Wednesday, 17 June 2015

Reflection for the Homily By: Valerian Patil.






सामान्य काळातील बारावा रविवार



दिनांक: २१/०६/२०१५
पहिले वाचन: इयोब ३:१, ८-११
दुसरे वाचन: २ करींथ ५: १४-१७
शुभवर्तमान: मार्क ४: ३५-४१

प्रस्तावना:
            आज आपण सामान्य काळातील बारावा रविवार साजरा करीत आहोत. आजच्या पहिल्या वाचनात इयोब आपल्या जन्मदिवसाला शाप देतो आणि आईच्या गर्भाशयातच किंवा जन्मताच मी मरण का पावलो नाही असे प्रश्न विचारतो. दुसऱ्या वाचनात संत पौल करिंथकरांस लिहिलेल्या दुसऱ्या पत्रात, ‘ख्रिस्ताच्या प्रेमाच्या नियंत्रणाखाली आम्ही आहोत, जो कोणी ख्रिस्ताशी संयुक्त झालेला आहे तो ख्रिस्तामध्ये नवी निर्मिती आहे असे सांगत आहे. तर आजच्या शुभवर्तमानात येशू ख्रिस्त समुद्रातील वादळाला शांत करून शिष्यांना धीर देत असल्याचे आपण पाहतो.
     आपल्या जीवनात येणाऱ्या कितीतरी लहान-मोठ्या संकटाना पाहून आपण भयग्रस्त होत असतो, परंतु येशू आम्हाला आमच्या संकटांना सामोरे जाण्यासाठी विशेष कृपा देत असतो. तीच विशेष कृपा ह्या मिस्साबलिदानात सहभागी होत असतांना मागूया. 

पहिले वाचन: इयोब ३:१, ८-११
            इयोबचे पहिले भाषण, ह्यामध्ये त्याने स्वत:चे दुःख वर्णिले आहे. इथे एका माणसाच्या अनुभवातून सर्वसाधारण मानवजातीचा उल्लेख केलेला आहे असे समजते. शोकाच्या जबर आघाताने व्याकूळ झालेला माणूस ‘इयोब’ हा होय. इयोब म्हणतो जन्मतःच मेलो असतो तर बरे झाले असते. इयोबच्या भाषणातून निराशेचा सूर लावलेला आपणास जाणवतो. आता त्याने प्रश्न उपस्थित केले की, असे शापित जन्माला येण्यापेक्षा, मी जन्मताच मेलो का नाही? आईच्या उदरातून मृत असाच बाहेर का आलो नाही? अश्या शापित जीवनापेक्षा त्याला मरण अधिक प्रिय झाले आहे असे येथे दिसून येते.

दुसरे वाचन: २ करींथ ५: १४-१७
            ख्रिस्ताचे मरण आणि पुनरूत्थान यांचा एक परिणाम म्हणजे, पौलाला मिळालेली ‘नवी दृष्टी’ होय. तो आता ख्रिस्ताकडे नव्या दृष्टीकोनातून पाहतो. जर कोणी ख्रिस्ताठायी वसत असेल तर तो नवीन उत्पत्ती आहे. या वास्तव विधानातून ख्रिस्ताच्या थोर महात्त्वपुर्णतेचे दर्शन होते आणि त्यावरून जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे असे ठामपणे म्हणता येते. ख्रिस्ताचे त्याच्यावरील हे व्यक्तीगत प्रेम पौलाला स्वतःसाठी (स्वार्थी) जीवन जगण्यापासून परावृत्त करते. व ख्रिस्ताठायी जगण्यास प्रवृत्त करते. खरोखर पेत्र हा ख्रिस्तासाठी जगला व ख्रिस्तासाठीच मेला. ख्रिस्ताचे मरण व पुनरुस्थान हे त्याच्यासाठी फार महत्त्वाचे होते.

शुभवर्तमान: मार्क ४: ३५-४१
     ह्या विशिष्ट उताऱ्यात विविध क्षेत्रामधील अधिकाराची उदाहरणे व त्याबाबतीत केलेल्या चमत्काराचे वृत्तांत आपणास ऐकावयास मिळतात. येशूने चमत्कार केल्याचे नव्या करारात ठामपणे व स्पष्टपणे नमूद केले आहे. हा चमत्कार येशूचा निसर्गावर असलेला अधिकार स्पष्ट करतो. गालील सरोवराच्या अगर समुद्राच्या भोवताली उंच डोंगर आहेत आणि या रांगांच्या दरम्यान अरुंद एकेरी दऱ्या आहेत. या दऱ्यांतून वारा अचानक सोसाट्याने उसळून वाहतो, त्यामुळे लाटा उफाळून केव्हाही  तेथील समुद्रात वादळ निर्माण होते.
     जेव्हा येशू व शिष्य माचाव्यात होता, तेव्हा वादळ सुरु झाले. तेव्हा शिष्य खूप घाबरले त्यांनी येशूला निद्रावस्थेत असलेल्या येशूला जागे करून त्याच्याकडे त्यांच्या बचावाची मागणी केली. त्यांनतर येशूने वाऱ्याला आणि वादळाला धमकावले आणि खवळलेला समुद्र शांत झाला. हे कृत्य निर्माणकर्त्याशिवाय अन्य कोणालाही शक्य झाले नसते. जुन्या करारात केवळ देवच एक वादळे उठवणारा व शांत करणारा आहे असे आपणास वाचावयास मिळते. शिष्यांना यातील फक्त अर्धेच सत्य उमगले आणि ते स्पष्टपणे बोलण्याचे भानही त्यांना उरले नव्हते, कारण ते घाबरले होते.
     येशूच्या शिष्यांनी त्याच्यावर अ-विश्वास दाखवला, त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवला नाही म्हणून त्याने त्यांची कानउघडणी केली. ह्या कृत्याने शिष्यांचा येशूवर असलेला विश्वास दृढ झाला. एखाद वादळ शांत करणे अगर न करणे हे विश्वासावर नव्हे तर देवाच्या इच्छेनुसार अवलंबून असते हेच येथे दिसते. देवाचे कार्य केवळ देवालाच करता येते.

बोधकथा:
      मासेमारी हा आमचा मुख्य व्यवसाय आहे आणि आम्ही आमचे उदरनिर्वाह ह्या मासेमारीच्या व्यवसायावर करतो. मे महिन्याचे दिवस होते आणि ह्या मे महिन्यात समुद्रात वादळ होत असतात. एकदा मी, माझा भाऊ आणि माझे वडील, मे महिन्यात पहाटे समुद्रात मासेमारी करण्यास गेलो होतो. पहाटेचे चार वाजले होते आणि आम्ही समुद्र किना-यावरून मासेमारीसाठी आमची बोट घेऊन निघालो होतो.
     अर्ध्यातासानंतर आम्हास समुद्राच्या लाटांचा प्रवाह वाढत असल्याचे आढळले. त्यावेळी आमची बोट थोडी लहान होती. त्या बोटीचे चालक माझे वडील होते. वडिलांनी आम्हाला झोपेतून उठवले आणि सावध राहण्यास सांगितले. आमच्या बरोबर असलेल्या बोटी सुद्धा सावध होत्या. अचानक समुद्राच्या लाटांचा प्रवाह वाढत गेला. आमच्या पुढे जात असलेली एक बोट एका क्षणात पाण्यात बुडाली.
     त्या बोटीतील माणसे आपला जीव वाचण्यासाठी इतर बोटींना हाका मारू लागली. माझ्यातर जीवात जीव राहिला नव्हता. माझा भाऊ तर आपला प्राण हातात घेऊन उभा होता. परंतु माझे वडील मात्र शांतपणे आमची बोट वल्हवत होते. वडिलांनी आम्हांला सुखरूप नेले आणि आणले.
येशू ख्रिस्त जेव्हा आपल्या जीवनाच्या नावेत असतो तेव्हा आपण आपल्या जीवनाची नाव कितीतरी वादळे किंवा संकटे असली तरी ती सुखरूपपणे समुद्र किनारी आणू शकतो.

मनन चिंतन:
     आजचे शुभवर्तमान आपल्याला महत्वाचा संदेश देत आहे. आपलं जीवन एका बोटीसारखे आहे व जग एका समुद्रप्रमाणे आहे. त्या समुद्रात कधी वादळ, संकटे येतात परंतु जर आपण येशूवर विश्वास ठेवला तर तो आपली बोट त्या वादळातून समुद्र किनारी नेईल. परंतु बऱ्याचदा आपण शिष्यांसारखे एखादे संकट उंबरठ्यावर दिसू लागल्यास आपला विश्वास ढासळतो व आपण अविश्वासू बनतो. प्रत्येकाच्या जीवनात वादळे, संकटे येतात मग ती लहान किंवा मोठी असतात. परंतु त्या संकटांना कश्याप्रकारे सामोरे जावे ह्याचा प्रत्येकाने विचार करायला हवा. शांतपणे, दृढ विश्वासाने वादळ सोसता यावे म्हणून देवाने संत पेत्राला शक्ती पुरवली. बऱ्याच वेळा देव आम्हालाही संकटातून वाचव असतो, तो आम्हाला मरणाच्या दाढेतून सोडवतो आणि काही वेळा आमच्या मरणाने आपल्या नावाचा गौरव करून घेतो (उदा. त्याचे विश्वासू शिष्य बनून जगल्याचा बहुमान आपल्याला मरनानंतर प्राप्त होतो).
आज्ञापालनाच्या वाटेने चालताना व प्रभू येशूच्या आज्ञा पाळताना छळाची वादळे उठली, संकटाचे वारे घोंगावू लागले, अगर दुसरी काही आपत्ती आली तरी आपण त्याच्यावर सर्वस्वी विश्वास ठेवला पाहिजे. कारण देव आपला राखण करणारा आहे हेच आपण आजच्या शुभवर्तमानात तसेच इतर दोन्ही वाचनात ऐकले. तो आपला फक्त निर्माणकर्ताच नव्हे तर तो आपला संरक्षणकर्ता देखील  आहे. कधी-कधी आपल्याला वाटते जेव्हा आपण आज्ञाभंग करतो तेव्हा आपल्या जीवनात संकटे येतात, परंतु हे नेहमीच खरे असते असे नाही. जगामध्ये प्रत्येक व्यक्तीला ह्या समुद्रातून प्रवास करावा लागतो. संकटे बऱ्याचदा माणसाला देवाच्या जवळ आणतात. उदा. जसे शिष्य येशूच्या जवळ आले. पहिल्या प्रथम ते घाबरले नंतर त्यांनी येशूला उठवले, कारण त्यांना ठाऊक होते, येशूच त्यांना ह्या संकटातून बाहेर काढील. चमत्कार हा महत्वाचा नव्हता तर त्याहून महत्वाचे होते शिष्य व येशू ह्याचा संपर्क, कारण येशू त्यांना घडवत होता. जीवनात त्यांना धाडसी बनवत होता.
  जशी इयोब व पेत्र ह्यांच्या जीवनात किती तरी वादळे व संकटे आली परंतु त्यांनी त्यांचा देवावरील विश्वास डळमळीत होऊ दिला नाही तर तो कायम ठेवला. ते देवाच्या आज्ञेत राहिले. तसेच आपणसुद्धा आपल्या जीवनात न डगमगता देवावर विश्वास ठेवावा म्हणून आजची उपासना आपणा सर्वांस पाचारण करीत आहे.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभो आमची प्रार्थना ऐक.
1. ख्रिस्तसभेचे अधिकारी पोप महाशय, सर्व महागुरू, धर्मगुरू व व्रतस्थ बंधूभगिनी जे ख्रिस्ताच्या मळ्यात कार्य करतात, त्यांची श्रद्धा बळकट व्हावी व इतरांची श्रद्धा त्यांनी बळकट करावी म्हणून आपणा प्रार्थना करूया. 
2. यंदाच्या वर्षी चांगले हवामान मिळावे, चांगला पाऊस लाभावा व सर्व शेती-बागा पिकांनी व फळाफुलांनी बहरून याव्यात म्हणून आपणा प्रार्थना करूया. 
3. सर्व स्थानिक कार्यकर्त्यांनी शांतता व न्यायासाठी एकत्र यावे तसेच संपूर्ण जगात शांतता पसरविण्यासाठी प्रयत्न करावे म्हणून आपणा प्रार्थना करूया.
4. जे लोक देवापासून दूर गेले आहेत त्यांना देवाचा स्पर्श होऊन त्यांनी येशूला आपला तारणारा आहे असा विश्वास ठेवावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
5. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक गरजांसाठी प्रार्थना करूया.



No comments:

Post a Comment