Tuesday 1 September 2015


Reflections for homily of 23rd Sunday in Ordinary Times by: Cajeten Pereira.





तेविसावा रविवार


दिनांक: ६/०९/२०१५.
पहिले वाचन: यशया ३५:४-७.
दुसरे वाचन: याकोब २:१-५.
शुभवर्तमान: मार्क ७:३१-३७.

“त्याने सर्वकाही चांगले केले आहे”



प्रस्तावना:
     आज आपण सामान्यकाळातील तेविसावा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपणाला देवाच्या तारणदायी प्रेमाविषयी आणि आनंदाविषयी स्पष्टीकरण देत आहे.
     पहिल्या वाचनात यशया संदेष्टा भविष्याविषयी उत्तेजनक उत्तर देत म्हणतो, ‘भिऊ नका पहा तुमचा देव; तुमचा उद्धार करावयास येत आहे. अनुरूप असे प्रतिफळ द्यावयास तो येत आहे. दुसऱ्या वाचनात याकोब, देव कोणत्याही प्रकारचा भेदभाव करीत नाही, त्याच्यासाठी सर्वजण सारखेच आहेत अशा प्रकारची ग्वाही देत आहे. तर  शुभवर्तमानात येशू आपल्या कृतीद्वारे देवाच्या चांगुलपणाविषयीची साक्ष देतो, तो त्याच्या  दैवी स्पर्शाने मूक आणि बधीर माणसाला बरे करतो.  
आज येशू आपणा सर्वांना आपल्या हृदयाचे दार उघडे ठेवून इतरांना आदराने वागविण्यासाठी सांगत आहे. आजू-बाजूला घडणाऱ्या गोष्टींची दखल घेऊन अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यास बोलावीत आहे व त्यासाठी लागणारी कृपा-शक्ती आपणास मिळावी म्हणून ह्या मिस्साबलिदानात परमेश्वराकडे प्रार्थना करुया.

सम्यक विवरण:
पहिले वाचन: यशया ३५:४-७.   
इस्रायली लोकांना कैद करून येरुशलेमहून बाबेलास नेले होते. जाताना त्यांना अवजड ओझे घेऊन अनेक दिवसाचा पायी प्रवास करावा लागला. पुरेसे अन्न ग्रहण न केल्यामुळे अनेक जण आजारी पडले. आजारी आणि वृध्द लोकांना मरण्यासाठी रस्त्यावर सोडून दिले जात असे. बाबेलमध्ये पालकांना पाल्यापासून (मुला– बाळांपासून), पतीला पत्नीपासून, भावाला भावापासून वेगळे करण्यात आले. अर्धेपोटी राहून सेवक म्हणून सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करून, रात्री जनावरांच्या जागी झोपावे लागत असे. त्यांचा मालक इतका क्रूरतेने वागवत असे कि, हत्या करण्याचा अधिकारही त्याच्याजवळ होता. इस्रायली लोक त्यांच्या मालकाच्या पूर्णपणे ताब्यात होते.
ह्या संदर्भात संदेष्टा यशया म्हणतो, ‘भिऊ नका, पाहा तुमचा देव तुमचा उद्धार करावयास येत आहे’. याप्रमाणे संदेष्टा इस्रायली लोकांचे बाबेलमधून यरुशलेमला परतण्याचे वर्णन करतो.

दुसरे वाचन: याकोब २:१-५.
ख्रिस्ताला आणि ख्रिस्तसभेला श्रेष्ठ, श्रीमंत आणि प्रतिष्ठित लोकांची गरज नाही; असे नाही तर देव सर्वांवर समान प्रेम करतो. देवाला गरीबांविषयी विशेष आस्था असल्याचे जुन्या करारामध्ये स्पष्टपणे नमूद केलेले आहे (अनु १५; स्तोत्र ३५:१०; निती. १९:१७). देवाचा संदेश गरिबांची बाजू घेतो व धनवानांकडून दारशूरपणाची अपेक्षा ठेवतो. सुवार्तेची घोषणा करताना येशूचा रोख, विशेषकरून गरीब दीनांवरच होता (लूक ४:१८). आपण ज्यांना गरीब म्हणतो, ते केवळ आर्थिक दृष्टीने (म्हणजेच जगाच्या दृष्टीने) गरीब असल्याचे याकोबने स्पष्ट केले आहे. देवासमोर विश्वासाच्या संबंधात सर्वच धनवान आहेत. म्हणूनच ख्रिस्तसभेमध्ये सर्वांचे स्वागत आहे, विशेषतः ज्यांचे स्वागत करावयास कोणीही नाही.

शुभवर्तमान: मार्क ७:३१-३७.
येशू दकापलीस (दहा शहरे) येथे आला. पूर्वी येथेच त्याने अनेक अशुद्ध आत्म्याने पछाडलेल्या माणसाला बरे केले होते (मार्क ५:२०). आता त्याने मुक-बधीर माणसाला बरे केले. केवळ शुद्धच नव्हे, तर त्याने त्याची थुंकी देखील वापरली (मार्क. ८:२३, योहान. ९:६; मार्क. ७:३३) मग येशूने त्या माणसाला, हे कोणाला कळवू नये असे निक्षून सांगितले (मार्क.५:४३;७:३६). येशूला ‘चमत्कार करणारा’ म्हणून प्रसिद्धी नको होती कारण त्याचे मुख्य कार्य लोकांना देवराज्यासंबंधी शिक्षण देऊन देवाचे राज्य प्रस्थापित करण्याचे होते. परंतु येशूने लंगडे, आंधळे, लुळे व मुके लोक बरे केले. मुके बोलतात, व्यंग चांगले होतात, लंगडे चालतात व आंधळे पाहतात हे पाहून लोकांनी आश्चर्य व्यक्त केले (मत्तय १५:३१). यशयाचे भविष्य येशूने पूर्ण केले, “तेव्हा अंधाचे नेत्र उघडतील, बहिऱ्यांचे कान खुले होतील, लंगडे हरणाप्रमाणे उड्या मारतील, मुक्याची जीभ सैल होईल” (यशया: ३५:५-६).
     येशूने केलेला चमत्कार पाहून लोक थक्क होऊन म्हणाले “त्याने सर्वकाही चांगले केले आहे”. उत्पत्तीच्या पुस्तकात निर्मितीच्या सहाव्या दिवसाच्या प्रात:काळी, आपण निर्माण केलेले सर्व काही अगदी चांगले आहे असे देवाने पाहिले (उत्पत्ती १:३१). येशूचे कार्य देवाच्या कौशल्यपुर्वकरीत्या करतो.
·        येशू बरे करतो, तेव्हा तो पूर्णपणे बरे करतो:
     आजच्या शुभवर्तमानात येशूने एका माणसाला बरे केले जो बहिरा व मुका होता. चमत्कारानंतर त्या माणसाचे कान उघडले, जिभेचा बंद सुटला आणि तो स्पष्टपणे ऐकू व बोलू शकला; त्याचा निरोगीपणा पूर्ण होता.
     गरसेकर इथे येशूने भूतग्रस्ताला बरे केले, तेव्हा तो पूर्णत: बरा झाला होता. आपण वाचतो कि, त्या माणसाला बरे केल्यानंतर, तो येशूच्या पायाजवळ बसलेला, वस्र नेसलेला व शुद्धीवर आलेला होता (लूक ८:३५). येशूने जेव्हा बाजेवर आणलेल्या पक्षघाती माणसाला बरे केले तेव्हा तो उठून आपली बाज घेऊन थक्क झालेल्या लोकसमुदायापुढून चालत निधून गेला (मार्क २:१-१२). येशूने वाळलेल्या हाताच्या मनुष्याला बरे केले, त्याक्षणी त्याचा हात दुसऱ्या हातासारखा चांगला झाला (मत्तय १२:९-१३).
     येशूला उद्देशून यशया संदेष्टा म्हणतो, “आमच्या अपराधामुळे तो घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मामुळे तो ठेचला गेला. त्यास बसलेल्या फटक्यांनी आम्हांस आरोग्य प्राप्त झाले. (यशया ५३:५). “येशु आपणाला आरोग्य देण्यास आला होता, आणि जेव्हा आपणांस तो निरोगी करतो. तो पूर्णपणे बरे करतो.

बोधकथा:
            जगातील सर्वात उत्कृष्ट कलाकृतीचा नमुना म्हणजे रोममधील ‘सिस्टाइन देवालयाचे छत’. पोपमहाशय ज्युलीस द्वितीय ह्यांनी मायकल अॅन्जोलोची ह्या चित्रकाराची छत रंगविण्यासाठी निवड केली. परंतु त्याने मात्र विरोध केला कारण तो एक मूर्तिकार होता, चित्रकार नव्हे. त्याच्या विरोधाला न जुमानता पोपमहाशयांनी अवाढव्य कामाची जबाबदारी त्याच्याकडेच सोपवली. विविध चित्रांनी नटलेली एकच प्रकारची कलाकृती, त्याला दहा हजार चौरस फुट छताच्या जागेवर काढायची होती.
हे काम त्याला एकट्याला करावयाचे होते; कारण त्याच्या मदतीला दिलेले पाचही चित्रकार परत पाठविण्यात आले होते. त्यालासुद्धा सोडून जायचे होते, कारण यशाचे किरण त्याच्या हाती लागत नव्हते. त्यांने रंगवलेल्या पहिल्या भागाला बुरशी आली. ह्या त्याच्या अयशस्वी परिश्रमाला कंटाळून, सोडून जाण्यासाठी पोपमहाशयांकडे त्याने भिक मागितली. परंतु पोपमहाशयांनी तत्काळ नकार दिला. ६८ फुट उंचावर हवेत पाठीवर झोपून महिनो न महिने जे काम त्याला करायचे नव्हते ते त्याने केले. ह्या कामासाठी ३४३ आकृत्या त्याला रेखाटाव्या लागल्या, त्यातील काही १८ फुट उंचीच्या होत्या. साडेचार वर्षाच्या वेदनादायक कष्टाचे काम इ.स. १५१२ च्या ऑक्टोबर महिन्यात अनाछादित करण्यात आले. जवळजवळ पाच शतकानंतरही कलेच्या विश्वातील हे एक आश्चर्य म्हणून उभे राहिले आहे. मायकल अॅन्जोलोला काम करायचे नव्हते, परंतु त्यांनी ते केले, तरी आजतागायत ते अप्रतिम असे गणले जाते.

मनन चिंतन:
     परमेश्वर अडचणीत असलेल्या लोकांचे संरक्षण करतो व त्यांना मदत करतो. माणूस जरी गरीब, दिन-दुबळ्यांची पिळवणूक करीत असला तरीही देव पुढे झुकून त्यांना मदत करतो आणि त्यांना न्याय मिळवून देतो. देव येशूमध्ये स्वत:ला प्रकट करतो आणि लोकांच्या स्वभावानुसार कार्य करतो. सृष्टीच्या निर्मितीनंतर देवाने सर्व गोष्टींवर दृष्टी फिरवली आणि सर्वकाही चांगले होते. लोकांनी येशूचा चमत्कार आणि कृत्ये पाहिल्यानंतर थक्क होऊन बोलले, ‘त्याने सर्व काही चांगले केले. बहिऱ्यास ऐकणारे व मुक्यास बोलके असे केले’.
देवाने अतिशय सुंदर सृष्टीची निर्मिती केली व येशूने सर्वकाही चांगले केले. येशूला आपल्या चमत्काराद्वारे प्रसिद्धी नको होती व लोकांचा पुढारी बनायचे नव्हते म्हणून चमत्काराबद्दल कोणाला सांगू नका, असे निक्षून येशूने त्यांस सांगितले. परंतु लोकांनी त्याचे ऐकले नाही. त्याच्या शिकवणुकीबद्दल आणि चमत्कारीक कृत्यांबद्दल बोलले व घोषणादेखील केल्या. येशूच्या दैवी स्पर्शाने लोकांना परिवर्तीत केले. देवाच्या खऱ्या आणि प्रेमळ अनुभवाविषयी बोलण्यास लोकांना कोणीही थांबवू शकत नव्हते. ज्यांनी कोणी येशूशी संबंध साधला, त्या सर्वांना येशूने उत्तेजित केले. ख्रिस्तसभेचा सुरुवातीचा काळ ह्याला साक्ष आहे.
     जगात लोक आज मानसिक आणि अध्यात्मिक दृष्ट्या बहिरे झालेले आहेत, त्यामुळे त्यांना देवाचा आवाज ऐकू येत नाही. जागतिक व्यवसायिक स्पर्धेमुळे त्यांचे मन विचलित होत आहे. स्पर्धीपणा, वैयक्तीकपणा, बेपर्वाई शिगेला पोहचू लागले आहेत. अन्याय जुलूम आणि छळवणूक दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ह्या सर्वांविरुद्ध आवाज उठविण्यासाठी, बंड पुकारण्यासाठी निष्ठावंत व प्रेमळ लोकांची आणि संस्थांची गरज आहे.
     कोणतीही चांगली गोष्ट स्वत्याग आणि स्व-समर्पणाशिवाय मिळवता येत नाही. देवाचे शांतीचे आणि प्रेमाचे राज्य, स्व-त्यागाच्या जमिनीवर उगवून बहरू शकते. सर्व प्रकारच्या वाईटांवर विजय मिळविण्यासाठी आणि भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी, प्रत्येक ख्रिस्ती भाविकाने निस्वार्थी वृत्तीने आणि प्रेमाने गरजवंतांची सेवा केली पाहिजे. त्यासाठी ह्या मिस्साबलीत विशेष कृपा मिळावी म्हणून प्रार्थना करूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद:- हे प्रभो, आमची प्रार्थना ऐक.
१. आपल्या धर्माची धुरा वाहणारे आपले परमगुरुस्वामीमहागुरूस्वामीधर्मगुरू आणि धर्मभगिनी ह्या सर्वांना देवराज्याची मुल्ये आपल्या शब्दांद्वारे व कृत्यांद्वारे जगजाहीर करता यावी व त्यासाठी त्यांना परमेश्वराची कृपा-सामर्थ्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. आपण आपल्या कुटुंबातील व मित्र परिवारातील प्रत्येक व्यक्तीला प्रेमाने व सहनशीलतेने समजून घ्यावे व एक आदर्श ख्रिस्ती जीवन जगावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. ख्रिस्ताच्या मळ्यात कार्य करण्यासाठी आपल्या परिसरातील अनेक तरूण-तरूणींना पुढे येण्यास पवित्र आत्म्याची प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. सर्व पालकांनी आपल्या मुलांना चांगले संस्कार द्यावेत, त्यांना देवराज्याविषयी शिकवण द्यावी, स्वत: परमेश्वराच्या वचनाप्रमाणे व आज्ञेप्रमाणे वागून, मुलांपुढे चांगला आदर्श ठेवावा, म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. आपण आपल्या वैयक्तिक हेतूंसाठी प्रभूकडे प्रार्थना करूया.



    


No comments:

Post a Comment