सामान्यकाळातील एकविसावा रविवार
दिनांक:
२३/०८/२०१५.
पहिले वाचन: यहोशवा
२४:१-२,१५-१८.
दुसरे वाचन: इफिस
५: २१-३२.
योहान: ६:६०-६९.
प्रस्तावना:
आज आपण सामान्यकाळातील एकविसावा रविवार साजरा करीत आहोत. आजची तिन्ही वाचने
आपल्याला देवाचे महत्व पटवून देतात.
पहिल्या वाचनात यहोशवा आपल्या लोकांना
देवापासून दूर गेल्याची आठवण करून देतो व लोकांना त्याची जाणीव होते. पौलाचे
इफिसकरांस पत्र ह्यातून घेतलेल्या दुसऱ्या वाचनात आपण पाहतो, संत पौल हा ख्रिस्ती
कुटुंबाचा जीवनक्रम कसा असावा याविषयी आपणास माहिती देतो. योहानकृत शुभवर्तमानात
आपण ऐकतो, संत पेत्राने येशू हा ‘ख्रिस्त’ असल्याची दिलेली कबुली ह्याविषयी ऐकतो.
पेत्राने पूर्ण विश्वासाने येशूला उत्तर दिले, ‘प्रभूजी सार्वकालिक जीवनाची वचने
आपणाकडे आहेत तर तुम्हाला सोडून आम्ही कुणाकडे जावे?’
पेत्राला धैर्य व विश्वासाने तारले. तेच धैर्य
व विश्वास पेत्राप्रमाणे आपल्यालाही प्राप्त व्हावा, तसेच खरा ख्रिस्ती जीवनक्रम कळून
व चांगले ख्रिस्ती जीवन जगण्यास प्रभूची प्रेरणा मिळावी म्हणून आपण ह्या
मिस्साबलीत प्रार्थना करूया.
सम्यक-विवरण
पहिले वाचन:
यहोशवा २४:१-२, १५-१८.
यहोशवा हा मोशेच्या काळातला इस्रायलच्या अनेक नेत्यांपैकी एक महान धाडसी नेता
होता. तो साधा, सरळ, धाडसी, निर्भय, पारदर्शक, लढवया नेता म्हणून प्रसिद्ध होता.
त्याची निर्भयता केवळ त्याच्या व्यक्तिमत्वामुळे नव्हे तर परमेश्वराचे अस्तिव
त्याच्या बरोबर होते म्हणून त्याला निर्भयता प्राप्त व यश मिळत गेले. ज्यावेळेला
लोकांनी परमेश्वराच्या इछेकडे दुर्लक्ष केले आणि ते वाईट मार्गाला लागले तेव्हा
यहोशवाने परखड भूमिका घेऊन लोकांना मार्गावर आणले. ईश्वरइच्छेपुढे त्याने कोणतीही
तडजोड केली नाही.
यहोशवाने आपल्या लोकांना एकत्र करून त्यांना अखेरचा संदेश देण्याचे ठरविले.
कोणत्याही कर्तबगार पुरुषाने तसेच केले असते. एखाद्या नेत्याने समाज एका विशिष्ट
शिखरावर पोहचविल्यानंतर त्याच दिशेने व गतीने वाढ व्हावी ही त्याची अपेशा असते.
यहोशवाने आपल्या सर्व श्रेष्ठींना, प्रसारकांना आणि प्रजेला बोलावून त्यांना
परमेश्वराच्या चांगुलपणाची आठवण करून दिली.
परमेश्वराने इस्रायलच्या दुधा-मधाच्या
प्रदेशात कसे नेले हे दाखवून दिले. यहोशवाने आपल्या लोकांना हिंमत दिली.
धर्मशास्त्र पाळावे व प्रभूच्या म्हणण्याप्रमाणे चालावे म्हणजे परमेश्वर त्यांना
यशस्वी करील असा आदेश दिला.
दुसरे वाचन:
इफिस ५: २१-३२.
दुसऱ्या वाचनात संत पौल हा आपणास ख्रिस्ती जीवन कसे असावे, तसेच पती-पत्नींनी त्याची
जबाबदारी कुटुंबात कशी पार पाडावी ह्याचे महत्व पटवून देतो. आपल्याला माहित आहे.
संत पौल व सर्वाना तो बदलवितो. कारण त्याचे परिवर्तन झाले होते व तेच परिवर्तन तो
सर्व ठिकाणी प्रगट करतो व अनेकांना ख्रिस्ता जवळ आणतो. इफिस पत्रात तो आपणास
ख्रिस्ती जीवनक्रम कसा असावा ह्याविषयी मार्गदर्शन करतो. विशेष करून पती-पत्नीचे
जीवन कसे असावे ह्याविषयी कानउघडणी करतो.
बोधकथा:
1. रेखा व सुनील ह्याच चांगले कुटुंब होते. त्याच्या
संसारवेलीवर देवाने दोन गोंडस मुले दिली होते. त्यांचा चांगला संसार होता. सुनीलला
देवाच्या कृपेने चांगली नोकरी होती. रेखा घरकाम मुलाचा अभ्यास व इतर कामे करायची.
सर्व काही व्यवस्थित चालले होते. दिवसमागून दिवस भरत होते. अचानक एक दिवस सुनील
रात्री कामावरून येत असताना त्याला भरधाव गाडीने धडक दिली. त्याचा अपघात होऊन तो
मरण पावला. होत्याचे नव्हते झाले रेखावर खूप मोठे संकट आले. घरातला कर्ता-पुरुष
गेला. मागे दोन मुले व त्याची पत्नी एकटी राहिली.
हळूहळू दु:खाचे दिवस सरले. रेखाला खूप एकाकी वाटू लागले.
त्यात तिचा भाऊ तिला व मुलांना त्याच्या घरी घेऊन आला. माहेरी आल्यावर
रेखा दु:खातून अद्याप सावरली नव्हती तोच, तिला तिच्या वहिनीकडून खूप काही बोलणी
ऐकावी लागली. कारण एकतर ती विधवा होती आणि पदरी दोन मुले होती, शिवाय ती भावाच्या
घरी आली होती. कारण खूप महिने ती भावाकडे राहिली होती व तिच्या वहिनीला त्याचा भार
वाटत होता.
एकदिवस रेखा मोठ्या धैर्याने तिच्या भावाच्या पाया पडते व
रडू लागते व म्हणते `भाऊ मला तुझ्याशिवाय कोणीच नाही, तुला सोडून कोठे जाऊ?” माझा
कर्ताकरविता तुच आहेस. भावाला तिच्या भावना कळतात. त्या सुद्धा खूप वाईट वाटते. काही
दिवसांनी रेखा तिच्या घरी येते. तिचा भाऊ शेवटपर्यंत त्याच्या कर्तव्याला जागतो व तो
तिची शेवट पर्यंत काळजी घेतो.
आजच्या शुभवर्तमानात काही शिष्य येशुस सोडून निघून जातात
परंतु पेत्र शेवटपर्यंत प्रभूवर श्रद्धा ठेवून धैर्याने त्याच्या सोबतीस राहतो.
मनन-चिंतन
आज शुभवर्तमानात अध्याय ६:६०-६९ ह्या वचनावर आपण चिंतन करत आहोत. परंतु ह्या
वचनाचा संदर्भ वचन २२ पासून सुरु होतो. त्यात येशु मी ‘स्वर्गातून उतरलेली जीवनाची भाकर
आहे असे म्हणतो.’ ख्रिस्ताने पाच भाकरी व दोन मासाचा चमत्कार केल्यानंतर लोकांनी
त्याचे चिन्हे बघितली व “हा खरोखर एक संदेष्टा आहे, जो ह्या जगामध्ये आला आहे म्हणू
लागले. लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला व त्याला त्यांचा संदेष्टा मानू लागले –
इथपर्यंत ठीक आहे. परंतु ख्रिस्ताने सांगितले की “स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर
मीच आहे” त्याच्याही पलिकडे जाऊन ख्रिस्ताने सांगितले, ‘तुम्ही मनुष्यांच्या
पुत्राचा देह खाल्ला नाही व त्याचे रक्त प्याला नाही तर तुम्हांला जीवन नाही.’
जो माझे देह खातो व रक्त पितो त्याला सार्वकालिक जीवन
प्राप्त होते. आणि मीच त्याला शेवटच्या दिवशी उठवील कारण माझा देह खातो व
माझे रक्त पितो तो माझ्यात राहतो व मी त्याच्यात राहतो. आता मात्र लोकांना हे वचने
कठीण वाटू लागली होती. त्यांनाच नाही तर त्याच्या शिष्यांपैकी पुष्कळ जण हे ऐकून
म्हणाले हे वचने कठीण आहे. हे कोण ऐकून घेऊ शकतो? ह्यावरून त्याच्या शिष्यांपैकी
पुष्कळ जण परत गेले. आणि ते पुन्हा कधी ह्याच्याबरोबर चालले नाही. कारण त्यांना
ख्रिस्ताची वचने खूप काही कठीण वाटली. ते कुरकुर करु लागले व येशूने त्याच्या मनातील
विचार ओळखले व त्यांच्या बारा शिष्यांना म्हणाला ‘तुमचीही निघून जाण्याची इच्छा
आहे काय?’
हाच प्रश्न ख्रिस्त आपणा सर्वांना
विचारत आहे, आज आपले उत्तर काय आहे? आपण ह्या पेत्राप्रमाणे धाडस करु काय?
पेत्राने धर्याने उत्तर दिले. पेत्र म्हणाला “प्रभूजी आम्ही कोणाकडे जावे?
सार्वकालिक जीवनाची वचने तर आपणाजवळ आहेत” आणि आम्ही विश्वास ठेवला आहे व ओळखले
आहे कि, देवाचे पवित्र पुरुष आपण आहात किती धैर्याने व विश्वासाने त्याने
ख्रिस्ताला ओळखले. म्हणून आपण चिंतन करूया कि, आपण आपल्या जीवनात कसे वागलो.
पेत्राप्रमाणे कि, इतर शिष्यांप्रमाणे कुरकुर करतो व पळून जातो? कधी कधी त्या
शिष्यांप्रमाणे आपल्यालाही वचने कठीण वाटू लागतात.
येशूने आपले शरीर व रक्त हे आपल्या
बलिदानाद्वारे आपणास दिले, मरणाअगोदर येशूने भाकर घेतली व द्राक्षरस घेतला व ते
रक्त म्हणून आपणास अर्पण केले. त्याच दिवशी मिस्सा बलिदान स्थापना केला. म्हणूनच
रोज मिस्साद्वारे त्याची आठवण करतो. पवित्र मिस्सा हे आज सुद्धा मोठे आव्हान आहे.
पवित्र मिस्सा ख्रिस्तावरील आपल्या श्रद्धेचे प्रतिक आहे. पवित्र मिस्सा हा एक संस्कार आहे व आपल्या सर्व विश्वासू
ख्रिस्ती लोकांचे आव्हान आहे. जी ख्रिस्तसभा रोज साजरी करतो
पेत्राप्रमाणे
आपण विश्वास धरीला पाहिजे व धैर्याने कार्य केले पाहिजे. आपण आपला विश्वास
पेत्राप्रमाणे मजबूत केला पाहिजे. विश्वास हा वैयक्तिक निर्णय आहे. तो नुसताच
कोणाला खुश करण्यासाठी किंवा बाहेरून पाठींबा देणारा नसावा. तरख्रिस्ताची निवड
करणारा असावा व देवाची कबुली देणारा असावा. म्हणजे एखादा बिकट प्रसंग आला व जर
आपला विश्वास दृढ व मजबूत असेल तर त्याचा फायदा जसा पेत्राला झाला होता तसाच
आपल्यालादेखील व्हावा. म्हणून आपला विश्वास मजबूत असला पाहिजे.
ख्रिस्त आज आपल्याला पेत्रासारखे जीवन जगण्यासाठी व
त्याच्या विश्वासाने व धैर्याने वाढण्यास बोलावीत आहे ख्रिस्त आपल्याला जो मार्ग
दाखवीत आहे. पेत्राप्रमाणे आपला विश्वास व धैर्य वाढावे म्हणून आपणा प्रभूकडे
प्रार्थना करूया.
“तुज सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे मी राहू कुठे”.
विश्वासू
लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद : हे
येशू दया कर व तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक.
१.ख्रिस्तसभेत
कार्य करणारे आपले पोप, कार्डीनल्स, बिशप, फादर्स, सिस्टर्स व ब्रदर्स व इतर सर्व
मिशनरी बंधू-भगिनींना देवाचे कार्य करण्यास कृपा व प्रेरणा मिळावी म्हणून
प्रार्थना करूया.
२. आपल्या
देशातील व राज्यातील सरकारने चांगल्या प्रकारे लोकांची सेवा करावी व निस्वार्थीपणे
कार्य करण्यास त्यांना परमेश्वराची कृपा लाभावी म्हणून प्रार्थना करूया.
३. ह्या वर्षी
चांगला पाऊस पडावा व शेतकऱ्यांना चांगले पीक घेता यावे तसेच त्यांच्या
शेती-बागायतीवर देवाचा आशिर्वाद सदैव असावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. जे
तरुण-तरुणी देवापासून दूर गेले आहेत, जे व्यसनाच्या आहारी गेले आहेत, ज्यांना
नोकरी नाही, अश्या सर्वांना प्रभूने त्याच्या प्रकाशात आणावे म्हणून आपण प्रार्थना
करूया.
५. जे लोक आजारी
आहेत, दु:खी व कष्टी आहेत, ज्यांच ह्या जगात कुणीच नाही व जे जीवनाला कंटाळले आहेत
अश्या सर्वावर देवाचा कृपाशिर्वाद असावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
This comment has been removed by the author.
ReplyDelete