांस ओळखीत नाहीत, दुष्ट वर्तणुकीमुळे तुझे पवित्र स्थान ह्यांनी तुडवून टाकले आहे. तुझे वतन झालेले वंशाकरिता तू परत ये, यापुढे अध्याय ६४ मध्ये तो त्याची अंतर्यामी भावना अती कडक शब्दात बोलावून दाखवत आहे, तू या धरतीवर आला तर तुझ्या येण्याने पर्वत देखील कंपयमान होतील, अग्नी जसा काडया-कुडया भस्म करितो, अग्नीने जशी पाण्याला उकळी येते त्याप्रमाणे तुझ्या येण्याने प्रताप दाखव, जो तुझ्या नावाने धर्माचरण करतो व वागतो त्यांना तू भेट देतोस, अशा विश्वासानं तुझ्या येण्याने आमचा उद्धार कर, आम्ही पाला-पाचोळ्याप्रमाणे कमकुवत झालो आहोत. आमच्या अनितीमुळे आम्ही तुझ्यापासून दुरावलो आहोत. इतक्या तीव्र कळकळीने हा संदेष्टा देवाशी करुणेने बोलत आहे.

दुसरे वाचन: १ करिंथ १:३-९

या अध्यायामध्ये करिंथ नावाच्या गावी ज्यांनी ख्रिस्ताला स्वीकारले त्यांना पौलाने हे पत्र लिहिले आहे. हे ठिकाण ग्रीसजवळ आखीया प्रांताची राजधानी असलेले शहर होय. देवाने येशूद्वारे तुमच्यावर कृपा केली आहे व ते लोक येशूच्या वचनाप्रमाणे वागू लागले तेव्हा पौल त्यांना दुस-या आगमनाविषयी सुचना करीत आहे की तुम्हाला देवाने जी कृपादाने दिली आहेत त्यात तुम्ही अनितीमान होऊ नये म्हणून योग्य रितीने वर्तन करा नाहीतर तोच तुम्हाला दोष लावील. या शिवाय आणखी काही महत्वाच्या सूचना केल्या, त्या पुढील प्रमाणे दर्शविल्या आहेत:
  1. देवाने तुमच्यावर खरोखर कृपा केली आहे हे विसरू नका.
  2. येशूच्या ज्ञानात, बोलण्यात, आचरणात तुम्ही विश्वासनीय ठरलेले आहा.
  3. तुम्ही कृपादानाची वाट पहा, त्यात तुम्ही उणे पडू नका.
  4. येशूचे दुसरे आगमन होणार आहे. त्यात सहभागी होण्यासाठी तुमची निवड केली आहे. संसारिक कामात गुरफटून जाऊ नका. देवाने ज्या कार्यासाठी तुम्हास पाचारण केले ते काम आवडीने करीत रहा. प्रथम देवाच्या कामाला प्राधान्य द्या. ही देवाची आज्ञा आहे.


शुभवर्तमान: मार्क १३:३३-३७
तो दिवस आणि ती घटका: मार्कच्या अध्यायात देवाच्या विचारात किती चांगुलपणा आहे हे या अध्यायात आपणास शिकावयास मिळते. प्रभू येशू नेहमी दाखल्याच्या पद्धतीनेच लोकांना समजेल असे बोलत असे. मनुष्य नेहमी जागृत रहावा, सावध असावा म्हणून ह्या दाखल्यामध्ये तो प्रत्येकास सुचना करीत आहे. वास्तविक मार्क हा येशूचा शिष्य नव्हता परंतु तो प्रेषितांच्या सहवासातील एक व्यक्ती होता. येशूने एका कुलीन घराण्यातील नोकराची जबाबदारी कशी करावी व ते काय असते हे दर्शविले आहे. प्रत्येकाला मालकाने दिलेलं काम चोख करण्यास तो सांगतो व मालक घरधनी बाहेरगावी निघून जातो. चोर चोरी करून घरातील सर्व लुटून नेतील म्हणून सर्वांना दक्षतेत राहण्यास आदेश देतो कारण तो व ती घटका केव्हा येईल हे कुणालाच माहित नाही. त्याचप्रमाणे ह्या जगात देवाने त्याचं कार्य करण्यास ज्यांनी येशूला स्वीकारलं त्याने त्यांच्यावर काही जबाबदारी टाकली आहे ती आपण चांगल्या प्रकारे पार पाडावी अशी त्याची अपेक्षा आहे.

बोधकथा

एकदा धर्मगुरूने एका सभ्य गुह्स्थाला प्रश्न विचारला की तू सध्या काय करीत आहेस? त्या गुह्स्थाने उत्तर दिले मी इंजिनियरिंग करीत आहे. धर्मगुरूने पुन्हा विचारले ह्याची तुला काय गरज आहे? उत्तर मिळाले मला मोठी मानाची नोकरी मिळेल. धर्मगुरूने पुन्हा प्रश्न विचरला तुला नोकरी कशासाठी पाहिजे? पुन्हा उत्तर मिळाले मला भरपूर पैसा मिळविण्यासाठी आणि मग मी माझे लग्न अगदी मजेत करीन व आनंदाने जीवन जगेन. धर्मगुरूने प्रश्न विचारणे चालूच ठेवले व शेवटचा प्रश्न विचरला त्या नंतर तू काय करणार आहेस? त्या गृहस्थाने उत्तर दिले यापुढे मी काय करणार याचा अद्दाप विचार केला नाही. परंतु तसा मी खूप दिवस जगणार आहे व म्हातारा होऊन मरणार आहे. तसेच आणखी एका प्रश्नाने धर्मगुरूने त्याला बुचकळ्यात पाडले. तो प्रश्न म्हणजे तू तुझ्या मृत्यूनंतर विचार करू शकशील काय? तरुणाने उत्तर दिले, ‘नाही’ मग धर्मगुरू त्यांस म्हणाले मग तू आताच विचार का करू शकत नाही? प्रत्येक माणसाने आपला आजचा दिवस हा शेवटचा समजून आपल्यावर असलेली जबाबदारी सदा-सतर्क राहून प्रामाणिकपणे पार पाडावी.

मनन चिंतन

१.    परमेश्वराने मानवास ह्या पृथ्वीवर त्या निर्माणकर्त्या परमेश्वराची आयुष्यभर सेवा करण्यास व सुख भोगण्यास निर्माण केले आहे परंतू मनुष्याने प्रपंचात रमत न राहता सतत निर्माणकर्त्याच्या आज्ञेचे पालन करून दिलेली जबाबदारी योग्य रितीने पार पाडली पाहिजे. हे ज्ञान ज्यास समजले तो धन्य होय. कारण मनुष्याच्या मुत्युनंतरचे अंतीम खरे सुखी जीवन परमेश्वराच्या सहवासात सुरु होते यालाच शाश्वत जीवन म्हणतात. मृतुनंतरचे जीवन सामोरे ठेवून जगले पाहिजे. मृत्यू कधीही कुठल्याही वेळी येऊ शकतो. तसे अनअपेक्षित प्रकारे आणि अनअपेक्षित वेळी घडू शकते. ११ तारखेला सप्टेंबर २००१ साली अमेरिकेची शान असलेले वर्ल्ड ट्रेड सेंटर दहशतवाद्यांनी नष्ट केले. अगदी काही क्षणातच सर्वकाही राख झाले. आपल्याला आपली मृत्यूची वेळ आणि प्रकार ठाऊक नाही. म्हणूनच प्रत्येकाने चांगली कृत्ये करूनच आपल्या मरणाची तयारी केली पाहिजे. यासाठी प्रत्येकाने आपल्या जीवनात चांगले काम केले पाहिजे. संसारिक गोष्टीमध्ये गुरफटून न जाता देवाने ज्या गोष्टीसाठी आपणास पाचारण केले ते काम आवडीने व जबाबदारीने करत राहिले पाहिजे. कारण या विश्वाचा धनी, मालक प्रभू येशु आपल्याला दिलेले काम बघायला येणार आहे, यासाठी तो आपणास ईशारा देत आहे की तुम्ही बेसावध राहू नका; तर सदा जागृत रहा.

२.    आमच्या जीवनात आगमन काळ म्हणजे काय ते प्रथम समजून घेऊया. आगमन काळ याचा पूर्व इतिहास जाणून घेणे महत्वाचे आहे. देवाची योजना फार चांगली होती परंतु आदम आणि एवा यांनी देवाची आज्ञा मोडून पाप केले, हे पाप आणखी काही दिवसांनी वाढत गेले, तर ते कसे वाढत गेले हे यशया २४:४ ते ६ दाखवत आहे, “पृथ्वी शोकाकुल व कृश झाली आहे. जग झुरून कृश झाले आहे. पृथ्वीवरील प्रतिष्ठीत जण जर्जर झाले आहेत. पृथ्वी आपल्या रहिवास्यांकडून भ्रष्ट झाली आहे. कारण त्यांनी नियमांचे उल्लंघन केले आहे. यास्तव पृथ्वी शापाने ग्रासली आहे.” त्यासाठी देवाने अनेक संदेष्टे, भविष्यवादी पाठविले. त्यांनी भविष्यवाणी केली की तारणारा येणार आहे आणि तो म्हणजे खुद्द प्रभू येशू ख्रिस्त होय. यशयाने ही भविष्यवाणी तो आठशे वर्षे येण्यापूर्वी केली होती. स्त्रीची संतती येशू देवाचा पुत्र होय, तो पापी माणसाच्या उद्धारासाठी येणार आहे. त्याची आई मरिया ही त्या दुष्ट सैतानाचे डोके फोडील. सैतानाने येशूची टाच हातापायी ठोकलेल्या खिळ्यांनी फोडली. परंतु त्याच क्रुसाच्या वधस्तंभाने सैतानाचे सामर्थ्य नष्ट केले जाईल. यशया ९:६-७ “कारण आम्हासाठी बाळ जन्माला आहे, आम्हास पुत्र दिला आहे; त्याच्या खांद्यावर सत्ता राहील. त्याला अद्भूत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील. त्याच्या सत्तावृद्धीला व शांतीला अंत नसणार; तो दाविदाच्या सिंहासनावर बसून त्याचे साम्राज्य चालविल आणि तेथून पुढे ते सर्वकाळ न्यायाने व धर्माने दृढ व स्थिर करील. सेनाधीश परमेश्वराचा आवेश हे सिद्धीस नेईल.” यशया ७:१४ मध्ये म्हटले आहे: “कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इम्मानुएल (आमच्या सानिध्यात देव) असे ठेवील”. व हे शास्त्रलिखित वचन पूर्ण झाले, खुद्द देवच येशूचे नाव घेऊन ह्या जगात आला. हाच आगमनाचा काळ आजपासून पुन्हा नव्या उमेदिने आपण साजरा करत आहोत.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद: हे प्रभू, तुझे स्वागत करण्यास आमचे अंतःकरण शुद्ध ठेव.
  1. आपले परमगुरु पोप फ्रान्सीस व इतर सर्व बिशप, महागुरू, धमर्गुरू, धर्मभगिनी, तसेच ख्रिस्ताठायी सेवाकार्य करण्या-या सर्व व्यक्ती यांना प्रभूचे कार्य चांगल्या प्रकारे करण्यास योग्य ती कृपाशक्ती लाभावी म्हणून आपण प्रभूचरणी प्रार्थना  करू या.
  2. प्रभू येशूच्या आगमनासाठी आम्ही सदैव तत्पर असावे, पापापासून मुक्त राहून ख्रिस्ताच्या आगमनाचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करण्यास पात्र ठरावे, म्हणून आपण प्रभूचरणी प्रार्थना करू या.
  3. ख्रिस्ताचे स्वागत करणे म्हणजे गोर गरीबांचा स्वीकार करणे, ख्रिस्ताचे रूप आपणांस अपंग, लुळे, बहिरे, गोर-गरीबांमध्ये पाहण्यास परमेश्वराची दैवी शक्ती लाभावी म्हणून आपण प्रभूचरणी प्रार्थना करू या.
  4. चैनबाजी अहंकार किंवा आनंद म्हणजे शाश्वत जीवन नाही, ह्याची जाणीव आम्हाला व्हावी व अशा मोहापासून आम्ही दूर रहावे म्हणून आपण प्रभूचरणी प्रार्थना  करू या.
  5. आपला प्रभू सर्व जगाचा द्या-सागर आहे, तो आपल्या विनंत्या ऐकतो म्हणून थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक गरजा प्रभूचरणी ठेऊ या.  

 


   

Tuesday, 18 November 2014


 Reflection for Homily by: Glen Fernandes

ख्रिस्त राजाचा सण
दिनांक:२३/११/२०१४
पहिले वाचन: यहेज्केल ३४:११-१२,१५-१७
दुसरे वाचन: करिंथकरांस पहिले पत्र १५:२०-२६,२८
शुभवर्तमान: मत्तय २५:३१-४६


प्रस्तावना:
आज ख्रिस्तसभा ख्रिस्त राजाचा सण साजरा करीत आहे व आपणास पुन्हा एकदा आठवण करून देत आहे की ख्रिस्त हाच खरा राजा आहे. तो फक्त ह्या विश्वाचा राजा नसून तो आपल्या कुटुंबाचा, आपल्या शरीराचा व आत्म्याचा राजा आहे.
           आजच्या पहिल्या वाचनात परमेश्वर म्हणतो, मी स्वतः माझ्या प्रजेचा, माझ्या मेंढरांचा मेंढपाळ होईन. जे हरवले आहेत त्यांना मी शोधून काढीन व त्यांच्या सर्व इच्छा तृप्त करीन. देव जो उत्तम राजा आहे त्याचे वर्णन यहेज्केल संदेष्टा करत आहे.
करिंथकरांस लिहिलेल्या पहिल्या पत्रातून घेतलेल्या आजच्या दुस-या वाचनात संत पौल आपल्याला विश्वासात खंबीर राहण्यास प्रोत्साहित करताना म्हणतो की ख्रिस्त उठला व तो परत येईल तेव्हा त्याचे सर्व लोक जिवंत होतील. ख्रिस्त जगातील सर्वांचा न्याय करावयास आपल्या दूतांसह वैभवाने व गौरवाने येईल. तो जगाचा न्याय एखाद्या उत्तम व ज्ञानी राजाप्रमाणे करेल असे मत्तय शुभवर्तमानात सांगत आहे.
आपल्याला देवाचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी देवाची कृपा-शक्ती लाभावी व ते पसरविण्यासाठी आपण सदैव तत्पर राहावे म्हणून आपण ह्या पवित्र मिस्साबलीदानात विशेष प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:

पार्श्वभूमी: ख्रिस्त राजाचा सण १९२५ साली पोप पायस अकरावे ह्यांनी प्रस्थापित केला. पहिल्या महायुद्धानंतर झालेल्या प्रचंड जीवितहानीनंतरही तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. लोक स्वार्थी जीवन जगत होते, कारण त्यांना देवाचा विसर पडत चाललेला होता. अशा प्रसंगी ख्रिस्त हाच आपल्या जीवनाचा राजा आहे, आपण सर्व देवाची लेकरे आहोत, कोणी मोठा वा छोटा नाही ही जाणीव आपण ठेवावी हा त्यामागचा हेतू होता.
अ.     यहुदी लोकांच्या स्वार्थी व कपटी राजांमुळे त्यांचा युद्धात पराभव झाला. आपली जमीन, मंदिर ह्यापासून त्यांना दूर नेण्यात आले. त्यांचे राज्य नष्ट झाले. अशा वेळी अनेक भोंदू व वाईट प्रवृत्तीचे नेते ह्यांनी यहुदी लोकांस चुकीची शिकवणूक दिली. ह्या लोकांचे हाल होत असताना त्यांना गरज भासली ती एका राजाची, एका मंदिराची व एक समाज म्हणून पुन्हा उभे राहण्याची. अशा वेळी परमेश्वर यहेज्केल संदेष्ट्याद्वारे म्हणतो, ‘मी मानव नसून परमेश्वर आहे. मी उत्तम मेंढपाळाप्रमाणे माझ्या जनतेस तृप्त करीन’.
ब.         करिंथ येथील ख्रिस्ती समूहात अनेक अडचणी येत होत्या. समाजात वावरत असताना ख्रिस्त आपला राजा, आपला परमेश्वर आहे ह्या गोष्टीची जाणीव ठेवावी म्हणून संत पौल करिंथकरांस मार्गदर्शन करत म्हणतो, ‘ख्रिस्ताने मृत्यूवरही विजय मिळविला आहे तो मेलेल्यांस नवजीवन देईल’.
मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेल्या ह्या उता-याचा ‘संपूर्ण जगाचा न्यायनिवडा’ हा विषय आहे. ख्रिस्त हा सर्वांचा न्याय करावयास येत आहे. तो गरीब व श्रीमंत ह्याविषयी पूर्वग्रहीत नाही. परंतु तो न्यायी आहे. त्याला जे ओळखतील ते धन्य होतील, परंतु जे ख्रिस्ताला गरिबात, भूकेल्यात ओळखणार नाहीत त्यांना तो म्हणेल, ‘शापित माणसांनो चालते व्हा’.

बोधकथा

१)          ख्रिस्त राजाचा स्वीकार आपण फक्त आपल्या खाजगी जीवनातच नव्हे तर समाजात जगत असतानाही केला पाहिजे. संत थाँमस मूर जे सर्व नेत्यांचे आश्रयदाते आहेत ते एक उत्तम वकील होते. ते राजा हेन्री आठवे ह्यांचे विश्वासू व निकट होते. जेव्हा राजा हेन्री ह्यांनी आपली पत्नी कँथरीन हीस घटस्पोट दिला व पुन्हा लग्न करण्याचे ठरविले तेव्हा थाँमस ह्यांनी राजास विरोध केला. थाँमस ह्यांनी येशूच्या शिकवणुकीला डोळ्यासमोर ठेवले. जरी त्यांना कैद झाली तरी त्यांना खात्री होती की येशू हाच माझा राजा आहे. लंडनमध्ये १५३४ साली थाँमस ह्यांना देशद्रोही ठरवून ठार करण्यात आले. मरतेवेळी त्यांच्या तोंडी शब्द होते “मी राजाचा सेवक म्हणून मरत आहे; परंतु प्रथम मी देवाचा सेवक आहे”.

२)      एका शहरामध्ये एका राजाचा पुतळा उभारण्यात आला. सोन्या-दागिन्यांनी भरलेला तो पुतळा बघून एका चिमणीने पाहिले: तो राजा मात्र दु:खी होता. तिने त्या राजाच्या पुतळ्यास विचारले, “हे राजा तू दु:खी का आहेस?” राजा उत्तरला, “मी जरी दागिन्यांनी सजलेला असलो तरी माझी प्रजा फार दु:खी आहे. श्रीमंत ऐश-आरामाचे जीवन जगत आहेत तर गरीब भुकेने व गरिबीने मरत आहेत. मी ह्या शहरामधोमध रोज रडत आहे. परंतु कोणीही माझी विचारपूस करीत नाही, म्हणून मी दु:खी आहे”. ती चिमणी उत्तरली, “हे राजा मी तुझी मदत करीन” व ह्याप्रमाणे ती राजाच्या पुताळ्यावरील एक-एक दागिना घेऊन गरजू घरात नेऊन टाकत असे. परंतु गरिबी इतकी होती की चिमणी तहानभूक विसरून राजाची सेवा करीत गेली व एक दिवस उपाशी पोटी ती कोसळून मरण पावली व राजा फार दु:खी झाला कारण तो आता पुन्हा एकटा पडला.
   (देवाचे राज्य ऐक्याचे आहे व ते ह्या भूतलावर आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले       पाहिजेत, एकाने किंवा दुजाने नाहीत.)

मनन चिंतन:

अ.        येशू पिलाताला म्हणाला, “मी काही ह्या जगातल्या राजासारखा नाही, असतो तर यहुदी पुढा-यांनी पकडले तेव्हाच माझ्या अनुयायांनी लढाई केली असती. माझे राज्य येथले नाही”. येशूचे राज्य व पृथ्वीवरील राजांच्या राज्यात अनेक फरक आहेत. त्यातील मुख्य म्हणजे:
  1.   दुस-या सर्व राज्यांना एक सीमा असते, एक विशिष्ट प्रदेश व एक जागा असते परंतु ख्रिस्ताचे राज्य हे ह्या जगाचे नाही, त्याला सीमा नाही.
  2.   दुसरी सर्व राज्य उगम पावतात व नष्ट होतात, परंतु ख्रिस्ताचे राज्य सर्वकालिक आहे, त्यास अंत नाही.
  3.   दुसरी राज्ये सैन्य व आर्थिक संपत्तीने नावाजली जातात परंतु ख्रिस्ताचे राज्य म्हणजे सत्य व सत्याची शक्ती आहे.

     त्यामुळे ख्रिस्ताच्या राज्यातील प्रजा सत्य प्रकट करते. आपण आपल्या देशाचा व राज्याचा सन्मान केला पाहिजे परंतु प्रथम आपण देवाचे राज्य पृथ्वीवर येण्यासाठी झटले पाहिजे. समाज व समाजातील नियम, रीतीरिवाज चुकीचे असू शकतील, उदा. गर्भपात. परंतु देवाच्या राज्याची सुवार्ता प्रकट करताना परमेश्वराच्या मार्गावर चालून सत्यासाठी उभे राहिले पाहिजे. आपण देशाचे उत्तम नागरिक व्हायला पाहिजे, परंतु त्याअगोदर आपण देवाच्या राज्याची प्रजा व्हायला पाहिजे.

ब. ख्रिस्त राजा हा इतर राजांपेक्षा महान व निराळा आहे.
  1.  इतर राजे आपल्या स्वार्थासाठी व गौरवासाठी दिवस-रात्र झटतात परंतु ख्रिस्तराजाने आपल्या प्रजेसाठी आपल्या प्राणाची आहुती दिली.
  2.  इतर राजे फक्त आपल्या व प्रजेच्या कल्याणासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. परंतु ख्रिस्त राजा जगातील प्रत्येक व्यक्तीसाठी व प्रत्येकाच्या तारणासाठी आपले जीवन बहाल करतो.       

ख्रिस्त राजाचा सण आपल्याला आपण दररोज करत असलेल्या प्रार्थनेची आठवण करून देतो, ती म्हणजे: ‘हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य आम्हामध्ये येवो......’, ह्या देवाच्या राज्याला राजवाडा व मोठे बंगले नाहीत. ह्या राज्याला जगाच्या नकाशावरही कुठले स्थळ नाही. हे राज्य आपणा प्रत्येकाच्या अंत:करणात उगम पावते व त्याची वाढ होते. देवाचे शांतीचे, न्यायाचे हेच राज्य आपणा सर्वांच्या अंत:करणात यावे हीच प्रार्थना.
      
विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद: हे प्रभो, तुझे राज्य आम्हामध्ये येवो.
१.     आपले पोप फ्रान्सीस, कार्डीनल्स, बिशप्स, धर्मगुरू, धर्मबंधू-धर्मभगिनी ह्यांनी आपल्या कार्याद्वारे आणि शुभसंदेशाद्वारे ख्रिस्त राजाची सुवार्ता घोषीत करून सर्वत्र ख्रिस्ताचे प्रेमाचे, शांतीचे व सत्याचे राज्य प्रस्थापित करावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.
२.     ख्रिस्त राजाच्या प्रेमाचे व नम्रतेचे महत्व सर्व मानवजातीला समजावे व सर्वांनी ख्रिस्त राजाच्या मार्गावर प्रेमाने व नम्रतेने चालून ऐक्याचे राज्य प्रस्थापित करावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.
३.   राजकीय नेत्यांनी राजांचा राजा प्रभू येशू ख्रिस्त ह्याचा आदर्श घेऊन त्यांचे जीवन लोकांच्या सेवेसाठी समर्पित करावे व आपल्या देशाची सेवा निस्वार्थीपणे करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
४.    समाजामध्ये ज्या लोकांना न्याय मिळत नाही. त्यांना ख्रिस्त राजाच्या कृपेने न्यायाचे वरदान मिळावे व त्यांच्यावर होणारे अन्याय-अत्याचार थांबावे आणि त्यांना माणूस म्हणून सन्मानाने समाजामध्ये जगता यावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.
५.     आपण आपल्या कौटुंबिक व वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करूया.



Tuesday, 11 November 2014


Reflections for Homily by: Fr Ghonsalo D'Silva.

सामान्य काळातील तेहत्तीसावा रविवार
दिनांक: १६-११-२०१४
पहिले वाचन: नीतिसूत्रे ३१:१०-१३, १९-२०, ३०-३१
दुसरे वाचन: थेसलोनिकाकरांस पत्र ३:१-६
शुभवर्तमान: मत्तय २५:१४-३०

 “शाब्बास, विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टीत विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळावर नेमणूक करीन; तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो”

प्रस्तावना:

ख्रिस्ताठायी माझ्या प्रिय बंधूभगिनींनो, ख्रिस्तसभा आज सामान्यकाळातील तेहत्तीसावा रविवार साजरा करीत आहे. आजची वाचने आपल्याला आपले मानवी जीवन व परमेश्वराने आपल्याला सोपविलेल्या महत्वाच्या जबाबदारीविषयी सांगत आहे.
आजच्या पहिल्या वाचनात नीतिसूत्रे ह्या पुस्तकातून घेतलेल्या शेवटच्या अध्यायात सद्गुणी स्त्रीविषयी सांगितलं गेलं आहे. तर थेस्सालनीकाकरांस पाठविलेल्या पहिल्या बोधपत्रात संत पौल सांगत आहे की आपण इतरांसारखी झोप घेऊ नये तर नेहमी जागे आणि सावध असावे. आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू रुपयांचा दाखला देऊन आपण ह्या जगात नेहमी देवराज्याच्या विस्तारासाठी झटत रहावे म्हणून मार्गदर्शन करीत आहे.
आजच्या ह्या पवित्र मिस्साबलीदानात सहभागी होत असताना आपल्या आध्यात्मिक जीवनाकडे एक कटाक्ष टाकू या आणि स्वतःचं आत्मपरीक्षण करीत आपल्या मनाला प्रश्न विचारू या की देवाने दिलेल्या मानवी जीवनाचा वापर मी त्याच्या व इतरांच्या सेवेसाठी खरोखरच करतोय का?

पहिले वाचन: नीतिसूत्रे ३१:१०-१३, १९-२०, ३०-३१

आपल्या दैनंदिन जीवनात आपण पाहतोय की स्त्री ही कोणत्याही कुटुंबातील एक महत्वाची व्यक्ती असते. भल्या पहाटेपासून तर रात्री उशिरापर्यंत ती आपल्या कुटुंबाची सारी जबाबदारी कसलीही कुरकुर किंवा तक्रार न करता सांभाळत असते. जर प्रीती हे देवाचे दुसरे नाव आहे तर मग त्याग स्त्रीचे दुसरे नाव आहे असं म्हणण्यास वावगं ठरणार नाही. आजच्या पहिल्या वाचनात सद्गुणी स्त्रीच्या त्यागमय जीवनाचे गुणगान गायीले आहेत. तिचे मोल मोत्याहून अधिक आहे. जर एखाद्या स्त्रीच्या गळ्यातल्या मोतीहाराने तिचं सौंदर्य खुलून दिसत असेल तर मग एखाद्या कुटुंबातील सद्गुणी स्त्रीमुळे ते कुटुंब शेजोळ्यात किती उठून दिसत असेल ह्याची कल्पना देखील करता येणार नाही.
सद्गुणी स्त्री ही आपल्या पतीचे नि कुटुंबाचे नेहमी हित बाळगत असते. ती देवभिरू नि उदार अंत:करणाची असते. तिच्या मनात गोरगरिबांविषयी आणि दिनदलीतांविषयी दया असते. जर स्त्रीने आपल्या घरकामात निष्काळजीपणा दाखवला तर त्या कुटुंबाची दुर्दशा होण्यास फार वेळ लागत नाही.

दुसरे वाचन: थेसलोनिकाकरांस पत्र ३:१-६

संत पौल थेसलोनिकाकरांस पाठविलेल्या पहिल्या बोधपत्रात त्यांना व आपल्या सर्वांना असा बोध करीत आहे की प्रभूचा दिवस हा रात्रीच्या वेळी काहीही कल्पना नसताना अचानक येणा­-या चोरासारखा असेल. प्रभू येशू ह्या जगाच्या अंती सर्वांचा न्यायनिवाडा करण्यास नि आपल्या मानवी जीवनाचा हिशेब घेण्यास येणार आहे. पौल आम्हांला आवर्जून सांगत आहे की आम्ही प्रभूचे शिष्य ह्या नात्याने इतरांसारखे निष्काळजी अथवा झोपेत असू नये तर सतत सावध नि जागे असावे.

शुभवर्तमान: २५:१४-३०

प्रभू येशू ह्या भूतलावर असताना लोकांना व त्याचा शिष्यांना मानवी जीवनातील आणि व्यवहारातील दाखल्याद्वारे देवराज्याविषयी शिक्षण देत असे. आजच्या शुभवर्तमानात तो रुपयांचा दाखला देऊन परमेश्वराने आपल्या प्रत्येकाला दिलेल्या विविध देणग्यांचा वापर आपण त्याच्या राज्याच्या विस्तारासाठी नि इतरांच्या सेवेसाठी कसा करावा हे सूचवत आहे.

सम्यक विवरण:

त्या काळात श्रीमंत लोक व व्यापारी काही कामानिमित्त्ताने बाहेरगावी जाताना आपल्या मालमत्तेची जबाबदारी आपल्या नोकरांवर टाकून जात असत. येशूने हा दाखला का सांगितला? परमेश्वर आपल्याशी कसा वागतो हे सुचविण्यासाठी येशूने ह्या दाखल्याचा उपयोग केला. सदर दाखला आम्हांस सांगतो की एक धनी आपल्या नोकरांवर विश्वास ठेवून त्यांच्या ऐपतीप्रमाणे आपल्या मालमत्तेची जबाबदारी सोपवून देतो. त्यांनी काय करावं हे प्रत्येक नोकरावर अवलंबून होतं. पहिल्याने आणि दुस-याने आपल्याला मिळालेल्या पाच व दोन हजार रुपये व्यापारात गुंतवून तेवढेच आणखी रुपये कमावले म्हणून त्यांच्या धन्याने त्यांना शाबासकी देऊन त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविली. मात्र तिस-या नोकराने काहीच न करता त्याला दिलेले एक हजार रुपये जमिनीत पुरून ठेवले म्हणून त्याच्या धन्याची आग मस्तकाला भिडली व त्याने त्याला शिक्षा केली. त्याला जे दिलं होतं ते देखील त्याच्याकडून हिसकावून घेतले व त्या निरुपयोगी दासाला अंधारकोठडीत टाकले.

बोधकथा:

. एकदा एक मनुष्य देवावर खूप रागावतो व त्याला तावातावाने विचारतो, अरे देवा, गेली तीन वर्षे मी रोज तुझ्याकडे प्रार्थना करतोय की मला माझ्या जीवनात तरी लॉटरी लागू दे. अरे, तुझ्याच पुत्राने आम्हांला सांगितले आहे की “मागा म्हणजे मिळेल” मग गेली तीन वर्षे मी तुझ्याकडे मागतोय की निदान मला एकदा तरी लॉटरी लागू दे, माझं भाग्य उजळू दे. मग मला लॉटरी का लागत नाही? माझ्या आशेची का निराशा का करतोस? देव म्हणाला, “अरे माझ्या भक्ता नुसतं वक्ता असून चालत नाही रे. माझी तीन वर्षे केलेली प्रार्थना पुरी झाली. आता निदान माझ्यासाठी एक छोटसं काम कर, एखाद्या लॉटरीच्या दुकानात जा नि लॉटरीचं तिकीट तरी खरेदी कर”.

. न्यूयॉर्क मध्ये एक कंपनी लोकांच्या घरांसाठी चोरांना कधीच फोडता येणार नाही अश्या विशेष चोर-प्रतिबंध (burglar-proof) काचा बनवायची. त्या कंपनीने खूप लोकांसाठी अशा काचा बनवून अनेकांना मदत केली. परंतु एके रात्री काही चोरांनी त्या कंपनीच्याच कचेरीच्या काचा फोडून फार मोठी चोरी केली. तेव्हा कंपनीचा मालक आपल्या कपाळावर हात मारू म्हणाला, “आपण आपल्या कंपनीचा वापर लोकांच्या घरांसाठी केला परंतु आपल्या कंपनीसाठी मात्र साध्याच काचा वापरल्या. आपल्या कलेचा वापर आपण आपल्यासाठी केला असता तर आज ही परिस्थिती आली नसती”.

३. एकदा मदर तेरेसाला विचारलं गेलं, “तुम्ही भारतातील गरिबांसाठी एवढं काही करत आहात, तरीही भारतात अजूनही गरिबी आणि दारिद्रय आहे. तुम्हाला वाटतं का की ह्या भारतातील गरिबी नष्ट करण्यास यशस्वी व्हाल?” मदर तेरेसा म्हणाल्या, “देवाच्या दृष्टीने आपण किती यशस्वी झालो ह्यापेक्षा आपण किती विश्वासू आहोत हे महत्वाचं असतं. आपण फार मोठे चमत्कार करावेत नि फार मोठमोठी कृत्ये करावीत ही देवाची अपेक्षा नसते तर त्याने आपल्याला दिलेल्या मानवी जीवनाचा व निरनिराळ्या कलागुणांचा वापर त्याच्या गौरवासाठी व इतरांच्या सेवेसाठी करावा हिच त्याची आपल्याविषयी इच्छा असते.

मनन चिंतन:

आपल्या प्रत्येकाला परमेश्वराने आपआपल्या कुवतीप्रमाणे कलागुण दिलेले आहेत. कुणाला चांगला आवाज, कुणाला चांगलं आरोग्य, कुणाला चांगली बुद्धी, कुणाला चांगली आर्थिक परिस्थिती वैगेरे. आपण समाजात पाहतोय की बरेच लोक देवाने त्यांना दिलेल्या वेगवेगळ्या कलागुणांचा चांगला वापर करून त्यांच्या कलागुणास्त अधिक भर पडते तर उलट समाजात अशीही माणसं आहेत की जी आपल्या स्वतःची तुलना इतरांबरोबर करत आपल्या नशिबाला दोष देत असतात. काही तर नेहमीच कुरकुर नि तक्रार करीत असतात. शुभवर्तमानातील दाखल्यात तिस-या नोकराने कदाचित असा विचार केला असेल की माझ्या मालकाने मला एकच हजार रुपये का दिले? म्हणजे त्याने मला इतर दोघांपेक्षा कमी लेखले. माझी त्यांच्याएवढी पात्रता नाही असं माझ्या मालकाला वाटलं असेल. आता मालक परत आल्यावर मी त्यांना काय हिशेब देणार? मी माझ्या मालकाला जाणून आहे की तो कठोर माणूस आहे. जेथे त्यांनी पेरले नाही तेथे तो कापणी करतो व जेथे पसरून ठेवले नाही तेथून तो गोळा करतो. बाकीच्या दोघांकडे पाच नि दोन हजार रुपये आहेत. त्यांनी ते व्यापारात वापरले तरी चालेल परंतु मी अजिबात धोका पत्करू शकत नाही. माझ्या धन्याच्या स्वभावानुसार मला वागले पाहिजे. मी हे पैसे जमिनीत पुरून ठेवतो व तसेच धन्याच्या हाती परत देईन”. त्याची चूक अशी होती की त्याच्या धन्याने त्याच्यावर सोपविलेल्या जबाबदारीबाबत त्याने काहीच केले नाही. तो नुसता तसाच निष्काळजीक  राहिला.
आपल्या जीवनात आपणही कधी-कधी या तिस-या नोकराप्रमाणे वागतो. आपण आपली तुलना इतरांबरोबर करतो. आपल्यापेक्षा इतरांजवळ जास्त आहे असा विचार करत जन्मभर मनातल्या मनात कुढत असतो नि मानवी जीवन असच कुजत राहत.
ज्याप्रमाणे सदर दाखल्यातील धनी परत आल्यानंतर आपल्या नोकराकडून हिशेब मागतो त्याप्रमाणे प्रभू येशू ह्या जगाच्या अंती येऊन आपल्या सर्वांकडून आपाल्या जीवनाचा नि परमेश्वराने आपल्याला दिलेल्या विविध कलागुणांचा हिशेब मागणार आहे. आपल्या आयुष्याच्या संध्याकाळी हे जग सोडून आपल्या सर्वांना ईश्वरी न्यायालयासमोर उभं राहायचं आहे. आपलं मानवी जीवन ही देवाची आपल्याला मिळालेली विशेष देणगी आहे. मराठीत सुंदर असं भक्तीगीत आहे, मीठ तुम्ही ह्या पुण्यभूमीचे! गुण मीठाचे सोडू नका! पायदळी तुडविण्यापलीकडे त्याचा वापर होईल का. एकदाची हा मानव जन्म! जन्म निरर्थक करू नका!!” इंग्रजी भाषेत अशी म्हण आहे की, “Either you use it or lose it” ज्याप्रमाणे निसर्गातील एखाद्या वस्तूचा वापर केला जात नाही तर कालांतराने ती वस्तू निरर्थक बनते व तिला कच-याच्या टोपलीत टाकले जाते. त्याच प्रमाणे देवाने दिलेल्या कलागुणांचा जर आपण योग्य वापर केला नाही तर त्या कलागुणांचा काहीच विस्तार न होता उलट काही काळाने ते कलागुण आपल्यामधून नष्ट होतात आणि त्यासाठीच ते नष्ट होऊ नयेत म्हणून आपण नेहमी कष्ट घ्यावेत.
कुणीतरी म्हटलं आहे की “लोखंडासारखं नुसतं गंजून जाण्यापेक्षा चंदनाप्रमाणं झिजून जावं” तसच आपला हा मानवी देह जीवनाच्या अंती नुसतं कुजून जाण्याअगोदर देवाच्या गौरवासाठी नि इतरांच्या सेवेसाठी सार्थकी लावावा. मेणबत्तीप्रमाणं स्वतःला जाळून इतरांच्या काळोखी जीवनात सत्कार्यरूपी प्रकाशाची किरणे पसरू या.
ह्या पवित्र मिस्साबलिदानात देवाने आपल्याला दिलेल्या विविध कलागुणांबद्दल त्याचे आभार मानूया व त्याच्या नि इतरांच्या सेवेसाठी सतत कार्यरत राहू या, आमेन.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद:  हे प्रभो, दया कर आणि तुझ्या लोकांची प्रार्थना ऐकून घे.
  1. अखिल ख्रिस्तसभेसाठी:- आमचे पोप, कार्डीनल्स, महागुरू, धर्मगुरू व प्रापंचिक ह्या सर्वांसाठी प्रार्थना करतो की प्रभू येशूचं कार्य सातत्याने पुढे नेण्यासाठी व देवराज्याच्या विस्तारासाठी सर्वांनी निस्वार्थी वृत्तीनं कार्य करावं म्हणून आपण प्रार्थना करूया.
  2. ख्रिस्ती कुटुंबांसाठी:- परमेश्वराने दिलेली जबाबदारी ख्रिस्ती कुटुंबातील सर्व मातापित्यांनी, लेकराबाळांनी व नोकर चाकर वर्गानी विश्वासाने व प्रामाणिकपणे पार पाडावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
  3. भारतासाठी:- आपल्या राजकीय नेत्यांनी व सर्व देशवासियांनी आपल्या स्वार्थाला नि अहंकाराला तिलांजली देऊन भारतमातेच्या सर्वांगीण विकासासाठी तळमळीने झटावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
  4. आपल्या सर्वांसाठी:- ह्या पवित्र मिस्साबलीदानात उपस्थित असलेल्या आपण सर्वांनी आपापल्या कलागुणांचा योग्य तो उपयोग करून देवराज्याच्या विस्तारासाठी मौलाचा वाटा उचलावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
  5. आपल्या वैयक्तिक व सामाजिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.