Thursday, 1 January 2015


 Reflections for Homily By: Baritan Nigrel





प्रकटीकरणाचा सण

दिनांक: ०४/०१/२०१५.
पहिले वाचन: यशया ६०: १-६
दुसरे वाचन: इफीसी ३:२-३, ५-६ 
शुभवर्तमान: मत्तय २:१-१२ 


प्रस्तावना:

ख्रिस्तसभा आज प्रभू येशूच्या प्रकटीकरणाचा म्हणजेच तीन राजांचा सण साजरा करीत आहे. प्रभू येशू या जगाचा प्रकाश आहे. पूर्वेकडील आलेल्या तीन राजांनी आपली दाने ख्रिस्ताला समर्पित करून ह्याच प्रकाशमय ख्रिस्ताचे दर्शन घेतले म्हणून देवाने त्यांचे जीवन प्रकाशमय बनवले.
यशया आजच्या पहिल्या वाचनात आपणांस सांगतो, ‘सर्व राष्ट्रे एक होऊन प्रभूच्या प्रकाशाकडे येतील’. दुसऱ्या वाचनात संत पौल आपल्याला देवाच्या प्रकटीकरणाविषयी सांगतो. हे प्रकटीकरण सर्व लोकांसाठी आहे आणि म्हणूनच विदेशीयांना सहवारस व सहसभासद करून संत पौल त्यांचा उल्लेख करीत आहे. तर आजचे शुभवर्तमान आपल्याला तीन राजांची ख्रिस्ताला भेट ह्याविषयी जरी सांगत असेल तरीही शुभवर्तमान हे राजांचा राजा, प्रकाशाचा प्रकाश जो जन्माला आला आहे, त्याच्याविषयी आहे. 
तीन राजांनी ज्याप्रमाणे आपली दाने ख्रिस्ताला समर्पित केली, त्याचप्रमाणे आपणही आपल्या जीवनात ख्रिस्ताच्या तेजस्वी प्रकाशाला शरण जाऊन, आपले सर्वस्व त्याच्या चरणी समर्पित करूया तसेच आपल्या व इतरांच्या जीवनात आनंद व प्रकाश निर्माण व्हावा म्हणून आजच्या या पवित्र मिस्स्साबलीदानात प्रार्थना करूया.

पहिले वाचन: यशया ६०: १-६

आजचे पहिले वाचन हे सियोन या माता नगरीला उद्देशून आहे. तिचे पुत्र व कन्या केवळ इस्त्रायलातील पांगलेले नाहीत तर प्रत्येक राष्ट्रातील आहेत. ही सर्व राष्ट्रे प्रकाशात येतील. आणि ज्याप्रमाणे कबुतरे आपल्या खुराड्याकडे आपोआप येतात तसे ते देवाकडे येतील. आणि आशेने देवाकडे पाहतील. हे आपणास यशया संदेष्टा सांगत आहे.

दुसरे वाचन: इफीसी ३:२-३, ५-६ 

यहुदी लोकांना वाटत होते की, ‘ते देवाची निवडलेली माणसे आहेत’. म्हणून संत पौल दुसऱ्या वाचनात ‘विदेशी लोकांचा देवामध्येच समावेश आहे’ या बाबीवर विशेष भर देतो कारण दुसऱ्या जातीतील लोकांना प्रभूच्या राज्यात वारसा मिळावा व त्यांनीसुद्धा त्या एकाच शरीराचे अवयव व्हावे आणि त्यांना ही ख्रिस्ताची अभिवचने मिळवावीत असे पौलाला वाटते. देवासाठी सर्व लोक एक समान व प्रिय आहे. आपण प्रेषितांची कृत्ये १०: ३४-३५ मध्ये एकतो, ‘देव तोंड पाहून माणसांना वागवीत नाही तर जे त्याला भितात व त्याच्या इच्छेप्रमाणे योग्य तेच करतात – मग ते कोणत्याही वंशाचे व जातीचे असो. देवाला त्या व्यक्ती मान्य व प्रेमळ असतात’.

शुभवर्तमान: मत्तय २:१-१२

‘येशू’ हा जुन्या करारातील देवाने वचन दिलेला इस्त्रायलचा तारणारा आहे. तो इस्त्रायलचा राजा आहे असा विषय मत्तयच्या शुभवर्तमानात मांडला आहे. भविष्यवाद्यांनी भाकीत केलेला तारणारा आणि राजा हा येशूच आहे आणि त्याचे आपण मनोभावे स्वागत करावे व आपण विश्वास ठेवावा असे मत्तय आपल्या वाचकांना आवर्जून सांगत आहे. 
आजच्या शुभवर्तमानात जे मागी लोक ख्रिस्ताला भेट देण्यास येतात ते ज्योतिषी होते. ग्रहताऱ्यांचे सूक्ष्म निरीक्षण आणि अवलोकन यांच्या आधारे ते आपले निष्कर्ष काढीत. पूर्वेकडील प्रदेशात ग्रहताऱ्यांचे निरीक्षण व गणिते करून पॅलेष्टाइन देशात राजकुळात महत्त्वपूर्ण व्यक्तीचा जन्म झाल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला. अर्थात या ‘बाळराजाच्या’ भेटीसाठी थाटामाटाने जाणे त्यांना अगत्याचे वाटले कारण देवाचे हे त्यांना अस्सल प्रकटीकरण होते.

बोधकथा:

     एकदा एक तरुण मुलगा मुलीच्या पाठीमागे चालत होता. त्या मुलीने त्या मुलाला पहिले. आणि धाडस करून त्याला विचारले,’माझापाठलाग तू का करतोस?’ मुलाने सांगितले, ‘मी तुझ्यावर प्रेम करतो, मुलीला आश्चर्य वाटले. ती त्याला म्हणाली माझ्या पाठीमागे येणारी मुलगी माझी बहिण आहे, ती माझ्यापेक्षा अधिक सुंदर आहेआहे. तू जा आणि तिला बघ.
     त्या मुलाने कुठलाही विचार न करता घाईमध्ये पाठीमागे तिच्या बहिणीला बघायला गेला. जेंव्हा त्याने येणाऱ्या मुलीला पहिले तेंव्हा त्याला आश्चर्याचा धाक्का बसला. ती मुलगी सुंदर नसून एकदम दुर्मिळ व विचित्र दिसत होती. रागामध्ये तो मुलगा परत पहिल्या मुलीकडे धावत गेला आणि विचारले, ‘तु मला खोटे कशाला बोलली?’ तिने न घाबरता प्रत्युत्तरदिले, ‘तर मग तु मला सत्य कधी सांगितले तू माझ्यावर प्रेम करतो. जर तुझे खरोखर माझ्यावर प्रेम असते तर तू दुसरी मुलीच्या शोधात पाठीमागे गेला नसता.
      येशू ख्रिस्त, राजांचा राजा, प्रकाशाचा प्रकाश जन्माला आला हि बातमी ऐकल्यावर ते तीन राजे त्याच्या शोधात निघाले तेंव्हा त्यांच्या मार्गावर अनेक अडथळे आले, कधी-कधी ते रस्ता विसरले पण ते कधी गोष्टीतील मुलाप्रमाने पाठीमागे फिरले नाही. त्यांना ख्रिस्ताचा प्रकाश त्याच्या अंगी स्वीकारायचा होता म्हणून ते पाठीमागे अंधारात फीरले नाहीत. देवाने दाखविलेल्या ताऱ्याच्या मदतीने त्या तीन राज्यांना ‘जगाचा सुपरस्टार’ शेवटी गाईच्या गव्हानीमध्ये गवसला. तिथे होता ख्रिस्त, जगाचा तारणहार. ख्रिस्ताचे दर्शन घेऊन ते आता ख्रिस्ताचे तेजस्वी तारे झाले होते. आणि म्हणूनच जाताना ते ख्रिस्ताचा प्रकाश घेऊन निघाले.
      आपल्या स्वत:ला ख्रिस्त सापडला नसेल तर आपण दुसऱ्यांनाख्रिस्ताकडे आणू शकणार नाही. ख्रिस्त जेव्हा आपल्याला सापडेल तेंव्हा खरोखर आंपण त्याचे तेजस्वी तारे होऊन या जगात प्रकशित होऊ व इतरांना ख्रिस्ताकडे येण्याचा मार्ग दाखवू शकतो. ख्रिस्ताचा शोध करत असताना कधी कधी झंझावाताने आपल्या हातातील कंदील कदाचित विझेल परंतु तो पुन्हा पेटवून आपण आपला मार्ग क्रमन करीत जायला पाहिजे. त्या तीन राजांच्यामार्गावर जेंव्हा ताराअदृश्य झाला तेंव्हा ते घाबरले नाही किंवा परत पाठीमागे फिरले नाही. त्यांनी ख्रिस्ताचा शोध चालूच ठेवला, कारण ते देवापुढे नम्र झाले. देव त्यांच्याबरोबर होता. आपणही जर देवापुढे नम्र झालो तर देव आपली कधीच साथ सोडणार नाही. कुठ्ल्याहि परिस्थितीत तो आपल्याला मार्ग दाखवील.
     आपल्या जीवनाच्या मार्गावर हेरोद राज्यासारखे अनेक काटे येतील. पण जर आपले ख्रिस्तावरील प्रेम खरे असेल तर ते सर्व काटे आपल्याला फुलासारखे वाटतील. आणि एक दिवस नक्कीच आपण ख्रिस्ताला भेटू. आपण ख्रिस्ताला शोधण्याची व भेटण्याची त्या राजाप्रमाणे चिकाटी धरली तर आपण यशाचे धनि बनू. देव आपल्याला नक्कीच ख्रिस्ताचा मार्ग दाखवील.

‘स्टारने दाखविला सुपरस्टार’
मनन चिंतन: मत्तय २:१-१२

नाताळ जवळ आला की आपण गोठयाची तयारी करायला सुरुवात करतो. गोठ्यामध्ये आपण बाळ येशू, योसेफ, मारिया, मेंढपाळ, गुरे-मेंढरे आणि तीन राजे उंटावर ख्रिस्ताच्या दर्शनासाठी येतात, असे सहसा चित्र दर्शवितो. जेव्हा ह्या तीन राजांविषयी आपण ऐकतो व वाचतो तेव्हा आपल्या मनात एक किमया भासते की या राजांना खरोखर बाळ येशूचे दर्शन घेण्याची गरज होती का?
जर आपण वास्तुस्थिती हाताळली तर आपल्या लक्षात येते की, अनेक माणसे दूरवरून राजांना भेटण्यासाठी त्यांच्या दरबारात येतात. राजा कधीच माणसांना भेट द्यायला त्यांच्या घरी जात नाही. मात्र बायबलमध्ये आपण वाचतो कि तीन राजे स्वतः आपल्या दरबारातून बेथलेहमध्ये जन्मलेल्या येशु बाळाला भेटण्यासाठी उत्सुकतेने व आनंदाने निघतात. गावातील लोकांनी त्यांची थठ्ठा केली असेल. ते वेडे झाले आहेत म्हणून कित्येक लोक त्यांच्यावर हसले असतील. पण देवाने जी ख्रिस्ताविषयी सुवार्ता त्यांना प्राप्त केली होती – राजांचा राजा, प्रकाशाचा प्रकाश जन्माला आला आहे, त्याच्यावर त्यांची पूर्ण श्रद्धा होती. म्हणूनच त्यांनी ख्रिस्ताला भेटून नमन करावे अशी चिकाटी धरली. त्यांना खरोखर ख्रिस्ताच्या दर्शनाची गरज होती, कारण जरी ते राजे असले तरी त्यांचे जीवन अंधकारमय होते. त्यांना प्रकाशाची गरज होती. त्यांच्या जीवनात शांती नव्हती, ख्रिस्त शांती देणार होता. त्यांच्या जीवनातील प्रेमाची ज्योत विझलेली होती. ख्रिस्त ती ज्योत त्यांच्या प्रेमाने पेटवणार होता.
येशू ख्रिस्त हा ‘प्रकाशाचा प्रकाश’ व ‘राजांचा राजा’ आहे हे गूढ त्या तीन मागी राज्यांना समजले होते. म्हणून कुठलाही विचार न करता, ते लगेच ख्रिस्ताच्या दर्शनासाठी आपली दाने घेऊन बेथलेहेम गावाकडे निघतात. बायबलमध्ये आपल्याला त्यांच्याविषयी जास्त काही सांगण्यात आलेले नाही. ते तीन राजे ज्ञानवंत, प्रज्ञावंत  होते. ते येशू बाळाचे दर्शन घेण्यासाठी पूर्वेकडून आले. असे सांगतात की, त्या राज्यांची नावे – ग्स्पार, बाल्ताझार आणि मेल्कीऑंर होते. येशू बाळाला भेटण्यासाठी ते रिकाम्या हाताने न येता ते आपल्याबरोबर सोने, धूप व गंधरस आणून  ते येशू बाळाला दान म्हणून भेट करतात. त्या तीन दानांचा अर्थ खालीलप्रमाणे होतो. सोने म्हणजे राजाचा सुवर्ण मुकुट. येशू हा राजांचा राजा आहे म्हणून सोने हे येशूचे राजेपण दर्शवितो. धूप म्हणजे येशूचे देवपण जरी देवशब्द मनुष्य झाला तरी तो देवाचा पुत्र होता. आणि गंधरस म्हणजे येशुचे दु:खसहन जे त्याला मानवाच्या कल्याणासाठी आणि तारणासाठी क्रुसावर मरेपर्यंत सोसावे लागणार होते.
येशु म्हणतो, “माझ्यामागे येण्याची कोणाची इच्छा असेल त्याने स्वतःचा त्याग करावा व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे.”(मत्तय १६:२४) हे शब्द तीन राजांनी हे ख्रिस्ताचे शब्द ऐकले नाही, तरीही त्यांनी आपला राजदरबार, आपली कुटुंबे आणि प्रजा सोडून ख्रिस्ताच्या दर्शनासाठी आले म्हणजे ख्रिस्ताला नमन करून ते ख्रिस्ताचे शिष्य बनण्यास आले होते. ते पूर्वेकडून ख्रिस्ताचा शुभसंदेश, घेण्यासाठी आले होते. मात्र बेथलेमातून निघताना ते ख्रिस्ताचे मिशनरी व ख्रिस्ताचा प्रकाश बनून परतले ते ख्रिस्ताचे संदेशवाहक झाले.
     परमेश्वर जेव्हा माणसांवर आपल्या कृपेचा वर्षाव करतो, तेंव्हा माणूस स्वत:चा राहत नाही. तसेच जेव्हा माणूस पूर्णपणे ईश्वराला शरण जातो. तेव्हा परमेश्वर त्याच्या जीवनाचा ताबा घेत असतो. हीच अनुभूती तीन राजे आपल्याला देत आहेत. जेव्हा ते देवापुढे शरण होतात तेंव्हा देव त्यांच्या माध्यमातून योग्य रितीने मार्गदर्शन करतो.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना :-
प्रतिसाद : हे प्रभू आमची प्रार्थना ऐक.
  1.  ख्रिस्ताच्या मळ्यात कार्य करीत असलेले आपले पोप फ्रान्सीस, सर्व कार्डीन्ल्स, बिशप्स, धर्मबंधू-धर्मभगिनी व सर्व प्रापंचिक यांना ख्रिस्ताचे योग्य मार्गदर्शन लाभावे व त्यांनी त्यांच्या जीवनाद्वारे ख्रिस्ताचा प्रकाश इतरांपर्यंत पोहचवावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
  2. आपण सर्वांनी देवाच्या प्रेरणेने ख्रिस्ताचा शोध खऱ्या मनाने व हृदयाने करावा व आपल्याला जीवनात ख्रिस्ताची शांती व प्रेम मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
  3. जे पापी लोक ख्रिस्ताच्या प्रकाशापासून दुरावलेले आहेत व पापाच्या अंधारात अजूनही भटकत आहेत अश्यांना प्रभूचा स्पर्श व्हावा व त्यांच्या जीवनात आशेचा व ख्रिस्ताच्या प्रेमाचा किरण प्रकाशित व्हावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
  4.  देव हा सर्वाचा एक आहे. हि भावना अखिल मानव-जातीच्या मनात रुजावी व सर्वांनी एक जुटीने, आनंदित, प्रेमान जगावं म्हणून आपण प्रार्थना करूया.

No comments:

Post a Comment