Tuesday, 25 August 2015


Reflections for the Homily on 22nd Sunday Of Ordinary Time  (30/08/2015)   by John Mendonsa.





                     सामान्यकाळातील बाविसावा रविवार 


दिनांक: ३०/०८/२०१५.
पहिले वाचन: अनुवाद ४: १-२, ६-८.
दुसरे वाचन: याकोब १:१७-१८, २१-२२, २७.   
शुभवर्तमान: मार्क: ७:१-८, १४-१५,२१-२८. 

   
  
प्रस्तावना:             
ख्रिस्ताच्या सान्निध्यात जमलेल्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत. आज आपण सामान्यकाळातील बाविसावा रविवार साजरा करत आहोत. आजची उपासना आपणा सर्वांस देवाच्या प्रेमावर व देवाच्या नियमांवर विचार-विनिमय करण्यास आवाहन करत आहे.  
आजच्या उपासनेतील तिन्ही वाचने आपणांस धार्मिक विधी व नियम ह्यांची जाणीव करून देत आहेत. हे धार्मिक विधी व नियम आपण सर्वांनी आपल्या दैनंदिन जीवनात कशाप्रकारे आचरणात आणले पाहिजेत ह्याचे सुस्पष्टीकरण देत आहेत.
प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला, धार्मिक विधी व नियम ह्यांचे केवळ ज्ञान न जोपासता हे धार्मिक विधी व नियम ख्रिस्ताच्या शिकवणुकीप्रमाणे सत्याने आचरणात आणावे म्हणून आपण ह्या पवित्र मिस्साबलीदानामध्ये प्रार्थना करू या.

पहिले वाचन: अनुवाद ४: १-२, ६-८
देवाबरोबरच्या कराराच्या नात्यामध्ये इस्रायल लोकांकडून देवाला नेमके काय अपेक्षित होते, ते ह्या अध्यायातून स्पष्ट केले आहे. अनुवादाच्या पुस्तकात, ‘नियमशास्र’ या शब्दाचे वेगवेगळे अर्थ योजिले आहेत. उदा. विधी व नियम. अनुवाद ४:१-२ मध्ये नियमशास्रासाठी असे तीन वेगवेगळे शब्द योजिले आहेत. उदा. विधी, नियम आणि आज्ञा.
देवाच्या आज्ञा पाळणारेच देवाच्या आशीर्वादात राहतात व त्यांनाच जीवन लाभते हे ४:१ वरून स्पष्ट होते. इस्त्राएल जनतेने देवाच्या आज्ञेत तसेच काहीही अधिक उणे न करता देवाचे विधी व नियम काळजीपूर्वक पाळावेत.

दुसरे वाचन: याकोब १:१७-१८, २१-२२, २७.   
वचन १७ मध्ये याकोब ‘देवाला’ ज्योतीमंडळाचा पिता असे संबोधतो. तो विश्वाचा निर्माता व नियंत्रक आहे. त्याने निर्माण केलेले ग्रह, तारे बदलतात परंतु देव कधीही बदलत नाही. तो नेहमी होता तसाच आहे व असणार. म्हणूनच प्रत्येक उत्तम देणगी आणि प्रत्येक पूर्ण दान आपल्याला पित्याकडून लाभते. पित्याने प्रेमाने आणि सत्य वचनाने आपल्याला नवजन्म दिला आहे. ह्यात पित्याचा उद्देश हाच आहे की, आपण त्याच्या सृष्ट वस्तूंतील जणु काय प्रथम फळ व्हावे.
     याकोबने केवळ शास्त्रलेखाचे बौद्धिक ज्ञान असणे, भक्तीपर शिक्षण मिळालेले असणे एवढेच पुरेसे नाही तर “वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका. वचन २७ नुसार शुद्ध व निर्मळ धर्माचरण म्हणजे खरे धर्माचरण होय. ह्यामध्ये प्रीतीकर्मांचा समावेश असावा. उदा. अनाथांची काळजी घेणे, विश्वाची काळजी घेणे आणि स्वत:ला जगापासून निष्कलंक ठेवणे होय.  

शुभवर्तमान: मार्क: ७:१-८, १४-१५,२१-२८.      
     यहुद्यांच्या अनेक रूढी होत्या व त्या ते काटेकोरपणे पाळीत असत. काही मौखिक हस्तगत रूढी वाड-वडीलांपासून चालत आल्या होत्या. त्यातीलच एक परंपरा म्हणजे जेवणापूर्वी हात धुणे.
     यहुदी लोक हात स्वच्छ व्हावेत म्हणून ते धूत नव्हते तर ‘हात स्वच्छ धुणे म्हणजे विधीपूर्वक स्वच्छ होणे असे होते व जर अशुद्ध हातानी, म्हणजे हात न धुता जेवण केले तर जेवणही अशुद्ध होते असा त्यांचा विश्वास होता. ह्याच हेतूने यहुदी लोक प्याले, घागरी, पितळेची भांडी व इतर पात्रे विधी म्हणून धूत असत (मार्क: ७:४).
त्याचप्रमाणे यहुदी लोक बाजारात जात तेव्हा चुकून त्यांना इतर लोकांचा स्पर्श होत असे मग ते स्वत:ला अशुद्ध मानत असत. त्यांना जेवणापूर्वी विधिवत स्नान करावे लागत असे. अशाप्रकारचे शेकडो नियम होते. ह्या नियमांच्या आधारावरच परुशी व शास्री यांनी येशूला व त्याच्या शिष्यांना ते वाड-वडीलांच्या परंपरा पाळीत नाहीत म्हणून दोष दिला कारण जेवणापूर्वी त्यांनी हात धुतले नव्हते.
     आपल्या शिष्यांनी परंपरा मोडल्या हे येशूने नाकारले नाही. परंतु या परंपरा केवळ मानवनिर्मित आहेत, देवनिर्मित नाहीत ह्या मुद्द्याद्वारे त्याने आपल्या शिष्यांचे समर्थन केले. कारण प्रभू येशूला परुशी व शास्री यांचा ढोंगीपणा माहित होता. ते बाहेरून शरीर जरी स्वच्छ करीत असले तरी त्यांचे हृद्य मात्र मलीन होते. येथे त्यांचा गर्विष्टपणा येशू त्यांना दाखवून देतो. त्यांच्यात देवाबद्दल प्रीती नव्हती. ओठांनी ते मोठ्या प्रार्थना करीत होते, पण अंत:करणपूर्वक ते देवाची भक्ती करीत नव्हते व त्याला सन्मान देत नव्हते. ते खरोखर ढोंगी होते. (यशया २९:१३) संदेष्ट्याच्या ग्रंथातील एका मर्मभेदक वाचनाने प्रभू ख्रिस्ताने हा मुद्दा सिद्ध केला आहे. (मार्क:७:६-७).
     यहुद्यांनी वाड-वडीलांपासून चालत आलेल्या चालीरीतींना देवाच्या वाणीपेक्षा जास्त महत्व दिले. यामधील अनेक रूढी देवाच्या आज्ञेविरुद्ध होत्या, ह्या रूढी पाळत असताना यहुदी लोक देवाची आज्ञा मोडीत होते, म्हणूनच प्रभू येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही देवाची आज्ञा बाजूला सारून माणसांच्या संप्रदायाला चिकटून राहता” (मार्क: ७:४).
     यहुदी वाड-वडीलांच्या परंपरा लक्षात ठेवून अशुद्ध हातांनी जेवण न करण्यासंबंधी काळजी करीत होते. अशुद्ध हातांनी जेवण केले तर जेवणही अशुद्ध होईल व असे अशुद्ध जेवण खाल्ल्यामुळे ते स्वत: अशुद्ध होतील असे त्यांना वाटत होते. परंतु येशू म्हणतो की, ‘बाहेरून माणसाच्या आत जाणाऱ्या गोष्टी त्याला भ्रष्ट करते असे नाही तर माणसाच्या आतून जे निघते तेच त्याला भ्रष्ट करते’. मार्क: ७:१५. ह्या वचनाचे समर्थन येशू ख्रिस्त २०,२१ आणि २३ ह्या वचनामधून करतो.

बोधकथा:
1. एका गावात एक श्रीमंत साधू राहत होता. तो आणि त्याचे कुटुंब अगदी धार्मिक प्रवृत्तीचे होते. घरात आणि मंदिरात रोज पूजा-अर्चना करणे, धार्मिक रिती-रिवाज रोज आचरणात आणणे, हा त्यांचा नेहमीचाच नित्यक्रम झाला होता. गावामध्ये कोणताही समारंभ असल्यास धार्मिक विधीचा खर्च तो अगदी आनंदाने दानधर्म करत असे.
     ह्याच कुटुंबाच्या अगदी शेजारी एक गरीब कुटुंब राहत होते. रोजची शिदोरी मिळविण्यासाठी त्यांना अतोनात कष्ट करावे लागत असत. वेळप्रसंगी त्यांना अनेकदा उपाशीच धरणी मातेच्या उराशी झोपावे लागे. ह्या गरीब कुटुंबाजवळ एक गाय होती, ह्या गायीसाठी श्रीमंत साधू दररोज त्याच्या धार्मिक विधीचा भाग म्हणून चार भाकऱ्या खायला घालत असे. तो जेव्हा-जेव्हा त्या भाकऱ्या गायीसाठी घेऊन येत असे, तेव्हा-तेव्हा त्या गरीब कुटुंबातील मुले त्यांना काहीतरी खायला मिळेल ह्या आशेने लागलीच धावत येत असत, परंतु हा साधू त्याच्या धार्मिक रिती-रिवाजामध्ये इतका रमलेला असायचा कि, त्याला कधीच त्या गरीब कुटुंबाचा कळवळा आला नाही.

२. एक मध्यमवर्गीय सु:खी-समाधानी धार्मिक कुटुंब होते. स्वत:च्या कष्टाच्या घामावर आपला उदरनिर्वाह अगदी आनंदाने भागवत होते. बऱ्याच वर्षापासून ह्या कुटुंबाने त्यांच्या उराशी एक स्वप्न बाळगून ठेवले होते, ते म्हणजे, त्यांना तीर्थ-यात्रेला जाऊन देवाचे दर्शन घ्यायचे होते.
     प्रत्येक वर्षी अपुऱ्या निधिस्तव त्यांचे स्वप्न जणूकाही काळ्या-कुट्ट ढगाआड दडले जाई, म्हणूनच त्यांनी मनाचा ठाम निर्धार केला कि, प्रत्येक महिन्यात थोडीफार पोटाची काटकसर करून त्यांचे स्वप्न पूर्ण करायचे. दोन वर्षाच्या कालावधीतच त्यांच्याजवळ आता तीर्थयात्रेला जाण्यापुरता पुरेशा निधी जमलेला होता. तीर्थयात्रा अगदी एक आठवड्याच्या कालावधीवर येऊन ठेपलेली होती, इतक्यातच त्यांच्या शेजारील छोट्या मुलाला “ब्रेन-टुमर” चा आजार जडला आणि त्याला लागलीच ओपरेशनची(शस्रक्रियेची) नितांत गरज होती. अश्या बिकट परिस्थितीत त्या धार्मिक कुटुंबाने त्यांच्या स्वप्नांचा विचार न करता त्यांच्याकडील जमवलेला तीर्थ-यात्रेचा सर्व निधी त्या मुलाच्या ओपरेशनसाठी त्याच्या आईवडिलांकडे सुपूर्त केला. अश्या रितीने त्यांना दुसऱ्यांच्या आनंदाद्वारे तीर्थ-यात्रा न करता, खऱ्या अर्थाने देवाचे दर्शन घडले होते.

मनन चिंतन:
     परुश्यांच्या धर्मामध्ये देवावरील प्रीती, प्रेमळ वृत्ती, मायाळू स्वभाव आणि वर्तन यांना काहीच स्थान नव्हते. ह्या उलट काही विशिष्ठ धार्मिक आचार-विचार आणि धार्मिक विधी ह्यांनाच सर्वोच्च स्थान ते देत. हे धार्मिक विधी ते अगदी काटेकोरपणे पाळीत असत. जेवणापूर्वी ते आपले हात स्वच्छ धुवत कारण हातांच्या अशुद्धतेने अन्नही धार्मिक दृष्ट्या अशुद्ध होते असा त्यांचा समज होता. पण आपल्या अंत:करणातील दुसऱ्याविषयीचा वैरभाव, वाईट विचार व दृष्टपणा काढून आपले अंत:करण धुण्याचे व शुद्ध करण्याचा विचार त्यांच्या मनाला कधी स्पर्शही करीत नसे. आपल्या दुकानातून किंवा बाजारांतून घरी आले कि तत्काळ ते हात पाय धूत, स्नान करीत कारण जगातील व्यवहाराने व जगातील इतर व्यवहारिक व्यक्तींच्या स्पर्शाने आपण अशुद्ध होतो असे ते मानत, पण दुसऱ्यांशी न्यायाने, प्रामाणिकपणे आणि सत्याने व्यवहार करावा याची त्यांना काळजीच नव्हती. घरातील सारी भांडी, ताट सर्व सजावटीचे सामान वैगेर विधिवत शुद्ध करण्यावर त्याचा कटाक्ष होता. पण आपले अंत:करण शुद्ध आहे का? ते देवाला वस्ती करण्याजोगे आहे का? हे पाहण्यास मात्र त्यांना क्षणाचीही फुरसत नव्हती.
     आपले दैनंदिन धर्माचरण सुद्धा परुश्यांच्या धर्माचरणासारखे होऊ नये म्हणून आपण नेहमी सावध असले पाहिजे. आज आपण आपल्या समाजात पाहतो की, कित्येक लोक ख्रिस्ती धर्माचे व देऊळ मातेचे नियम अगदी काटेकोरपणे पाळतात अनेक लोक दररोज प्रार्थना करीत असतात, पवित्र शास्राचे वाचन करतात, विविध संतांच्या नोव्हेनाची प्रार्थना करतात, उपवास करतात परंतु ह्या लोकांच्या हातून एक क्षणभरही, कणाएवढेही सत्य धर्माचरण(शेजाऱ्याबद्दल प्रेमभावना) होत नसेल तर ह्या लोकांना प्रभू येशू आजच्या शुभवर्तमानात म्हणतो, ‘हे लोक ओठांनी माझा सन्मान करतात परंतु त्यांचे अंत:करण माझ्यापासून दूर आहे, ते व्यर्थ  माझी उपासना करतात’.
     आपला स्वभाव, वृत्ती आणि अंत:करण यांच्यामध्ये जर का ख्रिस्ताचा आत्मा, ख्रिस्ताची वृत्ती आणि ख्रिस्ताचे प्रेम नसेल तर आपले सर्व प्रकारचे धार्मिक आचरण हे व्यर्थ आहे. कारण ख्रिस्ती धर्माची कर्तव्यपुर्ती ही देवावर आणि आपल्या शेजाऱ्यावर  प्रेम करणे यात सामावलेली आहे. ‘ख्रिस्ती प्रीती’ ही एकेरी नसून दुहेरी आहे आणि ही दुहेरी प्रीती (देव+शेजारी) आमच्या अंत:करणात नसेल व आपले जीवन आणि आपला स्वभाव यांच्यामधून ती प्रीती व्यक्त होत नसेल तर आमचे धर्माचरण आणि आपली धार्मिकता व्यर्थ आहे. हाच मुद्दा संत याकोब आजच्या दुसऱ्या वाचनाद्वारे स्पष्ट करीत असताना म्हणतो, ‘देव पित्याच्या दृष्टीने शुद्ध व निर्मळ धर्माचरण म्हणजे अनाथांचा व विधवांचा त्यांच्या संकटात समाचार घेणे व स्वत:ला जगापासून निष्कलंक ठेवणे होय’ (याकोब: १:२७).
म्हणूनच आपले स्वच्छ हात, चकाकणारे घर, लखलखणारी भांडी, ताटे-वाट्या यांनी नियमग्रस्त धर्माचरण असूनही जर का आपल्या अंत:करणात देवाविषयी आणि आपल्या शेजा-याविषयी प्रीतीचा लवशेषही नसेल तर आपले नियमग्रस्त धर्माचरण देवाला कधीही मान्य होणार नाही. म्हणूनच प्रभू येशू म्हणतो, ‘जे कोणी अंत:करणाचे शुद्ध ते धन्य कारण ते देवाला पाहातील’ (मत्तय: ५:८).

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: ऐकावी प्रार्थना, करतो मी याचना
१. आपल्या धार्मिक नेत्यांनी, देऊळ मातेची शिकवणूक सर्व ख्रिस्ती लोकांपर्यंत पोहचवावी व त्यांना ती योग्यरीतीने आचरणात आणण्यासाठी योग्य ती मदत करावी म्हणून आपण प्रार्थना करू या.
२. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने एकमेकांच्या सु:खदुःखात सह्भागी होऊन एकमेकांस साह्य करावे व प्रभू ख्रिस्ताचा प्रेमाचा, दयेचा आणि क्षमेचा संदेश आपल्या आचरणात आणावा म्हणून आपण प्रार्थना करू या.
३. आपल्या पॅरीशमधील आजारी माणसांना चांगले आरोग्य, बेरोजगारांना रोजगार आणि दुःख-संकटात सापडल्यांना प्रभूचे धैर्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करू या.
४. ख्रिस्ती श्रद्धेमुळे ज्या लोकांवर अन्याय, अत्याचार होत आहेत, अश्या लोकांना ख्रिस्ती श्रद्धेशी एकनिष्ठ राहण्यासाठी प्रभू परमेश्वराचे सामर्थ्य व धैर्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करू या.
५. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.



No comments:

Post a Comment