Reflections by: Nevil Govind
सामान्य काळातील चौदावा
रविवार
दिनांक: ०५/०७/२०१५
पहिले वाचन: यहेज्केल २:२-५
दुसरे वाचन: २ करिंथकरांस पत्र १२:७-१०
शुभवर्तमान: मार्क ६:१-६
प्रस्तावना:
आज आपण सामान्य काळातील चौदावा रविवार साजरा करीत आहोत. पहिल्या
वाचनात यहेज्केल संदेष्टा, त्याला देवाने पवित्र आत्म्याने परिपूर्ण करून इस्रायली
प्रजेला आपला संदेश देण्यासाठी पाचारीले आहे असे म्हणतो. तर संत पौल आपल्याला
प्रगटीकरणाच्या विपुलतेमुळे आपण बढाई मारू नये म्हणून ख्रिस्ताने आपल्या शरीरात एक
काटा रुतवला असल्याचे सांगतो.
संत मार्कलिखित आजच्या शुभवर्तमानात येशूची त्याच्याच
नाझरेथ गावच्या लोकांकडून झालेल्या अवहेलनेमुळे, ‘संदेष्ट्याला स्वत:च्याच गावात
अपमान सहन करावा लागेल’, असे येशूचे उद्गार ऐकावयास मिळतात.
प्रत्येक ख्रिस्ती हा ख्रिस्ताचा सुवार्तिक असतो.
ख्रिस्ताची सुवार्ता पसरविणे हे आपले आद्यकर्तव्य आहे. जीवनातील दैनंदिन
कृतीद्वारे ख्रिस्ताची सुवार्ता प्रकट करण्यासाठी देवाची कृपा मिळावी, म्हणून आपण
ह्या पवित्र मिस्साबलीदानात विशेष प्रार्थना करूया.
सम्यक विवरण:
पहिले वाचन: यहेज्केल २:२-५.
जुन्या करारातील चार मुख्य
संदेष्ट्यांपैकी यहेज्केल हा एक गणला जातो. यहेज्केल इ. स. पु. ५३९-५७१ मध्ये देवाचे
मुखपत्र म्हणून कार्य करीत होता. इ.स पु ५९७ साली बाबिलोनीयन गुलामगिरीतून सुटका
झालेल्या लोकांस आपला संदेश देण्यासाठी देवाने त्याला आपल्या पवित्र आत्म्याने
परिपूर्ण केले आणि आपला संदेष्टा म्हणून निवडले.
आजच्या उता-यात यहेज्केल आपल्याला
देवाकडून झालेल्या पाचारणाविषयीची साक्ष देतो. इस्त्राएल लोकांच्या फितुरीमुळे
देवाने त्यांना हद्दपार करून गुलामगिरीत ठेविले. इस्त्राएल लोकांची सुटका केल्यावर
देवाने यहेज्केल ह्यास आपला संदेष्टा म्हणून निवडले होते. “आत्म्याने माझ्याठायी
प्रवेश करून मला माझ्या पायांवर उभे केले” ह्या वाक्यावरून आपणास कळते की, देवाने
त्याला पवित्र आत्म्याने परिपूर्ण करून इस्त्राएल लोकांना आपला संदेश देण्यासाठी निवडले
होते.
दुसरे वाचन: २ करिंथकरांस पत्र १२:७-१०
करिंथ येथे संत पौलाने १८ महिने
(इ.स ५०-५२) येशूची सुवार्ता सांगितली आणि त्याने तेथे एका चर्चची स्थापना देखील केली
होती. त्याच्या अनुपस्थित इतर प्रवचनकार तेथे जाऊन त्यांनी करिंथ येथील
लोकांत खळबळजनक परिस्थिती निर्माण केली होती. त्यांनी संत पौल हा कनिष्ठ असून तो
त्यांच्याहून श्रेष्ठ नसल्याचे सांगितले. अशा ह्या परिस्थितीत संत पौलाने
करिंथकरांस आपले हे दुसरे पत्र इफीसस किंवा मासेदोनियाहून लिहिलेले होते.
“प्रकटीकरणांच्या विपुलतेमुळे”
ह्या शब्दांद्वारे संत पौल आपणास त्याला झालेल्या पाचारणाची साक्ष देतो. “प्रकटीकरणांच्या
विपुलतेमुळे मी गर्विष्ट बनू नये म्हणून माझ्या शरीरात एक काटा” ह्या वाक्यातून
संत पौल आपल्याला विपुलतेत प्रकटीकरणे झालेली होती हे स्पष्ट करून देतो. “प्रकटीकरणांच्या
ह्या विपुलतेमुळे तो चढून जाऊ नये” म्हणजेच संत पौल बढाई मारू नये म्हणून ख्रिस्ताने
त्याच्या शरीरात एक काटा रुतवलेला आहे असे तो म्हणतो. ख्रिस्ताने त्याच्या शरीरात
एक काटा रुतवण्याचे कारण म्हणजे त्याने गर्वपणा धारण न करता नम्रपणा धारण करावा व
ख्रिस्ताची साक्ष द्यावी असा होय.
शुभवर्तमान: मार्क ६:१-६
संत मार्क आपल्या शुभवर्तमानात येशूला
‘खरा प्रवक्ता’ किंवा ‘संदेष्टांचा संदेष्टा’ असे संबोधतो. संत मार्कप्रमाणे
येशूने गालीली येथे पुष्कळ वेळेस सुवार्ता सांगितली होती आणि तेथे चमत्कारही केले
होते. गालीली समुद्र किनारी आणि त्या गावात येशूने आपला कितीतरी वेळ घालवला असेल
असे त्याचे मत होते. येशू गालीलात असताना त्याला आपल्या गावी जाण्याची इच्छा झाली
होती म्हणून येशू गालीलीतून निघण्याअगोदर आपल्या नाझरेथ ह्या गावास भेट देतो. येशू
बरोबर त्याचे शिष्यही होते. ज्या दिवशी येशूने आपल्या गावास भेट दिली तो दिवस
शब्बाथ दिवस होता. शब्बाथ दिवशी यहुदी लोक ‘सिनेगॉगमध्ये’ (प्रार्थनागृह, देवालय)
प्रार्थना करण्यासाठी जात असत आणि येशूने तिथे उपदेश केला होता. त्याचा तो उपदेश
ऐकून लोक अतिशय प्रभावित झाले. काहींच्या मनात खळबळ उडाली तर काहीजण एकमेकांत
विचारपुस करत होते आणि म्हणत होते, ‘ह्याला हे सर्व ज्ञान कोठून प्राप्त झाले? काय
वर्णावे त्याचे बुद्धीवैभव? किती महान गोष्टी ह्याच्या हातून घडत आहेत! हा सुतार नाही काय? हा मरीयेचाच मुलगा ना?’ ‘याकोब,
योसेफ, यहूदा व शिमोन ह्यांचाच हा भाऊ ना? ह्याच्या बहिणीदेखील आपल्या बरोबर आहेत
ना?’(योहान १९:२६-२७) अशा शब्दांत त्यांनी त्याची अवहेलना केली होती.
ह्या त्यांनी केलेल्या अवहेलनेला
येशूने म्हटले होते, “संदेष्ट्यांचा सन्मान होत नाही असे नाही; मात्र त्याच्या
देशात, त्याच्या आप्तेष्टांत अथवा त्याच्या घरच्या मंडळीत त्याचा सन्मान होत
नसतो”(मार्क ६:४).
बोधकथा:
एका
खेडेगावामध्ये वीज, पाणीपुरवठा आणि शाळा देखील नव्हती. त्या गावाची आर्थिक
परिस्थिती खूप बिकट होती. त्या गावामध्ये इतर धर्माचे अधिक लोक वास्तव्य करीत होते.
त्यात फक्त एकच कुटुंब ख्रिस्ती धर्माचं होत व ते कुटुंब रॉबिनच होत. त्या गावातील
रॉबिनसारख्या तरुणाला आपल्या गावाचा विकास करायचा होता. त्या गावात त्याला
विद्यालय बांधायचे होते. परंतु परिस्थितीच्या कारणामुळे त्याच्याकडे पुष्कळ पैसे
नव्हते. पण त्याच्या आत्मविश्वासामुळे व ख्रिस्तावरील विश्वासामुळे त्याने
कुणाचीही पर्वा न करता आपल्या घराची शेती विकून टाकली व गावातील गरीब मुलांसाठी एक
विद्यालय सुरु केले. त्या विद्यालयात त्याने त्यांना चांगले शिक्षणाची गोडी दिली व
जीवनात काय करायचे यांचे धडे दिले. ती मुले पुढे जाऊन वेगवेगळ्या मार्गाला जाऊन
यशस्वी झाली. त्याच विद्यालयातील रीमा नावाची मुलगी डॉक्टर बनते व गावातील रुग्ण
व्यक्तींची सेवा करते.
आज जर रोबिनने त्यांना शिक्षणाची गोडी लावली नसती तर त्या
गावाचा विकास झाला नसता. हे फक्त त्याच्या ख्रिस्ती धर्मातील शिकवणुकीमुळे व
त्याच्या आई-वडिलाच्या संस्कारामुळे आणि ख्रिस्तावरील असलेल्या विश्वासामुळे तो हे
सर्वकाही करू शकला. तो जणू त्या गावासाठी ख्रिस्ताचा संदेष्टा झाला.
मनन चिंतन:
आपण संपूर्ण जुनाकरार जर आपल्या नजरे खालून
घातला तर आपणास दिसून येईल की देवाने आपल्या लोकांना आपला संदेश देण्यासाठी कितीतरी
संदेष्ट्यांची निवड केलेली होती. प्रत्येक संदेष्ट्याला देवाने
त्यांच्याच मनुष्यांतून निवडले व देवाविषयक गोष्टींबाबत बोलण्यासाठी त्याला नेमले
होते. संदेष्टे आणि त्यांनी
केलेली भविष्यवाणी देवाकडून येत असे, कारण देवाने स्वतः त्यांस पाचारण केलेले होते. संदेष्टा हा
देवासाठी, लोकांसमोर आणि देवाच्या वतीने बोलत असतो. संदेष्टा यहेज्केल इस्त्राएल
लोकांबरोबर नबुकदनेझरच्या गुलामगिरीत कैदी होता आणि त्यांच्या सुटकेनंतर देव
त्याला त्याच लोकांचा संदेष्टा म्हणून निवडतो. देव त्याच्या हाती अशक्य असे कार्य
सोपवतो; ‘जाऊन तू तुझ्या लोकांस त्यांनी देवाशी केलेल्या फितुरीबद्दल त्यांस सांग
व भविष्यवाणी कर की, तुमच्या ह्या फितुरीमुळे देव तुमचे येरूसलेमेतील मंदिर
उध्वस्त करील’. यहेज्केलला आपले लोक कसे आहेत हे ठाऊक होते आणि अशा ह्या कठीण
काळजाच्या लोकांना सत्य सांगणे म्हणजे स्वतःच्या प्राणाला मुकणे. विदेशी लोकांस
देवाची वाणी सांगण सोपे असतं पण स्वदेशी लोकांस सांगण कठीण कारण संदेश देणा-यांचा
संपूर्ण इतिहास त्यास ठाऊक असतो. इग्रंजी भाषेमध्ये एक वाक्य म्हटले जाते, ‘Message is everything and Messenger is nothing’ मराठीत ह्या वाक्याचा अर्थ, ‘संदेष्टा महत्वाचा नसून
त्याचा संदेशच सर्वकाही आहे’ असा होतो.
संत पौल यहुदी होता आणि ख्रिस्ताने त्याच
यहुदियांतील ‘यहुदीयाची’ निवड केली. संत पौल, ज्याने ख्रिस्ताविरूद्ध बोलले व
लोकांस छळले त्याला ख्रिस्ताने आपला शिष्य म्हणून निवडले आणि म्हटले, ‘माझ्या
विरुद्ध नव्हे तर माझ्यासाठी बोल’. ख्रिस्ताने पौलाला आपली प्रकटीकरणे विपुलतेत
अनुभण्यासाठी दिलेली होती. ह्या प्रकटीकरणांच्या विपुलतेमुळे संत पौलने बढाई मारू नये
म्हणून ख्रिस्ताने त्याच्या शरीरात एक काटा रुतवलेला होता जेणेकरून त्याला समजून
यावे की ही सर्व प्रकटीकरणे, पवित्र आत्म्याची दाने आणि चमत्कार करण्याचे सामर्थ्य
खुद्द परमेश्वराकडून मिळत असतात.
ख्रिस्ताचा त्याच्याच गावातील (नाझरेथ) लोकांनी स्वीकार आणि
सन्मान केला नाही कारण येशू त्यांच्यातला
व त्यांच्याच गावातील होता. तो सुतार नाही काय? तो मरीयेचाच मुलगा ना?’ ‘याकोब,
योसेफ, यहूदा व शिमोन ह्यांचाच हा भाऊ ना? ह्याच्या बहिणीदेखील आपल्याबरोबर आहेत
ना?’ हे सर्व ज्ञान ह्याला कोठून प्राप्त झाले? साधारण माणूस असाधारण कार्य कशी
करू शकतो? हे होते त्यांचे प्रश्न! इंग्रजी भाषेतील एक म्हण ‘familiarity
breeds contempt’, ही नाझरेथकरांच्या
कृतीमधून येथे पहावयास मिळते. येशूचा स्वीकार कोणी केला? दुस-या शहरातील
लोकांनी, विविध दर्जावर असलेल्यांनी, मेंढपाळांनी, पापी लोकांनी, व्यभिचारी
स्त्री, क्रूसावर टांगलेल्या उजव्या चोराने आणि ख्रिस्ताच्या आईने. ख्रिस्ताला
कोणी नाकारले? त्याच्याच नाझरेथ गावातील लोकांनी, शास्त्री आणि परुशियांनी.
तुम्ही आणि मी आजचे संदेष्टे आहोत. ख्रिस्ताचे
संदेष्टे म्हणून आपण सुरुवात कुठून करावी? प्रथम माझ्या स्वत:च्या घरातून, गावातून
नगरातून, राज्यातून आणि मग देशातून. जिथे अंधार आहे तिथे मी प्रकाश आणावा, जिथे
असत्य आहे तिथे सत्य फुलवावे. जिथे कुभावना आहे तिथे सदभाव फुलवावा, जिथे अन्याय
आहे तिथे न्याय द्यावे आणि जिथे शांतीची गरज आहे तिथे मी शांती प्रस्थापित करावी.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसादः हे प्रभो, आम्हाला तुझे सुवार्तिक बनण्यास सहाय्य कर.
- आपले परमाचार्य पोप फ्रान्सिस, कार्डिनल्स, बिशप्स, धर्मगुरू, धर्मबंधू-भगिनी व सर्व प्रापंचिक त्यांच्या कार्याद्वारे आणि शुभसंदेशाने येशू ख्रिस्ताची खरी ओळख संपूर्ण जगाला मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
- जे लोक मिशन भागात कार्य करीत आहेत त्यांची आज आपण विशेष आठवण करूया. त्यांना देवाची विशेष कृपा मिळावी व त्यांची श्रध्दा बळकट होऊन त्यांनी इतरांचीही श्रध्दा बळकट करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
- आपल्या देशाचा कारभार सांभाळण्यासाठी जे राज्यकर्ते आपण नेमून दिलेले आहेत, त्यांना प्रभूचे विशेष मार्गदर्शन लाभावे व त्यांनी सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीकोनातून जनतेचे प्रश्न सोडवावेत व प्रगतीसाठी झटावे, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
- येशू ख्रिस्ताची सुवार्ता प्रथम आपण आपल्या स्वतःच्या घरात, परिसरात आणि गावात पसरविण्यासाठी आपणास ख्रिस्ताची कृपा, सामर्थ्य आणि आशीर्वाद मिळावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
- आपण आपल्या वैयक्तिक कौटुंबिक व सामाजीक गरजांसाठी प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment