Tuesday 4 August 2015


Reflections for the homily of 19th Sunday in Ordinary Times By: Baritan Nigrel.









सामान्य काळातील एकोणिसावा रविवार





दिनांक: ०९/०८/२०१५.
पहिले वाचन: १ राजे १९:४-८                               
दुसरे वाचन: इफिसीकरांस पत्र ४:३०-५:२
शुभवर्तमान: योहान ६: ४१-५१

“स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे



प्रस्तावना:
आज आपण सामान्य काळातील एकोणिसावा रविवार तसेच ‘संत जॉन मारी वियानी’ यांचा सण साजरा करीत आहोत. पहिल्या वाचनात आपण बघतो की, ‘दुबळा, चुकलेला व भांबावलेला एलिया, देवाच्या इच्छेने व कृपा-शक्तीने होरेब डोंगरावर पोहचतो आणि देवाची कामगिरी हाती घेतो. दुसऱ्या वाचनात संत पौल आपल्याला पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने देवाचे अनुकरण करण्यास आणि आपले मन ख्रिस्तासारखे बनवून प्रीतीने वागण्यास सांगत आहे. तर शुभवर्तमानात, योहान सुवार्तिक आपणास येशू ख्रिस्त ‘स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर आहे’ हे स्पष्ट करतो.
आज आपण धर्मगुरूंचा दिवस साजरा करीत असताना, ह्या पवित्र मिस्साबलीदानात आपल्या खिस्ती जीवनाला स्पर्श करणा-या सर्व धर्मगुरूंसाठी आणि विशेष करून आपले प्रेमळ प्रमुख धर्मगुरू फा. ....... आणि त्यांचे सहाय्यक धर्मगुरू फा........... ह्यांना देवाने त्याच्या प्रेमाचा, मायेचा आणि क्षमेचा संदेश जगजाहीर पसरविण्यासाठी कृपा-शक्ती व त्यांना चांगले मानसिक व शारीरिक आरोग्य प्रदान करावे म्हणून प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:
पहिले वाचन: १ राजे १९: ४-८                              
या वाचनात एलीयाच्या स्वभावाची दुसरी बाजू आपणाला दिसते. इजबेलच्या धोक्याने एलियाने पळ काढला आणि थेट बैरशेबाच्या दक्षिणेस असलेल्या रानात गेला. तेथे उदासवाण्या निराश अवस्थेत गुंग होऊन त्याने मरण यावे अशी प्रार्थना केली. तेव्हा देवाच्या देवदुताने त्याला शक्ती पुरवली आणि त्या शक्तीने तो पुढचा प्रवास करीत होरेब या डोंगरावर पोहचला. देवाने होरेब ह्याच ठिकाणी मोशेला कामगिरी सोपवून दिली होती (निर्गम ३) आणि ह्याच ठिकाणी देवाने इस्रायलला दहा आज्ञा देण्यासाठी धूर, अग्नी व मेघगर्जना यातून दर्शन दिले होते (निर्गम १९, २०).

दुसरे वाचन: इफिसीकरांस पत्र ४:३०-५:२
खऱ्या व पवित्र जीवनासाठी आपल्याला पवित्र आत्माची गरज असते. यासाठी संत पौल आपल्याला सांगत आहे कि, पवित्र आत्माच्या नियंत्रणाखाली रहा. कारण ख्रिस्ताने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीमुळे आपणाला नवीन शरीर मिळणार आहे. आपले मन ख्रिस्तासारखे बनावे व आपण देवाचे अनुकरण करून देवाची मुले बनावे, म्हणून पवित्र आत्मा आपल्याला नेहमी सहाय्य करत असतो.

शुभवर्तमान: योहान ६: ४१-५१
शुभवर्तमानामध्ये योहानाने ‘भाकरीचा’ विषय मांडला आहे. येशू म्हणतो, “मी स्वर्गातून उतरलेली भाकर आहे” (योहान ६:४१). स्वर्गीय भाकरी मान्न्यापेक्षा श्रेष्ठ आहे. स्वर्गीय भाकरी जीवन देणारी, तर मान्ना काही मरणापासून बचाव करु शकत नाही (४९, ५०). ओवी ५१ मधून येशूने एक महत्त्वाचे विधान केले आहे. त्यात त्याने आपणच जिवंत भाकर असल्याचा दावा केला आहे. जीवनाची भाकर व जिवंत भाकर हे समानार्थी असले तरी येथे जिवंत भाकर व मान्ना यांतील भेद स्पष्ट दिसून येतो. पूर्वी पिता ‘मान्ना’ देणारा होता आणि आता येथे स्वतः येशूच ‘जिवंत भाकर’ देणार आहे. देह या शब्दाने येशूच्या मानवी जीवनाचा उल्लेख होतो; पण यहुद्यांनी त्याविषयी गैरसमज करून घेतला.

बोध कथा:
आपल्या व्यवसायात यशस्वी ठरलेला एक तरुण ऑफिसर आपल्या नव्या मारुती मोटार गाडीत भरधाव वेगाने रस्त्यावरून जात होता. प्रवासात असताना त्याच्या गाडीच्या एका बाजूच्या खिडकीवर एक विटेचा तुकडा आदळताना त्याला दिसला. त्याने गाडी एकदम थांबवली व ती मागे घेतली. विटेचा तुकडा पडला होता तिथपर्यंत नेली. रागाने भडकलेला तो ड्रायवर गाडीतून खाली उतरला, जवळच असलेल्या एका मुलाला त्याने धरले, गाडीजवळ फरफटत खेचले व त्याच्यावर तो ओरडला, ‘कोण आहेस रे तू? काय केलेस हे? ही गाडी नवी आहे आणि त्या विटेच्या फटक्यामुळे गाडीचे भयंकर नुकसान झाले आहे. तिच्या दुरुस्तीसाठी अवाढव्य खर्च होणार आहे, हे कळत का तुला? कशाला केलेस ते?
तो तरुण पोरगा माफी मागत भीतभीत म्हणाला, ‘मला क्षमा करा सर. पण मला दुसरा पर्याय उरला नव्हता. विटेचा तुकडा मी तुमच्या गाडीवर भिरकावला, कारण कोणीच गाडी थांबवत नव्हते’. डोळ्यात पाणी आणत, त्या मुलाने आपला हात जवळच्या खड्ड्याकडे दाखवत म्हणाला, ‘माझा भाऊ त्या खड्ड्यात पडला आहे. अपंगासाठी असलेल्या त्याच्या तीन चाकी सायकलवरून तो तेथे पडला आहे आणि त्याला वर उचलायला माझ्यात तेवढी ताकद नाही.’ रडत रडत तो पोरगा त्या ऑफिसरकडे विनंती करु लागला. ‘माझ्या भावाला वरती काढून त्याला अपंग सायकलवर बसविण्यास मला मदत करा.’
ऑफिसरचे मन गहिवरून आले. त्याने आपला सारा राग पोटात गिळला. घाईघाईने त्या अपंग मुलाला उचलले, त्याच्या खास सायकलवर त्याला बसवले. मग त्याने आपला रुमाल घेऊन गाडीच्या खिडकीची काच पुसली व सर्व काही ठीक आहे, असे भासवीत निघणार, इतक्यात तो पोरगा म्हणाला, ‘सर, फार आभारी. देवाचा आशीर्वाद तुमच्यावर असो.’
ख्रिस्ताला जो विश्वासाने स्वीकारतो, त्याचे जीवन ख्रिस्तासारखे होते. तो नेहमी दुसऱ्यांना समजून घेतो, त्यांना क्षमा करीतो व त्याच्यावर प्रीती करतो. कारण संत पौल म्हणतो, तुम्ही देवाची लेकरे आहात ह्या नात्याने तुम्ही देवाचे अनुकरण करा (इफिस ५:१).

मनन चिंतन:
देवाने हे संपूर्ण विश्व निर्माण केलं. सजीव सृष्टीसाठी देवाने सुयोग्य वातावरणाची निर्मिती केली. सजीवांसाठी पोषक अस अन्नधान्य, फळे आणि फुले निर्माण केली. मानवी जीवनास सुयोग्य अशी वातावरण निर्मिती केल्यांनतरच देवाने सृष्टीचा सम्राट व रक्षक म्हणून मानवाची निर्मिती केली (उत्पत्ती २:७).
पापांमुळे जे आरोग्य नष्ट झालं ते पु‌नर-प्रस्थापित करण्यासाठी ख्रिस्त धरतीवर अवतरला. मानवाला पापांची क्षमा करून पापांच्या शारिरीक, मानसिक व भावनिक दुष्परिणामातून मुक्त करण्यासाठी ख्रिस्त या जगात आला. म्हणूनच ख्रिस्त आपल्याला सांगत आहे, “मी स्वर्गातून उतरलेली भाकर आहे” (योहान ६:४१). येशु ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र भाकरीच्या रूपाने पवित्र ख्रिस्तशरीर कृपासंस्कारात उपस्थित असतो. तो आपल्याला सतत पाचारण करीत असतो, “अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही मजकडे या, मी तुम्हाला विसावा देईन” (मत्तय ११:२८). आपल्याला सगळ्यांना जीवनप्राप्ती व्हावी आणि ती विपुल प्रमाणात व्हावी म्हणून तो ह्या धरतीवर अवतरला (योहान १०:१०).
येशू ख्रिस्त जिवंत भाकर आहे, जो कोणी ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, त्याला जीवन प्राप्त होते (योहान ६:४७). ख्रिस्ताने अनेकांना बरे करून आरोग्यदान व नवीन जीवन दिले, ह्याविषयीच्या अनेक प्रसंगाची नोंद बायबलमध्ये आहे. दहा कृष्टरोगांना बरे करणे (लूक १७:११-१८), आंधळ्यांना दृष्टी देण (मार्क १०:४६-५२), अपंगाला बरे करणे (मत्तय ९:२). शताधीपतीच्या नोकराला आरोग्यादन देणे (लूक ७:१-१०), भूतग्रस्तातून भूत काढणे (मत्तय १७:१४-१७).
या घटनाद्वारे ख्रिस्ताच्या प्रेमाचा आपणास अनुभव येतो. दया म्हणजे कृतीशील प्रेम (Love is action). ईश्वर आपल्यावर निरपेक्ष  प्रेम करतो. त्या प्रेमाचा अनुभव घेणे म्हणजे त्याच्या पवित्र आत्म्याने परिपूर्ण होणे आणि पवित्र आत्म्याने परिपूर्ण होताच आपण ख्रिस्तासारखे होतो, नवीन जीवनाचा अनुभव घेतो.
आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल आपल्याला सांगतो कि, सर्व प्रकारचे कडुपण, संताप, क्रोध व मत्सर यांपासून दूर रहा. म्हणजेच ख्रिस्ताच्या प्रेमात राहून त्याचे अनुकरण करा. जशी देवाने ख्रिस्ताच्याठायी आपल्याला आपल्या पापांची क्षमा केली तशी क्षमा आपल्याला इतरांवर करायची आहे. ख्रिस्तासारखी प्रीती इतरांवर करण्यास ख्रिस्त आज आपल्याला सांगत आहे.
येशू ख्रिस्त जिवंत भाकर आहे. प्रत्येक मिस्साबलीदानामध्ये आपण ही जिवंत भाकर खातो. त्याच्या रक्ताचे व शरीराचे सेवन खऱ्या अर्थाने केल्यास माणसाला ख्रिस्ताचे जीवन मिळते. येशु ख्रिस्ताचे शरीर सेवन केल्याने आपणास पवित्र आत्मा मिळत असतो, हा पवित्र आत्मा आपल्याला समाज उभारणीसाठी शक्ती देतो, प्रेरणा देतो.
संत पौल म्हणतो, “जगतो जीवन नव्हे मी माझे ख्रिस्त जगात असे मम जीवनी” (गलतीकरांस २:२०). त्यानुसार आपणही पूर्णपणे ख्रिस्ताच्या पवित्र शरीराने ख्रिस्तमय होतो. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यामुळे आपण, आपण राहत नसतो तर ख्रिस्त आपल्या नसा-नसात भिनतो आणि आपण ख्रिस्तमय होतो. एक दैवी शक्ती आपल्यामध्ये संचारू लागते.  ती शक्ती समाज उन्नतीसाठी, आपली दीन-दुबळया बंधू भगिनींच्या प्रगतीसाठी आपल्याला मिळालेली असते.
ख्रिस्त जीवनाची भाकर आहे. ती दैवी भाकर ह्याच श्रद्धेने ग्रहण केल्यास आपले जीवन फुलते, बहरते. जीवनात आनंद निर्माण होतो. आपले जीवन परिपूर्ण  होण्यासाठी ह्या सात्विक आनंदाची गरज असते.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभो, तुझ्या पवित्र शरीराने आमचे तारण कर.
1. आपले परमगुरु पोप फ्रान्सीस, बिशप्स, धर्मगुरू व व्रतस्थ ह्यांना परमेश्वराचा आशीर्वाद मिळावा व त्यांनी ख्रिस्तासारखे जीवन जगून स्वतःचे जीवन अखिल मानवजातीच्या सेवेसाठी अर्पण करावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करुया.
2. ख्रिस्त आपली जिवंत भाकर आहे, ह्यावरील आपला विश्वास बळकट व्हावा व प्रत्येक मिस्साबलीदानामध्ये ही जिवंत भाकर खऱ्या अर्थाने सेवन करण्यास आपल्याला पवित्र आत्माचे सामर्थ्य लाभावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करुया.
3. आपल्या समाजातील व धर्मग्रामातील जी कुटुंब दुरावलेली आहेत त्यांना प्रभू परमेश्वराच्या प्रेमाचा अनुभव यावा व त्यांनी परमेश्वराच्या कृपेने एकत्र येऊन पुन्हा आपल्या कुटुंबात प्रेमाने एकजुटीने रहावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करुया.
4. आज आपण धर्मगुरूंचा दिवस साजरा करीत असताना आपण आपले प्रमुख धर्मगुरू....... आणि सहाय्यक धर्मगुरू...... ह्यांना परमेश्वराने त्यांच्या सुख-दु:खांमध्ये आधार द्यावा, सर्व संकटापासून त्यांचे संरक्षण करावे. तसेच धर्मगुरूंनी देवाला दिलेल्या वचनाशी एकनिष्ठ राहून त्यांच्या जीवनाद्वारे सर्व लोकांस परमेश्वराच्या प्रेमाचा अनुभव प्राप्त करून द्यावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करुया.
5. आपल्या जीवनात ज्यांनी प्रभूचा संदेश रुजवला व आज ह्या क्षणी स्वर्ग राज्यात असलेल्या सर्व स्वर्गवासी धर्मगुरूंची आपण आठवण करून थोडावेळ शांत राहून त्यांच्या आत्म्यासाठी प्रार्थना करूया.




                

2 comments:

  1. i liked the homily very much ,,, thanks a lot keep it up

    ReplyDelete
  2. Good one dear! God Bless You For The Good Work That You Are Doing!

    ReplyDelete