Reflections for Homily By: Cajitan Pereira
सामान्य काळातील तिसरा
रविवार
दिनांक: २५/०१/२०१५.
पहिले वाचन: योना: ३:१-५,१०.
दुसरे वाचन: १करींथ: ७:२९-३०.
शुभवर्तमान: मार्क १:१४-२०.
प्रस्तावना:
ख्रिस्ती जीवन हे शिष्यत्वाचे जीवन
आहे. आजच्या उपसानेतील वाचने आपणाला देवाची सुवार्ता पसरविण्यासाठी मिळालेल्या
पाचारणाविषयी स्पष्टीकरण देतात.
आजच्या पहिल्या वाचनात योनाने देवाच्या
हाकेला दिलेल्या प्रतिसादाविषयी ऐकतो. देवाच्या शब्दाला आज्ञाधारक राहून योना थोर
निनवे शहरात पश्चातापाचा संदेश देत फिरला. दुसऱ्या वाचनात संत पौल करींथकरांस
काळाची पुर्तता जवळ आली आहे व त्यामुळे ऐहिक आणि अनैतिक गोष्टीवर लक्ष केंद्रित न
करता, स्वर्गराज्याची मुल्ये आत्मसात करण्यास सांगत आहे. तर शुभवर्तमानात आपण
पहिल्या शिष्यांच्या पाचारणाविषयी ऐकतो.
येशूच्या पाचारणाचा स्वीकार करणे म्हणजेच अनोळख्या आणि
असुरक्षित विश्वात धोका पत्कारून उडी घेण्यायोग्य होय. तरीही पेत्र, आंद्रेय,
याकोब आणि योहान ह्यांनी येशूच्या हाकेला तत्काळ आणि संपूर्णपणे होकार दिला. प्रत्येक
ख्रिस्ती व्यक्तीने ख्रिस्ताचे शिष्य म्हणून ख्रिस्तासारखे जीवन जगावे व
ख्रिस्ताची सुवार्ता इतरांपर्यंत पोहचावी म्हणून ह्या मिस्साबलीदानात विशेष प्रार्थना
करूया.
सम्यक विवरण:
पहिले वाचन: योना: ३:१-५,१०.
योना संदेष्ट्याचे पुस्तक त्याच्या
प्रवासाचे, संदेशाचे व त्याच्या भावनांचे पुस्तक आहे. जो भविष्य वर्तवितो तो संदेष्टा
आहे असे सर्व-सामन्यांचे मत होते. परंतु बायबल म्हणते की, ‘संदेष्टा हा केवळ भविष्य
सांगणारा माणूस नसतो तर वर्तमानकाळात परमेश्वराचे मत प्रकट करणारा नेता असतो’.
योना भित्रा होता. परमेश्वराच्या
हाकेसरशी तो पळवाट काढतो. परमेश्वराने बोलावले तेव्हा तो विरुद्ध दिशेने धावत होता.
परमेश्वराने त्याला पूर्वेस बोलाविले परंतु
तो पश्चिमेला धावत गेला. त्याने परमेश्वराच्या आज्ञेस ठामपणे नकार दिला. योनाला जेव्हा देवाचे वचन दुसऱ्यांदा प्राप्त
झाले तेव्हा आपल्या जीवनातील घटनाप्रसंगांवर देवाचे नियंत्रण असल्याचे त्याने अनुभवले.
योना शेवटी परमेश्वराचा एक प्रभावी परिणामकारक संदेष्टा बनला. त्याने प्रामाणिकपणे आणि
निर्भयतापुर्वकतेने देवाचा संदेश थोर निनवे शहरात पोहचविला व निनवेकरांचे तारण झाले.
अश्या ह्या भित्र्या माणसाकडूनही परमेश्वर आपला संदेश लोकांपर्यंत पोहोचवितो.
परमेश्वराला सर्वकाही शक्य आहे. कोणत्याही दुबळ्या व्यक्तीचा परमेश्वर उपयोग करून
घेऊ शकतो.
दुसरे वाचन: १करींथ: ७:२९-३०.
करिंथ हे जागतिक किर्तीचे व्यापार
व उद्योग केंद्र तसेच अनैतिक व व्यसनाने बुरसटलेले शहर होते. करिंथ इथे ख्रिस्तसभेत
फुटीरता निर्माण झाली होती. माणसे खोटे शिक्षक व खोटे नेते ह्यांच्या बुद्धीवर विश्वास
ठेऊ लागले होते. परमेश्वराच्या कृपेपेक्षा माणसाच्या ज्ञानावर व शहाणपणावर ते अधिक
विसंबून होते.
माणसाविषयी देवाची जी योजना होती, ती क्रुसावर
खिळलेल्या ख्रिस्तात प्रकट झाली आहे. ज्यांना परमेश्वराने पाचारण केले आहे,
त्यांनाच क्रुसाचे सामर्थ्य कळू शकते. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती देवाने निवडलेला
शिष्य आहे. जग अविनाशी आहे व जगाचा भविष्यकाळ बदलणार नाही या इहवादी दृष्टिकोनावर पहिल्या
शतकात नित्य वादविवाद चालू असत. ख्रिस्ती माणसाच्या दृष्टीने ‘काळ’ ही संकल्पना
अमुलाग्र बदलली होती. आपण शेवटच्या पिढीबरोबर राहत आहोत अशी पौलाची खात्री होती (१
थेस्स. ४:१५; १ करिंथ. १५:५२). अनेक त्रासानंतर हल्लीची समाजरचना नाहीशी होईल
अश्या परिस्थितीत विवाह शुल्य असून, वंशावली चालू ठेवणे असबंधित आहे. ख्रिस्त
येण्याचा काळ जवळ आला आहे. आता जीवनाला एक नवी दृष्टी लाभणार. त्यामुळे
सर्वप्रकारच्या सामाजिक बांधिलकीपासून अलिप्त रहा. ख्रिस्ताचे शिष्य बनून चांगल्या
जीवनशैलीने त्याला संतुष्ट करा.
शुभवर्तमान: मार्क १:१४-२०.
मार्कचे शुभवर्तमान एका दृष्टीने
शिष्यत्वाचे शुभवर्तमान आहे. ख्रिस्ताच्या कार्याचा आरंभ शिष्यांचा पाचाराणापासून
करून, मार्कने शिष्य, येशूच्या कार्यक्षेत्राला साक्षी म्हणून पात्र असल्याचे
दर्शविले आहे. मार्कने शिष्यत्वाचे महत्व समजून सांगितले आहे. येशूच्या पाचारणाला
तत्काळ आणि पूर्णपणे प्रतिसाद देण्याचा मार्ग दाखविला आहे. तसेच शिष्य बनविण्यासाठी
येशू पुढाकार घेतो आणि शिष्य येशूला शोधत नाही तर येशू शिष्यांना शोधतो.
१. येशूच्या पाचारण्यात येशूला शिष्यांविषयी पूर्वज्ञान असल्याचे दिसून
येते:
येशूने आपल्या शिष्यांना एका क्षणात बोलाविले नाही. बाप्तिस्म्याच्यावेळी
झालेल्या आकाशवाणीनंतर त्याने चाळीस दिवस एकांतात घालविले (योहान: १:४०-४२).
गालीली सरोवराभोवती फिरत असताना पहिल्या शिष्यांना पाचारण्यापुर्वी येशूला
त्यांच्याविषयी पूर्वज्ञान होते. पहिल्या चार शिष्यांना पाचारण्यापुर्वी दोन शिष्य
: योहान आणि आंद्रेय एक दिवस येशुबरोबर राहतात. नंतर आंद्रेय पेत्राला घेऊन येतो.
मार्क, येशूने पाहिलेल्या पहिल्या दोन व्यक्तीतील शिमोनाचे
नाव सहा वेळा आणि पेत्राचे नाव अठरा वेळा नमूद करतो; तर शिमोन पेत्राचे एकदाच. इतर
शुभवर्तामानाच्या तुलनेत मार्क पेत्राचा उल्लेख अधिक वेळा करतो. किंबहुना मार्क पेत्राचा
उत्तम शिष्य होता. अंद्रेयाचे नाव अन्यत्र १:२९; ३:१८; १३:३ मध्ये नमूद करतो.
याकोब आणि योहानाच्या नावाचा उल्लेख नऊ वेळा केला आहे.
२. येशूच्या पाचारण्यात फक्त दिघौद्योगी व्यक्तीला आमंत्रण दिले आहे:
सुस्तपणाचा आणि आळशीपणाचा देव
तिरस्कार करतो. येशूने शिष्यांना रिकामे बसलेले तेव्हा नाही, तर काम करीत असताना
पाचारिले. येशूने बोलाविले तेव्हा पेत्र आणि अंद्रेया सरोवरात जाळे टाकत होते; तर
याकोब आणि योहान जाळे दुरुस्त करीत होते. इतर शिष्यांनासुद्धा कार्य करतानाच
पाचारिले. जुन्या करारातसुद्धा अनेक अशी उदाहरणे आहेत. संदेष्टा आमोस कळपाची राखण
करीत असताना देवाने त्याला बोलाविले(आमोस ७:१४-१५). संदेष्टा अलीशाला बैलाची बारा
जोंते चालवून शेत नांगरीत असताना संदेष्टा एलीयाला बोलाविले (१ राजे १९:१९). दाविद
राज्याला मेंढरे चारीत असताना बोलावून अभिषिक्त केले (१ शमुवेल १६:१५-१९).
जो व्यक्ती आळशी आणि सुस्त आहे तो
कधीच फलदायी कृत्य करु शकत नाही. “आळशी माणसाची वाट कांटेरी कुंपणासारखी असते, पण
सरळांची वाट राजमार्ग बनते”(नीतिसूत्रे १५:१९). परमेश्वर दिघौद्योगी आणि ज्यांना
भविष्यात अधिक कार्य करण्याची आवड आहे त्यांनाच पाचारितो. जेणेकरून मासे पकडणारे
शिष्य - माणसे पकडोत आणि बी पेरणारे – चांगली मुल्ये पेरोत.
३. येशूच्या पाचाराण्यात, प्रत्येक व्यक्ती विशिष्ट कार्यासाठी बोलावितो:
येशूने आपल्या शिष्यांना आरामासाठी
नाही, तर सेवेसाठी बोलाविले आणि त्यांस ठराविक कार्य करण्याची जबाबदारी दिली.
पेत्राला प्रेषितांचा प्रमुख म्हणून पाचारिले तर याकोबाला पहिला पहिला रक्तसाक्षी
बनण्यास निवडले. हेरोद राज्याने याकोबाला जीवे मारले (प्रेषितांची कृत्ये १२:२). योहानाला
मात्र दीर्घायुष्य लाभले आणि तो दीर्घकाळ जगला. इतर शिष्यांनी दिलेले कार्य
प्रामाणिकपणे आणि विश्वासुपणे पार पाडले. येशूने शिष्यांना परिश्रमासाठी पाचारिले
जेणेकरुन आपले सर्वस्व इतरांसाठी व्यथित करुन देवराज्य प्रस्तापित करतील.
येशूची आपल्या शिष्यांना एक आज्ञा
होती, ‘वाटेसाठी काठीवाचून काही घेऊ नका,
भाकरी, झोळी किंवा कंबरकशात पैसे घेऊ नका, दोन अंगरखे घालू नका. संपत्ती,
मालमत्ता, सौदर्य, खाणेपिणे हे ज्यांचे उद्धिष्ट बनते तो शिष्यत्वास अपात्र ठरतो’.
शिष्य हा शिस्तप्रिय आणि मोहमुक्त असावा हि मार्कची धारणा दिसते.
बोधकथा:
१) हर्बट कार्डीनल वॅगन, इंग्लिश कार्डीनल, तेरा भावंडापैकी एक होते. त्यांची
आई धर्मांतर होती. तिने ख्रिस्ताला व ख्रिस्ती विश्वासाला इतके अंगिकारले कि,
प्रत्येक दिवशी पवित्र साक्रामेंतासमोर तासाची आराधना करीत असे. मुलांचे व्यवस्थित
व योग्य पाचारण व्हावे म्हणून ती प्रार्थना करीत असे. आठ मुलांपैकी सहाजणांना
धर्मगुरू तर पाच मुलींना धर्मभगिनी बनवून देवाने तिच्या प्रार्थनेचा स्वीकार करून
उत्तर दिले होते. पाचही धर्मगुरू नंतर बिशप्स् बनले व एक कार्डीनल झाला. तिने
आयुष्याच्या संध्याकाळपर्यंत प्रार्थना केली व तिच्या प्रार्थनेला भरभराट यश व फळ
प्राप्त झाले.
२) १९२८ साली वयाच्या १८ व्या वर्षी मदर तेरेसाने नॉव्हीस म्हणून लोरेटो
सिस्टरच्या संस्थेत पदार्पण केले आणि ६ जानेवारी १९२९ ला त्या भारतात आल्या.
सुरवातीला दार्जीलिंग आणि कलकत्ता इथे शिक्षिका म्हणून कार्य केले . १० सप्टेबर
१९४६ साली दार्जीलिंगहून कलकत्त्याला रेल्वेने प्रवास करीत असताना मदर तेरेसाने
येशूची वाणी ऐकली, ‘तू माझी सेवा गरीबातल्या गरीबांमध्ये करावी अशी माझी इच्छा
आहे.’ ह्या प्रेरणादायी वाणीने तिचे आयुष्य बदलले.
देवाने आखलेल्या योजनावर तिची
खात्री होती. म्हणून तिने काही काळ कॉन्वेंटबाहेर राहण्यासाठी पोप महाशयांची
परवानगी मागितली. कोणत्याही अडथळ्याशिवाय तिला परवानगी देण्यात आली. सर्वप्रथम
पटनातील अमेरिकन मिशनरी ‘सिस्टर्स ऑफ द पुअर’ ह्या मिशनरी सिस्टरांसोबत राहून मदर
तेरेसाने आपल्या महान मिशनकार्याला सुरुवात केले. झोपडपट्टीमध्ये काम करून गरीबांतील
गरीब लोकांची आणि कुष्टरोग्यांची सेवा ईश्वर सेवा मानून ती आपली कार्याला वचनबद्ध
राहिली.
मदर तेरेसाप्रमाणे आपले जीवनसुद्धा
मिशन कार्यासाठी आहे. इतरांची सेवा करणे आपल्या ख्रिस्ती जीवनाचा हेतू व आपले
नैतिक कर्तव्यसुद्धा आहे.
मनन चिंतन:
येशूने आपल्या शिष्याकडून परिपूर्ण परिवर्तनाची इच्छा बाळगली
होती. त्यांनी जुनी जीवनशैली सोडून नवीन जीवन पद्धत आत्मसात करावी अशी प्रभूची
इच्छा होती. जीवनात अनेक लोक चांगले जीवन जगण्याचा प्रयत्न करतात पण अडचणीमुळे आणि
त्रासामुळे अर्ध्यावर सोडून देतात. अनेक कारणे देऊन, “मी नंतर करतो”
हे ब्रीदवाक्य वापरतात. “आज नाही तर उदयाला करतो” व उद्या कधीच उगवत नाही.
येशूला मानवी दुर्बलतेची जाणीव होती म्हणून त्याने तत्काळ
कृतीचे आव्हान केले. येशू, शिमोन आणि त्याचा भाऊ अंद्रेया ह्यांना आपल्या कार्याचे
सभासद होण्याचे आमंत्रण देतो. त्या ईश्वरी हाकेत चमत्कारिक सामर्थ्य असते. म्हणून त्या
हाकेने त्यांच्या जीवनाची दिशा बदलते, व्यवसाय बदलतो, संपत्तीकडे पाहण्याचा
दृष्टीकोन बदलतो. दोन्ही बंधू ताबडतोब आपले जाळे सोडून येशूचा पाठलाग करतात.
त्यांचा प्रतिसाद तत्काळ आणि परिपूर्ण होता. त्यांनी उद्याचा विचार केला नाही.
योहान आणि याकोब ह्यांच्या प्रतिसादातसुद्धा समान तीव्रता आपणांस दिसुत येते.
त्यांनी वस्तुचेच नव्हे तर आपल्या जन्मदात्याचासुद्धा त्याग केला. येशूचे शिष्यत्व
पुष्कळ आव्हानात्मक आहे. आपल्या सर्वस्वाचा त्याग करण्यास आव्हान करतो. ऐहिक जगात
राहूनही परमार्थ हेच त्याचे एकमेव उद्दिष्ट बनते.
परिवर्तनासाठी लोक नवीन विचारांचा स्वीकार करतात. परंतु
जुन्या रूढी-परंपरा सोडण्यास नकार देतात. इतरांबरोबर खऱ्या प्रेमाचे नाते
प्रस्थापित करण्यासाठी स्वार्थ्यभाव, द्वेष, मत्सर, संशय बाजूला सारणे महत्त्वाचे
आहे. नवीन विचार किंवा कार्य जुन्यावर बांधता येत नाही. त्यासाठी नव्याने सुरुवात
करावी लागते. येशु स्पष्टपणे सांगतो, ‘नवा द्राक्षरस नव्या बुधल्यात घालावा. जर
नवीन द्राक्षरस जुन्या बुधल्यात घातला तर
नव्या द्राक्षरसाने बुधले फुटतात व द्राक्षरस सांडून, बुधलेही नासतात’ (मत्तय
९:१७; मार्क २:२२; लूक ५:३७-३९).
येशूचे मिशनकार्य वेगळे आणि महत्त्वाचे आहे. ते फलदायी आणि
यशस्वी होण्यासाठी शिष्यांची संपूर्ण वचनबद्धता अत्यावश्यक आहे. येशु शिष्यांसमोर
अत्यंत कठीण परिस्थिती उभारतो. हे त्या मनुष्याने आपल्या बापाला पुरण्याच्या
विंनतीला दिलेल्या उतारातून स्पष्ट होते, “मेलेल्यांना आपल्या मेलेल्यांस पुरू
दे.” येशू आपल्या शिष्यांना स्पष्ट समजावतो, देवाच्या कार्याशी केलेली वचनबद्धता
इतर सर्व कर्तव्यापेक्षा महत्त्वाची आहे. “जर कोणी मजकडे येतो आणि आपला बाप, आई,
बायको, मुले, भाऊ व बहिणी यांचा आणि आपल्या जीवाचाही द्वेष करीत नाही तर त्याला
माझा शिष्य होता येत नाही. जो कोणी आपला वधस्तंभ घेऊन माझ्यामागे येत नाही त्याला
माझा शिष्य होता येत नाही” (लूक १४:२६-२७).
देव जिथे पाठवील तिथे देवाच्या दासाने जावे. जेव्हा बोलाविल
तेव्हा यावे आणि जे सांगेल ते करावे. देवाच्या शब्दाला आज्ञाधारक राहून कार्य
करण्याची इच्छा असली पाहिजे.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभो, तुझ्या हाकेला प्रतिसाद देण्यास आम्हांस तुझी कृपा लाभू
दे.
१. येशू ह्या जगात
गरिबांना सुवार्ता सांगण्यासाठी, आजाऱ्यांना रोगमुक्त करण्यासाठी, भुकेल्यांना
अन्न देण्यासाठी, अन्यायांना न्याय देण्यासाठी आणि अंधांना दृष्टी देण्यासाठी आला.
त्याचप्रमाणे पोपमहाशय, सर्व बिशप्स, धर्मगुरू आणि धर्मभगिनी ह्यांनी तुझे मिशन
कार्य अखंड चालू ठेवावे व तुझा चेहरा मानवजातीत पाहून तुझ्या प्रेमाची साक्ष
द्यावी, म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. प्रत्येक ख्रिस्ती
व्यक्तीने ख्रिस्ताचे शिष्य म्हणून जीवन जगावे. देवाच्या वचनाला आज्ञाधारक राहून,
देवाच्या इच्छेला प्राध्यान्य द्यावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. ‘पीक फार आहे परंतु
कामकरी थोडे आहेत’. अनेक तरुण-तरुणींनी प्रभूच्या मळ्यात कार्य करण्यासाठी
स्वखुशीने पुढे यावे. तसेच ज्या तरुण-तरुणींनी देवापासून मिळालेल्या पाचारणाला
होकार दिला आहे, त्यांनी जागतिक मोहाला बळी पडू नये, म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. जे युवक – युवती
मोहाला बळी पडून, देवापासून दूर गेलेले आहेत, त्यांना प्रभूचा स्पर्श व्हावा.
त्यांनी देवाची वाणी ऐकून त्यांचे मनपरिवर्तन व्हावे. आणि त्यांनी चांगले धार्मिक
जीवन जगावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. आपण आपल्या सामाजिक,
कौटुंबिक आणि वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करू या.
No comments:
Post a Comment