Reflection for the Homily of Pentecost by
Chris Bandya.
पवित्र आत्माच्या सण
दिनांक: २४/०५/२०१५.
पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये २:१-११
दुसरे वाचन: १ करिंथकरांस पत्र १२:३-७,१२-१३.
शुभवर्तमान: योहान २०:१९-२३.
प्रस्तावना:
आज देऊळमाता पवित्र आत्माचा सण म्हणजेच ख्रिस्ती धर्माचा
जन्मदिन साजरा करत आहे. आजच्या ह्या दिनी हजारो वर्षांपूर्वी शिष्यांवर पवित्र
आत्माचा वर्षाव झाला व पवित्र आत्म्याच्या वरदानांनी परिपूर्ण होऊन त्यांनी प्रभूची
सुवार्ता पसरवण्याच्या कार्यास सुरुवात केली.
येशू ख्रिस्ताच्या क्रूसावरील मरणानंतर सर्व शिष्यांनी घाबरून
स्वतःला एका खोलीत कोंढून ठेवले होते. येशूप्रमाणे छळ होऊन त्यांनादेखील क्रूसावरील
मरण सोसावे लागेल ह्या विचाराने ते भयभीत झाले होते. परंतु आजच्या शुभवर्तमानात
सांगितल्याप्रमाणे ख्रिस्त त्यांना पवित्र आत्माच्या दानांचे अभिवचन देतो. पवित्र
आत्मा सदैव त्यांच्या बरोबर राहून त्यांना त्यांच्या अडचणीत तसेच कठीण समयी सहाय्य
करील असे आश्वासनही देतो. ह्याच प्रभूवचनांवर आपल्या विशासाचा पाया भक्कम करून
शिष्यांनी त्यांच्या सेवाकार्यास नव्याने सुरुवात केली व ख्रिस्ताची सुवार्ता
जगाच्या कानाकोपऱ्यात निर्भीडपणे पोहचवली.
शिष्यांप्रमाणे आपलादेखील पवित्र आत्मावरील विश्वास दृढ
व्हावा तसेच ख्रिस्ताची सुवार्ता इतरांपर्यंत पोहोचविण्यास पवित्र आत्म्याचे
सामर्थ्य आपणास लाभावे म्हणून या मिस्साबलीत विशेष प्रार्थना करुया.
सम्यक विवरण
शुभवर्तमान: योहान २०:१९-२३.
येशूच्या मरणानंतर भयभीत झालेले शिष्य सर्वकाही संपलेलं आहे
ह्या भावना उराशी बाळगून लपलेले असताना संत योहान आजच्या शुभवर्तमानामध्ये सांगत
आहे की, ‘पुनरुत्थित येशू त्यांच्यामध्ये येऊन उभा राहिला. पुनरुत्थित प्रभू हा
इतिहासातील येशूपेक्षा वेगळा होता. तो पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने
त्यांच्यामध्ये, त्यांच्याबरोबर सदोदित राहत होता. संत पौल गलतीकरांस लिहिलेल्या
पत्रात अध्याय ५:२२ मध्ये पवित्र आत्म्याद्वारे निष्पन्न होणारे फळ शांतीविषयी
बोलतो. पुनरुत्थित ख्रिस्त, ‘तुम्हांस शांती असो’, असे अभिवादन करून प्रेषितांना
पवित्र आत्म्याचे शांतीचं फळ देतो. पुनरुत्थित ख्रिस्ताला पाहून शिष्यांना
क्षणभंगुर आनंद व सुख लाभले. तुकाराम म्हणतात, ‘सुख पाहता जवा एवढे, दु:ख मात्र
पर्वता ऐवढे.’ येशूला त्यांना केवळ तात्पुरत्या आनंदाने भरून द्यायचं नव्हतं तर
पवित्र आत्म्याच्याद्वारे निष्पन्न होणारं सार्वकालिक सुख व आनंदाचे फळ बहाल
करायचे होते. पुढे ख्रिस्त शिष्यांना शुभवर्तमानाचे साक्षीदार होण्यासाठी जसे
पित्याने येशूला पाठविले होते, तसे तो प्रेषितांना किंवा शिष्यांना पाठवतो. येशूचा
पवित्र आत्मा शिष्यांना त्याचे साक्षीदार होण्यासाठी येरुशलेमेत यहुदियांत,
शमरोनांत व पृथ्वीच्या शेवटापर्यंत पाठवतो (प्रेषित १:८). प्रभूच्या पुनरूत्थानाचे
साक्षीदार बनण्यासाठी त्यांना खरोखर पवित्र आत्म्याचे समर्थ हवे होते.
येशू केवळ त्यांच्याबरोबर पवित्र आत्म्याविषयी बोलला नाही
तर त्यांनी ‘पवित्र आत्म्याचा स्वीकार करावा’ म्हणून त्याने त्यांच्यावर फुंकर
टाकली. पवित्र आत्म्याचं दुसरं नाव ज्याला आपण हिब्रू भाषेमध्ये ‘रुहा याव्हे’
म्हणजेच ‘breath of God’ असे म्हणतो. पवित्र आत्मा हा दुसरा-तिसरा कोणी
नसून पुनरुत्थित ख्रिस्ताचा किंवा देवाचा ‘श्वास’ होता. ज्यांनी पवित्र आत्म्याचा
स्वीकार केलेला आहे तो पवित्र आत्म्याची कार्ये करत असतो. तो सत्याचा आणि क्षमेचा
आत्मा असल्यामुळे तो त्या व्यक्तीला सत्याकडे आणि क्षमेकडे नेत असतो.
मनन चिंतन:
पवित्र आत्माचा सण हा ख्रिस्तसभेचा जन्मदिन म्हणून हा सण
साजरा केला जातो. हा दिवस ख्रिस्तसभेच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरलेला दिवस
आहे. ह्याच दिवशी पवित्र आत्माने परिपूर्ण होऊन शिष्य निर्भयपणे प्रभूसुवार्तेचा
प्रचार करावयास जगभर फिरले. गेल्या रविवारच्या शुभवर्तमानात, सर्व जगात जाऊन
संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करण्याचा आदेश प्रभू येशु ख्रिस्ताने आपणा
सर्वांना दिला. हा आदेश पार पाडून पित्याचे राज्य ह्या जगात स्थापण्यासाठी लागणारी
पवित्र आत्माची दाने व त्या दानांद्वारे एकमेकांना क्षमा करून शांतीने एकत्र
राहण्यास आजचे शुभवर्तमान आपल्याला निमंत्रित करीत आहे.
खरं पाहता, पवित्र आत्माने परिपूर्ण होणे याचा नक्की अर्थ
काय व याचा परिणाम आपल्यावर तसेच लोकांवर कसा होतो हे आपण सर्वांनी समजून घेणे
अधिक गरजेचे आहे. पवित्र आत्माचे अस्तित्व व कार्य आणि ख्रिस्ताचे अस्तित्व व
कार्य ह्या दोन वेगळ्या गोष्टी नाहीत, कारण पवित्र आत्माने परिपूर्ण होणे म्हणजे
आपले ख्रिस्ती जीवन एका नव्या जोमाने व अनुभवाने ख्रिस्ताच्या जीवनाशी एकरूप होऊन
नव्याने जीवन जगणे होय. प्रत्येकक्षणी व जीवनाच्या हरएक घडीत पवित्र आत्मा
आपल्याला ख्रिस्ताच्या अस्तित्वाची तसेच त्याच्या कार्याची जाणीव करून देणारी एक
चेतनाशक्ती म्हणून कार्य करीत असते.
ख्रिस्तामधील आपले जीवन व ख्रिस्तावरील आपली श्रद्धा
प्रभावी करण्यासाठी आपल्याला पवित्र आत्माची गरज असते व जेव्हा आपण पवित्र आत्माने
परिपूर्ण होतो, तेव्हा आपण ख्रिस्ताच्या सुवार्तेचा प्रसार करण्यास निर्भयपणे तयार
होतो. पवित्र आत्माने परिपूर्ण होणे म्हणजे ख्रिस्त हा प्रभू आहे याची नव्यानं ओळख
पटणं होय, तसेच ख्रिस्त हा तारणारा आहे याचा नव्याने स्वीकार करणे व निर्भय बनून
ख्रिस्ताठायी जीवन जगण्यास प्रारंभ करणे. तसेच पवित्र आत्मानं परिपूर्ण होणे म्हणजे
आपल्या मनातील स्वार्थीभाव, पापवृत्ती लोप पावणे. पवित्र आत्माच्या चेतनादायी
सामर्थ्याने आपल्या अंतःकरणातील पापवासना आणि स्वार्थप्रवृत्ती पूर्णपणे नष्ट होते
आणि आपले जीवन शुद्ध, नीतिमान व आज्ञाधारक बनते.
आजच्या पहिल्या वाऐकल्याप्रमाणे पवित्र आत्माचा वर्षाव
शिष्यांवर होताच ते विविध भाषा बोलू लागले. शिष्यांच्या मुखातून बाहेर पडलेली ही
भाषा जेरुसलेममध्ये त्यावेळी उपस्थित असलेल्या वेगवेगळ्या भाविक लोकांना कळली.
याचा अर्थ हाच की, ख्रिस्तसभेचे मिशनकार्य एका विशिष्ट भागासाठी, जातीसाठी,
देशासाठी किंवा भाषिकांसाठी नाही, तर ते अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी आहे.
पवित्र आत्माने त्यांच्यावर वर्षाव केला कारण ख्रिस्ताच्या मृत्यूमुळे ते भिऊन
गेले होते त्यांना वाटत होत कि येशुप्रमाणे त्यांनासुद्धा क्रुसावर खिळले जाईल. जरी
त्यांचा ख्रिस्तावर विश्वास दृढ होता तरी ते भित्रे व अशक्त होते. त्यांच्यात आध्यात्मिक
शक्तीच्या उणीवा होत्या, म्हणूनच ते भिऊन एका खोलीत एकांकी बसले होते. अश्या वेळी पवित्र आत्माच्या वर्षावामुळे ते
निर्भय बनले व ख्रिस्त हाच प्रभू आणि तारणारा आहे ही शुभवार्ता ते घोषवू लागले. ह्या
विशिष्ट कृपादानांमुळे ते जीवनात येणाऱ्या संकटांना तसेच छळांना धैर्याने सामोरे जाण्यास
प्रबळ झाले.
आपल्या सर्वांना वाटत असते कि, पवित्र आत्माचा वर्षाव
आपल्यावर होऊन आपणसुद्धा विविध भाषांमध्ये बोलावे, असे जीवनात घडण्यासाठी पवित्र
आत्माच्या दानांची परिपूर्तताआपणाद्वारे होणे आवश्यक असते. जेव्हा आपण पवित्र
आत्माने परिपूर्ण होऊ तेव्हा आपले जीवन बदलून जाण्यास वेळ लागणार नाही व आपल्याला
नवजीवनाचा अनुभव येईल. आपल्या जीवनात, आनंद व शांती राज्य करील. जर आपल्या मनात
इतरांबद्दल राग, द्वेष, हेवा, मत्सर, स्वार्थ किंवा लोभ असेल तर सर्वप्रथम
आपल्याला ह्या सर्व गोष्टीपासून आपले मन रिकामे करावे लागेल व पवित्र आत्माचा
स्वीकार करण्यासाठी सज्ज राहावे लागेल. जेव्हा आपण आपले अंतकरण साफ ठेवू तेव्हा
आपल्याला पवित्र आत्माचा अनुभव येऊन आपले जीवन सुखी व समाधानी बनेल. हे सर्व
करण्यासाठी आपल्याला परमेश्वराची कृपा व मार्गदर्शन मिळावे म्हणून आपण ईश्वरचरणी
प्रार्थना करुया. आपल्या अंतकरणात निवास करीत असलेला हा पवित्र आत्मा आजच्या ह्या
पवित्र दिवशी जागृत व्हावा आणि आपल्या सर्व वरदानांचा त्याने आम्हावर वर्षाव करावा
व आम्हाला आनंद, प्रीती, शांती आणि समाधान यांचा अनुभव द्यावा हिच त्या
परम-पित्याकडे आमची नम्र प्रार्थना. आमेन.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे पित्या, आम्हास तुझ्या पवित्र आत्माने परिपूर्ण कर.
1. प्रभू येशूची सुवार्ता
घोषित करणारे पोप महाशय फ्रान्सिस, कार्डिनलस, महागुरू, धर्मगुरू व सर्व
धर्मबंधू-भगिनी यांच्यावर पवित्र आत्माचा वर्षाव सदैव होत राहावा व त्यांच्या
कार्यात लागणाऱ्या सर्व गरजा पवित्र आत्माच्या दानांनी त्यांना मिळाव्यात व
त्यांचा वापर त्यांनी लोकांच्या भल्यासाठी करावा म्हणून आपण प्रार्थना करुया.
2. आपल्या देशातील सार्वजनिक
क्षेत्रात अधिकारपदी असेलेल्या लोकांनी सर्व प्रकारचा भ्रष्टाचार सोडून आपल्या
देशातील लोकांची प्रामाणिकपणे व सचोटीने सेवा करावी म्हणून परमेश्वराने त्यांच्यावर
आपला पवित्र आत्मा पाठवावा, यासाठी आपण प्रार्थना करु या.
3. जे लोक त्यांच्या
विश्वासामुळे छळ सहन करीत आहेत व ज्यांच्यावर धर्माच्या नावावर अन्याय केले जातात अश्या
लोकांना प्रभूची कृपा लाभावी व पवित्र आत्माच्या दानांद्वारे त्याचे सांत्वन
व्हावे व त्यांची श्रद्धा अधिकाधिक बळकट व्हावी म्हणून आपण प्रार्थना करुया.
4. आपले जे बंधू-भगिनी जगाच्या
काना-कोपऱ्यात प्रभूशब्द पसरवण्याचे काम करत आहेत, त्यांच्यावर प्रभूच्या आत्माचा
वरदहस्त कायम राहून प्रभूची सुवार्ता जगासमोर धैर्याने प्रसारित करण्यास सतत मदत मिळावी
म्हणून आपण प्रार्थना करुया.
5. संपूर्ण जगात सर्वत्र शांती
आणि विशेष करून ज्या ठिकाणी हल्ले, युद्ध व अशांतीचे वातावरण आहे, अश्या सर्व
ठिकाणी प्रभूने शांतीचा वर्षाव करावा व अशांतीसाठी जबाबदार असणाऱ्या सर्व लोकांना
चांगले मार्गदर्शन लाभून त्यांनी शांतीसाठी आपले जीवन समर्पित करावे म्हणून आपण
प्रार्थना करु या.
No comments:
Post a Comment