Tuesday, 25 November 2014

Reflections for the Homily By : Fr. Joel Pen



आगमन काळातील पहिला रविवार


दिनांक: ३०/११/२०१४
पहिले वाचन: यशया ६३:१६ब,१७,१९ब,६४:२-७
दुसरे वाचन: १ करिंथ १:३-९
शुभवर्तमान: मार्क १३:३३-३७

“सावध असा, जागृत रहा कारण समय जवळ आला आहे”

प्रस्तावना:

ख्रिस्ताठायी जमलेल्या प्रिय भाविकांनो, आजपासून ख्रिस्तसभा उपासनेच्या नवीन वर्षात पदार्पण करीत आहे आणि ही सुरवात आपण आगमन काळाने म्हणजे येशू येण्याच्या तयारीने करीत आहोत. आजची उपासना आपल्याला जागृत राहून आपली जबाबदारी योग्य रितीने पार पाडण्यास बोलावत आहे.
इस्रायल लोक देवाच्या विरुद्ध अति वाईट वृत्तीने वागले व त्यांनी पापे केली म्हणून आजच्या यशयाच्या पुस्तकातून घेतलेल्या पहिल्या वाचनात आपण त्यांना देवाकडे दयेची याचना करताना पाहतो. तर दुसऱ्या वाचनात पौल करिंथकरांस येशूच्या दुस-या आगमनाविषयी सुचना करीत आहे तसेच मार्कलिखित शुभवर्तमानाद्वारे येशुख्रिस्त आपणास जागृत राहण्यास निमंत्रण देत आहे.
आजच्या मिस्साबलीदानात सहभागी होत असताना आपण सदैव जागृत राहून आपल्याला प्रभूच्या आगमनाची योग्य ती तयारी करता यावी म्हणून प्रार्थना करूया.

पहिले वाचन: यशया ६३:१६ब, १७, १९ब, ६४:२-७

यशया हा परमेश्वराचा खरा सेवक व भविष्यवादी होऊन गेला, त्याने परमेश्वराला पाहिल्यापासून पूर्ण विश्वास ठेवला होता. तो म्हणत असे की तुच आमच्या जीवनाचे केंद्रस्थान आहेस.
त्याने देवाकडे केलेली दयेची याचना ह्या अध्यायात दिसून येते. कारण इस्रायल लोक देवाच्या विरुद्ध अति वाईट वृत्तीने वागले व खूप वाईट पापे त्यांनी केली होती. त्यांच्या अनैतिक आचारणामुळे ते देवापासून दुरावले होते, अश्या वेळी हा भविष्यवादी म्हणत आहे की हे देवा तुझ्यासारखा दुसरा देव नाही. तू ह्या लोकांना शाशन कर, हे लोक आम्हांस ओळखीत नाहीत, दुष्ट वर्तणुकीमुळे तुझे पवित्र स्थान ह्यांनी तुडवून टाकले आहे. तुझे वतन झालेले वंशाकरिता तू परत ये, यापुढे अध्याय ६४ मध्ये तो त्याची अंतर्यामी भावना अती कडक शब्दात बोलावून दाखवत आहे, तू या धरतीवर आला तर तुझ्या येण्याने पर्वत देखील कंपयमान होतील, अग्नी जसा काडया-कुडया भस्म करितो, अग्नीने जशी पाण्याला उकळी येते त्याप्रमाणे तुझ्या येण्याने प्रताप दाखव, जो तुझ्या नावाने धर्माचरण करतो व वागतो त्यांना तू भेट देतोस, अशा विश्वासानं तुझ्या येण्याने आमचा उद्धार कर, आम्ही पाला-पाचोळ्याप्रमाणे कमकुवत झालो आहोत. आमच्या अनितीमुळे आम्ही तुझ्यापासून दुरावलो आहोत. इतक्या तीव्र कळकळीने हा संदेष्टा देवाशी करुणेने बोलत आहे.

दुसरे वाचन: १ करिंथ १:३-९

या अध्यायामध्ये करिंथ नावाच्या गावी ज्यांनी ख्रिस्ताला स्वीकारले त्यांना पौलाने हे पत्र लिहिले आहे. हे ठिकाण ग्रीसजवळ आखीया प्रांताची राजधानी असलेले शहर होय. देवाने येशूद्वारे तुमच्यावर कृपा केली आहे व ते लोक येशूच्या वचनाप्रमाणे वागू लागले तेव्हा पौल त्यांना दुस-या आगमनाविषयी सुचना करीत आहे की तुम्हाला देवाने जी कृपादाने दिली आहेत त्यात तुम्ही अनितीमान होऊ नये म्हणून योग्य रितीने वर्तन करा नाहीतर तोच तुम्हाला दोष लावील. या शिवाय आणखी काही महत्वाच्या सूचना केल्या, त्या पुढील प्रमाणे दर्शविल्या आहेत:
  1. देवाने तुमच्यावर खरोखर कृपा केली आहे हे विसरू नका.
  2. येशूच्या ज्ञानात, बोलण्यात, आचरणात तुम्ही विश्वासनीय ठरलेले आहा.
  3. तुम्ही कृपादानाची वाट पहा, त्यात तुम्ही उणे पडू नका.
  4. येशूचे दुसरे आगमन होणार आहे. त्यात सहभागी होण्यासाठी तुमची निवड केली आहे. संसारिक कामात गुरफटून जाऊ नका. देवाने ज्या कार्यासाठी तुम्हास पाचारण केले ते काम आवडीने करीत रहा. प्रथम देवाच्या कामाला प्राधान्य द्या. ही देवाची आज्ञा आहे.


शुभवर्तमान: मार्क १३:३३-३७
तो दिवस आणि ती घटका: मार्कच्या अध्यायात देवाच्या विचारात किती चांगुलपणा आहे हे या अध्यायात आपणास शिकावयास मिळते. प्रभू येशू नेहमी दाखल्याच्या पद्धतीनेच लोकांना समजेल असे बोलत असे. मनुष्य नेहमी जागृत रहावा, सावध असावा म्हणून ह्या दाखल्यामध्ये तो प्रत्येकास सुचना करीत आहे. वास्तविक मार्क हा येशूचा शिष्य नव्हता परंतु तो प्रेषितांच्या सहवासातील एक व्यक्ती होता. येशूने एका कुलीन घराण्यातील नोकराची जबाबदारी कशी करावी व ते काय असते हे दर्शविले आहे. प्रत्येकाला मालकाने दिलेलं काम चोख करण्यास तो सांगतो व मालक घरधनी बाहेरगावी निघून जातो. चोर चोरी करून घरातील सर्व लुटून नेतील म्हणून सर्वांना दक्षतेत राहण्यास आदेश देतो कारण तो व ती घटका केव्हा येईल हे कुणालाच माहित नाही. त्याचप्रमाणे ह्या जगात देवाने त्याचं कार्य करण्यास ज्यांनी येशूला स्वीकारलं त्याने त्यांच्यावर काही जबाबदारी टाकली आहे ती आपण चांगल्या प्रकारे पार पाडावी अशी त्याची अपेक्षा आहे.

बोधकथा

एकदा धर्मगुरूने एका सभ्य गुह्स्थाला प्रश्न विचारला की तू सध्या काय करीत आहेस? त्या गुह्स्थाने उत्तर दिले मी इंजिनियरिंग करीत आहे. धर्मगुरूने पुन्हा विचारले ह्याची तुला काय गरज आहे? उत्तर मिळाले मला मोठी मानाची नोकरी मिळेल. धर्मगुरूने पुन्हा प्रश्न विचरला तुला नोकरी कशासाठी पाहिजे? पुन्हा उत्तर मिळाले मला भरपूर पैसा मिळविण्यासाठी आणि मग मी माझे लग्न अगदी मजेत करीन व आनंदाने जीवन जगेन. धर्मगुरूने प्रश्न विचारणे चालूच ठेवले व शेवटचा प्रश्न विचरला त्या नंतर तू काय करणार आहेस? त्या गृहस्थाने उत्तर दिले यापुढे मी काय करणार याचा अद्दाप विचार केला नाही. परंतु तसा मी खूप दिवस जगणार आहे व म्हातारा होऊन मरणार आहे. तसेच आणखी एका प्रश्नाने धर्मगुरूने त्याला बुचकळ्यात पाडले. तो प्रश्न म्हणजे तू तुझ्या मृत्यूनंतर विचार करू शकशील काय? तरुणाने उत्तर दिले, ‘नाही’ मग धर्मगुरू त्यांस म्हणाले मग तू आताच विचार का करू शकत नाही? प्रत्येक माणसाने आपला आजचा दिवस हा शेवटचा समजून आपल्यावर असलेली जबाबदारी सदा-सतर्क राहून प्रामाणिकपणे पार पाडावी.

मनन चिंतन

१.    परमेश्वराने मानवास ह्या पृथ्वीवर त्या निर्माणकर्त्या परमेश्वराची आयुष्यभर सेवा करण्यास व सुख भोगण्यास निर्माण केले आहे परंतू मनुष्याने प्रपंचात रमत न राहता सतत निर्माणकर्त्याच्या आज्ञेचे पालन करून दिलेली जबाबदारी योग्य रितीने पार पाडली पाहिजे. हे ज्ञान ज्यास समजले तो धन्य होय. कारण मनुष्याच्या मुत्युनंतरचे अंतीम खरे सुखी जीवन परमेश्वराच्या सहवासात सुरु होते यालाच शाश्वत जीवन म्हणतात. मृतुनंतरचे जीवन सामोरे ठेवून जगले पाहिजे. मृत्यू कधीही कुठल्याही वेळी येऊ शकतो. तसे अनअपेक्षित प्रकारे आणि अनअपेक्षित वेळी घडू शकते. ११ तारखेला सप्टेंबर २००१ साली अमेरिकेची शान असलेले वर्ल्ड ट्रेड सेंटर दहशतवाद्यांनी नष्ट केले. अगदी काही क्षणातच सर्वकाही राख झाले. आपल्याला आपली मृत्यूची वेळ आणि प्रकार ठाऊक नाही. म्हणूनच प्रत्येकाने चांगली कृत्ये करूनच आपल्या मरणाची तयारी केली पाहिजे. यासाठी प्रत्येकाने आपल्या जीवनात चांगले काम केले पाहिजे. संसारिक गोष्टीमध्ये गुरफटून न जाता देवाने ज्या गोष्टीसाठी आपणास पाचारण केले ते काम आवडीने व जबाबदारीने करत राहिले पाहिजे. कारण या विश्वाचा धनी, मालक प्रभू येशु आपल्याला दिलेले काम बघायला येणार आहे, यासाठी तो आपणास ईशारा देत आहे की तुम्ही बेसावध राहू नका; तर सदा जागृत रहा.

२.    आमच्या जीवनात आगमन काळ म्हणजे काय ते प्रथम समजून घेऊया. आगमन काळ याचा पूर्व इतिहास जाणून घेणे महत्वाचे आहे. देवाची योजना फार चांगली होती परंतु आदम आणि एवा यांनी देवाची आज्ञा मोडून पाप केले, हे पाप आणखी काही दिवसांनी वाढत गेले, तर ते कसे वाढत गेले हे यशया २४:४ ते ६ दाखवत आहे, “पृथ्वी शोकाकुल व कृश झाली आहे. जग झुरून कृश झाले आहे. पृथ्वीवरील प्रतिष्ठीत जण जर्जर झाले आहेत. पृथ्वी आपल्या रहिवास्यांकडून भ्रष्ट झाली आहे. कारण त्यांनी नियमांचे उल्लंघन केले आहे. यास्तव पृथ्वी शापाने ग्रासली आहे.” त्यासाठी देवाने अनेक संदेष्टे, भविष्यवादी पाठविले. त्यांनी भविष्यवाणी केली की तारणारा येणार आहे आणि तो म्हणजे खुद्द प्रभू येशू ख्रिस्त होय. यशयाने ही भविष्यवाणी तो आठशे वर्षे येण्यापूर्वी केली होती. स्त्रीची संतती येशू देवाचा पुत्र होय, तो पापी माणसाच्या उद्धारासाठी येणार आहे. त्याची आई मरिया ही त्या दुष्ट सैतानाचे डोके फोडील. सैतानाने येशूची टाच हातापायी ठोकलेल्या खिळ्यांनी फोडली. परंतु त्याच क्रुसाच्या वधस्तंभाने सैतानाचे सामर्थ्य नष्ट केले जाईल. यशया ९:६-७ “कारण आम्हासाठी बाळ जन्माला आहे, आम्हास पुत्र दिला आहे; त्याच्या खांद्यावर सत्ता राहील. त्याला अद्भूत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील. त्याच्या सत्तावृद्धीला व शांतीला अंत नसणार; तो दाविदाच्या सिंहासनावर बसून त्याचे साम्राज्य चालविल आणि तेथून पुढे ते सर्वकाळ न्यायाने व धर्माने दृढ व स्थिर करील. सेनाधीश परमेश्वराचा आवेश हे सिद्धीस नेईल.” यशया ७:१४ मध्ये म्हटले आहे: “कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इम्मानुएल (आमच्या सानिध्यात देव) असे ठेवील”. व हे शास्त्रलिखित वचन पूर्ण झाले, खुद्द देवच येशूचे नाव घेऊन ह्या जगात आला. हाच आगमनाचा काळ आजपासून पुन्हा नव्या उमेदिने आपण साजरा करत आहोत.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद: हे प्रभू, तुझे स्वागत करण्यास आमचे अंतःकरण शुद्ध ठेव.
  1. आपले परमगुरु पोप फ्रान्सीस व इतर सर्व बिशप, महागुरू, धमर्गुरू, धर्मभगिनी, तसेच ख्रिस्ताठायी सेवाकार्य करण्या-या सर्व व्यक्ती यांना प्रभूचे कार्य चांगल्या प्रकारे करण्यास योग्य ती कृपाशक्ती लाभावी म्हणून आपण प्रभूचरणी प्रार्थना  करू या.
  2. प्रभू येशूच्या आगमनासाठी आम्ही सदैव तत्पर असावे, पापापासून मुक्त राहून ख्रिस्ताच्या आगमनाचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करण्यास पात्र ठरावे, म्हणून आपण प्रभूचरणी प्रार्थना करू या.
  3. ख्रिस्ताचे स्वागत करणे म्हणजे गोर गरीबांचा स्वीकार करणे, ख्रिस्ताचे रूप आपणांस अपंग, लुळे, बहिरे, गोर-गरीबांमध्ये पाहण्यास परमेश्वराची दैवी शक्ती लाभावी म्हणून आपण प्रभूचरणी प्रार्थना करू या.
  4. चैनबाजी अहंकार किंवा आनंद म्हणजे शाश्वत जीवन नाही, ह्याची जाणीव आम्हाला व्हावी व अशा मोहापासून आम्ही दूर रहावे म्हणून आपण प्रभूचरणी प्रार्थना  करू या.
  5. आपला प्रभू सर्व जगाचा द्या-सागर आहे, तो आपल्या विनंत्या ऐकतो म्हणून थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक गरजा प्रभूचरणी ठेऊ या.  

 


   

No comments:

Post a Comment