सामान्य काळातील तेहत्तीसावा रविवार
दिनांक:
१६-११-२०१४
पहिले वाचन:
नीतिसूत्रे ३१:१०-१३, १९-२०, ३०-३१
दुसरे वाचन: थेसलोनिकाकरांस पत्र ३:१-६
शुभवर्तमान: मत्तय
२५:१४-३०
“शाब्बास,
विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टीत विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळावर नेमणूक
करीन; तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो”
प्रस्तावना:
ख्रिस्ताठायी माझ्या प्रिय बंधूभगिनींनो, ख्रिस्तसभा आज सामान्यकाळातील तेहत्तीसावा
रविवार साजरा करीत आहे. आजची वाचने आपल्याला आपले मानवी जीवन व परमेश्वराने
आपल्याला सोपविलेल्या महत्वाच्या जबाबदारीविषयी सांगत आहे.
आजच्या पहिल्या वाचनात नीतिसूत्रे ह्या पुस्तकातून घेतलेल्या शेवटच्या
अध्यायात सद्गुणी स्त्रीविषयी सांगितलं गेलं आहे. तर थेस्सालनीकाकरांस पाठविलेल्या
पहिल्या बोधपत्रात संत पौल सांगत आहे की आपण इतरांसारखी झोप घेऊ नये तर नेहमी जागे
आणि सावध असावे. आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू रुपयांचा दाखला देऊन आपण ह्या
जगात नेहमी देवराज्याच्या विस्तारासाठी झटत रहावे म्हणून मार्गदर्शन करीत आहे.
आजच्या ह्या पवित्र मिस्साबलीदानात सहभागी होत असताना आपल्या आध्यात्मिक
जीवनाकडे एक कटाक्ष टाकू या आणि स्वतःचं आत्मपरीक्षण करीत आपल्या मनाला प्रश्न
विचारू या की देवाने दिलेल्या मानवी जीवनाचा वापर मी त्याच्या व इतरांच्या
सेवेसाठी खरोखरच करतोय का?
पहिले वाचन: नीतिसूत्रे
३१:१०-१३, १९-२०, ३०-३१
आपल्या दैनंदिन जीवनात आपण पाहतोय की स्त्री ही कोणत्याही कुटुंबातील एक
महत्वाची व्यक्ती असते. भल्या पहाटेपासून तर रात्री उशिरापर्यंत ती आपल्या
कुटुंबाची सारी जबाबदारी कसलीही कुरकुर किंवा तक्रार न करता सांभाळत असते. जर
प्रीती हे देवाचे दुसरे नाव आहे तर मग त्याग स्त्रीचे दुसरे नाव आहे असं म्हणण्यास
वावगं ठरणार नाही. आजच्या पहिल्या वाचनात सद्गुणी स्त्रीच्या त्यागमय जीवनाचे
गुणगान गायीले आहेत. तिचे मोल मोत्याहून अधिक आहे. जर एखाद्या स्त्रीच्या
गळ्यातल्या मोतीहाराने तिचं सौंदर्य खुलून दिसत असेल तर मग एखाद्या कुटुंबातील
सद्गुणी स्त्रीमुळे ते कुटुंब शेजोळ्यात किती उठून दिसत असेल ह्याची कल्पना देखील
करता येणार नाही.
सद्गुणी स्त्री ही आपल्या पतीचे नि कुटुंबाचे नेहमी हित बाळगत असते. ती
देवभिरू नि उदार अंत:करणाची असते. तिच्या मनात गोरगरिबांविषयी आणि दिनदलीतांविषयी
दया असते. जर स्त्रीने आपल्या घरकामात निष्काळजीपणा दाखवला तर त्या कुटुंबाची
दुर्दशा होण्यास फार वेळ लागत नाही.
दुसरे वाचन: थेसलोनिकाकरांस पत्र ३:१-६
संत पौल थेसलोनिकाकरांस पाठविलेल्या पहिल्या बोधपत्रात त्यांना व आपल्या
सर्वांना असा बोध करीत आहे की प्रभूचा दिवस हा रात्रीच्या वेळी काहीही कल्पना
नसताना अचानक येणा-या चोरासारखा असेल. प्रभू येशू ह्या जगाच्या अंती सर्वांचा
न्यायनिवाडा करण्यास नि आपल्या मानवी जीवनाचा हिशेब घेण्यास येणार आहे. पौल
आम्हांला आवर्जून सांगत आहे की आम्ही प्रभूचे शिष्य ह्या नात्याने इतरांसारखे
निष्काळजी अथवा झोपेत असू नये तर सतत सावध नि जागे असावे.
शुभवर्तमान:
२५:१४-३०
प्रभू येशू ह्या भूतलावर असताना लोकांना व त्याचा शिष्यांना मानवी जीवनातील
आणि व्यवहारातील दाखल्याद्वारे देवराज्याविषयी शिक्षण देत असे. आजच्या
शुभवर्तमानात तो रुपयांचा दाखला देऊन परमेश्वराने आपल्या प्रत्येकाला दिलेल्या
विविध देणग्यांचा वापर आपण त्याच्या राज्याच्या विस्तारासाठी नि इतरांच्या
सेवेसाठी कसा करावा हे सूचवत आहे.
सम्यक विवरण:
त्या काळात श्रीमंत लोक व व्यापारी काही कामानिमित्त्ताने बाहेरगावी जाताना
आपल्या मालमत्तेची जबाबदारी आपल्या नोकरांवर टाकून जात असत. येशूने हा दाखला का
सांगितला? परमेश्वर आपल्याशी कसा वागतो हे सुचविण्यासाठी येशूने ह्या दाखल्याचा
उपयोग केला. सदर दाखला आम्हांस सांगतो की एक धनी आपल्या नोकरांवर विश्वास ठेवून
त्यांच्या ऐपतीप्रमाणे आपल्या मालमत्तेची जबाबदारी सोपवून देतो. त्यांनी काय करावं
हे प्रत्येक नोकरावर अवलंबून होतं. पहिल्याने आणि दुस-याने आपल्याला मिळालेल्या
पाच व दोन हजार रुपये व्यापारात गुंतवून तेवढेच आणखी रुपये कमावले म्हणून
त्यांच्या धन्याने त्यांना शाबासकी देऊन त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविली. मात्र
तिस-या नोकराने काहीच न करता त्याला दिलेले एक हजार रुपये जमिनीत पुरून ठेवले
म्हणून त्याच्या धन्याची आग मस्तकाला भिडली व त्याने त्याला शिक्षा केली. त्याला
जे दिलं होतं ते देखील त्याच्याकडून हिसकावून घेतले व त्या निरुपयोगी दासाला
अंधारकोठडीत टाकले.
बोधकथा:
१. एकदा एक मनुष्य देवावर खूप रागावतो व त्याला
तावातावाने विचारतो, अरे देवा, गेली तीन वर्षे मी रोज तुझ्याकडे प्रार्थना करतोय
की मला माझ्या जीवनात तरी लॉटरी लागू दे. अरे, तुझ्याच पुत्राने आम्हांला सांगितले
आहे की “मागा म्हणजे मिळेल” मग गेली तीन वर्षे मी तुझ्याकडे मागतोय की निदान मला
एकदा तरी लॉटरी लागू दे, माझं भाग्य उजळू दे. मग मला लॉटरी का लागत नाही? माझ्या
आशेची का निराशा का करतोस? देव म्हणाला, “अरे माझ्या भक्ता नुसतं वक्ता असून चालत
नाही रे. माझी तीन वर्षे केलेली प्रार्थना पुरी झाली. आता निदान माझ्यासाठी एक छोटसं
काम कर, एखाद्या लॉटरीच्या दुकानात जा नि लॉटरीचं तिकीट तरी खरेदी कर”.
२. न्यूयॉर्क मध्ये एक कंपनी लोकांच्या घरांसाठी
चोरांना कधीच फोडता येणार नाही अश्या विशेष चोर-प्रतिबंध (burglar-proof) काचा बनवायची.
त्या कंपनीने खूप लोकांसाठी अशा काचा बनवून अनेकांना मदत केली. परंतु एके रात्री
काही चोरांनी त्या कंपनीच्याच कचेरीच्या काचा फोडून फार मोठी चोरी केली. तेव्हा
कंपनीचा मालक आपल्या कपाळावर हात मारू म्हणाला, “आपण आपल्या कंपनीचा वापर
लोकांच्या घरांसाठी केला परंतु आपल्या कंपनीसाठी मात्र साध्याच काचा वापरल्या. आपल्या
कलेचा वापर आपण आपल्यासाठी केला असता तर आज ही परिस्थिती आली नसती”.
३. एकदा मदर तेरेसाला विचारलं गेलं, “तुम्ही
भारतातील गरिबांसाठी एवढं काही करत आहात, तरीही भारतात अजूनही गरिबी आणि दारिद्रय
आहे. तुम्हाला वाटतं का की ह्या भारतातील गरिबी नष्ट करण्यास यशस्वी व्हाल?” मदर
तेरेसा म्हणाल्या, “देवाच्या दृष्टीने आपण किती यशस्वी झालो ह्यापेक्षा आपण किती
विश्वासू आहोत हे महत्वाचं असतं. आपण फार मोठे चमत्कार करावेत नि फार मोठमोठी
कृत्ये करावीत ही देवाची अपेक्षा नसते तर त्याने आपल्याला दिलेल्या मानवी जीवनाचा
व निरनिराळ्या कलागुणांचा वापर त्याच्या गौरवासाठी व इतरांच्या सेवेसाठी करावा हिच
त्याची आपल्याविषयी इच्छा असते.
मनन चिंतन:
आपल्या प्रत्येकाला परमेश्वराने आपआपल्या कुवतीप्रमाणे कलागुण दिलेले आहेत.
कुणाला चांगला आवाज, कुणाला चांगलं आरोग्य, कुणाला चांगली बुद्धी, कुणाला चांगली
आर्थिक परिस्थिती वैगेरे. आपण समाजात पाहतोय की बरेच लोक देवाने त्यांना दिलेल्या
वेगवेगळ्या कलागुणांचा चांगला वापर करून त्यांच्या कलागुणास्त अधिक भर पडते तर उलट
समाजात अशीही माणसं आहेत की जी आपल्या स्वतःची तुलना इतरांबरोबर करत आपल्या
नशिबाला दोष देत असतात. काही तर नेहमीच कुरकुर नि तक्रार करीत असतात.
शुभवर्तमानातील दाखल्यात तिस-या नोकराने कदाचित असा विचार केला असेल की माझ्या
मालकाने मला एकच हजार रुपये का दिले? म्हणजे त्याने मला इतर दोघांपेक्षा कमी
लेखले. माझी त्यांच्याएवढी पात्रता नाही असं माझ्या मालकाला वाटलं असेल. आता मालक
परत आल्यावर मी त्यांना काय हिशेब देणार? मी माझ्या मालकाला जाणून आहे की तो कठोर
माणूस आहे. जेथे त्यांनी पेरले नाही तेथे तो कापणी करतो व जेथे पसरून ठेवले नाही
तेथून तो गोळा करतो. बाकीच्या दोघांकडे पाच नि दोन हजार रुपये आहेत. त्यांनी ते
व्यापारात वापरले तरी चालेल परंतु मी अजिबात धोका पत्करू शकत नाही. माझ्या
धन्याच्या स्वभावानुसार मला वागले पाहिजे. मी हे पैसे जमिनीत पुरून ठेवतो व तसेच
धन्याच्या हाती परत देईन”. त्याची चूक अशी होती की त्याच्या धन्याने त्याच्यावर
सोपविलेल्या जबाबदारीबाबत त्याने काहीच केले नाही. तो नुसता तसाच निष्काळजीक राहिला.
आपल्या जीवनात आपणही कधी-कधी या तिस-या नोकराप्रमाणे वागतो. आपण आपली तुलना
इतरांबरोबर करतो. आपल्यापेक्षा इतरांजवळ जास्त आहे असा विचार करत जन्मभर मनातल्या
मनात कुढत असतो नि मानवी जीवन असच कुजत राहत.
ज्याप्रमाणे सदर दाखल्यातील धनी परत आल्यानंतर आपल्या नोकराकडून हिशेब मागतो
त्याप्रमाणे प्रभू येशू ह्या जगाच्या अंती येऊन आपल्या सर्वांकडून आपाल्या जीवनाचा
नि परमेश्वराने आपल्याला दिलेल्या विविध कलागुणांचा हिशेब मागणार आहे. आपल्या
आयुष्याच्या संध्याकाळी हे जग सोडून आपल्या सर्वांना ईश्वरी न्यायालयासमोर उभं
राहायचं आहे. आपलं मानवी जीवन ही देवाची आपल्याला मिळालेली विशेष देणगी आहे.
मराठीत सुंदर असं भक्तीगीत आहे, मीठ तुम्ही ह्या पुण्यभूमीचे! गुण मीठाचे सोडू
नका! पायदळी तुडविण्यापलीकडे त्याचा वापर होईल का. एकदाची हा मानव जन्म! जन्म
निरर्थक करू नका!!” इंग्रजी भाषेत अशी म्हण आहे की, “Either you use it or lose it” ज्याप्रमाणे निसर्गातील
एखाद्या वस्तूचा वापर केला जात नाही तर कालांतराने ती वस्तू निरर्थक बनते व तिला कच-याच्या
टोपलीत टाकले जाते. त्याच प्रमाणे देवाने दिलेल्या कलागुणांचा जर आपण योग्य वापर
केला नाही तर त्या कलागुणांचा काहीच विस्तार न होता उलट काही काळाने ते कलागुण
आपल्यामधून नष्ट होतात आणि त्यासाठीच ते नष्ट होऊ नयेत म्हणून आपण नेहमी कष्ट
घ्यावेत.
कुणीतरी म्हटलं आहे की “लोखंडासारखं नुसतं गंजून जाण्यापेक्षा चंदनाप्रमाणं झिजून
जावं” तसच आपला हा मानवी देह जीवनाच्या अंती नुसतं कुजून जाण्याअगोदर देवाच्या
गौरवासाठी नि इतरांच्या सेवेसाठी सार्थकी लावावा. मेणबत्तीप्रमाणं स्वतःला जाळून
इतरांच्या काळोखी जीवनात सत्कार्यरूपी प्रकाशाची किरणे पसरू या.
ह्या पवित्र मिस्साबलिदानात देवाने आपल्याला दिलेल्या विविध कलागुणांबद्दल
त्याचे आभार मानूया व त्याच्या नि इतरांच्या सेवेसाठी सतत कार्यरत राहू या,
आमेन.
विश्वासू
लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभो, दया कर आणि तुझ्या लोकांची प्रार्थना
ऐकून घे.
- अखिल ख्रिस्तसभेसाठी:- आमचे पोप, कार्डीनल्स, महागुरू, धर्मगुरू व प्रापंचिक ह्या सर्वांसाठी प्रार्थना करतो की प्रभू येशूचं कार्य सातत्याने पुढे नेण्यासाठी व देवराज्याच्या विस्तारासाठी सर्वांनी निस्वार्थी वृत्तीनं कार्य करावं म्हणून आपण प्रार्थना करूया.
- ख्रिस्ती कुटुंबांसाठी:- परमेश्वराने दिलेली जबाबदारी ख्रिस्ती कुटुंबातील सर्व मातापित्यांनी, लेकराबाळांनी व नोकर चाकर वर्गानी विश्वासाने व प्रामाणिकपणे पार पाडावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
- भारतासाठी:- आपल्या राजकीय नेत्यांनी व सर्व देशवासियांनी आपल्या स्वार्थाला नि अहंकाराला तिलांजली देऊन भारतमातेच्या सर्वांगीण विकासासाठी तळमळीने झटावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
- आपल्या सर्वांसाठी:- ह्या पवित्र मिस्साबलीदानात उपस्थित असलेल्या आपण सर्वांनी आपापल्या कलागुणांचा योग्य तो उपयोग करून देवराज्याच्या विस्तारासाठी मौलाचा वाटा उचलावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
- आपल्या वैयक्तिक व सामाजिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment