Wednesday, 7 January 2015

Reflections for Homily By: Suresh Alphonso




प्रभू येशूचा स्नानसंस्कार


दिनांक: ११/०१/२०१५.
पहिले वाचन: यशया ५५:१-११
दुसरे वाचन: १ योहान ५: १-९
शुभवर्तमान: मार्क १: ७-११

“तू माझा पुत्र, मला परमप्रिय आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे”


प्रस्तावना:

     आज ख्रिस्तसभा प्रभू येशूच्या स्नानसंस्काराचा सण साजरा करीत आहे. आजच्या पहिल्या वाचनात यशया संदेष्टा, ‘परमेश्वर वैभवयुक्त आहे व तो इस्त्रायलचा पवित्र प्रभू आहे’ असे सांगतो. येशू हा खिस्त आहे असा विश्वास जो कोणी धरतो तो देवापासून जन्मला आहे असे दुसऱ्या वाचनात सांगितलेले आहे. तर शुभवर्तमानात आपण प्रभू येशूच्या बाप्तिस्माविषयी ऐकतो जेथे पवित्र आत्मा प्रभूयेशूवर उतरतो व त्याचा स्वर्गीय पिता, ‘प्रभू येशू ख्रिस्त हा त्याचा परमप्रिय पुत्र आहे’ असे जाहीर करतो.
स्नानसंस्कार हा आपल्या ख्रिस्ती जीवनातील महत्वाचा संस्कार आहे. त्याद्वारे आपली ख्रिस्ती श्रद्धेत व विश्वासात वाढ होत असते. हीच ख्रिस्ती श्रद्धा अधिक दृढ होण्यासाठी लागणारी कृपा-शक्ती आपणास मिळावी म्हणून आजच्या मिस्साबलीदानात प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:

पहिले वाचन: यशया ५५:१-११.
     यशया संदेष्टा आपणास परमेश्वराकडून आपण सर्वांस मिळणाऱ्या ‘दयेच्या मोफत देणगीविषयी’ सांगतो. यशया संदेष्टा हा देवाने त्याच्या सेवेसाठी व लोकांच्या तारणासाठी निवडलेला होता. त्याने देवाची ओळख लोकांना पटवून दिली. म्हणूनच यशया संदेष्टा लोकांना आवाहन करतो की, “अहो तान्हेल्यांनो, तुम्ही सर्व जलाशयाकडे या, जवळ पैसा नसलेले तुम्ही या; सौदा करा, खा; या, पैश्यावाचून व मोलावांचून द्राक्षरसाचा व दुधाचा सौदा करा!” (यशया ५५:१) असे आवाहन फक्त जो देवाचा माणूस आहे, ज्याचा देवावर दृढ विश्वास आहे असाच माणूस करू शकतो. अश्याच प्रकारच्या विश्वासामुळे देवाने त्याला निवडिले होते.

दुसरे वाचन: १ योहान ५:१-९.
योहान आपल्याला ख्रिस्ताच्या शिष्यांची श्रद्धा किती मजबूत आहे हे सांगतो. योहान म्हणतो, ‘येशू हा ख्रिस्त आहे, असा विश्वास जो कोणी धरतो तो देवापासून जन्मलेला आहे.’ आपण जेव्हा देवावर प्रीती करितो व त्याच्या आज्ञा पाळतो तेव्हा आपल्याला कळून येते की, आपण देवाच्या मुलांवर प्रीती करितो.

शुभवर्तमान: मार्क १:७-११
     मार्ककृत शुभवर्तमानात आपण बाप्तिस्मा करणारा योहान आणि त्याचा संदेश ऐकतो. योहानाने येशूच्या येण्याचा मार्ग कसा तयार केला हे पाहतो. प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र होता व जगाच्या तारणासाठी त्याला देवपित्याने ह्या जगात प्रेषितीय कार्यास पाठविले होते. ते कार्य व्यवस्थित करण्यासाठी प्रभू येशूच्या जन्माअगोदर देवपित्याने अनेकांना पाठविले होते. अनेक संदेष्टे व प्रवक्ते तयार केले होते व त्यातील योहान हा एक संदेष्टा होता. ज्याने देवाच्या इच्छेप्रमाणे येशूच्या येण्याचा मार्ग मोकळा केला. त्याने लोकांची मने बदलली व त्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली. पापांच्या क्षमेसाठी पश्चाताप करून बाप्तिस्मा घ्यावा अशी घोषणा करीत बाप्तिस्मा करणारा योहान अरण्यात प्रगट झाला. त्यामुळे सगळा यहुदीया देश व सर्व येरूसलेमकर त्याच्याकडे ओढले गेले व त्यांनी आपापली पापे पदरी घेऊन यार्देन नदीत योहानाद्वारे बाप्तिस्मा घेतला. पुढे योहान म्हणतो, “मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने केला खरा; तो तर तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करणार आहे.” कारण येशूचे कार्य हे योहानाच्या कार्याहून सर्वस्वी वेगळे होते.
     त्यानंतर येशूचा बाप्तिस्मा योहानाच्या हातून यार्देन नदीत झाला आणि लागलेच पाण्यातून वर येताना आकाश उघडले व कबुतरासारखा आत्मा येशूवर उतरला व देववाणी झाली, “तू माझा पुत्र, मला परमप्रिय आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे”. ह्यावरून येशू देवाचा पुत्र होता हे स्पष्ट होते व येथूनच येशूच्या नविन मिशनकार्याला सुरुवात होते.

बोधकथा:

एक विधवा कबाडकष्ट करून मोठ्या श्रध्येने परमेश्वरी जीवन जगत होती. तिची सातही लेकरे प्रभूच्या श्रध्येने वाढलेली. एक दिवस तिथल्या राजाने हुकुमाद्वारे खऱ्या देवाची भक्ती करण्यास मनाई केली. त्यामुळे विधवा व तिची सातही मुले खऱ्या विश्वासापासून तसूभरही ढळली नाहीत. परिणामी राजाने सर्वांना ठार करण्याचा आदेश दिला. पहिल्याला जेव्हा ठार करण्यात आले तेव्हा त्याला खऱ्या देवापासून दूर करण्यासाठी डाव खेळण्यात आला. पण तो वदला नाही. असे सहाही पुत्र ठार केल्यानंतर राजाने सातव्य मुलाकडे येत त्या विधवा बाईला सांगितले की हा तुझा शेवटचा घराण्याचा वारस. माझ्या आदेशाप्रमाणे वागल्यास तुम्ही दोघेही वाचू शकाल, पण विधवा मोठी श्रद्धावंत तितकीच हजार जबाबी. तत्काळ ती आपल्या मुलाला म्हणाली, “ तुझे सहाही भाऊ स्वर्गात परमेश्वराच्या राज्यात चिरंतन सुख उपभोगत आहेत. तू या राजाच्या आदेशला जुमानू नकोस आणि तसेच झाले. सातव्या मुलाने आदेश नाकारल्यावर तत्काळ त्याचा वध करण्यात आला. त्या विधवेने नक्कीच आपल्या मुलाविषयी “मी संतृष्ट आहे” असे म्हटले असेल. धन्य ती बाई व तिचा विश्वास.

मनन चिंतन:

मार्कचे शुभवर्तमान येशूचा स्नान-संस्कार कसा झाला व योहानाचे त्याच्या येण्याची कशी तयारी केली हे सांगत आहे. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने पापांच्या क्षमेसाठी पश्चाताप करा व बाप्तिस्मा घ्या अशी घोषणा करत त्याने अरण्यात घोषणा केली कारण इस्रायलचे संदेष्टेही हाच सुपरिचित संदेश देत असत. हाच संदेश योहानाने लोकांना दिला परंतु तो वेगळ्या पद्धतीने तसेच त्याने प्रभूच्या येण्याचा मार्ग तयार केला. त्यामुळे तेथील लोकांचे त्वरित हृद्यपरिवर्तन झाले व त्यांनी लगेच योहानाकडून बाप्तिस्मा घेतला.
परंतु योहान इतक्यावरच थांबला नाही. तर त्याने प्रभू येशू येण्याचा आपल्याला संदेश दिला. म्हणूनच योहान घोषणा करताना म्हणत असे माझ्यापेक्षा समर्थ असा कोणी एक माझ्यामागून येत आहे, त्याच्या पायतनाचा बंध लवून सोडण्याची देखील पात्रता नाही. मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने केलेला आहे. तो तर तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करणार आहे. येथे आपणांस योहानाचा नम्रपणा जाणवतो कारण त्याला माहित होते की माझ्या मागून येत आहे तो दुसरा कोणी नसून जगाचा तारणारा प्रभू येशु ख्रिस्त आहे. ह्याची त्याला पूर्ण जाणीव होती, त्यामुळे त्याने त्याचा मार्ग तयार केला. पण त्याच्यानंतर जो येणार तो आत्म्याने अंतकरने शुद्ध व नवीन करणार होता. त्यामुळे येथे आपणास येशूचे कार्य हे योहानापेक्षा वेगळे व सामर्थ्याने होते हे दिसून येते.
म्हणूनच प्रभू येशू गालीलातील नाझरेथहून आला तेव्हा त्याने योहानाच्या हातून यार्देनेत बाप्तिस्मा घेतला येशू जरी देवाचा पुत्र होता तरी त्याने श्रेष्ठपणा दाखवला नाही व नम्रपणे योहानाकडून बाप्तिस्मा घेतला. त्यामुळे येशू मानव होता हे आपणास दिसून येते. तसेच तो देवपुत्र असल्यामुळे लागलेच पाण्यातून वर येताना आकाश विदारले व आत्मा कबुतरासारखा त्याच्यावर उतरताना येशूला दिसला व आकाशवाणी झाली की “हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, ह्याच्या विषयी मी संतृष्ट आहे.” देवाचा कृपाशीर्वाद त्याच्यावर येतो. व इथूनच प्रभूयेशुच्या प्रेषितीय कार्याची सुरुवात होते. येथे मला एक गोष्ट नमूद करावीशी वाटते.
आज पवित्र देऊळमाता ख्रिस्ताच्या बाप्तीस्माचा सण साजरा करीत आहे. ख्रिस्ताचा बाप्तिस्मा आपल्याला आपल्या प्रत्येकाच्या बाप्तीस्म्याची आठवण करून देते. आपल्या सगळ्यांचा बाप्तिस्मा पाण्याने व पवित्र आत्म्याने झालेला आहे. देवाने आपल्या सर्वांना त्याची लेकरे म्हणून निवडले आहे आणि ह्याची साक्ष देण्यासाठी ख्रिस्ताप्रमाणे जगात आपल्याला जगात पाठवले आहे. आपल्याविषयी देव संतुष्ट आहे. आपले आईवडील तसेच धर्म-आईबाप आपल्यासाठी देवाला वचणे देतात. आपण ती वचने आपल्या दररोजच्या जीवनात आचरणात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे व त्याप्रमाणे वागून आपण जगाला ख्रिस्ताच्या प्रेमाची व दयेची साक्ष देणे गरजेचे आहे.
मदर तेरेसा म्हणत असत, “माझ कार्य अथांग सागरातील एका थेंबाप्रमाणे आहे. मदरचे प्रचंड कार्य पाहता त्यांनी प्रौढी मिरवली असती पण बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाप्रमाणे तिच्यात जगावेगळी नम्रता होती. मदरप्रमाणे आपल्याला ही नम्रता धारण करता येणे हे प्रभूच्या कार्यासाठी अगत्याचे आहे.
ख्रिस्त मला त्याच्या कार्यासाठी खूप प्रकारे बोलावत आहे. त्यासाठी चर्च हे उत्तम प्रकारचे कार्य करण्याचे साधन आहे. चर्च सलग्न खुप काही संघटना आहेत. एखाद्या संघटनेत सहभागी होऊन देवाचे कार्य करूया. म्हणजे खरे ख्रिस्ती असल्याचा अभिमान वाटेल. तसेच बाप्तिस्मातला आपला पवित्र आत्मा आपल्याला त्यासाठी प्रेरणा देईल. देवाचे कार्य करण्यासाठी खूप तरुणांनी पुढे यावे व देवाची सुवार्ता सर्वत्र पसरावी म्हणून आपण आजच्या स्नान्संस्काराच्या सणा दिवशी खास प्रार्थना करूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद : प्रभो आमचा विश्वास दृढ कर
  1.  ख्रिस्तसभेत कार्य करणारे आपले पोप, बिशप्स व इतर सर्व प्रापंचिक लोकांना देवाची सुवार्ता पसरविण्यास कृपा व शक्ती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
  2. आपल्या राजकीय नेत्यांनी आपला स्वार्थीपणा बाजूला ठेवून जन कल्याणासाठी नेहमी कार्य करत राहावे व देशाची नेहमी प्रगती करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
  3.  आपले सर्व मिशनरी बंधू भागीनींवर देवाचा आशीर्वाद असावा व त्याचे कार्य करण्यास व येणाऱ्या संकटाना सामोरे जाण्यास परमेश्वराकडून प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
  4. जे तरुण तरुणी देवापासून दूर गेलेले आहेत, ज्यांना जगण्यात अर्थ उरला नाही व जे इतर वाईट मार्गाला लागले आहेत अश्यांना परमेश्वराने चांगला मार्ग दाखवावा व ते परमेश्वराकडे परत वळावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
  5. आपल्या वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करूया.

No comments:

Post a Comment