Thursday, 25 June 2015


Reflection for Homily By : Wicky Bhavigar





सामान्य काळातील तेरावा रविवार




दिनांक: २८/०६/२०१५.
पहिले वाचन: शलमोनाचा ज्ञानग्रंथ: १: १३-१५.
दुसरे वाचन: करिंथकरांस दुसरे पत्र : ८:७-९,१३-१५.
शुभवर्तमान: मार्क ५:२१-४३.

             ‘प्रभूचे सामर्थ्य ओळखा व त्याच्यावर विश्वास ठेवा’ 
  

प्रस्तावना:
आज आपण सामान्यकाळातील तेरावा रविवार साजरा करीत आहोत. आजच्या उपासनेचा मुख्य विषय ‘प्रभूचे सामर्थ्य ओळखा व त्याच्यावर विश्वास ठेवा’ आहे. आजच्या तिन्ही वाचनात आपण ऐकतो कि, वेळोवेळी मानव देवापासुन बहकला परंतु देवाने मानवाला पुन्हा आपल्या जवळ आणले. अनेक प्रकारच्या संकटांतून, अडीअडचणींतून देवाने मानवाचा बचाव केला आणि त्याला आपल्या करुणेचा व मायेचा स्पर्श दिला. आजच्या शुभवर्तमानात येशु एका रोगग्रस्त स्त्रीला तिच्या बऱ्याच दिवसापासून जडलेल्या व बऱ्या न होणाऱ्या रोगातून मुक्त करतो.
आपल्याही जीवनात सर्वकाही सुरळीत चालण्यास आपल्याला प्रभूच्या स्पर्शाची गरज आहे. ह्या मिस्साबलीत सहभागी होत असताना आपण प्रभूकडे क्षमेची याचना करूया आणि त्याच्या कृपेचा वर्षाव आम्हावर व्हावा म्हणून प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:
पहिले वाचन
आजच्या पहिल्या वाचनामध्ये म्हटले आहे की, सर्व अधिकार मानवाकडे नसून प्रभूयेशुकडे सोपविले आहे. म्हणूनच येशूने त्याच्या पवित्र सामर्थ्याने सर्व गोष्टींना अस्तित्व असावे म्हणून त्या निर्माण केल्या आहेत. देवापासून दूर झाल्याने आपण पापांमध्ये जगत असतो. पण येशू ख्रिस्त त्याच्या पवित्र सामर्थ्याने आणि अधिकाराने मृत्युच्या पाशातून आपल्याला सोडवितो.

दुसरे वाचन
     आजच्या दुसऱ्या वाचनात सांगितले आहे की, आपल्या प्रभूयेशुच्या सामर्थ्याविषयी भरपूर विचार करा. कारण तो संपत्तीने, सामर्थ्याने, सन्मानाने, स्वर्गीय सुखाने धनवान व संपन्न होता. पण तो इतरांच्या भल्यासाठी जगाला व शेवटी स्वताचा प्राण आपणासाठी दिला.

शुभवर्तमान: मार्क ५:२१-४३. 
      आपण शुभवर्तमानात पाहतो की, मनुष्याच्या मनाचा व व्यक्तिमत्त्वाचा नाश करीत असलेल्या अशुद्ध आत्माला काढण्याच्या येशूच्या सामर्थ्याचा लोकांनी अनुभव घेतला. त्याने एका रोगग्रस्त स्त्रीला बरे केल्याने असाध्य रोग बरे करण्याच्या त्याच्या सामर्थ्याची त्यांना प्रचीती आली. तसेच त्याने मृत मुलीला उठविल्याने मृतांनाही जीवन देण्याच्या सामर्थ्याचा त्यांना अनुभव आला.
अ)   रोग किंवा आजार – आजार हा हळूहळू नाश करणारा व अत्यंत हाल करणारा शत्रू आहे (२५, २६). त्या गरीब बाईने वैद्याच्या हातूनही उपचार करून घेतले होते तरी ती बरी झाली नव्हती. अशा व्यक्तीला सभास्थानात जाण्याची परवानगी नव्हती (लेवीय १५:२५-२७). सर्व मानवी प्रयत्न व्यर्थ ठरले होते.
     अश्यावेळी ती स्त्री कसलाही गाजावाजा न करता ख्रिस्ताकडे विश्वासाने आली. ख्रिस्तच तिचा रोग दूर करण्यात समर्थ होता, याची तिला पूर्ण खात्री होती. त्याने तिचा विश्वास ओळखला व तिला रोगमुक्त केले. ख्रिस्ताने जे केले होते, त्याची साक्ष देण्यास त्याने तिला धैर्य दिले (३३) व तिला शांतीने आपल्या समाजात साक्ष देण्यास पाठविले.
ब) मरण: सभास्थानाचा अधिकारी आपल्या मुलीला मरणापासून सोडवू शकत नव्हता. मरण अटळ आहे. ते कायमचे दूर करते. ते दुःखात लोटते. ते आशाहीन बनविते व देवापासून दूर करते. पापामुळे मानव नरकाकडे चालला आहे. हे दुसरे मरण आहे (प्रकटी २१:८; २०:१४,१५). येशूच्या आज्ञेमुळे, ती मुलगी वस्तुतः तीच बारा वर्षाची आहे, भूत नव्हे! हे समजून येण्यास व त्याचे भय नाहीसे होण्यास कशी मदत झाली.
प्रभुने काय केले: मुलीच्या मृत्यूची बातमी ऐकून तिचा बाप किती दुःखी व निराश झाला असेल. तरी प्रभुने त्याला धीर दिला व स्वतःवर विश्वास सांगितले (३६). प्रभूने त्याला ते सत्य सांगितले (३९). प्रभूने आपल्या अधिकाराने त्या मुलीला मुक्त केले (४१, ४२) त्याने त्या मुलीची गरज ओळखली (४३). ख्रिस्ताने मरणावर विजय मिळविला आहे. तो नरकापासून मुक्त करणारा आहे (योहान ५:२४, रोम ६:२५). मरणातून मुक्त झालेल्याची नावे पुस्तकात लिहिली जातात.

मनन चिंतन:
प्रभूचे सामर्थ्य ओळखा व त्याच्यावर विश्वास ठेवा(१-६).
     नासरेथचे लोक प्रभू येशूला सुतार, मारीयेचा मुलगा, आमच्यापैकी एक गरीब व अशिक्षित असे मानीत होते. तो थोर देवही होता हे त्याने आपल्या कृत्यांनी प्रगट केले होते. तो ज्ञानाने परिपूर्ण होता. तरी त्यांनी आपला दृष्टीकोन बदलला नाही(३). त्यांचे विचार सत्याला धरून नव्हते(४). ते ख्रिस्ताला मान देत नव्हते(योहान ७:१५-१७) व सत्य स्वीकारण्यास नम्र नव्हते(४) हा त्याचा अविश्वास होता. आजच्या शुभावर्तमानात प्रभू येशु रोगग्रस्त स्त्रीला बरे करितो व खऱ्या देवाराज्याची सुवार्ता पसरवितो. आपण त्याचा आरोग्यदायी स्पर्श अनुभवासाठी त्याचे देवत्व व सामर्थ्य विश्वासाने स्वीकारायला हवे. आज आपण पाहीले तर तोच प्रभू येशु सर्वासाठी शारिरीक, मानसिक व आत्मिक आरोग्यादानाचा वर्षाव करीत असतो. त्याच्या स्पर्शात तारण व जीवन आहे. त्याच्या वचनात जीवनाची परिपूर्ण आहे. तो करुणेचा आणि ममतेचा झरा आहे. प्रभू येशु केवळ आमचा आरोग्यादातच नव्हे तर सामर्थ्यशाली देव आहे. ह्या येशूवर पूर्ण विश्वास ठेवून त्याला आपले संपूर्ण जीवन समर्पित करुया. ह्या घडलेल्या चमत्काराद्वारे अनेक संदेश आपल्याला घेता येतात. येशुवरील श्रद्धेत बळकट असलेल्या माणसाच्या प्रार्थनेला उत्तर मिळते. आपल्या प्रार्थनेने इतरांच्या जीवनात परिवर्तन घडू शकते. प्रभू येशु आपल्या पापाची क्षमा करणारा देव आहे.
     समाजाने बहिष्कृत ठरवलेला व अस्पृश्य मानल्या गेलेल्या स्त्रीला येशूचा स्पर्श झाला व तिचा रोग अदृश्य झाला. समाजात सन्मानाने जीवन जगण्याची आशा तिलाच नव्हे तर इतरांच्या मनात सुद्धा निर्माण करावी लागेल. प्रभू येशूमुळे असंख्य आजारी व अपंग लोकांना आरोग्यादन मिळाले. प्रभू येशुचा स्पर्श आजसुद्धा तितकाच प्रभावी व गुणकारी आहे. ह्या सामर्थ्यशाली प्रभू येशूच्या कृपेचा, करुणेचा व प्रेमाचा स्पर्श आपल्या प्रत्येकाला व्हावा म्हणून एकमेकांसाठी प्रार्थना करुया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे सामर्थ्यशाली प्रभू आमचा विश्वास मजबूत कर.
  1. अखिल ख्रिस्तसभेची धुरा वाहणारे आपले पोप महाशय, सर्व कार्डीनल्स, बिशप, धर्मगुरू व धर्माभागिनीसाठी प्रार्थना करूया की, जेणेकरून त्यांनी आपल्या श्रध्येत दृढ व्हावे व प्रभूच्या लोकांचे परिवर्तन करावे.
  2. आपल्या सर्व राजकीय नेत्यांनी आपला राजकीय धूर्तपणा सोडून निस्वार्थीपणे लोकांची व देशाची सेवा करावी, म्हणून आपण प्रार्थना करूया.
  3. जे आजारी आहेत अश्या सर्वांना सदृढ, शारीरिक व मानसिक आरोग्य लाभावे व त्याचे सांत्वन व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
  4. जे कोणी देवापासून दूर गेले आहेत त्याच्यासाठी प्रार्थना करू या, जेणेकरून त्यांनी मागे वळून परत एकदा सामर्थ्यशाली येशूला आपला देव म्हणून स्वीकारावे व आपले संपूर्ण जीवन प्रभूची सुवार्ता पसरविण्यासाठी समर्पित करावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.
  5. आपण आपल्या वैयक्तिक गरजांसाठी शांतपणे प्रार्थना करूया. 

1 comment:

  1. Very nice reflection. Keep it up! Fr. Ajit Tellis

    ReplyDelete