Reflections for Homily By: Allwyn Gonsalves.
सामान्य काळातील विसावा
रविवार
दिनांक:
१६/०८/२०१५.
पहिले वाचन: नीतिसुत्रे ९:१-६.
दुसरे वाचन: इफिस ५:१५-२०.
शुभवर्तमान: योहान ६:५१-५८.
प्रस्तावना
आज पवित्र ख्रिस्तसभा सामान्य काळातील विसावा रविवार
साजरा करीत आहे. आजची उपासना आपल्याला ‘परमेश्वर न्यायी आहे’ ह्या विषयावर मनन-चिंतन
करण्यास आमंत्रण देत आहे.
नितिसुत्रे ह्या पुस्तकातून घेतलेल्या आजच्या पहिल्या वाचनात, परमेश्वर त्याच्या प्रजेला भोळेपण सोडून देऊन सुज्ञतेच्या मार्गाने
चालावयास सांगत आहे. इफिसीकरांस पाठवलेल्या पत्रातून घेतलेल्या दुसऱ्या वाचनात, संत पॉल इफिस येथील लोकांना ज्ञानाचा आणि वेळेचा सदुपयोग करून प्रभू येशू ख्रिस्ताच्या
नावाने सर्वदा देवपित्याची उपकारस्तुती करण्यास आवाहन करत आहे. तसेच संत योहानलिखित
शुभवर्तमानात येशू, ‘मी तुम्हाला माझे शरीर व रक्त तुमचे आध्यामिक भोजन म्हणून देतो’ असे म्हणतो.
आजच्या ह्या पवित्र मिस्साबलिदानात भाग घेत असता, आपण आपल्याला
दिलेल्या ज्ञानाचा आणि वेळेचा सदुपयोग करावा, म्हणून देवाकडून
सुबुद्धी व शहाणपण ह्यासाठी प्रभू चरणी प्रार्थना करूया.
सम्यक विवरण:
पहिले वाचन: नीतिसूत्रे: ९:१-६
बायबलमधील नीतिसूत्रे हे पुस्तक राजा शलमोनाला संबोधून लिहिलेले आहे कारण राजा शलमोनाने देवाकडे ज्ञानासाठी
विशेष प्रार्थना केली होती. ह्या पुस्तकात उत्तम अशी सूत्रे माडंलेली आहेत जे आपणास
देवावरील व आपल्या ज्ञानावर कसे प्रेम करावे हे शिकवतात. माणसाने
माणसाशी कसे वागावे, सामाजिक व्यवहार कसे
पार पाडावेत आणि नीतीचे जीवन कसे जगावे, ह्याविषयी इस्त्रायलमधील ऋषितुल्य व्यक्तींनी
देवावरील श्रद्धेच्या प्रकाशात केलेले हे मार्गदर्शन आहे. सर्व ज्ञानाचा आणि सुज्ञपणाचा
उगम देव आहे, असा इस्त्राएलचा विश्वास
होता. नीतीसूत्रे हा सुभाषितांचा आणि सुविचारांचा संग्रह आहे. नीतीसूत्रे हा ग्रंथ
म्हणजे अनेक शतकांच्या ज्ञानवचनांचा संग्रह आहे. प्रारंभीची ज्ञानसूत्रेही व्यवहारी जीवनासंबंधी असून अधूनमधून एखाद दुसरे आध्यात्मिक स्वरूपाचे सूत्रही दिसून येते. देव सज्जनाला बक्षीस देतो, परंतु द्रूष्टाला दंड देतो, अशा प्रकारचा उपदेश ह्या वचनांतून केलेला आहे.
नीतिसूत्रे हा नीतिवचनांचा संग्रह आहे. त्यांच्या
परिशीलनामुळे वाचकाच्या ज्ञानात भर पडते आणि त्याला मार्मिक
वचनांचा अर्थ समजतो. सुज्ञपणे कसे वागावे, आपले वर्तन प्रामाणिक, न्याय्य आणि स्वच्छ
कसे ठेवावे, ह्याचा हा वस्तुपाठ
आहे. तसेच ह्या वचनांच्या अभ्यासामुळे साध्या-भोळ्यांच्या शहाणपणात
वाढ होते. तरुणांना दिशा मिळते आणि विद्वानांना व शिकलेल्यांना कूट प्रश्नांचे
मर्म समजण्यास मदत होते.
दुसरे वाचन: इफिसकरांस पत्र; ५:१५-२०
आजच्या ह्या दोन्ही वाचनात साम्य आहे. ते म्हणजे संत पॉल
इफिसकरांस सांगतो कि, ‘ज्ञान तुम्हाला सत्याच्या मार्गावर चालण्यास शिकवेल, तसेच ख्रिस्ती ज्ञान
तुम्हाला देवाच्या इच्छेनुसार राहण्यास प्रोत्साहन करील’. तुम्ही द्राक्षरसाच्या
नशेत राहू नका तर पवित्र आत्म्याच्या सहवासात राहा व येशू ख्रिस्ताचे धन्यवाद व आभार माना कारण त्याने आपल्याला भेट वस्तु दिलेली आहे ती म्हणजे, ‘त्याने स्वत:चे शरीर व रक्त’ आपल्यासाठी दिले आहे,
जे आपल्याला येशू ख्रिस्ताशी व देवपित्याशी एकनिष्ठ करते व जे आपल्याला एक ख्रिस्ती कुटुंब म्हणून एकत्रित ठेवते.
शुभवर्तमान: योहान; ६:५१-५८
देव स्वत: ज्ञानदाता आहे. तो ज्ञानाचा आणि सुज्ञतेचा
उगम आहे. ज्ञान तुझ्या चित्तात प्रवेश करील. विद्या तुझ्या आत्म्याला आनंद देईल. ज्याला
ज्ञानाचा खजिना गवसतो, तो खरा सुज्ञ आणि
सुखी मनुष्य होय. ज्ञानप्राप्ती सोन्यारुप्यापेक्षा, हिऱ्या-माणकांपेक्षा अधिक
मौल्यवान आणि अतुलनीय आहे. ज्ञान तुला एका हाताने दीर्घायुष्य आणि दुस-या हाताने धनसंपदा
व मानसन्मान बहाल करते. ज्ञानाच्या आश्रयाला येणारे भक्त जीवनाच्या वृक्षासारखे असतात.
जे त्याच्या सावलीत विसावा घेतात, ते सुखी होतात. देवाने ज्ञानाच्या खडकावर पृथ्वीचा पाया घातला आहे. आकाश हा त्याच्या बुद्धिविलासाचा अविष्कार आहे.
येशू ख्रिस्त हा पवित्र मिस्साबलिदानातील भोजन बनतो. येशू ख्रिस्ताला माहिती होते की, तो जे काही शिकवत
आहे ते त्याच्या शिष्यांना व लोकांना कळणार नाही, त्यामुळे येशूने सर्व प्रथम भाकरीचे चमत्कार करून
त्यांना दाखवून दिले कि, मी तुम्हां सर्वांना भोजन पुरवू
शकतो. पुढे येशू त्यांना म्हणतो की मी स्वत: जीवनाची भाकर आहे. जी देवाने तुमच्यासाठी
स्वर्गातून पाठवली आहे.''I am the living bread which has come down from heaven'' ज्याप्रमाणे भोजन हे आपल्या जीवनाची भाकर आहे, त्याप्रमाणे आपल्या
विश्वासाद्वारे येशू ख्रिस्त हा आपल्या जीवनाची भाकर आहे.
शुभवर्तमानामध्ये आपण वाचलेले आहे कि, प्रभू येशू ख्रिस्त
खूप ठिकाणी भोजनाच्या वेळेस उपस्थित होता. उदा. काना गावातील लग्न, जेथे येशूने पाण्याचा
द्राक्षरस केला, येशूने जेव्हा लाजरसला मरणातून उठविले आणि
त्याच्या समवेत भोजन घेतले, त्यानंतर जक्कयच्या घरी येशू ख्रिस्त
भोजनास उतरला होता आणि विशेष म्हणजे शेवटचे भोजन जेथे येशू ख्रिस्ताने भाकरीचे व द्राक्षरसाचे रुपांतर त्याच्या शरीरात व
रक्तामध्ये केले होते (लूक २२:१९).
बोध कथा:
एकदा एका शाळेमध्ये शिकवल्यानतंर
एका शिक्षिकेचे २५ वर्षानंतर निवुत्ती झाली म्हणून शाळेमार्फत
त्यांच्यासाठी समारोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता १०वी ची मुले हा कार्यक्रम
करणार होते, त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी शिक्षिकेकडे जात विचारले, ‘बाई आपणाला काय भेट वस्तू
हवी आहे? त्यावर त्या बाई म्हणाल्या, ‘मी ह्या शाळेत २५
वर्षे शिकविले आहे. मला पुष्कळ भेट वस्तू
मिळाल्या आहेत परंतु माझी एक इच्छा आहे’. तेव्हा मुले त्या
बाईंना म्हणाली, ‘ती काय आहे? तेव्हा त्या म्हणाल्या, ‘मी तुम्हाला ह्या शाळेत २५ वर्षे
जी चांगली शिकवण दिली ती शिकवण तुम्ही नेहमी तुमच्या जीवनात वापरावी’ असे बोलून त्या निघून गेल्या. त्यावेळी सर्व मुलानी
त्यांना त्यांची इच्छा पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
मनन चिंतन:
आजच्या शुभवर्तमानात आपण ऐकले कि, आपल्या सर्वांना सार्वकालिक
जीवन मिळावे म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचे शरीर व रक्त ह्याचे स्मारक आपल्यापुढे
ठेवले आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, “मी जी भाकर देईन ती माझा देह असून ती जगाच्या कल्याणासाठी पोषक आहे व जो मला खातो
तो माझ्यामुळे जगेल”. सर्वांना प्रेम, शांती व जीवनदान देणा-या प्रभू ख्रिस्ताने पवित्र क्रुसावर
स्वत:च्या प्राणाची आहुती दिली.
परमेश्वर न्यायी, दयाळू व कणवाळू आहे. येशू ख्रिस्ताने
जगातील सर्व प्रकारच्या बंधनातून आपल्याला मुक्त केले आहे. मात्र
आज सुध्दा स्वार्थ, भ्रष्टाचार व अन्याय
सर्वत्र जाणवत आहे. ख्रिस्तसभा आज आपल्या
सर्वाना समानतेची वागणूक मिळावी म्हणून प्रार्थना करत आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा
ह्या मुलभूत गरजांची पूर्तता, धर्म पाळण्याचा अधिकार, नीतिमुल्यांचा व स्वतंत्रेचा आदर-सन्मान, अशा गोष्टींना प्राधान्य
मिळावे म्हणून आज ख्रिस्तसभा सर्वांना आणि सर्वांसाठी प्रार्थना करण्याचे
आवाहन करीत आहे.
ख्रिस्ती धर्माचे पूर्ण सार ‘देवप्रीती’ आणि ‘बंधूप्रीतीच्या’ आज्ञेत सामवलेले आहे.
देवाने दिलेल्या आज्ञापालनावरूनच देवावरील विश्वासाचे प्रमाण समजले जाते. अखिल मानवांच्या
तारणासाठी वधस्तंभावरील मरणापर्यंत प्रभू येशूने देवाच्या आज्ञांचे पालन केले आणि देवप्रीती आणि परस्परप्रीतीचा उच्च आदर्श आपल्याला
घालून दिला.
परमेश्वर मानवावर अनंत प्रीती करतो. आपल्या जीवनासाठी
उपयुक्त अशा सर्व गोष्टी देवाने आपल्याला उपलब्ध करून दिल्या आहेत. नीतिमान व अनीतिमान
असा भेदभाव देवाकडे नाही म्हणूनच तो सर्वांवर सारखाच पाऊस पाडतो. परमेश्वर जसा प्रेमळ
व दयाळू आहे तसेच आपणसुध्दा असावे असे ख्रिस्ताने म्हटले आहे. ‘आपण प्रार्थना, उपासना, श्रध्दा याद्वारे
देवावरील आपली प्रीति दर्शवितो, पण त्याचबरोबर आपल्या बंधु-भगिनींवर मनाने आणि कृतीद्वारे प्रेम
करणे महत्वाचे आहे’. ‘तू जशी स्वत:वर प्रीती करतो तशीच शेजा-यावर कर’, म्हणजे स्वत:साठी
आपण जसा विचार व कृती करतो तसेच इतरांसाठी करावी. स्वत:प्रमाणे इतरांच्या भल्याचा विचार
करावा.
धर्म, जात,
शिक्षण, गरिब-श्रीमंत अशा
प्रकारे कोणताच भेदभाव न करता ख्रिस्ताठायी आपण सर्वांनी एक व्हावे. आपले जीवन जगत असताना
अन्यायग्रस्तांसाठी आपल्याला कशा प्रकारे सहाय्य करता येईल यावर चिंतन करूया. आपल्यापरिने ख्रिस्तानुकरण करुन
आपण सर्वांना न्यायाने, शांतीने व प्रीतिने
वागविण्याचा प्रयत्न करुया.
संत पेत्र म्हणतो, ‘एकमेकांवर मनापासून
प्रेम करा’ (पेत्र १:२२), तर संत पॉल म्हणतो, 'प्रीति हे तुमचे ध्येय असू द्या' (१करिंथ १४:१). प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवणूक व आज्ञा आचारणात आणून ती प्रमाणिकपणे पाळण्यासाठी
आणि परस्परांवर मनापासून कृतीशील प्रेम करण्यासाठी ह्या मिस्साबलीत कृपा मागूया.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे न्यायी व प्रेमळ परमेश्वरा, आमची प्रार्थना ऐकून
घे.
१. आमचे पोप महाशय, सर्व बिशप्स, धर्मगुरू, धर्मबंधू-धर्मभगिनी
यांनी त्यांच्या आचार-विचारातून श्रद्धावंतांपुढे चांगला आदर्श ठेवावा तसेच त्यांच्या
कामात प्रभूचा वरदहस्त त्यांना सतत लाभावा व त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या ख्रिस्ती
धर्माची प्रगती होत राहावी,
म्हणून आपण प्रभूकडे
प्रार्थना करूया.
२. हे परमेश्वरा तू दैवी वैद्य
आहेस, आजारामुळे ज्या व्यक्तींचे मानसिक संतुलन
बिघडले आहे अशांना तू आधार व दिलासा दे तसेच तुझ्या
सुखद हाताचा स्पर्श करून त्यांना तू चांगले आरोग्य द्यावेस, म्हणून आम्ही तुजकडे प्रार्थना करतो.
३ जेथे दहशतवाद, आंतकवाद, ताणतणाव निर्माण झाले आहेत अशा ठिकाणी परमेश्वराने त्याची शांती निर्माण करावी व युद्ध
राष्ट्रांमध्ये समेट घडवून आणण्यास जगभर ज्या अनेक संघटना कार्यरत
आहेत, त्यांच्या कार्याला
यश प्राप्त व्हावे, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment