Reflections for Homily By: Botham Patil
सामान्यकाळातील चौथा रविवार
दिनांक : ०१/०२/२०१५
पहिले वाचन : अनुवाद १८:१५-२०
दुसरे वाचन : करिंथकरांस पहिले पत्र ७:३२-३५
शुभवर्तमान : मार्क १:२१-२८
“ तो त्यांना अधिकार
असल्यासारखा शिकवीत होता ”
प्रस्तावना:
ख्रिस्तामध्ये जमलेल्या भाविकांनो, आज ख्रिस्तसभा सामान्य
काळातील चौथा रविवार साजरा करीत आहे. आजची उपासना आपणाला येशूची अधिकारयुक्त शिकवण
व त्याच अधिकाराने केलेले महत्कृत्य ह्यावर मनन-चिंतन करावयास आवाहन करत आहे.
आजच्या पहिल्या वाचनात परमेश्वर एक संदेष्टा लोकांतून निवडून
आपली वचने त्याच्या मुखातून सांगण्याचे आपण ऐकत आहोत, त्याचीच पुर्तता शुभवर्तमानामध्ये
होत आहे. येशू ख्रिस्त परमेश्वराची वचने शास्त्र्यांसारखी न शिकवता खात्रीपूर्वक व
वेगळ्याच प्रकारे शिकवतो, ज्याच्यावरून सभास्थानात जमलेला सर्व समुदाय थक्क होतो.
इतकेच नाही तर तो फक्त शब्दांवरच न राहता प्रत्यक्ष कृतीद्वारे अशुद्ध आत्म्याला
बाहेर घालवून देतो. तर दुस-या वाचनात संत पौल परमेश्वराला प्रसन्न कसे करावे व
कोणत्या प्रकारचे आचरण असावे हे करिंथकरांस लिहितो.
सैतानाचे निघून जाणे म्हणजेच देवाच्या राज्याची सुरवात
होणे. येशू शिकवणुकीबरोबरच त्याच्या शब्दांना कृतीची जोड देतो. आजच्या ह्या
मिस्साबलीत सहभागी होत असताना आपले शब्द आपल्या दररोजच्या कृत्यांना जुळावेत म्हणून
परमेश्वराची कृपा मागूया.
सम्यक विवरण:
पहिले वाचन : अनुवाद १८:१५-२०
परमेश्वर स्वतः प्रवक्ता/संदेष्टा निवडून आपली वचने त्याच्या मुखातून सांगेल,
ह्या बाबतीचा हा उतारा आहे.
इस्रायली लोकांसाठी निवडलेला संदेष्टा हा ढोंगी किंवा भोंदू
संदेष्टा नसून (अनुवाद १३), तो खरा-खुरा संदेष्टा असेल व तो मोशे सारखा असून
त्यांच्यातूनच असेल असे परमेश्वर १८ व्या अध्यायातील १५ व्या ओवीत सांगत आहे;
याशिवाय तो परमेश्वराची वचने अधिकाराने बोलेल व लोक त्याचे ऐकतील. इस्रायलमध्ये
ह्या अगोदर संदेष्टे होऊन गेले होते, बायबलमध्ये काही ठिकाणी त्यांचा नावाने
उल्लेख केला आहे, जसा: आब्राहाम (उत्पत्ती २०:७), तर काही अनोळखी संदेष्टेदेखील
बायबलमध्ये नमूद केलेले आहेत (गणना ११:२९; १२:६-८). ह्या सर्व संदेष्ट्याबरोबर परमेश्वर
माध्यमांमार्फत बोलला परंतु मोशेबरोबर देव ‘गूढ अर्थाने’ न बोलता ‘समोरा-समोर’
बोलला (गणना १२:८). मोशेसारखा प्रवक्ता/संदेष्टा देण्यामागे कारण म्हणजे तो देवाची
वचने ऐकून, तीच वचने लोकांना सांगू शकेल जेणेकरून परमेश्वराचा अधिकार त्यांच्यावर
राहील आणि जो कोणी त्या वचनांची अवज्ञा करेल (पाळणार नाही) तो परमेश्वराला जाब
देण्यासाठी जबाबदार असेल. ह्याचाच अर्थ असा की संदेष्टे दोन प्रकारचे आहेत:
अ) परमेश्वराचे संदेष्टे,
ब) इतर (खोट्या) देवाचे संदेष्टे
परमेश्वराने निवडलेला संदेष्टा मोशेसारखा असेल कारण जे
दृश्य त्याने होरेब पर्वतावर पाहिले (ओवी १६), तेच निवेदन त्याने लोकांपुढे केले
आणि म्हणूनच मोशेसारखा संदेष्टा उभा करून आपली वचने त्याच्या मुखातून निवेदन करावी
हा परमेश्वराचा हेतू आहे हे पहिले वाचन सांगते.
दुसरे वाचन : करिंथकरांस पहिले पत्र ७:३२-३५
कोणत्याही गोष्टीविषयी निष्काळजी/बेफिकीर असणे हा एक अपराध
आहे किंवा एक चूक आहे (ओवी ३२), परंतु त्याची योग्य ती काळजी घेणे ही एक जबाबदार
माणसाची निशाणी/लक्षण आहे. भौतिक गोष्टींविषयी चिंतातूर होणे, त्याचा घोर लागणे,
त्या गोष्टी मिळवण्यातच संपूर्ण जीवन घालवणे किंवा इतर गोष्टी सोडून भौतिक
गोष्टींचाच विचार करणे हे एक पाप आहे. ज्या गोष्टींची काळजी माणसाचं मन अस्वस्थ
करते, परमेश्वराच्या आराधनेपासून लक्ष विचलित करते ते हानिकारक आहे; कारण परमेश्वराची
सेवा एकाग्रतेने करणे हे एक उत्तम आचरण आहे (ओवी ३५).
परमेश्वरची स्तुती-आराधना करताना मन आणि हृदय विचलित न होता
एक असलं पाहिजे हेच करिंथकरांस लिहिलेल्या ह्या अध्यायात संत पौल अविवाहित व
विवाहित स्त्री-पुरुषांना उद्देशून सांगत आहे. त्याचबरोबर प्रत्येक प्रकारच्या
विवाहित/अविवाहित लोकांकडून उत्तम प्रकारचे आचरण दाखवून प्रभूची सेवा एकाग्रतेने
कशी घडेल ह्याविषयी हा उतारा सांगत आहे. जे विवाह करीत नाहीत ते ज्यांनी विवाह
केला आहे त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत असे संत पौल सांगत नाही परंतु दोन्ही
प्रकारच्या लोकांनी इतर गोष्टींबाबत चिंता करूनही परमेश्वराला जास्त महत्व देणे
हाच हे सांगण्यामागचा हेतू आहे.
शुभवर्तमान : मार्क १:२१-२८
मार्क त्याच्या शुभवर्तमानाच्या पहिल्याच अध्यायात येशूच्या
अधिकाराविषयी सांगत आहे. येशूचा बाप्तिस्मा झाल्यानंतर आणि पहिल्या शिष्यांना
पाचारण केल्यानंतर येशू लगेच वेळ न घालवता देवाच्या राज्याची घोषणा करावयास लागतो.
ह्या अध्यायात येशूच्या अधिकाराविषयी तीन वेळा वेगवेगळा उल्लेख केला आहे:
अ) अधिकाराची शिकवण
ब) अधिकाराने घालवून दिलेला अशुद्ध आत्मा, आणि;
क) येशूच्या अधिकाराने थक्क झालेला समुदाय
अ) अधिकाराची शिकवण
ओवी २१ सांगते, “येशू सभास्थानात जाऊन शिक्षण देऊ लागला”.
येरुशलेममध्ये एकच मंदिर होते आणि तेथे यज्ञ अर्पण आणि आराधना होत असे, परंतु
जेथे-जेथे दहा बारा घरांची वसाहत असे, त्या ठिकाणी सभास्थान असे जेणेकरून लोकांना
भेटण्यासाठी सोयीस्कर होईल. सभास्थानात जाऊन लोक प्रार्थना, प्रभूवचन व तद्नंतर
त्याच्यावर दिलेला आदेश वा सूचना ऐकत. नव-नवीन शिकवण शिकण्यासाठी लोक सभास्थानात
जमा होत व तेथे मिळालेली शिकवण ऐकून ती आपल्या जीवनात अनुसरण्याचा प्रयत्न करीत.
अशाच एका शब्बाथ दिवशी येशू तेथे जाऊन लोकांना शिकवण देतो. येशूची शिकवण ही
त्यांच्या शास्त्र्यांसारखी नसून अधिकाराची होती (ओवी २२), ह्यावरून तेथे जमलेले
सर्व लोक थक्क झाले कारण येशू कोण असल्याची पार्श्वभूमी त्या सर्वांना ठाऊक होती,
तो एक सुताराचा मुलगा व कोणत्याही प्रकारचं शिक्षण नसताना ही शिकवण देत होता,
ह्यास्तव सर्वजण विस्मित झाले होते.
ब) अधिकाराने घालवून दिलेला अशुद्ध आत्मा
ह्याच अध्यायात
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ‘येशू अशुद्ध आत्मा असलेल्या माणसाला बरे करतो’ (ओवी
२६). येशू जेव्हा सभास्थानात आला तेव्हा तो अशुद्ध आत्मा चलबिचल झाला, कारण येशू
कोण आहे ह्याची त्या आत्म्याला जाण होती (ओवी २४); येथेच नाही तर भरपूर ठिकाणी आपण
बघतो की अशुद्ध आत्मे येशू ‘देवाचा पुत्र’ असल्याची कबुली देतात (मत्तय ८:२९;
मार्क ३:११; लूक ९:४१), एवढेच नाही तर मत्तय १४:३३ मध्ये शिष्य येशूला देवाचा
पुत्र म्हणतात तर सैतान खुद्द मत्तय ४:३ व लूक ४:३ मध्ये येशूला ‘देवाचा पुत्र’
म्हणून संबोधतो, परंतु जे याजक व यहुदी लोकांचे अधिकारी होते ते येशूला ओळखण्यास
कमी पडले, त्यांनी सत्य माहित असूनदेखील येशूला प्रश्न विचारले, ‘तू देवाचा पुत्र
आहेस काय?’ (मत्तय २६:६३, २७:४०; लूक २२:७०). ह्यावरून स्पष्ट होते की अधिकारी जाणून
बुजून डोळे असून आंधळे असल्यासारखे वागले किंवा योहानाच्या शब्दात सांगावयाचे झाले
तर, “जे त्याचे स्वतःचे त्याकडे तो आला, तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार
केला नाही” (योहान १:११), परंतु अशुद्ध आत्मे त्याला ओळखण्यापासून वंचित राहिले
नाहीत.
अशुद्ध आत्मा
येशूचे नाव घेऊन त्याची ओळख देत होता परंतु येशूने त्याला धमकावून चूप केले कारण
पुरातन/प्राचीन काळात एखाद्याचे नाव उच्चाराने म्हणजेच त्याच्यावर सत्ता गाजवणे
अशी समज होती, म्हणूनच अशुद्ध आत्म्याला बोलू न देता येशू त्याला धमकावतो व
त्याच्यातून निघून जाण्यास सांगतो. येशू आपला अधिकार त्या अशुद्ध आत्म्यावर गाजवतो
व त्या माणसाला बरे करतो. ही गोष्ट शब्बाथाच्या दिवशी चक्क सभास्थानात घडते परंतु
कोणीही त्याला आक्षेप करत नाही कारण येशूने केलेला चमत्कार लोक अनुभवतात, त्याने
काढलेल्या उद्गारावरच हा प्रसंग संपत नाही तर तो अशुद्ध आत्मा लागलेला मनुष्य बरा
होतो, ही घटना सर्व लोक प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहतात व थक्क होतात.
क) येशूच्या अधिकाराने थक्क
झालेला समुदाय
शास्त्री हे
शास्त्राची शिकवण देण्यासाठी निवडलेला गट होता आणि हे करण्यासाठी त्यांना विशेष
अधिकार देण्यात येत असे, याजक आणि परुश्यांसारखाच हा वर्ग देखील समाजात प्रतिष्ठीत
मानला जाई, परंतु येशूकडे असलेला अधिकार याजकांकडून नसून खुद्द त्याच्या
पित्याकडून होता, कारण तो स्वतःच म्हणत असे, “जे पिता मला सांगतो, तेच मी सांगतो”
(योहान ५:१९, १२:४९); “मला स्वतःहून काही करता येत नाही” (योहान ५:३०); किंवा “ज्याने
मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे व त्याचे कार्य सिद्धीस न्यावे हेच माझे
अन्न आहे” (योहान ४:३४).
येशूच्या
शिकवणुकीने आणि अशुद्ध आत्म्याच्या बाहेर जाण्याने लोक इतके थक्क झाले होते की
तेथे जमलेले सर्वजण येशूच्या अधिकाराविषयी चर्चा करत होते आणि ‘काय ही अधिकारयुक्त
नवीन शिकवण!’ ह्यावर विचार करत होते (ओवी २७). मत्तय ७:२८ मध्ये देखील हेच दृश्य
आपणाला दिसून येते. परंतु पुन्हा एकदा धर्माचे निवडलेले अधिकारी ‘तुम्ही हे
कोणत्या अधिकाराने करता?’ ह्याची जाब विचारतात (मत्तय २१:२३), परंतु येशू
ख्रिस्ताला हा अधिकार पित्याकडून लाभला आहे हे तो स्पष्ट करतो (योहान ५:२६-२७;
मत्तय ९:६, २८:१८) आणि तेथेच न थांबता प्रभूवाणी वेगवेगळ्या प्रांतात जाऊन घोषीत
करतो.
बोधकथा : (आपल्या देशाच्या
राजधानीत घडलेली सत्य घटना)
ख्रिस्ती कुटुंबात जन्मलेली एक मुलगी आपल्या आई-वडीलांबरोबर
आपलं जीवन आनंदाने घालवत होती. शाळा, कॉलेज, काम हा तिचा नित्य नेहमीचा कार्यक्रम
सुरळीत चालू होता परंतु धर्माच्या बाबतीत तिला कोणताच रस नव्हता. ती जरी मिस्साला
गेली तरी शेवटच्या बाकावर बसून ती ख्रिस्ताला न स्वीकारताच परत यायची. आनंदाने
भरलेल्या ह्या जीवनात अचानक दु:खाचे वारे वाहू लागले. तिला चांगली सरकारी नोकरी,
चांगले मित्र-मैत्रिणी असूनदेखील जीवनात पोकळी वाटायला लागली, कशाची तरी उणीव
आपल्या जीवनात आहे ह्याचा तिला भास होऊ लागला. मौज-मजा, मस्ती, पैसा ह्यापैकी
काहीही तिला ही पोकळी किंवा उणीव भरून काढण्यास मदत करत नव्हते. तेव्हा तिच्या
ह्या अवस्थेकडे पाहून एका मैत्रिणीने तिला योगा व मंत्र जप करायला सांगितले
जेणेकरून तिच्या ह्या परिस्थितीत बदल घडेल. महिने लोटले परंतु तिचा मार्ग अजूनच
खडतर होत चालला होता, म्हणून तिने ह्यांचे-त्यांचे एकून स्वतःचा धर्म सोडून इतर सर्व
धर्म सुखाच्या शोधात पालथे घातले, पण तिला त्याचा निष्कर्ष काही लागला नाही.
ऐन तारुण्यात वडिलांचं निधन झालं, ह्यास्तव आई नेहमीच आजारी
पडायला लागली व ही तरुणी दुःखाच्या महासागरात तळाशी जाऊन पडली. कोणत्यातरी
प्रकारची मदत भेटेल व आपण पुन्हा एकदा पाण्यावर तरंगणार ह्या आशेमध्ये ती आपलं
दु:खाने भरलेलं जीवन घालवत होती. अशा अवस्थेत असताना तिला कोणीतरी चर्चमध्ये
असलेल्या तीन दिवसांच्या प्रार्थना शिबिरात (रिट्रीट) जायला सांगितले. हा-ना करता
ती कशीबशी तिकडे गेली. आवड नसतानादेखील कोणीतरी सुचवलं म्हणून ती जाऊन त्या
प्रार्थना शिबिरात जाऊन शेवटच्या बाकावर बसायची.
कसेबसे दोन दिवस निघून गेले. प्रार्थनेच्या वेळी तिला
कोणीतरी बोलावत आहे असं तिला वाटायचं परंतु ती त्याच्याकडे कान-डोळा करत होती.
शिबिराच्या तिस-या दिवशी विशेष प्रार्थना (healing session) आयोजित करण्यात आली होती.
त्या विशेष प्रार्थनेमध्ये धर्मगुरू पवित्र साक्रामेंत हातात पकडून प्रार्थना करत
होते. तेथे हजर असलेले लोक प्रभूच्या स्पर्शाचा अनुभव घेत होते पण ही तरुणी मात्र
तशीच कोणतीही आवड व रस नसल्यासारखी तेथे बसली होती. तेवढ्यात अचानक तिची नजर
व्हिलचेअर मध्ये बसलेल्या एका बाईवर पडली. त्याच क्षणी धर्मगुरूने उच्चारलेले शब्द
तिच्या कानावर पडले, “ह्या सभेमध्ये एक बाई व्हिलचेअर मध्ये बसलेली आहे, त्या
बाईला येशू ख्रिस्त त्याच्या अधिकाराने सांगत आहे, उठ आणि चालायला लाग,
तुझा आजार बरा झाला आहे”. हे शब्द ऐकताच त्या तरुणीच्या अंगावर शहारे आले आणि ती
स्वतःशीच म्हणाली, “जर येशूने आपल्या अधिकाराने ह्या बाईला बरे केले तर मी
त्याची अनुयायी होऊन संपूर्ण जीवनभर त्याच्या नावाचा प्रचार करीन”, असे म्हणून ती
त्या बाईकडे टक लावून पाहत होती. ही बाई खरोखरच त्या व्हिलचेअर मधून उठेल का
ह्यावर तिचं संपूर्ण लक्ष केंद्रित होतं. ह्याच विचाराने तिच्या हृदयाचे ठोके
कितीतरी पटीने वाढले होते. ती बघते ना बघते तर काय चमत्कार- हळू-हळू ती बाई
व्हिलचेअर मधून उठली व वेदीजवळ जाऊन साक्रामेंतासमोर गुढगे टेकून प्रभूची स्तुती करू
लागली. येशूच्या त्या अधिकाराला पाहून आज ती तरुणी सगळीकडे जाऊन प्रभूच्या नावाची
घोषणा करत आहे, एवढेच नाही तर आपल्या आजारी असलेल्या आईचीदेखील तेवढ्याच निष्ठेने
काळजी घेत आहे.
मनन चिंतन :
अधिकार हा दोन प्रकारचा असतो, पहिला जो हक्क आणि
सामर्थ्याच्या बळावर मिळतो आणि दुसरा जो जीवनाच्या अस्सलपणाने व खरेपणाने उदय
पावतो. जो मनुष्य सामर्थ्याच्या जोरावर अधिकाराचा वापर करतो तो इतरांना स्वतःच्या
ताब्यात किंवा काबूत ठेवण्याचा प्रयत्न करतो. अशी ही माणसे अधिकाराचा दुरुपयोग
स्वतःच्या फायद्यासाठी कोणत्याही स्थरावर करू शकतात आणि जर कोणी धैर्य दाखवून
त्यांना सामोरे जात असेल किंवा त्यांच्या चुकीच्या कृत्यांवर बोट दाखवत असेल तर
ह्या अधिकाराचाच वापर करून ते त्या लोकांना शिक्षा देण्यास कमी पडत नाहीत. ते
विसरतात की हा अधिकार जे त्यांच्या हाताखाली आहेत त्या सर्वांची सेवा करण्यासाठी
आणि जीवन सुखकर करण्यासाठी दिलेला असतो. जो अधिकार खरेपणाने उदयास येतो, तो
दुस-यांसाठी आदर्श किंवा प्रेरणा बनतो. असा अधिकार जे कोणी त्यांच्या सभोवताली
आहेत त्यांना प्रभावित करतो, त्यांच्या भावना स्पर्श करतो, हेच लोक समाजामध्ये
नैतिक किंवा नीतिमान पुढारी म्हणून गणले जातात, त्यांच्याकडे लोक मार्गदर्शनासाठी
बघतात आणि तरुण पिढी त्यांचे आचरण/अनुकरण करते.
संदेष्ट्यांच्या नैतिक जीवनामुळेच ते कोणालाही न भिता
राजांना सामोरे जाऊ शकले, त्यांनी सत्याची बाजू उचलून धरली व प्रभूच्या नावाने
कोणालाही न डगमगता मोठ्यातल्या मोठ्या अधिका-यांना सामोरे गेले. जेव्हा
राष्ट्रांनी वा नेत्यांनी चुकीचा मार्ग अवलंबला तेव्हा संदेष्ट्यांनी
परमेश्वराच्या सांगण्यावरून व आपल्या आदर्शमय जीवनावरून लोकांना मागे आणण्याचा
प्रयत्न केला. जेव्हा-जेव्हा समाजातील गरिबांवर व सामान्य लोकांवर अत्याचार झाला
तेव्हा त्यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा करून लोकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न
केला. हे सर्वकाही त्यांच्या हक्कामुळे वा सामर्थ्यामुळे नव्हे तर जीवनाच्या
खरेपणामुळेच ते सर्वकाही करू शकले. दररोजच्या जीवनातूनच उद्भवणारा विश्वासनीय
अधिकार त्या सर्व संदेष्ट्यांना बळ देऊ शकला, उदा., नाथानने दावीद राजाला केलेला
प्रश्न; योहान बाप्तीस्माने हेरोदाच्या जीवनाबद्दल विचारलेली जवाब किंवा याजक,
शास्त्री, परुश्यांना न भिता सुवार्ता सांगणारे प्रेषित हे आपणा सर्वांसाठी एक
आदर्शच आहेत.
येशूने त्याचा अधिकार विविध ठिकाणी वापरला, त्याने अशुद्ध
आत्म्यांना घालवून दिले, त्याने वादळ शांत केले, आज-यांना बरे केले, मृतांना
मरणातून पुन्हा उठवले, हे सर्वकाही त्याने त्याला पित्याकडून मिळालेल्या
अधिकारानेच केले. त्याने ह्या अधिकाराचा उपयोग स्वतःसाठी कधीच केला नाही. सैतानाने
जेव्हा त्याची परिक्षा घेतली तेव्हा त्याने स्वतःच अस्तित्व व तो देव आहे हे
दाखविण्यासाठी त्याने धोंड्यांच्या भाकरी केल्या नाहीत (मत्तय ४:१-११); जेव्हा
शास्त्री आणि परुश्यांनी चिन्हे दाखविण्यासाठी मागणी केली तेव्हा त्याने कोणतीच
चिन्हे दाखवली नाहीत (मत्तय १२:३८-४२) किंवा क्रुसावरून तो खाली देखील आला नाही
(मत्तय ३२:४०). त्याला हे सर्वकाही शक्य होते, त्याच्याकडे हे करण्यासाठी सामर्थ्य
आणि अधिकार होता, ज्याने विश्व निर्माण केले, सर्व चराचर निर्माण केले
त्याच्यासाठी हे करणे एका क्षणभराच काम होतं, पण नाही, त्याने अधिकार योग्य
प्रकारे वापरला, त्याने फक्त मानवांवर केल ते- प्रेम, प्रेम आणि फक्त प्रेम. त्याने
आपला अधिकार सेवा करण्यात दाखवला, स्वतः धनी असून नोकरांचा सेवक झाला, त्याने
शिष्यांचे पाय धुतले, जे शोमरोनी आणि परकीय होते त्यांच्याबरोबर देखील त्याने
संवाद साधला, सर्वांना समान लेखले व प्रभूच्या राज्याची घोषणा केली.
आज जगाला विश्वासनीय आणि नैतिक पुढा-यांची गरज आहे, हक्काने
आणि विविध मार्ग वापरून अधिकार मिळवणारे भरपूर आहेत परंतु विश्वासनीय आणि सत्याने
अधिकाराचा उपयोग करणारे हातांच्या बोटावर मोजता येतील इतकेच आहेत. परमेश्वर
पित्याने निवडलेले आणि बोलाविलेले आपण सर्वजण देखील पुढारी आहोत. आपण कोणत्या
प्रकारे त्या अधिकाराचा उपयोग करतो? ज्याप्रमाणे येशूने त्याचा उपयोग केला
त्याप्रमाणे की आजचं जग दाखवते त्या प्रमाणे? हा अधिकार योग्य त्या प्रकारे
गाजविण्यासाठी आपणाला दोन गोष्टींची गरज आहे:
अ) प्रभू येशूचा आपल्या जीवनासमोर आदर्श
ब) कुटुंबात नेहमी प्रभूशब्द वाचन व प्रार्थना
ह्या दोन गोष्टी आपणाला प्रभूकडून मिळाव्या व आपण येशूसारखे
जीवन जगून आदर्शमय कुटुंब म्हणून समाजात गणले जावे व ह्यासाठी लागणारी कृपा आपणास
मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना :
प्रतिसाद : हे प्रभू, आमची प्रार्थना ऐक.
- ख्रिस्तसभेचे सेवक ज्यांना लोकांची सेवा करण्यासाठी नियुक्त करण्यात आले आहे त्या सर्वांनी येशूने शिकवलेली शिकवणूक त्यांच्या अंगी अनुसरावी व त्यांना दिलेल्या अधिकाराने इतरांना शिकवावी व प्रभूचे वचन सर्वत्र पसरवावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.
- जे लोक मानसिक, शारीरिक, आध्यात्मिक तसेच आतंकवाद, छळ व व्यसनासारख्या अशुद्ध आत्म्यांनी ग्रासलेले आहेत, त्यांना प्रभुने स्पर्श करावे व हे सर्व अशुद्ध आत्मे त्यांच्यातून काढून त्यांना शुद्ध बनवावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.
- ज्या कोणाची लग्न झाली आहेत परंतु ज्या जोडप्यांना अजून मुल-बाळ झाले नाही त्या सर्वांना प्रभूने आशीर्वादित करावे व त्यांच्या जीवनरूपी वेलीवर पुष्प फुलवावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.
- मुलांच्या परिक्षा लवकरच सुरु होणार आहेत. त्यांना चांगले आरोग्य लाभावे, ह्या वर्षभरात ते जे काही शिकलेले आहेत त्याचा पुन्हा सराव करून परिक्षेत योग्य प्रकारे लिहिण्यास त्यांना चांगले ज्ञान व सद्बुद्धी मिळावी, म्हणून आपण प्रार्थना करूया.
- आपल्या धर्माग्रामातील प्रत्येक व्यक्तीवर प्रभूच्या कृपेचा वर्षाव व्हावा, आपण सर्वांनी आपल्या कुटुंबात एकत्र येऊन प्रार्थना करावी व ह्यातून मिळणा-या कृपादानांनी आपण आपल्या घरात, समाजात व जेथे कुठे आपण जातो तेथे-तेथे प्रभूच्या राज्याची घोषणा करण्यास आपणास प्रेरणा मिळावी, म्हणून आपण प्रार्थना करूया.