Reflections for Homily By: Fr. Isaac D'Souza
सामान्य काळातील बत्तीसावा
रविवार
दिनांक: ०९/११/२०१४
पहिले वाचन: यहेज्केल ४७:१-२, ८-९,१२
दुसरे वाचन: १ करिंथकरांस पत्र ३:९-११, १६-१७
शुभवर्तमान: योहान २:१३-२२
‘तुम्ही देवाचे मंदिर आहात
आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास करतो’
प्रस्तावना:
प्रिय भाविकांनो आज आपण सामान्य काळातील बत्तीसावा रविवार
साजरा करीत असताना संत जॉन लँटरन महामंदिराचा (बेसिलिकाचा) सण सुद्धा साजरा करीत
आहोत.
आजच्या उपासनेची तिन्ही वाचने आपणास देवाच्या मंदिराविषयी
मौल्यवान अशी माहिती देतात. यहेज्केलच्या वाचनाद्वारे मंदिरापासून वाहणा-या आरोग्यदायक
पाण्याविषयी आपण ऐकतो तर दुस-या वाचनात संत पौल करिंथकरांस सांगतो की, ‘तुम्ही
देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास करतो’.
शुभवर्तमानात आपण पाहतो की, येशू ख्रिस्त मंदिराचे
शुद्धीकरण करून लोकांस आवाहान करितो की, स्वर्गीय पित्याच्या घराची बाजारपेठ करू
नका. आजच्या पवित्र मिस्साबलिदानामध्ये सहभागी होत असताना विशेष प्रार्थना करूया
की, ज्याप्रमाणे आपण देवाचे मंदिर पवित्र ठेवतो त्याचप्रमाणे आपण आपले शरीररुपी
मंदिर सुद्धा पवित्र ठेवावे, जेणेकरून देवाचा आत्मा आपल्यामध्ये वास करील.
सम्यक विवरण:
पहिले वाचन: यहेज्केल ४७:१-२, ८-९,१२
यहेज्केलने मंदिर व मंदिरातील व्यवस्था पाहिली. ते मंदिर
देवाच्या गौरवाने भरून गेले होते. त्या पुरुषाने यहेज्केलला आणखी एक अत्यंत
विलोभनीय दृश्य दाखविले. एक झरा मंदिरापासून वाहत होता व त्या झ-यापासून एक नदी
झाली होती. ती नदी संथपणे वाहत होती. आपला जीवंत देव इतका पवित्र व थोर असूनही
त्याच्यापासून कृपा, सत्य व प्रीती हे ख्रिस्तामध्ये मनुष्यांपर्यंत वाहत आली
आहेत. तो झरा वेदीजवळून वाहत होता (ओवी १). ते पाणी खोल खोल होत गेले. ती नदी खोल
व विशाल झाली (ओवी ५). या नदीच्या पाण्यावर वाढणारी झाडे किती टवटवीत होती! ती फळे
देत होती व ते फळे देण्यास थांबणार नव्हते (ओवी १२). जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ
लावले जाते तेच फळ देत राहते. हा पाण्याचा प्रवाह देवाचे वचन असून त्या वचनावर मनन
करणा-या विश्वासणा-याला ख्रिस्ताचे विपूल जीवन मिळत राहते.
दुसरे वाचन: १ करिंथकरांस पत्र ३:९-११, १६-१७
संत पौल करिंथकरांस सांगतो की, ‘ख्रिस्ताने घातलेल्या ह्या
पायावरती आपण आपले मंदिर उभारत असतो’ आणि हे मंदिर उभारण्यासाठी आपण कशाप्रकारे
काळजी घेतो, ह्यावर तो जास्त भर देत आहे. विशेषकरून संत पौल मानवरूपी मंदिराची जडण-घडण
करण्यासाठी सांगत आहे.
शुभवर्तमान:
आजच्या शुभवर्तमानाद्वारे येशू
खिस्ताची रागीट प्रतिमा आपल्यासमोर येत असली तरी प्रभू येशू खिस्ताची मंदिराविषयी
असलेली उत्कंठा सुद्धा आपणास जाणून येते. मंदिर प्रार्थनेचे स्थान आहे आणि ह्या
प्रार्थनास्थानाचे रुपांतर बाजारामध्ये होत असेल तर कोणत्याही धार्मिक व्यक्तीला राग येणे
योग्य आहे. येशूला आपल्या पित्याच्या घराची बाजारपेठसारखी अवस्था बघून राग येतो.
येशू खिस्ताचे धार्मिक संकलन अस्ताव्यस्त होते कारण येशूची देवाच्या घराविषयी,
मंदिराविषयी उत्कंठा फार अपार होती, त्यामुळे तो सर्व व्यापार करणा-यांना बाहेर
काढण्याचा प्रयत्न करतो. येशू खिस्त त्याच्या पित्याचे घर शुद्ध करीतो.
बोधकथा:
एकदा एक सद्गृहस्थ जग-संसार
सोडून देवाच्या शोधात निघाला होता. अनेक अशी वर्ष सरून गेली होती; त्या सद्गृहस्थाने
अनेक अशा ठीकठिकाणच्या प्रसिद्ध
मंदिरामध्ये भेठी दिल्या होत्या परंतु अजूनपर्यत त्याला देवाचा साक्षात्कार झाला
नव्हता.
एक दिवस त्या सद्गृहस्थाची
भेट एका साधू बरोबर होते, तेव्हा तो त्या साधुस विचारतो, ‘तुम्हाला तुमच्या जीवनात
कधीतरी देवाचा साक्षात्कार झालेला आहे का’? ह्यावर त्या साधूने उत्तर दिले, ‘होय!
नक्कीच’. साधूचे हे उत्तर ऐकून अगदी आश्चर्याने त्या सद्गृहस्थाने साधुस विचारले
‘तुम्हाला नक्की कोणत्या मंदिरामध्ये देवाचा साक्षात्कार झाला ते मला सांगा म्हणजे
मी त्या मंदिराला नक्कीच भेट देईन’. ह्यावर साधू उत्तरला, ‘मला तर देवाचा
साक्षात्कार सर्वच मंदिरामध्ये होतो.’ मात्र त्या सद्गृहस्थाचा साधूच्या ह्या
उत्तरावर विश्वास बसेना, तो त्याला म्हणाला, “मी तर माझ्या आयुष्यात अनेक
मंदिरामध्ये देवाचा शोध केला परंतु अजूनपर्यंत माझे सर्व प्रयत्न निष्फळ ठरलेले
आहेत, असे का?” हे ऐकून नम्रपणे साधु म्हणाला, “जर तुला तुझ्या शरिररुपी
मंदिरामध्ये देवाचा साक्षात्कार होत नसेल तर तुला कोणत्याही भव्य-दिव्य
मंदिरामध्ये देवाचा साक्षात्कार होऊ शकत नाही, सर्वप्रथम आपल्या अंतकरणात देवाचा
शोध कर आणि तो तुला नक्कीच सापडेल.
मनन चिंतन:
मंदिर म्हणजे प्रार्थनेचे घर, देवाचे वस्तीस्थान, ती पवित्र
जागा असते. ह्या जगात सर्वात महत्वाची जागा म्हणजे देवालय. मनुष्य आपल्या घरापेक्षा
मंदिराला अधिक महत्व देतो. घर बांधण्यापेक्षा मंदिर बांधण्यासाठी अधिक पैसा खर्च
करतो. कोणत्याही माणसाला देवळामध्ये शांतचित्ताने प्रार्थना व मनन-चिंतन करता
यावे, व प्रत्येकांस देवाचा साक्षात्कार घडावा म्हणून प्रसन्न वातावरण निर्माण
करण्यासाठी खूप प्रयत्न केले जातात.
मंदिर, चर्च हा शब्द आपण आपल्या दैनंदिन जीवनात आपण वारंवार
वापरत असतो. चर्च म्हणजे काय हा प्रश्न विचारल्यानंतर आपण नेहमी इमारतीविषयी विचार
करतो परंतु चर्च म्हणजे फक्त इमारत नव्हे तर येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे सर्व
लोक मिळून एक आध्यात्मिक चर्च किंवा देव मंदिर रचत असतात आणि हे आध्यात्मिक चर्च प्रेषितांच्या
आणि संदेष्ट्यांच्या पायावर उभारलेले आहे (इफिस २:२२...) आणि आपला प्रभू येशू
ख्रिस्त ह्या चर्चचा/मंदिराचा कोनशिला आहे.
आज आपण संत जॉन लँटरन महामंदिराचा सण साजरा करत आहोत. हा सण
साजरा करीत असताना देऊळमाता आपल्याला आठवण करून देते की, चर्च हे पोप, बिशप,
धर्मगुरू ह्यांचे नव्हे तर आपण प्रत्येक व्यक्ती ह्या मंदिराचे महत्वाचे घटक आहोत.
आपण सर्वजण ह्या मंदिरात परमेश्वराची लेकरे आहोत. चर्च हे आपल्या धर्माची
प्रतिष्ठा आहे. आपला मान-सन्मान आहे. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पवित्र मंदिर हे
आपल्याला ऐक्याचे प्रतिक आहे.
ख्रिस्ती कुटुंब हे एक लघू चर्च/देवाचे मंदिर आहे. जेव्हा आपण
आपल्या कुटुंबासाठी झटतो, कुटुंबामध्ये येशूवरील विश्वास राखतो; कुटुंबामध्ये
देवाच्या शब्दाला महत्व देतो, तेव्हा आपण आपल्या ख्रिस्तसभेची ख-या अर्थाने
रचना-बांधणी करत ख्रिस्तसभेला मजबूत करत असतो.
२. आज आपण संत जॉन लँटरन ह्या महामंदिराच्या
समर्पणाचा सण साजरा करीत आहोत. इ.स. ३११ मध्ये सम्राट काँस्टनटाईनने ख्रिस्ती
धर्माला स्वत:त्र दिल्यानंतर त्याने आपल्या पत्नी कडून मिळालेल्या लँटरन घराण्याचा
राजवाडा ३२४ मध्ये पोप मिल्तेआदेस ह्यांना दान दिला आणि जवळ जवळ एक हजार वर्ष लँटरन
राजवाडा हा पोप महाशयांचे राहण्याचे ठिकाण राहिले आणि तदनंतर सोळाव्या शतकात वँटिकन
हे पोप महाशयांचे अधिकृत राहण्याचे ठिकाण बनले. लँटरन महामंदीरात चौदा कौन्सिल्स
भरवण्यात आल्या होत्या आणि अठ्ठावीस पोप महाशयांना ह्या महामंदीरात पुरलेले आहे.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभू दया कर व तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक
१. ख्रिस्तसभेतील सर्व धार्मिक
अधिका-यांनी देवाच्या मंदिराची योग्य ती निगा राखावी व देवाच्या मंदिराचे सर्व
अनिष्ठापासून संरक्षण करावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. नवीन प्रस्थापित झालेल्या
महाराष्ट्र सरकारने लोकांच्या हितासाठी निस्वार्थीपणे झटावे व आपल्या महाराष्ट्र
राज्याला सुखसमृद्धीच्या, शांतीच्या आणि उन्नतीच्या मार्गावर न्यावे, म्हणून आपण
प्रार्थना करूया.
३. प्रत्येक ख्रिस्ती
व्यक्तीने आपले देहरूपी शरीर हे एक देवाचे मंदिर आहे ह्याचे विश्वासाने भान ठेवून
आपले शरीर नेहमी पावित्र्याने सजवावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. जे आजारी आहेत, मानसिक, शारीरिक
तसेच आध्यात्मिक आजारांनी ग्रासलेले आहेत त्यांना प्रभूचा गुणकारी स्पर्श व्हावा व
त्यांना चांगले आरोग्य लाभावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक
हेतूंसाठी थोडा वेळ शांत राहून प्रभूकडे प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment