Wednesday, 23 September 2015

Reflection for the homily of 26th Sunday in Ordinary Times(27/09/2015) By: Nevil Govind.










सामान्यकाळातील सव्विसावा रविवार


दिनांक: २७/०९/२०१५.
पहिले वाचन: गणना ११: २५-२९.
दुसरे वाचन: याकोबाचे पत्र ५: १-६.
शुभवर्तमान: मार्क ९: ३८-४३, ४५, ४७-४८.


प्रस्तावना:
आज आपण सामान्यकाळातील सव्विसावा रविवार साजरा करीत आहोत. आजची तिन्ही वाचने आपल्याला देवाचे खरे शिष्य बनण्यास पाचारण करीत आहेत.
     पहिल्या वाचनात मोशे आपल्या सेवाकार्यात हातभार लाभावा म्हणून इस्त्राएल लोकांतून सत्तर नेत्यांची निवड करतो. याकोबाचे पत्र ह्यातून घेतलेल्या दुसऱ्या वाचनात धनवानांनी केलेली कामकऱ्यांची पिळवणूक आणि त्यांच्या मजुरीवर चैनबाजी व विलास करणारे धनवान ह्यांच्या जुलुमाचे प्रतिफळ काय असणार ह्याविषयी ऐकतो. तर मार्कलिखित शुभवर्तमानात, येशूने आपल्याला देवाच्या सेवाकार्यात इतरांचे सहकार्य घेऊन एकत्रितपणे कार्य करण्यास सांगितले आहे.
परमेश्वर त्याचे कार्य पुढे चालू ठेवण्यास आम्हा प्रत्येकाला आमंत्रण देत असतो व त्याच्या हाकेला साद देण्याचे स्वातंत्र्यही तो आम्हांला बहाल करत असतो. ख्रिस्ताचे खरे शिष्य बनून त्याचे कार्य करण्यास ईश्वरी प्रेरणा आपणास मिळावी म्हणून आपण ह्या मिस्साबलीदानात प्रार्थना करूया.

सम्यक - विवरण
पहिले वाचन: गणना ११: २५-२९.
     इजिप्त देशात देवाने मोशेला जेव्हा इस्त्राएल लोकांस फारोच्या तावडीतून बाहेर काढण्यास पाचारीले तेव्हा तो एकटाच होता (निर्गम ३:१-१२). मग आता मोशेला सत्तर नेत्यांची गरज का भासली? कारण ज्या लोकांमध्ये मोशे होता त्यांचे पायदळच सहा लाख होते (गणना ११:२१). परमेश्वराने इस्त्राएल लोकांस खाण्यास मान्ना दिला आणि पिण्यास पाणीही दिले तरीही लोक संकटात सापडल्यासारखे मोशेजवळ कुर-कुर करीत होते व रडगाणे गाऊन म्हणत होते, “आम्हांला खावयाला मांस कोण देईल? मिसर देशात आम्हांला मासे फुकट खावयाला मिळत असत त्याची आठवण येते. त्याचप्रमाणे काकड्या, खरबूजे, भाजी, कांदे, लसूण ह्यांचीही आम्हांला आठवण येते. पण आता आमचा जीव सुकून गेला आहे; येथे ह्या मान्न्याशिवाय आमच्या दृष्टीस काहीच पडत नाही”(गणना ११:४ब-६).
     सर्व कुटुंबातील लोक आप-आपल्या तंबूंच्या दाराशी रडताना मोशे पाहतो व परमेश्वरास म्हणतो, “तू आपल्या दासाला दु:ख का देत आहेस? तू ह्या सर्व लोकांचा भार माझ्यावर का घालीत आहेस? ह्या सर्व लोकांना पुरवावयाला मी मांस कोठून आणू? मला एकट्याला ह्या सर्व लोकांचा भार सहन होत नाही; ते मला फारच जड जात आहे. तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणतो, “तुझ्या माहितीतले इस्त्राएल लोकांचे जे वडील व अंमलदार आहेत त्यांच्यातून सत्तर जणांस निवडून त्यांना दर्शनमंडपापाशी घेऊन ये व तेथे त्यांना तुझ्याबरोबर उभे कर. मग मी मेघात उतरून तेथे तुझ्याशी बोलेन आणि तुझ्यावर असणा-या आत्म्यातून काही घेऊन त्यांच्यावर ठेवीन म्हणजे तुझ्याबरोबर तेही लोकांचा भार वाहतील; मग तुला एकट्यालाच तो वाहवा लागणार नाही” (गणना ११:१०,११,१३-१४,१६-१७).
परमेश्वराने म्हटल्याप्रमाणे, परमेश्वर मेघात उतरुन मोशेशी बोलला आणि त्याच्यावर असणाऱ्या आत्म्यातून काही घेऊन त्याने त्या सत्तर नेत्यांवरठेविला; तेव्हा त्यांच्यावर आत्मा येताच ते संदेश सांगू लागले.
  
दुसरे वाचन: याकोबाचे पत्र ५: १-६.
     संत याकोब आजच्या उताऱ्यात धनवानांस ताकीद देतो आणि म्हणतो की, ‘तुम्हीं केलेल्या कृत्यांचा न्याय केला जाईल व तुम्हीं केलेल्या जुलुमाचे प्रतिफळ तुम्हांस मिळेल. जे क्लेश तुम्हांला होणार आहेत त्याविषयी रडून आकांत करा कारण तुमचे धन नासले आहे, तुमच्या वस्त्रांना कसर लागली आहे. तुमचे सोने व रूपे ह्यांवर गंज चढला आहे आणि त्यांचा तो गंज तुम्हांविरुद्ध साक्ष देत आहे. ज्या कामकऱ्यांनी तुमची शेते कापली त्यांची मजुरी तुम्ही बाकी ठेवली आहे व त्यांची बाकी असलेली मजुरी तुम्ही आपले धन म्हणून शेवटल्या दिवसासाठी साठवून ठेवली आहे. चैनबाजी व विलास तुम्हीं त्यांच्या धनावर करीत आहात. नितीमानाला तुम्ही दोषी ठरविले आहे, त्याचा घात केला आहे आणि त्याने तुम्हांस विरोध देखील केलेला नाही. 
  
शुभवर्तमान: मार्क ९: ३८-४३,४५,४७-४८.
     ह्या उताऱ्यात मार्क सुवार्तिक आपणास येशूचा अनुयायी नसलेला कोणी एक त्याच्या नावाने भुते काढत आहे ह्या दृष्याचे आपल्यासमोर सादरीकरण करतो. ह्या अध्यायात मार्क सुवार्तिकने योहानाने केलेले कृत्य आणि येशूने त्याला दिलेली शिकवण ह्यांच्यावर भर दिला आहे. योहान त्या मनुष्यास हे कार्य करताना पाहतो व त्याला मना करतो कारण तो त्याच्यासारखा येशूचा अनुयायी नव्हता (मार्क ९:३८). योहानाच्या बोलण्यावरून मार्क सुवार्तिक स्पष्ट करतो की, ‘जे ख्रिस्ताचे अनुयायी आहेत त्यांनीच फक्त ही कार्ये केली पाहिजेत व करावी, इतरांनी ती करु नयेत. ‘योहानाने येशूचा अनुयायी नसलेल्या कोणा ऐकाला येशूच्या नावाने भुते काढताना पाहिले’ असे मार्क सुवार्तिक आपणास सांगतो. ‘पाहिले’ ह्या शब्दावरून आपण सांगू शकतो की, त्याने बघितले, निरीक्षण केले, तपासणी केली, विचारपुस केली, चौकशी केली आणि मग निष्कर्ष काढून त्याला ते कार्य करण्यास मनाई केले.
त्या मनुष्यास योहानाने मना का केले? तो मनुष्य वाईट कार्य करत होता का? त्या मनुष्याने देवाविरुद्ध काही म्हटले होते का? तो फक्त येशूचा अनुयायी नव्हता ऐवढेच ना! देवाचे कार्य फक्त त्याचे अनुयायीच करु शकतात का? सामान्य व्यक्ती देवाचे कार्य करु शकत नाही का? देवाचा आत्मा फक्त त्याने निवडलेल्या लोकांवरच येतो का? सर्व साधारण मानवास तो मिळत नाही का? ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपणास बायबलमध्ये मिळतात. काही प्रश्नांची उत्तरे खुद्द येशू आपणास सांगतो. येशू योहानास म्हणतो, ‘त्याला मना करु नका कारण जो माझ्या नावाने महत्कृत्य करतो तो माझी निंदा करु शकणार नाही’. संत पौलाने करिंथकरांस लिहिलेल्या पत्रात म्हटल्याप्रमाणे, ‘कृपादानांचे जरी निरनिराळे प्रकार असले, तरी आत्मा एकच आहे; सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार असले, तरी प्रभू एकच आहे; आणि कार्याचे निरनिराळे प्रकार असले, तरी सर्वांत सर्व कार्ये करणारा देव एकच आहे’ (१ करिंथ १२:४-६), म्हणून जो आपल्याला प्रतिकूल नाही तो आपल्याला अनुकूल आहे. तसेच जो कोणी तुम्हांस पेलाभर पाणी प्यावयास देतो तोही मी दिलेले कार्य करत असतो. कारण ‘स्वतःहून कोणी महकृत्य करत नसतो तर माझा पिता त्यांना तसे करण्याची बुद्धी देतो’ (मत्तय १६:१७).

