Tuesday, 8 September 2015


The Reflections for the Homily on the 24th Sunday (13/09/2015) of Ordinary Times, by Botham Patil.









सामान्य काळातील चोविसावा रविवार


दिनांक: १३/०९/२०१५
पहिले वाचन: यशया ५०: ५-९
दुसरे वाचन: याकोब २: १४-१८
शुभवर्तमान: मार्क ८: २७-३५

“तुम्ही मला कोण म्हणून म्हणता?”


प्रस्तावना:
आज आपण सामान्य काळातील चोविसावा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपणाला येशू ख्रिस्ताची ओळख पटवून घेण्यास आमंत्रण करत आहे.
प्रवक्ता यशयाच्या ग्रंथातून घेतलेल्या आजच्या पहिल्या वाचनात ‘मसिहा’ काहीच न बोलता संकटांना सामोरे जातो ह्याविषयीचा संदर्भ देण्यात आला आहे. दुस-या वाचनात याकोब आपणाला ‘विश्वासाबरोबर चांगली कृत्ये देखील महत्वाची आहेत हे ज्ञात करून देत आहे. मार्ककृत शुभवर्तमानात “येशू हा ख्रिस्त आहे”, ह्या पेत्राने येशूविषयी दिलेल्या कबुलीचे वर्णन आपणास ऐकावयास मिळते. पण येशू येथेच न थांबता, प्रत्येकाने म्हणजेच ‘जो कोणी त्याचा अनुयायी होऊ पाहतो, त्याने स्वतःचा क्रूस उचलून आत्मत्याग करण्याचे’ तो आव्हान करतो.
जेव्हा आपण ‘ख्रिस्ताला’ आपल्या जीवनात ‘मसिहा’ म्हणून स्वीकारतो तेव्हा आपले हृदय आनंदाने आणि उल्हासाने भरून जाते, पण हा आनंद सदोदित अनुभवण्यासाठी आपणाला दु:ख, क्लेश आणि यातना ह्या सर्वांना, दररोजच्या जीवनात सामोरे जावेच लागेल. ह्यासाठी आपणा सर्वांना कृपा मिळावी म्हणून आजच्या मिस्साबालीदानामध्ये विशेष प्रार्थना करूया.
        
सम्यक विवरण:
पहिले वाचन: यशया ५०:५-९
अध्याय १ ते ६६ हे यशया प्रवक्त्याचे पुस्तक दिसायला जरी एक असले तरी ते प्रथम (१-३९), द्वितीय (४०-५५) आणि तृतीय (५६-६६) यशया ह्या अध्यायांत विभागलेले आहे. द्वितीय यशयामध्ये (४०-५५) ब-याचश्या कविता/गीते आहेत (चार सेवक कविता/गीते). ही सर्व गीते आपणाला मसिहाविषयी भाकीत करतात. त्यांच्यापैकीच आजचे वाचन हे तिसरे ‘सेवक गीत’ आहे (५०:५-९). यशया जरी येशू येण्याच्या सातशे (७००) वर्षाअगोदर येऊन गेला, तरी त्याने मसिहाविषयी केलेले दु:खसहनाचे भाकीत/भविष्य यथायोग्य आहे. ह्या तिस-या सेवक गीतात यशया प्रवक्ता ‘सेवकाला दुष्टतेला आणि सक्रीय आकस यांना तोंड द्यावे लागत आहे’ असे सांगतो. परंतु पुढे तो म्हणतो, “जो विश्वासात टिकून राहतो, त्याला कितीही दु:खांना किंवा संकटांना सामोरे जावे लागले तरी परमेश्वर त्याची साथ कधीही सोडत नाही आणि त्याला कोणतीही इजा होऊ देत नाही”.

दुसरे वाचन: याकोब २: १४-१८
याकोबाच्या पत्रातून घेतलेला हा उतारा, आपले दररोजचे जीवन व त्या जीवनासाठी आवश्यक वर्तन कसे असावे, ह्याबाबत मार्गदर्शन करत आहे. आपले ख्रिस्ती जीवन हे फक्त तर्क-वितर्क किंवा सिद्धांत नसून ते ख्रिस्ताने केलेल्या प्रकटीकरणावर प्रात्यक्षित असावे असे संत याकोब सांगतो.
काही जणांच्या मते हा उतारा संत याकोब आणि संत पौल ह्यांच्यामधील ‘विश्वास आणि कार्य’ ह्यावरून उद्भवलेल्या गैरसमजाबद्दल, याकोब पौलाला दुरुस्ती/सुधारणा करायला सांगतो असे वाटत असेल, तरी असे काहीच नाही. कारण संत पौलाच्या गोत्यात/जमातीत यहुदी ख्रिस्ती लोक स्वतःच्या तारणासाठी “कायदा” पाळावा ह्यावर जास्त भर देत असत(रोमकरांस पत्र ४: ५-६), म्हणूनच ह्याच्या विरोधात संत पौल “कायदा” विरुद्ध “श्रद्धा/विश्वास” हा प्रबंध मांडतो. पौलाला नक्कीच माहीत होते की खरा विश्वास जीवनात दाखवलेल्या दानशूरपणातून/औदार्यातून वाहतो (गलतीकरांस पत्र ५: ६, १३-१५). याकोबदेखील हेच सूत्र वापरतो, तो म्हणतो, ‘जर आपला विश्वास प्रेमावर आधारित प्रकट केला नाही तर तो निर्जीव आहे’.

शुभवर्तमान: मार्क ८:२७-३५
फिलीप्पी कैसरियाचा प्रदेश गालील प्रांताच्या बाहेरचा आहे. हा प्रदेश हेरोदाच्या हद्दीतला नसून फिल्लीपच्या हद्दीतला होता. ह्या प्रदेशाचा विशिष्ट असा इतिहास म्हणजे: जुन्या काळात ह्या प्रदेशाला ‘बलीनास’ (Balinas) म्हणून संबोधण्यात येई कारण हे ‘बाल देवाच्या’ पूजेचे एक महत्वाचे ठिकाण होते. आज ह्या प्रदेशाला ‘बनीआस’ (Banias) म्हणून ओळखले जाते. ‘बनीआस’ (Banias) हे ‘पनीआस’ (Panias) ह्या शब्दाचे रूप आहे. येथे डोंगराच्या माथ्याशी कपार/गुहा आहे आणि ही कपार ग्रीक देवता ‘पान’ (Pan) म्हणजेच ‘निसर्गाचा देव’ ह्याचे जन्मस्थळ म्हणून मानले जाई. त्यातून एक झरा वाही आणि हा झरा यार्देन नदीचा उगम म्हणून समजला जाई. ह्या कपारीपासून अजून थोड्या वर फिल्लीपने सफेद संगमरवरी दगडाचे एक भव्य-दिव्य मंदिर बांधून पूज्यनीय व्यक्ती रोमी सम्राट कैसर, ज्याला त्याकाळी संपूर्ण विश्वाचा देव म्हणून मानीत त्याला समर्पित केले होते. ह्याच फिल्लीपी कैसरीयाच्या प्रदेशात एक सुताराचा मुलगा येशू ह्याला पेत्र ‘देवाचा पुत्र’ किंवा ‘मसिहा’ म्हणून ओळखतो. जणूकाही मोठ-मोठ्या राजा-सम्राटांनी भरलेला अवाढव्य इतिहास असलेल्या ह्या प्रदेशात येशूदेखील एक राजकीय नेता बनेल आणि सर्व लोकांची गुलामगिरीतून सुटका करेल, ह्या हेतूने पेत्राकडून निघालेले हे उद्गार असावेत.
“लोक मला कोण म्हणून म्हणतात?”: शिष्य येशूबरोबर जवळ-जवळ तीन वर्षे होते. त्यांनी येशूची शिकवण, त्याने केलेले चमत्कार, रोग्यांना देलेले आरोग्य हे जवळून अनुभवलं होत. इतक्या ह्या तीन वर्षाच्या अनुभवानंतर येशू कोण असेल, ह्याची कल्पना त्यांनी त्यांच्या मनात नक्कीच केली असेल; त्याचबरोबर इतर लोक त्याच्याबद्दल काय म्हणतात हेदेखील ऐकले असेल. अशा ह्या परिस्थितीत येशू त्यांना प्रश्न विचारतो. लोकांनी बाप्तिस्मा करणा-या योहानाला बघितलं होत, पण हेरोदाने त्याचा वध केला होता, म्हणून आता पुन्हा एकदा तोच उठला असावा किंवा इ.स. पूर्व ९००-८५० ह्या काळात एलिया प्रवक्ता होऊन गेला होता तो मसिहा येण्याची तयारी करण्यासाठी आला असावा असे लोकांना वाटले आणि जेव्हा लोकांनी येशूचे जीवन पाहिले, तेव्हा हाच तो असावा किंवा होऊन गेलेल्या प्रवक्त्यांपैकी कोणी एक आलेला असावा असे शिष्य येशूला त्याची ओळख करून देतात.
“तुम्ही मला कोण म्हणून म्हणता?”: आतापर्यंत फक्त सैतान आणि अशुद्ध आत्मे ह्यांनीच येशूची ‘देवाचा पुत्र’ म्हणून ओळख दिली होती (मत्तय ४:३, ८:२९; मार्क १:२४, ३:११). तद्नंतर शिष्यांनी येशूला लोक कोण म्हणून ओळखतात असे विचारल्यावर हा प्रवक्ता किंवा तो अमुक व्यक्ती अशी दुस-यांना असलेल्या कल्पनेची उत्तरे दिली पण येशू इथवर थांबला नाही, त्याने त्यांना आता एकदम सोपा वाटणारा पण उत्तर देण्यासाठी तितकाच चिवट आणि तारेवर चालण्याची कसरत करायला लावणारा प्रश्न विचारला. कोणीही त्याच्या ह्या प्रश्नाला उत्तर देऊ शकले नाही, पण पेत्राने लागलेच, ‘आपण ख्रिस्त (मसिहा) आहात’ असे सांगितले (मसिहा: तेलाने अभिषिक्त केलेला, निवडलेला). येशूने हे सत्य कोणालाही सांगू नका ह्याची ताकीद दिली कारण दुस-यांना तोंडाने सांगण्यापेक्षा, त्यांनी स्वतःहून हे अनुभवावं हा त्यामागचा हेतू असावा.     
सैताना माझ्या पुढून चालता हो: जो व्यक्ती आपल्या दैनंदिन जीवनाच्या प्रवासात बाधा आणतो, त्याला आपण सैतान म्हणतो परंतु येशूच्या काळी सैतानाचा अर्थ म्हणजे शत्रू किंवा प्रतिस्पर्धी असा होता. येशू मानवाच्या तारणासाठी आपला प्राण समर्पित करणार होता परंतु पेत्र त्याला प्रतिकार करतो किंवा ह्या कार्यात येशूच्या समोर शत्रू बनून येतो, म्हणूनच येशू पेत्राला, ‘सैताना, माझ्यापासून दूर हो’ असे म्हणतो.

बोधकथा:
१.     एक लष्करी पुढारी एकदम कडक शिस्तीचा होता. त्याचं शिस्तीसाठी इतकं नाव होत की, सारे सैनिक त्याच्या नावानेच कापत असत. घरी सुट्टीला आल्यावरदेखील त्याचा ह्याच प्रकारचा स्वभाव असे. सर्व शेजारी-पाजारी देखील त्याच्या ह्या स्वभावाला चांगलेच ओळखून होते. एके दिवशी त्याची पत्नी त्याला रागाने म्हणाली, “तुम्ही इतके शिस्त पाळण्यात कडक आहात, लोक तुमच्या ह्या शिस्तप्रिय वागणुकीने त्यांच्या जीवनातदेखील शिस्त आणण्याचा प्रयत्न करतात, पण ह्याचा फायदा काय? आपली चार वर्षाची लहान मुलगी तुम्हाला घाबरत देखील नाही, ती सारखी इकडे-तिकडे नाचत असते, उड्या मारत असते, मग ह्या शिस्तीचा उपयोग काय?” पत्नीचे हे बोल ऐकून आपल्या लहान मुलीला त्याने ताब्यात आणण्याचे ठरवलं.
संध्याकाळी जेव्हा त्याची मुलगी त्याच्याकडे हसत-खेळत आली, तेव्हा तो तिला सिंहासारख्या गर्जनेने म्हणाला, “आजपासून तू मला हाक मारशील किंवा काहीही बोलशील तर तुझ्या प्रत्येक वाक्याची सुरवात आणि शेवट ‘सर’ ह्या शब्दाने करायचा आणि मगच काही सांगायचे असेल तर सांगायचे.” सकारात्मक मान हलवून मुलीने तसे करण्याचे वचन दिले. तिचे संभाषण नेहमी असे असायचे, “सर, आज मला आईस्क्रीम मिळेल का, सर?, सर, मी टी.व्ही. पाहू का सर?” आणि असेच दिवस जात होते. एके दिवशी वडील कुठेतरी बाहेर जात होते तेव्हा तिने आपल्या वडिलांना विचारले, “सर, मीदेखील तुमच्याबरोबर बाहेर येऊ का?” जर मागच्या सीटवर बसशील तर तुला माझ्याबरोबर घेऊन जाईन, असे वचन तिच्याकडून घेऊन, हे गृहस्थ आपल्या चिमुकल्या मुलीला बरोबर बाहेर घेऊन गेले. अर्ध्या वाटेत असताना तिने मागच्या सीटवरून आपल्या वडीलांच्या खांद्यावर हात ठेवून ‘सर’ म्हणाली व काही क्षण स्तब्ध झाली व थोड्या वेळानंतर म्हणाली, “आय लव्ह यू, पप्पा”. हे ऐकताच त्या शिस्त प्रिय लष्करी पुढा-याच्या डोळ्यांतील अश्रू आवरले नाहीत.
(टीप: आपण प्रत्येकजण कोणासाठी कोणीतरी आहोत. कोणासाठी मुलगा, भाऊ, पती, वडील किंवा कोणाचा तरी आदर्श. शिस्त असणे हे वाईट नाही परंतु आपल्याला आपली खरी ओळख/जाण आहे का? की ही जाण दुस-या कोणी करून देणे गरजेचे आहे?)
   
२.     एकदा काही भक्तिमान लोक क्रूस वाहून यात्रा करीत होते परंतु हे क्रूस वाहून नेणं तितकं सोपं नव्हतं. ही यात्रा अपार कष्ट, दु:ख आणि विव्हळणं याने भरलेली होती कारण हा क्रूस शेवटपर्यंत वाहून नेण्यासाठी फार जड होता. अशावेळी एका यात्रेकरुने आपल्या खांद्यावरील वजन हलके करण्यासाठी त्या क्रूसाचा काही भाग कापून टाकला.
ब-याच दिवसांच्या प्रवासानंतर ते ठरलेल्या पवित्र स्थळी जेथे सार्वकालिक आनंद आणि परमेश्वराच्या सहवासाचा अनुभव घेण्यासाठी ते जवळ-जवळ पोहचले होते, पण त्यांना त्या स्थळी पोहोचण्याअगोदर अजून एका अडथळ्याला सामोरे जावे लागणार होते आणि तो अडथळा म्हणजे ह्या टोकापासून स्वर्गाच्या टोकापर्यंत जाण्यास एक भली मोठी दरी त्यांना पार करावी लागणार होती. हे ते कसं करू शकतील ह्याच विचारात ते गुरफटून गेले असता त्यांना समजलं की प्रत्येकाचा क्रूस ही दरी पार करण्यासाठी योग्य त्या मापाचा आहे. त्यांनी तो क्रूस वापरून ती दरी पार केली. परंतु ज्याने आपला क्रूस प्रवासात कापून हलका केला होता, तो क्रुसाच्या अपुऱ्या  मापामुळे पलिकडे न जाता अलीकडेच राहिला; कारण वाटेत असतानाच त्याने दु:खाला सामोरे जाण्यास टाळले होते.

मनन चिंतन:
महान तत्वज्ञानी सॉक्रेटस (Socrates) म्हणतात, The unexamined life is not worth living” (परीक्षण न केलेले जीवन जगण्यास्पद योग्य नाही). “लोक आणि तुम्ही मला कोण म्हणून म्हणता?” येशूचे हे उद्गार ऐकल्यानंतर कोणाच्याही मनात सहज प्रश्न उद्भवेल, ‘येशूला स्वतःविषयी आणि स्वतःच्या ओळखीविषयी निर्माण झालेला हा मानसिक संघर्ष आणि अनिश्चितता होती का? त्याला आपण कोण असल्याची जाण/माहिती नव्हती का?’ पण असं काहीच नाही. खरं पाहता येशूला लोक त्याला ‘कोण’ म्हणून ओळखतात, हे फक्त जाणून घ्यावयाचे होते. येशूला माहित होते की, तो काही जणांसाठी ईश्वर निंदक, तर काहींसाठी भूत आणि वेड लागलेला मनुष्य होता. काहींसाठी तर येशू नियमशास्त्र मोडणारा बंडखोर तर काहींसाठी चमत्कार करणारा, नवजीवन देणारा व चांगले शिकवणारा गुरुदेखील होता. त्याकाळी येशूबरोबर असलेल्या लोकांना येशू ‘कोण’ असल्याची खरी जाणीव नव्हती, त्यांनाच काय तर त्याचे शिष्य जे त्याच्याबरोबर कायमचे असत, त्याचे ऐकत, त्याच्याबरोबर जेवत व त्याच्याबरोबर सर्व ठिकाणी जात असत, त्यांना देखील येशूची खरी ओळख पटली नव्हती. परंतु त्यांच्या माहितीप्रमाणे येशू हा एक सत्यवादी, करुणामय, सद्गुणी आणि न्यायप्रिय व्यक्ती होता आणि त्याच्यासारखा दुसरा त्यांनी त्यांच्या समकालीन युगापर्यंत पाहिला नव्हता.
‘लोक मला कोण म्हणून संबोधतात?’ हा प्रश्न येशूने जर आज विचारला, तर आज त्याच्या ह्या प्रश्नाला काय प्रतिसाद असेल? आज प्रसारमाध्यमांनी इतकी प्रगती केली आहे की, जगाच्या वेगवेगळ्या कानाकोप-यातून उत्तरांचा साठा आला असता. कोणी सांगितलं असतं: ‘तो चमत्कार करणारा’, तर कोणी ‘तो गरिबांना न्याय देणारा’. अजून काही जणांनी सांगितलं असतं, ‘तो वस्तू, नोकरी, घरदार, आजारातून मुक्तता पुरवणारा आणि निसर्गाला आणि विज्ञानाला अशक्य असणा-या गोष्टी सहजपणे साध्य करणारा कोणीतरी अजब मनुष्य आहे.’ असा प्रश्न येशूने का बरं विचारला असावा? ह्याचा विचार आपण कधी केला आहे का? तो ‘ख्रिस्त’, ‘जिवंत देवाचा पुत्र’ आहे ह्याची जाण त्याला नव्हती का? की तो फक्त वस्तू पुरवतो, चमत्कार करतो, रोगमुक्ती देतो एवढ्यापुरतीच त्याची ओळख होती? नाही, येशू ह्याच्या पलीकडचा कोणीतरी आहे, हे त्यांना समजावे म्हणून तो त्यांना प्रश्न विचारतो आणि त्याने दु:ख सहन करावे, मरणाला सामोरे जावे हे लागलेच त्याच्या शिष्यांना शिकवतो. 
दुस-याने दिलेल्या उत्तरांची पुनरावृत्ती करणे सोपे असते परंतु वैयक्तिक उत्तर देण्यासाठी अनुभव, हिंमत आणि धारणा असावी लागते. व्यक्तीच्या अंगी असणा-या विद्वत्तेवरून आणि वक्तृत्वावरून विश्वास ठेवण्याचे जुने दिवस निघून गेलेले आहेत. आज लोक प्रवचनकाराच्या ख-या आणि अस्सल देवानुभावर विश्वास ठेवतात किंवा ज्याच्या वाणीतून ते देव अनुभवतात त्याचेच ते ऐकून घेतात. पोप पौल सहावे हे त्यांचे परिपत्रक (Encyclical) “इवान्गेली नुनशीआंदी” (Evangeli Nuntiandi) मध्ये म्हणतात, “आधुनिक मानव साक्षीदारांचे ऐकतो आणि प्रवचनकाराचे नाही आणि जर का तो प्रवचनकाराचे ऐकत असेल तर तो साक्षीदार असेल म्हणून. आज आपण ख्रिस्त कोण आहे? ह्याबद्दल प्रश्न न विचारता, आपली स्वत: बद्दलची आणि इतरांची आपल्याला काय ओळख आहे? हा प्रश्न विचारने यथायोग्य ठरेल.   आपला नवरा, बायको, मुले, मित्र परिवार, नातेवाईक, शेजारी ह्यांची उत्तरे वेगवेगळी असतील, परंतु हे सर्व आपण कोण असल्याची जाणीव करून देतील.
काही वर्षाअगोदर हिंदी सिनेमात गुंड किंवा दारू विकणारा, छोटे कपडे घालणारी मुलगी, हे सर्व ख्रिस्तीच दाखवले जायचे, हीच आपली ओळख आहे का? समाजात आपण एक ख्रिस्ती आहोत म्हणून ओळखले जाण्यासाठी आपण कसं जीवन जगतो? माझं आचरण चर्चमध्ये एका प्रकारचं आणि चर्चच्या बाहेर वेगळ्या प्रकारचं आहे का? आपल्या चालण्या-बोलण्यावरून  आपली ओळख इतरांसमोर प्रदर्शित केली जाते. आपण कोण आहोत हे जेव्हा आपणाला समजते तेव्हा आपली जबाबदारी काय आहे, आपण कश्याप्रकारे वागलो पाहिजे, समाज आपल्याकडून कशाची अपेक्षा करतो, हे समजायला जास्त वेळ लागत नाही. आपणाला असलेल्या आपल्या स्व-ज्ञानाने व समाजाच्या दृष्टीने आपण कोण आहोत ह्याचे एकमत घेऊन चांगल्या प्रकारचे वर्तन करण्याचा आपण आटोकाट प्रयत्न केला पाहिजे.
आपल्याला पुस्तकी ज्ञानाने येशू कोण होता, दुस-यांसाठी त्याने काय केलं हे सहज सांगता येईल, पण मला त्याचा वैयक्तिक अनुभव आहे का? जर असेल तर मी स्वतःला नाकारून त्याच्यासाठी व त्याच्या प्रेमाखातर कोणत्याही दु:खाला किंवा संकटांना सामोरे जाण्यास मागे कधीच पडू शकत नाही. येशू माझ्यासाठी कोण आहे हे एका दिवसापुरताच मर्यादित नसून संपूर्ण जीवनभर असायला हवं. ख्रिस्ताची खरी प्रतिष्ठा/ कीर्ती, भाकर आणि मासे ह्यांचा चमत्कार करण्यात नव्हती, तर गेथसेमनी बागेतील दु:ख सोसण्यात होती, त्याची प्रतिष्ठा पाण्यावरून चालण्यात नव्हती, तर भारदस्त क्रूस कालवारीपर्यंत वाहून नेण्यात होती, त्याची प्रतिष्ठा दृष्ट आत्म्यांना बाहेर घालवण्यात नव्हती तर क्रूसावर सोसलेल्या क्लेशात होती. खरोखर त्याची प्रतिष्ठा त्याने केलेल्या चमत्कारात नसून त्याच्या क्रूसामध्ये होती. प्रतीष्ठेबरोबरच दु:ख सहन करणे हे ख्रिस्ती व्यक्तीचे महत्वाचे लक्षण होय. आपण जेव्हा लहान मुलांना बघतो तेव्हा त्याच्या/तिच्या कृतीवरून सांगतो की, हा आई किंवा बाबावर गेला आहे, पण आपल्या आचरणावरून कोणी म्हणू शकते का: “हा/ही ख्रिस्तावर गेला आहे म्हणून?”

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभो, तुला ओळखण्यास आम्हांला कृपा दे.
१. ख्रिस्तसभेचे सर्व पुढाकारी ह्यांनी येशू हा कोण आहे, ह्याचा अनुभव आपल्या जीवनात आत्मसात करून, इतरांसाठी एक आदर्श बनावे व त्यांना योग्य ते मार्गदर्शन करावे, म्हणून आपण प्रभूचरणी प्रार्थना करूया. 
२. आपल्या समाजातील, देशातील व सा-या विश्वातील सर्व युवकांना शिक्षणाची आणि नोकरीची संधी उपलब्ध व्हावी, त्यांना योग्य ती मदत सहजासहजी प्राप्त व्हावी, म्हणून आपण प्रभूचरणी प्रार्थना करूया. 
३. जे-जे लोक, विशेषकरून सर्व ख्रिस्ती बंधू-भगिनी ज्यांना येशूच्या नावाखातर अपार दु:खे, यातना आणि संकटांना सामोरे जावे लागत आहे, त्या सर्वांना हा छळ सहन करण्यास परमेश्वराने बळ द्यावे, व जे छळ करत आहेत त्यांचे मन व हृदयाचे परिवर्तन व्हावे, म्हणून आपण प्रभूचरणी प्रार्थना करूया. 
४. जग हे स्वार्थी बनत चालले आहे, हा स्वार्थ बाजूला सारून आपण चांगली कृत्ये करावी. तसेच होईल त्या पद्धतीने गरजवंतांना मदत करावी व आपल्या विश्वासात भर पडण्यासाठी त्यास आपल्या कृतीची जोड असावी, म्हणून आपण प्रभूचरणी प्रार्थना करूया. 
५. आपल्या वैयक्तिक व सामाजिक हेतूंसाठी थोडा वेळ शांत राहून आपण प्रभूचरणी प्रार्थना करूया. 







     

1 comment: