Tuesday, 26 May 2015


Reflection for the Feast of Most Holy Trinity by
Leon D`Britto.









पवित्र त्रैक्याचा सण

दिनांक: ३१/०५/२०१५
पहिले वाचन: अनुवाद ४:३२-३४, ३९-४०
दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ८:१४-१७
शुभवर्तमान: मत्तय २८:१६-२०




पवित्र त्रैक्य: आदर्श कुटुंबाचे प्रतिक



प्रस्तावना 

आज आपण पवित्र त्रैक्याचा सण साजरा करत आहोत. अतिपवित्र त्रैक्याचे रहस्य हे ख्रिस्ती श्रद्धेचे आणि जीवनाचे मुलभूत रहस्य आहे.
आजच्या पहिल्या वाचनात मोशे परमेश्वर हाच खरा देव आहे व सुखी समृद्धीत राहण्यासाठी त्याच्या आज्ञेचे पालन करा असे म्हणतो तर दुसऱ्या वचनात संत पौल पवित्र आत्म्याचे महत्व पटवून देत आहे. शुभवर्तमानात पिता, पुत्र व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा देण्याच्या आज्ञेद्वारे आपल्या जीवनातील पवित्र त्रैक्याचे महत्व येथे पटवून सांगण्यात आले आहे.
अगदी प्रारंभापासून पवित्र त्रैक्याचे रहस्य हे ख्रिस्तसभेच्या जिवंत श्रद्धेचा मुलभूत घटक आहे. स्नानसंस्काराच्या श्रद्धेत, धर्मप्रचारात, धर्मशिक्षणात आणि प्रार्थनेत त्याचे अस्तित्व आपल्याला जाणवत असते. उपासनेतही ह्या रहस्याचा समावेश आहे. ह्या रहस्याद्वारेच प्रभू येशु ख्रिस्ताची कृपा, परमेश्वर पित्याचे प्रेम आणि पवित्र आत्म्याचा सहवास आपणाबरोबर असतो व हाच पवित्र त्रैक्याचा सहवास आपणाबरोबर सदा असावा म्हणून ह्या मिस्साबलिदानात प्रार्थना करूया.

सम्यक विवरण

पवित्र त्रैक्य हे खऱ्या अर्थाने श्रद्धेचे रहस्य आहे. हे असे रहस्य आहे, की ते देवाने प्रकट केल्याशिवाय आपणास उलगडणार नाही. परमेश्वराने ह्या त्रैक्याच्या रहस्याचे ठसे त्याच्या निर्मितीच्या कार्यावर आणि जुन्या करारातील प्रकटीकरणावर उमटविले आहेत. तरीही त्रैक्याचे रहस्य मानवी विवेकाला पूर्णपणे उलगडणारे असे नाही. देवाचा पुत्र आणि पवित्र आत्मा ह्या जगात येण्यापूर्वी इस्रायल लोकांनाही ते उलगडलेले नव्हते.

त्रैक्याचे प्रकटीकरण
पुत्राने पित्याला प्रकट केले : येशूने जेव्हा देवाला “पिता” ह्या नावाने संबोधले, हे यापूर्वी कधी ऐकले वा वापरले गेले नव्हते. तो केवळ निर्माणकर्ता ह्या नात्यानेच पिता नव्हे तर अनंतकालीन पुत्राचे युगानयुगे पित्याशी आणि पित्याचे त्याच्या एकमेव पुत्राशी जे नाते आहे त्या अर्थाने त्याने “पिता” संबोधले. पित्याविना पुत्राला कोणी ओळखत नाही आणि पुत्राविना पित्याला; ज्या कुणाला पुत्र पित्याची ओळख करून देऊ इच्छितो त्याविना पित्याला कोणी ओळखत नाही. ह्या कारणास्तव प्रेषितांनी येशू हा ‘शब्द’ असल्याची साक्ष दिली. प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता आणि शब्द देव होता आणि तो शब्द अदृश्य देवाची प्रतिमा होती. तो देवाच्या ऐश्वर्याची प्रतिमा आणि त्याचे प्रतिबिंब आहे.
पवित्र आत्मा पिता व पुत्र ह्यांस प्रकट करतो: आपल्या दुःसहनापुर्वी येशूने दुसरा ‘कैवारी’ म्हणजेच ‘पवित्र आत्मा’ पाठविण्याचे अभिवचन दिले होते. निर्मितीपासून पिता आणि पुत्रासह कार्य करीत असलेला आणि संदेष्ट्याद्वारे जो बोलला आहे तो पवित्र आत्मा आता प्रेषितांमध्ये आणि प्रेषितांसह राहणार होता. हा पवित्र आत्मा म्हणजे पिता आणि पुत्र ह्यांच्यासह असलेली त्रैक्यातली तिसरी व्यक्ती होय. येशू वैभवाने परतल्यानंतर पवित्र आत्म्यास पाठविले गेले, त्यामुळे पवित्र त्रैक्याचे रहस्य पूर्ण प्रकट झाले.
पवित्र त्रैक्याची रचना: पवित्र त्रैक्याच्या रहस्याची मांडणी करण्यासाठी ख्रिस्तसभेने तत्कालीन तत्वज्ञानातील भाषेचा वापर केला. उदा. स्वभाव, तत्व, व्यक्ती, सबंध, नाते इ. हे करीत असताना तिने श्रद्धेला मानवी ज्ञानापेक्षा कमी लेखले नाही, तर ह्या शब्दप्रयोगाला नवा अदभूतपूर्व अर्थ दिला. तेव्हापासून हे शब्द ह्या अवर्णनीय रहस्याचे वर्णन करण्यासाठी वापरण्यात येऊ लागले.
पवित्र त्रैक्याचे सत्य: त्रैक्य एक आहे. आपण तीन देव म्हणत नाही तीन व्यक्ती मिळून एकच देव आहे असे म्हणतो. हे त्रैक्य म्हणजे एकच स्वभाव असलेला देव! ह्या दैवी व्यक्तीत देव विभागलेला नाही, तर प्रत्येक व्यक्ती पूर्ण देव आहे. पिता जसा आहे तसा पुत्र आहे, पुत्र जसा आहे तसा पिता आहे आणि पिता, पुत्र जसा आहे तसा पवित्र आत्मा आहे.  असे तिघे मिळून एकच देव आहे.
त्रैक्यातील तिन्ही व्यक्ती एकमेकांपासून वेगळ्या आहेत. परमेश्वर एकच आहे परंतु एकटा नाही. ह्या तीन परस्पर सबंधित व्यक्ती असूनही एकच देव किंवा एकच स्वभाव आहे. ह्या ऐक्यामुळे पिता पूर्णपणे पुत्रामध्ये आणि पवित्र आत्म्यात आहे. पुत्रही पूर्णपणे पित्यामध्ये व पवित्र आत्म्यात आहे.

बोधकथा

संत अगुस्तीन पवित्र त्रैक्याचे रहस्य समजण्याचा प्रयत्न करत होते व ह्या रहस्यावर एकांतात विचार करण्यासाठी एक दिवस समुद्रकिनारी फेरफटका मारत होते. किनाऱ्यावर चालत असताना त्याला एक मुलगा किनाऱ्यावर खेळत असताना दिसला. तो काय करत आहे हे पाहण्यासाठी संत अगुस्तीन त्या मुलाजवळ गेले. त्या मुलाने किनाऱ्यावर एक छोटासा खड्डा केला होता व तो पाण्यापाशी जाऊन आपल्या ओंजळीत समुद्राचे पाणी घेत होता व ते पाणी त्याने केलेल्या खड्ड्यात ओतत होता. हे पाहिल्यावर संत अगस्तीन त्या मुलाला म्हणाला, ‘तू काय करत आहेस?’ तेव्हा तो मुलगा म्हणाला की, ‘मला संपूर्ण समुद्र ह्या खड्ड्यात रिकामा करायचा आहे.’ हे ऐकून संत अगुस्तीन स्मितहास्य देत म्हणाले, ‘ते कस काय शक्य आहे? एवढा मोठा अथांग सागर ह्या छोट्याश्या खड्यात रिकामा करणे अशक्य आहे.’ तेव्हा तो मुलगा म्हणाला, जर तुम्हाला वाटत असेल की, आपल्या बुद्धीसामर्थ्यापलीकडील हे पवित्र त्रैक्याचे रहस्य तुम्ही समजू शकता तर मी का नाही ह्या खड्ड्यात समुद्र रिकामा करू शकणार?’ एवढे म्हणून ते बाळ तिथून अदृश्य झालं, तेव्हा पवित्र त्रैक्याचे संपूर्ण रहस्य आपल्या बुद्धिचातुर्यापलीकडीचे आहे हे संत अगुस्तीनला समजले.


मनन-चिंतन

संत अगुस्तीनप्रमाणे कदाचित आपल्यालासुद्धा पवित्र आत्म्याचे रहस्य कसे आहे हे समजणार नाही परंतु आपण ते काय आहे ह्यावर विचार विनिमय करू शकतो. मनात प्रश्न येतो कि, देवाने हे पवित्र त्रैक्याचे रहस्य आपल्याला का दिले? कदाचित त्याचे कारण हे असू शकते: देवाने आपल्याला त्याच्या प्रतीरुपात निर्माण केले आहे. ह्या पवित्र त्रैक्याच्या रहस्याद्वारे जेवढे आपण देवाला समजू शकू तेवढे जास्त आपण आपल्या स्वत:ला समजू शकू. कारण प्रत्येक सर्व-साधारण माणूस हा आपल्या देवासारखा होण्याचा प्रयत्न करत असतो. जे भक्त रागवणाऱ्या व शिक्षा देणाऱ्या देवास भजतात ते सुद्धा लवकर शिक्षा करतात, जे प्रेमळ देवाला भजतात ते आपल्या जीवनातून प्रेम देतात, जे न्यायी देवाला भजतात त्यांच्यासाठी न्याय मिळणे व मिळवून देणे महत्वाचे असते. जसा देव तसे त्याचे भक्त. असे असेल तर आपल्या सर्वांच्या मनात एक प्रश्न यायला हवा की, ‘हे पवित्र त्रैक्याचे रहस्य आपल्याला आपल्या देवाबद्दल तसेच आपणाबद्दल काय सांगत आहे?
पवित्र त्रैक्याच्या रहस्यातून आपल्याला समजते की, आपला देव हा एकांतात राहत नाही तर तो एकत्र राहतो. व आपल्याला सुद्धा एकांकी जगापासून दूर न राहता आपल्या समाजात राहण्यास सांगतो. पवित्र त्रैक्यातील ऐक्य, समतोल, प्रीतीबंधुत्व अतुलनीय आहे. हे पवित्र त्रैक्य एक आदर्श कुटुंबाचे प्रतिक आहे. एक उत्तम कुटुंब कसं असावं ह्याचा आदर्श पवित्र त्रैक्य आपणासमोर ठेवत आहे.
खऱ्या प्रेमासाठी तिघांची गरज असते व हे खरे प्रेम कुटुंबात आढळते. कुटुंबात आई वडील व बाळ असे तिघे असतात. आपला देव आपल्याला आपल्या जीवनातील कुटुंबाचे महत्व दाखवत आहे. पिता, पुत्र व पवित्र आत्मा एकमेकांत समन्वय राखून आपले कार्य व्यवस्थीत पार पाडतात. आपल्या देवाचे उदाहरण समोर ठेऊन आपण आपल्या कुटुंबात समन्वय राखणे गरजेचे आहे. कुटुंबात प्रत्येकाने स्वतःचे स्थान जाणून घेऊन आपल्यावर असलेल्या जबाबदारीचे निरंतर पालन करणे गरजेचे आहे.
आपल्याला देवाने त्याच्या प्रतीरुपात बनवलेले आहे. जसे देवाचे खरे देवपण त्रैक्यात दिसून येते तसेच आपले खरे मानवी रूप त्रैक्यात दडलेले आहे. जेव्हा एखादा माणूस पृथ्वीवरील आपल्या इतर बांधवांशी व देवाशी नाते जोडतो तेव्हा देव, माणूस व त्याचे इतर बांधव ह्यामध्ये त्रैक्यात त्याचे खरे मानवी रूप दिसून येते. त्रैक्याचे जीवन हे परीपुर्णतेचे जीवन आहे, हे परीपुर्णतेचे जीवन जगण्यासाठी जीवनात आपल्या प्रत्येकाला देवाची व आपल्या इतर बांधवांची गरज आहे. पवित्र त्रैक्याचा हा आदर्श समोर ठेवून आपणसुद्धा आपले देवाबरोबर व आपल्या बांधवांबरोबर असलेले नाते दृढ करूया व खऱ्या जीवनाचा आस्वाद घेऊया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थंना

प्रतिसाद: हे पवित्र त्रैक्या आम्हांला आमच्या कुटुंबातील व समाजातील एकरूपता वाढविण्यास मदत कर.

1. ख्रिस्तसभेचे अधिकारी पोप महाशय, सर्व बिशप, धर्मगुरू व व्रतस्त बंधू भगिनी जे ख्रिस्ताच्या मळ्यात कार्यरत आहेत, त्यांची त्रैक्यावरील श्रद्धा बळकट असावी व इतरांनाही त्याच श्रद्धेत दृढ असण्यास त्यांनी योग्य ते मार्गदर्शन करावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
2.  आज पवित्र त्रैक्याचा सण साजरा करत असताना त्यांच्यातील समन्वयातून आपण प्रेरणा घेऊन आपल्या कुटुंबात, धर्मग्रामात व समाजात समन्वय राखून सुखा-समाधानाने आपल्याला जगता यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
3. ख्रिस्ती ह्या नात्याने जी श्रद्धा आम्हाला मिळाली आहे ती श्रद्धा अधिक दृढ करण्यास आम्हाला कृपा मिळावी व हीच श्रद्धा आम्हाला दुसऱ्यांना देता यावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
4. लवकरच मुले नवीन शैक्षणिक वर्षाला सुरवात करणार आहेत. ह्या नवीन वर्षात अधिक जोमाने अभ्यास करून त्यांना त्यांचा सर्वांगीन विकास करता यावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक कौटुंबिक व सामाजिक गरजा प्रभूचरणी मांडूया.






                आपणा सर्वास पवित्र त्रेक्याच्या सणाच्या हार्दिक शुभेच्छा!


Tuesday, 19 May 2015


Reflection for the Homily of Pentecost  by
Chris Bandya.









पवित्र आत्माच्या सण


दिनांक: २४/०५/२०१५.
पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये २:१-११
दुसरे वाचन: १ करिंथकरांस पत्र १२:३-७,१२-१३.
शुभवर्तमान: योहान २०:१९-२३.










प्रस्तावना:

आज देऊळमाता पवित्र आत्माचा सण म्हणजेच ख्रिस्ती धर्माचा जन्मदिन साजरा करत आहे. आजच्या ह्या दिनी हजारो वर्षांपूर्वी शिष्यांवर पवित्र आत्माचा वर्षाव झाला व पवित्र आत्म्याच्या वरदानांनी परिपूर्ण होऊन त्यांनी प्रभूची सुवार्ता पसरवण्याच्या कार्यास सुरुवात केली.                 
येशू ख्रिस्ताच्या क्रूसावरील मरणानंतर सर्व शिष्यांनी घाबरून स्वतःला एका खोलीत कोंढून ठेवले होते. येशूप्रमाणे छळ होऊन त्यांनादेखील क्रूसावरील मरण सोसावे लागेल ह्या विचाराने ते भयभीत झाले होते. परंतु आजच्या शुभवर्तमानात सांगितल्याप्रमाणे ख्रिस्त त्यांना पवित्र आत्माच्या दानांचे अभिवचन देतो. पवित्र आत्मा सदैव त्यांच्या बरोबर राहून त्यांना त्यांच्या अडचणीत तसेच कठीण समयी सहाय्य करील असे आश्वासनही देतो. ह्याच प्रभूवचनांवर आपल्या विशासाचा पाया भक्कम करून शिष्यांनी त्यांच्या सेवाकार्यास नव्याने सुरुवात केली व ख्रिस्ताची सुवार्ता जगाच्या कानाकोपऱ्यात निर्भीडपणे पोहचवली.
शिष्यांप्रमाणे आपलादेखील पवित्र आत्मावरील विश्वास दृढ व्हावा तसेच ख्रिस्ताची सुवार्ता इतरांपर्यंत पोहोचविण्यास पवित्र आत्म्याचे सामर्थ्य आपणास लाभावे म्हणून या मिस्साबलीत विशेष प्रार्थना करुया.

सम्यक विवरण

शुभवर्तमान: योहान २०:१९-२३.

येशूच्या मरणानंतर भयभीत झालेले शिष्य सर्वकाही संपलेलं आहे ह्या भावना उराशी बाळगून लपलेले असताना संत योहान आजच्या शुभवर्तमानामध्ये सांगत आहे की, ‘पुनरुत्थित येशू त्यांच्यामध्ये येऊन उभा राहिला. पुनरुत्थित प्रभू हा इतिहासातील येशूपेक्षा वेगळा होता. तो पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने त्यांच्यामध्ये, त्यांच्याबरोबर सदोदित राहत होता. संत पौल गलतीकरांस लिहिलेल्या पत्रात अध्याय ५:२२ मध्ये पवित्र आत्म्याद्वारे निष्पन्न होणारे फळ शांतीविषयी बोलतो. पुनरुत्थित ख्रिस्त, ‘तुम्हांस शांती असो’, असे अभिवादन करून प्रेषितांना पवित्र आत्म्याचे शांतीचं फळ देतो. पुनरुत्थित ख्रिस्ताला पाहून शिष्यांना क्षणभंगुर आनंद व सुख लाभले. तुकाराम म्हणतात, ‘सुख पाहता जवा एवढे, दु:ख मात्र पर्वता ऐवढे.’ येशूला त्यांना केवळ तात्पुरत्या आनंदाने भरून द्यायचं नव्हतं तर पवित्र आत्म्याच्याद्वारे निष्पन्न होणारं सार्वकालिक सुख व आनंदाचे फळ बहाल करायचे होते. पुढे ख्रिस्त शिष्यांना शुभवर्तमानाचे साक्षीदार होण्यासाठी जसे पित्याने येशूला पाठविले होते, तसे तो प्रेषितांना किंवा शिष्यांना पाठवतो. येशूचा पवित्र आत्मा शिष्यांना त्याचे साक्षीदार होण्यासाठी येरुशलेमेत यहुदियांत, शमरोनांत व पृथ्वीच्या शेवटापर्यंत पाठवतो (प्रेषित १:८). प्रभूच्या पुनरूत्थानाचे साक्षीदार बनण्यासाठी त्यांना खरोखर पवित्र आत्म्याचे समर्थ हवे होते.
येशू केवळ त्यांच्याबरोबर पवित्र आत्म्याविषयी बोलला नाही तर त्यांनी ‘पवित्र आत्म्याचा स्वीकार करावा’ म्हणून त्याने त्यांच्यावर फुंकर टाकली. पवित्र आत्म्याचं दुसरं नाव ज्याला आपण हिब्रू भाषेमध्ये ‘रुहा याव्हे’ म्हणजेच ‘breath of God’ असे म्हणतो. पवित्र आत्मा हा दुसरा-तिसरा कोणी नसून पुनरुत्थित ख्रिस्ताचा किंवा देवाचा ‘श्वास’ होता. ज्यांनी पवित्र आत्म्याचा स्वीकार केलेला आहे तो पवित्र आत्म्याची कार्ये करत असतो. तो सत्याचा आणि क्षमेचा आत्मा असल्यामुळे तो त्या व्यक्तीला सत्याकडे आणि क्षमेकडे नेत असतो.

मनन चिंतन:

पवित्र आत्माचा सण हा ख्रिस्तसभेचा जन्मदिन म्हणून हा सण साजरा केला जातो. हा दिवस ख्रिस्तसभेच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरलेला दिवस आहे. ह्याच दिवशी पवित्र आत्माने परिपूर्ण होऊन शिष्य निर्भयपणे प्रभूसुवार्तेचा प्रचार करावयास जगभर फिरले. गेल्या रविवारच्या शुभवर्तमानात, सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करण्याचा आदेश प्रभू येशु ख्रिस्ताने आपणा सर्वांना दिला. हा आदेश पार पाडून पित्याचे राज्य ह्या जगात स्थापण्यासाठी लागणारी पवित्र आत्माची दाने व त्या दानांद्वारे एकमेकांना क्षमा करून शांतीने एकत्र राहण्यास आजचे शुभवर्तमान आपल्याला निमंत्रित करीत आहे.
खरं पाहता, पवित्र आत्माने परिपूर्ण होणे याचा नक्की अर्थ काय व याचा परिणाम आपल्यावर तसेच लोकांवर कसा होतो हे आपण सर्वांनी समजून घेणे अधिक गरजेचे आहे. पवित्र आत्माचे अस्तित्व व कार्य आणि ख्रिस्ताचे अस्तित्व व कार्य ह्या दोन वेगळ्या गोष्टी नाहीत, कारण पवित्र आत्माने परिपूर्ण होणे म्हणजे आपले ख्रिस्ती जीवन एका नव्या जोमाने व अनुभवाने ख्रिस्ताच्या जीवनाशी एकरूप होऊन नव्याने जीवन जगणे होय. प्रत्येकक्षणी व जीवनाच्या हरएक घडीत पवित्र आत्मा आपल्याला ख्रिस्ताच्या अस्तित्वाची तसेच त्याच्या कार्याची जाणीव करून देणारी एक चेतनाशक्ती म्हणून कार्य करीत असते.
ख्रिस्तामधील आपले जीवन व ख्रिस्तावरील आपली श्रद्धा प्रभावी करण्यासाठी आपल्याला पवित्र आत्माची गरज असते व जेव्हा आपण पवित्र आत्माने परिपूर्ण होतो, तेव्हा आपण ख्रिस्ताच्या सुवार्तेचा प्रसार करण्यास निर्भयपणे तयार होतो. पवित्र आत्माने परिपूर्ण होणे म्हणजे ख्रिस्त हा प्रभू आहे याची नव्यानं ओळख पटणं होय, तसेच ख्रिस्त हा तारणारा आहे याचा नव्याने स्वीकार करणे व निर्भय बनून ख्रिस्ताठायी जीवन जगण्यास प्रारंभ करणे. तसेच पवित्र आत्मानं परिपूर्ण होणे म्हणजे आपल्या मनातील स्वार्थीभाव, पापवृत्ती लोप पावणे. पवित्र आत्माच्या चेतनादायी सामर्थ्याने आपल्या अंतःकरणातील पापवासना आणि स्वार्थप्रवृत्ती पूर्णपणे नष्ट होते आणि आपले जीवन शुद्ध, नीतिमान व आज्ञाधारक बनते.
आजच्या पहिल्या वाऐकल्याप्रमाणे पवित्र आत्माचा वर्षाव शिष्यांवर होताच ते विविध भाषा बोलू लागले. शिष्यांच्या मुखातून बाहेर पडलेली ही भाषा जेरुसलेममध्ये त्यावेळी उपस्थित असलेल्या वेगवेगळ्या भाविक लोकांना कळली. याचा अर्थ हाच की, ख्रिस्तसभेचे मिशनकार्य एका विशिष्ट भागासाठी, जातीसाठी, देशासाठी किंवा भाषिकांसाठी नाही, तर ते अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी आहे. पवित्र आत्माने त्यांच्यावर वर्षाव केला कारण ख्रिस्ताच्या मृत्यूमुळे ते भिऊन गेले होते त्यांना वाटत होत कि येशुप्रमाणे त्यांनासुद्धा क्रुसावर खिळले जाईल. जरी त्यांचा ख्रिस्तावर विश्वास दृढ होता तरी ते भित्रे व अशक्त होते. त्यांच्यात आध्यात्मिक शक्तीच्या उणीवा होत्या, म्हणूनच ते भिऊन एका खोलीत एकांकी बसले होते.  अश्या वेळी पवित्र आत्माच्या वर्षावामुळे ते निर्भय बनले व ख्रिस्त हाच प्रभू आणि तारणारा आहे ही शुभवार्ता ते घोषवू लागले. ह्या विशिष्ट कृपादानांमुळे ते जीवनात येणाऱ्या संकटांना तसेच छळांना धैर्याने सामोरे जाण्यास प्रबळ झाले.
आपल्या सर्वांना वाटत असते कि, पवित्र आत्माचा वर्षाव आपल्यावर होऊन आपणसुद्धा विविध भाषांमध्ये बोलावे, असे जीवनात घडण्यासाठी पवित्र आत्माच्या दानांची परिपूर्तताआपणाद्वारे होणे आवश्यक असते. जेव्हा आपण पवित्र आत्माने परिपूर्ण होऊ तेव्हा आपले जीवन बदलून जाण्यास वेळ लागणार नाही व आपल्याला नवजीवनाचा अनुभव येईल. आपल्या जीवनात, आनंद व शांती राज्य करील. जर आपल्या मनात इतरांबद्दल राग, द्वेष, हेवा, मत्सर, स्वार्थ किंवा लोभ असेल तर सर्वप्रथम आपल्याला ह्या सर्व गोष्टीपासून आपले मन रिकामे करावे लागेल व पवित्र आत्माचा स्वीकार करण्यासाठी सज्ज राहावे लागेल. जेव्हा आपण आपले अंतकरण साफ ठेवू तेव्हा आपल्याला पवित्र आत्माचा अनुभव येऊन आपले जीवन सुखी व समाधानी बनेल. हे सर्व करण्यासाठी आपल्याला परमेश्वराची कृपा व मार्गदर्शन मिळावे म्हणून आपण ईश्वरचरणी प्रार्थना करुया. आपल्या अंतकरणात निवास करीत असलेला हा पवित्र आत्मा आजच्या ह्या पवित्र दिवशी जागृत व्हावा आणि आपल्या सर्व वरदानांचा त्याने आम्हावर वर्षाव करावा व आम्हाला आनंद, प्रीती, शांती आणि समाधान यांचा अनुभव द्यावा हिच त्या परम-पित्याकडे आमची नम्र प्रार्थना. आमेन.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे पित्या, आम्हास तुझ्या पवित्र आत्माने परिपूर्ण कर.
1. प्रभू येशूची सुवार्ता घोषित करणारे पोप महाशय फ्रान्सिस, कार्डिनलस, महागुरू, धर्मगुरू व सर्व धर्मबंधू-भगिनी यांच्यावर पवित्र आत्माचा वर्षाव सदैव होत राहावा व त्यांच्या कार्यात लागणाऱ्या सर्व गरजा पवित्र आत्माच्या दानांनी त्यांना मिळाव्यात व त्यांचा वापर त्यांनी लोकांच्या भल्यासाठी करावा म्हणून आपण प्रार्थना करुया.
2. आपल्या देशातील सार्वजनिक क्षेत्रात अधिकारपदी असेलेल्या लोकांनी सर्व प्रकारचा भ्रष्टाचार सोडून आपल्या देशातील लोकांची प्रामाणिकपणे व सचोटीने सेवा करावी म्हणून परमेश्वराने त्यांच्यावर आपला पवित्र आत्मा पाठवावा, यासाठी आपण प्रार्थना करु या.
3.   जे लोक त्यांच्या विश्वासामुळे छळ सहन करीत आहेत व ज्यांच्यावर धर्माच्या नावावर अन्याय केले जातात अश्या लोकांना प्रभूची कृपा लाभावी व पवित्र आत्माच्या दानांद्वारे त्याचे सांत्वन व्हावे व त्यांची श्रद्धा अधिकाधिक बळकट व्हावी म्हणून आपण प्रार्थना करुया.
4.  आपले जे बंधू-भगिनी जगाच्या काना-कोपऱ्यात प्रभूशब्द पसरवण्याचे काम करत आहेत, त्यांच्यावर प्रभूच्या आत्माचा वरदहस्त कायम राहून प्रभूची सुवार्ता जगासमोर धैर्याने प्रसारित करण्यास सतत मदत मिळावी म्हणून आपण प्रार्थना करुया.
5. संपूर्ण जगात सर्वत्र शांती आणि विशेष करून ज्या ठिकाणी हल्ले, युद्ध व अशांतीचे वातावरण आहे, अश्या सर्व ठिकाणी प्रभूने शांतीचा वर्षाव करावा व अशांतीसाठी जबाबदार असणाऱ्या सर्व लोकांना चांगले मार्गदर्शन लाभून त्यांनी शांतीसाठी आपले जीवन समर्पित करावे म्हणून आपण प्रार्थना करु या.
6.   आपल्या वैयक्तिक व सामाजिक हेतूसाठी आपण प्रार्थना करू या. 



Monday, 11 May 2015

  
 Reflections for the Homily on the 'Ascension of our lord Jesus Christ' by Amol Gonsalves.





                           प्रभू येशूच्या स्वर्गरोहणाचा सण


दिनांक: १७-५-२०१५
पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये १:१-११
दुसरे वाचन: इफिसकरांस पत्र १:१७-२३
शुभवर्तमान: मार्क १६:१५-२०



“तुम्ही माझे साक्षी व्हाल”

                                  

प्रस्तावना:

आज पवित्र ख्रिस्तसभा “येशू ख्रिस्ताच्या स्वर्गरोहणाचा” सण साजरा करीत आहे. पुनरुत्थानानंतर चाळीस दिवस येशू ख्रिस्त आपल्या शिष्यासमवेत राहिला. पवित्र आत्म्याच्या देणग्या मार्फत ख्रिस्ताने आपल्या शिष्यांस सुवार्तेचा प्रसार जगजाहीर करण्यास सज्ज केले.
आजच्या पहिल्या वाचनात आपण येशू ख्रिस्ताच्या स्वर्गरोहणाविषयी व पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने शिष्य येशूचे साक्षीदार बनले ह्याविषयी वृत्तांत ऐकतो. दुसऱ्या वाचनात संत पौल ख्रिस्ताच्या वैभवशाली पुनरुस्थानात देवाच्या अखंड दैवी शक्तीचे दर्शन घडून येत असल्याचे सत्य इफिसकरांस लिहिलेल्या पत्रात सांगत आहे. शुभवर्तमानात संत मार्क, ‘येशूची आपल्या शिष्यांस अखेरची आज्ञा’ ह्याविषयीचा वृत्तांत सादर करीत आहे. देव-पित्याच्या स्वर्गीय राज्याची सुवार्ता जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्यासाठी ख्रिस्ताने शिष्यांस अखेरची आज्ञा दिली.
आज ख्रिस्तसभा आपल्याला ह्या महान आज्ञेचे प्रचारक बनण्यास आमंत्रित करीत आहे. सुवार्तेच्या प्रचारासाठी आपण सतत झटत राहावे, म्हणून ह्या मिस्साबलीदानामध्ये आपण विशेष प्रार्थना करू या.

सम्यक विवरण:

पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये १:१-११

शुभवर्तमानकार संत लूक ह्याने ख्रिस्ती पवित्रशास्रात दोन पुस्तके लिहिलेली आहेत; ‘लुकलीखीत शुभवर्तमान’ व ‘प्रेषितांची कृत्ये’. शुभवर्तमानात लूकने येशू ख्रिस्ताचे जीवन व कार्य ह्याविषयीचा वृत्तांत सादर केला आहे. तर, प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकात पुनरुत्थानानंतर येशूने आपल्या प्रेषितांना त्यांनी करावयाच्या सुवार्ता-कार्याविषयी दिलेल्या आदेशाबद्दल माहिती मिळते.
पुनरुत्थित येशूने प्रेषितांना दिलेल्या आदेशानुसार पवित्र आत्माच्या त्यांच्यावरील आभमताने सामर्थ्य प्राप्त होऊन ते येशूचे सुवर्ताकार्य पुढे चालू ठेवतात. तसे पहिले तर, प्रेषितांचे कृत्ये १: १-१४ व लूक २४: २६-५३ या दोन उताऱ्यांत भरपूर साम्य असल्याचे दिसून येते. लूकने शुभवर्तमानाच्या शेवटच्या २४:३६-५३ या उताऱ्यात पुनरुत्थित येशूचे प्रेषितांना दिलेले दर्शन व आपण खरोखर जिवंत येशूच आहोत हे सिद्ध करण्यासाठी दिलेले प्रमाण तसेच त्यांना पवित्र शास्राचा आधार घेऊन स्वतःच्या कार्याविषयीची दिलेली शिकवण व आपल्या नावाने पापक्षमेची सुवार्ता घोषाविण्याचा दिलेला आदेश आणि त्यासाठी त्यांनी देण्यात येणारे पवित्र आत्माचे सामर्थ्य इत्यादिविषयी त्यांच्याशी केलेले संभाषण व शेवटी त्यांनी बेथनिपर्यंत बाहेर नेऊन त्यांच्या समक्ष वर स्वर्गात जाणे तद्नंतर प्रेषितांचे येरुशलेमात परतणे या वृत्तांताची लूक प्रेषितांची कृत्ये १:१-१४ मध्ये पुनरावृत्ती करतो.
१:३- चाळीस दिवसापर्यंत येशू प्रेषितांना दर्शन देत असे व देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे. संत लूक आपल्या दुसऱ्या खंडाच्या सुरवातीलाच सांगतो कि, येशू पुनरुत्थानानंतर चाळीस दिवसांनी स्वर्गात चढला. ‘चाळीस’ हा अंक बायबलमध्ये ‘संपूर्णता’, ‘पुष्कळ’ किंवा ‘पुरेसा’ ह्या गोष्टीचा संदर्भ दर्शवून देतो.   
उदा: सियोन डोंगरावरील देवाच्या सान्निध्यातील मोशेचे चाळीस दिवस; सुवार्ताकार्यास प्रारंभ करण्यापूर्वी येशूचे चाळीस दिवस; पवित्र आत्माच्या सान्निध्यात अरण्यातील वास्तव्य; इस्रायलच्या लोकांचे चाळीस वर्षे रानातील वास्तव्य इ. ह्यास्तव येशू चाळीस दिवसांनी प्रेषितांमधून निघून गेल्यावर ते स्वतः त्याने त्यांच्यावर पाठविलेल्या पवित्र आत्माच्या सामर्थ्याने ‘देवाच्या राज्याची’ अधिकृत व खरी शिकवण देण्यास समर्थ होतील असे संत लूक सूचित करतो.
१:८- “तुम्ही माझे साक्षी व्हाल”. पुनरुत्थित येशू आपल्या प्रेषितांना सांगतो की, पवित्र शास्रात सांगितल्याप्रमाणे ख्रिस्ताचे मरण, पुनरुत्थान व त्यांच्या नावाने येरुशलेमहून प्रारंभ करून सर्व राष्ट्रांस पश्चात्ताप व पापांची क्षमा ही सुवार्ता घोषविणे या गोष्टीचे तुम्ही साक्षी आहात. (लूक २४:४६-४८) लूकच्या शुभवर्तमानात यापूर्वी प्रेषितांना उद्देशून ‘साक्षी’ हा शब्दप्रयोग आलेला आहे.
बारा प्रेषित येशूच्या जीवनकार्याचे साक्षी होते, तरीदेखील ते मुख्यत्वेकरून पुनरूत्थानाचे साक्षी होते. पुनरुत्थित येशूने पाठविलेला पवित्र आत्मा प्रेषितांवर आल्यानंतर त्यांना येशूचे साक्षी होण्याचे सामर्थ्य प्राप्त झाले व परिणामी ते प्रभू येशूच्या नावाने लोकांना तारणाची सुवार्ता घोषवू लागले.
१:९-११- या वचनांत लूक येशूच्या स्वर्गारोहाणाविषयीची (लूक २४:५०-५१) पुनरावृत्ती करतो. त्याशिवाय जो येशू शिष्यांपासून वर स्वर्गात गेला आहे तो पुन्हा तसाच गौरवाने पुन्हा येईल असे प्रकटीकरण त्यांना देव-दुतांमार्फत होते.

दुसरे वाचन: इफिसकरांस पत्र १:१७-२३

इफिसकरांस लिहिलेल्या पत्रातून घेतलेल्या आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल इफिस मंडळीतील सर्व बंधुजनास देवाच्या कृपेने ख्रिस्तात मिळालेले आशीर्वाद किती महान आहेत याची आठवण करून देतो. देवाविषयी अधिक कळण्यासाठी आणि त्यांचे विचार व मार्ग ओळखण्यासाठी आपल्याला आत्मिक दृष्टीची गरज आहे. तसेच देवाचे महान सामर्थ्य विश्वास ठेवणाऱ्यांकरिता उपलब्ध आहे. हे सामर्थ्य देवाने ख्रिस्तासाठी जे केले त्यावरून प्रगट झाले (९:२०-२३). देवाने ख्रिस्ताला मेलेल्यांतून उठविले. त्याला सर्वश्रेष्ठ अधिकार दिला (२१). हा अधिकार व मन कोणालाही कधीच मिळाला नाही व मिळणार नाही. ख्रिस्त मंडळीचा मस्तक आहे. देव पाप्यांचे तारण करून पुनरुत्थित ख्रिस्ताचे सामर्थ्य प्रगट करतो (२२). ख्रिस्ताचे कार्य व गौरव पाहून देवाचे सामर्थ्य व शक्ती ओळखण्यास संत पौल इफिसकरांस उत्तेजन देत आहे.

शुभवर्तमान: मार्क १६:१५-२०

मार्कलिखित शुभवर्तमानातील या विभागात येशूच्या पुनरुत्थानानंतर घडलेल्या काही घटनांचा उल्लेख आहे. (मार्क १६:१५-२०) येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर काही दिवसांनी शिष्य गालील प्रांतातील एका डोंगरावर गेले. या अगोदर येशू ख्रिस्ताची व त्यांची येरुशलेमेत भेट झाली होती. अशा शिष्यांना ख्रिस्ताने नवीन जबाबदारी व काम दिले – “जा, आणि माझ्याविषयी सर्वांना सांगा” (१५). जे ख्रिस्ताचा स्वीकार करतात त्यांचे तारण होते. जो विश्वास ठेवणार नाही तो शिक्षेस पात्र ठरेल (१६).
शिष्यांनी ख्रिस्ताची सुवार्ता सांगून सर्व राष्ट्रांतील लोकांस ख्रिस्ताचे शिष्य/ अनुयायी करायचे होते. जे ख्रिस्ताचे शिष्य होण्यास तयार होतील त्यांना पापात बाप्तिस्मा द्यायचा होता. देव जो पिता, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा या त्र्यैक्य देवाशी एकनिष्ठ राहण्याची ही साक्षच होती. यानंतर प्रभू येशू स्वर्गात घेतला गेला व देवाच्या उजवीकडे बसला (१९). तो आत्म्याने आपल्या शिष्यांबरोबर होता. तो त्यांच्याबरोबर कार्य करीत राहिला (२०).

मनन चिंतन:

मानवरूपी देह धारण करून प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगात आपल्या स्वर्गीय पित्याचे कार्य प्रस्थापित करण्यासाठी आला होता. प्रभू येशूने देवराज्याची घोषणा केली आणि देवराज्याची सुवार्ता सांगत तो गावोगावी, शहरा-शहरी व नगरो-नगरी फिरला. पृथ्वीवरील आपले कार्य पूर्ण केल्यावर तो आपल्या स्वर्गीय पित्याकडे परतला. आपल्या स्वर्गरोहणानंतर पेन्टेकॉस्टच्या दिवशी त्याने आपल्या प्रेषितांवर पवित्र आत्मा पाठवला आणि तिथेच ख्रिस्तसभेचा जन्म झाला. तो पवित्र आत्मा ख्रिस्तसभेमध्ये सक्रीय राहून तिला आपले मंदिर बनवितो. ख्रिस्तसभा हीदेखील पवित्र आत्माची व ख्रिस्ताची वधू म्हणून ह्या जगात पवित्रीकरणाचे कार्य करीत आहे.
ख्रिस्तसभेद्वारे देवराज्य दृश्य स्वरुपात जरी अवतरलेले असले तरी तिच्याठायी देवराज्याचे अदृश्य स्वरूपदेखील दडलेले आहे. ख्रिस्तसभा ही ख्रिस्ताने स्थापन केलेली असल्यामुळे तिचे स्वरूप ईश्वरीय आहे. असे जरी असले तरीही ख्रिस्त/देव मानवी सहाय्यावर अवलंबून असतो. ह्याच मानवी सहाय्यामुळे (ख्रिस्तसभा) जगात देवराज्य स्थापनेचे कार्य अखंडीतपणे चालू आहे. मात्र ते परिपूर्ण स्वरुपात साकार झालेले नाही. ख्रिस्तसभा आज आपल्याला ह्या स्वर्गीय कार्यात हातभार लावण्यास आमंत्रण करीत आहे.
ख्रिस्ताने दिलेली अखेरची आज्ञा (मार्क १६:१५-२०) पाळून, ख्रिस्तसभेत जीवन जगणारी देवाची प्रजा जगाचा प्रकाश आणि पृथ्वीचे मीठ बनते व देवराज्याची सुवार्ता पसरवित राहते. धर्मगुरू त्यांच्या दीक्षित याजकपदाद्वारे आणि प्रापंचिक त्यांच्या सामान्य याजकपदाद्वारे हे प्रेषितकार्य पुढे सुरु ठेवतात.
आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे वैभवशाली स्वर्गारोहण, हे आपल्या ख्रिस्ती विश्वासाचे एक महत्त्वपूर्ण घटक बनले आहे. जो ख्रिस्त पित्याकडून ह्या धरतीवर आला होता, तोच ख्रिस्त मरणावर विजय मिळवून आज पित्याकडे परत जात आहे. ख्रिस्ताने आपल्या मरणानंतर आपल्या शिष्यांस व त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांस अनाथ सोडले नाही तर त्यांना पवित्र आत्माचे वरदान बहाल केले. पवित्र आत्माच्या शक्तीद्वारे त्यांना सामर्थ्य प्राप्त करून दिले व पृथ्वीच्या शेवटपर्यंत आपले खरे साक्षीदार बनण्यास सुसज्ज केले.
प्रभू येशूचे स्वर्गरोहण आपल्याला मुख्यता चार गोष्टीवर मनन चिंतन करण्यास पाचारीत आहे.
१.  आपल्या कौटुंबिक जीवनाद्वारे परमेश्वराच्या राज्याची सुवार्ता घोषित करणे.
२. पापाच्या अंधारात चाचपडणाऱ्या जगाला ख्रिस्ताच्या प्रकाशाचा मार्ग दाखविणे.
३. भौतिक जगात वावरताना शिस्त निपुनता, सक्रीय जीवनशैली आणि सुज्ञता इत्यादी सदगुणांची मशाल तेवत ठेवणे.
४. देवशब्दाचे बीज पेरण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे.
ह्यास्तव, ह्या जगातील ईश्वरी कार्य कोणतेही असो, ते करताना आपली सदसद्विवेकबुद्धी  जागृत ठेवून आणि ख्रिस्ती मुल्ये जोपासून आपण देवराज्याची सुवार्ता सर्वत्र सुवेळी आणि अवेळी घोषित करणे जरुरीचे आहे.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: ऐकावी प्रार्थना, करीतो मी याचना.
१. आपले परमगुरुस्वामी (नाव), अध्यात्मिक मेंढपाळ (नाव) यांना त्यांच्या कामात प्रभूचा सतत वरदहस्त लाभावा, त्यांना प्रभूने उदंड आयष्य व आरोग्य बहाल करावे तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या अखिल ख्रिस्तसभेची प्रगती होत राहावी, म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. आपल्या देशाचा कारभार संभाळण्यासाठी जे राज्यकर्त्ये, अधिकारी नेमले गेले आहेत त्यांनी आपल्या सद्सदविवेकबुद्धीला जागून सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीकोनातून जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी योग्य ते श्रम घ्यावेत व सामान्य जनतेच्या प्रगतीसाठी झटावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. युगानयुगांचा धर्मगुरू प्रभू येशू ख्रिस्त याने आपल्या धर्मप्रांताला जे तरुण व होतकरू धर्मगुरू, धर्मभगिनी दिले आहेत, त्यांना उदंड आयुष्य द्यावे, तसेच त्यांनीही सध्या कार्यरत असलेल्या धर्मग्रामाला आदर्श व प्रभावी असे नेतृत्व पुरवावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. ख्रिस्ती वैवाहिक जीवनात स्त्री-पुरुषांना समान स्थान आहे. याची जाण ठेवून कुटुंबा-कुटुंबात वैवाहिक पावित्र्य अधिकाधिक जपले जावे तसेच ख्रिस्तसभेने दिलेले वैवाहिक कायदे हे आपल्या भल्यासाठी व देवाच्या गौरवासाठी आहेत, ही शिकवण आपल्या कुटुंबाचा आधारस्तंभ ठरावा म्हणून आपण प्रार्थना करू या.
५. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.