बोधकथा:
एक उत्साहित धर्मगुरू आपल्या धर्मग्रामामध्ये नुतनीकरण घडवू इच्छित होता. स्वबळावरती त्याला गावाची सुधारणा करायची होती व त्यासाठी त्याने कामाचा आराखडाही तयार केला. परंतु चार वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर सुद्धा  त्याच्या हाती यश लागले नाही. निराश व अपयशी होऊन तो धर्मग्रामातून निघून गेला. त्याच्यानंतर आलेल्या धर्मगुरूने प्रथम आपल्या पॅरिशची पडताळणी केली. आपल्या आजूबाजूला चाललेल्या घटनेकडे लक्ष दिले आणि त्याचा त्याने अभ्यास केला. त्या नवीन धर्मगुरूने प्रथम आपल्या धर्मग्रामामधील लोकांस एकत्रित आणले. त्याने विविध संघटना तयार करून त्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपविल्या व तो त्यांचा मार्गदर्शनकर्ता म्हणून कार्य करू लागला. संघटीत केलेल्या कार्याला यश मिळत असल्याचे त्यांना आढळून आले.
जशी त्याने आपल्या धर्मग्रामामध्ये सुधारणा घडवून आणली तशीच सुधारणा गाव पातळीवर आणण्यासाठी तो प्रयत्न करू लागला व त्याच्या ह्या प्रयत्नालाही यश प्राप्त झाले.
(येशू आज म्हणत आहे, ‘एकत्रितपणे व संघटीतपणे कार्य केल्याने आपण देवाचे राज्य ह्या भूतलावर प्रस्थापित करू शकतो’).

मनन - चिंतन:
     परमेश्वराने मिसर देशात असलेल्या आपल्या इस्त्राएल लोकांची विपत्ती पाहिली होती, त्यांनी केलेला आक्रोश परमेश्वराने ऐकला होता व परमेश्वर त्यांचे क्लेश जाणून होता. त्यांना मिसऱ्यांच्या तावडीतून सोडविण्यास आणि त्या देशातून चांगल्या देशात घेऊन जाण्यास परमेश्वराने मोशेला पाचारण केले होते. मोशेवर सोपवलेल्या सेवाकार्यात परमेश्वर सतत मोशेबरोबर होता. कधी मेघातून, तर कधी अग्नीतुन परमेश्वर मोशेशी बोलला होता. परमेश्वर त्याच्या बरोबर असून देखील ह्या सर्व लोकांचा भार त्याला सहन होत नव्हता. त्यांनी मांगितलेल्या सर्व गोष्टी मोशेला पुरवणे कठीण जात होते. तो सर्व ठिकाणी, सर्व जागेवर व सर्वांकडे एकटा लक्ष देऊ शकत नव्हता, म्हणून मोशे परमेश्वराशी तक्रार करतो व म्हणतो, ‘तु आपल्या दासास दु:ख का देत आहेत? तु ह्या सर्व लोकांचा भार माझ्यावर का घालीत आहेस? ज्या लोकांमध्ये मी आहे त्यांचे पायदळच सहा लाख आहे. मला एकट्याला ह्या सर्व लोकांचा भार सहन होत नाही, तो मला फारच जड जात आहे’. तेव्हा परमेश्वराने त्याला इस्त्राएल लोकांतून सत्तर नेत्यांस निवडून त्यांस दर्शनमंडपात घेऊन येण्यास सांगितले. जेणेकरून परमेश्वर मेघात उतरुन मोशेशी बोलेल आणि त्याच्यावर असणाऱ्या आत्म्यातून काही घेऊन त्यांच्यावर ठेवील म्हणजे तुझ्याबरोबर तुझ्यासारखेच तेही लोकांचा भार वाहतील. मग तो तुला एकट्याला वाहवा लागणार नाही.
दर्शनमंडपात मोशेबरोबर फक्त ६८ जण जातात व दोघेजण मागे छावणीतच राहतात. परमेश्वर मेघात उतरुन मोशेशी बोलतो आणि त्याच्यावर असणाऱ्या आत्म्यातून काही घेऊन त्या ६८ जणांवर ठेवतो. तेव्हा त्यांच्यावर आत्मा येताच ते संदेश सांगू लागतात. तेच नव्हे तर मागे राहिलेले दोघेजण सुद्धा आत्म्याने भरून येतात व ते दोघेजण छावणीतच संदेश सांगू लागतात. परमेश्वर फक्त दर्शनमंडपात आलेल्यांनाच आपला आत्मा देतो का? छावणीत असलेल्यांना परमेश्वर आपला आत्मा देत नाही का? ह्यावरून परमेश्वर स्पष्ट करतो की, आपण त्याचे निवडलेले असो वा नसो तो सर्वांना सारखेच दान देत असतो.
     येशू ख्रिस्त आपले कोणतेही कार्य करण्यापूर्वी आपल्या पित्याजवळ प्रार्थना करीत असे (मार्क १:३५). परमेश्वराने येशूच्या बाप्तीस्म्यावेळी आपला आत्मा कबुतरासारखा येशूवर उतरविला (मत्तय ३:१६). परमेश्वर पिता येशू ख्रिस्ताशी विविध ठिकाणी, विविध प्रसंगी बोलला हे आपणास बायबल सांगते. उदा. बाप्तिस्म्याच्यावेळी परमेश्वराने केलेली आकाशवाणी (मत्तय३:१३-१७), येशूच्या रूपांतरावेळी परमेश्वराने केलेली मेघवाणी (मार्क ९:७). आपल्या पित्याने आकाशवाणीतून आणि मेघवाणीतून दिलेल्या सामर्थ्याने येशू ख्रिस्त आपल्या पित्याचे कार्य करीत होता. हे कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी व त्याच्या ह्या मिशन कार्यात हातभार लाभावा म्हणून येशूने बारा प्रेषितांची निवड केली (मार्क ३:१३-१९). लूक सुवार्तिकाने देखील आपल्या शुभवर्तमानात, ‘येशूने आणखी बहात्तर (७२) शिष्यांस विविध नगरात, विविध ठिकाणी परमेश्वराचे कार्य करण्यास पाठविले ह्याचे नमूद केलेले आहे (लूक १०:१-१२). मला येथे इतकेच स्पष्ट करायचे होता की, ‘जसा पिता आपल्या पुत्राशी बोलत असे. तसा परमेश्वरही मोशेशी संवाद साधत होता. जसे मोशे आपल्या कामात हातभार लाभावा म्हणून सत्तर नेत्यांची निवड करतो तसे येशू आपल्या कामात हातभार लाभावा म्हणून बारा प्रेषितांची व बहात्तर (७२) शिष्यांची निवड करतो. जसे परमेश्वर मोशेवरील असणाऱ्या आत्म्यातील काही घेऊन त्यांच्यावर ठेवतो व परमेश्वराचा आत्मा त्यांच्यावर येताच ते संदेश सांगू लागतात तसे येशूही आपल्या शिष्यांना आपल्यावरील असणाऱ्या आत्म्यातील काही घेऊन त्यांच्यावर ठेवतो व परमेश्वराचा आत्मा त्यांच्यावर येताच ते आपले सुवार्ता कार्य चालू करतात.        
आज खिस्त आपणास काय सांगत आहे? मोशेने ज्याप्रमाणे परमेश्वराचे कार्य करण्यासाठी सत्तर जणांची मदत घेतली व परमेश्वराचे कार्य पूर्णतेस नेले. येशू ख्रिस्ताने जसे आपल्या पित्याचे कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी बारा प्रेषितांची व बहात्तर (७२) शिष्यांची निवड केली. येशूच्या शिष्यांनी ज्याप्रमाणे देवाच्या सेवाकार्यात हातभार लाभावा म्हणून बाराव्या प्रेषिताची आणि पवित्र आत्म्याने व ज्ञानाने पूर्ण असे सात प्रतिष्ठित पुरुष निवड केली (प्रेषितांची कृत्ये १:१२, ६:१-७). त्याचप्रमाणे आपणही परमेश्वराचे कार्य करण्यासाठी इतरांची मदत घ्यायला हवी. योहानाप्रमाणे तो किंवा ती ख्रिस्ताचा/ची अनुयायी नाही असे म्हणू नये. तर संत पौलाने करिंथकरांस लिहिलेल्या पहिल्या पत्रात म्हटल्याप्रमाणे, “कृपादानांचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी आत्मा एकच आहे; सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी प्रभू एकच आहे; आणि कार्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी सर्वांत सर्व कार्ये करणारा देव एकच आहे. तथापि आत्म्याचे प्रकटीकरण सार्वजनिक हितासाठी ऐकेकाला होते. कारण आत्म्याच्याद्वारे एखाद्याला ज्ञानाचे वचन, तर कुणाला विद्देचे वचन, तर कुणाला विश्वास, तर कुणाला निरोगी करण्याची कृपादाने, तर कुणाला अदभूत कार्ये करण्याची शक्ती, तर कुणाला संदेश देण्याची शक्ती, तर कुणाला आत्मे ओळखण्याची शक्ती, तर कुणाला विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याची शक्ती व तर इतरांना भाषांचा अर्थ सांगण्याची शक्ती मिळते; तरी हि सगळी कार्ये तोच एक आत्मा करितो, तो आपल्या इच्छेप्रमाणे एकेकाला वाटून देतो” (१ करीथ १२: ४-११). आपणासमोरील लोकसमुदाय फार मोठा आहे. आपणाला ह्या जगात जर दवाचे सेवाकार्य प्रस्थापित करायचे असेल तर आपण इतरांचे सहकार्य मांगितले पाहिजे. मग ते सहकार्य देशाच्या नेत्याचे असो वा राष्ट्रपतीचे, तो गावाचा नगराध्यक्ष असो वा गावाचा पाटील असो. जर आपण ‘एकत्रितपणे व संघटीतपणे कार्य केले तर देवाचे राज्य ह्या भूतलावर प्रस्थापित करू शकतो’. देवाचे हे कार्य करण्यासाठी आपले एकमत असू द्या. कारण ‘एकीचे बळ मिळते फळ’. एकटा एकाचवेळी प्रत्येक ठिकाणी पोहचू शकत नाही. एकटाच सर्वकाही करू शकत नाही. म्हणून जर अन्यायाविरुद्ध लढा द्यायचा असेल तर एकाने मुक्याची वाच्या व्हायला हवे, तर दुसऱ्याने आंधळ्याचे डोळे, तर तिसऱ्याने लंगड्याची काठी, तर चौथ्याने अन्यायाविरुद्ध लढा दिला पाहिजे आणि ह्या सर्वांना असे सेवाकार्य करण्यासाठी कृपा-शक्ती मिळावी म्हणून देवाकडे प्रार्थना करणारे पाहिजेत.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे येशू दया कर व तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक.
१. ख्रिस्तसभेत कार्य करणारे आपले पोप, कार्डीनल्स, बिशप, फादर्स, सिस्टर्स व ब्रदर्स व इतर सर्व मिशनरी बंधू-भगिनींना देवाचे कार्य करण्यास देवाची प्रेरणा, त्याचे सामर्थ्य व कृपा मिळावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
२. ‘पिक भरपूर आहे परंतु कामकरी थोडे आहेत’. आजच्या आधुनिक युगात फार थोडे युवक-युवती धर्मगुरू, धर्मभगिनी होण्यासाठी पुढे येतात, त्यांच्यात ईशकृपेने भर पडावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
३. सिरीया शहरातील अनेक लोक बेघर झालेले आहेत, तेथे चालू असलेल्या दुराग्रही वृत्तीमुळे त्यांना स्थलांतर करावे लागत आहे. अश्या सर्व निराश्रीतांना इतर देशवासीयांनी आसरा द्यावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
४. जे तरुण-तरुणी देवापासून दूर गेले आहेत, जे व्यसनाच्या आहारी गेले आहेत, ज्यांना नोकरी नाही, अश्या सर्वांना प्रभूने त्याच्या प्रकाशात आणावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना कर.
५. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व सामाजिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.



   

Wednesday, 16 September 2015


Reflections for the Homily of 25th Sunday in Ordinary Times(20/09/2015) by Amol Gonsalves.







सामान्यकाळातील पंचविसावा रविवार



दिनांक: २०/०९/२०१५.
पहिले वाचन: शलमोनाचा ग्रंथ २:१२;१७-२०.
दुसरे वाचन: योकोब ३:१६,४:३.
शुभवर्तमान: मार्क ९:३०-३७.

‘तुम्हामध्ये जो कोणी उच्च होऊ इच्छितो, त्याने सर्वांचा सेवक बनावे’


प्रस्तावना:
     आज आपण सामान्यकाळातील पंचविसावा रविवार साजरा करीत आहोत. आजच्या पवित्र उपासनेतील तिन्ही वाचने आपल्याला मानवी जीवनातील तीन महत्वपूर्ण अश्या गोष्टीवर विचार-विनिमय करण्यास बोलावत आहे. नितीमत्व, एकाग्रता व नम्रपणा.
     शलमोनाचा ज्ञानग्रंथ ह्या पुस्तकातून घेतलेल्या आजच्या पहिल्या वाचनात आपण नीतिमान माणूस हा देवाचा पुत्र ठरेल असे ऐकतो. दुसऱ्या वाचनात संत याकोब आपल्याला ह्या जगातील ऐहिक गोष्टींवरचा मोह न धरता ख्रिस्ताच्या वचनांचा ध्यास आपल्या जीवनात कसा उतरावा ह्याविषयी उपदेश करत आहे. तर शुभवर्तमानात ख्रिस्त आपल्या शिष्यांना नम्रतेविषयी धडा देत आहे. जो कोणी पहिला होऊ इच्छितो त्याने प्रथम सेवक झाले पाहिजे  असे ख्रिस्त म्हणतो.
मानवी जीवनातील अहंकारपणा, मी-पणा मानवाला ख्रिस्ताकडून व त्याच्या शिकवणुकीतून दूर नेत असतो. ख्रिस्ताने गाईच्या गोठ्यात जन्म घेऊन आपल्यासमोर नम्रतेचा धडा व लीनपणाचा सर्वात मोठा कित्ता घालून दिला आहे. ख्रिस्ताच्या नम्रपणाचा व लीनपणाचा धडा आपल्या जीवनात गिरवता यावा म्हणून आपण ह्या मिस्साबलीत प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:
पहिले वाचन: शलमोनाचा ज्ञानग्रंथ २:१२; १७-२०.
ह्या ज्ञानग्रंथाद्वारे लेखकाने वाचकांसमोर ‘ज्ञानाचे कार्य’ आणि ‘देवाचे कार्य’ यांचे इस्रायली लोकांच्या इतिहासामध्ये कोणते महत्व होते व ह्या दोन्ही अस्तित्व कशाप्रकारे एक आहेत ह्याविषयी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. शलमोनाचा ग्रंथ हा पाच भागामध्ये विभागलेला आहे.
आजचे पहिले वाचन हे ज्ञानग्रंथातील पहिल्या भागातून घेतले आहे. येथे आपल्याला ‘नितीमानाचे अमरत्व’ व ‘दृष्टांना शिक्षा’ ह्याविषयी लेखक जाणीव करून देत आहे. सत्यपणा, खरेपणा व नितीमत्वपणा हे दैविक गुणधर्म आहेत, आपल्या विपरीत बुद्धीमुळे मनुष्य देवापासून दुरावला. आपल्या दृष्ट कृत्यांमुळे त्याला मरण प्राप्त झाले, परंतु पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे नीतिमान मनुष्य हा त्यांच्या चांगल्या कार्यामुळे शाश्वत जीवनास योग्य ठरेल. तो वाईटांपासून व ऐहिक मोहापासून दूर राहील. अशा नीतिमान व चांगल्या लोकांची कसोटी वेळोवेळी केली जाते; परंतु देवावर पूर्ण विश्वास ठेवल्यास नीतिमान मनुष्याची विरोधकांच्या तावडीतून सदैव सुटका होत असते. कारण त्याची चांगली कार्ये व सौम्यपणा त्याच्या मदतीला येत असतात.

दुसरे वाचन: संत याकोबचे पत्र ३:१६, ४:३
संत याकोब आपल्या पत्राद्वारे ख्रिस्ती जणांसमोर खोटे व खरे काय ह्याविषयीची ज्ञान ठेवत आहे. मनात मत्सर व लडपडण्याची वृत्ती बाळगून मनुष्य कदापि सत्य मार्गावर चालत नाही. आपला वाईट कृत्याद्वारे तो पापांचा वाटेकरी होतो. आजचे जग आपल्याला खरे काय व खोटे काय ह्याविषयी अज्ञानात ठेवत असते. परंतु देवाकडून येणारे ज्ञान हे खरे, शांतीप्रिय, सौम्य, अपक्षपाती असते. तथापि, मानवाने स्वत:च्या स्वार्थामुळे जगाच्या ज्ञानात गुंफून खऱ्या ज्ञानाचा विसर पाडून घेतला आहे. संकटवेळी तो देवाकडे आपले गाऱ्हाणे घेऊन येतो. परंतु आपण देवाकडे काय मागावे व काय मागू नये, ह्याविषयीची जाणीव त्याला नसते. त्यामुळे त्याने मागितले त्याला ते मिळत नाही. अयोग्य मार्गाने मागणाऱ्याला कदापि काहीच प्राप्त होत नाही. स्वत:च्या सुखासाठी व चैनबाजीकरीता जो कोणी देवाकडे मागतो, तो देवाठायी स्वार्थी व लबाड ठरला जातो. ‘दुसऱ्यासाठी चांगले मग म्हणजे देव तुम्हाला चांगल्या गोष्टीने फलदायी बनवेल’, हा नियामशास्राचा नियम आहे.

शुभवर्तमान: मार्क ९:३०-३७.
संत मार्कच्या शुभवर्तमानात प्रभू येशू ख्रिस्त तिन्ही भिन्न भिन्न ठिकाणी आपल्या मृत्यूबद्दल दुसऱ्यांना सांगत असल्याचे आढळून येते. (उदा: मार्क ८:३१-३३.९:३०-३२. १०:३२-३९.)
     ख्रिस्ताने आपल्या मरणाची भविष्यवाणी तीन वेळा का केली असावी? ह्याबद्दल अनेक धर्मपंडीतानी आपल्या अभ्यासात विचार-विनिमय केला आहे. व त्यांनी त्यांच्या मतानुसार दोन महत्वपूर्ण कारणे मांडली आहेत.
१. प्रथम म्हणजे, ख्रिस्ताला आपल्या अंतिम वेळेची जाणीव जन्मापासून होती.
२. दुसरे कारण म्हणजे, येशूला आपल्या शिष्यांना हि सत्य घटना आत्मसात करण्यासाठी सभ्य बनवायचे होते.
आपले राज्य ह्या जगाचे नसून आपण शांतीचा, प्रेमाचा व समेटाचा संदेश देण्यासाठी ह्या जगात आलो आहोत, ह्याविषयी ख्रिस्ताला जाणीव होते, आपण गौरवशाली मसीहा नसून जगाच्या तारणासाठी, कल्याणासाठी स्वत:चा प्राण अर्पिण्यासाठी आलेला देवाचा कोंकरू असल्याचे सत्य ख्रिस्ताला आपल्या शिष्यांना पटवून द्यायचे होते.
तसेच संत मार्कच्या शुभवर्तमानातील अध्याय. ९:३३-३७ मध्ये ख्रिस्त शिष्यांना नम्रतेविषयी धडा देत असल्याचे दिसून येते. आपण ज्याला अनुसरतो तो जर वैभवशाली मसीहा असेल, गौरवशाली राजा असेल, तर त्याच्या राज्यात आपल्याला कोणते स्थान मिळेल व त्याच्या राज्यात सर्वात श्रेष्ठ म्हणून कोणाला मानले जाईल, ह्याविषयी शिष्य आपापसात विचारपूस करीत होते. त्यांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी लहान बालकाच्या उदाहरणामार्फत ख्रिस्त आपल्या शिष्यांना; ‘देवराज्याचा वाटेकरी होण्यासाठी श्रेष्ठत्वाची गरज नसते’ ह्याची जाणीव करून देतो. बालके, हे स्वभावाने स्वाभिमानी व वागण्याने नितळ असतात. ह्यास्तव जो कोणी बालकाप्रमाणे आपल्या जीवनात स्वाभिमान व नितळपणा ह्यांचा स्विकार करतो, तो ख्रिस्ताचाच नव्हे तर ज्याने ख्रिस्ताला पाठवले आहे त्याचा स्विकार करतो.

बोधकथा:
२०१० साली “सत्य” नावाचा एक मराठी चित्रपट प्रदर्शित केला होता. चित्रपटासाठी प्रेक्षकांचा घवघवून प्रतिसाद मिळाला. त्याचे कारण म्हणजे, दिग्दर्शकाने आजच्या समाजात घडत असलेल्या सत्य घटनेचे प्रदर्शन हे चित्रपटात केले होते. हा चित्रपट आपल्याच समाजात राहत असलेले अपंग, लुळे पांगळे व शरीराने दुबळेपणा सहन करत असलेल्या व्यक्तींवर आधारित होता.
     ह्या चित्रपटातील एक हृद्यस्पर्शी दृष्य म्हणजे, ‘दिवस करमणुकीसाठी सर्व आंधळे, लुळे, पांगले, ह्यांच्यात शर्यत लावण्यात येते, त्यांना कमी वेळात शंभर मीटरचे अंतर पार करायचे असते. शर्यतीचा दिवस उगवतो, सर्वजण चांगल्या तयारीनुसार क्रीडांगणात उतरतात. दहा जणांचा एक संघ त्यात करण्यात आला होता. सर्वजण रांगेत उभे रथून पंचांच्या आदेशाची वाट पाहत होते. आदेश मिळताच शर्यतीला सुरुवत होते. थोडा काळ सरल्यावर त्यांच्यातील एक अपंग मुलगा जमिनीवर कोसळतो. ते पाहताच सर्वजण आपली शर्यत तेथेच सोडून देतात व जमिनीवर पडलेल्या आपल्या साथीदाराच्या मदतीसाठी येतात. त्याचा हात पकडून त्याला उठवतात व आपल्या खांद्यावर घेऊन पुन्हा सर्वजण शर्यतीला सुरवात करतात.
     खरोखरच मनाचा मोठेपणाचा व दुसऱ्याची सेवा करण्यासाठी स्वत:च्या शर्यतीचा त्याग करण्यासाठी ह्या मुलाकडून खूप काही शिकायला मिळते. “जो कोणी तुमच्यात मोठा व श्रेष्ठ होऊ इच्छितो, त्याने सर्वप्रथम दुसऱ्याचा सेवक बनायला हवे”.

मनन चिंतन:
            आजचे आधुनिक जग हे जाहिरातीचे, प्रसारमाध्यमाचे व तत्वज्ञानाचे युग आहे. सर्वत्र जो तो मान-सन्मान, प्रतिष्ठा, मोठेपणा ह्याच्यामध्ये गुंफलेला आहे. जीवनात आपण कसे होऊ व नव-नवीन उच्च पदवीस्थाने कसे मिळवू? ह्यामध्ये गुरफटत चालला आहे. खरे पाहिले तर हा जगाचा नियम आहे. जगाच्या निर्मितीपासूनच ह्या नियमाची जोड जगाला लागली होती, येशू ख्रिस्ताचे शिष्य ह्या अस्तित्वाला निराळे होते असे नाही. संत मार्कच्या शुभवर्तमानात ऐकल्याप्रमाणे येशूचे शिष्य आपल्यामध्ये सर्वात श्रेष्ठ कोण? ह्याविषयी चर्चा करीत होते. तेदेखील मान-सन्मान,  मोठेपणा ह्यामध्ये गुंफून केलेले होते.
     शिष्यांना ठावूक होते कि, येशू ख्रिस्त ज्याने इतके चमत्कार केले आहेत तो सर्वसामान्य मनुष्य नसून एक दैवी मानव आहे. तो एक चमत्कारी असून त्याच्याठायी दैवी शक्ती आहे. त्याचे गौरवशाली राज्य प्रस्थापित करण्यासाठी तो ह्या जगात अवतरला आहे. त्या वैभवशाली राज्याचे भागीदार होण्यासाठी वारस होण्यासाठी त्याने आमची निवड केली आहे. एक दिवस आम्हांला सुद्धा मान-सन्मान, प्रतिष्ठा गाठता येईल.
     परंतु आजच्या शुभवर्तमानाद्वारे ख्रिस्त त्यांना नम्रतेचा व लीनतेचा धडा शिकवत आहे. “जो कोणी तुम्हांमध्ये उच्च होऊ इच्छितो, त्याने सर्वांचा सेवक बनावे”.
     जीवनात यशस्वी होणे किंवा कोणतेही उच्च पद मिळविणे हे मुळीच चुकीचे नाही. देवाने दिलेल्या देणग्यांचा वापर करूनच आपण जीवनात यशस्वी बनत असतो. पण अनेक वेळा आपल्याला, आपल्या यशस्वीपणाचा अहंकार चढतो. आपण दुसऱ्याला विसरतो. दुसऱ्याकडे दुर्लक्ष करतो. संकटकाळी त्यांच्या मदतीला पाठ फिरवत असतो. अशा ह्या ‘मी’ घटक वृत्तीला बळी न पडण्यासाठी जीवनात नम्र व लीन राहणे आवश्यक आहे.  
     येशू ख्रिस्ताने शुभवर्तमानात आपला संदेश, आपली शिकवून स्पष्ट करण्यासाठी अनेक अशा वृतांचा, दाखल्यांचा व चिन्हांचा वापर केला आहे. आजच्या शुभवर्तमानात देखील त्याने ‘बालकाचे’ उदाहरण त्याच्या शिष्यांसमोर ठेवल्याचे आपण पाहतो. छोटी मुले ही मनाने नितळ व शुद्ध असतात. त्यांच्यात कुभावना कदापि नसते. कोण मोठा व कोण छोटा असा भेदभाव ते कदापि करत नसतात. बालकांप्रमाणे नितीमान, नितळ शुद्ध, प्रेमळ होण्यासाठी ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना पाचारले होते. ते जगातील राज्याचे शिष्य नसून, स्वर्गीय राज्याचे शिष्य होते. ह्याची जाणीव ख्रिस्ताला आपल्या शिष्यांना करुन द्यायची होती.
     आजच्या शुभवर्तमानात जो नम्रतेने, लीनपणाने आपले जीवन जगतो, त्याला जग निराळे संबोधते. त्याला जगात किंमत नसते. तो भूतकाळात जीवन जगत असल्याचे जाहीर करतात. प्राणत्याग ख्रिस्ताच्या वचनाप्रमाणे स्वर्गीय राज्यात त्यांची किंमत अधिक आहे. देवाचे श्रेष्ठत्व त्याला लाभेल. तोच खरा ख्रिस्ताचा अनुयायी व त्याच्या स्वर्ग-राज्याचा भागीदार होण्यास पात्र ठरेल.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभो आमची प्रार्थना ऐक.
१. आपले परमगुरुस्वामी फ्रान्सीस यांना प्रभुने उदंड आयुष्य व आरोग्य बहाल करावे व अखिल ख्रिस्तसभेची धुरा सांभाळण्यासाठी त्यांना मनोबल द्यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. जगात शांती निर्माण करण्यासाठी व समेट घडवून आणण्यासाठी अनेक अश्या सेवाभावी संघटना कार्यरत आहेत, त्यांच्या कार्यात प्रभूचा आशीर्वाद सदैव रहावा व त्यांना त्यांच्या कार्यात यश लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. आपल्या कुटुंबात प्रत्येक व्यक्तीला समानतेची व सन्मानाची वागणूक मिळावी, प्रत्येक सदस्यात बंधुभाव वाढावा, एकमेकांत जवळीकता निर्माण व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. आपल्या देशाचा कारभार सांभाळण्यासाठी जे राज्यकर्ते नेमले गेले आहेत, विशेषकरून आपले राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान व मंत्री मंडळाचे सदस्य ह्यांना प्रभूचे विशेष मार्गदर्शन लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. आजच्या तरुण पिढीला जीवघेण्या स्पर्धेला तोंड द्यावे लागत आहे, प्रसंगी ते निराश होतात. ह्या तरुण पिढीत देवाने दिलेला उत्साह कायम टिकून राहावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
६. आपल्या सामाजिक व वैयक्तिक हेतूंसाठी थोडा वेळ शांत राहून प्रार्थना करूया.




Tuesday, 8 September 2015


The Reflections for the Homily on the 24th Sunday (13/09/2015) of Ordinary Times, by Botham Patil.









सामान्य काळातील चोविसावा रविवार


दिनांक: १३/०९/२०१५
पहिले वाचन: यशया ५०: ५-९
दुसरे वाचन: याकोब २: १४-१८
शुभवर्तमान: मार्क ८: २७-३५

“तुम्ही मला कोण म्हणून म्हणता?”


प्रस्तावना:
आज आपण सामान्य काळातील चोविसावा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपणाला येशू ख्रिस्ताची ओळख पटवून घेण्यास आमंत्रण करत आहे.
प्रवक्ता यशयाच्या ग्रंथातून घेतलेल्या आजच्या पहिल्या वाचनात ‘मसिहा’ काहीच न बोलता संकटांना सामोरे जातो ह्याविषयीचा संदर्भ देण्यात आला आहे. दुस-या वाचनात याकोब आपणाला ‘विश्वासाबरोबर चांगली कृत्ये देखील महत्वाची आहेत हे ज्ञात करून देत आहे. मार्ककृत शुभवर्तमानात “येशू हा ख्रिस्त आहे”, ह्या पेत्राने येशूविषयी दिलेल्या कबुलीचे वर्णन आपणास ऐकावयास मिळते. पण येशू येथेच न थांबता, प्रत्येकाने म्हणजेच ‘जो कोणी त्याचा अनुयायी होऊ पाहतो, त्याने स्वतःचा क्रूस उचलून आत्मत्याग करण्याचे’ तो आव्हान करतो.
जेव्हा आपण ‘ख्रिस्ताला’ आपल्या जीवनात ‘मसिहा’ म्हणून स्वीकारतो तेव्हा आपले हृदय आनंदाने आणि उल्हासाने भरून जाते, पण हा आनंद सदोदित अनुभवण्यासाठी आपणाला दु:ख, क्लेश आणि यातना ह्या सर्वांना, दररोजच्या जीवनात सामोरे जावेच लागेल. ह्यासाठी आपणा सर्वांना कृपा मिळावी म्हणून आजच्या मिस्साबालीदानामध्ये विशेष प्रार्थना करूया.
        
सम्यक विवरण:
पहिले वाचन: यशया ५०:५-९
अध्याय १ ते ६६ हे यशया प्रवक्त्याचे पुस्तक दिसायला जरी एक असले तरी ते प्रथम (१-३९), द्वितीय (४०-५५) आणि तृतीय (५६-६६) यशया ह्या अध्यायांत विभागलेले आहे. द्वितीय यशयामध्ये (४०-५५) ब-याचश्या कविता/गीते आहेत (चार सेवक कविता/गीते). ही सर्व गीते आपणाला मसिहाविषयी भाकीत करतात. त्यांच्यापैकीच आजचे वाचन हे तिसरे ‘सेवक गीत’ आहे (५०:५-९). यशया जरी येशू येण्याच्या सातशे (७००) वर्षाअगोदर येऊन गेला, तरी त्याने मसिहाविषयी केलेले दु:खसहनाचे भाकीत/भविष्य यथायोग्य आहे. ह्या तिस-या सेवक गीतात यशया प्रवक्ता ‘सेवकाला दुष्टतेला आणि सक्रीय आकस यांना तोंड द्यावे लागत आहे’ असे सांगतो. परंतु पुढे तो म्हणतो, “जो विश्वासात टिकून राहतो, त्याला कितीही दु:खांना किंवा संकटांना सामोरे जावे लागले तरी परमेश्वर त्याची साथ कधीही सोडत नाही आणि त्याला कोणतीही इजा होऊ देत नाही”.

दुसरे वाचन: याकोब २: १४-१८
याकोबाच्या पत्रातून घेतलेला हा उतारा, आपले दररोजचे जीवन व त्या जीवनासाठी आवश्यक वर्तन कसे असावे, ह्याबाबत मार्गदर्शन करत आहे. आपले ख्रिस्ती जीवन हे फक्त तर्क-वितर्क किंवा सिद्धांत नसून ते ख्रिस्ताने केलेल्या प्रकटीकरणावर प्रात्यक्षित असावे असे संत याकोब सांगतो.
काही जणांच्या मते हा उतारा संत याकोब आणि संत पौल ह्यांच्यामधील ‘विश्वास आणि कार्य’ ह्यावरून उद्भवलेल्या गैरसमजाबद्दल, याकोब पौलाला दुरुस्ती/सुधारणा करायला सांगतो असे वाटत असेल, तरी असे काहीच नाही. कारण संत पौलाच्या गोत्यात/जमातीत यहुदी ख्रिस्ती लोक स्वतःच्या तारणासाठी “कायदा” पाळावा ह्यावर जास्त भर देत असत(रोमकरांस पत्र ४: ५-६), म्हणूनच ह्याच्या विरोधात संत पौल “कायदा” विरुद्ध “श्रद्धा/विश्वास” हा प्रबंध मांडतो. पौलाला नक्कीच माहीत होते की खरा विश्वास जीवनात दाखवलेल्या दानशूरपणातून/औदार्यातून वाहतो (गलतीकरांस पत्र ५: ६, १३-१५). याकोबदेखील हेच सूत्र वापरतो, तो म्हणतो, ‘जर आपला विश्वास प्रेमावर आधारित प्रकट केला नाही तर तो निर्जीव आहे’.

शुभवर्तमान: मार्क ८:२७-३५
फिलीप्पी कैसरियाचा प्रदेश गालील प्रांताच्या बाहेरचा आहे. हा प्रदेश हेरोदाच्या हद्दीतला नसून फिल्लीपच्या हद्दीतला होता. ह्या प्रदेशाचा विशिष्ट असा इतिहास म्हणजे: जुन्या काळात ह्या प्रदेशाला ‘बलीनास’ (Balinas) म्हणून संबोधण्यात येई कारण हे ‘बाल देवाच्या’ पूजेचे एक महत्वाचे ठिकाण होते. आज ह्या प्रदेशाला ‘बनीआस’ (Banias) म्हणून ओळखले जाते. ‘बनीआस’ (Banias) हे ‘पनीआस’ (Panias) ह्या शब्दाचे रूप आहे. येथे डोंगराच्या माथ्याशी कपार/गुहा आहे आणि ही कपार ग्रीक देवता ‘पान’ (Pan) म्हणजेच ‘निसर्गाचा देव’ ह्याचे जन्मस्थळ म्हणून मानले जाई. त्यातून एक झरा वाही आणि हा झरा यार्देन नदीचा उगम म्हणून समजला जाई. ह्या कपारीपासून अजून थोड्या वर फिल्लीपने सफेद संगमरवरी दगडाचे एक भव्य-दिव्य मंदिर बांधून पूज्यनीय व्यक्ती रोमी सम्राट कैसर, ज्याला त्याकाळी संपूर्ण विश्वाचा देव म्हणून मानीत त्याला समर्पित केले होते. ह्याच फिल्लीपी कैसरीयाच्या प्रदेशात एक सुताराचा मुलगा येशू ह्याला पेत्र ‘देवाचा पुत्र’ किंवा ‘मसिहा’ म्हणून ओळखतो. जणूकाही मोठ-मोठ्या राजा-सम्राटांनी भरलेला अवाढव्य इतिहास असलेल्या ह्या प्रदेशात येशूदेखील एक राजकीय नेता बनेल आणि सर्व लोकांची गुलामगिरीतून सुटका करेल, ह्या हेतूने पेत्राकडून निघालेले हे उद्गार असावेत.
“लोक मला कोण म्हणून म्हणतात?”: शिष्य येशूबरोबर जवळ-जवळ तीन वर्षे होते. त्यांनी येशूची शिकवण, त्याने केलेले चमत्कार, रोग्यांना देलेले आरोग्य हे जवळून अनुभवलं होत. इतक्या ह्या तीन वर्षाच्या अनुभवानंतर येशू कोण असेल, ह्याची कल्पना त्यांनी त्यांच्या मनात नक्कीच केली असेल; त्याचबरोबर इतर लोक त्याच्याबद्दल काय म्हणतात हेदेखील ऐकले असेल. अशा ह्या परिस्थितीत येशू त्यांना प्रश्न विचारतो. लोकांनी बाप्तिस्मा करणा-या योहानाला बघितलं होत, पण हेरोदाने त्याचा वध केला होता, म्हणून आता पुन्हा एकदा तोच उठला असावा किंवा इ.स. पूर्व ९००-८५० ह्या काळात एलिया प्रवक्ता होऊन गेला होता तो मसिहा येण्याची तयारी करण्यासाठी आला असावा असे लोकांना वाटले आणि जेव्हा लोकांनी येशूचे जीवन पाहिले, तेव्हा हाच तो असावा किंवा होऊन गेलेल्या प्रवक्त्यांपैकी कोणी एक आलेला असावा असे शिष्य येशूला त्याची ओळख करून देतात.
“तुम्ही मला कोण म्हणून म्हणता?”: आतापर्यंत फक्त सैतान आणि अशुद्ध आत्मे ह्यांनीच येशूची ‘देवाचा पुत्र’ म्हणून ओळख दिली होती (मत्तय ४:३, ८:२९; मार्क १:२४, ३:११). तद्नंतर शिष्यांनी येशूला लोक कोण म्हणून ओळखतात असे विचारल्यावर हा प्रवक्ता किंवा तो अमुक व्यक्ती अशी दुस-यांना असलेल्या कल्पनेची उत्तरे दिली पण येशू इथवर थांबला नाही, त्याने त्यांना आता एकदम सोपा वाटणारा पण उत्तर देण्यासाठी तितकाच चिवट आणि तारेवर चालण्याची कसरत करायला लावणारा प्रश्न विचारला. कोणीही त्याच्या ह्या प्रश्नाला उत्तर देऊ शकले नाही, पण पेत्राने लागलेच, ‘आपण ख्रिस्त (मसिहा) आहात’ असे सांगितले (मसिहा: तेलाने अभिषिक्त केलेला, निवडलेला). येशूने हे सत्य कोणालाही सांगू नका ह्याची ताकीद दिली कारण दुस-यांना तोंडाने सांगण्यापेक्षा, त्यांनी स्वतःहून हे अनुभवावं हा त्यामागचा हेतू असावा.     
सैताना माझ्या पुढून चालता हो: जो व्यक्ती आपल्या दैनंदिन जीवनाच्या प्रवासात बाधा आणतो, त्याला आपण सैतान म्हणतो परंतु येशूच्या काळी सैतानाचा अर्थ म्हणजे शत्रू किंवा प्रतिस्पर्धी असा होता. येशू मानवाच्या तारणासाठी आपला प्राण समर्पित करणार होता परंतु पेत्र त्याला प्रतिकार करतो किंवा ह्या कार्यात येशूच्या समोर शत्रू बनून येतो, म्हणूनच येशू पेत्राला, ‘सैताना, माझ्यापासून दूर हो’ असे म्हणतो.

बोधकथा:
१.     एक लष्करी पुढारी एकदम कडक शिस्तीचा होता. त्याचं शिस्तीसाठी इतकं नाव होत की, सारे सैनिक त्याच्या नावानेच कापत असत. घरी सुट्टीला आल्यावरदेखील त्याचा ह्याच प्रकारचा स्वभाव असे. सर्व शेजारी-पाजारी देखील त्याच्या ह्या स्वभावाला चांगलेच ओळखून होते. एके दिवशी त्याची पत्नी त्याला रागाने म्हणाली, “तुम्ही इतके शिस्त पाळण्यात कडक आहात, लोक तुमच्या ह्या शिस्तप्रिय वागणुकीने त्यांच्या जीवनातदेखील शिस्त आणण्याचा प्रयत्न करतात, पण ह्याचा फायदा काय? आपली चार वर्षाची लहान मुलगी तुम्हाला घाबरत देखील नाही, ती सारखी इकडे-तिकडे नाचत असते, उड्या मारत असते, मग ह्या शिस्तीचा उपयोग काय?” पत्नीचे हे बोल ऐकून आपल्या लहान मुलीला त्याने ताब्यात आणण्याचे ठरवलं.
संध्याकाळी जेव्हा त्याची मुलगी त्याच्याकडे हसत-खेळत आली, तेव्हा तो तिला सिंहासारख्या गर्जनेने म्हणाला, “आजपासून तू मला हाक मारशील किंवा काहीही बोलशील तर तुझ्या प्रत्येक वाक्याची सुरवात आणि शेवट ‘सर’ ह्या शब्दाने करायचा आणि मगच काही सांगायचे असेल तर सांगायचे.” सकारात्मक मान हलवून मुलीने तसे करण्याचे वचन दिले. तिचे संभाषण नेहमी असे असायचे, “सर, आज मला आईस्क्रीम मिळेल का, सर?, सर, मी टी.व्ही. पाहू का सर?” आणि असेच दिवस जात होते. एके दिवशी वडील कुठेतरी बाहेर जात होते तेव्हा तिने आपल्या वडिलांना विचारले, “सर, मीदेखील तुमच्याबरोबर बाहेर येऊ का?” जर मागच्या सीटवर बसशील तर तुला माझ्याबरोबर घेऊन जाईन, असे वचन तिच्याकडून घेऊन, हे गृहस्थ आपल्या चिमुकल्या मुलीला बरोबर बाहेर घेऊन गेले. अर्ध्या वाटेत असताना तिने मागच्या सीटवरून आपल्या वडीलांच्या खांद्यावर हात ठेवून ‘सर’ म्हणाली व काही क्षण स्तब्ध झाली व थोड्या वेळानंतर म्हणाली, “आय लव्ह यू, पप्पा”. हे ऐकताच त्या शिस्त प्रिय लष्करी पुढा-याच्या डोळ्यांतील अश्रू आवरले नाहीत.
(टीप: आपण प्रत्येकजण कोणासाठी कोणीतरी आहोत. कोणासाठी मुलगा, भाऊ, पती, वडील किंवा कोणाचा तरी आदर्श. शिस्त असणे हे वाईट नाही परंतु आपल्याला आपली खरी ओळख/जाण आहे का? की ही जाण दुस-या कोणी करून देणे गरजेचे आहे?)
   
२.     एकदा काही भक्तिमान लोक क्रूस वाहून यात्रा करीत होते परंतु हे क्रूस वाहून नेणं तितकं सोपं नव्हतं. ही यात्रा अपार कष्ट, दु:ख आणि विव्हळणं याने भरलेली होती कारण हा क्रूस शेवटपर्यंत वाहून नेण्यासाठी फार जड होता. अशावेळी एका यात्रेकरुने आपल्या खांद्यावरील वजन हलके करण्यासाठी त्या क्रूसाचा काही भाग कापून टाकला.
ब-याच दिवसांच्या प्रवासानंतर ते ठरलेल्या पवित्र स्थळी जेथे सार्वकालिक आनंद आणि परमेश्वराच्या सहवासाचा अनुभव घेण्यासाठी ते जवळ-जवळ पोहचले होते, पण त्यांना त्या स्थळी पोहोचण्याअगोदर अजून एका अडथळ्याला सामोरे जावे लागणार होते आणि तो अडथळा म्हणजे ह्या टोकापासून स्वर्गाच्या टोकापर्यंत जाण्यास एक भली मोठी दरी त्यांना पार करावी लागणार होती. हे ते कसं करू शकतील ह्याच विचारात ते गुरफटून गेले असता त्यांना समजलं की प्रत्येकाचा क्रूस ही दरी पार करण्यासाठी योग्य त्या मापाचा आहे. त्यांनी तो क्रूस वापरून ती दरी पार केली. परंतु ज्याने आपला क्रूस प्रवासात कापून हलका केला होता, तो क्रुसाच्या अपुऱ्या  मापामुळे पलिकडे न जाता अलीकडेच राहिला; कारण वाटेत असतानाच त्याने दु:खाला सामोरे जाण्यास टाळले होते.

मनन चिंतन:
महान तत्वज्ञानी सॉक्रेटस (Socrates) म्हणतात, The unexamined life is not worth living” (परीक्षण न केलेले जीवन जगण्यास्पद योग्य नाही). “लोक आणि तुम्ही मला कोण म्हणून म्हणता?” येशूचे हे उद्गार ऐकल्यानंतर कोणाच्याही मनात सहज प्रश्न उद्भवेल, ‘येशूला स्वतःविषयी आणि स्वतःच्या ओळखीविषयी निर्माण झालेला हा मानसिक संघर्ष आणि अनिश्चितता होती का? त्याला आपण कोण असल्याची जाण/माहिती नव्हती का?’ पण असं काहीच नाही. खरं पाहता येशूला लोक त्याला ‘कोण’ म्हणून ओळखतात, हे फक्त जाणून घ्यावयाचे होते. येशूला माहित होते की, तो काही जणांसाठी ईश्वर निंदक, तर काहींसाठी भूत आणि वेड लागलेला मनुष्य होता. काहींसाठी तर येशू नियमशास्त्र मोडणारा बंडखोर तर काहींसाठी चमत्कार करणारा, नवजीवन देणारा व चांगले शिकवणारा गुरुदेखील होता. त्याकाळी येशूबरोबर असलेल्या लोकांना येशू ‘कोण’ असल्याची खरी जाणीव नव्हती, त्यांनाच काय तर त्याचे शिष्य जे त्याच्याबरोबर कायमचे असत, त्याचे ऐकत, त्याच्याबरोबर जेवत व त्याच्याबरोबर सर्व ठिकाणी जात असत, त्यांना देखील येशूची खरी ओळख पटली नव्हती. परंतु त्यांच्या माहितीप्रमाणे येशू हा एक सत्यवादी, करुणामय, सद्गुणी आणि न्यायप्रिय व्यक्ती होता आणि त्याच्यासारखा दुसरा त्यांनी त्यांच्या समकालीन युगापर्यंत पाहिला नव्हता.
‘लोक मला कोण म्हणून संबोधतात?’ हा प्रश्न येशूने जर आज विचारला, तर आज त्याच्या ह्या प्रश्नाला काय प्रतिसाद असेल? आज प्रसारमाध्यमांनी इतकी प्रगती केली आहे की, जगाच्या वेगवेगळ्या कानाकोप-यातून उत्तरांचा साठा आला असता. कोणी सांगितलं असतं: ‘तो चमत्कार करणारा’, तर कोणी ‘तो गरिबांना न्याय देणारा’. अजून काही जणांनी सांगितलं असतं, ‘तो वस्तू, नोकरी, घरदार, आजारातून मुक्तता पुरवणारा आणि निसर्गाला आणि विज्ञानाला अशक्य असणा-या गोष्टी सहजपणे साध्य करणारा कोणीतरी अजब मनुष्य आहे.’ असा प्रश्न येशूने का बरं विचारला असावा? ह्याचा विचार आपण कधी केला आहे का? तो ‘ख्रिस्त’, ‘जिवंत देवाचा पुत्र’ आहे ह्याची जाण त्याला नव्हती का? की तो फक्त वस्तू पुरवतो, चमत्कार करतो, रोगमुक्ती देतो एवढ्यापुरतीच त्याची ओळख होती? नाही, येशू ह्याच्या पलीकडचा कोणीतरी आहे, हे त्यांना समजावे म्हणून तो त्यांना प्रश्न विचारतो आणि त्याने दु:ख सहन करावे, मरणाला सामोरे जावे हे लागलेच त्याच्या शिष्यांना शिकवतो. 
दुस-याने दिलेल्या उत्तरांची पुनरावृत्ती करणे सोपे असते परंतु वैयक्तिक उत्तर देण्यासाठी अनुभव, हिंमत आणि धारणा असावी लागते. व्यक्तीच्या अंगी असणा-या विद्वत्तेवरून आणि वक्तृत्वावरून विश्वास ठेवण्याचे जुने दिवस निघून गेलेले आहेत. आज लोक प्रवचनकाराच्या ख-या आणि अस्सल देवानुभावर विश्वास ठेवतात किंवा ज्याच्या वाणीतून ते देव अनुभवतात त्याचेच ते ऐकून घेतात. पोप पौल सहावे हे त्यांचे परिपत्रक (Encyclical) “इवान्गेली नुनशीआंदी” (Evangeli Nuntiandi) मध्ये म्हणतात, “आधुनिक मानव साक्षीदारांचे ऐकतो आणि प्रवचनकाराचे नाही आणि जर का तो प्रवचनकाराचे ऐकत असेल तर तो साक्षीदार असेल म्हणून. आज आपण ख्रिस्त कोण आहे? ह्याबद्दल प्रश्न न विचारता, आपली स्वत: बद्दलची आणि इतरांची आपल्याला काय ओळख आहे? हा प्रश्न विचारने यथायोग्य ठरेल.   आपला नवरा, बायको, मुले, मित्र परिवार, नातेवाईक, शेजारी ह्यांची उत्तरे वेगवेगळी असतील, परंतु हे सर्व आपण कोण असल्याची जाणीव करून देतील.
काही वर्षाअगोदर हिंदी सिनेमात गुंड किंवा दारू विकणारा, छोटे कपडे घालणारी मुलगी, हे सर्व ख्रिस्तीच दाखवले जायचे, हीच आपली ओळख आहे का? समाजात आपण एक ख्रिस्ती आहोत म्हणून ओळखले जाण्यासाठी आपण कसं जीवन जगतो? माझं आचरण चर्चमध्ये एका प्रकारचं आणि चर्चच्या बाहेर वेगळ्या प्रकारचं आहे का? आपल्या चालण्या-बोलण्यावरून  आपली ओळख इतरांसमोर प्रदर्शित केली जाते. आपण कोण आहोत हे जेव्हा आपणाला समजते तेव्हा आपली जबाबदारी काय आहे, आपण कश्याप्रकारे वागलो पाहिजे, समाज आपल्याकडून कशाची अपेक्षा करतो, हे समजायला जास्त वेळ लागत नाही. आपणाला असलेल्या आपल्या स्व-ज्ञानाने व समाजाच्या दृष्टीने आपण कोण आहोत ह्याचे एकमत घेऊन चांगल्या प्रकारचे वर्तन करण्याचा आपण आटोकाट प्रयत्न केला पाहिजे.
आपल्याला पुस्तकी ज्ञानाने येशू कोण होता, दुस-यांसाठी त्याने काय केलं हे सहज सांगता येईल, पण मला त्याचा वैयक्तिक अनुभव आहे का? जर असेल तर मी स्वतःला नाकारून त्याच्यासाठी व त्याच्या प्रेमाखातर कोणत्याही दु:खाला किंवा संकटांना सामोरे जाण्यास मागे कधीच पडू शकत नाही. येशू माझ्यासाठी कोण आहे हे एका दिवसापुरताच मर्यादित नसून संपूर्ण जीवनभर असायला हवं. ख्रिस्ताची खरी प्रतिष्ठा/ कीर्ती, भाकर आणि मासे ह्यांचा चमत्कार करण्यात नव्हती, तर गेथसेमनी बागेतील दु:ख सोसण्यात होती, त्याची प्रतिष्ठा पाण्यावरून चालण्यात नव्हती, तर भारदस्त क्रूस कालवारीपर्यंत वाहून नेण्यात होती, त्याची प्रतिष्ठा दृष्ट आत्म्यांना बाहेर घालवण्यात नव्हती तर क्रूसावर सोसलेल्या क्लेशात होती. खरोखर त्याची प्रतिष्ठा त्याने केलेल्या चमत्कारात नसून त्याच्या क्रूसामध्ये होती. प्रतीष्ठेबरोबरच दु:ख सहन करणे हे ख्रिस्ती व्यक्तीचे महत्वाचे लक्षण होय. आपण जेव्हा लहान मुलांना बघतो तेव्हा त्याच्या/तिच्या कृतीवरून सांगतो की, हा आई किंवा बाबावर गेला आहे, पण आपल्या आचरणावरून कोणी म्हणू शकते का: “हा/ही ख्रिस्तावर गेला आहे म्हणून?”

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभो, तुला ओळखण्यास आम्हांला कृपा दे.
१. ख्रिस्तसभेचे सर्व पुढाकारी ह्यांनी येशू हा कोण आहे, ह्याचा अनुभव आपल्या जीवनात आत्मसात करून, इतरांसाठी एक आदर्श बनावे व त्यांना योग्य ते मार्गदर्शन करावे, म्हणून आपण प्रभूचरणी प्रार्थना करूया. 
२. आपल्या समाजातील, देशातील व सा-या विश्वातील सर्व युवकांना शिक्षणाची आणि नोकरीची संधी उपलब्ध व्हावी, त्यांना योग्य ती मदत सहजासहजी प्राप्त व्हावी, म्हणून आपण प्रभूचरणी प्रार्थना करूया. 
३. जे-जे लोक, विशेषकरून सर्व ख्रिस्ती बंधू-भगिनी ज्यांना येशूच्या नावाखातर अपार दु:खे, यातना आणि संकटांना सामोरे जावे लागत आहे, त्या सर्वांना हा छळ सहन करण्यास परमेश्वराने बळ द्यावे, व जे छळ करत आहेत त्यांचे मन व हृदयाचे परिवर्तन व्हावे, म्हणून आपण प्रभूचरणी प्रार्थना करूया. 
४. जग हे स्वार्थी बनत चालले आहे, हा स्वार्थ बाजूला सारून आपण चांगली कृत्ये करावी. तसेच होईल त्या पद्धतीने गरजवंतांना मदत करावी व आपल्या विश्वासात भर पडण्यासाठी त्यास आपल्या कृतीची जोड असावी, म्हणून आपण प्रभूचरणी प्रार्थना करूया. 
५. आपल्या वैयक्तिक व सामाजिक हेतूंसाठी थोडा वेळ शांत राहून आपण प्रभूचरणी प्रार्थना करूया.