Reflection for the Feast of Body and Blood of Christ by Glen Fernandes.
येशूच्या अतिपवित्र शरीराचा
आणि रक्ताचा सण
दिनांक: ०७/०६/२०१५
पहिले वाचन: निर्गम २६:३ – ८.
दुसरे वाचन: इब्री ९:११-१५
शुभवर्तमान: मार्क १४: १२-१६, २२-२६
प्रस्तावना:
आज आपण प्रभू येशूच्या शरीर व
रक्ताचा सोहळा साजरा करत आहोत. भाकररूप ख्रिस्त शरीर हे ख्रिस्ती धर्मातील एक महान
रहस्य आहे. ख्रिस्ताचे आम्हाला दिव्य दर्शन घडावे, आमचे आत्मिक पोषण व्हावे
त्याच्या मायेचा ओलावा आम्हांला सदैव मिळावा, त्याची सोबत आम्हांला नित्य लाभावी
म्हणून ख्रिस्त भाकररूप बनला.
निर्गम या पुस्तकातून घेतलेल्या
पहिल्या वाचनात आपण ऐकतो की, ईस्त्रायल लोकांनी देवाचे वचन ऐकावे व त्याच्या
आज्ञा पाळाव्यात म्हणून मोशे रक्त शिंपडून करार करतो. इब्री लोकांस लिहिलेल्या दुस-या
पत्रातून घेतलेल्या वाचनात, ‘ख्रिस्ताने स्वतःचे रक्त अर्पण करून एकदाच
परमपवित्रस्थानांत गेला आणि त्याने सार्वकालिक मुक्ती मिळविली’ असे ऐकतो. तर
शुभवर्तमानात ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना भाकर व द्राक्षारस देऊन स्वतःला प्रकट
केले, याचा बोध करण्यात येतो.
प्रभू येशूच्या शरीर व रक्ताचा सोहळा साजरा करत असताना आपणा सर्वांना प्रभू
ख्रिस्ताच्या शरीर आणि रक्ताचा एक घटक होता यावे म्हणून ह्या मिस्साबलीदानामध्ये भक्तिपूर्वक
सहभागी होऊया.
सम्यक विवरण:
पहिले वाचन: निर्गम: २६: ३-८
इस्त्रायली लोकांनी मिसर
देश सोडल्यापासून बराच काळ लोटला होता. या काळात देवाने त्यांचा सांभाळ करून
त्यांना नियमशास्त्र दिले. देवाने मोशेकरवी अभिवचन देऊन लोकांनी पवित्र्यात राहावे
म्हणून मार्गदर्शन केले व मोशेने रक्त शिंपडून देव व त्याची जनता ह्यामध्ये करार
केला. देवाचे आज्ञापालन अंतकरणपूर्वक केले पाहिजे. इस्त्रायली लोकांना लीन व नम्र
करण्यासाठी रानातला अनुभव त्यांना दिला होता आणि हा अनुभव खडतर असला तरी तोही एक
देणगीदायकच होता व लोकांनी या अनुभवाचे स्मरण करावे अशी योजना केली होती. मोशेने
यज्ञ व अन्नार्पण करण्यासाठी युवकांना पाचारण केले. मांस व रक्त अर्पण करून देवाला
प्रसन्न करण्यासाठी मोशेने नियम तयार केले.
दुसरे वाचन: इब्री ९:११-१५
ख्रिस्त हा पुढे होणा-या चांगल्या
गोष्टीसंबंधी प्रमुच याजक होऊन आला. ख्रिस्ताने स्वतःचे समर्पण केले. त्याने आपला
आत्मयज्ञ करून व आपले शरीर व रक्त बलीदान करून मोशेने दिलेले यज्ञमार्ग रद्द केले.
नियमशास्त्राप्रमाणे रक्ताने बहुतेक सर्वकाही शुद्ध होते आणि रक्त ओतल्यावाचून
क्षमा होत नाही. बकरे व वासरे ह्यांचे नव्हे, तर स्वतःचे रक्त अर्पण करून एकदाच
ख्रिस्त परमपवित्रस्थानात गेला आणि त्याने सार्वकालिक मुक्ती मिळविली.
ख्रिस्त हा एकदाच युगांच्या समाप्तीस आत्मयज्ञ करून पापे
नाहीशी करण्यासाठी प्रगट झाला. ज्या अर्थी माणसांना, एकदाच मरणे व त्यानंतर न्याय
होणे नेमून ठेविले आहे, त्या अर्थी ख्रिस्त ‘पुष्कळांची पापे स्वतःवर घेण्यासाठी
एकदाच अर्पिला गेला आणि जे त्याची वाट पाहतात त्यांना पापसंबंधात नव्हे तर
तारणासाठी तो दुस-यांदा दिसेल.
शुभवर्तमान: मार्क १४: १२-१६, २२-२६
आपल्या शिष्यांबरोबर वल्हांडणाचे
भोजन करण्याची येशूची उत्कट इच्छा होती. भोजन कोठे करायचे ते त्याने सांगितले व
आज्ञा दिल्या. तो आपला जीव खंडणी म्हणून अर्पिण्यास सिद्ध झाला होता. तो काय करणार
होता त्याचे स्मरण त्याच्या शिष्यांनी सदोदित ठेवावे म्हणून त्याने हे भोजन स्थापले (१
करिंथ ११:२३-२६). त्याचे शरीर त्याने अर्पिले. त्याच्या रक्ताच्याद्वारे नवा करार
केला गेला. त्याच्या कृतज्ञतेचे स्मरण आपण करावे व त्याची प्रीती आपणास मिळावी
म्हणून तो म्हणतो, ‘हे माझ्या आठवणीसाठी करा’ म्हणून लोकांच्या पापासाठी प्रतिदिनी
यज्ञ करणे योग्य नाही कारण त्याने स्वतःला अर्पिल्याने ते अर्पण एकदाच अनंतकालीन परिपूर्ण
असे बनले आहे.
बोधकथा:
१. संत अंतोनी (११९५-१२३१) ह्यांची साक्रामेंतावर अढळ अशी श्रद्धा होती व
त्यामुळे त्याच्या श्रद्धेमुळे अनेक चमत्कार घडत असत.
बोनोनीला नावाच्या एका व्यक्तीने संत अंतोनीस त्याच्या
श्रद्धेमुळे डिवचले व जे लोक विश्वास ठेवत असत त्यांचीही निंदानालस्ती केली. संत
अंतोनी बोनोनिलो म्हणाले, ‘तू जरी विश्वास ठेवत नसलास तरी तुझे गाढव ठेवते व ते
सिद्ध करण्यासाठी बोनोनिलोने अंतोनीस पाचारण केले.
ठरल्याप्रमाणे बोनोनिलोने आपले
गाढव आणले. त्याने ते दोन दिवस उपाशी ठेवले होते. तसेच भरपूर चारा ठेविला होता
जेणेकरून गाढव साक्रामेंताकडे पाहणारही नाही. परंतु जेव्हा त्या मुक्या प्राण्याने
साक्रामेंत पाहिले तेव्हा त्याने जवळ जाऊन वाकून बसले व वंदन केले. तसेच
बोनोनिलोलाही त्या साक्रामेंतात प्रभू येशूचे दर्शन घडले.
संत अंतोनी ह्यांनी मिस्साबालीदानामध्ये
हजर असलेल्या प्रभू येशूवर अपार प्रीती केली व त्यानी प्रभूविषयी सर्वांना
सांगण्यासाठी आपल्या आयुष्यात प्रयत्न केला.
२. आब्राहाम लिंकन ह्याची निघृण आणि भ्याड हत्येनंतर त्याच्या अंतयात्रेला
जनसागर उसळला होता. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी दूरदूरवरून आलेल्या अनेक
लोकांत एक आई व मुल होते. गर्दीमध्ये आपल्या बाळाने आब्राहाम लिंकन ह्यांना पहावे
म्हणून त्या आईने आपल्या छोट्या मुलाला खांद्यावर पकडले होते. आब्राहाम लिंकन ह्यांना
पाहिल्यावर त्या बाळाने आईस विचारले, ‘आई कोण आहे ही व्यक्ती?’ त्याची आई
उद्गारली, ‘बाळा, नीट बघून घे त्या व्यक्तीने आपल्याला स्वातंत्र्य मिळावे म्हणून
स्वतःचे बलिदान दिले’.
ख्रिस्ताने आपल्यासाठी स्वतःच्या
जीवाचे बलिदान केले. त्याचे स्मरण आपण करावे व देवपित्याची उत्तम लेकरे बनावी
म्हणून ख्रिस्त ह्या जगात आला.
मनन चिंतन:
अ) पूर्वी लोकांची
अशी श्रद्धा होती की, माणसाचे जीवन हे त्याच्या रक्तात असते. त्यामुळे ते कुठल्याही
मांसाचे रक्त प्राशन करत असत. रक्त हे त्यांच्यासाठी पावन होते. त्यामुळे रक्ताचे
अर्पण केल्यावर देव प्रसन्न होतो अशी त्याची श्रद्धा होती. त्यामुळे पशुबळी दिले
जात असत आणि त्यासाठी अनेक कारणे असत.
१) देवाला प्रसन्न करून अनिष्टापासून टाळण्यासाठी.
२) देवाकडून काहीतरी मागण्याच्या हेतूने उदा. पाऊस
३) व तसेच दिलेल्या वरदानांमुळे देवाचे आभार मानण्यासाठी उदा. चांगलं पीक
आल्यामुळे, ते विविध देवांना रक्त सांडून यज्ञ करीत असत. हे सर्व करण्यासाठी
लोकांनी याजक नेमलेले असत.
ब) तसेच कुठलाही करार करण्यासाठी रक्त सांडले जात असे. दोन व्यक्ती कुठलाही
करार करण्याअगोदर आपल्या बोटातून थोडं रक्त सांडून ते मिसळत व करार झाल्याचे साध्य
होत असे.
आजच्या वाचनात आपण ऐकतो की, मोशेने
देवाबरोबर करार करून घेण्यासाठी प्राण्यांचा बळी देऊन त्यांचे रक्त शिंपडले ते
प्राणी निरागस असे.
तसेच शुभवर्तमानात आपण ऐकतो की,
प्रभू स्वतःला समर्पण करतो. ख्रिस्त स्वतः सार्वकालिक जीवन देणारा होता. हे जीवन
त्याच्यावर विश्वास ठेऊन प्राप्त होते. सार्वकालिक जीवन जगाला देता यावे यासाठी
ख्रिस्ताला वधस्तंभावर मरण पत्करावे लागले, त्याचा देह वधस्तंभावर खिळला गेला.
त्याचे रक्त बहुतांच्या खंडणीसाठी त्या वधस्तंभावर वाहण्यात आले.
अर्पणाच्या कोकराचा वध केल्यावर ते
रक्त वेदीच्या सभोवती ओतीत व कोंकराचा देह सेवन करीत; ‘सेवन करणे’ आणि ‘पिणे’ हे
उद्गार ख्रिस्ताच्या मरणाद्वारे तो जे सार्वकालिक जीवन देऊ शकणार होता याचे सूचक
आहेत. या अर्थाने जो ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन मिळते.
ख्रिस्ती धर्मात मिस्साबलीदानाला
अतिशय महत्व आहे. ख्रिस्ती लोकांसाठी मिस्साबलीदानातून जीवनासाठी आवश्यक असलेले
दान मिळते व श्रद्धा बळकट होऊन आध्यात्मिक जीवनात वाढ होते आणि त्यामुळेच
ख्रिस्तसभेत ख्रिस्ताच्या अतिपवित्र शरीराचा व रक्ताचा सण आपण साजरा करतो. ह्या
सणाची सुरुवात सर्वप्रथम बेल्जियम ह्या देशात झाली. पोप उर्बन चौथे ह्यांनी
संपूर्ण कॅथलिक देऊळमातेत हा सण साजरा करण्यास सातशे वर्षापूर्वी सुरुवात केली.
भाकररूप ख्रिस्त शरीर हे ख्रिस्ती
धर्मातील एक महान रहस्य आहे. रासायनिक प्रयोग शाळेत जे सिद्ध करता येत नाही ते
आपल्याला आत्मिक प्रेरणेने त्याचे अस्तित्व मान्य करावे लागते ह्यालाच ख्रिस्ती
श्रद्धा म्हणतात. ख्रिस्ताचे आपल्याला दिव्य दर्शन घडावे, आपले आत्मिक पोषण
व्हावे, त्याच्या मायेचा ओलावा आम्हांला सदैव मिळावा, त्याची आम्हांला नित्य सोबत
लाभावी म्हणून ख्रिस्त भाकररूप बनला. भाकररूपी ख्रिस्त आपल्या दृष्टीच्या पलिकडे
आपल्या स्पर्शाच्या पलिकडे, आपल्या इंद्रियांच्या पलिकडे आहे तरी आपली श्रद्धा आहे
की, भाकर ही ख्रिस्त-शरीर आहे. ‘ग्रहण इंद्रिया ही हो गुढ, गोचर केवळ श्रद्धेला’
इंद्रियाला गुढ आणि बुद्धीला अगम्य असलेल्या ख्रिस्ताचे हे शरीर आम्ही श्रद्धारुपी
डोळ्यांनी पाहत आहोत. आज आपण ख्रिस्ताच्या अतिपवित्र शरीराचा व रक्ताचा सण साजरा
करीत असताना आपण त्याचा स्वीकार करण्यास आणि त्याच्याशी एकजीव होण्यास पात्र ठरावे
म्हणून प्रार्थना करूया.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभो, तुझ्या शरीर व रक्ताद्वारे आमचे नितांत पोषण कर.
१. ख्रिस्तसभेची धुरा वाहणारे पोप फ्रान्सीस, कार्डीनल्स, बिशप्स, फादर्स,
सिस्टर्स, ब्रदर्स व इतर प्रापंचिक या सर्वांवर देवाचा विशेष आशिर्वाद यावा व
त्यांना त्यांच्या पवित्र कार्यात प्रभूचे मार्गदर्शन व कृपा मिळावी म्हणून आपण
प्रार्थना करूया.
२. आपल्या देशातील सर्व नेत्यांवर व अधिका-यांवर परमेश्वराचा आशिर्वाद असावा,
त्यांना सत्याने आणि न्यायाने राज्यकारभार करण्यास परमेश्वराने मदत करावी तसेच सर्व
वाईट वृत्तींपासून त्यांना दूर ठेवून
चांगल्या मार्गावर चालण्यास सहकार्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. ख्रिस्ताच्या मळ्यात कार्य करण्यासाठी आपल्या परिसरातील अनेक तरुण-तरुणींना
पुढे येण्यास पवित्र आत्म्याची प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. आज हा पवित्र सण साजरा करीत असताना आपण आपल्या शरीररूपी मंदिरात देवाला
प्रथम स्थान द्यावे व आपले जीवन त्याच्याठायी समर्पित करावे, म्हणून आपण प्रार्थना
करूया.
५. आपल्या धर्मग्रामात जे दु:खीत, पिडीत आहेत, तसेच जे असाध्य आजाराने
पछाडलेले आहेत त्यांना परमेश्वरी कृपेचा अनुभव यावा व नवजीवनाची वात त्यांना
दिसावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
६. आपण आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक हेतूंसाठी थोडावेळ शांत राहून
प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment