Reflections for Homily By: Xavier Patil
सामान्याकाळातील पंधरावा रविवार
दिनांक: १२ /०७/२०१५
पहिले वाचन: आमोस ७:१२-१५.
दुसरे वाचन: इफिसिकारंस पत्र
१:३-१४.
शुभवर्तमान: मार्क ६:७-१३.
प्रस्तावना:
आज आपण सामान्यकाळातील पंधरावा
रविवार साजरा करीत आहोत. ख्रिस्ती जीवन हे शिष्यत्वाचे जीवन आहे म्हणूनच आजच्या
उपासनेतील तीनही वाचने आपणाला देवाच्या सुवार्तेचा प्रसार करण्यास पाचारीत आहेत.
आजच्या पहिल्या वाचनात आमोस
संदेष्ट्याला देवाने त्याची सुवार्ता इस्रायल लोकांना घोषित करण्यास पाचारण केले.
दुसऱ्या वाचनात संत पौल इफिसिकरांस पत्र लिहून आपणास ईशस्तवन म्हणजेच देवाचा गौरव
आणि स्तुती करण्यास आमंत्रित करीत आहे. तर शुभवर्तमानात येशू ख्रिस्त त्याच्या
शिष्यांना प्रेषितीय कार्य करण्यास जोडी-जोडीने पाठवतो.
आज येशू ख्रिस्त आपणाला देखील त्याची सुवार्ता इतरांपर्यंत
पोहचवण्यास बोलावीत आहे. म्हणून येशूच्या मिशन कार्यामध्ये हातभार लावण्यास आपणाला
त्याची कृपा व शक्ती मिळावी म्हणून आपण ह्या मिस्साबालीमध्ये प्रार्थना करून
त्याच्या कृपेची याचना करूया.
सम्यक विवरण:
पहिले वाचन: आमोस ७:१२-१५
पहिल्या वाचनात अमासिया, आमोस ह्या संदेष्टाला त्याच्या देशात परत जाण्यास
सांगतो कारण शलमोन राजाच्या मरणाअगोदरच इस्रायलची दोन भागांमध्ये विभागणी झाली
होती; यहुदी आणि इस्रायल.
आमोस हा यहुदिया प्रांतातून इस्रायल प्रांतात देवाची सुवार्ता
पसरविण्यासाठी आला होता. पण आमोस अमासियाला सांगतो की, मी स्वतःहून आलो नाही, तर
देवाने मला त्याची सुवार्ता सांगण्याकरिता पाठविले आहे.
आमोस इस्रायल प्रांतात पैसा किंवा संपत्ती मिळवण्यासाठी आला नव्हता;
कारण मेंढपाळ म्हणून तो त्याच्या उद्योगात आनंदी होता. आमोस हा उपदेशक नव्हता,
अर्थात संदेष्टा बनणे हे त्याच्या विचारापलिकडचे होते, परंतु देवाने त्याला पाचारण
केले आहे असे तो ठामपणे सांगतो व देवाचा संदेश देत इस्रायलच्या काना कोपऱ्यात
फिरला. इथे आमोसाचे उदाहरण लक्षणीय आहे.
दुसरे वाचन: इफिसिकारंस पत्र
१:३-१४.
संत पौल इफिसकरांस ईश्वरस्तवन करण्यास सांगतो, कारण देवाने आपणा
सर्वांना येशूच्या रक्ताने त्याची लेकरे (दत्तक) म्हणून विकत घेतले आहे. अर्थात
ख्रिस्तामध्ये आपण देवाच्या पवित्र आत्माचे वतनदार झालो आहोत. आणि देवाचा कृपाशिर्वाद
आपणावर सदैव हजर आहे. पुढे संत पौल म्हणतो की,
ज्या ख्रिस्तावर आपण पूर्वीपासून आशा ठेवली आहे, त्या येशूचा गौरव आणि महिमा करणे
गरजेचे आहे.
आपण ऐकलेल्या सुवार्तेवर विश्वास ठेवला पाहिजे आणि त्याचा प्रचार
करण्यासाठी हातभार लावला पाहिजे. ख्रिस्ताने आपणावर पवित्र आत्मा पाठवून शिक्का
मारला आहे. ख्रिस्तामुळेच आपणाला मुक्ती मिळाली आहे.
शुभवर्तमान: मार्क ६:७-१३
अविश्वास असला तरीही सुवार्ताप्रसाराचे कार्य पुढे चालू ठेवणे
आवश्यक होते, म्हणून येशूने बारा जणांना या कामगिरीवर पाठवले. प्रेषितांनी बरोबर
काय घ्यावे, कोणती वस्त्रे घालावी वैगेरे तपशिलातल्या वर्णनात शुभवर्तमानात किंचित
फरक आहे पण ते तेवढेसे महत्त्वाचे नाही. “प्रवासात जास्त ओझे घ्यायचे नाही” हे
सूत्र सर्वांनीच एकमुखाने सांगितले आहे. सुवार्ताप्रसाराचे कार्य शिरावर घेतलेल्या
व्यक्तींनी अन्नपाणी, मुक्कामाची जागा वैगेरे गोष्टींची उगाच चिंता करू नये.
आपल्यावर सोपवलेली कामगिरी अतिमहत्त्वाची आहे, त्यात श्रोत्यांच्या जीवन मरणाचा
प्रश्न गुंतला आहे हे त्यांनी कायम मनात बाळगिले पाहिजे. यहुदी लोक परक्या ठिकाणी
गेले तर तेथून परताना अनेकदा तिकडची धूळ तिकडेच झटकून टाकीत. पण या प्रसंगी
त्यांनी सुवार्ता नाकारल्याचे चिन्ह, रीतसर साक्ष म्हणून ते करायचे होते.
या बारा जणांना येशूने भुते
काढण्याचे सामर्थ्य दिले. तथापी सुवार्तेची घोषणा करणे हेच त्यांचे मुख्य कार्य
होते हे आपणाला बाराव्या ओळीमध्ये दिसते. “ते तेथून निघाले व लोकांनी पश्चाताप
करावा अशी त्यांनी घोषणा केली.” ह्या घोषनेतूनच भुते काढणे व आजाऱ्यांना बरे करणे
ही कार्य होतात. तेलाभ्यंग करणे हे येथे प्रतीकात्मक आहे.
बोधकथा:
१) एके दिवशी असिसिचा
फ्रान्सीस ह्या महान संताने त्याच्या शिष्याला म्हटले की, आज आपण शहरात जाऊन
ख्रिस्ताचा शुभसंदेश प्रचार करून येऊ! शिष्य फार आनंदी झाला, कारण संत फ्रान्सीसबरोबर
शहरामध्ये जाण्याची सुवर्णसंधी त्याला लाभली होती. ते मठवाश्यांचा पोशाख घालून
बाहेर पडले आणि सर्व शहरामध्ये फिरले.
सायंकाळी त्यांच्या आश्रमात परतल्यानंतर त्या शिष्याने
फ्रान्सिसला विचारले, “आज आपण देवाचा संदेश शहरामध्ये पसरवणार होतो ना? पण आपण
एकही शब्द वापरलेला नाही. अर्थात आपण देवाचा उपदेश केलाच नाही”! ह्यावर संत
फ्रान्सिस हसत म्हणाला, ‘भक्तीभाव हाच खरा उपदेश होय. आपण आपल्या शब्दांनी नव्हे
तर आपल्या जीवनाद्वारे ख्रिस्ताचा प्रचार केला आहे’.
फ्रान्सिसने आपल्या जीवन आचरणाने
द्या, प्रेम व ईश्वर स्तवनाचा उपदेश केला. त्याच्या स्वत:च्या जीवनाद्वारे
त्याच्या शिष्यांना परिवर्तन करून क्षमा, शांती आणि प्रेमाच्या मार्गाचा उपदेश
करण्यास सांगितले. आपण आपल्या शब्दांद्वारेच नव्हे तर आपल्या कृतीद्वारे देवाचा
संदेश इतरांना देऊ शकतो.
२.
देवाच्या सुवार्तेचे पालन करा.
रामपूर नावाचे एक गाव नदीच्या काठावर उभारलेले होते. ह्या
गावामध्ये एक म्हातारी राहत होती. ती फार दयाळू, प्रेमळ आणि आदर्श जीवन जगत होती.
देवावर तिचा फार विश्वास होता. काही वर्षानंतर त्या नदीला पूर आला आणि गावामध्ये
पाणी शिरायला लागले. हळूहळू घरामध्ये पाणी यायला लागले म्हणू सर्वजण जीव
वाचवण्यासाठी गावापासून दूर गेले. पण म्हातारीने गाव सोडण्यास नाकारले कारण तिचा
देवावर असा ठाम विश्वास होता की, देव स्वत: तिला वाचवील.
थोड्या वेळानंतर आर्मीतील सैन्य येऊन म्हातारीला वाचवण्याचा
प्रयत्न करतात पण ती नाकारते कारण ती देवाची वाट पहात असते. हळूहळू पाणी
कमरेपर्यंत पोहचले मग नौदलातील सैन्य बोटीद्वारे म्हातारीला वाचवण्यास येतात
पुन्हा ती नाकारते. आत्तातर पाणी गळ्यापर्यंत पोहचले होते म्हणून हवाईदल
विमानाच्या सहाय्याने म्हातारीला वाचवण्यास येतात पण पुन्हा ती त्यांच्याबरोबर
जाण्यास नाकारते आणि शेवटी पाण्यात बुडून मरण पावते. जेव्हा तिचा आत्मा स्वर्गात
जातो. तेव्हा ती नाराज होऊन देवाला प्रश्न विचारते, ‘तू मला वाचवण्यास का आला
नाहीस’? देवाने तिला सांगितले, की, ‘मी तुझ्यावर खूप करतो म्हणून तीन वेळा मी तुला
वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु तू तीन वेळा मला नाकारलेस’.
उपदेशकांच्याद्वारे देवाचा संदेश जे नाकारतात
त्यांचीही दुर्दशा ह्या म्हातारी सारखी होते.
मनन चिंतन:
प्रिय भाविकांनो मिशनकार्य हा आपल्या धर्मग्रामाचा मुलभूत घटक
आहे म्हणून प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती, मग तो व्रतस्त असो किंवा प्रापंचिक, आपण
सर्वांनी येशू ख्रिस्ताचे मिशनकार्य पुढे चालू ठेवण्यास हातभार लावला पाहिजे.
येशू ख्रिस्त, जो देवाचा एकुलता एक पुत्र होता, त्याला
देखील देवाने ह्या धरतीवर मिशनकार्य करण्यासाठी पाठवले होते. हेच कार्य पुढे चालू
ठेवण्यासाठी येशू बारा शिष्यांची निवड करतो. हे बारा शिष्य उच्च पदाचे नव्हते तर
साधारण जीवन जगणारे आपल्यासारखेच सामान्य लोक होते. म्हणून येशू ख्रिस्त स्वतः
त्यांना मिशनकार्य कशा प्रकारे करावे हे त्याच्या स्वत:च्या चालण्या-बोलण्यातून
शिकवितो. हेच दृष्य आपणाला आजच्या शुभवर्तमानामध्ये पाहायला मिळते.
येशू ख्रिस्त जेव्हा त्याच्या शिष्यांना जोडी-जोडीने प्रेषितीय
कार्य करण्यासाठी पाठवतो, तेव्हा तो खालील तीन मुद्द्यांवर जास्त भर देतो.
- देवाचे राज्य जवळ आले आहे अशी सुवार्ता लोकांपर्यंत पोहोचावी आणि पापी मनुष्यांनी पश्चाताप करावा असा उपदेश शिष्यांनी लोकांना द्यावा.
- आजारी लोकांची सेवा करावी तसेच रोग्यांना तेलाभ्यंग करून त्यांची आजारातून सुटका करावी व अशुद्ध आत्म्यावरचा अधिकारही त्यांना दिला होता.
- सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, दुसऱ्या ठिकाणी जाताना रिकाम्या हातांनी प्रवास करावा जेणेकरून ते स्वतःवर अवलंबून न राहता ईश्वरकृपेवर असलेली श्रद्धा प्रबळ ठरेल. ह्या सर्व मुद्यांवरून आपणाला कळून येते की, देव त्याच्या मिशन कार्यासाठी कुणाचीही आणि केव्हाही निवड करू शकतो.
आजच्या पहिल्या वाचनात देवाने आमोस ह्याला निवडले. तो तर धनगर
होता आणि त्याला वाचता किंवा लिहिता येत नव्हते. ख्रिस्ताने देखील त्याच्या मिशनकार्यासाठी
मासे धरणाऱ्या कोळी लोकांची निवड केली. येशूने श्रीमंत, चतुर, सुज्ञ, समंजस किंवा
विद्वान लोकांची निवड न करता सामान्य व्यक्तींची निवड केली जेणेकरून
त्यांच्याद्वारे देवाची महीमा प्रकट होईल.
कुठलीही व्यक्ती त्याच्या मुलभूत गरजा भागवण्यासाठी किंवा
पैसा, संपत्ती, मान-सन्मान मिळवण्यासाठी धर्मोपदेशक व प्रवचनकार बनत नाही, तर
देवाचा शिष्य बनून तो देवराज्याची सुवार्ता दुसऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी त्याला
देवानेच बोलावले आणि निवडलेले असते.
असं
म्हटलं जात की, “उत्तम प्रवचनकार हा त्याच्या शब्दांनी नव्हे तर त्याच्या
व्यक्तिमत्वामुळे प्रसिद्ध होत असतो”. आपणा प्रत्येकाला उत्तम प्रवचन करण्यास
वाटते परंतु त्यासारखे जीवन जगण्यास आपण कमी पडतो. म्हणूनच म्हणतात की, “बोलणे
सोपे असते पण प्रत्यक्ष कृतीमध्ये उतरवणे फार कठीण असते.” येशू ख्रिस्त त्याच्या
शिष्यांना फक्त शब्दांनीच देवाची सुवार्ता पसरवण्यासाठी न सांगता त्यांच्या
रोजच्या जीवनाद्वारे देवाचे प्रेम इतरांपर्यंत पोहचवण्यास सांगत आहे. सेवा हा
प्रेषितीय कार्याचा मुख्य गाभा आहे. म्हणूनच पूर्वी जेव्हा मिशनरी खेडेगावामध्ये
जायचे तेव्हा ते सर्वप्रथम जे आजारी आहेत त्यांना भेट देण्यासाठी जात असत आणि सेवा
कार्याद्वारे ते देवाची सुवार्ता इतरांपर्यंत पोहचवत असत.
आजदेखील प्रभू त्याच्या प्रेमाचा, शांतीचा आणि क्षमेचा
संदेश आपणाला अनेक प्रकारे सांगत असतो, पण देवाच्या सुवार्तेवर आपण लक्ष देत
नाहीत. देवाची आपणाकडून एकच इच्छा आहे आणि ती म्हणजे देवाची वाणी आपण सदैव ऐकावी
आणि पश्चातापी अंतकरणाने आपण त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करावा. अनेकवेळा आपण
देवाची सुवार्ता ऐकतो, पण त्याप्रकारे वागण्याचा प्रयत्न करीत नाही. उलट
धर्मोपदेशक व प्रवचनकार ह्याच्यामध्ये कुठल्या उणीवा आहेत त्या शोधण्याचा प्रयत्न
करतो. उपदेशक चांगला किंवा वाईट आहे ह्याला महत्व नाही तर तो कुठला संदेश आपणाला
देत आहे ह्याला उत्तम स्थान दिले गेले पाहिजे. त्यांनी दिलेला संदेश नाकारणे
म्हणजे देवालाच नाकारणे होय.
आपणा प्रत्येकाला देवाची सुवार्ता पसरविण्यासाठी पाचारण
केले आहे. मग आपण व्रतस्थ जीवन जगणारे असो किंवा प्रापंचिक असो. आपण फक्त
शब्दांनीच देवाची सुवार्ता पसरवू शकतो असं नाही तर आपल्या रोजच्या जीवनात आपल्या
कृतीद्वारे आपण देवाचा संदेश इतरापर्यंत पोहचवू शकतो. देवराज्याची सुवार्ता
इतरांना सांगण्यापूर्वी आपण ख्रिस्ताचे प्रतिरूप झाले पाहिजे म्हणून ख्रिस्तासारखे
जीवन जगण्यास परमेश्वराने आपणाला कृपा व शक्ती द्यावी म्हणून आपण परमेश्वराकडे
प्रार्थना करूया.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद: हे प्रभू आमची
प्रार्थना ऐक.
१. ख्रिस्तसभा हा संवेदनाक्षम असा विश्वासू जणांचा समुदाय
आहे. त्यामुळे आपल्या शिकवणुकीतून, प्रार्थनेनेतून आणि प्रत्यक्ष कार्याद्वारे
ख्रिस्तसभेने ह्या जगात प्रभू ख्रिस्ताची सुवार्ता पसररावी म्हणून आपण प्रार्थना
करूया.
२. विविध जाती धर्माचे लोक आपल्या देशात गुण्या-गोविंदाने नांदत राहावे व
त्यांच्यातील ऐक्य दिवसेंदिवस भक्कम होत राहावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. आजच्या युवक युवतीसमोर खूप मोठ-मोठी आव्हाने आहेत. मद्यपान, बेकारी, वाईट
सवयी अश्या विविध समस्यांमध्ये युवापिढी अडकलेली आहे, त्यांना प्रभूने योग्य दिशा
दाखवावी जेणेकरून ते चांगल्या मार्गावर चालून स्वत:ची व इतरांची प्रगती करतील
म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. आज संपूर्ण जगाला मारामारी जीवीतहानी व वित्तहानी ह्यांची चिंता भेडसावीत
आहे. अशांती निर्माण करणाऱ्या ह्या गोष्टी आपल्याला टाळता याव्यात व खऱ्याखुऱ्या
स्वरुपाची शांती आपल्या जगात पसरावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. प्रभूच्या सुवार्तेचे प्रेषित व प्रसारक म्हणून आपण सर्वांनी न्याय, शांती
ऐक्य व परस्पर स्नेहभाव ही स्वर्गराज्याची मुल्ये जोपासावीत आणि आपल्या संपर्कात
येणाऱ्यांना ईश्वरी प्रेमाचा अनुभव द्यावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment