Monday 11 May 2015

  
 Reflections for the Homily on the 'Ascension of our lord Jesus Christ' by Amol Gonsalves.





                           प्रभू येशूच्या स्वर्गरोहणाचा सण


दिनांक: १७-५-२०१५
पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये १:१-११
दुसरे वाचन: इफिसकरांस पत्र १:१७-२३
शुभवर्तमान: मार्क १६:१५-२०



“तुम्ही माझे साक्षी व्हाल”

                                  

प्रस्तावना:

आज पवित्र ख्रिस्तसभा “येशू ख्रिस्ताच्या स्वर्गरोहणाचा” सण साजरा करीत आहे. पुनरुत्थानानंतर चाळीस दिवस येशू ख्रिस्त आपल्या शिष्यासमवेत राहिला. पवित्र आत्म्याच्या देणग्या मार्फत ख्रिस्ताने आपल्या शिष्यांस सुवार्तेचा प्रसार जगजाहीर करण्यास सज्ज केले.
आजच्या पहिल्या वाचनात आपण येशू ख्रिस्ताच्या स्वर्गरोहणाविषयी व पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने शिष्य येशूचे साक्षीदार बनले ह्याविषयी वृत्तांत ऐकतो. दुसऱ्या वाचनात संत पौल ख्रिस्ताच्या वैभवशाली पुनरुस्थानात देवाच्या अखंड दैवी शक्तीचे दर्शन घडून येत असल्याचे सत्य इफिसकरांस लिहिलेल्या पत्रात सांगत आहे. शुभवर्तमानात संत मार्क, ‘येशूची आपल्या शिष्यांस अखेरची आज्ञा’ ह्याविषयीचा वृत्तांत सादर करीत आहे. देव-पित्याच्या स्वर्गीय राज्याची सुवार्ता जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्यासाठी ख्रिस्ताने शिष्यांस अखेरची आज्ञा दिली.
आज ख्रिस्तसभा आपल्याला ह्या महान आज्ञेचे प्रचारक बनण्यास आमंत्रित करीत आहे. सुवार्तेच्या प्रचारासाठी आपण सतत झटत राहावे, म्हणून ह्या मिस्साबलीदानामध्ये आपण विशेष प्रार्थना करू या.

सम्यक विवरण:

पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये १:१-११

शुभवर्तमानकार संत लूक ह्याने ख्रिस्ती पवित्रशास्रात दोन पुस्तके लिहिलेली आहेत; ‘लुकलीखीत शुभवर्तमान’ व ‘प्रेषितांची कृत्ये’. शुभवर्तमानात लूकने येशू ख्रिस्ताचे जीवन व कार्य ह्याविषयीचा वृत्तांत सादर केला आहे. तर, प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकात पुनरुत्थानानंतर येशूने आपल्या प्रेषितांना त्यांनी करावयाच्या सुवार्ता-कार्याविषयी दिलेल्या आदेशाबद्दल माहिती मिळते.
पुनरुत्थित येशूने प्रेषितांना दिलेल्या आदेशानुसार पवित्र आत्माच्या त्यांच्यावरील आभमताने सामर्थ्य प्राप्त होऊन ते येशूचे सुवर्ताकार्य पुढे चालू ठेवतात. तसे पहिले तर, प्रेषितांचे कृत्ये १: १-१४ व लूक २४: २६-५३ या दोन उताऱ्यांत भरपूर साम्य असल्याचे दिसून येते. लूकने शुभवर्तमानाच्या शेवटच्या २४:३६-५३ या उताऱ्यात पुनरुत्थित येशूचे प्रेषितांना दिलेले दर्शन व आपण खरोखर जिवंत येशूच आहोत हे सिद्ध करण्यासाठी दिलेले प्रमाण तसेच त्यांना पवित्र शास्राचा आधार घेऊन स्वतःच्या कार्याविषयीची दिलेली शिकवण व आपल्या नावाने पापक्षमेची सुवार्ता घोषाविण्याचा दिलेला आदेश आणि त्यासाठी त्यांनी देण्यात येणारे पवित्र आत्माचे सामर्थ्य इत्यादिविषयी त्यांच्याशी केलेले संभाषण व शेवटी त्यांनी बेथनिपर्यंत बाहेर नेऊन त्यांच्या समक्ष वर स्वर्गात जाणे तद्नंतर प्रेषितांचे येरुशलेमात परतणे या वृत्तांताची लूक प्रेषितांची कृत्ये १:१-१४ मध्ये पुनरावृत्ती करतो.
१:३- चाळीस दिवसापर्यंत येशू प्रेषितांना दर्शन देत असे व देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे. संत लूक आपल्या दुसऱ्या खंडाच्या सुरवातीलाच सांगतो कि, येशू पुनरुत्थानानंतर चाळीस दिवसांनी स्वर्गात चढला. ‘चाळीस’ हा अंक बायबलमध्ये ‘संपूर्णता’, ‘पुष्कळ’ किंवा ‘पुरेसा’ ह्या गोष्टीचा संदर्भ दर्शवून देतो.   
उदा: सियोन डोंगरावरील देवाच्या सान्निध्यातील मोशेचे चाळीस दिवस; सुवार्ताकार्यास प्रारंभ करण्यापूर्वी येशूचे चाळीस दिवस; पवित्र आत्माच्या सान्निध्यात अरण्यातील वास्तव्य; इस्रायलच्या लोकांचे चाळीस वर्षे रानातील वास्तव्य इ. ह्यास्तव येशू चाळीस दिवसांनी प्रेषितांमधून निघून गेल्यावर ते स्वतः त्याने त्यांच्यावर पाठविलेल्या पवित्र आत्माच्या सामर्थ्याने ‘देवाच्या राज्याची’ अधिकृत व खरी शिकवण देण्यास समर्थ होतील असे संत लूक सूचित करतो.
१:८- “तुम्ही माझे साक्षी व्हाल”. पुनरुत्थित येशू आपल्या प्रेषितांना सांगतो की, पवित्र शास्रात सांगितल्याप्रमाणे ख्रिस्ताचे मरण, पुनरुत्थान व त्यांच्या नावाने येरुशलेमहून प्रारंभ करून सर्व राष्ट्रांस पश्चात्ताप व पापांची क्षमा ही सुवार्ता घोषविणे या गोष्टीचे तुम्ही साक्षी आहात. (लूक २४:४६-४८) लूकच्या शुभवर्तमानात यापूर्वी प्रेषितांना उद्देशून ‘साक्षी’ हा शब्दप्रयोग आलेला आहे.
बारा प्रेषित येशूच्या जीवनकार्याचे साक्षी होते, तरीदेखील ते मुख्यत्वेकरून पुनरूत्थानाचे साक्षी होते. पुनरुत्थित येशूने पाठविलेला पवित्र आत्मा प्रेषितांवर आल्यानंतर त्यांना येशूचे साक्षी होण्याचे सामर्थ्य प्राप्त झाले व परिणामी ते प्रभू येशूच्या नावाने लोकांना तारणाची सुवार्ता घोषवू लागले.
१:९-११- या वचनांत लूक येशूच्या स्वर्गारोहाणाविषयीची (लूक २४:५०-५१) पुनरावृत्ती करतो. त्याशिवाय जो येशू शिष्यांपासून वर स्वर्गात गेला आहे तो पुन्हा तसाच गौरवाने पुन्हा येईल असे प्रकटीकरण त्यांना देव-दुतांमार्फत होते.

दुसरे वाचन: इफिसकरांस पत्र १:१७-२३

इफिसकरांस लिहिलेल्या पत्रातून घेतलेल्या आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल इफिस मंडळीतील सर्व बंधुजनास देवाच्या कृपेने ख्रिस्तात मिळालेले आशीर्वाद किती महान आहेत याची आठवण करून देतो. देवाविषयी अधिक कळण्यासाठी आणि त्यांचे विचार व मार्ग ओळखण्यासाठी आपल्याला आत्मिक दृष्टीची गरज आहे. तसेच देवाचे महान सामर्थ्य विश्वास ठेवणाऱ्यांकरिता उपलब्ध आहे. हे सामर्थ्य देवाने ख्रिस्तासाठी जे केले त्यावरून प्रगट झाले (९:२०-२३). देवाने ख्रिस्ताला मेलेल्यांतून उठविले. त्याला सर्वश्रेष्ठ अधिकार दिला (२१). हा अधिकार व मन कोणालाही कधीच मिळाला नाही व मिळणार नाही. ख्रिस्त मंडळीचा मस्तक आहे. देव पाप्यांचे तारण करून पुनरुत्थित ख्रिस्ताचे सामर्थ्य प्रगट करतो (२२). ख्रिस्ताचे कार्य व गौरव पाहून देवाचे सामर्थ्य व शक्ती ओळखण्यास संत पौल इफिसकरांस उत्तेजन देत आहे.

शुभवर्तमान: मार्क १६:१५-२०

मार्कलिखित शुभवर्तमानातील या विभागात येशूच्या पुनरुत्थानानंतर घडलेल्या काही घटनांचा उल्लेख आहे. (मार्क १६:१५-२०) येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर काही दिवसांनी शिष्य गालील प्रांतातील एका डोंगरावर गेले. या अगोदर येशू ख्रिस्ताची व त्यांची येरुशलेमेत भेट झाली होती. अशा शिष्यांना ख्रिस्ताने नवीन जबाबदारी व काम दिले – “जा, आणि माझ्याविषयी सर्वांना सांगा” (१५). जे ख्रिस्ताचा स्वीकार करतात त्यांचे तारण होते. जो विश्वास ठेवणार नाही तो शिक्षेस पात्र ठरेल (१६).
शिष्यांनी ख्रिस्ताची सुवार्ता सांगून सर्व राष्ट्रांतील लोकांस ख्रिस्ताचे शिष्य/ अनुयायी करायचे होते. जे ख्रिस्ताचे शिष्य होण्यास तयार होतील त्यांना पापात बाप्तिस्मा द्यायचा होता. देव जो पिता, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा या त्र्यैक्य देवाशी एकनिष्ठ राहण्याची ही साक्षच होती. यानंतर प्रभू येशू स्वर्गात घेतला गेला व देवाच्या उजवीकडे बसला (१९). तो आत्म्याने आपल्या शिष्यांबरोबर होता. तो त्यांच्याबरोबर कार्य करीत राहिला (२०).

मनन चिंतन:

मानवरूपी देह धारण करून प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगात आपल्या स्वर्गीय पित्याचे कार्य प्रस्थापित करण्यासाठी आला होता. प्रभू येशूने देवराज्याची घोषणा केली आणि देवराज्याची सुवार्ता सांगत तो गावोगावी, शहरा-शहरी व नगरो-नगरी फिरला. पृथ्वीवरील आपले कार्य पूर्ण केल्यावर तो आपल्या स्वर्गीय पित्याकडे परतला. आपल्या स्वर्गरोहणानंतर पेन्टेकॉस्टच्या दिवशी त्याने आपल्या प्रेषितांवर पवित्र आत्मा पाठवला आणि तिथेच ख्रिस्तसभेचा जन्म झाला. तो पवित्र आत्मा ख्रिस्तसभेमध्ये सक्रीय राहून तिला आपले मंदिर बनवितो. ख्रिस्तसभा हीदेखील पवित्र आत्माची व ख्रिस्ताची वधू म्हणून ह्या जगात पवित्रीकरणाचे कार्य करीत आहे.
ख्रिस्तसभेद्वारे देवराज्य दृश्य स्वरुपात जरी अवतरलेले असले तरी तिच्याठायी देवराज्याचे अदृश्य स्वरूपदेखील दडलेले आहे. ख्रिस्तसभा ही ख्रिस्ताने स्थापन केलेली असल्यामुळे तिचे स्वरूप ईश्वरीय आहे. असे जरी असले तरीही ख्रिस्त/देव मानवी सहाय्यावर अवलंबून असतो. ह्याच मानवी सहाय्यामुळे (ख्रिस्तसभा) जगात देवराज्य स्थापनेचे कार्य अखंडीतपणे चालू आहे. मात्र ते परिपूर्ण स्वरुपात साकार झालेले नाही. ख्रिस्तसभा आज आपल्याला ह्या स्वर्गीय कार्यात हातभार लावण्यास आमंत्रण करीत आहे.
ख्रिस्ताने दिलेली अखेरची आज्ञा (मार्क १६:१५-२०) पाळून, ख्रिस्तसभेत जीवन जगणारी देवाची प्रजा जगाचा प्रकाश आणि पृथ्वीचे मीठ बनते व देवराज्याची सुवार्ता पसरवित राहते. धर्मगुरू त्यांच्या दीक्षित याजकपदाद्वारे आणि प्रापंचिक त्यांच्या सामान्य याजकपदाद्वारे हे प्रेषितकार्य पुढे सुरु ठेवतात.
आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे वैभवशाली स्वर्गारोहण, हे आपल्या ख्रिस्ती विश्वासाचे एक महत्त्वपूर्ण घटक बनले आहे. जो ख्रिस्त पित्याकडून ह्या धरतीवर आला होता, तोच ख्रिस्त मरणावर विजय मिळवून आज पित्याकडे परत जात आहे. ख्रिस्ताने आपल्या मरणानंतर आपल्या शिष्यांस व त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांस अनाथ सोडले नाही तर त्यांना पवित्र आत्माचे वरदान बहाल केले. पवित्र आत्माच्या शक्तीद्वारे त्यांना सामर्थ्य प्राप्त करून दिले व पृथ्वीच्या शेवटपर्यंत आपले खरे साक्षीदार बनण्यास सुसज्ज केले.
प्रभू येशूचे स्वर्गरोहण आपल्याला मुख्यता चार गोष्टीवर मनन चिंतन करण्यास पाचारीत आहे.
१.  आपल्या कौटुंबिक जीवनाद्वारे परमेश्वराच्या राज्याची सुवार्ता घोषित करणे.
२. पापाच्या अंधारात चाचपडणाऱ्या जगाला ख्रिस्ताच्या प्रकाशाचा मार्ग दाखविणे.
३. भौतिक जगात वावरताना शिस्त निपुनता, सक्रीय जीवनशैली आणि सुज्ञता इत्यादी सदगुणांची मशाल तेवत ठेवणे.
४. देवशब्दाचे बीज पेरण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे.
ह्यास्तव, ह्या जगातील ईश्वरी कार्य कोणतेही असो, ते करताना आपली सदसद्विवेकबुद्धी  जागृत ठेवून आणि ख्रिस्ती मुल्ये जोपासून आपण देवराज्याची सुवार्ता सर्वत्र सुवेळी आणि अवेळी घोषित करणे जरुरीचे आहे.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: ऐकावी प्रार्थना, करीतो मी याचना.
१. आपले परमगुरुस्वामी (नाव), अध्यात्मिक मेंढपाळ (नाव) यांना त्यांच्या कामात प्रभूचा सतत वरदहस्त लाभावा, त्यांना प्रभूने उदंड आयष्य व आरोग्य बहाल करावे तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या अखिल ख्रिस्तसभेची प्रगती होत राहावी, म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. आपल्या देशाचा कारभार संभाळण्यासाठी जे राज्यकर्त्ये, अधिकारी नेमले गेले आहेत त्यांनी आपल्या सद्सदविवेकबुद्धीला जागून सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीकोनातून जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी योग्य ते श्रम घ्यावेत व सामान्य जनतेच्या प्रगतीसाठी झटावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. युगानयुगांचा धर्मगुरू प्रभू येशू ख्रिस्त याने आपल्या धर्मप्रांताला जे तरुण व होतकरू धर्मगुरू, धर्मभगिनी दिले आहेत, त्यांना उदंड आयुष्य द्यावे, तसेच त्यांनीही सध्या कार्यरत असलेल्या धर्मग्रामाला आदर्श व प्रभावी असे नेतृत्व पुरवावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. ख्रिस्ती वैवाहिक जीवनात स्त्री-पुरुषांना समान स्थान आहे. याची जाण ठेवून कुटुंबा-कुटुंबात वैवाहिक पावित्र्य अधिकाधिक जपले जावे तसेच ख्रिस्तसभेने दिलेले वैवाहिक कायदे हे आपल्या भल्यासाठी व देवाच्या गौरवासाठी आहेत, ही शिकवण आपल्या कुटुंबाचा आधारस्तंभ ठरावा म्हणून आपण प्रार्थना करू या.
५. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.   





No comments:

Post a Comment