Reflections for the homily By: John Mendonca.
सामान्य काळातील दुसरा
रविवार
दिनांक – १८/०१/२०१५
पहिले वाचन – १ शमुवेल ३:३६-१०-१९
दुसरे वाचन – करिंथ ६:१३c- १५a -१७-२०
शुभवर्तमान – योहान १:३५-४२
प्रस्तावना:
ख्रिस्ताठायी जमलेल्या प्रिय भाविकांनो आज आपण सामान्य
काळातील दुसरा रविवार साजरा करीत असताना आजची उपासना आपणाला प्रभूची वाणी ऐकण्यास
व प्रभूच्या सान्निध्याचा अनुभव घेण्यास आमंत्रण करीत आहे.
आजच्या पहिल्या वाचनात देवाने शमुवेल प्रवादिस कशाप्रकारे
पाचारण केले ह्याविषयी आपण एकतो, तर दुसऱ्या वाचनाद्वारे संत पौल करिंथकरास सांगतो
की, तुम्ही देवाचे पवित्र मंदिर आहात.
तर आजच्या शुभवर्तमानाद्वारे संत योहान बाप्तिस्टाचे शिष्य,
आंद्रिया आणि शिमोन घोषीत करतात की, त्यांना जगाचा तारणारा ख्रिस्त सापडला आहे. आपल्या
दैनंदिन जीवनात आपणही शमुवेलाप्रमाणे प्रभू ख्रिस्ताचा शोध करावा म्हणून ह्या
पवित्र मिस्साबलीदानामध्ये विशेष प्रार्थना करू या.
पहिले वाचन – १ शमुवेल ३:३६-१०-१९.
शमुवेल छोटा बालक होता. ऐलीचा मान-सन्मान करून ऐली सांगेल ती
कामे विश्वासाने करून तो देवाची सेवा करीत असे (३:१). शमुवेलाने आपल्या बालपणातच
एक उत्तम गुण आत्मसात केला होता, तो म्हणजे आज्ञाधारकता म्हणूनच ऐली जे सांगेल
त्यास तो आज्ञा मानीत असे. ज्या-ज्या वेळेस शमुवेलास हाक ऐकू येते त्या-त्या वेळेस
तो ऐलीकडे आज्ञाधारकतेने ऐलीकडे उठून जातो (३:४, ३:६, ३:८) आणि सरतेशेवटी ऐली शमुवेलास
आज्ञा देतो की, पुन्हा तुला हाक ऐकू आली तर म्हण, “प्रभू बोल! तुझा दास ऐकत आहे”.
ह्या हृदयस्पर्शी पाचारणाद्वारे देवाने शमुवेलाला आपला
संदेष्टा म्हणून अभिषिक्त केले. देवाचे वचन शमुवेलाला नियमितपणे प्राप्त होत असे
आणि शमुवेलाकडून ते इस्रायेलच्या सर्व लोकांना समजत असे (३:१९-२१, ४:१).
दुसरे वाचन – करिंथ ६: १३c- १५a -१७-२०.
पौल करिंथकरांस आवर्जून सांगतो की, शरीर हे जारकर्मासाठी
नाही. तर ते प्रभूच्या गौरवासाठी प्रत्येक व्यक्तीने समर्पित केले पाहिजे. ‘माझा
देह’, ‘माझे शरीर’ असे कोणीही ख्रिस्ती व्यक्तीला कधी म्हणता येणार नाही कारण
त्याला ख्रिस्ताने किमंत मोजून विकत घेतले
आहे; म्हणजेच ख्रिस्ताच्या मरणाने खंडणी भरून सोडवून घेतले आहे. आपल्या
शरीराद्वारे देवाचे गौरव करणे, देवाला मान देणे हेच आपले आद्य कर्तव्य आहे आणि
पवित्र शास्यामध्ये घालून दिलेल्या नातेसंबधाच्या मर्यादेत इतरांशी सामाजिक व
वैवाहिक नाते जोडल्याने ते साध्य होणार आहे ह्याची हमी संत पौल करिंथकरांस देतो.
शुभवर्तमान – योहान १:३५-४२.
सर्व प्रजा तारणाऱ्याची वाट पाहत होती. हा तारणारा येऊन
रोमी सरकारच्या सत्त्येतून सुटका करील अशी त्यांची आशा होती. अश्या बिकट
परिस्थितीत योहान बाप्तीस्ता मोठ्या सामर्थ्याने संदेश देत होता, ह्यास्तव योहानच
तारणारा असावा असे वाटून येरुश्लेमेतल्या यहुद्यानी योहानाकडे पुरोहित व लेवी पाठवून
विचारणा केली , ‘आपण कोण आहा?’ (योहान१:१९,१:२२) ह्या प्रसंगी योहानाने येशू ख्रिस्ताविषयी
साक्ष दिली, त्याच्या पादत्रानाचे बंध सोडण्याची माझी लायकी नाही, (योहान१:२-६).
निर्भीडपणे योहान प्रभू येशू ख्रिस्तास “देवाचे कोकरू” ही
उपमा दोन वेळेस वापरतो(योहान१:२९), वचन१:३५ मध्ये ‘देवाचे कोकरू’ ही उपमा योहान
पुन्हा वापरतो. येशूच्या मागे गेलेल्या दोघा शिष्यांना योहानाने वापरलेल्या उपमेचे
मर्म थोडेफार समजले होते, आणि योहानाने ज्याच्याकडे निर्देश केले होते त्याचे थोडे
तरी महत्व त्यांना समजले होते, हाच ह्या पुनरुवुत्तीचा उद्देश आहे.
योहानाच्या साक्षीमुळे योहानाच्या दोन शिष्यांना ख्रिस्ताची
ओळख व्हावी असे वाटू लागले व ते येशूच्या मागोमाग निघाले (योहान १:३७). त्यांचे
येशूच्या मागे-मागे येणे येशूच्या निदर्शनास येताच येशूने त्यांना विचारले, “तुम्ही
काय शोधता?”( योहान १:३८).
येशू ख्रिस्ताच्या ह्या प्रश्नाला त्या दोन शिष्यांचे उत्तर
व त्यांनी त्याला ‘रब्बी’ म्हणून संबोधले यावरून ख्रिस्ताच्या मागे-मागे जाण्यात
त्या दोन शिष्यांना येशू ख्रिस्ताला जाणून घेण्याची आस्था होती असे दिसून येते.
प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर राहून त्यांनी ख्रिस्ताच्या सानिध्याचा अनुभव घेतला व
येशू ख्रिस्त हाच तारणारा आहे ते त्यांनी ओळखले आणि त्यांची खात्री पटली. त्यांना
इतका आनंद झाला की आंद्रीयाला पहिल्यांदा त्याचा सख्खा भाऊ शिमोन भेटला असता
आंद्रिया ख्रिस्ताविषयी साक्ष देताना म्हणतो, “आम्हाला मशीहा सापडलेला
आहे!”(योहान१:४१). आंद्रिया ख्रिस्ताविषयी फक्त साक्षच देत नाही तर तो शिमोनाला
प्रभू येशूकडे घेऊन येतो.(योहान१:४२).
बोधकथा:
डायक्लोशियन या क्रूर सम्राटाच्या काळात मार्सेलिनस नावाचे
धर्मगुरु कार्य करीत होते. पिटर ह्याला दुष्टात्मा निवारणाचे अदभूत सामर्थ्य
लाभलेले होते. या दोघांना सम्राटाने त्यांच्या श्रद्धेपायी तुरुंगात टाकले होते.
त्या तुरुंगात अनेक ख्रिस्ती लोक आपल्या श्रद्धेपायी दु:ख वेदना सहन करीत होते.
मार्सेलिनस आणि पिटर ह्यांनी तुरुंगातील लोकांना ख्रिस्ती शिकवणुकीचे धडे दिले.
त्याचा परिणाम असा झाला की हे कैदी आनंदाने आपली शिक्षा भोगू लागले ते पाहून तेथील
तुरूंग अधिकारी- आर्थिमिऊस हा ख्रिस्ती झाला.
पिटर व मार्सेलिनस ह्यांना मुत्युदंडाची शिक्षा
फरर्मावण्यात आली. तुरुंगातील कैद्यांकडून प्रतिकार होऊ नये म्हणून दोघांना सिल्वा
नायाग्रा नामक जंगलात नेण्यात आले. तिथे त्यांच्या मारेक-यांनी त्यांच्या खाचा
आधीच तयार करून ठेवलेल्या होत्या. कोणत्याही ख्रिस्ती व्यक्तींना त्यांची थडगी
मिळू नयेत अशी त्यांची योजना होती. परंतु काही कालांतराने ह्या दोन
रक्तसाक्ष्यांच्या मारेक-यांचेच परिवर्तन होऊन ते ख्रिस्ती झाले व त्यांनीच ह्या
खाचा सर्व ख्रिस्ती लोकांना दाखविल्या.
मनन-चिंतन:
मनन-चिंतन:
प्रिय भाविकानो आजची उपासना आपणा सर्वांस देवाची वाणी
ऐकण्यास व देवाच्या प्रेमाची साक्ष जगजाहीर करण्यास आमंत्रण देत आहे.
आपण आपले दैनंदिन जीवन जगत असताना
अनेक वेळा देव आपल्याला साद घालीत असतो परंतु आपण ह्या जागतिक मोह-मायामध्ये इतके रमून गेलेलो
असतो की देवाची प्रेमळ हाक आपल्या हृदयापर्यंत पोहचतच नाही. ज्या प्रमाणे आजच्या
पहिल्या वाचनामध्ये शमुयेलने देवाची हाक ऐकली त्याप्रमाणे आपणसुद्धा ऐकली पाहिजे.
शमुवेल हा सुस्वभावी, नम्र, आणि आज्ञाधारक होता. ह्या त्याच्या
सुस्वभावामुळेच जेव्हा त्याला तीनवेळा हाक ऐकण्यात येते तेव्हा तो तिन्ही वेळेस ऐली
जवळ नम्रपणे जाऊन विचारतो, “काय आज्ञा? तुम्ही मला हाक मारली”. नंतर ऐली शमुवेलास
आज्ञा देतो कि, ‘जेव्हा परत तुला हाक ऐकण्यास येईल तेव्हा माझ्याकडे न येता असे म्हण की, “हे परमेश्वरा, बोल तुझा दास
ऐकत आहे” आणि जेव्हा शमुवेल ऐलीच्या आज्ञेप्रमाणे वागतो तेव्हा त्याला देवाच्या
वाणीची जाणीव होते, व देव शमुवेलास प्रवादी म्हणून अभिषिक्त करतो. शमुवेल देवाच्या
वचनाशी एकनिष्ठ होता. देवाचे वचन शमुवेलला नियमितपणे प्राप्त होत असे आणि ह्याच
देवाच्या वचनाची साक्ष तो इस्राएल लोकांना देत असे.
ज्याप्रमाणे
देवाने देवाच्या वचनांची साक्ष देण्यासाठी शमुवेलास पाचारण केले त्याचप्रमाणे
आजच्या शुभावार्तामानामध्ये येशू ख्रिस्ताने आपल्या पहिल्या शिष्यास पाचारण केले. योहानाच्या
उपदेशावरून योहानाच्या शिष्यांमध्ये येशू ख्रिस्तास जाणून घेण्याची तीव्र आस्था
निर्माण झाली होती. ह्याच आस्थेपोटी आंद्रिया येशूच्या पाऊलखुणांचा मागोवा घेतो.
येशू ख्रिस्त जेव्हा विचारतो, “तुम्ही काय शोधता”? तेव्हा ते नम्रपणे ख्रिस्तास
विचारतात, “रब्बी आपण कुठे राहता”?
‘या आणि
पहा’ ह्या ख्रिस्ताच्या प्रतिउत्तराला आंद्रिया कसलाही विचार न करता संपूर्ण हृदयाने व मनाने ख्रिस्ताच्या
मागोमाग जाऊन, ख्रिस्ताच्या सहवासाचा व प्रेमाचा अनुभव घेतो. येशूख्रिस्त हा जगाचा
तारणारा, “मशीहा” आहे हे सत्य तो जाणून घेतो आणि ह्याच सत्याची साक्ष तो आपला
सख्खा भाऊ शिमोन ह्यास देतो. इतकेच नव्हे तर तो शिमोनास ख्रिस्ताजवळ घेऊन जातो.
आपण आपल्या
जीवनाच्या पहिल्या श्वासापासून ते जीवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंत देवाचे प्रेम
अनुभवत असतो. आपल्या दैनंदिन जीवनात, संसारात, आणि आपल्या प्रत्येक सु:ख-दु:खात
आपण देवाच्या प्रेमाचा अनुभव घेत असतो; अंधाऱ्या मार्गी तो आपल्याला प्रकाश देतो,
दु:खाच्या लहरीत तो आपल्याला सावरतो, थकल्या भागल्या मनाला तो विसावा देतो,
हरवलेल्यांचा तो शोध घेतो, निराश्रीतांस तो आश्रय देतो, भुकेल्यांस तो अन्न देतो,
तहानलेल्यांस तो जीवनदायी पाणी देतो आणि सर्व आनिष्टांपासून तो आपले प्रेमाने
संरक्षण करतो. अशा सर्व प्रकारच्या परिस्थितीत आपण देवाच्या प्रेमाची साक्ष आपल्या
कौटुंबिक आणि सामाजिक जीवनाद्वारे जगजाहीर करतो का?
आजच्या या
आधुनिक युगात आपले अनेक ख्रिस्ती बांधव वेगवेगळ्या अन्याय-अत्याचाराला नीडरपणे
सामोरे जात आहेत. जे ख्रिस्ताचे प्रेम त्यांनी त्यांच्या जीवनात अनुभवले आहे त्याच
प्रेमाखातीर, विश्वासाने आणि संयमाने हे लोक अनेक प्रकारच्या अन्यायाला सामोरे जात
आहेत. वेळप्रसंगी देवाच्या प्रेमाची साक्ष देता देता आपल्या प्राणाची आवृत्ती
सुद्घा देत आहेत.
आजची उपासना
आपणा सर्वाना देवाची वाणी ऐकण्यास, आपल्या जीवनात ख्रिस्ताचा शोध घेण्यास आणि
ख्रिस्ताचे प्रेम अनुभवयास आवाहन करीत आहे. आजच्या शुभावार्तामानाद्वारे
ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना विचारले, “आपण काय शोधता?”. हाच प्रश्न येशू ख्रिस्त
आज आपणा सर्वांस विचारत आहे. ज्याप्रमाणे शिष्य, मशीहाच्या शोधात होते,
त्याप्रमाणे आपण आपल्या जीवनात ख्रिस्ताच्या शोधात आहोत का? आणि आपल्याला ख्रिस्त
सापडल्यावर आपण ख्रिस्ताची साक्ष जगजाहीर करतो का?
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद – कर दानांचा वर्षाव देवा, कर दानांचा वर्षाव
१. ख्रिस्तसभेची धुरा वाहणारे आपले पोप महाशय, बिशप्स,
सिस्टर्स आणि सर्व प्रापंचिक लोक ह्या सर्वांना, देवाच्या प्रेमाची साक्ष जगजाहीर
करण्यासाठी कृपा-शक्ती लाभावी म्हणून आपण प्रार्थना करुया.
२. आपल्या देशातील अन्याय-अत्याचाराचे वातावरण दूर व्हावे व
सर्वांनि भेदभाव विसरुन आपल्या कुटुंबात, समाजात आणि देशात शांतीचे वातावरण
प्रस्थापित करावे म्हणून आपण प्रार्थना करुया.
३. जे लोक वाईट व्यसनांच्या अधीन झालेले आहेत, अशा सर्व
लोकांना वाईट व्यसनांपासून परावृत्त होण्यासाठी प्रभूचे ध्येर्य-सामर्थ्य लाभावे
म्हणून आपण प्रार्थना करुया.
४. प्रभूच्या कृपेने निराशितांना आश्रय, पिडितांना आरोग्य,
दुखीतांना सहारा, आणि भुकेल्यांस अन्न लाभावे म्हणून आपण प्रार्थना करुया.
५. आपण सर्वांनी आपल्या जीवनात ख्रिस्ताचा शोध एकनिष्टेने
करावा व ख्रिस्ताच्या प्रेमाची साक्ष आपल्या दैनंदिन जीवनाद्वारे इतरांना द्यावी
म्हणून आपण प्रार्थना करुया.
No comments:
Post a Comment