Friday 12 June 2015

 Reflections for Homily By: Manuel Fernandes


सामान्य काळातील अकरावा रविवार


दिनांक: १४/०६/२०१५
पहिले वाचन: यहेज्केल. १७:२२-२४
दुसरे वाचन: २ करिंथ  ५: ६-१०
शुभवर्तमान: मार्क ४: २६-३४

प्रस्तावना
आज आपण सामान्य काळातील अकरावा रविवार साजरा करीत आहोत. आजच्या पहिल्या वाचनात यहेज्केल संदेष्ट्याद्वारे देव म्हणतो की, ‘मी निचास उंच व जे स्वत:ला उंच असे मानतात त्यांना नमविल’. दुसऱ्या वाचनात संत पौल करंथिकरास पाठवलेल्या दुसऱ्या पत्रामध्ये, ‘श्रद्धेच्या मार्गदर्शनाने आम्ही धैर्याने वागतो आणि प्रभूला संतोषविणे हेच आमचे ध्येय होय’ असे म्हणतो. तर संत मार्कलिखित शुभवर्तमानात येशू देवराज्याची तुलना ‘मोहरीच्या बी’ बरोबर करतो. मोहरीचे बी दिसण्यात जरी लहान असले तरी रुजल्यानंतर ते सर्व झाड्पाल्यांमध्ये मोठे होते आणि त्याच्या सावलीत पक्षांना बसण्यास आसरा मिळतो.
 मोहरीचा दाणा खूपच लहान असतो परंतु तो रुजला, वाढला आणि त्याचे वृक्षात रुपांतर झाले तर अनेकांच्या आश्रयाचे ते आशास्थान बनते. आपण जर परमेश्वराचे वचन ग्रहण केले व त्याचा अंकुर जर आपल्या जीवनात वाढत गेला तर आपले जीवन परमेश्वराच्या असंख्य कृपादानांनी बहरू शकते. म्हणून त्यासाठी लागणारी विशेष कृपा ह्या मिस्साबलीत मागुया व प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:
पहिले वाचन: यहेज्केल: १७:२२-२४
     यहेज्केल संदेष्ट्याद्वारे सांगण्यात आलेला देवाचा संदेश समजण्यासाठी या मागची पार्श्वभूमी जाणून घेणे योग्य ठरेल. शलमोन राजा कालवश झाल्यानंतर दोन राज्यांची स्थापना करण्यात आली. त्यापैकी एक म्हणजे इस्रायल होय; परंतु त्याची यहेज्केल असतांना धूळधाण करण्यात आली होती.
     येशू येण्याच्या ६०० वर्षापूर्वी, बाबीलोन शहराचा राजा नेबुकदनेझर ह्याने येरुशलेम शहर धुळीस मिळविले आणि त्या शहराचा राजा जेहोयाकिम ह्याला त्याच्या प्रजेसह बंदिस्त केले. नंतर नेबुकदनेझर ह्याने स्वत:चा गौरव करवून घेण्यासाठी झेदेकीया याची राजा म्हणून तेथे नियुक्ती केली. यिर्मया संदेष्टा त्याकाळात जिवंत होता, त्याला त्या शहरात राहण्यासाठी राजाकडून काहीही हरकत नव्हती. देवाने यिर्मया संदेष्ट्याद्वारे येरुशलेम शहर वाचविण्यासाठी नेबुकदनेझर व झेदेकीयाने स्वत:ला बाबीलोनच्या राज्याला शरण यावे असे संदेश पाठविले.
     झेदेकीया राजाने हे सर्व संदेश धुडकावून लावले. तसेच त्याने इजिप्तच्या राज्याच्या बळावर नेबुकदनेझर राजाविरुद्ध बंद पुकारला. काही काळानंतर बाबिलोनवासियांनी जेरुसलेम शहरावर हल्ला चढवून त्यात असलेली देऊळे ह्यावर कब्जा मिळविला आणि राजाला कारावासात ठेविले. नेबुकदनेझरने झेदेकीया राजाच्या मुलांची कत्तल केली व राजाचे डोळे काढून त्याला आंधळे केले.
     साधारणत: हा इस्रायलचा अंत असायला हवा होता, कारण बाबीलोनचा राजा अतिशय बलशाली होता व त्याच्याकडून त्यांची सुटका होणे अशक्यच होते. ह्याच काळात परमेश्वराने यहेज्केल संदेष्ट्याद्वारे संदेश पाठविला. ह्या संदेशामध्ये झाडे व पक्षी म्हणजेच राज्य आणि त्यात वसणारी जनता.
            पॅलेस्टीन शहराच्या उत्तरेला असलेल्या पर्वतरांगांना ‘लेबनॉन’ असे म्हणतात. त्यावर उंच आणि सुंदर अश्या प्रतीचे झाड उगवते. त्या झाडापासून उत्कृष्ट लाकूड मिळते, त्यास ‘लेबनॉनचे गंधसरू’ म्हणून ओळखले जात. शलमोन राजाने हेच गंधसरू येरुशलेमचे मंदिर बांधण्यासाठी वापरले. यहोवाने संदेष्ट्याद्वारे सांगितले की, तो स्वत: गंधसरूच्या शेंड्यावरील एक डहाळी घेऊन ती लावील आणि त्याचे रुपांतर तो सुंदर व बलाढ्य अश्या झाडामध्ये होईल. ह्या झाडाच्या छायेखाली सर्व पशु पक्षी निवास करतील. हे झाड परमेश्वराच्या राज्याचे प्रतिक होय. सर्व राष्ट्रे ह्यात सहभागी होण्यासाठी तो आमंत्रण करतो.
     त्याचबरोबर कालांतराने ही सर्व राष्ट्रे एका मागोमाग नाश पावतील असे यहोवा म्हणतो; परंतु आपणास इतिहासातून कळते की, देवाचे राज्य सदा सर्वदा टिकेल, त्याचा कोणीही नाश करू शकत नाही.

दुसरे वाचन: २ करिंथ  ५: ६-१०
देवाकडे आपल्याला केवळ विश्वासाने जाता येते. पौल पुढे म्हणतो, शरीरापासून दूर जाऊन प्रभूसह गृह्वास करणे हे आम्हांस अधिक बरे वाटते कारण या स्थितीत प्रभूला नेत्रांनी पाहता येते, आता विश्वासाने त्याला पाहण्याची गरज नाही. ख्रिस्ताचे दुसरे येणे होण्यापूर्वीच पौल मरण पावला तर त्याला देहरहित अस्तित्वाचा अनुभव घ्यावा लागेल याची त्याला जाणीव असल्याचे येथे दिसते. पण ही देहरहीत अवस्था कशी असेल ह्याविषयी त्याने काहीच सूचित केलेले नाही.
अखेरीस आपल्या भावी अवस्थेविषयी अंदाज बांधणे महत्वाचे नाही, आपण कोणत्याही स्थितीत असले तरी तेथूनही देवाला निश्चयपूर्वक संतोष देत राहणे हेच महत्त्वाचे आहे. आपण सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर खऱ्या स्वरूपाने प्रगट झाले पाहिजे. त्यावेळी आपण प्रत्येकाला देहाने केलेल्या गोष्टीचे फळ मिळेल, मग ते बरे असो वा वाईट असो. देहाने केलेल्या गोष्टी म्हणजे या जीवनात कोणाही व्यक्तीने केलेले कृत्य असाच या संदर्भाचा अर्थ आहे. आमच्या सर्व कृत्याबद्दल आपण देवाला जबाबदार आहोत आणि योग्य असेल त्याप्रमाणे आम्हाला लाभ होईल किंवा हानी सोसावी लागेल.

शुभवर्तमान: मार्क ४: २६-३४
आमच्या अंतःकरणामध्ये देवाच्या राज्याची सतत शांतपणे वाढ होत असते हे आम्हाला पहिल्या दाखल्यातून सांगण्यात आले आहे. आपण चिंतातूर होऊन धडपड करण्याची काहीच गरज नाही. पेरलेले बी वाढून आपोआप फळ देईल. नैसर्गिक वाढीची प्रतिक्रिया आम्हाला समजत नाही. पण त्या वाढीत सहभागी होण्यासाठी ती समजून घेण्याची आम्हाला गरज नाहीच फक्त बीज अंकुरून वाढीस लागण्याच्या स्थितीत असणं मात्र गरजेचे आहे. पीक मिळण्याचे अभिवचन तर आहेच पण त्याबरोबर पवित्र शास्रात अनेकदा देवाच्या न्यायाची सूचनाही आहे.
दुसऱ्या दाखल्यामध्ये पुन्हा जवळजवळ लक्षात न येणारी वाढ आणि त्याचे आश्चर्यकारक परिणाम याचे वर्णन केले आहे. ‘मोहरीचे बी’ अगदी छोटे असते पण त्याची वाढ झाली की कालांतराने मध्यपूर्वेतील एक मोठ्यात-मोठया रोपात त्याची गणना केली जाते. देव-राज्याची वाढही अशीच असते. प्रारंभी ते अगदी अल्प वाटते पण अखेरीच त्याचाच जय होतो.

मनन चिंतन:
“स्वर्गराज्य मोहरीच्या दाणासारखे आहे.”
प्रभू येशू ख्रिस्ताने सर्वसामान्य लोकांना देवाची योजना आणि स्वर्गराज्याची शिकवणूक देताना साध्या व व्यवहारातील अनेक गोष्टीचे दाखले दिले. आजच्या शुभवर्तमानातील मोहरीच्या दाण्याचा दाखला खूपच प्रेरणादायी आहे. मोहरीचा दाणा खूपच लहान असतो परंतु तो रुजला, वाढला आणि त्याचे वृक्षात रुपांतर झाले तर अनेकांच्या आश्रयाचे ते आशास्थान बनते. आपण जर परमेश्वराचे वचन ग्रहण केले व त्याचा अंकुर जर आपल्या जीवनात वाढत गेला तर आपले जीवन परमेश्वराच्या असंख्य कृपादानांनी बहरू शकते.
आज आपण आपल्या जीवनावर मनन चिंतन करू या. आपल्या जीवनाला पोषक आणि प्रेरणादायी शब्द आपण लक्षपूर्वक ऐकतो का? आपल्या दररोजच्या आचरणाशी त्यांची सांगड घालण्याचा प्रयत्न करतो का? आपले जीवन खरोखरच परमेश्वराच्या आध्यात्मिक कृपादानांनी बहरत आहे का?
आपल्या जीवनात परमेश्वराला प्राधान्य दिलेले असेल तरच आपण त्याच्या कृपेचा अनुभव प्राप्त करू शकतो. प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःचे सर्वस्व अर्पण करून आपणा सर्वांचे तारण केले. प्रभू येशू ख्रिस्ताठायी आपण सर्वजण मोहरीच्या दाण्यासारखे आहोत. आपण जरी स्वतःला अपात्र समजत असलो; अनेक प्रकारच्या वाईट वर्तणुकीमुळे देवापासून दूर गेलेलो असलो तरीसुद्धा परमेश्वर आपल्यावर करुणामय दृष्टीने पाहतो. आपण देखील देवाचा म्हणजेच स्वर्गराज्याचा शोध घेतला पाहिजे.
देवाचे राज्य:
देवराज्यासंदर्भात प्रभू येशू ख्रिस्ताने आजच्या शुभवर्तमानात दोन दाखले सांगितले आहेत. जमिनीत बी टाकल्यावर शेतकरी त्याची मशागत करून निश्चींतपणे झोपतो. त्या बीजाला अंकुर कसा फुटतो व त्याचे रोपटे तयार होऊन त्याला कणीस कसे लागते हे शेतकऱ्याला कधीच कळत नाही. देवाने घातलेल्या निसर्गाच्या नियमानुसार सर्व काही घडत असते. आपण त्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही. देवाचे राज्य तसेच आहे. देवाच्या वचनाचा अंकुर माणसाच्या जीवनात वाढत जातो आणि माणूस देवाच्या आधीन असल्यामुळे देवराज्याच्या दिशेने आपोआप वाटचाल सुरु करतो.
प्रभू येशूने सांगितलेला दुसरा दाखला मोहरीच्या दाण्याचा आहे. अगदी लहान असलेला मोहरीचा दाणा हळूहळू वाढत जातो व त्याचे रुपांतर मोठया वृक्षात होते. आज आपण पाहत आहोत की देवाच्या वचनावर श्रद्धा ठेऊन ख्रिस्तसभेचा पाया अशाच बारा प्रेषिताच्या सहाय्याने उभा राहिला. आज त्याचे महावृक्षात रुपांतर झाले. देवाचे राज्य छोटयाशा कृतीद्वारे सुरु होते व देवाच्या योजनेप्रमाणे ते बहरते व फलद्रूप बनते.
आपल्या जीवनात देवराज्याचा अंकुर वाढवा म्हणून विश्वासाने आपण आपले सर्वस्व देवाच्या हातात सोपवू या. श्रद्धेने त्याच्या कृपेवर अवलंबून राहू या. आपली छोटीशी कृती मग ती प्रार्थना, उपासना, भक्ती व सेवा अशा माध्यमातून जर सुरु झाली तर देवाच्या योजनेप्रमाणे विशाल स्वरूप धारण करू शकते. आमेन.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभो आमची प्रार्थना ऐक.
  1. आपले परमगुरुस्वामी, महागुरूस्वामी व सर्व कार्यकर्त्यांना परमेश्वराचा स्पर्श व्हावा व प्रभूच्या प्रेमशांतीचा संदेश त्यांनी सर्वत्र पसरावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
  2. जे आजारी आहेत त्यांना चांगले आरोग्य, जे दुःखी आहेत त्यांचे दुःख दूर व्हावे व जे एकटे आहेत अशांना प्रभूप्रेमाचा सहवास मिळावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
  3. जे तरुण-तरुणी देवापासून दूर जाऊन अंधारात भरकटत आहेत, त्यांना प्रभूच्या प्रकाशात मार्गक्रमण करावे व जागतिक मोह सोडून प्रभूच्या प्रेमाकडे वळावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
  4. जे लोक दुःखी-कष्टी व बेरोजगार आहेत अशांना देवाने त्यांच्या योग्यतेप्रमाणे चांगले काम दयावे व त्यांच्यावर असलेली त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी पूर्ण करता यावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
  5. आता थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, सामाजिक गरजांसाठी देवाकडे प्रार्थना करूया.

No comments:

Post a Comment