Reflection for Homily by: Glen Fernandes
ख्रिस्त राजाचा सण
दिनांक:२३/११/२०१४
पहिले वाचन: यहेज्केल ३४:११-१२,१५-१७
दुसरे वाचन: करिंथकरांस पहिले पत्र १५:२०-२६,२८
शुभवर्तमान: मत्तय २५:३१-४६
प्रस्तावना:
आज ख्रिस्तसभा ख्रिस्त राजाचा सण साजरा करीत आहे व आपणास
पुन्हा एकदा आठवण करून देत आहे की ख्रिस्त हाच खरा राजा आहे. तो फक्त ह्या
विश्वाचा राजा नसून तो आपल्या कुटुंबाचा, आपल्या शरीराचा व आत्म्याचा राजा आहे.
आजच्या पहिल्या वाचनात परमेश्वर
म्हणतो, ‘मी स्वतः माझ्या
प्रजेचा, माझ्या मेंढरांचा मेंढपाळ होईन. जे हरवले आहेत त्यांना मी शोधून काढीन व
त्यांच्या सर्व इच्छा तृप्त करीन’. देव जो उत्तम राजा आहे त्याचे वर्णन यहेज्केल संदेष्टा
करत आहे.
करिंथकरांस लिहिलेल्या पहिल्या पत्रातून घेतलेल्या आजच्या दुस-या
वाचनात संत पौल आपल्याला विश्वासात खंबीर राहण्यास प्रोत्साहित करताना म्हणतो की
ख्रिस्त उठला व तो परत येईल तेव्हा त्याचे सर्व लोक जिवंत होतील. ख्रिस्त जगातील
सर्वांचा न्याय करावयास आपल्या दूतांसह वैभवाने व गौरवाने येईल. तो जगाचा न्याय
एखाद्या उत्तम व ज्ञानी राजाप्रमाणे करेल असे मत्तय शुभवर्तमानात सांगत आहे.
आपल्याला देवाचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी देवाची
कृपा-शक्ती लाभावी व ते पसरविण्यासाठी आपण सदैव तत्पर राहावे म्हणून आपण ह्या पवित्र
मिस्साबलीदानात विशेष प्रार्थना करूया.
सम्यक विवरण:
पार्श्वभूमी: ख्रिस्त राजाचा सण १९२५ साली पोप पायस अकरावे ह्यांनी प्रस्थापित
केला. पहिल्या महायुद्धानंतर झालेल्या प्रचंड जीवितहानीनंतरही तणावाचे वातावरण
निर्माण झाले होते. लोक स्वार्थी जीवन जगत होते, कारण त्यांना देवाचा विसर पडत
चाललेला होता. अशा प्रसंगी ख्रिस्त हाच आपल्या जीवनाचा राजा आहे, आपण सर्व देवाची
लेकरे आहोत, कोणी मोठा वा छोटा नाही ही जाणीव आपण ठेवावी हा त्यामागचा हेतू होता.
अ. यहुदी लोकांच्या स्वार्थी व कपटी राजांमुळे
त्यांचा युद्धात पराभव झाला. आपली जमीन, मंदिर ह्यापासून त्यांना दूर नेण्यात आले.
त्यांचे राज्य नष्ट झाले. अशा वेळी अनेक भोंदू व वाईट प्रवृत्तीचे नेते ह्यांनी
यहुदी लोकांस चुकीची शिकवणूक दिली. ह्या लोकांचे हाल होत असताना त्यांना गरज भासली
ती एका राजाची, एका मंदिराची व एक समाज म्हणून पुन्हा उभे राहण्याची. अशा वेळी
परमेश्वर यहेज्केल संदेष्ट्याद्वारे म्हणतो, ‘मी मानव नसून परमेश्वर आहे. मी उत्तम
मेंढपाळाप्रमाणे माझ्या जनतेस तृप्त करीन’.
ब. करिंथ येथील ख्रिस्ती समूहात अनेक अडचणी येत
होत्या. समाजात वावरत असताना ख्रिस्त आपला राजा, आपला परमेश्वर आहे ह्या गोष्टीची
जाणीव ठेवावी म्हणून संत पौल करिंथकरांस मार्गदर्शन करत म्हणतो, ‘ख्रिस्ताने
मृत्यूवरही विजय मिळविला आहे तो मेलेल्यांस नवजीवन देईल’.
मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेल्या ह्या उता-याचा ‘संपूर्ण
जगाचा न्यायनिवडा’ हा विषय आहे. ख्रिस्त हा सर्वांचा न्याय करावयास येत आहे.
तो गरीब व श्रीमंत ह्याविषयी पूर्वग्रहीत नाही. परंतु तो न्यायी आहे. त्याला जे
ओळखतील ते धन्य होतील, परंतु जे ख्रिस्ताला गरिबात, भूकेल्यात ओळखणार नाहीत
त्यांना तो म्हणेल, ‘शापित माणसांनो चालते व्हा’.
बोधकथा
१) ख्रिस्त राजाचा
स्वीकार आपण फक्त आपल्या खाजगी जीवनातच नव्हे तर समाजात जगत असतानाही केला पाहिजे.
संत थाँमस मूर जे सर्व नेत्यांचे आश्रयदाते आहेत ते एक उत्तम वकील होते. ते राजा
हेन्री आठवे ह्यांचे विश्वासू व निकट होते. जेव्हा राजा हेन्री ह्यांनी आपली पत्नी
कँथरीन हीस घटस्पोट दिला व पुन्हा लग्न करण्याचे ठरविले तेव्हा थाँमस ह्यांनी
राजास विरोध केला. थाँमस ह्यांनी येशूच्या शिकवणुकीला डोळ्यासमोर ठेवले. जरी
त्यांना कैद झाली तरी त्यांना खात्री होती की येशू हाच माझा राजा आहे. लंडनमध्ये
१५३४ साली थाँमस ह्यांना देशद्रोही ठरवून ठार करण्यात आले. मरतेवेळी त्यांच्या
तोंडी शब्द होते “मी राजाचा सेवक म्हणून मरत आहे; परंतु प्रथम मी देवाचा सेवक
आहे”.
२) एका शहरामध्ये
एका राजाचा पुतळा उभारण्यात आला. सोन्या-दागिन्यांनी भरलेला तो पुतळा बघून एका
चिमणीने पाहिले: तो राजा मात्र दु:खी होता. तिने त्या राजाच्या पुतळ्यास विचारले,
“हे राजा तू दु:खी का आहेस?” राजा उत्तरला, “मी जरी दागिन्यांनी सजलेला असलो तरी
माझी प्रजा फार दु:खी आहे. श्रीमंत ऐश-आरामाचे जीवन जगत आहेत तर गरीब भुकेने व
गरिबीने मरत आहेत. मी ह्या शहरामधोमध रोज रडत आहे. परंतु कोणीही माझी विचारपूस
करीत नाही, म्हणून मी दु:खी आहे”. ती चिमणी उत्तरली, “हे राजा मी तुझी मदत करीन” व
ह्याप्रमाणे ती राजाच्या पुताळ्यावरील एक-एक दागिना घेऊन गरजू घरात नेऊन टाकत असे.
परंतु गरिबी इतकी होती की चिमणी तहानभूक विसरून राजाची सेवा करीत गेली व एक दिवस
उपाशी पोटी ती कोसळून मरण पावली व राजा फार दु:खी झाला कारण तो आता पुन्हा एकटा
पडला.
(देवाचे राज्य ऐक्याचे आहे व ते ह्या भूतलावर आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न
केले पाहिजेत, एकाने किंवा दुजाने नाहीत.)
मनन चिंतन:
अ. येशू पिलाताला म्हणाला, “मी काही ह्या
जगातल्या राजासारखा नाही, असतो तर यहुदी पुढा-यांनी पकडले तेव्हाच माझ्या
अनुयायांनी लढाई केली असती. माझे राज्य येथले नाही”. येशूचे राज्य व पृथ्वीवरील
राजांच्या राज्यात अनेक फरक आहेत. त्यातील मुख्य म्हणजे:
- दुस-या सर्व राज्यांना एक सीमा असते, एक विशिष्ट प्रदेश व एक जागा असते परंतु ख्रिस्ताचे राज्य हे ह्या जगाचे नाही, त्याला सीमा नाही.
- दुसरी सर्व राज्य उगम पावतात व नष्ट होतात, परंतु ख्रिस्ताचे राज्य सर्वकालिक आहे, त्यास अंत नाही.
- दुसरी राज्ये सैन्य व आर्थिक संपत्तीने नावाजली जातात परंतु ख्रिस्ताचे राज्य म्हणजे सत्य व सत्याची शक्ती आहे.
त्यामुळे ख्रिस्ताच्या राज्यातील
प्रजा सत्य प्रकट करते. आपण आपल्या देशाचा व राज्याचा सन्मान केला पाहिजे परंतु
प्रथम आपण देवाचे राज्य पृथ्वीवर येण्यासाठी झटले पाहिजे. समाज व समाजातील नियम,
रीतीरिवाज चुकीचे असू शकतील, उदा. गर्भपात. परंतु देवाच्या राज्याची सुवार्ता
प्रकट करताना परमेश्वराच्या मार्गावर चालून सत्यासाठी उभे राहिले पाहिजे. आपण
देशाचे उत्तम नागरिक व्हायला पाहिजे, परंतु त्याअगोदर आपण देवाच्या राज्याची प्रजा
व्हायला पाहिजे.
ब. ख्रिस्त राजा हा इतर राजांपेक्षा महान व निराळा आहे.
- इतर राजे आपल्या स्वार्थासाठी व गौरवासाठी दिवस-रात्र झटतात परंतु ख्रिस्तराजाने आपल्या प्रजेसाठी आपल्या प्राणाची आहुती दिली.
- इतर राजे फक्त आपल्या व प्रजेच्या कल्याणासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. परंतु ख्रिस्त राजा जगातील प्रत्येक व्यक्तीसाठी व प्रत्येकाच्या तारणासाठी आपले जीवन बहाल करतो.
ख्रिस्त राजाचा सण आपल्याला आपण दररोज करत असलेल्या प्रार्थनेची
आठवण करून देतो, ती म्हणजे: ‘हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले
जावो, तुझे राज्य आम्हामध्ये येवो......’, ह्या देवाच्या राज्याला राजवाडा व मोठे
बंगले नाहीत. ह्या राज्याला जगाच्या नकाशावरही कुठले स्थळ नाही. हे राज्य आपणा
प्रत्येकाच्या अंत:करणात उगम पावते व त्याची वाढ होते. देवाचे शांतीचे, न्यायाचे
हेच राज्य आपणा सर्वांच्या अंत:करणात यावे हीच प्रार्थना.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद: हे प्रभो, तुझे राज्य आम्हामध्ये येवो.
१. आपले पोप फ्रान्सीस,
कार्डीनल्स, बिशप्स, धर्मगुरू, धर्मबंधू-धर्मभगिनी ह्यांनी आपल्या कार्याद्वारे
आणि शुभसंदेशाद्वारे ख्रिस्त राजाची सुवार्ता घोषीत करून सर्वत्र ख्रिस्ताचे
प्रेमाचे, शांतीचे व सत्याचे राज्य प्रस्थापित करावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. ख्रिस्त राजाच्या प्रेमाचे
व नम्रतेचे महत्व सर्व मानवजातीला समजावे व सर्वांनी ख्रिस्त राजाच्या मार्गावर
प्रेमाने व नम्रतेने चालून ऐक्याचे राज्य प्रस्थापित करावे, म्हणून आपण प्रार्थना
करूया.
३. राजकीय नेत्यांनी राजांचा
राजा प्रभू येशू ख्रिस्त ह्याचा आदर्श घेऊन त्यांचे जीवन लोकांच्या सेवेसाठी
समर्पित करावे व आपल्या देशाची सेवा निस्वार्थीपणे करावी म्हणून आपण प्रार्थना
करूया.
४. समाजामध्ये ज्या लोकांना न्याय
मिळत नाही. त्यांना ख्रिस्त राजाच्या कृपेने न्यायाचे वरदान मिळावे व त्यांच्यावर
होणारे अन्याय-अत्याचार थांबावे आणि त्यांना माणूस म्हणून सन्मानाने समाजामध्ये जगता
यावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. आपण आपल्या कौटुंबिक व
वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करूया.
congratulations, keep it up
ReplyDelete