Thursday, 16 July 2015



Reflections for Homily By: Alfred Rodrigues




सामान्य काळातील सोळावा रविवार


दिनांक : १९/०७/२०१५
पहिले वाचन: यिर्मया २३:१-६.                              
दुसरे वाचन: इफिसीकरांस पत्र २:१३-१८.
शुभवर्तमान: मार्क ६: ३०-३४.

प्रस्तावना:
आज आपण सामान्य काळातील सोळावा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपल्याला मेंढपाळाच्या भूमिकेत ख्रिस्ताचे दर्शन घडवून देते.
पहिल्या वाचनात परमेश्वर आपल्या विखुरलेल्या मेंढरांना परत एकत्र आणून त्यांच्यावर मेंढपाळ नेमण्याचे आश्वासन देतो. दुसऱ्या वाचनात ख्रिस्त आपापसातील वैर नाहीसे करून शांती प्रस्थापित करण्यास येत आहे असे सांगण्यात आले आहे. आजच्या शुभवर्तमानात आपण पाहतो कि, ‘जमलेला जनसमुदाय हा मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखा होता म्हणून ख्रिस्त स्वतः त्यांच्या मदतीला जाऊन त्यांच्यावर दया दाखवतो’.
आपणही ख्रिस्तासारखे दुसऱ्यांची समस्या व अडचणी जाणून घेऊन त्यांच्या मदतीस धावत जावे म्हणून ह्या मिस्साबलीत परमेश्वराची विशेष कृपा मागूया.

पहिले वाचन: यिर्मया २३:१-६.
आजच्या पहिल्या वाचनात यिर्मया संदेष्टा आपणास सांगत आहे कि, इस्रायल देशातील मेंढपाळ परमेश्वराशी विश्वासू नव्हते. म्हणूनच देव त्यांच्यावर नाराज होता. ते कळपावर लक्ष न ठेवता आपले स्वतःचे चांगले कसे होईल हे ते नेहमी बघत. त्यांच्या ह्या दुर्लक्षपणामुळे इस्रायल शहर पापात पडले होते आणि त्यामुळे ते विखुरलेले होते. म्हणूनच परमेश्वर सांगत आहे कि, आतापासून मी स्वतः इस्रायल लोकांवर लक्ष ठेवीन. मी त्यांना परत एकत्र आणील व त्यांच्यावर एक विश्वासू मेंढपाळ नेमीन.

दुसरे वाचन: इफिसीकरांस पत्र २:१३-१८.
संत पौल इफिसकरांस पत्रात म्हणतो कि, ख्रिस्त हा त्याच्या समुदायाला जीवन व शांती देण्यास आला आहे. इस्रायल लोकांना इतर जमाती (विधर्मी) पासून धोका होता कारण ते मूर्तीपूजा करणारे होते, म्हणून ख्रिस्त त्यांना त्यांच्यापासून दूर राहण्यास सांगत आहे. परंतु ह्या विभागणीमुळे ज्यु लोक गर्विष्ठ झाले होते, कारण हे स्वतःला देवाच्या जवळचे व देवाचे प्रिय असे समजु लागले. त्यांची अशी समज होती कि, जेव्हा तारणारा येईल तेव्हा तो फक्त त्यांचेच तारण करील व इतर लोकांस तो शिक्षेस पात्र ठरवील.

शुभवर्तमान: मार्क ६: ३०-३४.
आजच्या शुभवर्तमानात संत मार्क आपणास सांगत आहे कि, येशूचे शिष्य आनंदाने आपण दिलेल्या शिकवणुकीचा व कार्याचा अनुभव येशुजवळ कथन करत आहेत. ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना एकांकी जागेत विश्रांती घेण्यासाठी बोलावले कारण ते दमले होते. परंतु तेथे पोहोचण्याअगोदर त्यांना असे आढळून आले कि, जनसमुदाय त्यांच्या अगोदर तिथे पोहचला आहे. मग त्याने आपला थकवा दूर सारून त्यांना शिकवण देऊ लागला. कारण ते उतावीळ होते. हाच संदेश येशूने आपल्या कृत्याद्वारे शिष्यांना आणि मेंढपाळांनाही दिला. ज्यांना ख्रिस्त आपला कळप चारण्याचे काम देणार होता “त्यांना स्वतःला विसरून आरामदायी जीवन सोडून व आपल्या आवडी-निवडीकडे लक्ष न देता त्यांना लोकांची काळजी असावी.”

सम्यक विवरण
शेकडो वर्षापासून इस्रायलचे लोक मेंढपाळ होते. ते गावात किंवा घरात राहत नसत तर ते तंबूत राहत आणि एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी आपल्या मेंढराच्या काळपासमवेत गवताळ प्रदेशात स्थलांतर करीत. आजही असे लोक पालेस्तीन ह्या देशात आहेत ज्यांना ‘Nomads’ म्हणजेच ‘भटकी जमात’ असे संबोधले जायचे. ते क्वचीतच शेती करीत असत, परंतु मेंढरापासून मिळालेली उत्पादने बाजारात विकून आपला उदरनिर्वाह ते करीत. अब्राहम, इसहाक आणि याकोब या सर्वांचे कुटुंब अश्याच प्रकारचे जीवन जगले.
मेंढपाळ नेहमी एक आठवडा ते महिना गावाबाहेर असत ते आपल्या मेंढराच्या कळपासमवेत दिवसा गवताळ भागात चरण्यासाठी तर रात्री त्यांच्यावर पहारा ठेवत. उन्हाळा असो की हिवाळा, ते आपले जीवन कळपासमवेत घालवत. मेंढपाळांना त्याच्या कळपातील प्रत्येक मेंढरू माहित होते. कधी कधी ते आपल्या मेंढरांना टोपण नावानेही बोलवत. मेंढरे हे त्याच धन असे म्हणूनच पवित्र शास्रात परमेश्वर नेहमी इस्रायल लोकांना “त्याचा कळप” आणि स्वतःला “त्याचा मेंढपाळ” ह्या नावाने उल्लेख करतो.
अशाप्रकारे देवाचे हेतू हाच होता कि, इस्रायल लोकांनी देवाचे प्रेम अनुभवावे आणि त्याबदल्यात त्यांनी देवाशी विश्वासू रहावे. पवित्र शास्रात राजांना तसेच धर्मगुरूंना ‘इस्रायलचे मेंढपाळ’ म्हणून संबोधले गेले आहे. विशेष करून त्यांना देवाच्या नावाने इस्रायल लोकांची काळजी घेण्यासाठी नेमले होते.
शुभवर्तमानात आपण पाहतो कि, येशु व त्याचे शिष्य खूप व्यस्त होते. जस-जसा ख्रिस्त आपल्या कार्याने प्रसिद्ध होत होता, तस-तसा ख्रिस्ताला भेटण्यासाठी मोठा जनसमुदाय येत होता. ते त्यांचे अनेक समस्या व गरजा घेऊन येशुजवळ येत होते. काही रोगमुक्त होण्याच्या आशेने तर काही त्याची शिकवण एकूण मनशांती मिळविण्यासाठी येत होते त्यामुळे ख्रिस्ताला व शिष्यांना जेवण्यासाठी व आराम करण्यासाठी सुद्धा वेळ मिळणे कठीण झाले होते. म्हणूनच ख्रिस्त शिष्यांना म्हणतो, तुम्ही रानात एकांती चला व थोडा विसावा घ्या.
परंतु लोकांचा येशूला व त्याच्या शिष्यांना भेटण्यासाठी उत्साह इतका होता की, ते येशु व शिष्यांच्या अगोदरच धावत जाऊन त्यांच्या अगोदर तिकडे पोहचले. येशु थकलेला असून सुद्धा लोकांच्या येण्याने येशु कंटाळून न जाता त्याला त्यांचा कळवळा आला. कारण ते मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखे होते. येशु आपली तहान-भूक विसरून त्याच्यासाठी धावून गेला.

बोधकथा
एके दिवशी मदर तेरेसांच्या भगिनी रस्त्यावरून कृष्टरोगी लोकांचा शोध घेत असताना त्यांचे लक्ष एका तरुण मुलाकडे गेले ज्याच्या कपाळावर व पोटावर दोन मोठे घाय झालेले त्यांना आढळले. तो मुलगा गावातील एका गरीब कुटुंबातील होता. चांगला उपचार मिळण्याच्या शोधात तो गावाकडून शहराकडील दवाखान्यात एकटा निघाला होता. परंतु त्याच्याकडे उपचार करून पुरेसे पैसे नसल्यामुळे तो रस्त्याच्या कडेला बसला होता.
मदर तेरेसांच्या सिस्टरांनी त्या मुलाला एका चांगल्या डॉक्टरच्या मदतीने दवाखान्यात भरती केले. सुरुवातीला तो मुलगा दचकून गेला होता, परंतु जसे दिवस निघून जात होते, तसे सिस्टरांनी केलेल्या दया व सेवेमुळे आपली काळजी घेणारा ह्या जगात कोणी तरी आहे याची खात्री त्याला पटत होती. त्यामुळे सिस्टरांमध्ये त्याला परमेश्वराचे दर्शन घडले. त्याचे दुःख व वेदना चालूच होत्या परंतु त्याला आता परमेश्वर तारत आहे ह्याचा अनुभव येत होता.

मनन चिंतन:
प्रिय बंधू-भगिनींनो, आज गरिबांना तसेच आजारी लोकांना खाण्याची व औषधाची गरज नसून तर त्यांना प्रथम आपल्या सहानुभूतीची व दयेची गरज असते. आजचा मोठा आजार ‘कर्करोग’ किंवा इतर जीव-घेणा रोग नाही, तर ‘आपली काळजी वाहणारा कोणीच नाही’ हा होय. आजची वाईट परिस्थिती अशी कि, प्रेम न मिळणे व आपल्यापेक्षा खालच्या दर्जातील लोकांना तुच्छतेने लेखणे. आपणही ख्रिस्ताप्रमाणे दया-दृष्टीने त्यांच्याकडे पाहून त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात कारण स्वतः ख्रिस्ताने सर्वांवर दया दाखवली.
आजच्या शुभवर्तमानात आपण पाहतो कि, ख्रिस्ताला व शिष्यांना विश्रांतीची गरज भासते. तसेच आपणही आपल्या व्यस्त जीवनात थोडासा वेळ आपण आपले मन प्रसन्न ठेवण्यासाठी विरंगुळ्यासाठी देत असतो. परंतु ह्या विरंगुळ्यात आपण पूर्णपणे रमून न जाता किंवा ते आपल्या जीवनाचे ध्येय न बनवता आपण पुढचे काम चालू ठेवायला हवे. काही वेळेस आपल्याला इतरांच्या मदतीस बोलावले असता आपण त्यांना नाकारतो. आपल्या आरामाच्या किंवा विरंगुळेच्या वेळेस आपण त्यांच्यावर चिडतो. आपण त्यांना आता शक्य नाही म्हणून परत पाठवतो. काही लोक आपले सुट्टीचे दिवस मोठ्या अडचणीच्या वेळी दुसऱ्यांच्या मदतीसाठी त्यागण्यास असमर्थ ठरतो. परंतु ख्रिस्ताच्या जीवनात आपण याउलट पाहतो. म्हणूनच तो आपली आराम करण्याची वेळ लोकांच्या भल्यासाठी वापरतो.
आराम, विरंगुळा, मौजमजा हे सर्व, इतरांना दया व प्रेम दाखवण्यापेक्षा श्रेष्ठ असूच शकत नाही. म्हणूनच खरे सुख आराम, विरंगुळा खाऊन-पिऊन मौजमजा करण्यात नाही, तर ते इतरांसाठी केलेल्या सेवेत आहे. ख्रिस्त आपल्या शिष्यांना इतरांवर दया-भाव नजरेने पाहण्याचा धडा शिकवत आहे. आपण आपल्या आखलेल्या वेळापत्रकाप्रमाणे केलेली सेवा ही सेवा होऊ शकत नाही तर, वेळेच भान न ठेवता किंवा आपण वेळेपलीकडे जाऊन केलेली सेवा ती खरी सेवा असते असे म्हणणे योग्यस्पद ठरेल.
ख्रिस्ताने आपल्याकडे आलेल्या जनसमुद्याला पहिले स्थान दिले. ख्रिस्ताने असे म्हटले नाही कि, ‘आता मी खूप थकलेला आहे व हि माझी आराम करण्याची वेळ आहे म्हणून तुम्ही नंतर या’ असे न म्हणता तो त्यांच्या सेवेसाठी तत्पर होता. त्याला त्यांचा कळवळा आला. म्हणूनच आपण आपल्या जीवनात वेळेनुसार बदल घडवून आणला पाहिजे. आपण आपल्या गरजेनुसार नव्हे तर लोकांच्या गरजेनुसार नियम केले पाहिजेत म्हणूनच ख्रिस्त म्हणतो, “शब्बाथ माणसासाठी केला आहे, माणूस शब्बाथासाठी नाही.”
  
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे दयावंत परमेश्वरा, आमची प्रार्थना ऐक.
  1. आपल्या ख्रिस्तसभेची धुरा वाहणारे पोप, बिशप्स, धर्मगुरू व धर्मभगिनी ह्या सर्वांनी ख्रिस्ताप्रमाणे विश्वासू मेंढपाळ बनून ख्रिस्ताचे प्रेम सर्वत्र पसरावे म्हणून आपण प्रार्थना करुया.
  2. ख्रिस्ताच्या मार्गदर्शनाखाली आपण एकमेकांना मदतीचा हात देऊन शांती व सलोख्याने राहावे म्हणून आपण आपल्या ख्रिस्ती समुदायासाठी प्रार्थना करुया.
  3. आपल्या देशातील राजकीय नेत्यांनी स्वहितासाठी न झटता इतरांसाठी झटावे व आपल्यासमोर एक आदर्श ठेवावा म्हणून आपण प्रार्थना करुया.
  4. जे तरुण-तरुणी देवापासून दूर गेलेले आहेत व जे व्यसनाधीन झालेले आहेत त्यांना चांगले जीवन जगण्यासाठी प्रभूची कृपा लाभावी म्हणून आपण प्रार्थना करुया.
  5. ह्यावर्षी चांगला पाऊस पडावा व परमेश्वराने आपल्याला अतिवर्षाव व दुष्काळापासून मुक्त करावे म्हणून आपण प्रार्थना करुया.
  6. थोडावेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.

1 comment: